येशू ख्रिस्त तो पृथ्वीवर येऊन गेल्याचा पुरावा
येशू ख्रिस्त तो पृथ्वीवर येऊन गेल्याचा पुरावा
अल्बर्ट आयंस्टाईन नावाची एक व्यक्ती अस्तित्वात होती यावर तुमचा विश्वास आहे का? तुम्ही लगेच होय म्हणाल, पण का? बहुतेक लोक त्याला प्रत्यक्ष भेटलेले नाहीत. तरीही, त्याच्या प्रयोगांचे विश्वसनीय अहवाल सिद्ध करतात की तो अस्तित्वात होता. त्याच्या संशोधनांच्या वैज्ञानिक प्रयोगांमध्ये त्याच्या अस्तित्वाचा प्रभाव जाणवतो. उदाहरणार्थ, आण्विक ऊर्जेने निर्माण होणाऱ्या विद्युतशक्तीचा अनेकांना फायदा होतो; विद्युतशक्तीच्या या निर्मितीचा संबंध, E=mc२ या आयंस्टाईनच्या प्रसिद्ध समीकरणाच्या अवलंबीकरणाशी आहे.
हीच कारणमीमांसा इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व अर्थात येशू ख्रिस्त याच्यासंबंधी लागू करता येते. त्याच्याविषयी असलेले लेखी तपशील
आणि त्याने पाडलेल्या प्रभावाचा दृश्य पुरावा हे स्पष्टपणे शाबीत करतात की तो अस्तित्वात होता. आधीच्या लेखात ज्याविषयी सांगितले होते तो याकोबाच्या लेखाचा अलीकडील पुरातत्त्वीय शोध कितीही रोचक असला तरीही येशूची ऐतिहासिकता या अथवा इतर कोणत्याही प्राचीन वस्तूवर आधारलेली नाही. वस्तुस्थिती ही आहे की, जगीक इतिहासकारांनी येशूविषयी आणि त्याच्या अनुयायांविषयी जे लिहिले त्यावरून त्याच्या अस्तित्वाचा पुरावा आपल्याला सापडतो.इतिहासकारांची ग्वाही
उदाहरणार्थ, फ्लेव्हियस जोसीफसची ग्वाही लक्षात घ्या; हा पहिल्या शतकातील यहुदी इतिहासकार असून तो एक परुशी होता. ज्यूइश अँटिक्विटीझ या पुस्तकात त्याने येशू ख्रिस्ताचा उल्लेख केला आहे. जोसीफसने येशूला मशीहा म्हटले त्या पहिल्या संदर्भाबद्दल काहीजणांना संशय वाटत असला तरी येशिवा विद्यापीठाचे प्राध्यापक लुइस एच. फेल्डमन म्हणतात की, दुसऱ्या संदर्भाबद्दल क्वचितच लोकांनी संशय केला आहे. तेथे जोसीफसने म्हटले: “[अनानस महायाजकाने] सन्हेद्रीनच्या शासकांची सभा भरवून त्यांच्यासमोर ख्रिस्त म्हणवल्या जाणाऱ्या येशूचा भाऊ, याकोब याला उभे केले.” (ज्यूइश अँटिकीटीझ, XX, २००) होय, एका परुशाने, जो एका पंथाचा सदस्य होता व ज्या पंथाचे अनुयायी येशूचे कट्टर शत्रू होते, त्याने “येशूचा भाऊ, याकोब” अस्तित्वात होता हे कबूल केले.
येशूच्या अस्तित्वाताचा प्रभाव त्याच्या अनुयायांच्या कार्यहालचालींद्वारे जाणवला. सा.यु. ५९ साली, प्रेषित पौल रोममध्ये तुरुंगात होता तेव्हा यहुद्यांच्या मुख्य माणसांनी त्याला म्हटले: “ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात.” (प्रेषितांची कृत्ये २८:१७-२२) येशूच्या शिष्यांना त्यांनी ‘हा पंथ’ असे संबोधले. सर्वत्र त्यांच्याविरुद्ध बोलले जात असते तर जगीक इतिहासकारांनी त्याविषयी अहवाल दिला असता, नाही का?
