व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्वांमध्ये चांगले पाहा

सर्वांमध्ये चांगले पाहा

सर्वांमध्ये चांगले पाहा

“देवा, या सत्कृत्यांसाठी माझी आठवण ठेव.”नहेम्या १३:३१, ईजी-टू-रीड व्हर्शन.

१. यहोवा सर्वांशी कशाप्रकारे चांगुलपणाने वागतो?

अनेक ढगाळ व उदास दिवसांनंतर सूर्यप्रकाश चमकतो तेव्हा सर्वांना आनंद होतो. लोक प्रसन्‍न दिसू लागतात. तसेच अनेक दिवसांपर्यंत राहिलेल्या रखरखीत कोरड्या हवामानानंतर पावसाची हलकीशी सर, किंबहुना मुसळधार पाऊस जरी आला तरी लोकांना हायसे वाटते, त्यांना तजेला मिळतो. आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याने या पृथ्वीच्या वातावरणातच बदलणाऱ्‍या हवामानाचे हे अद्‌भुत चक्र निर्माण केले आहे. येशूने लोकांना शिकवताना देवाच्या या उदारतेकडे लक्ष वेधले व असे म्हटले: “आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४३-४५) होय यहोवा सर्वांना चांगुलपणा दाखवतो. त्याच्या सेवकांनी देखील इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष देण्याद्वारे त्याचे अनुकरण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे.

२. (अ) यहोवा कोणत्या आधारावर चांगुलपणाने वागतो? (ब) यहोवाच्या चांगुलपणाला आपली काय प्रतिक्रिया आहे याची तो कशी दखल घेतो?

यहोवा कोणत्या आधारावर चांगुलपणाने वागतो? आदामाने पाप केल्यापासून यहोवाने लोकांमध्ये असलेल्या चांगल्या गुणांकडे सतत लक्ष दिले आहे. (स्तोत्र १३०:३, ४) त्याचा उद्देश आज्ञाधारक मानवांना परादीसात पुन्हा एकदा सार्वकालिक जीवन देण्याचा आहे. (इफिसकर १:९, १०) त्याच्या अपात्र कृपेमुळे आपल्याला प्रतिज्ञात संततीद्वारे पाप व अपरिपूर्णतेपासून सुटका मिळण्याची आशा प्राप्त झाली आहे. (उत्पत्ति ३:१५; रोमकर ५:१२, १५) खंडणी व्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे परिपूर्णतेकडे परतण्याचा मार्ग मोकळा होतो. आज यहोवा आपल्यापैकी प्रत्येकाचे परीक्षण करत आहे आणि हे पाहत आहे की त्याच्या उदारतेप्रती आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो. (१ योहान ३:१६) त्याच्या चांगुलपणाबद्दल आपली कृतज्ञता दाखवण्याकरता आपण जे काही करतो त्याची तो दखल घेतो. प्रेषित पौलाने लिहिले, “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.

३. कोणता प्रश्‍न विचारात घेण्याजोगा आहे?

मग आपण इतरांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देण्यात यहोवाचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो? जीवनाच्या चार क्षेत्रांच्या संदर्भात या प्रश्‍नांची उत्तरे विचारात घेऊ या: (१) ख्रिस्ती सेवाकार्य, (२) कुटुंब, (३) मंडळी आणि (४) आपले सर्व नातेसंबंध.

प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यात

४. ख्रिस्ती सेवाकार्यात भाग घेणे हा इतरांच्या चांगल्या गुणांकडे पाहण्याचा एक मार्ग का आहे?

येशूच्या शिष्यांनी गहू व निदणाच्या त्याच्या दृष्टान्ताविषयी प्रश्‍न विचारले तेव्हा येशूने त्यांना उत्तर देताना खुलासा केला की “शेत हे जग आहे.” ख्रिस्ताचे आधुनिक काळातील शिष्य या नात्याने सेवाकार्यात सहभागी होताना आपण हे सत्य लक्षात ठेवतो. (मत्तय १३:३६-३८; २८:१९, २०) क्षेत्र सेवाकार्य म्हणजे आपल्या विश्‍वासाची सार्वजनिक घोषणा करणे. यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या घरोघरच्या व रस्त्यांवरील सेवेकरता आज सर्वत्र ओळखले जाते हीच गोष्ट दाखवते की राज्य संदेशाकरता योग्य असलेल्यांना शोधण्याचा आपण परिश्रमी प्रयत्न करतो. येशूने हीच आज्ञा दिली होती: “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा.”—मत्तय १०:११; प्रेषितांची कृत्ये १७:१७; २०:२०.

