व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शांतपणे उभे राहा आणि यहोवा कशी सुटका करतो ते पाहा!

शांतपणे उभे राहा आणि यहोवा कशी सुटका करतो ते पाहा!

शांतपणे उभे राहा आणि यहोवा कशी सुटका करतो ते पाहा!

“आपापल्या जागा घ्या, शांतपणे उभे राहा, आणि देव तुमची किती आश्‍चर्यकारक रीतीने सुटका करतो ते पाहा!”२ इतिहास २०:१७, सुबोध भाषांतर.

१, २. ‘मागोग देशाच्या गोगचा’ लवकरच होणार असलेला हल्ला, आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या धोक्यापेक्षा अधिक भयंकर असेल असे का म्हणता येईल?

काहींनी दहशतवादाचे वर्णन, जगव्याप्त सुसंस्कृत मानव समाजावरील हल्ला या शब्दांत केले आहे. निश्‍चितच अशाप्रकारची धोकेदायक परिस्थिती गांभिर्याने घेण्याजोगी आहे. पण याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक भयानक असा एक हल्ला आहे ज्याकडे जागतिक मानव समाज पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. आपण कोणत्या हल्ल्याविषयी बोलत आहोत?

हा ‘मागोग देशाच्या गोगचा’ हल्ला आहे; याविषयी बायबलमध्ये यहेज्केलच्या ३८ व्या अध्यायात वर्णन केले आहे. हा हल्ला आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या धोक्यापेक्षाही अधिक भयानक असेल असे म्हणणे अतिशयोक्‍तीचे आहे का? मुळीच नाही, कारण गोगचा हल्ला हा केवळ मानवी सरकारांवर केलेला हल्ला नाही. तर हा खुद्द देवाच्या स्वर्गीय सरकाराविरुद्ध एक आघात आहे! पण मनुष्यांना आपल्याविरुद्ध केलेल्या हल्ल्यांना तोंड देण्यात काही प्रमाणातच यश येत असले तरीसुद्धा देवाच्या बाबतीत तसे नाही; निर्माणकर्ता देव गोगच्या अधिक भयंकर अशा हल्ल्यास तोंड देण्याकरता पूर्णपणे समर्थ आहे.

देवाच्या सरकारावर हल्ला

३. जागतिक शासकांना १९१४ पासून काय करण्यास प्रोत्साहित करण्यात आले, पण त्यांनी कशाप्रकारे प्रतिसाद दिला आहे?

देवाचा राज्य करत असलेला राजा आणि सैतानाचे दुष्ट व्यवस्थीकरण यांच्यातला संघर्ष १९१४ साली देवाचे राज्य स्वर्गात स्थापित झाले तेव्हापासूनच सुरू आहे. त्या वेळी मानवी शासकांना देवाच्या निवडलेल्या शासकाला अधीन होण्याचे सूचित करण्यात आले होते. पण त्यांनी असे करण्यास नकार दिला आहे; याविषयी असे भाकीत करण्यात आले होते: “परमेश्‍वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की, चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणावरील त्यांचे पाश फेकून देऊ.” (स्तोत्र २:१-३) राज्य शासनाचा हा विरोध मागोग देशाचा गोग हल्ला करील तेव्हा कळसास पोचेल.

४, ५. मानव देवाच्या अदृश्‍य स्वर्गीय सरकारच्या विरोधात लढतात हे कसे शक्य आहे?

एका अदृश्‍य, स्वर्गीय सरकाराविरुद्ध मानव कसे लढू शकतात असे कदाचित आपल्याला वाटेल. या सरकाराविषयी बायबल खुलासा करते, की या सरकारात ‘कोकऱ्‍यासोबत’ “पृथ्वीवरून विकत घेतलेले एक लक्ष चव्वेचाळीस हजार लोक” आहेत. (प्रकटीकरण १४:१, ३; योहान १:२९) स्वर्गीय असल्यामुळे या नव्या सरकारला “नवे आकाश” आणि या सरकारच्या पृथ्वीवरील प्रजेला “नवी पृथ्वी” म्हणण्यात आले आहे. (यशया ६५:१७; २ पेत्र ३:१३) ख्रिस्तासोबत राज्य करणाऱ्‍या १,४४,००० सहशासकांपैकी बहुतेकांनी आपले पृथ्वीवरील मार्गाक्रमण विश्‍वासूपणे संपवले आहे. अशारितीने त्यांनी स्वर्गातील नवी सेवानियुक्‍ती स्वीकारण्याकरता स्वतःला योग्य शाबीत केले आहे.

