स्थिर राहा, आणि जीवनाच्या शर्यतीत जिंका
स्थिर राहा, आणि जीवनाच्या शर्यतीत जिंका
समजा तुम्हाला वादळी समुद्रातून प्रवास करायचा आहे, तर तुम्ही कशाप्रकारचे जहाज निवडाल? तुम्ही लहानशी होडी पसंत कराल, की एक मजबूत, उत्तमरित्या बांधलेले जहाज निवडाल? निश्चितच तुम्ही जहाज निवडाल कारण समुद्राच्या भयंकर लाटांचा सामना तेच अधिक चांगल्यारितीने करू शकेल.
या वादळी व धोकेदायक व्यवस्थीकरणातून प्रवास करत असताना आपल्याला अनेक बेचैन करणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. उदाहरणार्थ, काही तरुण जगातल्या गोंधळात पाडणाऱ्या विचारधारा आणि बदलते प्रवाह यांत गटांगळ्या खाऊ लागतात; त्यांना असुरक्षित वाटते. अलीकडेच ख्रिस्ती मार्गाक्रमण करण्यास सुरवात केलेल्या व्यक्तींना अजूनही काहीसे अस्थिर वाटू शकते. तर अनेक वर्षांपासून देवाच्या विश्वासू सेवेत स्थिरावलेल्या काही व्यक्तींनाही आपल्या अपेक्षा अद्याप पूर्णपणे वास्तवात न उतरल्यामुळे एका आव्हानाला तोंड द्यावे लागत असेल.
अशा या भावना नवीन नाहीत. मोशे, ईयोब व दावीद यांसारखे यहोवाचे विश्वासू सेवक देखील काही वेळा काहीसे अस्थिर झाले. (गणना ११:१४, १५; ईयोब ३:१-४; स्तोत्र ५५:४) तरीसुद्धा, यहोवाची सातत्यपूर्ण भक्ती हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ठ्य होते. त्यांचे उत्तम उदाहरण आपल्यालाही स्थिर राहण्याचे प्रोत्साहन देते पण दियाबल सैतान मात्र आपल्याला सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीतून विचलित करू इच्छितो. (लूक २२:३१) तर मग आपण स्थिर व “विश्वासात दृढ” कसे राहू शकतो? (१ पेत्र ५:९) आणि आपल्या सहविश्वासू बांधवांना आपण कसे पाठबळ देऊ शकतो?
आपण स्थिर राहावे ही यहोवाची इच्छा
आपण यहोवाला विश्वासू राहिल्यास तो आपल्याला आपले स्थैर्य कायम ठेवण्यास मदत करण्यासाठी नेहमी पाठीशी राहील. स्तोत्रकर्त्या दाविदाने अनेक आव्हानात्मक प्रसंगांना तोंड दिले पण त्याने यहोवाची आस धरली आणि म्हणूनच तो असे गाऊ शकला: “नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले, माझे पाय खडकावर ठेविले आणि माझी पावले स्थिर केली.”—स्तोत्र ४०:२.
यहोवा आपल्याला ‘विश्वासासंबंधीचे सुयुद्ध’ करण्यास सामर्थ्य देतो, जेणेकरून आपण ‘युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धरू शकतो.’ (१ तीमथ्य ६:१२) आपण स्थिर राहून या आत्मिक युद्धात विजयी व्हावे म्हणून त्याने मदत देखील पुरवली आहे. प्रेषित पौलाने सहख्रिस्ती बांधवांना ‘प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जाण्याचे’ व ‘सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करण्याचे’ प्रोत्साहन दिले. (इफिसकर ६:१०-१७) पण कोणत्या गोष्टी आपल्याला अस्थिर करू शकतात? आणि अशा धोकेदायक प्रभावांपासून आपण कशाप्रकारे सुरक्षित राहू शकतो?