५, ६. लोकांच्या घरी त्यांना वारंवार भेट देण्याचा प्रयत्न आपण का सोडत नाही?

आपण स्वतःहून लोकांच्या घरी जातो तेव्हा आपल्या संदेशाला ते कशी प्रतिक्रिया दाखवतात याकडे आपण लक्ष देतो. कधीकधी घरातली एक व्यक्‍ती आपले ऐकून घेते तर दुसरी व्यक्‍ती आतून ओरडते, “आम्हाला नाही ऐकायचे” आणि अशारितीने ती भेट तिथेच संपते. एका व्यक्‍तीच्या विरोधामुळे किंवा अनिच्छेमुळे दुसऱ्‍या व्यक्‍तीचीही प्रतिक्रिया बदलते हे पाहून आपल्याला वाईट वाटते. अशा परिस्थितीत सर्वांमध्ये चांगले ते पाहण्याचा आपण कशाप्रकारे प्रयत्न करू शकतो?

त्या क्षेत्रात आपण पुन्हा जातो व त्या घरी पुन्हा भेट देतो तेव्हा आपल्याला त्याच व्यक्‍तीशी थेट बोलण्याची संधी मिळू शकते जिने आधीच्या भेटीत व्यत्यय आणले होते. त्या वेळी काय घडले होते हे आठवणीत ठेवल्यामुळे आपल्याला या भेटीकरता तयारी करण्यास मदत मिळू शकते. विरोध करणाऱ्‍या व्यक्‍तीचे हेतू कदाचित चांगले असतील; तिच्या कुटुंबातली जी व्यक्‍ती राज्य संदेश ऐकण्यास तयार होती तिला रोखण्याची आपली जबाबदारी आहे असे कदाचित या व्यक्‍तीला वाटत असेल. आपल्या कार्याच्या उद्देशाविषयी खोटी माहिती मिळाल्यामुळे कदाचित तिचा असा दृष्टिकोन बनला असेल. पण हे आपल्याला त्या घरात राज्याच्या संदेशाचा प्रचार वारंवार करत राहण्यापासून व अत्यंत विचारशीलपणे त्यांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखत नाही. आपण सर्वांना देवाचे अचूक ज्ञान घेण्यास मदत करू इच्छितो. असे केल्यास कदाचित यहोवा त्या व्यक्‍तीला स्वतःकडे आकर्षित करेल.—योहान ६:४४; १ तीमथ्य २:४.

७. आपण लोकांना भेटतो तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला सकारात्मक मनोवृत्ती बाळगण्यास मदत करेल?

येशूने आपल्या शिष्यांना सूचना दिल्या तेव्हा त्याने कौटुंबिक विरोधाबद्दलही उल्लेख केला होता. “मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्‍यांच्यांत फूट पाडण्यास मी आलो आहे,” असे त्याने म्हटले नव्हते का? पुढे तो म्हणाला: “मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.” (मत्तय १०:३५, ३६) पण परिस्थिती व लोकांच्या मनोवृत्ती सतत बदलत असतात. अचानक आलेले आजारपण, नातलगाचा मृत्यू, विपत्ती, भावनिक आघात आणि इतर असंख्य कारणांमुळे, लोक आपल्या प्रचार कार्याला कशी प्रतिक्रिया दाखवतात यावर प्रभाव पडतो. लोक आपल्या प्रचाराला कधीच चांगला प्रतिसाद देणार नाहीत असा निराशावादी दृष्टिकोन आपण बाळगला तर आपण त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देत आहोत असे आपल्याला म्हणता येईल का? त्याऐवजी दुसऱ्‍या प्रसंगी त्यांच्या घरी आनंदी मनोवृत्तीने भेट का देऊ नये? कदाचित या वेळी आपल्याला वेगळी प्रतिक्रिया मिळेल. कधीकधी आपण काय सांगतो यामुळे नव्हे तर ते कशाप्रकारे सांगतो यामुळे वेगळी प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता असते. प्रचाराला निघण्याआधी यहोवाला कळकळीची प्रार्थना केल्यामुळे निश्‍चितच आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास आणि राज्य संदेश लोकांना भावेल अशा पद्धतीने सादर करण्यास मदत मिळेल.—कलस्सैकर ४:६; १ थेस्सलनीकाकर ५:१७.