पण १,४४,००० जणांपैकी एक लहानसा शेषवर्ग अद्यापही पृथ्वीवर आहे. २००२ साली प्रभूच्या सांज भोजनाच्या विधीला उपस्थित राहिलेल्या १,५०,००,००० पेक्षा अधिक जणांपैकी केवळ ८,७६० जणांनी या स्वर्गीय सेवानियुक्‍तीकरता निवड होण्याची आशा व्यक्‍त केली आहे. राज्याच्या या भावी शेष सदस्यांवर कोणीही हल्ला करण्याचे धाडस केल्यास ते मुळात देवाच्या राज्याविरुद्ध हल्ला करण्यासारखे ठरेल.—प्रकटीकरण १२:१७.

राजा विजयावर विजय मिळवतो

६. यहोवा व ख्रिस्त देवाच्या लोकांना केल्या जाणाऱ्‍या विरोधाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात?

यहोवाच्या स्थापित राज्याच्या विरोधाला त्याची काय प्रतिक्रिया असेल, याविषयी असे भाकीत करण्यात आले होते: “स्वर्गात जो राजासनारूढ आहे तो हसत आहे; प्रभु त्यांचा उपहास करीत आहे. पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्‍त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांस घाबरे करील. तो म्हणेल, मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.” (स्तोत्र २:४-६) यहोवाच्या मार्गदर्शनाखाली, ‘विजयावर विजय मिळवण्याची’ ख्रिस्ताची वेळ आता आली आहे. (प्रकटीकरण ६:२) शेवटला विजय मिळवण्याच्या काळादरम्यान यहोवाच्या लोकांचा विरोध केला जाईल तेव्हा यहोवाचा याविषयी काय दृष्टिकोन असेल? त्याचा स्वतःचा व त्याच्या राज्य करत असलेल्या राजाचा विरोध केला जात आहे या दृष्टीने तो याकडे पाहील. यहोवा म्हणतो: “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जखऱ्‍या २:८) आणि येशूनेही स्पष्टपणे सांगितले होते, की लोक त्याच्या अभिषिक्‍त बांधवांकरता जे करतात किंवा करत नाहीत ते त्याच्यासाठी करण्यासारखे किंवा न करण्यासारखे आहे असे तो लेखतो.—मत्तय २५:४०, ४५.

७. प्रकटीकरण ७:९ येथे वर्णन केलेला “मोठा लोकसमुदाय” गोगच्या क्रोधाचे निशाण बनतो यामागे कोणती कारणे आहेत?

अर्थात, जे अभिषिक्‍त शेषवर्गाचे सक्रिय समर्थन करतात त्यांना देखील गोगच्या क्रोधाची झळ लागेल. देवाच्या ‘नव्या पृथ्वीचे’ भावी सदस्य म्हणजे, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी” निवडलेला एक “मोठा लोकसमुदाय” आहे. (प्रकटीकरण ७:९) ते ‘शुभ्र झगे परिधान करून राजासनासमोर व कोकऱ्‍यासमोर उभे आहेत.’ याचा अर्थ असा, की देवासमोर व ख्रिस्त येशूसमोर त्यांना संमती प्राप्त आहे. ‘हातात झावळ्या घेऊन’ ते विश्‍वाचा सार्वभौम या नात्याने यहोवाच्या न्याय्य पदाचा जयजयकार करतात; “देवाचा कोकरा,” राजा येशू ख्रिस्त या सिंहासनाधिष्ट झालेल्या राजाच्या राज्याद्वारे यहोवा आपले शासन चालवतो.—योहान १:२९, ३६.

८. गोगचा हल्ला ख्रिस्ताला काय करण्यास प्रवृत्त करेल आणि याचा काय परिणाम होईल?

गोगचा हल्ला देवाच्या सिंहासनाधिष्टित राजाला कारवाई करण्यास आणि हर्मगिदोनाची लढाई लढण्यास प्रवृत्त करेल. (प्रकटीकरण १६:१४, १६) ज्यांनी यहोवाचे सार्वभौमत्व स्वीकारण्यास नकार दिला त्यांचा नाश होईल. पण देवाच्या राज्याला निष्ठावान राहिल्यामुळे ज्यांचा छळ झाला व जे त्यातही टिकून राहिले अशांना कायमची सुटका मिळेल. याविषयी प्रेषित पौलाने असे लिहिले: “ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. तुम्हावर संकट आणणाऱ्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्‍या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांति देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभु येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल. तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.”—२ थेस्सलनीकाकर १:५-८.

