व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देव प्रीति आहे”

“देव प्रीति आहे”

“देव प्रीति आहे”

“जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे.”—१ योहान ४:८.

१-३. (अ) यहोवाच्या प्रीतीविषयी बायबल कोणते विधान करते आणि हे विधान कशाप्रकारे खास आहे? (ब) “देव प्रीति आहे” असे बायबल का म्हणते?

यहोवाचे सर्व गुण अतिशय श्रेष्ठ, परिपूर्ण व मनमोहक आहेत. पण यहोवावर प्रेम करण्यास प्रेरित करणारा सर्वात प्रमुख गुण म्हणजे त्याची प्रीती. दुसरा कोणताही गुण आपल्याला यहोवाकडे इतक्या उत्कटतेने आकर्षित करत नाही. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हाच त्याचा सर्वात प्रमुख गुण आहे. हे आपल्याला कसे कळते?

बायबलमध्ये यहोवाच्या प्रीतीबद्दल एक असे विधान आढळते जे त्याच्या प्रमुख गुणांपैकी इतर कोणत्याही गुणाविषयी केलेले नाही. शास्त्रवचनांत असे कोठेही म्हटलेले नाही की देव सामर्थ्य आहे किंवा देव न्याय आहे किंवा देव बुद्धी आहे. तो हे गुण बाळगतो आणि या गुणांचा तो मूळ स्रोत आहे. पण प्रीतीविषयी १ योहान ४:८ येथे आणखी गहन असे काहीतरी सांगितले आहे: “देव प्रीति आहे.” (तिरपे वळण आमचे.) प्रीती यहोवाच्या व्यक्‍तिमत्त्वात भिनलेली आहे. प्रीती त्याचा स्वभावगुण आहे. याविषयी आपण अशाप्रकारे विचार करू शकतो: यहोवाचे सामर्थ्य त्याला कार्य करण्यास समर्थ करते. त्याचा न्याय व त्याची बुद्धी त्याच्या कृतींना मार्गदर्शित करतात. पण यहोवाची प्रीति त्याला कार्य करण्यास प्रेरित करते. आणि त्याचे इतर गुण तो ज्याप्रकारे उपयोगात आणतो त्यातूनही नेहमी त्याची प्रीती व्यक्‍त होते.

सहसा असे म्हटले जाते की यहोवा प्रीतीचे सचेतन रूप आहे. त्यामुळे प्रीतीविषयी शिकण्यासाठी आपण प्रथम यहोवाविषयी शिकले पाहिजे. यहोवाच्या अद्वितीय प्रीतीच्या काही पैलूंचे आपण परीक्षण करू या.

प्रीतीची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍ती

४, ५. (अ) सबंध इतिहासातली प्रीतीची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍ती कोणती आहे? (ब) आजपर्यंत कधीही जोडण्यात आले नसेल इतके मजबूत प्रीतीचे बंधन यहोवा व त्याचा पुत्र यांच्यात आहे असे आपण का म्हणू शकतो?

यहोवाने अनेक मार्गांनी आपली प्रीती व्यक्‍त केली आहे पण त्याच्या प्रीतीची एक अभिव्यक्‍ती इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. ती कोणती? स्वतःच्या पुत्राला आपल्याकरता दुःख भोगून मरण्याकरता पाठवणे. सबंध इतिहासात यापेक्षा अधिक प्रीती कोणीही कधीही दाखवली नाही असे म्हटल्यास ती अतिशयोक्‍ती ठरणार नाही. असे आपण का म्हणू शकतो?

बायबल येशूला “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असे म्हणते. (कलस्सैकर १:१५) जरा विचार करा—यहोवाचा पुत्र भौतिक विश्‍व निर्माण करण्याच्याही आधीपासून अस्तित्वात होता. मग पिता व पुत्र किती काळ अस्तित्वात होते? काही शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार विश्‍व हे १,३०० कोटी वर्षांपासून अस्तित्वात आहे. हा अंदाज बरोबर असला तरीसुद्धा यहोवाच्या ज्येष्ठ पुत्राच्या जीवन काळापेक्षा हा काळ कमीच आहे! या सर्व युगांत तो काय करत होता? हा पुत्र आपल्या पित्याचा “कुशल कारागीर” म्हणून आनंदाने सेवा करत होता. (नीतिसूत्रे ८:३०; योहान १:३) यहोवा व त्याच्या पुत्राने इतर सर्व गोष्टी अस्तित्वात आणण्याकरता एकत्र मिळून कार्य केले. त्यांचे जीवन खरोखर किती आनंददायक होते! इतक्या अमर्याद काळापासून अस्तित्वात असलेले बंधन खरोखर किती घनिष्ट असेल याची कल्पना तरी आपण करू शकतो का? साहजिकच यहोवा देव व त्याचा पुत्र यांच्यात, आजपर्यंत कधीही जोडण्यात आले नसेल इतके मजबूत प्रीतीचे बंधन आहे.

६. येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा यहोवाने आपल्या पुत्राविषयीच्या भावना कशाप्रकारे व्यक्‍त केल्या?

पण यहोवाने आपल्या पुत्राला एका मानवी बालकाच्या रूपात जन्माला येण्याकरता पाठवले. यामुळे काही दशकांपर्यंत यहोवाला आपल्या परमप्रिय पुत्रासोबतचा स्वर्गातील निकट सहवास त्यागावा लागला. पृथ्वीवर येशूची वाढ होऊन तो एक परिपूर्ण पुरुष बनत असताना यहोवा स्वर्गातून अतिशय उत्सुकतेने पाहत होता. वयाच्या सुमारे ३० व्या वर्षी येशूचा बाप्तिस्मा झाला. त्या प्रसंगी पिता स्वतः स्वर्गातून बोलला: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्‍याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्तय ३:१७) येशूने त्याच्याविषयी भाकीत केलेल्या व त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी विश्‍वासूपणे पूर्ण केल्या हे पाहून त्याच्या पित्याला किती आनंद झाला असावा!—योहान ५:३६; १७:४.

७, ८. (अ) सा.यु. ३३ साली निसान १४ रोजी येशूला काय सहन करावे लागले आणि त्याच्या स्वर्गीय पित्यावर याचा काय परिणाम झाला? (ब) यहोवाने आपल्या पुत्राला दुःख सहन करून का मरू दिले?

पण सा.यु. ३३ साली निसान १४ रोजी येशूचा विश्‍वासघात करण्यात आला आणि एका क्रोधित जमावाने त्याला अटक केली तेव्हा यहोवाला कसे वाटले असावे? त्याची निंदानालस्ती करण्यात आली, त्याच्यावर लोक थुंकले, त्याला बुक्क्यांनी मारले; त्याला कोडे मारून त्याच्या पाठीच्या चिंधड्या करण्यात आल्या; त्याच्या हातापायांवर खिळे ठोकून एका लाकडी खांबावर लटकत ठेवण्यात आले व त्या स्थितीत येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांनी त्याची थट्टा केली तेव्हा यहोवाच्या मनाची काय स्थिती झाली असेल? आपला परमप्रिय पुत्र असहाय वेदनेने ओरडून आपल्याकडे मदतीची याचना करत आहे हे पाहून त्या पित्याला काय वाटले असावे? येशूने शेवटचा श्‍वास घेतला आणि सर्व सृष्टीच्या आरंभापासून पहिल्यांदा यहोवाचा प्रिय पुत्र काहीकाळ अस्तित्वात नव्हता, तेव्हा यहोवाच्या काय भावना असतील?—मत्तय २६:१४-१६, ४६, ४७, ५६, ५९, ६७; २७:२६, ३८-४४, ४६; योहान १९:१.

यहोवाला भावना आहेत, त्यामुळे आपल्या पुत्राच्या मृत्यूमुळे त्याला किती दुःख झाले असावे हे शब्दांत व्यक्‍त करणे अशक्य आहे. पण असे घडू देण्यामागचा यहोवाचा उद्देश मात्र शब्दांत व्यक्‍त केला जाऊ शकतो. पित्याने इतके दुःख का सहन केले? याविषयी योहान ३:१६ या वचनात यहोवा एक अद्‌भुत सत्य प्रकट करतो—हे बायबल वचन इतके महत्त्वाचे आहे की या एका वचनाला संक्षिप्त शुभवर्तमान म्हणण्यात आले आहे. ते म्हणते: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” तेव्हा, देवाचा उद्देश इतकाच होता: प्रीती. यापेक्षा अधिक प्रीती कधीही व्यक्‍त करण्यात आली नाही.