८. ख्रिस्ती आपल्या विश्‍वासात नसलेल्या नातेवाईकांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतात तेव्हा काय घडू शकते?

काही मंडळ्यांमध्ये एकाच कुटुंबातले अनेक सदस्य यहोवाची सेवा करतात. सहसा अशा कुटुंबातल्या तरुण सदस्यांना एखाद्या वयस्क नातलगाच्या कुटुंबातील किंवा वैवाहिक जीवनातील चांगल्या संबंधांमुळे त्याच्याविषयी आदर व कौतुक वाटते आणि अशाप्रकारे ते सत्याकडे आकर्षित होतात. पेत्राच्या सल्ल्याकडे लक्ष दिल्यामुळे कित्येक ख्रिस्ती पत्नींना “वचनावाचून” आपल्या पतीचे मन जिंकता आले आहे.—१ पेत्र ३:१, २.

कुटुंबात

९, १०. याकोब व योसेफ या दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या चांगल्या गुणांकडे कशाप्रकारे लक्ष दिले?

कुटुंबातले जवळचे नातेसंबंध हे इतरांचे चांगले गुण पाहण्याचे आणखी एक क्षेत्र आहे. याकोबाने त्याच्या पुत्रांसोबत केलेल्या व्यवहारांवरून मिळणारा एक धडा लक्षात घ्या. उत्पत्ति अध्याय ३७, यांतील ३ व ४ वचनात बायबल असे सूचित करते की याकोबाचे योसेफावर विशेष प्रेम होते. योसेफाची भावंडे त्याच्याशी मत्सरी वृत्तीने वागली, इतकेच नव्हे तर आपल्या भावाला मारून टाकण्याचा कट त्यांनी रचला. पण याकोब व योसेफ यांनी नंतर त्यांच्या जीवनात कशाप्रकारची मनोवृत्ती दाखवली याकडे लक्ष द्या. दोघांनी आपल्या कुटुंबीयांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिले.

१० ईजिप्तमध्ये दुष्काळ पडला तेव्हा अन्‍न प्रबंधक म्हणून कार्य करत असलेल्या योसेफाने आपल्या बांधवांचे स्वागत केले. त्याने लगेच स्वतःची ओळख करून दिली नाही पण त्यांची काळजी घेतली जाईल आणि त्यांना त्यांच्या वृद्ध पित्याकडे नेण्याकरता अन्‍नधान्य मिळेल याकडे त्याने जातीने लक्ष दिले. होय, त्यांनी योसेफाचा द्वेष केला व त्याच्याशी दुर्वर्तन केले तरीसुद्धा योसेफाने त्यांच्या हिताकरता कार्य केले. (उत्पत्ति ४१:५३-४२:८; ४५:२३) त्याचप्रकारे मरणप्राय स्थितीत असताना याकोबाने आपल्या सर्व पुत्रांना भविष्यवाणींच्या रूपात आशीर्वाद दिले. त्यांच्या चुकीच्या कृत्यांमुळे काही विशेषाधिकारांपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले तरीसुद्धा देशात आपापले वतन त्यांच्यापैकी प्रत्येकाला देण्यात आले. (उत्पत्ति ४९:३-२८) याकोबाने या कृतीतून किती उत्तम रितीने आपली धीरोदात्त प्रीती व्यक्‍त केली!

११, १२. (अ) कुटुंबात चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व कोणत्या भविष्यसूचक उदाहरणावरून स्पष्ट होते? (ब) उधळ्या पुत्राच्या येशूच्या उदाहरणातील पित्याकडून आपण कोणता धडा शिकतो?

