व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गरीब घराण्यातील लोक बायबलचे भाषांतर करतात

गरीब घराण्यातील लोक बायबलचे भाषांतर करतात

गरीब घराण्यातील लोक बायबलचे भाषांतर करतात

सन १८३५ मध्ये, गवंड्याचे काम करणारा हेन्री नॉट हा इंग्रज इसम आणि किराणा मालाची नव्याने विक्री सुरू केलेला जॉन डेव्हिस हा वेल्श गृहस्थ यांनी मिळून एक मोठा प्रकल्प पूर्ण केला होता. ३० हून अधिक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ताहिती भाषेत संपूर्ण बायबलचे भाषांतर पूर्ण केले होते. गरीब घराण्यांतून आलेल्या या दोघांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आणि प्रेमापोटी केलेल्या कष्टाचे त्यांना काय फळ मिळाले?

“मोठी जागृती”

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात, मोठी जागृती किंवा फक्‍त जागृती या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या एका प्रोटेस्टंट चळवळीचे सदस्य ब्रिटनच्या गावांतल्या चौकांत आणि खाणींजवळ व कारखान्यांजवळ प्रचार करत होते. कामगार वर्गापर्यंत पोहंचणे हे त्यांचे ध्येय होते. जागृतीच्या प्रचारकांनी बायबलचे वितरण करायला आवेशाने प्रोत्साहन दिले.

या चळवळीची सुरवात करणारे बॅप्टिस्ट पंथाचे विल्यम कॅरी यांनी १७९५ साली स्थापना झालेल्या लंडन मिशनरी सोसायटीची (एलएमएस) सुरवात करण्यातही योगदान दिले होते. एलएमएस ही संस्था, तद्देशीय भाषा शिकण्याची व दक्षिण पॅसिफिक भागात मिशनरी म्हणून सेवा करण्याची इच्छा असलेल्या लोकांना प्रशिक्षण देत होती. स्थानीय लोकांना त्यांच्या भाषेत शुभवर्तमानाचा प्रचार करणे, हे या मिशनऱ्‍यांचे उद्दिष्ट होते.

अलीकडेच शोध लागलेले ताहिती बेट, एलएमएसकरता पहिले मिशनरी क्षेत्र ठरले. जागृतीच्या सदस्यांकरता ही बेटे मूर्तिपूजेची ‘अंधकारमय ठिकाणे’ होती; ती कापणीसाठी तयार असलेली शेते होती.

गरीब घराण्यातील लोक पुढे येतात

ही कापणी गोळा करण्यासाठी, घाईगडबडीने व अपुऱ्‍या तयारीसह निवडलेले सुमारे ३० मिशनरी, एलएमएसच्या मालकीच्या डफ नावाच्या जहाजात बसले. एका अहवालानुसार, “चार नियुक्‍त पादरी [औपचारिक प्रशिक्षण प्राप्त न केलेले], सहा सुतार, दोन चांभार, दोन गवंडी, दोन विणकरी, दोन शिंपी, एक दुकानदार, एक जीनगर, एक घरगडी, एक माळी, एक वैद्य, एक लोहार, पिंपे तयार करणारा एकजण, कापसाचा एक उत्पादक, टोप्या बनवणारा एक, कापडाचा एक उत्पादक, उत्तम प्रतीचे फर्निचर तयार करणारा एक, पाच पत्नी आणि तीन मुले,” हे सर्व त्या जहाजात गेले.

मूळ बायबल भाषांशी परिचित होण्याकरता या मिशनऱ्‍यांकडे केवळ ग्रीक-इंग्रजीतील एक शब्दकोश आणि इब्री शब्दकोश असलेले एक बायबल एवढीच साधने होती. सात महिन्यांच्या समुद्रप्रवासात, या मिशनऱ्‍यांनी, ताहितीला जाऊन आलेल्या आधीच्या लोकांनी (विशेषतः ज्यांनी बाउंटीविरुद्ध बंड केले होते) सांगितलेले ताहिती भाषेतील काही शब्द तोंडपाठ केले. सरतेशेवटी, डफ ताहितीला पोचले आणि मार्च ७, १७९७ रोजी मिशनऱ्‍यांनी तेथील जमिनीवर पाय ठेवले. परंतु, एका वर्षानंतर बहुतेकजण निराश होऊन पुन्हा माघारी गेले. फक्‍त सात मिशनरी मागे राहिले.