सा.यु. ५५ च्या सुमारास जन्मलेला व जगातील सर्वात मान्यवर इतिहासकारांपैकी एक समजला जाणारा टॅसिटस याने ख्रिश्चनांचा उल्लेख ॲनल्स नावाच्या आपल्या ग्रंथात केला. सा.यु. ६४ मध्ये, रोममध्ये झालेल्या प्रचंड अग्नीसाठी ख्रिश्चनांना नीरोने दोषी ठरवले त्या अहवालाविषयी त्याने लिहिले: “नीरोने, घृणित कार्यांसाठी द्वेष केल्या जाणाऱ्या एका विशिष्ट वर्गाला दोषी ठरवले आणि त्यांचा अतिशय क्रूररीत्या छळ केला; या लोकांना ख्रिस्ती म्हणून ओळखले जात होते. ख्रिस्तुस, ज्याच्यावरून हे नाव आले होते, याला टायबेरियसच्या शासन काळात आपल्या एका अधिकाऱ्याने अर्थात पंतय पिलाताने देहान्ताची शिक्षा दिली होती.” या अहवालातील तपशील बायबलमधील येशूच्या माहितीशी जुळतात.
येशूच्या अनुयायांविषयी भाष्य करणारा आणखी एक लेखक होता, प्लीनी धाकटा जो बिथनियाचा सरदार होता. सा.यु. १११ सालाच्या सुमारास, ख्रिश्चनांशी कसा व्यवहार करावा हे विचारण्यासाठी प्लीनीने सम्राट ट्राजनला लिहिले. प्लीनीने लिहिले की, ख्रिस्ती असल्याचा खोटा आरोप केलेले लोक ते ख्रिस्ती नाहीत हे सिद्ध करण्यासाठी देवतांना प्रार्थना करून दाखवायचे आणि ट्राजनच्या मूर्तीला नमन करायचे. प्लीनीने पुढे लिहिले: “यांपैकी काही एक करण्यासाठी खऱ्या ख्रिश्चनांवर कितीही दबाव आणला तरी त्याचा काही फायदा होत नाही.” यावरून ख्रिस्त खरोखर अस्तित्वात होता हे सिद्ध होते कारण त्याचे अनुयायी त्याच्यावरील विश्वासामुळे आपले प्राण द्यायला तयार होते.
पहिल्या दोन शतकातील इतिहासकारांनी येशू ख्रिस्त
आणि त्याच्या अनुयायांविषयी दिलेल्या संदर्भांचा सारांश दिल्यावर, द एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका (२००२ आवृत्ती) शेवटी म्हणतो: “हे वेगवेगळे अहवाल सिद्ध करतात की, प्राचीन काळी ख्रिस्ती धर्माच्या विरोधकांनीही कधी येशूच्या अस्तित्वाबद्दल शंका केली नाही; याबद्दल प्रथम १८ व्या शतकाच्या शेवटी, १९ व्या शतकात आणि २० व्या शतकाच्या सुरवातीला आक्षेप घेण्यात आला आणि त्यालाही पर्याप्त आधार नव्हता.”येशूच्या अनुयायांची ग्वाही
“नव्या करारात येशूच्या जीवन व मरणाची ऐतिहासिक घटना पुनःनिर्मित करण्यासाठी आणि तो एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होता या ख्रिस्ती दाव्यांना पाठिंबा देण्यासाठी जवळजवळ सर्व पुरावा आहे,” असे द एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना म्हणतो. संशयवादी कदाचित बायबल हे येशूच्या अस्तित्वाचा पुरावा आहे असे मानणार नाहीत. परंतु, शास्त्रवचनीय अहवालांवर आधारित दोन तर्कवाद विशेषतः हे सिद्ध करायला मदत करतात की येशू खरोखर या पृथ्वीवर होऊन गेला.
