देवाला संतुष्ट करणारे दान
देवाला संतुष्ट करणारे दान
येशू आणि त्याचे शिष्य बेथानी येथे मरीया, मार्था, आणि अलीकडेच पुनरुत्थित झालेला लाजर यांच्याशिवाय इतर जवळच्या मित्रांसोबत मेजवानी करत होते. मरीयेने जेव्हा सुमारे ३०० ग्राम मोलवान तेल घेऊन येशूच्या चरणास लावले तेव्हा यहूदा इस्कर्योत संतापला आणि त्याने आपले मत मांडले. त्याने या कृत्याचा विरोध करत म्हटले: “हे सुगंधी तेल तीनशे रूपयांस विकून ते गरिबांस का दिले नाहीत?” इतरजणही मग तक्रार करू लागले.—योहान १२:१-६; मार्क १४:३-५.
परंतु येशूने उत्तर दिले: “हिच्या वाटेस जाऊ नका . . . गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करिता येते; परंतु मी तुम्हाबरोबर नेहमीचा आहे असे नाही.” (मार्क १४:६-९) यहुदी धार्मिक नेते असे शिकवत असत की, दानधर्म हा केवळ सद्गुण नव्हता तर त्याने पापांचे प्रायश्चित देखील करता येत होते. परंतु, येशूने हे स्पष्ट केले की, केवळ गोरगरिबांना दानधर्म केले तरच देव संतुष्ट होतो असे नाही.
प्रारंभीच्या ख्रिस्ती मंडळीत दान कशाप्रकारे दिले जात होते याचा जरा विचार केल्याने आपण आपली काळजी कशी दाखवू शकतो व आपल्या देण्याने देवाला कसे संतुष्ट करू शकतो याचे काही व्यावहारिक मार्ग आपल्याला दिसून येतील. शिवाय, सर्वात फायदेशीर असलेल्या एका अनोख्या प्रकारच्या दानधर्माविषयी देखील आपल्याला माहिती मिळेल.
“दानधर्म करा”
अनेक वेळा येशूने आपल्या शिष्यांना “दानधर्म करा” असे उत्तेजन दिले. (लूक १२:३३) परंतु, देवाऐवजी देणाऱ्याचा गौरव करण्यासाठी दिखावा केला जाऊ नये याबद्दल येशूने सावधान केले. तो म्हणाला: “जेव्हा जेव्हा तू दानधर्म करितोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून, ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवितात तसे करू नको.” (मत्तय ६:१-४) या सल्ल्यानुसार, प्रारंभीच्या ख्रिश्चनांनी त्यांच्या काळात पवित्रतेचा आव आणणाऱ्या धार्मिक पुढाऱ्यांचा ढोंगीपणा टाळला आणि त्याऐवजी स्वतःहून काही मदत करून किंवा खासगीरितीने काही दान देऊन गरजवंतांना मदत करण्याचे ठरवले.
उदाहरणार्थ, लूक ८:१-३ येथे आपल्याला असे सांगण्यात येते की, मरीया मग्दालीया, योहान्ना व सुसान्ना आणि इतरांनी आपल्या “पैशाअडक्याने” येशू आणि त्याच्या प्रेषितांची कसलाही आव न आणता सेवाचाकरी केली. हे पुरूष निराश्रित नव्हते तरीपण त्यांनी आपले कामकाज, व्यवसाय-धंदे सोडून संपूर्ण लक्ष सेवाकार्यात घातले होते. (मत्तय ४:१८-२२; लूक ५:२७, २८) देवाने त्यांना दिलेली नेमणूक पूर्ण करण्यात त्यांची मदत करून या स्त्रियांनी खरे तर देवाचे गौरव केले. त्यांच्या या उदारतेचे वृत्त भावी पिढ्यांना वाचता यावे म्हणून देवाने ते बायबलमध्ये जपून ठेवले व त्याबद्दल आपली संमती प्रदर्शित केली.—नीतिसूत्रे १९:१७; इब्री लोकांस ६:१०.
दुर्कस नावाची आणखी एक दयाळु स्त्री होती जी “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.” यापो या किनारपट्टीवरील आपल्या नगरात राहणाऱ्या गरजू विधवांसाठी ती कपडे शिवत असे. तिने कापडाचा खर्च दिला की फक्त कपडे शिवून देण्यात मदत केली हे आपल्याला ठाऊक नाही. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की, तिच्या या सत्कृत्यामुळे ती लोकांना आणि देवालाही प्रिय होती आणि म्हणून देवाने तिच्या सत्कृत्याचे प्रतिफळ तिला दिले.—प्रेषितांची कृत्ये ९:३६-४१.
