खरे प्रेम कसे विकसित करावे
खरे प्रेम कसे विकसित करावे
“प्रेम जीवनाचे अमृत आहे; प्रेम हेच जीवन आहे.”—जोसेफ जॉन्सन यांचे उद्देशपूर्ण जीवन (इंग्रजी), १८७१.
मानव प्रेम करण्यास कसे शिकतो? मानसशास्त्राचा अभ्यास करण्याद्वारे? व्यक्तिगत विकासासंबंधीची पुस्तके वाचण्याद्वारे? रोमँटिक चित्रपट पाहण्याद्वारे? मुळीच नाही. मानव प्रथम आपल्या उदाहरणाद्वारे आणि पालकांच्या प्रशिक्षणाद्वारे प्रेम करायला शिकतात. एका जिव्हाळ्याच्या वातावरणात पालक आपले भरणपोषण करतात, संरक्षण करतात, आपल्याशी संवाद साधतात आणि आपल्यात व्यक्तिगतरित्या लक्ष घालतात हे मुलांनी पाहिल्यास त्यांना प्रेमाचा अर्थ शिकता येतो. शिवाय, पालकांनी त्यांना योग्यायोग्यची उचित तत्त्वे पाळण्यास शिकवल्यावरही मुले प्रेम करायला शिकतात.
खरे प्रेम केवळ जिव्हाळा किंवा भावनांवर आधारित नसते. ते सातत्याने इतरांचे हित साधते. काही वेळा याचे मूल्य समजले जात नाही, विशेषतः, मुलांना प्रेमळ शिस्त दिली जाते तेव्हा असे होते. निःस्वार्थ प्रेमाचा एक परिपूर्ण आदर्श खुद्द निर्माणकर्ता आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “माझ्या मुला परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको; कारण ज्यावर परमेश्वर प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करतो.”—इब्री लोकांस १२:५, ६.
पालकहो, आपल्या कुटुंबाला प्रेम दाखवण्यामध्ये तुम्ही यहोवाचे अनुकरण कसे करू शकता? शिवाय, पती-पत्नीच्या आपसातील नातेसंबंधात आदर्श असणे किती महत्त्वाचे आहे?
उदाहरणाद्वारे प्रेम शिकवा
तुम्ही पती असला तर तुमच्या पत्नीची तुम्ही प्रशंसा करता का, तिला बहुमोल समजता का आणि तिला सन्मान व आदर देता का? तुम्ही पत्नी असल्यास, तुम्ही आपल्या पतीवर प्रेम करता का, त्याला पूर्ण पाठिंबा देता का? बायबल म्हणते की, पती-पत्नीने एकमेकांवर प्रेम केले पाहिजे, एकमेकांचा आदर केला पाहिजे. (इफिसकर ५:२८; तीत २:४) असे केल्यास त्यांच्या मुलांना ख्रिस्ती प्रेम प्रत्यक्ष पाहता येते. असा धडा किती प्रभावशाली आणि मोलाचा असू शकतो!
पालक आपल्या कुटुंबात, मनोरंजन, नैतिकता आणि ध्येये राखण्याच्या व प्राधान्य देण्याच्या बाबतीत उच्च दर्जांचे पालन करतात तेव्हा देखील ते घरामध्ये प्रेमाला प्रोत्साहन देत असतात. जगभरात, असे कौटुंबिक दर्जे राखण्यासंबंधी बायबलची बरीच मदत झाली आहे असे लोकांना आढळले आहे व त्यांना जिवंत पुरावा मिळाला आहे की, बायबल खरोखर “परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख [असून] सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) अर्थात, डोंगरावरील प्रवचनात आढळणारी नैतिक तत्त्वे व जीवनाकरता मार्गदर्शन सर्वोच्च दर्जाचे आहे.—मत्तय, अध्याय ५ ते ७.