आपण आधी पाहिल्याप्रमाणे, आइंस्टाईनच्या महान सिद्धान्तांवरून तो अस्तित्वात होता हे सिद्ध होते. त्याचप्रमाणे, येशूच्या शिकवणी त्याच्या अस्तित्वाची सत्यता पटवतात. डोंगरावरील प्रवचन या येशूच्या एका सुप्रसिद्ध भाषणाचे उदाहरण घ्या. (मत्तय, अध्याय ५-७) प्रेषित मत्तयने त्या प्रवचनाच्या परिणामाविषयी लिहिले: “लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले; कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकारवाणीने शिकवीत होता.” (मत्तय ७:२८, २९) कित्येक शतकांदरम्यान या प्रवचनाचा लोकांवर काय प्रभाव झाला आहे त्याविषयी प्राध्यापक हान्स डीटर बेट्स म्हणतात: “डोंगरावरील प्रवचनाचा प्रभाव यहुदी आणि ख्रिस्ती धर्म किंवा पाश्चात्य संस्कृतीचीही सीमा पार करतो.” त्यांनी पुढे असे म्हटले की, “सर्व प्रकारच्या लोकांना भावणारे एक वैशिष्ट्य” या प्रवचनात आहे.
डोंगरावरील प्रवचनात सापडणारे पुढील सुज्ञतेचे संक्षिप्त आणि व्यावहारिक बोल लक्षात घ्या: “जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारितो, त्याच्याकडे दुसरा गाल कर.” ‘तुम्ही आपले धर्माचरण माणसांच्यासमोर न करण्याविषयी जपा.’ “उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला.” “आपली मोत्ये डुकरांपुढे टाकू नका.” “मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल.” “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” “अरुंद दरवाजाने आत जा.” “त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.” “प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते.”—मत्तय ५:३९; ६:१, ३४; ७:६, ७, १२, १३, १६, १७.
यातील काही बोल तुम्ही कदाचित ऐकले असतील किंवा त्यांच्या तात्पर्याविषयी ऐकले असेल. कदाचित तुमच्या भाषेत ते म्हणींच्या स्वरूपातही असतील. हे सर्व बोल डोंगरावरील प्रवचनातील आहेत. या प्रवचनाने अनेक लोकांवर आणि संस्कृतींवर जो प्रभाव पाडला आहे त्यावरून “थोर शिक्षकाच्या” अस्तित्वाची प्रभावीपणे साक्ष मिळते.
आपण अशी कल्पना करू या की, कोणा एका व्यक्तीने येशू ख्रिस्त नावाची एक काल्पनिक व्यक्ती निर्माण केली. आणि असे समजू या की ती व्यक्ती इतकी हुशार होती की, बायबलमधील ज्या शिकवणुकी येशूने दिल्या असे म्हटले जाते त्या मुळात तिनेच निर्माण केल्या. असे असल्यास, ती व्यक्ती, सर्वसामान्यपणे लोकांना येशू व त्याच्या शिकवणुकी आवडतील अशाप्रकारे ते कल्पनाचित्र रचणार नाही का? तरीही, प्रेषित पौलाने निरीक्षिले: “यहूदी चिन्हे मागतात व हेल्लणी ज्ञानाचा शोध करितात, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो; हा यहूद्यांस अडखळण व हेल्लेण्यांस मूर्खपणा असा आहे.” (१ करिंथकर १:२२, २३) वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचा संदेश यहुद्यांना आणि हेल्लेण्यांना देखील आकर्षित करत नव्हता. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मात्र हाच ख्रिस्त गाजवत होते. पण, वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचे वर्णन कशाला? याचे एकच समाधानकारक उत्तर असे असू शकते की, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या लेखकांनी येशूच्या जीवन व मृत्यूच्या सत्य घटनांचा अहवाल लिहिला.