त्या सातांपैकी हेन्री नॉट हा गवंडी फक्‍त २३ वर्षांचा होता. त्याने लिहिलेल्या पहिल्या पत्रांवरून असा निष्कर्ष काढता येतो की, त्याचे केवळ मूलभूत शिक्षण झाले होते. तरीसुद्धा, अगदी सुरवातीपासून ताहिती भाषा शिकण्यात तो प्रवीण ठरला होता. तो प्रामाणिक, शांत स्वभावाचा व प्रसन्‍न होता.

१८०१ साली, नॉटला नव्याने आलेल्या नऊ मिशनऱ्‍यांना ताहिती भाषा शिकवण्यास नेमण्यात आले. त्यांच्यापैकी, जॉन डेव्हिस नावाचा २८ वर्षांचा एक वेल्श गृहस्थ होता; तो हुशार विद्यार्थी, मेहनती, शांत स्वभावाचा आणि उदार मनाचा होता. लवकरच, या दोघांनी ताहिती भाषेत बायबलचे भाषांतर करण्याचे ठरवले.

अवघड काम

परंतु, ताहिती भाषेत भाषांतर करण्याचे काम अत्यंत अवघड होते कारण तोपर्यंत ताहिती लिखित स्वरूपात नव्हती. मिशनऱ्‍यांना केवळ ऐकून ती पूर्णतः शिकावी लागली. त्यांच्याजवळ शब्दकोश नव्हता किंवा व्याकरणाचे पुस्तक नव्हते. त्या भाषेतील तोंडातून श्‍वास बाहेर टाकून काढले जाणारे आवाज व त्यांच्या अधूनमधून असलेले कंठ्य स्फोटक, त्यातले असंख्य स्वर (कधीकधी तर एकाच शब्दात पाच स्वर असतात) आणि मोजकी व्यंजने यांमुळे मिशनरी एकदम हताश झाले. “पुष्कळ शब्दांमध्ये फक्‍त स्वरच असतात, आणि प्रत्येकाचा वेगळा आवाज असतो,” असे ते दुःखाने म्हणाले. त्यांनी कबूल केले की, त्यांना “शब्दांचा ज्याप्रमाणे उच्चार केला पाहिजे तसा अचूक उच्चार कळत नव्हता.” त्यांना असेही वाटले की, जे उच्चार मुळातच नाहीत ते देखील त्यांनी ऐकले!

या समस्येत भर म्हणजे, वेळोवेळी, ताहिती भाषेतील काही शब्दांवर बंदी घातली जायची त्यामुळे ते शब्द बदलावे लागत. समानार्थी शब्द म्हणजे आणखी एक डोकेदुखी. “प्रार्थना” या शब्दाकरता ताहिती भाषेत ७० हून अधिक संज्ञा होत्या. इंग्रजीपेक्षा अगदीच वेगळी असलेली ताहिती वाक्यरचना देखील एक अडचण होती. या सर्व अडचणी असतानाही, या मिशनऱ्‍यांनी हळूहळू शब्दांची एक यादी तयार केली; याच्याच आधारे डेव्हिसने ५० वर्षांनंतर १०,००० शब्दांचा एक शब्दकोश प्रकाशित केला.

याशिवाय, ताहिती भाषेत लिहिणे हेसुद्धा कठीण होते. इंग्रजीची स्थापित लेखन पद्धती उपयोगात आणून मिशनऱ्‍यांनी ताहिती भाषा लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु, इंग्रजीतील लॅटिन मुळाक्षरांचा उपयोग ताहिती भाषेतील उच्चारांशी जुळत नव्हता. त्यामुळे, ध्वनी आणि वर्णरचना यांच्यावर अंतहीन चर्चा होत असे. बहुतेक वेळा, मिशनऱ्‍यांनी नवीन वर्णरचना केल्या कारण दक्षिण पॅसिफिकमधील तोंडी भाषा लेखी स्वरूपात उतरवणारे ते पहिलेच होते. त्यांना याची काही कल्पना नव्हती की त्यांचा हा प्रयोग दक्षिण पॅसिफिकमधील बहुतांश भाषेकरता एक नमुना ठरणार होता.