११ विश्‍वासघाती इस्राएल राष्ट्राशी व्यवहार करताना यहोवाने जी सहनशीलता दाखवली त्यावरून तो आपल्या लोकांच्या चांगल्या गुणांकडे कशाप्रकारे लक्ष देतो याबद्दल आणखी समजून येते. संदेष्टा होशेय याच्या कौटुंबिक परिस्थितीचा उपयोग करून यहोवाने आपली धीरोदात्त प्रीती दाखवली. होशेयची पत्नी गोमर हिने वारंवार व्यभिचार केला. पण तरीसुद्धा यहोवाने होशेयला असा सल्ला दिला: “इस्राएल लोक अन्य देवांकडे वळतात व मनुकांच्या ढेपांची आवड धरितात, तरी त्यांच्यावर परमेश्‍वर प्रेम करितो; त्याप्रमाणे तू पुनः जाऊन जी स्त्री जारिणी असून आपल्या सख्याला प्रिय आहे तिजवर प्रेम कर.” (होशेय ३:१) यहोवाने असा सल्ला का दिला? यहोवाला माहीत होते की त्याच्या मार्गांतून भटकलेल्या राष्ट्रातून काही व्यक्‍ती त्याच्या सहनशीलतेला प्रतिसाद देतील. होशेयने असे घोषित केले: “नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्‍वर व आपला राजा दावीद यांना शरण येतील; ते कालांती भीतीने कंपित होऊन परमेश्‍वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करितील.” (होशेय ३:५) निश्‍चितच कौटुंबिक समस्या निर्माण होतात तेव्हा या उत्तम उदाहरणावर आपण विचार करू शकतो. इतर कुटुंबीयांत चांगले गुण शोधत राहिल्यामुळे तुम्ही निदान सहनशीलतेचे उत्तम उदाहरण मांडू शकाल.

१२ उधळ्या पुत्राच्या येशूने दिलेल्या दृष्टान्तावरूनही आपण आपल्या कुटुंबाच्या संबंधाने चांगले कसे पाहू शकतो याविषयी अधिक समज मिळते. धाकट्या पुत्राने आपले ऐषारामाचे जीवन त्यागले व तो घरी परतला. पित्याने त्याला दया दाखवली. आपल्या कुटुंबाला कधी सोडून न गेलेल्या थोरल्या मुलाने याविषयी कुरकूर केली तेव्हा पित्याने काय केले? आपल्या थोरल्या मुलाला संबोधून पित्याने म्हटले: “बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे, ते सर्व तुझेच आहे.” पित्याने चिडून त्याला झिडकारले नाही तर केवळ आपल्या प्रेमाची त्याला पुन्हा खात्री दिली. पुढे तो म्हणाला, “उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे; हरवला होता तो सापडला आहे.” आपणही अशाचप्रकारे नेहमी इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करू शकतो.—लूक १५:११-३२.

ख्रिस्ती मंडळीत

१३, १४. ख्रिस्ती मंडळीत प्रेमाच्या राजमान्य नियमाचे पालन करण्याचा एक मार्ग कोणता?

१३ ख्रिस्ती या नात्याने आपण प्रेमाचा राजमान्य नियम पाळण्याचा प्रयत्न करतो. (याकोब २:१-९) कदाचित आपल्यापेक्षा वेगळी भौतिक परिस्थिती असलेल्या मंडळीतल्या बांधवांचा आपण स्वीकार करत असू. पण जातीच्या, संस्कृतीच्या किंवा धार्मिक पार्श्‍वभूमींच्या आधारावर आपल्यामध्ये “भेदभाव” आहेत का? असल्यास, आपण याकोबाच्या मार्गदर्शनाचे कशाप्रकारे पालन करू शकतो?

१४ ख्रिस्ती सभांना येणाऱ्‍या सर्वांचे स्वागत करण्याद्वारे आपण उदार मनोवृत्ती दाखवतो. राज्य सभागृहात येणाऱ्‍या नवीन लोकांशी बोलण्याकरता आपण पुढाकार घेतो तेव्हा त्यांना सुरवातीला वाटणारी भीती व संकोच आपोआप दूर होतो. किंबहुना पहिल्यांदा ख्रिस्ती सभेला उपस्थित राहणाऱ्‍या काहींनी असे म्हटले आहे, “सर्वजण किती मनमिळाऊ होते. जणू ते सर्व मला आधीच ओळखत होते. मला जराही भीती वाटली नाही.”

१५. मंडळीतल्या तरुणांना वयस्कांप्रती आस्था दाखवण्याकरता कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते?

