व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

येशूच्या अस्तित्वाचा पुरातत्त्वीय पुरावा?

येशूच्या अस्तित्वाचा पुरातत्त्वीय पुरावा?

येशूच्या अस्तित्वाचा पुरातत्त्वीय पुरावा?

“येशूच्या पुराव्याचा शिलालेख.” बिब्लिकल आर्कियॉलॉजी रिव्ह्यू (नोव्हेंबर/डिसेंबर २००२) याच्या मुखपृष्ठावर हे शीर्षक होते. मुखपृष्ठावर, इस्राएलमध्ये सापडलेली चुनखडीची एक अस्थि पेटी दाखवण्यात आली होती. सा.यु.पू. पहिल्या शतकापासून सा.यु. ७० पर्यंतच्या संक्षिप्त काळात अस्थी पेट्यांचा यहुदी सर्रास वापर करत असत. परंतु या विशिष्ट अस्थि पेटीला तिच्या एका बाजूवर असलेल्या अरेमिक भाषेतील लेखामुळे अधिक महत्त्व मिळाले. तज्ज्ञांनी तो लेख पुढीलप्रमाणे असल्याचे कबूल केले: “याकोब, योसेफाचा पुत्र, येशूचा भाऊ.”

बायबलनुसार, नासरेथच्या येशूला याकोब नावाचा एक भाऊ होता जो मरीयेचा पती, योसेफ याचा मुलगा समजला जात होता. येशू ख्रिस्त आपल्या गावात शिकवत असताना एकदा चकित झालेल्या श्रोत्यांनी विचारले: “हा सुताराचा पुत्र ना? ह्‍याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा हे ह्‍याचे भाऊ ना? ह्‍याच्या बहिणी, त्या सर्व आपणांबरोबर नाहीत काय?”—मत्तय १३:५४-५६; लूक ४:२२; योहान ६:४२.

होय, त्या अस्थि पेटीवरील लेख नासरेथच्या येशूच्या वर्णनाला जुळणारा आहे. लेखात उल्लेख केलेला याकोब, येशू ख्रिस्ताचा सावत्र भाऊ असल्यास, “बायबलच्या बाहेरून मिळालेला येशूच्या अस्तित्वाचा हा सर्वात जुना पुरावा” ठरेल असे प्रतिपादन प्राचीन लिखाणांचे तज्ज्ञ व बिब्लिकल आर्कियॉलॉजी रिव्ह्यू यातील वर उल्लेखित लेखाचे लेखक ऑन्ड्रे लमेर करतात. मासिकाचे संपादक, हर्शल शँक्स म्हणतात की, ही अस्थि पेटी “पृथ्वीवर होऊन गेलेल्या एकमेव महत्त्वपूर्ण व्यक्‍तीची स्पर्शनीय आणि दृश्‍य” अशी वस्तू आहे.

अस्थि पेटीवर असलेली तिन्ही नावे पहिल्या शतकात अगदी सर्वसामान्य होती. त्यामुळे, येशू ख्रिस्ताच्या कुटुंबाव्यतिरिक्‍त याकोब, योसेफ आणि येशू अशी नावे असलेल्या सदस्यांचे दुसरे एखादे कुटुंब देखील असण्याची शक्यता आहे. लमेर म्हणतात: “जेरूसलेमात सा.यु. ७० सालाआधीच्या दोन पिढ्यांमध्ये . . . सुमारे २० लोक ‘योसेफाचा पुत्र, येशूचा भाऊ, याकोब’ या नावाने ओळखले जात असावेत.” तथापि, अस्थि पेटीवरील याकोब हा येशू ख्रिस्ताचा सावत्र भाऊ असण्याची ९० टक्के शक्यता आहे असे त्यांना वाटते.

दुसऱ्‍या एका कारणामुळे काहींना असे वाटते की, लेखातील याकोब येशू ख्रिस्ताचा सावत्र भाऊ होता. अशा लेखांमध्ये वडिलांचे नाव देणे सामान्य गोष्ट होती परंतु भावाचे नाव सहसा कोणी देत नसत. त्यामुळे, काही विद्वानांचा असा विश्‍वास आहे की, हा येशू कोणी तरी महत्त्वपूर्ण असला असावा अर्थात त्यांच्या मते तो येशू ख्रिस्त, ख्रिस्ती धर्माचा संस्थापक होता.

ही अस्थि पेटी खरी आहे का?

अस्थि पेटी म्हणजे काय? ती एक पेटी किंवा संदूक होती ज्यात कबरेतील मृत व्यक्‍तीचा देह कुजल्यानंतर तिची हाडे ठेवली जात असत. जेरूसलेमच्या आसपासच्या कबरांतून अनेक अस्थि पेट्या चोरीला गेल्या. याकोबाचे नाव असलेली पेटी एका प्राचीन वस्तूंच्या बाजारातून प्राप्त झाली, उत्खननाच्या स्थळातून नव्हे. या अस्थि पेटीच्या मालकाने १९७० च्या दशकात काही तीनचारशे डॉलर देऊन ती पेटी विकत घेतली होती असे म्हटले जाते. त्यामुळे, ही अस्थि पेटी नेमकी कोठून मिळाली हे एक रहस्य आहे. “एखादी वस्तू कोठून सापडली आणि सुमारे २,००० वर्षांपासून ती कोठे होती हे कोणाला सांगता येत नसेल तर त्या वस्तूमधील आणि त्यात उल्लेख केलेल्या लोकांमधील संबंध दाखवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत नाही,” असे न्यूयॉर्कच्या बार्ड विद्यापीठाचे प्राध्यापक ब्रुस चिल्टन म्हणतात.

पुरातत्त्वीय पुरावा नसल्यामुळे ऑन्ड्रे लमेर यांनी इस्राएलचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण येथे ती अस्थि पेटी निरीक्षणासाठी पाठवली. तेथील संशोधकांच्या तपासणीनुसार ही पेटी चुनखडीची असून ती सा.यु. पहिल्या किंवा दुसऱ्‍या शतकातली होती. त्यांनी म्हटले की, “कोणतेही आधुनिक साधन किंवा अवजार वापरल्याचे चिन्ह दिसले नाही.” तथापि, द न्यू यॉर्क टाईम्सने बायबल विद्वानांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी असे मत व्यक्‍त केले की, “येशूशी संबंध असल्याचा परिस्थितीजन्य पुरावा कदाचित ठोस होता पण कितीही झाले तरी तो परिस्थितीजन्य पुरावा आहे.”

टाईम मासिक म्हणते की, “आजकाल कोणतीही शिक्षित व्यक्‍ती येशू अस्तित्वात होता यावर शंका करत नाही.” तरीही अनेकांना वाटते की येशूच्या अस्तित्वाविषयी बायबलमधील माहितीशिवाय अधिक पुरावा असण्याची गरज आहे. येशू ख्रिस्तावर विश्‍वास करण्यासाठी पुरातत्त्वविज्ञान हा आधार मानला जावा का? ‘पृथ्वीवर येऊन गेलेल्या एकमेव महत्त्वपूर्ण व्यक्‍तीच्या’ इतिहासाचा आपल्याजवळ काय पुरावा आहे?

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

डावीकडे, जेम्स अस्थि पेटी: AFP PHOTO/J.P. Moczulski; उजवीकडे, खोदीव लेख: AFP PHOTO/HO