दानधर्म कमी का झाला आहे?
दानधर्म कमी का झाला आहे?
न्यूयॉर्क सिटी आणि वॉशिंग्टन डी.सी. येथे सप्टेंबर ११, २००१ रोजी झालेल्या हल्ल्यांनंतर, विपत्तीग्रस्तांना लोकांकडून उल्लेखनीय मदत मिळाली. धर्मदाय संस्थांना विपत्तीग्रस्त कुटुंबांना देण्याकरता २.७ अब्ज डॉलर इतके अनुदान प्राप्त झाले. या हल्ल्याने झालेले प्रचंड नुकसान पाहून लोकांना धक्का बसला आणि लोक मदतीला पुढे आले.
परंतु, काही सुप्रसिद्ध धर्मदाय संस्था, गोळा झालेल्या निधींचा गैरवापर करत आहेत हे कळाल्यावर काही लोकांची मनोवृत्ती बदलली. एका धर्मदाय संस्थेला ५४.६ कोटी डॉलर मिळाले आणि या रक्कमेतील निम्मी रक्कम बाजूला ठेवून इतर उद्देशांकरता वापरण्यात येईल असा अहवाल लोकांना कळाल्यावर लोक संतप्त झाले. या संस्थेने नंतर आपला निर्णय बदलला आणि माफी देखील मागितली, तरीपण एका पत्रकाराने म्हटले: हल्ल्यांआधी लोकांना जो “विश्वास होता तो परत मिळवण्यास हा बदललेला निर्णय अपुरा पडला असे टीकाकारांचे म्हणणे आहे.” तुमच्याविषयी काय? धर्मदाय संस्थांवरून अलीकडे तुमचाही विश्वास उडाला आहे का?
उपयोगी की व्यर्थ?
दानधर्म करणे हा सद्गुण समजला जातो. परंतु, सर्वांचे असे मत नाही. २०० वर्षांआधी, इंग्रज निबंधलेखक, सॅम्युएल जॉनसन यांनी असे लिहिले: “केवळ दान म्हणून पैसे देण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या कामाचा मोबदला म्हणून त्याला पैसे देताना आपल्याला परोपकार केल्याची अधिक खात्री वाटते.” आजही अनेकजण दानधर्म करायला कचरतात आणि धर्मदाय संस्था कशाप्रकारे पैशाचा गैरवापर करत आहेत हे ऐकून तर लोकांचा विश्वास अधिकच ढळत जातो. अलीकडील दोन उदाहरणे पाहा.
सॅन फ्रान्सिस्को येथील एका धार्मिक धर्मदाय संस्थेच्या संचालकाने स्वतःच्या कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च आणि दोन वर्षांपर्यंत दर आठवडी ५०० डॉलरचे रेस्टॉरंटचे बिल आपल्या संस्थेला पाठवल्यामुळे त्याला त्या पदावरून काढण्यात आले. रोमानियात नवीन अनाथालय बांधण्यासाठी गोळा झालेल्या ६५ लाख पाउंड (सुमारे १ कोटी यु.एस. डॉलर) रक्कमेतून केवळ १२ निकृष्ठ दर्जाची घरे बांधण्यात आली आणि लाखो डॉलर्सचा काहीच पत्ता नव्हता हे उघडकीस आल्यावर ब्रिटनमध्ये मोठमोठे टीव्ही कार्यक्रम करून दान गोळा करणारे संयोजक अडचणीत सापडले. अशाप्रकारच्या
प्रतिकूल अहवालांमुळे दान देणारे काही जण किती दान द्यावे आणि कोणाला द्यावे याबद्दल सावध झाले आहेत हे उचित आहे.दान करावे की करू नये
पण केवळ काही मोजक्या व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या अशा कार्यांमुळे इतरांबद्दल वाटणारी खरी काळजी किंवा कळवळा दाबून टाकणे दुःखाची गोष्ट ठरेल. बायबल म्हणते: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे” हे आहे. (याकोब १:२७) गरीब आणि निराश्रित लोकांबद्दल काळजी बाळगून त्या दिशेने काही कार्य करणे हा ख्रिस्ती धर्माचा अविभाज्य भाग आहे.
पण कदाचित तुम्ही विचार कराल, ‘मी दानधर्म करत राहावे का की वैयक्तिकांना काही भेटवस्तू द्यावी?’ देव आपल्याकडून कशाप्रकारचे दान देण्याची अपेक्षा करतो? या प्रश्नांची उत्तरे पुढील लेखात दिली जातील.