१५ काही मंडळ्यांमध्ये चारपाच तरुण सभा संपल्यावर राज्य सभागृहाच्या आत किंवा बाहेर एक घोळका करून उभे राहतात आणि आपल्यापेक्षा वयाने मोठ्या बांधवांशी भेटण्याबोलण्याचे टाळतात. या प्रवृत्तीवर मात करण्याकरता कोणती सकारात्मक पावले उचलली जाऊ शकतात? पहिली गोष्ट म्हणजे आईवडिलांनी घरीच आपल्या मुलांना प्रशिक्षण दिले पाहिजे व त्यांना सभांकरता तयार केले पाहिजे. (नीतिसूत्रे २२:६) सभांकरता सर्वांना जी प्रकाशने लागणार आहेत ती काढून तयार ठेवण्याचे काम त्यांना नेमले जाऊ शकते. आईवडील आपल्या मुलांना राज्य सभागृहात काही वयस्क किंवा दुर्बल व्यक्‍तींशी बोलण्याचे प्रोत्साहन देऊ शकतात. अशा व्यक्‍तींना काहीतरी अर्थपूर्ण विषयावर बोलता आल्यामुळे मुलांना समाधान वाटेल.

१६, १७. मंडळीतले वयस्क, तरुणांच्या चांगल्या गुणांकडे कशाप्रकारे लक्ष देऊ शकतात?

१६ वयस्क बंधू भगिनींनीही मंडळीतल्या लहान मुलांमध्ये रस घेतला पाहिजे. (फिलिप्पैकर २:४) तरुणांना प्रोत्साहन देण्याकरता ते पुढाकार घेऊ शकतात. सहसा सभेत काही उल्लेखनीय मुद्द्‌यांवर चर्चा केली जाते. वयस्क बंधू भगिनी तरुणांना विचारू शकतात की त्यांना सभा आवडली किंवा नाही, कोणते व्यावहारिक मुद्दे त्यांना विशेष आवडले इत्यादी. तरुण देखील मंडळीचे सदस्य असल्यामुळे त्यांना सभेत लक्ष देण्याबद्दल शाबासकी दिली पाहिजे आणि सभेत त्यांच्या उत्तरांबद्दल किंवा त्यांनी काही भाग हाताळल्यास त्याबद्दल त्यांची प्रशंसा केली पाहिजे. हे तरुण मंडळीतल्या वृद्धांशी कसे वागतात तसेच घरातील साध्या कामांत ते कितपत हातभार लावतात याच्या आधारावर ते नंतर अधिक पदभार सांभाळ्यास योग्य आहेत किंवा नाही हे ठरवता येईल.—लूक १६:१०.

१७ जबाबदाऱ्‍या स्वीकारण्याद्वारे काही तरुण उत्तम आध्यात्मिक गुण विकसित करतात आणि अधिक महत्त्वाच्या नेमणुका पेलण्याइतपत प्रगती करतात. जबाबदाऱ्‍या मिळाल्यास सहसा ते अविचारीपणे वागण्याचे टाळू शकतील. (२ तीमथ्य २:२२) या जबाबदाऱ्‍यांच्या साहाय्याने, सेवा सेवक म्हणून कार्य करू इच्छिणाऱ्‍यांची “पारख” केली जाऊ शकते. (१ तीमथ्य ३:१०) सभेत उत्सुकतेने भाग घेणे, सेवाकार्यात आवेश दाखवणे तसेच मंडळीतल्या सर्वांच्याप्रती प्रेमळ वागणूक यांसारख्या गुणांवरून, त्यांना अधिक जबाबदाऱ्‍या द्याव्यात किंवा नाही याविषयी वडील निर्णय घेऊ शकतात.

सर्वांमध्ये चांगले पाहा

१८. न्याय करताना कोणता धोका टाळणे आवश्‍यक आहे आणि का?

