इतरांची सेवा केल्यानं आपण आपलं दुःख विसरून जातो
जीवन कथा
इतरांची सेवा केल्यानं आपण आपलं दुःख विसरून जातो
हुल्यान आर्यास यांच्याद्वारे कथित
सन १९८८ मध्ये, मी ४० वर्षांचा होतो तेव्हा माझं व्यावसायिक भवितव्य अगदी सुरक्षित असल्याचं मला भासत होतं. एका बहुराष्ट्रीय कंपनीत मी प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून कामाला होतो. माझ्या नोकरीमुळे मला कंपनीकडून एक महागडी गाडी, लठ्ठ पगार आणि स्पेनमधील माद्रिदच्या अगदी मध्यभागी एक झकास कार्यालय मिळालं होतं. कंपनीनं मला असंही सुचवलं होतं की लवकरच ते मला कंपनीचा राष्ट्रीय व्यवस्थापक बनवणार आहेत. परंतु माझं जीवन पार बदलणार आहे, याची मला तेव्हा जराही जाणीव नव्हती.
त्याच वर्षी, एके दिवशी माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं, की मला बहुतंत्रिका विकार अर्थात एक असाध्य रोग झाला आहे. मी पार उद्ध्वस्त झालो. नंतर मी, बहुतंत्रिका विकारामुळे एका व्यक्तीला काय काय होत असतं ते वाचलं तेव्हा तर मी खूप घाबरलो. * असं वाटलं, की संपूर्ण आयुष्यभर माझ्या डोक्यावर, डॅमोक्लीसच्या म्हणीतली टांगती तलवार लटकत राहणार आहे. माझी पत्नी मिलाग्रोस आणि माझा तीन वर्षांचा मुलगा इस्माईल यांची काळजी मी कशी घेणार? मी स्वतः या परिस्थितीचा सामना कसा करणार? या प्रश्नांची उत्तरे मी शोधत होतो तोच आणखी एक जबरदस्त धक्का मला बसला.
माझ्या डॉक्टरांनी मला माझ्या आजाराबद्दल सांगितल्यानंतर एक महिन्यानं माझ्या सुपरव्हायझरनं मला आपल्या कार्यालयात बोलवलं आणि मला सांगितलं, की कंपनीला “आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे” लोक हवेत. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीचा आजार बळावत चाललेला अर्थात तो नुकताच जडलेला असला तरी ती व्यक्ती आकर्षक ठरणार नाही. तिथल्या तिथंच माझ्या मालकानं मला कामावरून काढून टाकलं. अचानक मी बेकार झालो!
मी हिंमत हरलो नाही, असं मी माझ्या कुटुंबाला भासवण्याचा प्रयत्न करू लागलो; माझ्या परिस्थितीचा, भविष्याचा विचार करण्यासाठी मला एकान्त हवा होता. माझ्या मनात वाढत चाललेल्या नैराश्याच्या भावनेवर मी मात करायचा प्रयत्न करू लागलो. एका रात्रीत मी, कंपनीच्या नजरेत निकामी ठरलो होतो, या एका गोष्टीचं मला जास्त वाईट वाटलं.
दुर्बलतेतून शक्ती मिळवणं
एक बरं झालं, की या निराशजनक काळात मी शक्तीच्या अनेक स्रोतांवर अवलंबून राहू शकलो. मी २० वर्षांपूर्वी यहोवाचा साक्षीदार बनलो होतो. त्यामुळे मी यहोवाला अगदी कळकळून प्रार्थना केली, त्याला माझ्या भावनांविषयी आणि माझ्या अस्थिर भवितव्याविषयी सांगितलं. यहोवाची साक्षीदार असलेली माझी पत्नी माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिली; शिवाय, माझ्या काही निकटच्या मित्रांनी मला दाखवलेली दया आणि कळवळा खरोखरच अमूल्य होता.—नीतिसूत्रे १७:१७.