९, १०. (अ) यहोवाने यहुदाला एका शक्‍तिशाली शत्रूविरुद्ध कशाप्रकारे विजय मिळवून दिला? (ब) आज ख्रिश्‍चनांनी काय करत राहिले पाहिजे?

येणारे मोठे संकट, ज्याचा अंत हर्मगिदोनात होईल त्यात ख्रिस्त सर्व दुष्टतेविरुद्ध लढाई लढेल. पण ज्याप्रमाणे हजारो वर्षांपूर्वी यहुदाच्या दोन गोत्रांच्या राज्यातील रहिवाशांना आपल्या शत्रूंविरुद्ध लढावे लागले नाही त्याचप्रमाणे हर्मगिदोनातही येशूच्या अनुयायांना लढावे लागणार नाही. ती लढाई यहोवाची होती आणि त्यानेच आपल्या लोकांना विजय मिळवून दिला. याविषयीचा अहवाल असे म्हणतो: “तेव्हा अम्मोनी, मवाबी व सेइर पहाडातले लोक जे यहूदावर चाल करून येत होते त्यांस गाठण्यास परमेश्‍वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. अम्मोनी व मवाबी सेइर पहाडातल्या लोकांची अजिबात कत्तल उडवून त्यांचा विध्वंस करावा म्हणून त्यांजवर उठले; सेइरनिवाश्‍यांचा निःपात केल्यावर ते एकमेकांचा वध करू लागले. रानातील टेहळणीच्या बुरुजानजीक यहूदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टि फेकिली तेव्हा चोहोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यांस दिसून आले.”—२ इतिहास २०:२२-२४.

१० “तुम्हास लढावे लागणार नाही,” असे जे यहोवाने भाकीत केले होते त्याप्रमाणेच घडले. (२ इतिहास २०:१७) येशू ख्रिस्त जेव्हा ‘विजयावर विजय मिळवण्यास’ कार्य करेल तेव्हा खरे ख्रिस्ती याच आदर्शाचे अनुकरण करतील. तोपर्यंत, ते दुष्टाईला लढा देत राहतात; अर्थात, शस्त्रांच्या साहाय्याने नाही तर आत्मिक शस्त्रांच्या साहाय्याने. त्याअर्थी, ते ‘बऱ्‍याने वाईटाला जिंकत राहतात.’—रोमकर ६:१३; १२:१७-२१; १३:१२; २ करिंथकर १०:३-५.

गोगच्या हल्ल्यात कोण पुढाकार घेतील?

११. (अ) गोग कोणाच्या मार्फत हल्ला करेल? (ब) आध्यात्मिकरित्या सतर्क राहण्यात काय सामील आहे?

११ मागोगचा गोग कोण आहे? १९१४ पासून हीन करण्यात आलेल्या दियाबल सैतानास तो सूचित करतो. आत्मिक प्राणी असल्यामुळे तो थेटपणे हल्ला करू शकत नाही, तर तो आपल्या मानवी हस्तकांमार्फत कार्य करेल. हे मानवी हस्तक कोण असतील? बायबल आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देत नाही पण काही संकेत दिलेले आहेत, ज्यांच्या आधारावर हे हस्तक कोण असतील हे ओळखण्यास आपल्याला मदत मिळते. बायबलच्या भविष्यवाण्यांची पूर्णता होत असताना ज्या जागतिक घडामोडी घडतील त्यांवरून आपल्याला अधिकाधिक स्पष्ट समज प्राप्त होईल. यहोवाचे लोक अनुमान काढण्याचे टाळतात पण ते आध्यात्मिकरित्या सतर्क राहतात. बायबलच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेशी जुळणाऱ्‍या राजकीय व धार्मिक घडामोडींचे ते पूर्ण भान ठेवतात.

१२, १३. संदेष्टा दानीएल याने देवाच्या लोकांवर एक शेवटला हल्ला होण्याविषयी कसे भाकीत केले?

१२ संदेष्टा दानीएल देवाच्या लोकांविरुद्ध केल्या जाणाऱ्‍या शेवटल्या हल्ल्याविषयी काही माहिती देतो. तो असे लिहितो: “पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो [उत्तरेचा राजा] चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल. समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील, पण त्याचा अंत येईल; कोणी त्यास साहाय्य करणार नाही.”—दानीएल ११:४४, ४५.

