व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अतुलनीय आनंद!

अतुलनीय आनंद!

जीवन कथा

अतुलनीय आनंद!

रेजिनाल्ड वॉलवर्क यांच्याद्वारे कथित

“जगात अशी एकही गोष्ट नाही जिची तुलना, यहोवाच्या पूर्ण वेळेच्या मिशनरी सेवेत आम्हाला मिळालेल्या आनंदाशी करता येईल!” हे शब्द असलेली एक चिठी मला माझ्या पत्नीच्या गोष्टींमध्ये १९९४ सालच्या मे महिन्यात तिचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी सापडली.

आयरीनच्या या शब्दांचा मी विचार करतो तेव्हा मला, पेरूमध्ये मिशनरी या नात्याने आम्ही घालवलेली ती आनंदाची, समाधानाची ३७ वर्षे आठवतात. १९४२ सालच्या डिसेंबर महिन्यात आमचं लग्न झालं; तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या अमूल्य सहचाराचा आनंद लुटला—मला वाटतं, इथूनंच तुम्हाला माझी कहाणी सांगितलेली बरी.

इंग्लंड, लिव्हरपूल येथे यहोवाची साक्षीदार म्हणूनच आयरीन लहानाची मोठी झाली होती. तिला आणखी दोन बहिणी होत्या आणि तिचे वडील पहिल्या महायुद्धादरम्यान वारले होते. त्यानंतर तिच्या आईने विंटन फ्रेझर यांच्याशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव सिडनी. दुसऱ्‍या महायुद्धाची सुरवात व्हायच्या फक्‍त काही दिवस आधी त्यांचे संपूर्ण कुटुंब बँगोर, नॉर्थ वेल्स येथे राहायला गेले; तिथेच १९३९ साली आयरीनचा बाप्तिस्मा झाला. सिडनीचा या आधीच्या वर्षी बाप्तिस्मा झाला होता त्यामुळे तो आणि आयरीन एकत्र मिळून पायनियर—पूर्ण वेळेचे सुवार्तिक—म्हणून वेल्सच्या उत्तर किनाऱ्‍यालगत, बँगोरपासून कारनारव्हेनपर्यंत आणि अँग्लसीच्या द्वीपावर सेवा करू लागले.

त्या वेळी, मी लिव्हरपूलच्या आग्नेयपासून २० किलोमीटर दूर असलेल्या रंकर्न मंडळीत, अध्यक्षीय पर्यवेक्षक (आज असे म्हटले जाते) म्हणून सेवा करत होतो. एका विभागीय संमेलनात आयरीन माझ्याजवळ आली आणि प्रचारासाठी तिला क्षेत्र द्यावे म्हणून तिने माझ्याकडे विनंती केली कारण ती, रंकर्नमध्ये विरा नावाच्या आपल्या एका विवाहित बहिणीबरोबर राहायला येणार होती. आयरीन आमच्याबरोबर दोन आठवड्यांपर्यंत होती त्या काळात माझी आणि तिची चांगली जोडी जमली होती; नंतर, मीही तिला पुष्कळदा बँगोरला भेटायला गेलो. आणि मग एके शनिवारी मी आयरीनला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिचा होकार ऐकून मला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा!

रविवारी घरी आल्यावर मी लगेच आमच्या लग्नाची तयारी करू लागलो; पण मंगळवारी मला अचानक एक तार मिळाली. “मला माहीत आहे, ही तार वाचून तुला वाईट वाटेल, मला क्षमा कर, पण मी लग्न करू शकत नाही. सविस्तर पत्र पाठवत आहे.” तार वाचून मला धक्काच बसला होता. नेमकं काय झालं असावं?

दुसऱ्‍या दिवशी आयरीनचं पत्र आलं. तिनं मला सांगितलं की ती हिल्डा पॅजेटबरोबर यॉर्कशायर येथील होर्सफोर्थ येथे पायनियर म्हणून जाणार होती. * पत्रात तिने लिहिले होते, की १२ महिन्यांपूर्वी, अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची विनंती केल्यास आपण जाऊ असे तिने कबूल केले होते. पत्रात तिने लिहिले होते: “हे जणू काय मी यहोवाला वचन दिलं होतं आणि तुझी माझी भेट होण्यापूर्वी मी हे वचन दिल्यामुळे मी ते पूर्ण केलं पाहिजे.” मला खूप वाईट वाटलं खरं, पण तिची सचोटी पाहून मी खूप प्रभावित झालो आणि मी तिला अशी तार पाठवली: “ठीक आहे, जा, मी तुझी वाट पाहीन.”