यहोवा आपल्याला त्याच्या प्रीतीचे आश्‍वासन देतो

९. यहोवाच्या आपल्याविषयीच्या दृष्टीकोनाबद्दल आपण कसा विचार करावा अशी सैतानाची इच्छा आहे पण यहोवा आपल्याला कशाचे आश्‍वासन देतो?

पण एक महत्त्वाचा प्रश्‍न उपस्थित होतो: देव व्यक्‍तिशः आपल्यावर प्रेम करतो का? काहीजण योहान ३:१६ यात सांगितल्याप्रमाणे हे मानतात की देवाने सर्वसामान्य मानवजातीवर प्रेम केले. पण त्यांना असे वाटते, की ‘देव व्यक्‍तिशः माझ्यावर कधी प्रेम करू शकत नाही.’ खरे पाहता, दियाबल सैतान आपल्याला असा विचार करायला भाग पाडण्यास उत्सुक आहे की यहोवा आपल्यावर प्रेम करत नाही किंवा त्याला आपली किंमत नाही. पण, आपण प्रेम करण्यालायक नाही किंवा आपण अगदी कवडीमोल आहोत असे आपल्याला कितीही वाटले तरीसुद्धा, यहोवा आपल्याला आश्‍वासन देतो की त्याच्या विश्‍वासू सेवकांपैकी प्रत्येकजण त्याच्या लेखी बहुमोल आहे.

१०, ११. येशूचा चिमण्यांचा दृष्टान्त कशाप्रकारे दाखवतो की यहोवाच्या नजरेत आपले मोल आहे?

१० उदाहरणार्थ, मत्तय १०:२९-३१ येथे लिहिलेले येशूचे शब्द विचारात घ्या. आपल्या शिष्यांचे मोल उदाहरणासहित स्पष्ट करण्याकरता येशूने म्हटले: “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यांतून एकहि भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.” येशूच्या पहिल्या शतकातील श्रोत्यांकरता हे शब्द किती अर्थपूर्ण होते याकडे लक्ष द्या.

११ येशूच्या काळात, खाद्य म्हणून उपयोगात आणल्या जाणाऱ्‍या पक्ष्यांपैकी चिमणी सर्वात स्वस्त होती. अगदी कमी मोलाच्या, एका दमडीला दोन चिमण्या विकत घेता येत होत्या. पण येशूने नंतर, लूक १२:६, ७ यात सांगितल्यानुसार असे म्हटले की एखाद्याने दोन दमड्या दिल्या तर चार नव्हे तर पाच चिमण्या मिळतात. चार चिमण्यांसोबत ती पाचवी चिमणी अशीच दिली जात होती, जणू तिची काहीच किंमत नव्हती. कदाचित मनुष्याच्या नजरेत हे पक्षी कवडीमोल होते, पण निर्माणकर्ता त्यांना कसे लेखतो? येशूने म्हटले: “त्यांपैकी एकीचाहि [जादा दिलेल्या चिमणीचाही] देवाला विसर पडत नाही.” आता आपल्याला येशूचा मुद्दा आणखी स्पष्टपणे कळतो. एका लहानशा चिमणीचे यहोवाच्या नजरेत इतके मोल आहे तर मग एका मानवाचे मोल किती आहे! येशूने सांगितल्याप्रमाणे, यहोवाला आपल्याविषयी सर्व बारीकसारीक गोष्टी माहीत आहेत. इतकेच काय, आपल्या डोक्यावरील केस देखील मोजलेले आहेत!

१२. येशूने आपल्या डोक्यावरील केस मोजलेले आहेत असे म्हटले तेव्हा तो अतिशयोक्‍ती करत नव्हता हे आपण खात्रीने कसे म्हणू शकतो?