मोजकीच साधने मात्र हिकमती

भाषांतरकारांकडे फार कमी संदर्भ पुस्तके होती. एलएमएसने त्यांना सूचना दिली की, त्यांनी आधारभूत शास्त्रवचनांकरता टेक्सटस रीसेप्टस (प्राप्त शास्त्र) आणि किंग जेम्स व्हर्शन यांचा उपयोग करावा. नॉट याने हिब्रू आणि ग्रीकमधील आणखी शब्दकोश त्याचप्रमाणे दोन्ही भाषेत बायबल देखील पाठवण्यास एलएमएसकडे मागणी केली. त्याला ती पुस्तके प्राप्त झाली की नाही हे आपल्याला ठाऊक नाही. परंतु, डेव्हिसला मात्र आपल्या वेल्श मित्रांकडून काही विद्वत्तेची पुस्तके मिळाली. अहवालानुसार दिसते की, त्याच्याजवळ एक ग्रीक शब्दकोश, एक हिब्रू बायबल, ग्रीकमधील एक नवीन करार आणि एक सेप्ट्यूअजिंट एवढी पुस्तके तरी होती.

दरम्यान, मिशनऱ्‍यांना त्यांच्या प्रचारकार्याचे काही फळ मिळत नव्हते. मिशनऱ्‍यांना ताहितीमध्ये राहून १२ वर्षे झाली होती तरी एकाही स्थानीय रहिवाशाने अद्याप बाप्तिस्मा घेतला नव्हता. शेवटी, मुलकी युद्धे सतत चालू असल्यामुळे दृढनिश्‍चयी नॉटला सोडून बाकी सर्व मिशनऱ्‍यांनी ऑस्ट्रेलियाला पलायन केले. काही काळासाठी, सोसायटी द्वीपसमूहातील विंडवर्ड द्वीपांवर तो एकटाच मिशनरी होता पण राजा पोमारे दुसरा जेव्हा जवळच्या मोरेआ बेटावर पळून गेला तेव्हा त्यालाही तिकडे पळून जावे लागले.

परंतु, नॉटच्या स्थलांतराने त्याचे भाषांतराचे काम बंद पडले नाही आणि डेव्हिसने ऑस्ट्रेलियात दोन वर्षे घालवल्यावर तो पुन्हा नॉटकडे आला. या काळादरम्यान, नॉटने ग्रीक आणि हिब्रू भाषांचा अभ्यास सुरू केला होता आणि त्या दोन्ही भाषांवर त्याने प्रभुत्व मिळवले होते. परिणामस्वरूप, त्याने हिब्रू शास्त्रवचनांच्या काही भागांचे भाषांतर ताहिती भाषेत करायला सुरवात केली. त्याने बायबलमधील असे उतारे निवडले जे तेथील मूळच्या रहिवाशांना समजतील.

डेव्हिसच्या सोबत राहून नॉटने लूक शुभवर्तमानाचे भाषांतर करायला सुरवात केली जे सप्टेंबर १८१४ मध्ये पूर्ण झाले. त्याने ताहिती भाषेत स्वाभाविक वाटणारे एक भाषांतर केले आणि डेव्हिसने तो अनुवाद मूळ शास्त्रवचनांप्रमाणे अचूक आहे की नाही ते तपासले. १८१७ मध्ये, राजा पोमारे दुसरे यांनी, लूक शुभवर्तमानाचे पहिले पान स्वतः छापण्याची विनंती केली. मिशनऱ्‍यांनी मोरेआ येथे आणलेल्या हाताने चालवण्याच्या छपाई यंत्रावर राजाने ते छापले. ताहिती भाषेतील बायबलच्या अनुवादाची कहाणी तुआहीन नावाच्या एका विश्‍वासू ताहिती इसमाचा उल्लेख केल्याशिवाय अपुरी आहे; तुआहीन कित्येक वर्षे मिशनऱ्‍यांसोबत राहिला आणि त्याने त्यांना त्या भाषेतील सूक्ष्म तपशील समजून घेण्यास मदत केली.