इतरांबद्दलच्या जबाबदारीच्या जाणीवेने देखील मला पुष्कळ मदत मिळाली. मला माझ्या मुलाचं उत्तम संगोपन करण्याची, त्याला शिकवण्याची, त्याच्याबरोबर खेळण्याची, प्रचारकार्यात त्याला प्रशिक्षित करण्याची इच्छा होती. त्यामुळे मला हार मानून चालणार नव्हते. शिवाय, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका मंडळीत मी वडील या नात्याने सेवा करत असल्यामुळे माझ्या ख्रिस्ती बंधूभगिनींना माझ्या आधाराची गरज होती. माझ्या आजारामुळे मी माझाच विश्वास कमकुवत होऊ दिला तर मी इतरांपुढे चांगलं उदाहरण कसं मांडू शकेन?
शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीमुळं माझं जीवन बदलू लागलं—यामुळे काही बाबतीत ते अत्यंत बिकट झालं तर काही बाबतीत सुधारलं. एका डॉक्टरला मी असं म्हणताना ऐकलं होतं: “आजार व्यक्तीला नष्ट करत नाही, उलट त्या व्यक्तीत परिवर्तन करतो.” आणि मला हे समजलं आहे, की आजारामुळे होणारे सर्वच बदल नकारात्मक नसतात.
सर्वप्रथम, ‘माझ्या शरीरातल्या काट्याने’ मला इतरांच्या आरोग्याच्या समस्या चांगल्याप्रकारे समजून त्यांना सहानुभूती दाखवण्यास शिकवलं. (२ करिंथकर १२:७) पूर्वीपेक्षा आता मला, नीतिसूत्रे ३:५ मधील शब्द अधिक चांगल्याप्रकारे समजतात, जेथे असे म्हटले आहे की, “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको.” याहीपेक्षा अधिक सांगायचं तर, माझ्या नवीन परिस्थितीनं मला, जीवनात सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि खरे समाधान व स्वाभिमानाची भावना कशामुळे मिळते हे समजण्यास शिकवलं. यहोवाच्या संघटनेत पुष्कळ गोष्टी करण्याजोग्या होत्या. “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे” या येशूच्या शब्दांचा खरा अर्थ मला गवसला.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
नवजीवन
माझ्या आजाराचं निदान झाल्यानंतर लगेच मला, माद्रिद येथे भरणाऱ्या एका सत्रासाठी आमंत्रण देण्यात आलं; या सत्रात ख्रिस्ती स्वयंसेवकांना, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये सहकार्य निर्माण करण्यास शिकवण्यात आले. नंतर, या स्वयंसेवकांची मिळून, इस्पितळ सहकार्य समिती निर्माण करण्यात आली. माझ्या बाबतीत, हे सत्र अगदी उचित समयी आलं होतं. मी एक उत्तम पेशा शोधून काढला; असा पेशा ज्यातून मला माझ्या व्यापारी नोकरीपेक्षा कितीतरी पटीने अधिक समाधान मिळू शकेल.
सत्रात आम्ही शिकलो, की नव्यानं स्थापन केलेल्या समितींना, इस्पितळांना भेटी द्यायच्या होत्या, डॉक्टरांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या, आरोग्य कामगारांसमोर सादरता पेश करायच्या होत्या; आणि हे सर्व, सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याच्या व मतभेद टाळण्याच्या उद्देशाने करायचं होते. या समिती, रक्ताविना वैद्यकीय उपचार करण्यास तयार असलेले डॉक्टर शोधण्यास सहसाक्षीदारांना मदत करतात. अर्थातच, मला या क्षेत्रातील कसलीच माहिती नसल्यामुळे मला वैद्यकीय शब्द, वैद्यकीय तत्त्वे आणि इस्पितळ संघटन याविषयी पुष्कळ काही शिकावं लागलं. तरीपण, या सत्रामुळे माझी विचारसरणी पार बदलली होती. माझ्यासमोर आता एक रोमांचक आव्हान होतं.