यॉर्कशायरमध्ये असताना, धार्मिक कारणांमुळे युद्धप्रयत्नांना पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे आयरीनला तीन महिन्यांची कैद झाली. पण, १८ महिन्यांनंतर म्हणजे डिसेंबर १९४२ मध्ये आमचं लग्न झालं.

माझे बालपण

१९१९ साली माझ्या आईने शास्त्रवचनांवरील अभ्यास * याचा एक संच विकत घेतला होता. त्या वेळी माझ्या वडिलांनी म्हटल्यानुसार माझ्या आईनं खरोखरच एकही पुस्तक वाचलं नव्हतं तरीपण आपलं बायबल सोबत घेऊन तिनं या खंडांचा अभ्यास करण्याचं ठरवलं होतं. आणि तिनं असं केलं व १९२० साली तिचा बाप्तिस्मा झाला.

माझे वडील कडक स्वभावाचे नव्हते, त्यामुळे आई जे काही करू इच्छित होती ते त्यांनी तिला करू दिले; म्हणजे, आम्हा चार मुलांना—माझ्या दोन बहिणी, ग्वेन आणि आयव्ही; माझा भाऊ, ॲलेक आणि मला, सत्य शिकवण्यास मोकळीक दिली. स्टॅनली रॉजर्स आणि लिव्हरपूलमधील इतर विश्‍वासू साक्षीदार रंकर्नमध्ये नव्यानेच स्थापन झालेल्या मंडळीत बायबलवर आधारित भाषणे द्यायला जायचे. या मंडळीबरोबर आमच्या कुटुंबाची देखील आध्यात्मिकरीत्या चांगलीच वाढ झाली.

ग्वेन, चर्च ऑफ इंग्लंडमधून दृढीकरण संस्काराचे धडे घेत होती; पण आईबरोबर बायबलचा अभ्यास करायला सुरवात केल्यानंतर लगेच तिने हे धडे घ्यायचे थांबवले. ग्वेन आपल्या वर्गाला का येत नव्हती हे पाहण्यासाठी पाळक आमच्या घरी आले तेव्हा त्यांना आम्ही एका पाठोपाठ एक प्रश्‍न विचारत गेलो; अर्थात त्यांना या प्रश्‍नांची नीट उत्तरे देता आली नाही. ग्वेननं त्यांना प्रभूच्या प्रार्थनेचा अर्थ विचारला; आणि झाले असे की तिनेच त्यांना प्रार्थनेचा अर्थ समजावून सांगितला! शेवटी तिने १ करिंथकर १०:२१ हे वचन त्यांना दाखवून स्पष्टपणे सांगितले, की ती ‘दोन मेजांवरून खाऊ’ शकत नाही. निघताना या पाळकानं म्हटलं, की मी ग्वेनसाठी प्रार्थना करेन व तिच्या प्रश्‍नांची उत्तरं देण्यासाठी पुन्हा येईन; पण ते काही आले नाहीत. ग्वेनच्या बाप्तिस्म्यानंतर ती पूर्ण-वेळची सुवार्तिक बनली.

आमची मंडळी तरुणांकडे लक्ष देण्यात खरोखरच एक उदाहरण होती. मला आठवतं, मी जेव्हा सात वर्षांचा होतो, आमच्या मंडळीला भेट देणाऱ्‍या एका वडिलांनी एक भाषण दिलं होतं. नंतर ते माझ्याजवळ येऊन माझ्याशी बोलू लागले. मी त्यांना सांगितलं, की मी अब्राहामाविषयी आणि तो आपल्या पुत्राचं अर्पण करायला कसा चालला होता याविषयी वाचत होतो. हे बंधू मला म्हणाले: “जा, स्टेजच्या त्या कोपऱ्‍यात उभं राहा आणि मग मला सर्व सांग.” तिथं उभं राहून माझं पहिलं “जाहीर भाषण” दिल्यानंतर मला किती आनंद झाला होता!