१२ काहीजण कदाचित म्हणतील की येशू येथे अतिशयोक्‍ती करत होता. पण पुनरुत्थानाविषयी जरा विचार करा. आपल्याला पुन्हा एकदा निर्माण करण्याकरता यहोवाला आपल्याला किती जवळून ओळखणे आवश्‍यक आहे! तो आपल्याला अतिशय मोलवान समजत असल्यामुळेच आपल्याविषयी तो प्रत्येक बारीकसारीक गोष्ट, आपली गुंतागुंतीची जननशास्त्रीय तपशीले आणि इतक्या वर्षांदरम्यान आपल्या सर्व स्मृती व अनुभव त्याला आठवणीत राहतात. त्यामानाने आपले केस, जे सर्वसामान्य मनुष्याच्या डोक्यावर जवळजवळ १,००,००० असतात ते मोजणे देवाकरता मुळीच कठीण नाही. यहोवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे याविषयी येशूचे शब्द आपल्याला किती सुरेखपणे आश्‍वासन देतात!

१३. राजा यहोशाफाटाच्या उदाहरणावरून कशाप्रकारे दिसून येते की आपण अपरिपूर्ण असूनही देव आपल्या चांगल्या गुणांकडे पाहतो?

१३ बायबल आपल्याला आणखी काहीतरी सांगते जे आपल्याला यहोवाच्या प्रेमाचे आश्‍वासन देते. तो आपल्या चांगल्या गुणांकडे पाहतो आणि त्यांची कदर करतो. चांगला राजा यहोशाफाट याचे उदाहरण घ्या. राजा यहोशाफाटाने एक मूर्खतेचे कृत्य केले तेव्हा यहोवाच्या संदेष्ट्याने त्याला सांगितले: “परमेश्‍वराचा तुजवर कोप भडकला आहे.” किती चिंतादायक विचार! पण यहोवाचा संदेश येथे संपला नाही. पुढे राजाला असे सांगण्यात आले: “तथापि तुझ्या ठायी काही चांगल्या गोष्टी दिसून आल्या आहेत.” (२ इतिहास १९:१-३) आपल्या नीतिमान क्रोधामुळे यहोवाने यहोशाफाटाच्या “चांगल्या गोष्टी” दृष्टिआड केल्या नाहीत. आपण अपरिपूर्ण असूनही देव आपल्या चांगल्या गुणांकडे पाहतो हे जाणून आपल्याला दिलासा मिळत नाही का?

“क्षमाशील” देव

१४. आपण पाप करतो तेव्हा कशाप्रकारच्या भावना कदाचित आपल्याला सतावतील पण आपण यहोवाच्या क्षमेपासून कसा फायदा मिळवू शकतो?

१४ पाप केल्यानंतर वाटणारी निराशा, लाज व दोषभावना यांमुळे कदाचित आपण असा विचार करण्यास प्रवृत्त होऊ की आपण कधीही यहोवाची सेवा करण्यास लायक बनू शकत नाही. पण यहोवा “क्षमाशील” आहे हे लक्षात ठेवा. (स्तोत्र ८६:५) होय, आपण आपल्या पापांविषयी पश्‍चात्ताप केला व पुन्हा ते न करण्याकरता यत्न केला तर आपल्यालाही यहोवाची क्षमा मिळू शकते. यहोवाच्या प्रीतीच्या या अद्‌भुत पैलूचे बायबल कसे वर्णन करते हे विचारात घ्या.

१५. यहोवा आपले पाप आपल्यापासून किती दूर करतो?

१५ स्तोत्रकर्त्या दाविदाने यहोवाच्या क्षमेचे सचित्र वर्णन केले: “पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.” (तिरपे वळण आमचे; स्तोत्र १०३:१२) पूर्व पश्‍चिमेपासून किती दूर आहे? पूर्व ही नेहमी पश्‍चिमेपासून सर्वाधिक अंतरावर असते, पूर्व व पश्‍चिम ही दोन टोके कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. एका विद्वानाने म्हटले की या शब्दप्रयोगाचा अर्थ, “शक्य होईल तितक्या दूर; आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतक्या दूर” असा होतो. दाविदाच्या प्रेरित शब्दांवरून आपल्याला कळते की यहोवा क्षमा करतो तेव्हा तो आपले पाप, कल्पनाही करता येणार नाही इतक्या दूर करतो.

१६. यहोवा आपल्या पातकांची क्षमा करतो त्यानंतर तो आपल्याला शुद्ध लेखतो याची आपण खात्री का बाळगू शकतो?