योग्य हेतू असणे महत्त्वाचे आहे
या सर्व लोकांनी कशामुळे दानधर्म केले? केवळ लोकांच्या याचनेमुळे कळवळा येऊन त्यांनी मदत केली नाही. तर गरीब, विपत्तीग्रस्त, आजारी किंवा इतर अडचणींमध्ये असलेल्यांना आपल्या परीने दररोज मदत करण्याची आपली जबाबदारी आहे असे त्यांना वाटले. (नीतिसूत्रे ३:२७, २८; याकोब २:१५, १६) अशाप्रकारच्या दानधर्माने देव संतुष्ट होतो. देवाबद्दल गहिरे प्रेम आणि त्याच्या दयाळु व उदार व्यक्तिमत्त्वाचे अनुकरण करण्याची इच्छा हा त्या दानधर्मामागचा प्रमुख हेतू असतो.—मत्तय ५:४४, ४५; याकोब १:१७.
प्रेषित योहानाने दानधर्माच्या या महत्त्वपूर्ण पैलूवर जोर देऊन विचारले: “जवळ संसाराची साधने असून व आपला बंधु गरजवंत आहे हे पाहून जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीति कशी राहणार?” (१ योहान ३:१७) याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे. देवाची प्रीती लोकांना दानधर्म करण्यास प्रेरित करते. जे देवाप्रमाणे उदारता दाखवतात त्यांची तो प्रशंसा करतो आणि त्यांना प्रतिफळ देतो. (नीतिसूत्रे २२:९; २ करिंथकर ९:६-११) आज अशाप्रकारची उदारता आपल्याला दिसते का? यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत अलीकडे काय घडले ते पाहा.
एका वृद्ध ख्रिस्ती स्त्रीचे घर एकदम खराब स्थितीत होते. ती एकटीच राहत होती आणि तिला मदत करायला तिचे कुटुंबही नव्हते. कित्येक वर्षांपासून तिने आपले घर ख्रिस्ती सभा भरवण्याकरताही दिले होते आणि ती सहसा लोकांना आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण द्यायची. (प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५, ४०) तिची दयनीय अवस्था पाहून मंडळीतले सगळे सदस्य तिची मदत करायला एकत्र आले. काहींनी पैसे दिले तर इतरांनी काम करण्याची तयारी दाखवली. दोन-चार सप्ताहांतांमध्ये स्वयंसेवकांनी तिच्या घराला नवीन छप्पर घालून दिले, नवीन बाथरूम बांधून दिले, पहिला मजला पूर्णपणे लिंपून रंगरंगोटी केली आणि स्वयंपाकघरात नवीन कपाटे बसवून दिली. बंधूभगिनींच्या या देण्यामुळे त्या स्त्रीची गरज तर भागलीच परंतु मंडळीतल्या सदस्यांमध्येही जवळीक निर्माण झाली आणि खऱ्या ख्रिस्ती दानधर्माचे उदाहरण म्हणून शेजाऱ्यांवरही चांगली छाप पडली.
आपण इतरांना व्यक्तिगतरित्या अनेक मार्गांनी मदत करू शकतो. एखाद्या अनाथ मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर आपण वेळ घालवू शकतो का? आपल्या ओळखीच्या एखाद्या वृद्ध विधवेसाठी खरेदी किंवा शिवणकाम आपण करू शकतो का? आर्थिक अडचणीत असलेल्यांकरता आपण एखाद्या वेळी स्वयंपाक करून किंवा एखाद्या गोष्टीचा खर्च देऊ शकतो का? मदत करण्यासाठी आपल्याला श्रीमंत असण्याची गरज नाही. प्रेषित पौलाने लिहिले: “उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ असेल तसे ते मान्य होते; नसले तसे नाही.” (२ करिंथकर ८:१२) परंतु, एखाद्याला अशी थेट मदत करण्याच्या प्रयत्नांनाच केवळ देव आशीर्वादित करतो का? नाही.
मोठ्या प्रमाणावरील मदतकार्याविषयी काय?
काही वेळा व्यक्तिगत प्रयत्न पुरेसे नसतात. येशू आणि त्याच्या प्रेषितांनीही गरिबांकरता एक निधी ठेवला होता आणि त्यांच्या सेवेत त्यांना भेटणाऱ्या काळजीवाहू लोकांकडून ते अनुदान गोळा करत होते. (योहान १२:६; १३:२९) त्याचप्रमाणे, पहिल्या शतकातील मंडळ्यांनी गरज भासली तेव्हा अनुदान गोळा केले आणि मोठ्या प्रमाणावर मदतकार्याची आयोजना केली.—प्रेषितांची कृत्ये २:४४, ४५; ६:१-३; १ तीमथ्य ५:९, १०.