संपूर्ण कुटुंब जेव्हा देवाकडून मार्गदर्शन प्राप्त करते आणि त्याच्या दर्जांचे पालन करते तेव्हा प्रत्येक व्यक्तीला अधिक सुरक्षित वाटते आणि मुलांना आपल्या पालकांबद्दल अधिकाधिक प्रेम आणि आदर वाटू लागतो. त्याउलट, ज्या घरातले दर्जे एकसारखे नसतात, जेथे चुकीचे दर्जे अवलंबले जातात किंवा दर्जांचे पालन केले जात नाही त्या घरातली मुले कदाचित वैतागून जातील, चिडतील किंवा बंडखोर बनतील.—रोमकर २:२१; कलस्सैकर ३:२१.
एकट्या पालकांबद्दल काय? त्यांना आपल्या मुलांना प्रेम शिकवणे मुळीच शक्य नाही असे आहे का? नाही. उत्तम माता व पिता यांना पर्याय नसला तरी अनुभवाने हे दिसून आले आहे की, काही अंशी कुटुंबातले उत्तम नातेसंबंध, नसलेल्या पालकाची उणीव भरून काढू शकतात. तुम्ही एकटे पालक असल्यास आपल्या घरात बायबल तत्त्वे अंमलात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करा. एका नीतिसूत्रात असे म्हटले आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—पालकत्वाच्या मार्गातही.—नीतिसूत्रे ३:५, ६; याकोब १:५.
एकट्या पालकीय वातावरणात अनेक उत्तम तरुणांचे संगोपन झाले आहे आणि सध्या ते जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या हजारो ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये विश्वासूपणे देवाची सेवा करत आहेत. हा याचा पुरावा आहे की, एकटे पालक देखील आपल्या मुलांना प्रेम शिकवण्यात यशस्वी ठरू शकतात.
सर्वजण प्रेम कसे विकसित करू शकतात
बायबलने भाकीत केले की, “शेवटल्या काळी . . . ममताहीन” लोक असतील. याचाच अर्थ, कुटुंबात सहसा एकमेकांबद्दल असलेल्या नैसर्गिक प्रेमभावाचा अभाव असेल. (२ तीमथ्य ३:१, ३) तथापि, प्रेमाचा अभाव असलेल्या वातावरणात वाढलेले लोकही प्रेम विकसित करायला शिकू शकतात. कसे? प्रेमाचा स्रोत असलेल्या व आपल्याकडे खऱ्या मनापासून येणाऱ्या प्रत्येकाला प्रेम आणि जिव्हाळा दाखवणाऱ्या यहोवाकडून शिकण्याद्वारे. (१ योहान ४:७, ८) “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील,” असे एका स्तोत्रकर्त्याने लिहिले.—स्तोत्र २७:१०.
यहोवा अनेक मार्गांनी आपल्याबद्दल प्रेम प्रदर्शित करतो. तो बायबलद्वारे आपल्याला पित्यासमान मार्गदर्शन देतो, पवित्र आत्म्याद्वारे आपले साहाय्य करतो आणि ख्रिस्ती बंधुत्वाद्वारे प्रेमळ पाठबळ देतो. (स्तोत्र ११९:९७-१०५; लूक ११:१३; इब्री लोकांस १०:२४, २५) या तीन तरतुदी आपल्याला देवाबद्दल आणि शेजाऱ्याबद्दल अधिक प्रेम विकसित करण्यास कशी मदत देऊ शकतात ते आपण पाहू या.
प्रेरित पित्यासमान मार्गदर्शन
एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमळ नातेसंबंध विकसित करण्यासाठी त्या व्यक्तीशी चांगला परिचय करून घेणे महत्त्वाचे आहे. बायबलद्वारे स्वतःविषयी प्रकट करून यहोवा आपल्याला त्याच्या समीप येण्याचे आमंत्रण देतो. परंतु, केवळ बायबल वाचणे पुरेसे नाही. त्याच्या शिकवणुकी अंमलात आणण्याची आणि त्यामुळे मिळणारे फायदे अनुभवण्याची गरज आहे. (स्तोत्र १९:७-१०) “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो,” असे यशया ४८:१७ मध्ये सांगण्यात आले आहे. होय, प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण यहोवा, आपले स्वातंत्र्य सीमित करण्यासाठी नव्हे तर आपल्याच फायद्यासाठी असंख्य नियम देऊन आपल्याला शिक्षण देतो.
बायबलचे अचूक ज्ञान आपल्याला सहमानवांबद्दल अधिक प्रेम विकसित करण्यासही मदत करते. कारण फिलिप्पैकर १:९.