अस्थिर करणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा
ही महत्त्वाची वस्तुस्थिती आठवणीत ठेवणे शहाणपणाचे ठरेल: आपण जे निर्णय घेतो ते आज न उद्या आपल्या ख्रिस्ती
स्थैर्यावर एकतर चांगला किंवा वाईट परिणाम करतील. तरुणांना व्यवसाय, पुढील शिक्षण, आणि विवाह यासंबंधी निर्णय घ्यावे लागतात. प्रौढांना कदाचित, दुसऱ्या ठिकाणी स्थायिक व्हावे का किंवा अतिरिक्त नोकरी करावी का यांसारखे निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या वेळेचा कसा उपयोग करावा आणि इतर अनेक गोष्टींसंबंधी आपण सर्वजण दररोज कितीतरी निर्णय घेत असतो. देवाचे सेवक या नात्याने आपल्या स्थैर्याला हातभार लावतील अशाप्रकारचे सुज्ञ निर्णय घेण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत मिळेल? अनेक वर्षांपासून सेवा करणाऱ्या एका ख्रिस्ती बहिणीने म्हटले: “निर्णय घेताना मी यहोवाची मदत मागते. यासोबत बायबलमधून, ख्रिस्ती सभांतून, वडिलांकडून आणि बायबलवर आधारित असलेल्या प्रकाशनांतून मिळणारा सल्ला स्वीकारून त्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.”निर्णय घेताना आपण स्वतःला हा प्रश्न विचारणे श्रेयस्कर ठरेल: ‘मी आज जो निर्णय घेत आहे त्याविषयी आजपासून पाच किंवा दहा वर्षांनंतर मी समाधानी असेन का, की मला पस्तावा होईल? माझ्या निर्णयांमुळे मी आध्यात्मिकरित्या अस्थिर होण्याऐवजी ते माझ्या आध्यात्मिक प्रगतीला हातभार लावतील याची मी खात्री करण्याचा प्रयत्न करतो का?’—फिलिप्पैकर ३:१६.
मोहांना बळी पडून किंवा देवाच्या नियमांचे थेट उल्लंघन न करता तेथपर्यंत स्वतःला येऊ देण्याद्वारे काही बाप्तिस्मा झालेल्या व्यक्ती देखील अस्थिर जीवन जगू लागल्या आहेत. पश्चात्ताप न करता पापाच्या मार्गात चालत राहिल्यामुळे बहिष्कृत करण्यात आलेल्यांपैकी काहींनी पुनःस्थापित होण्याकरता बरीच मेहनत घेतली पण त्यांना त्याचप्रकारच्या चुकीमुळे पुन्हा बहिष्कृत करण्यात आले; काही उदाहरणांत तर पुनःस्थापित केल्यानंतर काही काळातच या व्यक्तींना पुन्हा बहिष्कृत करण्यात आले. ‘वाईटाचा वीट मानून बऱ्याला चिकटून राहण्याकरता’ या व्यक्तींनी देवाला मदतीकरता प्रार्थना केली नाही अशी शक्यता आहे का? (रोमकर १२:९; स्तोत्र ९७:१०) आपण सर्वांनी ‘आपल्या पायांसाठी सरळ वाटा करण्याची’ गरज आहे. (इब्री लोकांस १२:१३) आपल्याला आपले आध्यात्मिक स्थैर्य टिकवून ठेवण्यास मदत करतील असे काही मुद्दे आता आपण विचारात घेऊ.
ख्रिस्ती कार्याद्वारे स्थिर राहा
जीवनाच्या शर्यतीत स्थिर गतीने धावत राहणे हे राज्याच्या प्रचार कार्याशी निगडीत आहे. होय, आपले ख्रिस्ती सेवाकार्य आपल्या मनाला व अंतःकरणाला देवाची इच्छा करण्यावर व सार्वकालिक जीवनाच्या बक्षीसावर आपले लक्ष केंद्रित ठेवण्याकरता एक बहुमोल सहायक आहे. या संदर्भात पौलाने करिंथकरांना असे आर्जवले: “माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.” (१ करिंथकर १५:५८) “स्थिर” याचा अर्थ ‘एका ठिकाणी कायम.’ “अढळ” या शब्दावरून ‘बांधलेल्या जागेवरून स्वतःला न सुटू देणे’ असा अर्थबोध मिळतो. त्याअर्थी, आपल्या सेवाकार्यात गुंतून राहिल्याने आपण ख्रिस्ती मार्गात स्थिर राहू शकतो. इतरांना यहोवाबद्दल जाणून घेण्यास मदत केल्याने आपले जीवन अर्थपूर्ण बनते व आपल्याला आनंद मिळतो.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
पॉलीन या ख्रिस्ती बहिणीने एक मिशनरी या नात्याने व इतर प्रकारच्या पूर्णवेळेच्या सेवेत ३० पेक्षा अधिक वर्षे खर्च केली आहेत; ती सांगते: “सेवाकार्य एक सुरक्षा आहे कारण इतरांना साक्ष दिल्याने मला खात्री पटते की माझ्याजवळ सत्य आहे.” उपासनेकरता सभांना उपस्थित राहणे व परिश्रमी वैयक्तिक बायबल अभ्यास करणे यांसारख्या इतर ख्रिस्ती कार्यांमुळेही अशाच प्रकारे सत्याविषयी खात्री पटते.