१६ तुम्ही कधी एखाद्या फिक्या रंगाच्या कापडाला लागलेला डाग काढण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा डाग पूर्णपणे निघत नाही. यहोवा कितपत क्षमा करू शकतो याविषयी तो कशाप्रकारे वर्णन करतो ते पाहा: “तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.” (तिरपे वळण आमचे; यशया १:१८) “लाखेसारखी लाल” याचा अर्थ अगदी भडक लाल रंग. * “किरमिजी” हा रंगवलेल्या कापडांपैकी अतिशय गाढा रंग होता. आपण स्वतःच्या प्रयत्नांनी कधीही पापाचा डाग काढू शकत नाही. पण लाल किंवा किरमिजी रंगाप्रमाणे असलेली पातके देखील यहोवा बर्फासारखी किंवा न रंगवलेल्या शुभ्र लोकरीसारखी बनवू शकतो. त्याअर्थी यहोवा आपल्या पातकांची क्षमा करतो तेव्हा आपण असे समजू नये की अशा पापांचे डाग आपल्यावर आयुष्यभर राहतील.

१७. यहोवा कोणत्या अर्थाने आपली पातके त्याच्या पाठीमागे टाकतो?

१७ हिज्कियाला एका जीवघेण्या आजारपणातून यहोवाने वाचवल्यानंतर त्याने उपकारस्तुतीचे एक हृदयस्पर्शी गीत लिहिले व त्यात त्याने यहोवाला म्हटले: “तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकिली आहेत.” (तिरपे वळण आमचे; यशया ३८:१७) येथे काहीसे असे चित्र रेखाटले आहे, की यहोवा एका पश्‍चात्तापी पातक्याची पापे आपल्या पाठीमागे टाकतो जेथे त्याला ती दिसत नाहीत आणि तो पुन्हा त्यांच्याविषयी विचारही करत नाही. एका संदर्भ ग्रंथानुसार यातून व्यक्‍त होणारा विचार पुढील शब्दांत मांडता येतो: “तू माझी पातके, जणू ती घडलीच नाही असे केले आहे.” हे जाणून सांत्वन मिळत नाही का?

१८. यहोवा क्षमा करतो तेव्हा तो आपली पापे कायमची काढून टाकतो हे संदेष्टा मीखा याने कशाप्रकारे दाखवले?

१८ पुनर्स्थापनेच्या प्रतिज्ञेत संदेष्टा मीखा याने असा विश्‍वास व्यक्‍त केला की यहोवा त्याच्या पश्‍चात्तापी लोकांना क्षमा करेल, त्याने म्हटले: “तुजसमान देव कोण आहे? . . . आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकितोस; . . . तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहांत टाकिशील.” (तिरपे वळण आमचे; मीखा ७:१८, १९) बायबल काळात जगणाऱ्‍या लोकांकरता या शब्दांचा काय अर्थ होता याचा जरा विचार करा. “समुद्राच्या डोहात” फेकलेली कोणतीही वस्तू पुन्हा मिळवण्याची शक्यता होती का? अशारितीने मीखाचे शब्द दाखवतात की आपल्या पापांची यहोवा क्षमा करतो तेव्हा तो ती कायमची काढून टाकतो.

“आपल्या देवाची करुणा”

१९, २०. (अ) “दया दाखवणे” किंवा “कळवळा येणे” असे भाषांतर केलेल्या इब्री क्रियापदाचा काय अर्थ होतो? (ब) बायबलमध्ये एका आईला आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांचा उपयोग करून यहोवाच्या करुणेविषयी काय शिकवण्यात आले आहे?

१९ करुणा हा यहोवाच्या प्रेमाचा आणखी एक पैलू आहे. करुणा म्हणजे काय? बायबलमध्ये करुणा व दया यांच्यात जवळचा संबंध आहे. अनेक इब्री व ग्रीक शब्द करुणा या शब्दाचा अर्थ ध्वनित करतात. उदाहरणार्थ, रखाम या इब्री शब्दाचे अनेकदा “दया दाखवणे” किंवा “कळवळा येणे” असे भाषांतर केले जाते. हा इब्री शब्द जो यहोवा आपल्याकरता वापरतो, तो “उदर” या शब्दाशी संबंधित असून त्याचे “ममत्व” असेही भाषांतर केले जाऊ शकते.