१८ नीतिसूत्रे २४:२३ म्हणते: “तोंड पाहून न्याय करणे ठीक नाही.” देवाकडील बुद्धीच्या प्रेरणेने कार्य करणारे वडील मंडळीत न्याय करताना पक्षपात टाळतात. याकोबाने म्हटले: “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्‍यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.” (याकोब ३:१७) अर्थात इतरांमध्ये चांगले ते पाहताना वडिलांनी आपला न्याय वैयक्‍तिक नातेसंबंधांवर किंवा भावनांवर आधारित नाही याची खातरी करावी. स्तोत्रकर्ता आसाफ याने लिहिले: “देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये न्याय करितो; तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल? कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल?” (स्तोत्र ८२:१, २) त्याचप्रमाणे, एखाद्या मित्राच्या अथवा नातलगाच्या संबंधात काही प्रश्‍न उपस्थित झाल्यास, ख्रिस्ती वडील पक्षपाती वृती पूर्णपणे टाळतात. अशारितीने ते मंडळीची एकता कायम ठेवतात आणि यहोवाच्या आत्म्याला मुक्‍तपणे कार्य करू देतात.—१ थेस्सलनीकाकर ५:२३.

१९. आपण कोणत्या मार्गांनी इतरांचे चांगले गुण पाहू शकतो?

१९ आपल्या बांधवांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देऊन आपण पौलाने थेस्सलनीकाकर मंडळीला संबोधताना जी मनोवृत्ती दाखवली त्यानुसार वागत असतो. त्याने म्हटले: “तुम्हाविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हास जे सांगतो ते तुम्ही करीत असता व पुढेहि करीत जाल.” (२ थेस्सलनीकाकर ३:४) आपण इतरांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो तेव्हा त्यांच्या चुका पदरात घेण्यास आपण तयार असतो. आपण सतत टीका करण्याची प्रवृत्ती टाळून आपल्या बांधवांची प्रशंसा करण्याचे मार्ग शोधतो. पौलाने लिहिले: “कारभारी म्हटला की तो विश्‍वासू असला पाहिजे.” (१ करिंथकर ४:२) मंडळीत कारभाऱ्‍यांचे काम करणाऱ्‍यांचाच नव्हे तर सर्व बांधवांचा व बहिणींचा विश्‍वासूपणा आपल्या मनात त्यांच्याविषयी प्रेम निर्माण करतो. अशारितीने आपण त्यांच्या जवळ येतो आणि आपल्यातील ख्रिस्ती मैत्रीची बंधने अधिक मजबूत होतात. पौलाला त्याच्या काळातील बांधवांविषयी जी मनोवृत्ती होती ती आपण देखील बाळगतो. ते ‘देवाच्या राज्याकरिता आपले सहकारी’ आणि आपल्याला “सांत्वन” पुरवणारे आहेत. (कलस्सैकर ४:११) अशारितीने आपण यहोवाची मनोवृत्ती प्रदर्शित करतो.

२०. सर्वांमध्ये चांगले ते पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना कोणते आशीर्वाद मिळतील?

२० निश्‍चितच आपण ही नहेम्याप्रमाणे प्रार्थना करतो: “देवा, [माझ्या] सत्कृत्यांसाठी माझी आठवण ठेव.” (नहेम्या १३:३१) यहोवा लोकांच्या चांगल्या गुणांवर लक्ष देतो हे जाणून आपल्याला किती आनंद वाटतो! (१ राजे १४:१३) आपणही इतरांसोबतच्या आपल्या व्यवहारांत असेच करू या. असे केल्याने आपल्याला तारण व अत्यंत जवळ आलेल्या नव्या जगात जीवन मिळण्याची आशा प्राप्त होईल.—स्तोत्र १३०:३-८.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

यहोवा सर्वांशी कोणत्या आधारावर चांगुलपणाने वागतो?

आपण इतरांमध्ये चांगले ते कसे पाहू शकतो?

आपल्या सेवाकार्यात?

आपल्या कुटुंबात?

आपल्या मंडळीत?

आपल्या सर्व नातेसंबंधांत?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्र]

योसेफाच्या बांधवांनी आधी त्याचा द्वेष केला तरीसुद्धा त्याने त्यांच्या चांगल्या गुणांकडे पाहिले

[१९ पानांवरील चित्र]

विरोध झाल्यामुळे आपण सर्वांना मदत करण्याचे थांबवत नाही

[२० पानांवरील चित्र]

गतकाळात वाईट कृत्ये करूनही याकोबाच्या पुत्रांना त्याच्या आशीर्वादापासून वंचित ठेवण्यात आले नाही

[२१ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती सभांमध्ये सर्वांचे स्वागत करा