व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धूप जाळण्याला खऱ्‍या उपासनेत स्थान आहे का?

धूप जाळण्याला खऱ्‍या उपासनेत स्थान आहे का?

धूप जाळण्याला खऱ्‍या उपासनेत स्थान आहे का?

“देवांना सुगंध आवडतात.” अशी प्राचीन ईजिप्तच्या लोकांमध्ये एक सर्वसामान्य म्हण होती. त्यांच्या उपासनेत धूप जाळण्याला खूप महत्त्व होते. दैवते आसपास असतात असा त्यांचा विश्‍वास असल्यामुळे ते दररोज आपल्या मंदिरांत, घरांतील देव्हाऱ्‍यात इतकेच काय तर व्यापार करतानाही धूप जाळत असत. इतर राष्ट्रांमध्येही काहीशा अशाच प्रथा होत्या.

धूप म्हणजे काय? धूप हा, सुंगध किंवा सुगंधासाठी जाळण्यात येणारा पदार्थ यांना सूचित करू शकतो. धूप, सुगंधी राळ आणि ओलिबॅनम व बालसम यांसारख्या डिंकांपासून बनवला जातो. या सर्वांची पूड केली जाते आणि ठराविक उपयोगासाठी विशिष्ट सुवास मिळावा म्हणून बहुतेकदा, मसाले, झाडांच्या साली आणि फुलांचे मिश्रण बनवले जाते.

प्राचीन काळांत धूप, सर्वांच्या आवडीचे आणि मौल्यवान वस्तू असल्यामुळे, धुपासाठी लागणारे जिन्‍नस, व्यापाराच्या प्रमुख वस्तू बनून गेल्या. दूरदूरहून या वस्तूंची ने-आण करणाऱ्‍या काफिल्यांची वर्दळ सुरू झाली. तुम्हाला कदाचित आठवत असेल, की याकोबाचा तरुण मुलगा योसेफ याला ‘उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात’ असलेल्या इश्‍माएली व्यापाऱ्‍यांना विकण्यात आले होते. (उत्पत्ति ३७:२५) धूपाची मागणी खूपच वाढल्यामुळे, धूप घेऊन जाणाऱ्‍या व्यापाऱ्‍यांनी सुरू केलेला मार्ग आशिया व युरोपमध्येही खुला झाला.

आजही अनेक धर्मांच्या समारंभांमध्ये व रीतीरिवाजांमध्ये धूप जाळला जातो. शिवाय, अधिकाधिक लोक आपल्या घरातील सुगंधित वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी धूप जाळतात. ख्रिश्‍चनांनी धूप जाळण्याविषयी कोणता दृष्टिकोन बाळगावा? उपासनेत धुपाचा उपयोग देवाला मान्य आहे का? याविषयावर बायबल काय म्हणते ते आपण पाहू या.

‘परमेश्‍वराप्रीत्यर्थ पवित्र’

प्राचीन इस्राएली लोकांमध्ये, निवासमंडपातील याजकांच्या कार्यांत धूप जाळण्याचे प्रमुख काम होते. मॅक्लिन्टॉक ॲण्ड स्ट्राँग यांचा एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “होय, असे दिसते की धूप जाळण्याला इब्री लोकांच्या उपासनेत इतके महत्त्व होते, की कदाचित उपासनेव्यतिरिक्‍त ते इतर कोणत्याही कार्यात धूप जाळायचे असे आपल्याला वाचायला मिळत नाही.”

यहोवा देवाने चार पदार्थांचे मिश्रण करून ते निवासमंडपात जाळण्यास सांगितले: ‘तू सुगंधी मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधाबिरुजा व शुद्ध ऊद ही घ्यावी; ही सर्व समभाग घ्यावी; आणि गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळून निर्भेळ शुद्ध आणि पवित्र असे धूपद्रव्य तयार करावे; त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे आणि ते थोडेसे घेऊन दर्शनमंडपातील कोशापुढे ठेवावे.’ (निर्गम ३०:३४-३६) विद्वान असे सुचवतात की मंदिराच्या वापरासाठी रब्बी लोकांनी नंतर वरील सामग्रीत इतर पदार्थ घातले.

निवासमंडपात जाळले जाणारे धूप पवित्र होते, केवळ देवाच्या उपासनेसाठी त्याचा वापर केला जात असे. यहोवाने आज्ञा दिली होती: “जे धूपद्रव्य तू तयार करिशील त्यासारखे मिश्रण तुम्ही आपल्या स्वतःसाठी तयार करू नये, हे परमेश्‍वराप्रीत्यर्थ तुम्ही पवित्र लेखावे. कोणी वास घेण्याकरिता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.” (निर्गम ३०:३७, ३८) एका ठराविक वेदीवर याजक दिवसातून दोनदा धूप जाळत असत. (२ इतिहास १३:११) आणि प्रायश्‍चित्ताच्या दिवशी महायाजक परमपवित्रस्थानात धूप जाळत असे.—लेवीय १६:१२, १३.