इस्पितळांना दिलेल्या भेटी—समाधानाचा एक स्रोत
एकीकडे माझा आजार अगदी हळूवारपणे व क्रूरपणे मला अधू करत होता आणि दुसरीकडे इस्पितळ सहकार्य समितीतील एक सदस्य या नात्याने असलेल्या माझ्या जबाबदाऱ्या वाढत चालल्या होत्या. अपंगांसाठी दिले जाणारे पेन्शन मलाही मिळत असल्यामुळे, इस्पितळांना भेटी द्यायला माझ्याकडे वेळ होता. अधूनमधून मी निराश होत असलो तरी, मी जशी अपेक्षा केली त्यापेक्षा हे कितीतरी सोपं व अधिक प्रतिफलदायी ठरलं. मला सध्या व्हीलचेअर वापरावी लागत असली तरी, यामुळे मला इतकी काही अडचण भासत नाही. समितीतील एखादा सदस्य नेहमी माझ्याबरोबर असतो. शिवाय, व्हीलचेअरवर असलेल्या लोकांचं बोलणं ऐकायची डॉक्टरांना सवय आहे आणि कधीकधी तर त्यांची भेट घेण्यासाठी मी किती प्रयत्न करतो हे ते पाहतात तेव्हा ते माझं बोलणं आणखी आदरपूर्वक ऐकतात.
गेल्या दहा वर्षांत, मी शेकडो डॉक्टरांची भेट घेतली आहे. काही तर पहिल्या भेटीतच आम्हाला मदत करायला तयार असतात. माद्रिदमध्ये, रुग्णाच्या इच्छेचा आदर करण्यात अभिमान बाळगणारे व हृदयावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. क्वान ड्वार्टे यांनी लगेच आम्हाला मदत करायची तयारी दर्शवली. तेव्हापासून, त्यांनी स्पेनच्या अनेक भागांतून आलेल्या साक्षीदारांवर रक्ताविना २०० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. अनेक वर्षांपासून, पुष्कळ डॉक्टरांनी रक्ताविना शस्त्रक्रिया करण्यास सुरू केले आहे. आमच्या नियमित भेटींचा हा काही प्रमाणात परिणाम असला तरी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती आणि रक्ताविना शस्त्रक्रिया केल्यामुळे मिळालेले चांगले परिणाम यांमुळे देखील हे शक्य झाले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाने आमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिला आहे, अशी आमची खात्री पटली आहे.
मुलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणाऱ्या काही तज्ज्ञ डॉक्टरांनी दाखवलेल्या प्रतिक्रियेमुळे मला खासकरून उत्तेजन मिळाले आहे. दोन सर्जन आणि त्यांचा भूलतज्ज्ञ, अशा एका गटाला आम्ही दोन वर्षे भेटी देत राहिलो. या क्षेत्रात इतर डॉक्टर काय करत आहेत त्याचे स्पष्टीकरण देणारे वैद्यकीय साहित्य आम्ही त्यांना देत राहिलो. १९९९ मध्ये, बाल हृदय शस्त्रक्रियेवरील एका वैद्यकीय परिषदेत आमच्या प्रयत्नांचे प्रतिफळ आम्हाला मिळाले. इंग्लंडच्या एका सहकारी सर्जनच्या उत्तम मार्गदर्शनाखाली दोन सर्जनने साक्षीदारांच्या एका लहान बाळाच्या हृदयाची अतिशय कठीण शस्त्रक्रिया केली; या बाळाच्या हृदयाच्या महाधमनीच्या झडपेत सुधार करायचा होता. * शस्त्रक्रियेनंतर एक सर्जन ऑपरेशन खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी या बाळाच्या आईवडिलांना जेव्हा असे सांगितले, की शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती व या कुटुंबाच्या इच्छेचा आदर करण्यात आला होता तेव्हा या बाळाच्या आईवडिलांबरोबर मलाही खूप आनंद वाटला. आता, हे दोन्ही सर्जन नियमितरीत्या संपूर्ण स्पेनहून येणाऱ्या साक्षीदार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यास तयार असतात.