येशूच्या अस्तित्वाची सत्यता पटवणारे दुसरे एक कारण, त्याच्या अनुयायांनी त्याच्या शिकवणुकींचा केलेला अथक प्रचार यात सापडते. येशूने सेवाकार्याची सुरवात करून केवळ सुमारे ३० वर्षे झाल्यावर, पौल म्हणू शकला की “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत [सुवार्तेची] घोषणा झाली.” (कलस्सैकर १:२३) होय, विरोध असतानाही येशूच्या शिकवणुकी प्राचीन जगात सर्वत्र पसरल्या. ख्रिस्ती या नात्याने छळ सोसलेल्या खुद्द पौलाने लिहिले: “ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्ही अजून आपल्या पापातच आहा.” (१ करिंथकर १५:१२-१७) ज्या ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले नाही अशा ख्रिस्ताचा प्रचार करणे निष्फळ ठरले असते तर जो ख्रिस्त कधी अस्तित्वात नव्हता त्याचा प्रचार करणे किती तरी अधिक निष्फळ ठरले असते. प्लीनी धाकटा याच्या अहवालात आपण वाचतो त्यानुसार पहिल्या शतकातील ख्रिस्ती, ख्रिस्त येशूवरील विश्वासासाठी मरण पत्करायलाही तयार होते. त्यांनी ख्रिस्तासाठी आपला जीव धोक्यात घातला कारण तो खरा होता; शुभवर्तमान अहवालांत सांगितल्याप्रमाणे तो पृथ्वीवर होऊन गेला होता.
तुम्ही पुरावा पाहिला आहे
येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थावर विश्वास असणे हे ख्रिस्ती प्रचारकार्यासाठी आवश्यक होते. येशूचा आज किती प्रभाव आहे हे पाहून तुम्ही देखील तुमच्या मनःचक्षूंनी पुनरुत्थित येशूला पाहू शकता.
येशूला वधस्तंभावर खिळण्याआधीच, त्याने आपल्या भावी उपस्थितीसंबंधी एक महान भविष्यवाणी केली. त्याने हे देखील सुचवले की, तो पुनरुत्थित होऊन देवाच्या उजव्या हाताला बसून त्याच्या शत्रूंचा निवाडा करण्याच्या वेळेची वाट पाहील. (स्तोत्र ११०:१; योहान ६:६२; प्रेषितांची कृत्ये २:३४, ३५; रोमकर ८:३४) त्यानंतर, तो कार्यवाही करून सैतान व त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून हाकलून लावील.—प्रकटीकर १२:७-९.
हे सर्व केव्हा घडणार आहे? येशूने आपल्या शिष्यांना “आपल्या उपस्थितीचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह” दिले. त्याच्या अदृश्य उपस्थितीला ओळखण्याच्या चिन्हांत मोठी युद्धे, दुष्काळ, भूकंप, खोटे संदेष्टे, अधर्मात वाढ आणि महामाऱ्या समाविष्ट होत्या. अशा विपत्तीजनक घटना घडणार होत्या कारण दियाबल सैतानाची हकालपट्टी ‘पृथ्वीसाठी अनर्थ’ ठरणार होती. दियाबल, “आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन” पृथ्वीच्या परिसरात आला आहे. याशिवाय, चिन्हामध्ये ‘सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून सर्व जगात’ राज्याच्या सुवार्तेचा प्रचारही सामील आहे.—मत्तय २४:३-१४; प्रकटीकरण १२:१२; लूक २१:७-१९.
एखाद्या कोड्याचे वेगवेगळे तुकडे ज्याप्रमाणे आपापल्या जागी नीट बसतात त्याप्रमाणे येशूने भाकीत केलेल्या गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाल्यापासून, येशू ख्रिस्ताच्या अदृश्य उपस्थितीचा संमिश्र पुरावा आपण पाहिला आहे. तो देवाच्या राज्याचा राजा या नात्याने राज्य करत असून अत्यंत प्रभावशाली आहे. हे मासिक तुमच्या हातात आहे हाच एक पुरावा आहे की, राज्याच्या प्रचाराचे कार्य आज चालू आहे.
येशूच्या अस्तित्वाच्या परिणामाविषयी अधिक समजण्यासाठी तुम्हाला बायबलचा अभ्यास करण्याची गरज आहे. येशूच्या उपस्थितीच्या तपशीलांविषयी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांना विचारू शकता.
[५ पानांवरील चित्रे]
जोसीफस, टॅसीटस आणि प्लीनी धाकटा यांनी येशू ख्रिस्त व त्याच्या अनुयायांचा उल्लेख केला
[चित्राचे श्रेय]
सर्व तीन प्रतिमा: © Bettmann/CORBIS
[७ पानांवरील चित्र]
प्रारंभीच्या ख्रिश्चनांना खात्री होती की येशू खरा होता