बायबलचे सत्य आपल्याला मानवांबद्दल देवाचा दृष्टिकोन काय आहे ते शिकवते आणि एकमेकांसोबतच्या व्यवहारात कोणती तत्त्वे लागू केली पाहिजेत ते दाखवते. अशी माहिती, शेजाऱ्याबद्दल प्रेम विकसित करण्यास एक ठोस आधार देते. प्रेषित पौलाने म्हटले: “माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीति ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.”—“ज्ञानाने” प्रेम कसे वाढू शकते हे दाखवण्यासाठी प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ येथे दिलेले मूलभूत सत्य विचारात घ्या: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” देव जर राष्ट्राच्या किंवा जातीच्या आधारे नव्हे तर नीतिमान कृत्ये आणि ईश्वरी भय यांच्या आधारे त्यांचा न्याय करतो तर आपणही सहमानवांना अपक्षपाती नजरेतून पाहायला नको का?—प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७; १ योहान ४:७-११, २०, २१.
प्रीती—देवाच्या आत्म्याचे फळ
शेतमळ्यावर योग्य समयी पडणाऱ्या पावसामुळे चांगले उत्पन्न मिळते त्याचप्रमाणे देवाचा आत्मा ग्रहणशील व्यक्तींमध्ये काही गुण उत्पन्न करू शकतो ज्यांना बायबलमध्ये ‘आत्म्याचे फळ’ म्हटले आहे. (गलतीकर ५:२२, २३) यात सर्वात पहिले फळ प्रीती आहे. (१ करिंथकर १३:१३) परंतु, देवाचा आत्मा आपल्याला कसा मिळतो? प्रार्थना हा एक प्रमुख मार्ग आहे. आपण देवाच्या आत्म्यासाठी प्रार्थना केल्यास तो आपल्याला पवित्र आत्मा देईल. (लूक ११:९-१३) तुम्ही सातत्याने पवित्र आत्म्यासाठी ‘मागत’ राहता का? तसे केल्याने, त्याचे बहुमोल फळ—प्रीती देखील—तुमच्या जीवनात अधिक दिसून येईल.
परंतु, देवाच्या आत्म्याच्या विरोधात कार्य करणारा आणखी एक आत्मा आहे. बायबल त्यास “जगाचा आत्मा” म्हणते. (१ करिंथकर २:१२; इफिसकर २:२) तो एक दुष्ट प्रभाव आहे आणि त्याचा उगम, देवापासून दुरावलेल्या मानवजातीच्या “जगाचा अधिकारी” दियाबल सैतान याच्याशिवाय आणखी कोणी नाही. (योहान १२:३१) वाऱ्यामुळे जशी धूळ आणि कचरा हवेत उडतो त्याचप्रमाणे, “जगाचा आत्मा” प्रीतीचा नाश करून देहाच्या कमतरतांना पूर्ण करणाऱ्या हानीकारक वासनांना चेतवतो.—गलतीकर ५:१९-२१.
लोक जेव्हा भौतिकवादी, स्वार्थी विचारशैली, हिंसक मनोवृत्ती आणि जगामध्ये सर्रासपणे प्रीतीबद्दल जो चुकीचा इतकेच नव्हे तर विकृत दृष्टिकोन बाळगला जातो त्याच्या संपर्कात येतात तेव्हा हा दुष्ट आत्मा त्यांच्यात संचारतो. खऱ्या प्रीतीत तुम्हाला अधिक वाढायचे असल्यास, जगाच्या आत्म्याचा दृढपणे प्रतिकार करण्याची गरज आहे. (याकोब ४:७) परंतु, स्वतःच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवू नका; यहोवाकडून मदत घ्या. त्याचा आत्मा—विश्वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्ती—तुम्हाला बळकट करू शकतो आणि यश देऊ शकतो.—स्तोत्र १२१:२.