१३ बायबलच्या संदर्भात विचार केल्यास, ‘समुद्र’ हा महासमुद्राला किंवा भूमध्य सागराला सूचित करतो आणि ‘पवित्र पर्वत’ हे सीयोन होते ज्याविषयी यहोवाने असे म्हटले: “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.” (स्तोत्र २:६; यहोशवा १:४) त्याअर्थी, आत्मिक अर्थाने “समुद्राच्या व शोभवंत पवित्र पर्वताच्या दरम्यान” असलेली भूमी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या वैभवी आत्मिक क्षेत्राला सूचित करते. देवापासून दुरावलेल्या मानवजातीच्या समुद्रासोबत आता ते संलग्न नाहीत आणि ते ख्रिस्त येशूसोबत स्वर्गीय राज्यात राज्य करण्याची आशा करतात. स्पष्टपणे, दानीएलाच्या भविष्यवाणीनुसार उत्तरेचा राजा उग्र स्वरूपाचा हल्ला करेल तेव्हा देवाचे अभिषिक्‍त सेवक व मोठ्या लोकसमुदायातील त्यांचे निष्ठावान साथीदार त्याचे निशाण बनतील.—यशया ५७:२०; इब्री लोकांस १२:२२; प्रकटीकरण १४:१.

देवाचे सेवक कशी प्रतिक्रिया दाखवतील?

१४. हल्ला झाल्यावर देवाचे लोक कोणत्या तीन गोष्टी करतील?

१४ हल्ला सुरू झाल्यानंतर देवाच्या सेवकांकडून काय करण्याची अपेक्षा केली जाईल? पुन्हा एकदा यहोशाफाटाच्या काळात देवाच्या नमुनेदार राष्ट्राने जी प्रतिक्रिया दाखवली तीच देवाच्या लोकांकरता एका नमुन्यासारखी आहे. त्या काळात इस्राएलांना तीन गोष्टी करण्याची आज्ञा देण्यात आली होती: (१) आपापली जागा घेणे, (२) शांतपणे उभे राहणे आणि (३) यहोवा कशी सुटका करतो ते पाहणे. आजच्या काळात देवाचे लोक या शब्दांच्या सामंजस्यात काय करतील?—२ इतिहास २०:१७.

१५. यहोवाचे लोक त्यांची जागा घेतील याचा काय अर्थ होतो?

१५ आपापली जागा घेणे: जराही विचलित न होता, देवाचे लोक त्याच्या राज्याला क्रियाशील पाठिंबा देण्याद्वारे आपल्या जागी स्थिर राहतील. ख्रिस्ती तटस्थतेच्या त्यांच्या भूमिकेवर ते कायम राहतील. यहोवाच्या एकनिष्ठ सेवेत ते “स्थिर व अढळ” राहतील आणि यहोवाच्या प्रेमदयेबद्दल त्याची जाहीर स्तुती ते करत राहतील. (१ करिंथकर १५:५८; स्तोत्र ११८:२८, २९) कोणताही वर्तमान अथवा भावी दबाव त्यांना देवासमोरील त्यांच्या संमतीप्राप्त स्थितीपासून वंचित करू शकत नाही.

१६. यहोवाचे सेवक कोणत्या अर्थाने शांतपणे उभे राहतील?

१६ शांतपणे उभे राहणे: यहोवाचे सेवक स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाहीत, तर ते यहोवावर संपूर्ण भरवसा ठेवतील. केवळ तोच त्याच्या सेवकांना या जगातील गोंधळातून सुटका देण्यास समर्थ आहे आणि त्याने असे करण्याची प्रतिज्ञा देखील केली आहे. (यशया ४३:१०, ११; ५४:१५; विलापगीत ३:२६) यहोवावर विश्‍वास ठेवण्यात त्याच्या आधुनिक दृश्‍य माध्यमावर भरवसा ठेवणे सामील असेल; या माध्यमाचा यहोवाने आपल्या उद्देशांकरता कित्येक दशकांपासून उपयोग केला आहे. यहोवाने व त्याच्या राज्य करत असलेल्या राजाने ज्यांना नेतृत्व करण्याचा अधिकार दिला आहे त्या सहउपासकांवर विश्‍वास ठेवणे त्या वेळी खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता कधी नव्हे इतके गरजेचे असेल. हे विश्‍वासू पुरुष देवाच्या लोकांचे मार्गदर्शन करतील. त्यांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करणारे स्वतःवर संकट ओढवतील.—मत्तय २४:४५-४७; इब्री लोकांस १३:७, १७.