१९३१ साली वयाच्या १५ व्या वर्षी माझा बाप्तिस्मा झाला; त्याच वर्षी आई वारली आणि ॲप्रेन्टीस इलेक्ट्रीशियन होण्यासाठी मी शाळा सोडली. १९३६ साली सार्वजनिकरीत्या फोनोग्राफवर रेकॉर्ड केलेली बायबल आधारित भाषणे वाजवली जायची; तेव्हा एका वयस्कर बहिणीनं माझ्या भावाला आणि मला या क्षेत्रात व्यस्त होण्याचं उत्तेजन दिलं. त्यामुळे मग, ॲलेक व मी लिव्हरपूलला सायकल विकत घेऊन तिला एक साईडकार बसवून घेण्यासाठी गेलो; जेणेकरून या साईडकारवर आम्ही आमचा फोनोग्राफ ठेवू शकू. साईडकारच्या मागच्या बाजूला वर, एकात एक बसेल अशा दोन मीटर उंच नळीवर आम्ही एक लाऊडस्पीकर बसवला. ज्याच्याकडून आम्ही हे सर्व करवून घेतले त्या मेकॅनिकनं आम्हाला सांगितलं की त्यानं पूर्वी असं काही बनवलं नव्हतं; पण आमची सायकल आणि लाऊडस्पीकर उत्तम चालला. अगदी आवेशाने आम्ही आमच्या पूर्ण क्षेत्रात प्रचार कार्य केलं; त्या वृद्ध भगिनीनं दिलेल्या सल्ल्याबद्दल आणि आम्हाला मिळत गेलेल्या विशेषाधिकारांबद्दल आम्ही खूप आभारी होतो.

दुसरे महायुद्ध—परीक्षेचा काळ

युद्धाचे ढग जसजसे जमू लागले तसतसे स्टॅनली रॉजर्स आणि मी सप्टेंबर ११, १९३८ रोजी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये दिल्या जाणाऱ्‍या जाहीर भाषणाची जाहिरात करण्यात व्यस्त झालो; या भाषणाचा विषय होता, “वस्तुस्थिती स्वीकारा.” नंतर, या भाषणाची एक पुस्तिका बनवण्यात आली तेव्हा या पुस्तिकेचे आणि पुढील वर्षी प्रकाशित करण्यात आलेल्या हुकूमशाही की स्वातंत्र्य (इंग्रजी) नावाच्या पुस्तिकेचे वाटप करण्याच्या कामातही मी सहभाग घेतला. या दोन्ही पुस्तिकांनी, हिटलरच्या जर्मनीच्या एकछत्री राजवटीचे उद्देश उघडकीस आणले. या वेळेपर्यंत, माझ्या सार्वजनिक सेवेमुळे रंकर्नमध्ये सर्वजण मला ओळखू लागले होते आणि माझा आदरही करत होते. खरं तर, ईश्‍वरशासित कार्यांत मी नेहमी अग्रेसर असल्यामुळेच पुढे मला याचा फायदा झाला.

मी ज्या कंपनीत कामाला होतो त्या कंपनीनं, शहराच्या बाहेर असलेल्या एका नवीन कंपनीला वीज उपकरणांद्वारे वीज देण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं. या नव्या कंपनीत युद्धासाठी शस्त्रास्त्रे बनवली जात असल्याचे मला समजल्यावर मी त्यांना सांगितलं, की मी या कंपनीत काम करू शकत नाही. माझे मालक नाराज झाले, पण माझ्या फोरमननं माझी बाजू घेतली आणि मला दुसरं काम देण्यात आलं. नंतर मला कळलं, की या फोरमनची एक अंटीसुद्धा यहोवाची साक्षीदार होती.