सा.यु. ५५ सालाच्या सुमारास असाच एक प्रसंग उद्भवला. यहूदीयाच्या मंडळ्यांतील लोकांना दारिद्र्याचा सामना करावा लागत होता; कदाचित अलीकडे पडलेल्या मोठ्या दुष्काळामुळे असे झाले असावे. (प्रेषितांची कृत्ये ११:२७-३०) गरीबांची नेहमी काळजी करणाऱ्या प्रेषित पौलाने मासेदोनियापर्यंतच्या मंडळ्यांची नावे दिली. त्याने स्वतः एक निधी जमा केला आणि संमतीप्राप्त पुरुषांना तो पोहंचवण्यास पाठवले. (१ करिंथकर १६:१-४; गलतीकर २:१०) त्याने किंवा त्यात गोवलेल्या इतरांनीही याचा मोबदला घेतला नाही.—२ करिंथकर ८:२०, २१.
आज देखील विपत्ती येते तेव्हा यहोवाचे साक्षीदार मदत करायला तत्पर असतात. उदाहरणार्थ, २००१ च्या उन्हाळ्यात अमेरिकेतील हुस्टन, टेक्सस येथे वादळी पावसामुळे पूर आला. साक्षीदारांच्या एकंदर ७२३ घरांना नुकसान पोहंचले; त्यांपैकी पुष्कळे घरे तर पार उद्ध्वस्त झाली. प्रत्येकाच्या गरजा जाणून स्थानीय साक्षीदारांना त्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि त्यांची घरी दुरुस्त करून देण्यासाठी निधी पुरवायला कार्यक्षम ख्रिस्ती वडिलांची एक विपत्ती मदतकार्य समिती तत्काळ बनवण्यात आली. शेजारच्या मंडळ्यांतील इच्छुक स्वयंसेवकांनी सर्व काम केले. एका साक्षीदार बहिणीला तिच्या वीमा कंपनीकडून तिच्या घराची नुकसान भरपाई मिळाली तेव्हा कृतज्ञतेमुळे तिने गरजवंत असलेल्या इतरांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून लगेच तो पैसा मदतकार्य निधीला दिला.
नीतिसूत्रे १४:१५ म्हणते: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” म्हणून सर्व गोष्टींचा नीट विचार करणे हे शहाणपणाचे आहे.
परंतु, मोठ्या दानधर्मांसाठी विनंती केली जाते तेव्हा सावधान असण्याची गरज आहे. काही दानधर्म संस्थांच्या व्यवस्थापनाकरता किंवा निधी गोळा करण्याच्या माध्यमाकरता अधिक पैसा लागतो आणि निर्धारित उद्देशाकरता रक्कमेतला लहानसा भाग वापरला जातो.सर्वात फायदेकारक दानधर्म
एकप्रकारचे देणे दानधर्मापेक्षाही महत्त्वाचे आहे. एका श्रीमंत, तरुण शासकाने सार्वकालिक जीवन मिळवण्याकरता काय करावे असा प्रश्न केला तेव्हा येशूने त्या देण्याविषयी सुचवले होते. येशूने त्याला म्हटले: “तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” (मत्तय १९:१६-२२) लक्ष द्या की येशूने असे म्हटले नाही की, ‘दरिद्र्यांस दे आणि तुला जीवन मिळेल.’ तर त्याने पुढे म्हटले, “चल, माझ्यामागे ये.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, दानधर्म कितीही प्रशंसनीय आणि फायदेकारक असले तरी ख्रिस्ती शिष्य होण्यात आणखी जास्त गोवलेले आहे.
इतरांना आध्यात्मिकरित्या मदत करणे हा येशूचा प्रमुख हेतू होता. आपल्या मृत्यूच्या काही काळ आधी, त्याने पिलाताला सांगितले: “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) त्याने गोरगरिबांना मदत करण्यात, आजाऱ्यांना बरे करण्यात, भुकेलेल्यांना अन्न देण्यात पुढाकार घेतला तरी त्याने आपल्या शिष्यांना प्रचार करण्याचे प्रशिक्षण प्रामुख्याने दिले. (मत्तय १०:७, ८) किंबहुना, त्यांना त्याने सर्वात शेवटच्या सूचनेत ही आज्ञा दिली: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.”—मत्तय २८:१९, २०.
अर्थात, प्रचाराने जगाच्या सर्व समस्या सुटणार नाही. तरीपण, सर्व प्रकारच्या लोकांना देवाच्या राज्य सुवार्तेबद्दल सांगितल्याने देवाचा गौरव होतो कारण प्रचाराने देवाची इच्छा पूर्ण होते आणि हा ईश्वरी संदेश स्वीकारणाऱ्यांकरता सार्वकालिक फायदे प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होतो. (योहान १७:३; १ तीमथ्य २:३, ४) यहोवाचे साक्षीदार पुढच्या वेळी तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही त्यांचे ऐकून घेऊ शकता का? ते आध्यात्मिक देणगी घेऊन येतात. आणि हाच देण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे हे त्यांना ठाऊक आहे.
[६ पानांवरील चित्रे]
आपली काळजी व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत
[७ पानांवरील चित्र]
आपण इतरांना सुवार्ता सांगतो तेव्हा देव संतुष्ट होतो आणि सार्वकालिक फायदे प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा होतो