वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
खूप आजारी असलेल्या किंवा म्हाताऱ्या पाळीव प्राण्याला सुलभ मृत्यू येऊ देणे चुकीचे आहे का?
पुष्कळ लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आवडतात व त्यांना त्यांच्यामुळे आनंदही मिळतो. काही पाळीव प्राणी तर उत्तम सोबती होतात. जसे की, कुत्रे त्यांच्या मालकांच्याप्रती पूर्ण आज्ञाधारकता व प्रेम दाखवतात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे, अशा प्राण्याबद्दल आणि तेही जर तो प्राणी अनेक वर्षांपासून त्यांच्याबरोबर असल्यास त्याच्याबद्दल जिव्हाळा निर्माण होणे हे समजण्याजोगे आहे.
परंतु, बहुतेक पाळीव प्राण्यांचे आयुष्य जास्त नसते. कुत्रे १० ते १५ वर्षे किंवा त्याहून थोडे अधिक जगतात, आणि मांजरी त्यांच्या जातीप्रमाणे जवळजवळ इतकाच काळ जगतात. पण म्हातारपणामुळे हे प्राणी आजारी पडतात आणि अधू होतात तेव्हा त्यांच्या मालकांना त्यांची ही अवस्था पाहवत नाही कारण त्यांना या प्राण्यांचे लहानपण व तेव्हा ते किती चपळ होते हे सर्व आठवत असते. मग या प्राण्यांना सुलभ मृत्यू येऊ देऊन त्यांचे दुखणे थांबवणे चुकीचे ठरेल का?
प्राण्यांबरोबर व्यवहार करताना ख्रिश्चन व्यक्तीला देवाच्या इच्छेच्या सुसंगतेत कार्य करण्याची इच्छा असेल. प्राण्यांना क्रूर वागणूक देणे हे अर्थातच देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे कारण त्याचे वचन म्हणते: “धार्मिक मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो.” (नीतिसूत्रे १२:१०) परंतु याचा असा अर्थ होत नाही, की मानवांबद्दल देवाचा जो दृष्टिकोन आहे तोच प्राण्यांबद्दलही आहे. देवाने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवामध्ये व प्राण्यांमध्ये स्पष्ट फरक दाखवला. जसे की, त्याने केवळ मानवांना सार्वकालिक जीवनाची आशा दिली; ही आशा त्याने प्राण्यांना दिली नाही. (रोमकर ६:२३; २ पेत्र २:१२) देव निर्माणकर्ता असल्यामुळे त्याला मानव व प्राणी यांच्यामधील उचित नातेसंबंध ठरवण्याचा अधिकार आहे.
तो नातेसंबंध कोणता हे उत्पत्ति १:२८ मध्ये सांगितले आहे. देवाने पहिल्या मानवाला सांगितले: “समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” तसेच स्तोत्र ८:६-८ म्हणते: “तू सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेविले आहे. शेरडेंमेढरें, गुरेंढोरें ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे.”
देवाने हेही स्पष्टपणे सांगितले, की मानव प्राण्यांचा उचित वापर करण्यासाठी त्यांना मारू शकतो. जसे की प्राण्यांच्या कातडीपासून वस्र बनवता येऊ शकतात. शिवाय, नोहाच्या दिवसांतील जलप्रलयानंतर देवाने मानवांना, ते पूर्वी खात असलेल्या भाजीपाल्याबरोबर प्राण्यांचे मांसही खाण्याची परवानगी दिली.—उत्पत्ति ३:२१; ४:४; ९:३.
परंतु याचा अर्थ असा होत नाही, की केवळ मनोरंजनाकरता प्राण्यांना ठार मारण्याची त्यांना मोकळीक आहे. उत्पत्ति १०:९, NW येथे बायबल निम्रोदाचे वर्णन “बलवान पारधी” असे करते. तेच वचन पुढे म्हणते की यामुळे तो “यहोवाच्या विरोधात” गेला.
यास्तव, मानवाला प्राण्यांवर सत्ता गाजवण्याचा अधिकार असला तरी, त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करू नये तर देवाच्या वचनातील तत्त्वांच्या सुसंगेतत त्याचा उपयोग करावा. यात, खूप वय झाल्यामुळे, गंभीर इजा झाल्यामुळे किंवा असाध्य रोग जडल्यामुळे एखाद्या पाळीव प्राण्याला खूप त्रास होत असेल तर त्याला विनाकारण तडफडत न ठेवणे समाविष्ट आहे. अशा वेळी, काय करावे हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ठरवावे. आपला पाळीव प्राणी बरा होण्याची शक्यता दिसत नसली तर त्याला जिवंत ठेवून अधिक त्रास होऊ देणे दयाळुपणा ठरणार नाही असे तिने ठरवल्यास, ती कदाचित सुलभ मृत्यूद्वारे त्या प्राण्याला झोपी घालण्याचा निर्णय घेईल.