माझ्याबरोबर काम करणारा एक जण मला असं म्हणाला, की “रेज, तू इतक्या वर्षांपासून बायबलचं काम करत आहेस, त्यामुळे आम्हाला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती.” तरीपण, मला नेहमी सतर्क राहावं लागायचं, कारण माझ्याबरोबर काम करणाऱ्‍या पुष्कळ कामगारांचा माझ्यावर डोळा होता.

१९४० सालच्या जून महिन्यात लिव्हरपूलच्या कोर्टानं धार्मिक कारणांमुळे युद्धात सहभाग न घेण्याची माझी नोंदणी, मी माझ्या सध्याच्या कामातच टिकून राहिलं पाहिजे, या एका अटीवर स्वीकारली. यामुळे अर्थातच मला माझी ख्रिस्ती सेवा चालू ठेवता आली.

पूर्ण-वेळेच्या सेवेत

युद्ध संपायच्या बेतात असताना मी माझी नोकरी सोडून आयरीनबरोबर पूर्ण-वेळेची सेवा करण्याचं ठरवलं. १९४६ साली, मी पाच-मीटर उंचीचा एक ट्रेलर तयार केला; यातच आम्ही राहायचो आणि पुढील वर्षी आम्हाला ग्लॉसटरशायरमधील ॲल्वेस्टन नावाच्या एका गावात जाऊन राहायला सांगण्यात आले. कालांतरानं, आम्ही सायरनसेस्टरच्या प्राचीन गावात आणि बाथच्या शहरात पायनियरींग केली. १९५१ साली, मला वेल्सच्या दक्षिणेकडील मंडळ्यांना प्रवासी पर्यवेक्षक म्हणून भेटी देण्याचं काम देण्यात आलं; पण या कामात मला दोन वर्षंही पूर्ण झाली नव्हती तोच आम्ही मिशनरी प्रशिक्षणासाठी गिलियडच्या वॉचटावर बायबल प्रशालेसाठी गेलो.

गिलियडचा २१ वा वर्ग, न्यूयॉर्कच्या उत्तरेकडे असलेल्या साऊथ लॅन्सींग येथे झाला आणि न्यूयॉर्क शहरात १९५३ साली झालेल्या न्यू वर्ल्ड सोसायटी ॲसेंब्ली यात आम्ही पदवीधर झालो. आमच्या पदवीदानाच्या दिवसापर्यंत आयरीन आणि मला माहीत नव्हतं की आम्हाला कोठे नेमण्यात येईल. नंतर जेव्हा आम्हाला समजले, की आम्हाला पेरूला नेमण्यात आले आहे तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला. का? कारण, आयरीनचा सावत्र भाऊ सिडनी फ्रेझर आणि त्याची पत्नी मार्गारेट, गिलियडच्या १९ व्या वर्गातून पदवीधर होऊन बऱ्‍याच वर्षांपासून लिमा शाखा दफ्तरात सेवा करत होते!

आमचा व्हिसा मिळेपर्यंत आम्ही ब्रुकलिन बेथेलमध्ये काही वेळ काम केलं; काही दिवसांतच आमचा व्हिसा मिळाला आणि आम्ही लिमाला गेलो. आम्हाला मिळालेल्या दहा मिशनरी नेमणुकांमधील पहिली नेमणूक पेरूचे प्रमुख बंदर कयॉओ येथे होती; हे लिमाच्या पश्‍चिमेकडे होते. आम्ही थोडी थोडी स्पॅनिश भाषा शिकलो होतो खरं पण तेव्हा आयरीन आणि मला स्पॅनिशमध्ये चांगल्याप्रकारे बोलता येत नव्हते. आम्ही कसे दिवस काढले असावेत?