या सर्व वेळी मला मात्र एका गोष्टीचं समाधान मिळतं; ते म्हणजे मी माझ्या ख्रिस्ती बंधूभगिनींना मदत करू शकतो. सहसा, जेव्हा ते इस्पितळ सहकार्य समितीशी संपर्क साधतात तेव्हा तो त्यांच्या जीवनातला सर्वात कठीण काळ असतो. त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते आणि स्थानीय इस्पितळातील डॉक्टर रक्ताविना शस्त्रक्रिया अथवा उपचार करण्यास तयार नसतात. परंतु, त्यांना जेव्हा कळतं, की माद्रिदमध्ये सर्व वैद्यकीय क्षेत्रात सहकार्य देऊ इच्छिणारे सर्जन आहेत तेव्हा त्यांना किती हायसं वाटतं. एक बंधू इस्पितळात होते तेव्हा फक्त आमच्या उपस्थितीनंच त्यांच्या चेहऱ्यावरचा चिंतेचा भाव बदलून एकप्रकारची शांती आल्याचं मी स्वतः पाहिलं आहे.
वकीलांची व वैद्यकीय तत्त्वांची दुनिया
अलीकडील वर्षांमध्ये, इस्पितळ सहकार्य समितींच्या सदस्यांनी वकीलांच्या देखील भेटी घेतल्या आहेत. या भेटींदरम्यान आम्ही त्यांना यहोवाच्या साक्षीदारांसाठी कौटुंबिक काळजी आणि वैद्यकीय व्यवस्था (इंग्रजी) नावाचे एक प्रकाशन देतो जे, रक्ताविषयी आपली भूमिका आणि रक्त नसलेले वैद्यकीय उपचाराची उपलब्धता याविषयी अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी तयार करण्यात आले आहे. अशा भेटी देणे खरोखरच आवश्यक होतं कारण, एक काळ असा होता जेव्हा स्पेनमधले वकील सर्रासपणे, रुग्णाच्या मर्जीविरुद्ध रक्त संक्रमण देण्याची डॉक्टरांना परवानगी द्यायचे.
वकीलांचे कक्ष अतिशय प्रशस्त असतात; माझ्या पहिल्या भेटीतच मी जेव्हा प्रवेशमार्गातून माझ्या व्हीलचेअरवर चाललो होतो तेव्हा मला, आपण किती क्षुल्लक आहोत असं वाटलं. यात आणखी एक फजिती झाली; मी माझ्या व्हीलचेअरवरून खाली घसरून गुडघ्यांवर पडलो. माझी दयनीय अवस्था पाहून काही वकील आणि न्यायाधीश मला मदत करायला धावत आले पण मला त्यांच्यासमोर खूप लाज वाटली.
आम्ही भेट द्यायला का आलो होतो हे या वकीलांना नीटसं माहीत नव्हतं तरी, पुष्कळ वकील आमच्याबरोबर दयाळुपणे वागले. पहिल्या वकीलांना आम्ही भेटलो तेव्हा ते, आधीच आमच्या स्थितीविषयीचा विचार करत होते आणि ते आम्हाला म्हणाले, की आम्हाला तुमच्याबरोबर जास्त चर्चा करण्याची इच्छा आहे. पुढल्या भेटीच्या वेळी त्यांनी स्वतः माझी व्हीलचेअर ढकलत मला त्यांच्या कक्षेत नेलं आणि आमचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. या पहिल्या भेटीमुळे आलेले उत्तम परिणाम पाहून माझ्याबरोबर असलेल्या माझ्या सोबत्यांना आणि मला, आमच्या मनात असलेली भीती घालवून देण्याचं उत्तेजन मिळालं आणि काही काळातच आम्ही चांगले परिणाम पाहिले.