सर्वच प्रकारचे धूप देवाला स्वीकारयोग्य नव्हते. याजक नसलेल्या कोणी, गर्विष्ठ होऊन याजक असल्याप्रमाणे धूप जाळण्याचा प्रयत्न केल्यास देव त्याला शिक्षा देत असे. (गणना १६:१६-१८, ३५-४०; २ इतिहास २६:१६-२०) यहुदी राष्ट्राचे लोक एकीकडे यहोवासाठी धूप जाळायचे आणि दुसरीकडे खोट्या उपासनेत भाग घेऊन आपले हात रक्‍तरंजित करून धूप जाळायचे तेव्हा यहोवासमोर तो एक अपराध होता. त्यांच्या दांभिकपणामुळे यहोवाने असे घोषित केले: “धुपाचा मला वीट आहे.” (यशया १:१३, १५) यहोवाने सांगितलेल्या उपासनेबाबत इस्राएली लोक इतका हलगर्जीपणा दाखवू लागले, की त्यांनी मंदिर बंद केले आणि ते इतर वेद्यांवर धूप जाळू लागले. (२ इतिहास २८:२४, २५) इतकेच काय, तर काही वर्षांनंतर, पवित्र धुपाचा खोट्या दैवतांच्या दुष्ट उपासनेत वापर करण्यात येऊ लागला. अशा प्रकारच्या प्रथा यहोवाला उद्वेग आणणाऱ्‍या होत्या.—यहेज्केल १६:२, १७, १८.

धूप आणि आरंभीचे ख्रिस्ती

नियमशास्त्र करार आणि धूप जाळण्यासाठी असलेला याजकीय हुकूम, सा.यु. ३३ मध्ये ख्रिस्ताने नवीन कराराची स्थापना केली तेव्हा रद्द झाला. (कलस्सैकर २:१४) आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी धार्मिक कारणांसाठी धूप जाळल्याचा कोठेही अहवाल नाही. याविषयी, मॅक्लिन्टॉक ॲण्ड स्ट्राँग यांचा एन्सायक्लोपिडिआ म्हणतो: “[आरंभीचे ख्रिस्ती] धूप वापरत नसत हे निश्‍चित आहे. उलट, धूप वापरणे हे, मूर्तीपूजेचे वैशिष्ट्य होते. . . . एखाद्या भक्‍ताने मूर्तीपूजक वेदीवर धूपाचे काही तुकडे वाहिल्यास ते उपासनेचे एक कृत्य ठरत असे.”

आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी, मृत्यूदंडाची शिक्षा मिळण्याची शक्यता असूनही रोमी सम्राटाचे “ईश्‍वरत्व” कबूल करण्यासाठी धूप जाळण्यास नकार दिला. (लूक ४:८; १ करिंथकर १०:१४, २०) त्या दिवसांत, धुपाचा मूर्तीपूजेत उपयोग होत असल्यामुळे, आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी धुपाच्या व्यापारातही भाग का घेतला नाही हे समजण्याजोगे आहे.

आज धूप जाळणे

आज धुपाचा उपयोग कशाप्रकारे केला जातो? ख्रिस्ती धर्मजगताच्या अनेक चर्चेसमध्ये, विधींमध्ये व सेवांमध्ये धूप जाळला जातो. आशियातील पुष्कळ कुटुंबे, आपल्या दैवतांचा आदर करण्यासाठी व मृतांपासून संरक्षण मिळण्यासाठी मंदिरात किंवा घरातील देव्हाऱ्‍यात धूप जाळतात. धार्मिक सेवांमध्ये, खोलीत सुगंधी वातावरण निर्माण करण्यासाठी, बरे करण्यासाठी, शुद्धीकरण, संरक्षण वगैरे विविध प्रकारांच्या उपयोगासाठी धूप जाळला जातो.

कोणताही धर्म न पाळणाऱ्‍या लोकांमध्ये आजकाल धूप जाळण्याचे वेड पुन्हा सुरू झाले आहे. काही लोक, चिंतन करताना धूप जाळणे पसंत करतात. ऐहिक जगाच्या पलीकडे असलेल्या गूढ “वातावरणात” पोहंचण्यासाठी व गूढ “शक्‍ती” मिळवण्यासाठी धूपाचा उपयोग केला पाहिजे, असे एक मार्गदर्शक पुस्तक सुचवते. ते पुढे असेही सुचवते, की जीवनाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी, “अलौकिक व्यक्‍तींबरोबर” संपर्क साधण्यासाठी धूप जाळण्याचे विधी पार पाडावेत. या सर्व गोष्टी ख्रिश्‍चनांनी कराव्यात का?

शुद्ध उपासनेत खोट्या धार्मिक प्रथांची भेसळ करणाऱ्‍यांचा, यहोवा कडाडून विरोध करतो. प्रेषित पौलाने यशयाच्या भविष्यवाणीचा संदर्भ देऊन व ती ख्रिश्‍चनांना लागू करून त्यांना खोट्या धर्माच्या सर्व अशुद्ध प्रभावांपासून दूर राहण्यास आर्जवले. त्याने लिहिले: “‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभु म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन.’” (२ करिंथकर ६:१७; यशया ५२:११) खोटी उपासना किंवा जादूटोणा याजशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी टाळण्याचा खरे ख्रिस्ती कटाक्षाने प्रयत्न करतात.—योहान ४:२४.

धूपाचा उपयोग धार्मिक विधींमध्ये व जादूटोण्यात केला जात असल्यामुळे याचा अर्थ मग असा होतो का, की सर्व प्रकारचे धूप जाळणे चुकीचे आहे? नाही. एखाद्या व्यक्‍तीला आपल्या घरात धूप जाळून घरातील वातावरण सुगंधित करायला आवडेल. (नीतिसूत्रे २७:९) तरीपण, धूप जाळावा की नाही याबाबतीत ख्रिश्‍चनांनी विशिष्ट गोष्टींचा विचार करावा. तुम्ही राहता त्या क्षेत्रात लोक, धूप जाळण्याचा संबंध खोट्या धर्माच्या विधीशी लावतील का? तुमच्या समाजात, धूपाचा संबंध सहसा जादूटोण्याशी लावला जातो का? की, धूपाचा सर्वसामान्य उपयोग धार्मिक गोष्टींचा अंश नसलेल्या गोष्टींसाठी केला जातो?

एखादी व्यक्‍ती धूप जाळणे पसंत करीत असेल तर तिने स्वतःच्या विवेकाचा आणि इतरांच्या भावनांचा विचार करूनच निर्णय घ्यावा. (१ करिंथकर १०:२९) रोमकरांना लिहिलेले प्रेषित पौलाचे शब्द येथे लागू होतात. त्याने लिहिले: “शांतीला व परस्परांच्या बुद्धीला पोषक होणाऱ्‍या गोष्टींच्या मागे आपण लागावे. अन्‍नाकरिता देवाचे कार्य ढासळून पाडू नको. सर्व पदार्थ शुद्ध आहेत; परंतु जो माणूस अडखळण होईल अशा रीतीने खातो, त्याला ते वाईट आहे. मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो [किंवा अडखळतो अथवा अशक्‍त होतो] ते न करणे हे चांगले.”—रोमकर १४:१९-२१.

‘धूपाप्रमाणे’ असलेल्या प्रार्थना

इस्राएली लोकांमध्ये धूप जाळणे, देव ऐकत असलेल्या प्रार्थनांचे उचित प्रतीक होते. म्हणूनच, स्तोत्रकर्त्या दाविदाने यहोवाला असे गीत गायिले: ‘माझी प्रार्थना, तुझ्यासमोर धुपाप्रमाणे सादर होवो.’—स्तोत्र १४१:२.

विश्‍वासू इस्राएलांनी धूप जाळण्याला एक क्षुल्लक विधी समजले नाही. त्यांनी, यहोवाने सांगितल्याप्रमाणेच धूप तयार करून तो जाळण्याचा कटाक्षाने प्रयत्न केला. खरोखरचे धूप वापरण्याऐवजी ख्रिस्ती आज, आपला स्वर्गीय पिता यहोवा याला खोल कृतज्ञता व आदर व्यक्‍त करणाऱ्‍या प्रार्थना करतात. मंदिरांतील याजकांनी जाळलेल्या गोड सुवासाच्या धूपाप्रमाणे देवाचे वचन आपल्याला असे आश्‍वासन देते: “सरळाची प्रार्थना त्याला आनंदविते.”—नीतिसूत्रे १५:८.

[२९ पानांवरील चित्रे]

निवासमंडप आणि मंदिर येथे जाळण्यात येणारा धूप पवित्र होता

[३० पानांवरील चित्र]

चिंतन करण्याच्या उद्देशाने धूप जाळणे ख्रिश्‍चनांसाठी उचित आहे का?