प्रचारांतील समस्या आणि सुहक्क

गिलियडमध्ये आम्हाला सांगण्यात आले होते, की आई आपल्या बाळाला कोणतीही भाषा शिकवत नसते. तर आई जशी बोलते तसे बाळ शिकत राहते. आम्हाला दिलेला सल्ला असा होता: “प्रचार कार्यात लगेच जायला सुरवात करा, आणि लोकांकडून स्वतःच भाषा शिका. ते तुम्हाला मदत करतील.” ही नवीन भाषा समजण्याचा मी प्रयत्न करत असताना, आम्हाला येऊन फक्‍त दोन आठवडे झाले होते आणि लगेच मला कयॉओ मंडळीचा अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले तेव्हा मला कसे वाटले असेल याची कल्पना करा! मी सिडनी फ्रेझरला भेटायला गेलो तेव्हा त्यानंही मला गिलियडमध्ये आम्हाला जो सल्ला दिला होता तोच सल्ला दिला—मंडळीतल्या बंधूभगिनींबरोबर आणि तुमच्या क्षेत्रातील लोकांबरोबर मिसळा. या सल्ल्याचे पालन करण्याचे मी ठरवले.

एका शनिवारी सकाळी, मी एका सुताराला त्याच्या दुकानात भेटलो. तो मला म्हणाला: “मला काम थांबवता येणार नाही, पण तुम्ही कृपया बसा आणि तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते सांगा.” मी त्यांना म्हणालो, की मी फक्‍त एका अटीवर बसेन: “मी बोलताना चुका करेन तेव्हा कृपया मला सांगा, मला वाईट वाटणार नाही.” त्याला हसू आले आणि त्याने माझी अट मान्य केली. आठवड्यातून दोनदा मी त्याला भेट द्यायचो; मला सांगण्यात आल्याप्रमाणे नवीन भाषा शिकून घेण्याचा हा अतिशय उत्तम मार्ग असल्याचे मला दिसून आले.

योगायोगाने झाले असे, की इका येथील आमच्या दुसऱ्‍या मिशनरी नेमणुकीत असताना, मी आणखी एका सुताराला भेटलो आणि कयॉओत असताना मी भाषा कशी शिकून घेत होतो ते त्याला सांगितले. तोही मला अशाच प्रकारे मदत करायला तयार झाला; त्यामुळे, माझी स्पॅनिश चांगलीच सुधारली, अर्थात चांगल्याप्रकारे स्पॅनिश बोलण्यासाठी मला तीन वर्षे लागली. हा सुतार नेहमीच व्यस्त असायचा तरीसुद्धा कसेबसे मी त्याला शास्त्रांतून वचने वाचण्याद्वारे व त्यांचा अर्थ त्याला समजावून सांगण्याद्वारे त्याच्याबरोबर बायबलचा अभ्यास करू शकलो. एका आठवडी, मी त्याच्याकडे गेलो तेव्हा मला त्याच्या मालकानं सांगितलं, की लिमामध्ये त्याला नवीन काम मिळाल्यामुळे तो तिथं गेला. काही काळानंतर, आयरीन आणि मी लिमाला एका अधिवेशनासाठी गेलो होतो तेव्हा मी या सुताराला पुन्हा भेटलो. बायबलचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी त्याने स्थानीय साक्षीदारांशी संपर्क साधला होता आणि तो व त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य यहोवाचे समर्पित सेवक झाले होते हे ऐकून मला किती आनंद झाला!

एका मंडळीत, एक जोडपे लग्न न करताच एकत्र राहत होते आणि तरीसुद्धा त्यांचा बाप्तिस्मा झाला असल्याचे आम्हाला समजले. त्यांच्याबरोबर आम्ही शास्त्रवचनांतील तत्त्वांची चर्चा करत असताना, बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार होण्याच्या योग्यतेचे होण्यासाठी त्यांनी आपल्या विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्याचे ठरवले. त्यामुळे मी त्यांना नगरभवनात नेण्याची व्यवस्था केली. पण एक समस्या होती, त्यांना चार मुलं होती आणि त्यांची अधिकृत नोंदणी करण्यात आली नव्हती कारण कायद्यानुसार ही एक अपेक्षा होती. पण मग आता नगराध्यक्ष काय कारवाई करतील याचा आम्ही विचार करू लागलो. ते म्हणाले: “या भल्या लोकांनी, तुमच्या या यहोवाच्या साक्षीदार मित्रांनी, तुमच्या विवाहाची नोंदणी करण्याची व्यवस्था केली असल्यामुळे, प्रत्येक मुलासाठी काढावे लागणारे समन्स मी माफ करून त्यांची कायदेशीर नोंदणी विनामूल्य करणार आहे.” आम्ही या नगराध्यक्षांचे खूप आभार मानले कारण हे कुटुंब गरीब होते आणि त्यांना जर भुर्दंड भरावा लागला असता तर त्यांच्यावर खूप मोठा आर्थिक बोजा आला असता!