ख्रिस्ती बंधुत्वातून प्रीती शिकणे
मुले ज्याप्रमाणे घरातल्या अनुभवाने प्रीती दाखवण्यास शिकतात त्याचप्रमाणे आपण सर्वजण—अबालवृद्ध—इतर ख्रिश्चनांच्या सहवासात राहून प्रीती वाढवू शकतो. (योहान १३:३४, ३५) किंबहुना, एकमेकांना “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देणारे वातावरण निर्माण करणे हे ख्रिस्ती मंडळीचे एक महत्त्वाचे कार्य आहे.—इब्री लोकांस १०:२४.
आपल्या भोवतालच्या प्रेमहीन जगात जे “गांजलेले व पांगलेले” आहेत अशांना या प्रीतीचे विशेष मोल वाटते. (मत्तय ९:३६) अनुभवाने हे दाखवून दिले आहे की, प्रौढपणी प्रेमळ नातेसंबंध असल्याने प्रेमाचा अभाव असलेल्या बालपणाच्या जखमा भरून निघतात. सर्व समर्पित ख्रिश्चनांनी आपल्यामध्ये येणाऱ्या नवीन जणांचे मनःपूर्वक स्वागत करणे किती महत्त्वाचे आहे!
“प्रीती कधी अंतर देत नाही”
बायबल म्हणते की, “प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:८) ते कसे? प्रेषित पौल म्हणतो: “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति हेवा करीत नाही; प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) स्पष्टतः, ही प्रीती म्हणजे मनाची कल्पना नाही किंवा वरपांगी भावना नाही. त्याउलट, ही प्रीती प्रदर्शित करणाऱ्या लोकांना जीवनातील निराश करणाऱ्या गोष्टींची व दुखण्यांची चांगलीच जाणीव आहे व ते त्यांस कबूलही करतात पण त्यामुळे सहमानवाबद्दलची प्रीती नष्ट होऊ देत नाहीत. अशी प्रीती खरोखर “पूर्णता करणारे बंधन” आहे.—कलस्सैकर ३:१२-१४.
कोरियातील एका १७ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीचे उदाहरण पाहा. तिने यहोवा देवाची सेवा करायला सुरवात केली तेव्हा तिच्या कुटुंबाला हे नापसंत होते आणि तिला आपले घर सोडावे लागले. परंतु, मनात राग बाळगण्याऐवजी तिने याविषयी प्रार्थना केली आणि देवाच्या वचनाला व पवित्र आत्म्याला तिच्या विचारशैलीवर प्रभाव करण्यास वाव दिला. नंतर, ती आपल्या कुटुंबाला पत्र पाठवत राहिली आणि त्या पत्रांमध्ये तिला त्यांच्याबद्दल वाटणारा खरा जिव्हाळा व्यक्त करू लागली. याचा परिणाम असा झाला की, तिचे दोन थोरले भाऊ बायबलचा अभ्यास करू लागले आणि ते आज समर्पित ख्रिस्ती आहेत. तिच्या आईने आणि तिच्या धाकट्या भावानेही बायबल सत्य स्वीकारले. शेवटी, तिच्या कट्टर विरोधी वडिलांचेही मन बदलले. ही साक्षीदार मुलगी लिहिते: “आम्ही सर्वांनी सह-ख्रिश्चनांशी विवाह केला आणि सध्या आमच्या कुटुंबात एकतेने उपासना करणारे २३ जण आहेत.” प्रीतीचा केवढा मोठा विजय!
तुम्हाला खरी प्रीती विकसित करायची आहे का आणि इतरांनाही ती विकसित करण्यास मदत करायची आहे का? मग, त्या गुणाचा स्रोत असलेल्या यहोवाची मदत घ्या. होय, त्याच्या वचनाकडे कान द्या, पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा, आणि ख्रिस्ती बंधुवर्गासोबत नियमितपणे सहवास राखा. (यशया ११:९; मत्तय ५:५) लवकरच सर्व दुष्ट नाहीसे होतील आणि केवळ खरी ख्रिस्ती प्रीती आचरणारे राहतील हे जाणणे किती दिलासा देणारे आहे! खरेच, प्रीती ही आनंद आणि जीवनाचे रहस्य आहे.—स्तोत्र ३७:१०, ११; १ योहान ३:१४.
[६ पानांवरील चित्रे]
प्रार्थना आणि देवाच्या वचनाचा अभ्यास आपल्याला खरी प्रीती विकसित करण्यास मदत करील