प्रेमळ बंधुत्वाद्वारे स्थिर केले जाणे
खऱ्या उपासकांच्या जगव्याप्त संघटनेचा भाग असल्यामुळेही आपण अधिक स्थिर होऊ शकतो. एका प्रेमळ, जागतिक बंधुसमाजासोबत सहवासाची संधी मिळणे हा किती मोठा आशीर्वाद आहे! (१ पेत्र २:१७) आणि आपण देखील आपल्या सहविश्वासू बांधवांना स्थिर होण्यास मदत करू शकतो.
सात्विक पुरुष ईयोब याच्या परोपकारांवर जरा लक्ष द्या. खोटा सांत्वनदाता एलिफज याला देखील पुढीलप्रमाणे कबूल करावे लागले: “तुझ्या शब्दांनी ठेंचाळत असलेल्यांस धीर दिला आहे. लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत.” (ईयोब ४:४) याबाबतीत आपण कसे आहोत? आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींना देवाच्या सेवेत टिकून राहण्याकरता मदत करण्याची आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यांच्याशी व्यवहार करत असताना आपण पुढील शब्दांप्रमाणे कृती करू शकतो: “गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.” (यशया ३५:३) ख्रिस्ती बांधवांशी जेव्हाही भेट होते तेव्हा निदान एक किंवा दोन सहविश्वासू बांधवांना प्रोत्साहन व उत्तेजन देण्याचे ध्येय तुम्हाला ठेवता येईल का? (इब्री लोकांस १०:२४, २५) प्रशंसेचे प्रोत्साहनदायक शब्द आणि यहोवाला संतुष्ट करण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे त्यांना स्थिर राहून जीवनाच्या शर्यतीत जिंकण्यासाठी अवश्य मदत मिळेल.
नवीन लोकांना प्रोत्साहन देण्याद्वारे ख्रिस्ती वडील बरेच काही साध्य करू शकतात. कदाचित ते सहायक सूचना किंवा योग्य शास्त्रवचनीय सल्ला देण्याद्वारे अथवा त्यांच्यासोबत क्षेत्रसेवेत कार्य करण्याद्वारे असे करू शकतात. प्रेषित पौलाने इतरांना प्रोत्साहन देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा उचलला. रोममधील ख्रिश्चनांना आध्यात्मिक बळ देता यावे म्हणून त्याला त्यांना भेटण्याची उत्कंठा लागली होती. (रोमकर १:११) फिलिप्पै येथील त्याच्या प्रिय बंधू व भगिनींना त्याने “तुम्ही माझा आनंद व मुकुट आहा” असे म्हटले आणि “प्रभुमध्ये तसेच स्थिर राहा” असे त्यांना प्रोत्साहन दिले. (फिलिप्पैकर ४:१) थेस्सलनिका येथील बांधवांना खडतर परिस्थितीतून जावे लागत आहे हे ऐकल्यावर पौलाने तीमथ्याला त्यांच्याकडे यासाठी पाठवले की ‘त्याने त्यांना स्थिर करावे [जेणेकरून] ह्या संकटात कोणी घाबरू नये.’—१ थेस्सलनीकाकर ३:१-३.