यहोवाच्या साक्षीदारांच्या ब्रुकलिन येथील मुख्यालयातून अल्बर्ट डी. श्रोडर नंतर आम्हाला भेट द्यायला आले आणि लिमात दुसऱ्‍या एका ठिकाणी एक नवीन मिशनरी गृह बनवण्याचे त्यांनी सुचवले. त्यामुळे मग, मी, आयरीन, अमेरिकेहून आलेल्या दोन बहिणी, फ्रान्सिस आणि एलिझाबेथ गुड आणि कॅनडाचे एक दांपत्य असे आम्ही सर्व जण सॅन बोरहाच्या जिल्ह्यात राहायला गेलो. दोन ते तीन वर्षांत तेथे आणखी एक मंडळी तयार झाली जिची खूप भरभराट होत होती.

सुमारे ३,००० मीटर उंचीवरच्या मध्य डोंगराळ भागात अर्थात वान्कीओ येथे सेवा करत असताना आम्ही ८० साक्षीदार असलेल्या एका मंडळीबरोबर सहवास करू लागलो. तेथे मी, देशात बांधल्या जाणाऱ्‍या दुसऱ्‍या राज्य सभागृहाच्या बांधकामात भाग घेतला. मला यहोवाच्या साक्षीदारांचा कायदेशीर प्रतिनिधी म्हणून नेमण्यात आले; कारण, आम्ही विकत घेतलेली जागा कायद्याने आमची आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला तीन वेळा कोर्टात जावे लागले. अशा कार्यांद्वारे व अनेक विश्‍वासू मिशनऱ्‍यांनी केलेल्या त्या दिवसांतील विस्तृत शिष्य बनवण्याच्या कार्यांद्वारे, पेरूत आता आपण पाहत असलेल्या उत्तम वाढीसाठी पक्का पाया घालण्यात आला; १९५३ मधील साक्षीदारांची संख्या २८३ पासून आज ८३,००० साक्षीदारांपर्यंत वाढली आहे.

दुःखद प्रस्थान

आमच्या सर्व मिशनरी गृहांमध्ये सहमिशनऱ्‍यांबरोबरील प्रेमळ सहवासाचा आनंद आम्ही लुटला; या सर्व मिशनरी गृहांमध्ये सहसा मला होम ओव्हरसियर म्हणून सेवा करण्याचा सुहक्क मिळत असे. दर सोमवारी सकाळी आम्ही एकत्र जमून आठवड्याभरात आम्ही करणार असलेल्या कामांची चर्चा करत असू आणि गृहाच्या देखभालीची पाळी ज्याची असेल त्याला ते काम सोपवून देत असू. सर्वात प्रमुख काम प्रचार कार्य होते हे आम्ही सर्वांनी जाणले होते त्यामुळे तो उद्देश मनी बाळगून आम्ही सर्वजण मिळून कार्य करत असू. मला सांगायला आनंद वाटतो, की आमच्या कोणत्याही गृहात एकही मोठी समस्या कधी उद्‌भवली नाही.

आमची शेवटली नेमणूक, ब्रेन्या नावाच्या लिमाच्या दुसऱ्‍या एका उपनगरात होती. तेथील ७० साक्षीदारांची प्रेमळ मंडळी जलदरीतीने वाढून तेथे सुमारे १०० साक्षीदार झाले त्यामुळे पॅलोमिन्यात आणखी एका मंडळीची स्थापना करावी लागली. याच वेळेला आयरीन आजारी पडली. मला पहिल्यांदा दिसून आले, की कधीकधी तिला, तिने काय म्हटले ते आठवायचे नाही आणि कधीकधी तर घरी पुन्हा कसे यायचे हे देखील ती विसरू लागली होती. तिच्यावर सर्वात उत्तम वैद्यकीय उपचार केले जात होते तरीसुद्धा तिची तब्येत हळूहळू ढासळत गेली.

