व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आज या राजधान्या कोठे आहेत?

आज या राजधान्या कोठे आहेत?

आज या राजधान्या कोठे आहेत?

नोफ आणि नो ही, ईजिप्तच्या मेंफिस आणि थीब्झच्या एके काळच्या राजधान्यांची बायबलमधील नावे आहेत. नोफ (मेंफिस) कैरोच्या दक्षिणेकडे सुमारे २३ किलोमीटरवर आणि नाईल नदीच्या पश्‍चिमेकडे होते. कालांतराने ईजिप्तची राजधानी म्हणून मेंफिसने आपली प्रतिष्ठा गमावली. सा.यु.पू १५ व्या शतकाचा उदय झाला तेव्हा, मेंफिसच्या दक्षिणेकडे सुमारे ५०० किलोमीटरवर असलेले नो (थीब्झ) ईजिप्तची नवी राजधानी बनले. थीब्झच्या अनेक मंदिरांच्या अवशेषांपैकी एक आहे कर्नाक. आजपर्यंत बांधलेल्या सर्व वास्तूंमध्ये ही खांबे असलेली टोलेजंग वास्तू आहे. थीब्झ आणि कर्नाक येथील मंदिर ईजिप्शियन लोकांचे प्रमुख दैवत आमोन याला समर्पित केलेले होते.

मेंफिस आणि थीब्झ यांच्याविषयी बायबल भविष्यवाणीने काय भाकीत केले होते? ईजिप्तचा फारो आणि तेथील दैवते खासकरून “नो एथला आमोन” या प्रमुख दैवताविरुद्ध न्यायदंड घोषित करण्यात आला होता. (यिर्मया ४६:२५, २६) येथे येणाऱ्‍या उपासकांच्या लोकसमुदायाचा “उच्छेद” केला जाणार होता. (यहेज्केल ३०:१४, १५) हे सर्व असेच घडले. आमोनच्या उपासनेतील, केवळ मंदिरांचे अवशेष काय ते आज उरले आहेत. लक्सरचे आधुनिक शहर प्राचीन थीब्झच्या एका भागात वसलेले आहे आणि इतर लहान लहान गावे या अवशेषांत वसलेली आहेत.

मेंफिसमध्ये कबरांना सोडून फार कमी असे काही उरले आहे. बायबल विद्वान लुईस गोल्डींग म्हणतात: “अनेक शतकांपासून, ईजिप्तच्या अरब विजेत्यांनी, नदीच्या दुसऱ्‍या बाजूला असलेली आपली राजधानी [कैरो] येथे बांधकाम करण्यासाठी मेंफिस येथील टोलेजंग अवशेषांतील दगडधोंड्यांचा उपयोग केला आहे. नाईल आणि अरब कामगारांनी आपले काम इतक्या सफाईदारपणे केले आहे की प्राचीन शहराच्या विभागात मैलोमैल तुम्हाला एकही दगड काळ्या मातीतून वर आलेला दिसणार नाही.” बायबलमध्ये भाकीत केल्यानुसार मेंफिस निव्वळ एक ‘आश्‍चर्याची वस्तू निर्जन’ बनले आहे.—यिर्मया ४६:१९, NW.

बायबल भविष्यवाण्यांची अचूकता दर्शवणाऱ्‍या अनेक उदाहरणांतील ही केवळ दोन उदाहरणे आहेत. थीब्झ व मेंफिसचा झालेला नाश आपल्याला, अद्याप पूर्ण व्हावयाच्या बायबलच्या भविष्यवाणींवर पूर्ण भरवसा ठेवण्यास ठोस कारण देतो.—स्तोत्र ३७:१०, ११, २९; लूक २३:४३; प्रकटीकरण २१:३-५.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Photograph taken by courtesy of the British Museum