प्रेषित पौल व पेत्र यांनी आपल्या सह उपासकांच्या विश्वासू सेवेची कदर बाळगली आणि याबद्दल त्यांची प्रशंसा केली. (कलस्सैकर २:५; १ थेस्सलनीकाकर ३:७, ८; २ पेत्र १:१२) आपणही त्यांच्यासारखेच आपल्या बांधवांच्या दोषांवर नव्हे तर त्यांच्या चांगल्या गुणांवर आणि स्थिर राहून यहोवाचे गौरव करण्याच्या आव्हानाला ते कशाप्रकारे यशस्वीरित्या तोंड देत आहेत यावर अधिक लक्ष द्यावे.
आपण नकारात्मक प्रवृत्ती दाखवली किंवा टीका करत राहिलो तर नकळत आपण काहीजणांकरता विश्वासात स्थिर राहणे दुर्धर बनवू शकतो. या व्यवस्थीकरणात आपले बांधव “गांजलेले व पांगलेले” आहेत हे आपण नेहमी आठवणीत ठेवणे किती योग्य आहे. (मत्तय ९:३६) ख्रिस्ती मंडळीत ते जर सांत्वन व विश्राम मिळवण्याची अपेक्षा करतात तर हा त्यांचा हक्क आहे. तेव्हा आपण सर्वजण आपल्या सहविश्वासू बांधवांना उत्तेजन देण्याकरता व स्थिर राहण्यास त्यांना मदत करण्याकरता प्रयत्नांची पराकाष्टा करू या.
कधीकधी इतरजण आपल्याशी अशाप्रकारे वागतील ज्यामुळे आपण अस्थिर होण्याची शक्यता आहे. पण कोणाच्या अविचारी शब्दांमुळे अथवा कृतीमुळे आपण स्वतःला यहोवाच्या सेवेत मंद होऊ द्यावे का? आपण कोणालाही आपले स्थैर्य आपल्यापासून हिरावून घेण्याची अनुमती देऊ नये.—२ पेत्र ३:१७.
देवाची अभिवचने—स्थैर्याला पोषक
राज्य शासनाखाली एका अद्भुत भविष्याबद्दल यहोवाने दिलेली प्रतिज्ञा आपल्याला अशी एक आशा देते जिच्यामुळे आपल्याला आपले स्थैर्य टिकवून ठेवण्यास साहाय्य मिळते. (इब्री लोकांस ६:१९) आणि देव नेहमी आपल्या प्रतिज्ञा पूर्ण करतो ही खात्री आपल्याला ‘सावध असण्याची व विश्वासात स्थिर राहण्याची’ प्रेरणा देते. (१ करिंथकर १६:१३; इब्री लोकांस ३:६) देवाच्या प्रतिज्ञांपैकी काहींची पूर्णता होण्यास उशीर लागत आहे असे वाटल्यास आपल्या विश्वासाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोट्या शिकवणुकींमुळे पथभ्रष्ट न होण्याविषयी आणि आपल्या आशेपासून न बहकण्याविषयी नेहमी सावध राहणे आवश्यक आहे.—कलस्सैकर १:२३; इब्री लोकांस १३:९.
यहोवाच्या प्रतिज्ञांवर विश्वास नसल्यामुळे नाश झालेल्या इस्राएलांच्या वाईट उदाहरणाने आपल्याला सावध केले पाहिजे. (स्तोत्र ७८:३७) त्यांच्याप्रमाणे होण्याऐवजी आपण स्थिर राहावे आणि या शेवटल्या काळाच्या निकडीची जाणीव ठेवून देवाची सेवा करावी. एका अनुभवी वडिलाने म्हटले: “मी प्रत्येक दिवस ही अपेक्षा धरून घालवतो की यहोवाचा महान दिवस उद्या येणार आहे.”—योएल १:१५.
नीतिसूत्रे ११:१९; १ तीमथ्य ६:१२, १७-१९.
होय यहोवाचा महान दिवस येऊन ठेपला आहे. पण आपण देवाच्या जवळ राहतो तोपर्यंत आपल्याला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. त्याच्या नीतिमान दर्जांना आपण जडून राहिलो आणि स्थिर राहिलो तर सार्वकालिक जीवनाची शर्यत आपण यशस्वीरित्या पूर्ण करू!—[२३ पानांवरील चित्र]
सहख्रिस्ती बांधवांना स्थिर राहण्यास मदत करण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करत आहात का?
[२१ पानांवरील चित्राचे श्रेय]
The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck