व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“भिऊ नका, निराश होऊ नका”

“भिऊ नका, निराश होऊ नका”

“भिऊ नका, निराश होऊ नका”

“भिऊ नका, निराश होऊ नका. . . . देव तुमच्याबरोबर आहे.” २ इतिहास २०:१७, सुबोध भाषांतर.

१. दहशतवादाचा लोकांवर काय परिणाम होतो आणि त्यांची ही भीती निराधार का नाही?

सध्याच्या काळात, अनेक लोक भयग्रस्त व निराश झाले आहेत ते दहशतवादामुळे! दहशतवाद! हा शब्द ऐकताच मनात भीती असुरक्षितता आणि असहायता यांसारख्या भावना निर्माण होतात. दहशत, दुःख आणि क्रोध यांसारख्या मिश्र भावनांचे मनात काहूर माजते. बरेच लोक म्हणतात की हा दहशतवाद येणाऱ्‍या कित्येक वर्षांपर्यंत मानवजातीला पीडित करेल. आणि त्यांची ही भीती निराधार नाही, कारण काही देश अनेक दशकांपासून दहशतवादाच्या निरनिराळ्या प्रकारांना पूर्ण शक्‍तिनिशी लढा देत असूनही त्यांना फारसे यश आलेले नाही.

२. यहोवाचे साक्षीदार दहशतवादाच्या समस्येसंबंधी काय प्रतिक्रिया दाखवतात आणि यामुळे कोणते प्रश्‍न उपस्थित होतात?

तरीसुद्धा, परिस्थिती पूर्णतः निराशाजनक नाही. पृथ्वीच्या पाठीवर २३४ देशांत व प्रदेशांत सक्रियपणे प्रचार करत असलेले यहोवाचे साक्षीदार अतिशय आशावादी आहेत. दहशतवादाचे कधीही उच्चाटन होणार नाही अशी भीती बाळगण्याऐवजी त्यांना पूर्ण भरवसा आहे की तो नाहीसा होईल आणि तेसुद्धा फार लवकर. हा आशावाद वास्तवाला धरून आहे का? ही भयंकर पीडा या जगातून नाहीशी करण्यात कधीही कोणाला यश येईल का आणि हे कसे घडेल? कोणत्या न कोणत्या प्रकारच्या हिंसाचाराचा आपल्या सर्वांवर परिणाम होत असल्यामुळे, हा आशावाद बाळगण्याकरता कोणती कारणे आहेत याचे परीक्षण करणे योग्य ठरेल.

३. कोणत्या कारणांमुळे मनुष्य भयग्रस्त होतो आणि आपल्या काळाविषयी काय भाकीत करण्यात आले आहे

आज, लोक निरनिराळ्या कारणांमुळे भीतीग्रस्त आहेत. अशा असंख्य लोकांचा विचार करा ज्यांना म्हातारपणामुळे पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहावे लागते; अशा व्यक्‍तींबद्दल विचार करा की जे असाध्य रोगांमुळे जर्जर झाले आहेत आणि अशी कुटुंबे ज्यांना दोन वेळच्या जेवणासाठी काबाडकष्ट करावे लागते. किंबहुना, जीवनाच्या अनिश्‍चिततेचा विचार करा! एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा विपत्तीमुळे अचानक मृत्यू होण्याची आणि एका क्षणात आपल्याला प्रिय असलेले सर्वकाही उद्‌ध्वस्त होण्याची भीती मनुष्याला पदोपदी असते. ही भीती, ही चिंता आणि त्यासोबत वैयक्‍तिक जीवनातले संघर्ष व निराशा यांमुळे आपल्या या काळातल्या परिस्थितीशी पौलाचे शब्द अगदी तंतोतंत जुळतात: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, . . . ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी . . . होतील.”—२ तीमथ्य ३:१-५.

४. दुसरे तीमथ्य ३:१-३ यात जे निराशाजनक चित्र रेखाटले आहे त्याची चांगली बाजू कोणती आहे?

या वचनात रेखाटलेले चित्र एका दृष्टीने अतिशय नाउमेद करणारे आहे पण दुसरीकडे पाहता ते आपल्याला एक आशाही प्रदान करते. कठीण दिवस हे सैतानाच्या सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या काळी” येतील याकडे लक्ष द्या. याचा अर्थ लवकरच आपल्याला सुटका मिळेल आणि या दुष्ट जगिक व्यवस्थेची जागा देवाच्या त्या परिपूर्ण राज्याद्वारे घेतली जाईल ज्यासाठी येशूने आपल्या अनुयायांना प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्तय ६:९, १०) हे राज्य देवाचे स्वर्गीय सरकार आहे जे “कधी भंग होणार नाही” तर त्याऐवजी संदेष्टा दानीएल याने सांगितल्याप्रमाणे “ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.

ख्रिस्ती तटस्थता विरुद्ध दहशतवाद

५. दहशतवादाच्या धोक्याला अलीकडेच निरनिराळ्या देशांनी कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली?

अनेक दशकांपासून दहशतवादाने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. ११ सप्टेंबर, २००१ रोजी न्यू यॉर्क सिटी आणि वॉशिंग्टन डी.सी. यांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांनंतर दहशतवादाच्या धोक्याविषयी सारे जग जागरूक झाले. दहशतवादाच्या समस्येचे प्रमाण आणि त्याचा जागतिक अवाका लक्षात घेऊन बरीच राष्ट्रे लगेच त्याचा सामना करण्याकरता एकजूट झाली. उदाहरणार्थ प्रसार माध्यमांनुसार, दहशतवादाला सुसंघटितरित्या लढा देण्याकरता डिसेंबर ४, २००१ रोजी “युरोप, उत्तर अमेरिका व मध्य आशिया येथील ५५ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक सामाईक योजना आखली.” एका उच्च पदस्थ यु.एस. अधिकाऱ्‍याने या कृतीचे वर्णन दहशतवादाविरुद्धच्या लढाईत “एक नवे शक्‍तिशाली पाऊल” या शब्दांत केले. अचानक कोट्यवधी लोक, द न्यू यॉर्क टाईम्स मॅगझीन या नियतकालिकाच्या शब्दांत ‘एका ऐतिहासिक युद्धाच्या तयारीला’ लागले. हे सर्व प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे अर्थातच येणारा काळ सांगेल. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईचे दुष्परिणाम लक्षात घेता, बऱ्‍याच लोकांच्या मनात भीती व चिंता निर्माण झाली आहे; पण यहोवावर ज्यांची भिस्त आहे ते घाबरलेले नाहीत.

६. (अ) काहीजणांना कधीकधी यहोवाच्या साक्षीदारांनी घेतलेली ख्रिस्ती तटस्थतेची भूमिका स्वीकारणे कठीण का जाऊ शकते? (ब) राजकीय कार्यांसंबंधी येशूने आपल्या अनुयायांकरता कोणता आदर्श मांडला?

यहोवाच्या साक्षीदारांची राजकीय तटस्थता सर्वज्ञात आहे. पण शांतीच्या काळात त्यांच्या या तटस्थ भूमिकेविषयी बहुतेक लोक हरकत घेत नसले तरीसुद्धा, असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते इतक्या खुल्या मनाने विचार करत नाहीत. सहसा युद्धामुळे निर्माण होणारी भीती आणि अनिश्‍चितता तीव्र राष्ट्रप्रेमी भावनांना जन्म देते. अशा वेळी, एखादी व्यक्‍ती एका लोकप्रिय राष्ट्रीय चळवळीत का भाग घेत नाही हे समजणे लोकांना कठीण जाते. पण खऱ्‍या ख्रिश्‍चनांना हे माहीत आहे की ‘जगाचे नसण्याविषयी’ येशूने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले पाहिजे. (योहान १५:१९; १७:१४-१६; १८:३६; याकोब ४:४) याचा अर्थ त्यांनी राजकीय किंवा सामाजिक बाबतींत तटस्थता कायम ठेवली पाहिजे. स्वतः येशूने याबाबतीत योग्य आदर्श मांडला. त्याची परिपूर्ण बुद्धी आणि असामान्य गुणांचा विचार करता तो निश्‍चितच त्याच्या काळातील मानवी व्यवहारांत उत्तम योगदान देऊ शकला असता. पण त्याने राजकीय गोष्टींत गुंतण्यापासून स्वतःला आवरले. त्याच्या सेवाकार्याच्या सुरवातीला त्याने जगातल्या सर्व राज्यांवर प्रभुत्व मिळवण्याचे सैतानाचे आमीष धुडकावून लावले. नंतर त्याला बळजबरीने राजा बनवण्याचा लोक प्रयत्न करू लागले तेव्हा देखील त्याने दृढ निर्धाराने नकार दिला.—मत्तय ४:८-१०; योहान ६:१४, १५.

७, ८. (अ) यहोवाच्या साक्षीदारांच्या राजकीय तटस्थतेचा काय अर्थ होत नाही आणि का? (ब) रोमकर १३:१, २ यानुसार, सरकारांविरुद्ध हिंसक चळवळींत भाग घेणे का योग्य नाही?

यहोवाचे साक्षीदार तटस्थ भूमिका घेतात याचा अर्थ ते हिंसाचाराचे समर्थन करतात किंवा त्याकडे डोळेझाक करतात असा होत नाही. असे केल्यास “प्रीतीचा व शांतीचा देव” यहोवा याचे सेवक असण्याचा त्यांचा दावा खोटा ठरेल. (२ करिंथकर १३:११) यहोवाचा हिंसाचाराविषयी कसा दृष्टिकोन आहे याचे त्यांना ज्ञान आहे. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्‍वर नीतिमानाला कसास लावितो; त्याला दुर्जनाचा व आततायी [“हिंसाचारी,” NW] माणसाचा वीट येतो.” (स्तोत्र ११:५) तसेच येशूने प्रेषित पेत्राला जे सांगितले होते त्याचीही त्यांना जाणीव आहे: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.”—मत्तय २६:५२.

खोट्या ख्रिश्‍चनांनी बऱ्‍याचदा ‘तरवारीचा’ आसरा घेतला याचा स्पष्ट पुरावा इतिहासात सापडतो, पण यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत हे खरे नाही. ते या सर्व प्रकारच्या राजकीय कार्यविधींपासून दूर राहतात. ते रोमकर १३:१, २ येथे दिलेली आज्ञा विश्‍वासूपणे पाळतात: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाराला आड येतो, तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणारे आपणावर दंड ओढवून घेतील.”

९. कोणत्या दोन मार्गांनी यहोवाचे साक्षीदार दहशतवादाचा विरोध करतात?

पण दहशतवादी कृत्ये मुळात दुष्टपणाची असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांचा प्रतिकार करण्यात मदत करू नये का? होय करावा आणि ते करतही आहेत. एकतर ते अशाप्रकारच्या कृत्यांत स्वतः सहभागी होत नाहीत. आणि दुसरे म्हणजे ते लोकांना अशा ख्रिस्ती तत्त्वांचे शिक्षण देतात ज्यांचे पालन केल्याने सर्व प्रकारचा हिंसाचार पूर्णपणे नाहीसा होतो. * गत वर्षी साक्षीदारांनी हा ख्रिस्ती मार्ग आत्मसात करण्यास लोकांना मदत करण्याकरता १,२०,२३,८१,३०२ तास खर्च केले. हा वेळ व्यर्थ गेला नाही कारण या कार्यामुळे २,६५,४६९ जणांचा यहोवाचे साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा झाला आणि हे पाऊल उचलण्याद्वारे त्यांनी, आपण हिंसाचाराच्या पूर्णपणे विरोधात आहोत हे सार्वजनिकरित्या दाखवले.

१०. आजच्या जगातील हिंसाचाराचे भविष्यात काय होईल?

१० याशिवाय, यहोवाचे साक्षीदार ओळखतात की ते स्वतः जगातून दुष्टता काढू शकत नाहीत. पण जो काढू शकतो त्याच्यावर, अर्थात यहोवा देवावर ते आपला पूर्ण भरवसा ठेवतात. (स्तोत्र ८३:१८) प्रामाणिक प्रयत्न करूनही मानव हिंसाचाराला आळा घालू शकत नाहीत. आपल्या काळाविषयी, म्हणजेच ‘शेवटल्या काळाविषयी’ एक प्रेरित बायबल लेखक आपल्याला अशी ताकीद देतो: “दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.” (२ तीमथ्य ३:१, १३) या दृष्टिकोनातून पाहिल्यास, दुष्टपणाविरुद्धची लढाई मानव जिंकतील याची फारशी शक्यता नाही. दुसरीकडे पाहता, आपण यहोवावर पूर्णपणे विसंबून राहू शकतो की तोच हिंसाचार पूर्णपणे व कायमचा काढून टाकेल.—स्तोत्र ३७:१, २, ९-११; नीतिसूत्रे २४:१९, २०; यशया ६०:१८.

येणाऱ्‍या नाशाला निर्भयतेने तोंड देणे

११. हिंसाचाराचे उच्चाटन करण्याकरता यहोवाने आधीच कोणती पावले उचलली आहेत?

११ शांतीचा देव हिंसाचाराचा द्वेष करतो. म्हणूनच त्याने या दुष्टतेचे मूळ कारण दियाबल सैतान याचा नाश करण्याकरता पावले उचलण्यास सुरवात केली आहे. किंबहुना त्याने आधीच सैतानाला, आद्यदेवदूत मीखाएल—सिंहासनाधिष्ट झालेला देवाचा नवा राजा येशू ख्रिस्त याच्या हातून अपमानास्पदरित्या पराभूत केले आहे. बायबल या घटनेचे पुढीलप्रमाणे वर्णन करते: “स्वर्गात युद्ध सुरू झाले; मीखाएल व त्याचे दूत अजगराबरोबर युद्ध करण्यास निघाले, आणि त्यांच्याबरोबर अजगर व त्याचे दूत लढले; तरी त्यांचे काही चालले नाही, आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणहि उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.”—प्रकटीकरण १२:७-९.

१२, १३. (अ) एकोणीसशे चौदा सालाचे काय महत्त्व आहे? (ब) देवाच्या राज्याचे समर्थन करणाऱ्‍यांकरता यहेज्केलच्या भविष्यवाणीत काय भाकीत करण्यात आले आहे?

१२ हे युद्ध स्वर्गात केव्हा घडले यासंबंधी बायबलचा कालक्रम आणि जगीक घडामोडी दोन्ही १९१४ सालाकडे संकेत करतात. तेव्हापासून जगाची परिस्थिती बिघडतच गेली आहे. यामागचे कारण स्पष्ट करताना, प्रकटीकरण १२:१२ म्हणते: “स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्‍यांनो, उल्लास करा; पृथ्वी व समुद्र ह्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हांकडे आला आहे.”

१३ साहजिकच, दियाबलाचा क्रोध मुख्यतः देवाचे अभिषिक्‍त उपासक आणि ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ त्यांचे सोबती यांच्यावर आहे. (योहान १०:१६; प्रकटीकरण १२:१७) त्याचा हा विरोध लवकरच कळसास पोचेल; देवाच्या स्थापित राज्याचे समर्थन करणाऱ्‍या व त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या सर्वांविरुद्ध दियाबल एक तीव्र स्वरूपाचा हल्ला करेल. सर्व शक्‍तिनिशी केलेल्या या हल्ल्यास यहेज्केल अध्याय ३८ यात “मागोग देशातील गोग” याचा हल्ला म्हणण्यात आले आहे.

१४. गतकाळात यहोवाच्या साक्षीदारांना कोणते संरक्षण मिळाले आणि ही परिस्थिती पुढेही राहील का?

१४ सैतानाला स्वर्गातून काढल्यानंतर, त्याने देवाच्या लोकांवर हल्ला केला तेव्हा काही प्रसंगी राजकीय गटांनी त्यांना संरक्षण दिले; प्रकटीकरण १२:१५, १६ या वचनांत याचे लाक्षणिक भाषेत वर्णन केले आहे. याच्या विरोधात बायबल असे दाखवते की सैतानाच्या शेवटल्या हल्ल्याच्या वेळी, यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांच्या मदतीला कोणतीही मानवी संस्था पुढे येणार नाही. यामुळे ख्रिश्‍चनांनी भ्यावे किंवा घाबरून जावे का? मुळीच नाही!

१५, १६. (अ) यहोशाफाटच्या काळात यहोवाने आपल्या लोकांना ज्याप्रकारे दिलासा दिला त्यावरून आज ख्रिश्‍चनांकरता कोणती आशा बाळगण्याचे कारण मिळते? (ब) यहोशाफाट व यहुदाच्या लोकांनी आजच्या काळातील देवाच्या सेवकांकरता कोणता नमूना ठेवला आहे?

१५ देवाने आपल्या राष्ट्राला राजा यहोशाफाटच्या काळात ज्याप्रमाणे पाठिंबा दिला त्याचप्रमाणे तो निश्‍चितच येणाऱ्‍या काळातही आपल्या लोकांच्या पाठीशी राहील. आपण याविषयी असे वाचतो: “यरुशलेमचे व यहूदाचे सर्व लोकहो, माझे ऐका! यहोशाफाट राजे, तुम्ही पण ऐका! देव म्हणतो, ‘घाबरू नका! हे महान सैन्य पाहून गर्भगळित होऊ नका, कारण ही लढाई तुमची नसून देवाची आहे. . . . तुम्हाला त्यांच्याशी लढण्याची आवश्‍यकता नाही. आपापल्या जागा घ्या, शांतपणे उभे राहा आणि देव तुमची किती आश्‍चर्यकारक रीतीने सुटका करतो ते पाहा! अहो यहूदाच्या व यरुशलेमच्या लोकांनो, भिऊ नका, निराश होऊ नका! त्यांच्याशी सामना करण्यास उद्या तिकडे जा, कारण देव तुमच्याबरोबर आहे.”—२ इतिहास २०:१५-१७, सुबोध भाषांतर.

१६ यहुदाच्या लोकांना आश्‍वासन देण्यात आले की त्यांना लढावे लागणार नाही. त्याचप्रकारे मागोगचा गोग देवाच्या लोकांवर हल्ला करील तेव्हा ते स्वतःच्या संरक्षणाकरता शस्त्रे उचलणार नाहीत. उलट ते ‘शांतपणे उभे राहून, देव आपली कशी सुटका करतो ते पाहतील.’ अर्थात उभे राहणे हे संपूर्णतः अक्रियाशील असण्यास सूचित करत नाही; यहोशाफाटच्या काळातही ते लोक पूर्णपणे अक्रियाशील नव्हते. आपण त्यांच्याविषयी असे वाचतो: “मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लवविले; त्याप्रमाणेच सर्व यहूदी व यरुशलेमनिवासी यांनी परमेश्‍वराचे भजन करून त्याच्यापुढे दंडवत घातले; . . . ‘सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्‍वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे’, हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे म्हणून [यहोशाफाटाने] प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांस त्या कामी नेमिले.” (२ इतिहास २०:१८-२१) होय, शत्रूला तोंड देतानाही यहुदाच्या लोकांनी यहोवाची सक्रियपणे स्तुती करणे जारी ठेवले. गोग हल्ला करील तेव्हा यहोवाचे साक्षीदारही याच नमुन्याचे पालन करतील.

१७, १८. (अ) यहोवाचे साक्षीदार आज गोगच्या हल्ल्यासंबंधी कशाप्रकारे आशावादी दृष्टिकोन बाळगतात? (ब) अलीकडेच ख्रिस्ती तरुणांना कोणती समयोचित सूचना देण्यात आली?

१७ तोपर्यंत—आणि गोगचा हल्ला सुरू झाल्यानंतरही—यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याचे समर्थन करत राहतील. जगभरातील ९४,६०० मंडळ्यांच्या सहवासात राहून ते पाठबळ व संरक्षण मिळवत राहतील. (यशया २६:२०) यहोवाची निर्भयतेने स्तुती करण्याकरता आज किती उत्तम संधी आहे! गोगच्या हल्ल्याची अपेक्षा करत असताना ते भीतीने माघार घेत नाहीत. उलट त्यांना आपल्या स्तुतीरूपी बलिदानात शक्य तितकी भर घालण्याची प्रेरणा मिळते.—स्तोत्र १४६:२.

१८ सबंध जगात पूर्ण वेळेची सेवा हाती घेतलेल्या हजारो तरुणांनी हीच निर्भय मनोवृत्ती प्रदर्शित केली आहे. अशी जीवनशैली किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरता तरुणांनो—तुम्ही आपल्या जीवनाचा कसा उपयोग करणार? (इंग्रजी) या पत्रिकेचे २००२ सालच्या प्रांतीय अधिवेशनांत अनावरण करण्यात आले. सर्व ख्रिस्ती, मग ते तरुण असोत वा वृद्ध, अशा या समयोचित सूचनांबद्दल कृतज्ञ आहेत.—स्तोत्र ११९:१४, २४, ९९, ११९, १२९, १४६.

१९, २०. (अ) ख्रिश्‍चनांनी का भिऊ नये किंवा कचरू नये? (ब) पुढील अभ्यास लेख आपल्याला कशाप्रकारे मदत करील?

१९ जगाची परिस्थिती कितीही वाईट होवो, ख्रिश्‍चनांनी घाबरू नये किंवा भिऊ नये. त्यांना माहीत आहे की यहोवाचे राज्य लवकरच सर्व प्रकारचा हिंसाचार नाहीसा करेल. त्यांना हेही जाणून सांत्वन मिळते, की हिंसाचारामुळे ज्यांनी आपले जीव गमावले आहेत त्यांपैकी कित्येकांना पुनरुत्थानाद्वारे पुन्हा जिवंत केले जाईल. काहींना यामुळे यहोवाबद्दल जाणून घेण्याची प्रथमच संधी मिळेल तर इतरांना आपली समर्पित सेवा पुढे चालू ठेवण्याची संधी मिळेल.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

२० खरे ख्रिस्ती या नात्याने आपण ख्रिस्ती तटस्थता कायम ठेवण्याची गरज ओळखतो आणि ती टिकवून ठेवण्याचा आपला दृढ निर्धार आहे. ‘शांतपणे उभे राहून देव आपली कशी सुटका करील ते पाहण्याची’ अद्‌भुत प्रत्याशा आपण नेहमी मनात बाळगू इच्छितो. बायबलच्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेविषयी अधिकाधिक स्पष्ट समज देत असलेल्या सध्याच्या काळातील घटनांची जाणीव करून देण्याद्वारे पुढील लेख आपला विश्‍वास बळकट करील.

[तळटीपा]

^ परि. 9 साक्षीदार बनण्याकरता ज्यांनी हिंसाचारी मार्गाचा त्याग केला अशा व्यक्‍तींच्या उदाहरणांकरता सावध राहा! नियतकालिकाच्या मार्च २२, १९९० (इंग्रजी) अंकातील पृष्ठ २१ आणि ऑगस्ट ८, १९९१ (इंग्रजी) अंकातील पृष्ठ १८; तसेच टेहळणी बुरूज नियतकालिकातील जानेवारी १, १९९६ अंकातील पृष्ठ ५ आणि ऑगस्ट १ १९९८ अंकातील पृष्ठ ५ पाहा.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

• आज अनेक लोक इतके निराशावादी का आहेत?

• यहोवाचे साक्षीदार भविष्यासंबंधी आशावादी का आहेत?

• सर्व प्रकारच्या हिंसाचारासंबंधी यहोवाने आधीच कोणती पावले उचलली आहेत?

• गोगच्या हल्ल्याची आपण भीती बाळगण्याचे कारण का नाही?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१३ पानांवरील चित्र]

येशूने ख्रिस्ती तटस्थतेसंबंधी उत्तम आदर्श मांडला

[१६ पानांवरील चित्रे]

हजारो तरुण साक्षीदारांनी आनंदाने पूर्णवेळेची सेवा हाती घेतली आहे

[१२ पानांवरील चित्राचे श्रेय]

UN PHOTO १८६२२६/M. Grafman