भरल्या मनाने, १९९० साली मला इंग्लंडला पुन्हा जाण्याची व्यवस्था करावी लागली; माझी बहीण आयव्ही हिनं आम्हाला तिच्या घरी राहायला बोलवलं. चार वर्षांनंतर वयाच्या ८१ व्या वर्षी आयरीननं जगाचा निरोप घेतला. मी अजूनही पूर्ण वेळेच्या सेवेतच आहे आणि सध्या मी माझ्या गावात असलेल्या तीन मंडळ्यांपैकी एका मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहे. कधीकधी मी मॅन्चेस्टरला तेथील स्पॅनिश गटाला उत्तेजन देण्याकरता जातो.

मला अलीकडेच एक चांगला अनुभव आला ज्याची सुरवात, खूप वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा मी माझ्या फोनोग्राफवर घरमालकांसाठी पाच मिनिटांचे प्रवचन वाजवायचो तेव्हा झाली होती. मला स्पष्टपणे आठवतं, की एकदा मी एका घरी दाराजवळ उभं राहून एका स्त्रीशी बोलत होतो तेव्हा त्या स्त्रीची शाळेला जाणारी लहान मुलगी तिच्या मागं उभं राहून संदेश ऐकत होती.

हीच मुलगी मोठी झाल्यावर कॅनडाला राहायला गेली आणि रंकर्नमध्येच राहणाऱ्‍या तिच्या एका मैत्रिणीनं (जी आता एक यहोवाची साक्षीदार आहे) तिच्याबरोबर पत्रव्यवहार चालू ठेवला. पत्रात तिनं अलीकडेच असे लिहिले, की दोन साक्षीदार तिच्या घरी आले होते आणि त्यांनी असे काही शब्द वापरले ज्यामुळे तिला, त्या पाच मिनिटांच्या प्रवचनांत तिने ऐकलेल्या शब्दांची अचानक आठवण झाली. तिने ओळखले होते, की हेच सत्य आहे व आता ती यहोवाची एक समर्पित सेविका आहे आणि ६० पेक्षा अधिक वर्षांआधी आपल्या आईच्या घरी आलेल्या त्या तरुण मनुष्याला तिने आपले आभार कळवले आहेत. खरंच, सत्याचं बीज केव्हा मूळ धरून वाढेल हे आपण सांगू शकत नाही.—उपदेशक ११:६.

यहोवाच्या मौल्यवान सेवेत घालवलेल्या आयुष्याकडे मी वळून पाहतो तेव्हा मला अत्यंत कृतकृत्य वाटतं! १९३१ मध्ये मी समर्पण केलं होतं तेव्हापासून मी यहोवाच्या लोकांचं एकही संमेलन चुकवलेलं नाही. आम्हा दोघा पतीपत्नीला आमची पोटची मुलं नसली तरीसुद्धा आध्यात्मिक अर्थानं मला आपला स्वर्गीय पिता यहोवा याची सेवा करणारी १५० पेक्षा अधिक मुले-मुली आहेत हे सांगायला आनंद वाटतो. माझ्या प्रिय आयरीननं लिहिल्याप्रमाणे खरोखरच आम्हाला मिळालेले सुहक्क हे अतुलनीय आनंद देणारे ठरले आहेत!

[तळटीपा]

^ परि. 9 टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९९५, पृष्ठे १९-२४ वरील, “माझ्या पालकांचे अनुकरण करणे” ही हिल्डा पॅजेट द्वारा निवेदित कहाणी आहे.

^ परि. 12 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[२४ पानांवरील चित्र]

१९०० सालच्या सुरवातीला, आई

[२४, २५ पानांवरील चित्र]

डावीकडे: १९४० साली लीड्‌स, इंग्लंडमध्ये हिल्डा पॅजेट, मी, आयरीन आणि जॉईस राऊले

वर: आयरीन व मी आमच्या ट्रेलर गृहासमोर

[२७ पानांवरील चित्र]

१९५२ साली, वेल्स, कार्डिफमध्ये एका जाहीर भाषणाची जाहिरात करत असताना