१७. देवाच्या विश्‍वासू सेवकांना यहोवाकडून सुटका का मिळेल?

१७ यहोवा कशी सुटका करतो ते पाहणे: ख्रिस्ती सचोटी कायम राखून, तारण होण्याकरता यहोवावर पूर्ण भरवसा ठेवणाऱ्‍यांना याचे प्रतिफळ मिळेल, अर्थात त्यांची सुटका होईल. शेवटच्या घटकेपर्यंत आणि त्यांना शक्य होईल तितक्या प्रमाणावर ते यहोवाच्या न्यायाच्या दिवसाच्या आगमनाची घोषणा करतील. यहोवा हाच खरा देव आहे आणि या पृथ्वीवर त्याचे विश्‍वासू सेवक आहेत हे सर्व सृष्टीला कळले पाहिजे. यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या न्याय्यतेविषयी पुन्हा कधीही दीर्घकाळापर्यंत वादविवाद करण्याची गरज उरणार नाही.—यहेज्केल ३३:३३; ३६:२३.

१८, १९. (अ) निर्गम अध्याय १५ यातील जयजयकाराचे गीत, गोगच्या हल्ल्यातून बचावणाऱ्‍यांच्या भावना कशाप्रकारे व्यक्‍त करते? (ब) आज देवाच्या लोकांकरता काय करण्याची योग्य वेळ आहे?

१८ नव्या उत्साहाने देवाचे लोक त्याच्या नव्या जगात प्रवेश करतील; तांबड्या समुद्रातून बचावलेल्या इस्राएलांप्रमाणे ते देखील गीत गाऊन यहोवाचा जयजयकार करण्यास उत्सुक असतील. यहोवाने त्यांचे संरक्षण केल्याबद्दल, वैयक्‍तिकरित्या व सामूहिकरित्या ते सदैव यहोवाचे ऋणी राहतील आणि प्राचीन काळातील या शब्दांतील भावना ते व्यक्‍त करतील: “मी परमेश्‍वराला गीत गाईन, कारण तो विजयी होऊन उन्‍नत झाला आहे; . . . परमेश्‍वर रणवीर आहे; याव्हे हे त्याचे नाव. . . . हे परमेश्‍वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकितो. आपणांविरुद्ध बंड करणाऱ्‍यांना तू आपल्या महाप्रतापाने उलथून टाकितोस; तू आपला संताप भडकवितोस, तो त्यांना भुसाप्रमाणे भस्म करितो. . . . तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस. . . . तू त्यांना आपल्या वतनाच्या डोंगरावर आणून लाविशील; हेच, हे परमेश्‍वरा, तू आपल्यासाठी केलेले निवासस्थान आहे; हेच हे प्रभु, तुझ्या हातांनी स्थापिलेले पवित्रस्थान आहे. परमेश्‍वर युगानुयुग राज्य करील.”—निर्गम १५:१-१९.

१९ सार्वकालिक जीवनाची आशा आज कधी नव्हे इतकी उज्ज्वल आहे; तेव्हा यहोवाबद्दल आपली भक्‍तिभावना दाखवण्याची आणि सार्वकालिक राजा या नात्याने त्याची सेवा करत राहण्याचा नव्याने निर्धार करण्याची देवाच्या सेवकांकरता हीच अगदी योग्य वेळ नाही का?—१ इतिहास २९:११-१३.

तुम्ही समजावून सांगू शकता का?

• गोगचा हल्ला अभिषिक्‍त व दुसरी मेंढरे यांच्यावर का रोखलेला असेल?

• देवाचे लोक कोणत्या अर्थाने आपापल्या जागा घेतील?

• शांतपणे उभे राहण्याचा काय अर्थ होतो?

• यहोवा कशी सुटका करतो हे देवाच्या लोकांना कशाप्रकारे पाहण्यास मिळेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

यहोवाने यहोशाफाट व त्याच्या माणसांना विजय मिळवून दिला, त्यांना लढण्याची गरज पडली नाही

[२० पानांवरील चित्र]

अभिषिक्‍त व दुसरी मेंढरे मिळून यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करतात

[२२ पानांवरील चित्र]

प्राचीन इस्राएली लोकांप्रमाणे देवाचे लोक लवकरच जयजयकाराचे गीत गात असतील