अनुवाद पूर्ण होतो

सहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेरीस, १८१९ साली शुभवर्तमान, प्रेषितांची कृत्ये आणि स्तोत्रसंहिता यांचे भाषांतर पूर्ण झाले. नवीन मिशनऱ्‍यांनी सोबत आणलेल्या छपाई यंत्रावर छपाई आणि या बायबल पुस्तकांचे वितरण करण्याचे काम सुलभतेने पार पाडण्यात आले.

त्यानंतर, काही काळासाठी भाषांतर, मुद्रितशोधन आणि सुधारणा या कामांचा जोर वाढला. ताहितीमध्ये २८ वर्षे राहिल्यावर नॉट १८२५ साली आजारी पडला आणि एलएमएसने त्याला जहाजाने इंग्लंडला परतण्याची परवानगी दिली. आनंदाची गोष्ट म्हणजे, तोपर्यंत ग्रीक शास्त्रवचनांचे भाषांतर जवळजवळ पूर्ण झाले होते. इंग्लंडला परतीचा प्रवास करत असताना व तेथील मुक्कामाच्या दरम्यान त्याने बायबलच्या उर्वरित भाषांतराचे काम चालू ठेवले. नॉट १८२७ साली ताहितीला परतला. आठ वर्षांनंतर म्हणजे १८३५ साली, त्याने भाषांतराचे काम बंद केले. ३० हून अधिक वर्षांच्या कष्टानंतर संपूर्ण बायबलचे भाषांतर झाले होते.

ताहिती भाषेतील संपूर्ण बायबलची लंडन येथे छपाई करण्यासाठी १८३६ साली नॉट पुन्हा एकदा इंग्लंडला गेला. जून ८, १८३८ रोजी, हर्षभरीत नॉटने, ताहिती भाषेतील बायबलची पहिली छापील आवृत्ती राणी व्हिक्टोरियाला सादर केली. एकेकाळी जो गवंडी होता व ज्याने हे जिकीरीचे व दीर्घकाळाचे काम पूर्ण करण्यासाठी ४० वर्षांआधी डफ जहाजाने ताहितीला प्रवास करून तेथील संस्कृतीत स्वतःला समरूप करून घेतले होते त्याच्याकरता साहजिकच हा क्षण अत्यंत भावस्पर्शी होता.

दोन महिन्यांनंतर, ताहिती भाषेतील संपूर्ण बायबलच्या पहिल्या ३,००० प्रती असलेल्या २७ पेट्या घेऊन नॉट पुन्हा दक्षिण पॅसिफिकला रवाना झाला. सिडनी येथे मुक्काम केल्यानंतर तो पुन्हा एकदा आजारी पडला, परंतु त्या मौल्यवान पेट्या सोडून जाण्यास त्याने नकार दिला. आजारातून बरा झाल्यावर तो १८४० साली ताहितीला पोहंचला तेव्हा ताहिती भाषेतील बायबलच्या प्रती प्राप्त करण्यासाठी तेथील लोकांनी त्याचे सामान अक्षरशः लुटले. वयाच्या ७० व्या वर्षी, मे १८४४ साली नॉटचा ताहितीमध्ये अंत झाला.

व्यापक परिणाम

नॉटच्या साहित्याचा मात्र अंत झाला नाही. पॉलिनेशियन भाषांवर त्याच्या भाषांतराचा व्यापक परिणाम झाला. ताहिती भाषेला लेखी स्वरूप देऊन मिशनऱ्‍यांनी ती भाषा जपवली. एका लेखकाने म्हटले: “नॉटने प्रमाणभूत व्याकरणाची ताहिती भाषा स्थापित केली. शुद्ध ताहिती भाषा शिकून घेण्यासाठी बायबलचा उपयोग करण्याची नेहमी आवश्‍यकता भासेल.” या भाषांतरकारांच्या अथक प्रयत्नांमुळे हजारो शब्द लोप पावण्यापासून वाचले. एका शतकानंतर, एका लेखकाने म्हटले: “नॉटचे उल्लेखनीय ताहिती भाषेतील बायबल ताहिती भाषेतले उत्कृष्ट साहित्य आहे—सर्वजण याजशी सहमत आहेत.”