त्याच वर्षी, आम्ही आणखी एका वकीलांना कौटुंबिक काळजी (इंग्रजी) या प्रकाशनाची एक प्रत दिली ज्यांनी आमचं दयाळुपणे स्वागत केलं आणि मी प्रकाशनातील माहिती वाचून पाहीन असं आम्हाला आश्वासन दिलं. मी त्यांना माझा फोन नंबर दिला जेणेकरून तातडीच्या प्रसंगी आमच्याशी संपर्क साधावा लागल्यास ते साधू शकतील. दोन आठवड्यांनंतर त्यांनी फोन करून सांगितलं, की एका स्थानीय सर्जननं त्यांना, शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या एका साक्षीदाराला रक्त संक्रमण देण्यात यावं म्हणून त्यांची परवानगी मागितली. या वकीलांनी आम्हाला सांगितलं, की या साक्षीदाराला रक्त न घेण्याची इच्छा असल्यामुळे त्याच्या इच्छेचा आदर करण्याकरता पर्याय शोधण्यास आपण मला मदत करावी. आम्ही दुसरं एक इस्पितळ शोधून काढलं जिथल्या सर्जननी रक्ताविना यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केल्या होत्या; हे इस्पितळ शोधून काढायला आम्हाला इतका काही त्रास झाला नाही. या वकीलांना, शेवटी काय झालं ते ऐकल्यावर
आनंद वाटला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, की पुढे मीही असेच उपाय पाहीन.मी इस्पितळांना भेटी द्यायला जायचो तेव्हा, वैद्यकीय तत्त्वांचा नेहमी प्रश्न यायचा; कारण, डॉक्टरांनी रुग्णाच्या हक्कांचा आणि इच्छेचा विचार करावा अशी आमची इच्छा असायची. माद्रिदमधील एका सहकारी इस्पितळाने मला, तत्त्वांवर असलेल्या एका कोर्समध्ये सहभाग घेण्यासाठी आमंत्रण दिलं. या कोर्समुळे मी, या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांना आपला बायबल आधारित दृष्टिकोन समजावून सांगू शकलो. या कोर्सनं मला, डॉक्टरांना किती कठीण निर्णय घ्यावे लागतात हे समजण्यास देखील मदत केली.
या कोर्समधील एक शिक्षक, प्राध्यापक ड्येगो ग्रास्या नियमितरीत्या स्पॅनिश डॉक्टरांसाठी तत्त्वांसंबंधाने, एका कोर्सचे आयोजन करतात आणि रक्त संक्रमणाच्या बाबतीत धार्मिक कारणांसाठी आपण घेत असलेल्या आपल्या निर्णयांना पूर्ण पाठिंबा देतात. * त्यांच्याबरोबर आम्ही नेहमी संपर्क ठेवल्यामुळे, प्राध्यापक ग्रास्या यांच्या विद्यार्थ्यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या भूमिकेचे स्पष्टीकरण देण्यासाठी स्पेनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातील काही प्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आले; या विद्यार्थ्यांपैकी काही जण, देशांतील सर्वात नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जातात.
वस्तुस्थिती स्वीकारणे
अर्थातच, सहविश्वासूंसाठी मी करत असलेल्या या समाधानकारक कार्यामुळे माझ्या व्यक्तिगत समस्या सुटल्या नाहीत. माझा आजार हा बळावतच चालला आहे. आतापर्यंत तरी देव दयेने माझं मन शाबूत आहे. कसलीही तक्रार न करणाऱ्या माझ्या पत्नीमुळे व मुलामुळे मी अजूनही जबाबदाऱ्या सांभाळू शकलो आहे. यांच्या मदतीविना व पाठिंब्याविना हे शक्य झाले नसते. मी स्वतःहून पॅन्टची बटणं लावू शकत नाही किंवा ओव्हरकोट घालू शकत नाही. मला माझा मुलगा, इस्माईल याच्याबरोबर दर शनिवारी क्षेत्र सेवेत जायला आवडतं; तोच मला प्रत्येक घरी माझ्या व्हीलचेअरवरून नेतो. मंडळीत वडील या नात्याने मी आजही माझ्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतो.
गेल्या १२ वर्षांत मी काही आघातजन्य क्षण अनुभवले आहेत. कधीकधी, माझ्या अपंगत्वाचा माझ्या कुटुंबावर परिणाम होतो हे पाहून मला माझ्या आजारापेक्षाही अधिक यातना होतात. माझ्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, असं ते मला बोलून दाखवत नसले तरी ते मला कळतं. अलीकडेच, एक वर्षाच्या कालावधीत, माझी सासू आणि माझे वडील वारले. त्याच वर्षी, मला दिसून आलं, की व्हीलचेअरविना मी कुठेच फिरू शकत नाही. माझे वडील आमच्याच घरी राहत होते; त्यांनाही एक बळावणारा आजार होता. मिलाग्रोसनं त्यांची खूप काळजी घेतली; माझं भवितव्य काय असेल हे जणू तिनं आधीच पाहिलं होतं असं तिला तेव्हा वाटलं असावं.
परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे, आम्ही येणाऱ्या प्रत्येक अडचणीला कुटुंब मिळून तोंड देतो. पूर्वी मी एका व्यवस्थापकाच्या खुर्चीवर बसत होतो आणि आता मी एका व्हीलचेअरवर बसतो; पण माझं जीवन आता खऱ्या अर्थानं उत्तम आहे कारण इतरांची सेवा करण्यात माझा बहुतेक वेळ जातो. इतरांची सेवा केल्यानं आपण आपलं दुःख विसरून जातो आणि आपल्याला गरज असते तेव्हा यहोवा आपल्याला शक्ती देण्याचं आपलं वचन पूर्ण करतो. प्रेषित पौलाप्रमाणे मीही म्हणू शकतो, की “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३.
[तळटीपा]
^ परि. 5 बहुतंत्रिका विकार, मध्य तंत्रिका तंत्रातील एक बिघाड आहे. हा विकार झालेल्या व्यक्तींमध्ये, तोल, हाता-पायांची हालचाल आणि कधीकधी दृष्टी, बोलणे किंवा समजणे, या गोष्टी हळूहळू लोप पावत जातात.
^ परि. 19 या शस्त्रक्रियेला रॉस पद्धत म्हटले जाते.
^ परि. 27 टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, १९९७, पृष्ठे १९-२० पाहा.
[२४ पानांवरील चौकट]
पत्नीचे मनोगत
पत्नी या नात्यानं, बहुतंत्रिका विकार झालेल्या एका सोबत्याबरोबर राहणं, मानसिकरीत्या, भावनिकरीत्या व शारीरिकरीत्या कठीण आहे. योजना बनवताना मला नेहमी समजंस असावं लागतं आणि भवितव्याविषयीच्या अनावश्यक चिंता मनातून काढून टाकाव्या लागतात. (मत्तय ६:३४) तरीपण, दुःख उराशी बाळगून जीवन जगल्यानं एखाद्या व्यक्तीतले चांगले गुण दिसू लागतात. आमचा विवाह पूर्वीपेक्षा आता अधिक भक्कम झाला आहे आणि यहोवाबरोबरचं माझं नातं आणखी घनिष्ट झालं आहे. माझ्यासारख्या दबावपूर्ण परिस्थितीत असलेल्यांचे अनुभव वाचल्यामुळेसुद्धा मी पुष्कळ खंबीर बनू शकले आहे. बंधूभगिनींसाठी हुल्यानना मौल्यवान सेवा करत असताना जसं समाधान मिळतं तसं मलाही मिळतं. आणि प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान घेऊनच उदयास येत असला तरी यहोवानं आम्हाला सोडलेलं नाही, हे माझ्या पाहण्यात आलं आहे.
[२४ पानांवरील चौकट]
मुलाचे मनोगत
माझ्या वडिलांचा धीर व आशावादी मनोवृत्ती माझ्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे; मी त्यांना व्हीलचेअरवर नेत असतो तेव्हा माझी त्यांना मदत होतेय याचे मला समाधान वाटते. मला माहीत आहे की मला जे करावंस वाटतं ते मी नेहमी करू शकत नाही. आता मी एक किशोरवयीन आहे, पण मोठा झाल्यावर मला इस्पितळ सहकार्य समितीचा एक सदस्य म्हणून सेवा करायला आवडेल. बायबलच्या अभिवचनांवरून मला हे माहीत आहे, की आपल्याला भोगावं लागणारं दुःख हे तात्पुरतं आहे आणि आपल्यापेक्षा अधिक दुःख आपल्या अनेक बंधूभगिनींना सहन करावं लागत आहे.
[२२ पानांवरील चित्र]
माझी पत्नी माझ्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे
[२३ पानांवरील चित्र]
हृदयावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. क्वान ड्वार्टे यांच्याबरोबर बोलत असताना
[२५ पानांवरील चित्र]
माझ्या मुलाला आणि मला सेवेमध्ये एकत्र काम करायला आवडतं