या महत्त्वाच्या साहित्याचा केवळ ताहिती लोकांना फायदा झाला नाही तर दक्षिण पॅसिफिक भाषांच्या इतर अनुवादांकरता तो एक पाया ठरला. उदाहरणार्थ, कुक आणि सामोआ बेटांवरील अनुवादकांनी त्याचा नमुनेदाखल उपयोग केला. एका अनुवादकाने म्हटले, “मी प्रामुख्याने मि. नॉट यांच्या भाषांतराचा नमुना अनुसरला आहे; त्यांच्या भाषांतराची मी काळजीपूर्वक तपासणी केली आहे.” असे म्हटले जाते की, आणखी एका भाषांतरकाराने ‘सामोअन भाषेत दावीदाच्या एका स्तोत्राचा अनुवाद करत असताना स्तोत्रसंहितेच्या पुस्तकाचे हिब्रू, इंग्रजी आणि ताहिती भाषेतील अनुवाद’ आपल्यासमोर ठेवले होते.

इंग्लंडमधील जागृती या पंथाच्या सदस्यांना अनुसरून ताहितीमधील मिशनऱ्‍यांनी साक्षरतेला आवेशपूर्ण प्रोत्साहन दिले. किंबहुना, एका शतकाहून अधिक काळापर्यंत ताहिती लोकांना उपलब्ध असलेले बायबल हे एकमेव पुस्तक होते. त्यामुळे ताहिती संस्कृतीचा ते एक अविभाज्य भाग बनले.

हिब्रू आणि ग्रीक शास्त्रवचनांतील ईश्‍वरी नावाचा मोठ्या प्रमाणातील वापर हे नॉट भाषांतराचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. परिणामतः, ताहिती आणि त्यातील बेटांमध्ये यहोवाचे नाव आज सर्वज्ञात आहे. काही प्रोटेस्टंट चर्चेसवरही ते पाहायला मिळते. परंतु, सध्या देवाच्या नावाचा संबंध यहोवाच्या साक्षीदारांशी व त्यांच्या आवेशी प्रचार कार्याशी लावला जात असून या कार्यात ते नॉट व त्याच्या सहकाऱ्‍यांनी भाषांतर केलेल्या ताहिती भाषेतील बायबलचा प्रचंड प्रमाणात वापर करतात. हेन्री नॉटसारख्या अनुवादकांनी घेतलेले श्रम आपल्याला याची आठवण करून देतात की, मानवजातीतील बहुतेकांजवळ आज देवाचे वचन उपलब्ध असल्यामुळे आपण कृतज्ञ असले पाहिजे.

[२६ पानांवरील चित्रे]

ताहिती भाषेतील पहिली भाषांतरे, १८१५. यहोवाचे नाव वापरण्यात आले

हेन्री नॉट (१७७४-१८४४), ताहिती भाषेतील बायबलचा प्रमुख भाषांतरकार

[चित्राचे श्रेय]

ताहिती बायबल: Copyright the British Library (३०७०.a.३२); हेन्री नॉट आणि पत्र: Collection du Musée de Tahiti et de ses Îles, Punauia, Tahiti; कॅटेकिझम: With permission of the London Missionary Society Papers, Alexander Turnbull Library, Wellington, New Zealand

[२८ पानांवरील चित्र]

सन १८०१ चे ताहिती आणि वेल्श द्विभाषीय प्रश्‍नोत्तरावली, ज्यात देवाचे नाव वापरण्यात आले

[चित्राचे श्रेय]

With permission of the London Missionary Society Papers, Alexander Turnbull Library, Wellington, New Zealand

[२९ पानांवरील चित्र]

फ्रेंच पॉलिनेशियातील वाहिनी बेटावर यहोवाचे नाव समोरच्या बाजूला असलेले एक प्रोटेस्टंट चर्च

[चित्राचे श्रेय]

Avec la permission du Pasteur Teoroi Firipa