२० एका आईला आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांचा उपयोग करून बायबल आपल्याला यहोवाच्या करुणेविषयी शिकवते. यशया ४९:१५ म्हणते: “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा [रखाम] येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.” एक आई आपल्या बाळाला दूध पाजायला किंवा त्याची काळजी घ्यायला विसरेल अशी कल्पनाही आपण करू शकत नाही. काही झाले तरी, एक बाळ असहाय असते; त्याला रात्रंदिवस आपल्या आईची गरज असते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, कधीकधी आया देखील आपल्या बाळकांकडे दुर्लक्ष करतात; खासकरून या शेवटल्या ‘कठीण दिवसांत’ अशा घटना बऱ्‍याचदा ऐकायला मिळतात. (२ तीमथ्य ३:१,) पण यहोवा म्हणतो, “मी तुला विसरणार नाही.” यहोवाला आपल्या सेवकांविषयी वाटणारी कोमल करुणा आपण ज्याची कल्पना करू शकतो अशा सर्वात कोमल नैसर्गिक भावनेपेक्षा—अर्थात, एका आईला आपल्या लहान बाळाबद्दल वाटणाऱ्‍या स्वाभाविक करुणेपेक्षाही जास्त उत्कट आहे.

२१, २२. प्राचीन ईजिप्तमध्ये इस्राएल लोकांना काय अनुभव आला आणि यहोवाने त्यांच्या आक्रोशाला कसा प्रतिसाद दिला?

२१ यहोवा कशाप्रकारे एका प्रेमळ पालकाप्रमाणे करुणा दाखवतो? त्याने प्राचीन इस्राएलसोबत केलेल्या व्यवहारांतून हा गुण स्पष्टपणे पाहायला मिळतो. सा.यु.पू. १६ व्या शतकाच्या समाप्तीपर्यंत लाखो इस्राएली लोक ईजिप्तमध्ये गुलाम बनले होते आणि येथे त्यांचा भयंकर जाच केला जात होता. (निर्गम १:११, १४) या अत्याचारामुळे दुःखी होऊन इस्राएलांनी यहोवाकडे मदतीची याचना केली. करुणामय यहोवा देवाने कसा प्रतिसाद दिला?

२२ यहोवाचे अंतःकरण पिळवटले. तो म्हणाला: “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ति मी खरोखर पाहिली आहे; . . . त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे.” (निर्गम ३:७) आपल्या लोकांवर होणारा अत्याचार पाहून व त्यांचा आक्रोश ऐकून यहोवाला त्यांच्याविषयी काहीही न वाटणे यहोवाकरता अशक्य होते. यहोवा एक सहानुभूतीशील देव आहे. आणि सहानुभूती, अर्थात इतरांचे दुःख समजून घेण्याची शक्‍ती करुणेशी निगडित आहे. पण यहोवाला आपल्या लोकांकरता करुणा केवळ वाटली नाही तर त्याने त्यांच्याकरता कार्य केले. यशया ६३:९ सांगते की “त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांस उद्धरिले.” ‘पराक्रमी हाताने’ त्याने इस्राएलांना ईजिप्तमधून सोडवले. (अनुवाद ४:३४) त्यानंतर त्याने त्यांना चमत्कारिकरित्या अन्‍न पुरवले आणि त्यांचा स्वतःचा म्हणता येईल अशा सुपीक देशात त्यांना नेले.

२३. (अ) स्तोत्रकर्त्याचे शब्द आपल्याला कशाप्रकारे आश्‍वासन देतात की यहोवाला व्यक्‍तिशः आपल्याविषयी काळजी वाटते? (ब) यहोवा कोणत्या मार्गांनी आपल्याला मदत करतो?

२३ यहोवाने केवळ एक समूह या नात्याने आपल्याप्रती करुणा दाखवली नाही. आपला प्रेमळ पिता आपल्यात व्यक्‍तिशः आस्था बाळगतो. आपल्याला सहन कराव्या लागणाऱ्‍या कोणत्याही दुःखाविषयी त्याला जाणीव आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो: “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१५, १८) यहोवा व्यक्‍तिशः आपल्याला कशी मदत करतो? तो नेहमीच आपल्या दुःखाला कारणीभूत ठरणारी गोष्ट काढून टाकत नाही. पण त्याच्याकडे मदतीची याचना करणाऱ्‍यांसाठी त्याने विपुल प्रमाणात तरतुदी केल्या आहेत. त्याचे वचन व्यावहारिक मार्गदर्शन पुरवते जे खरोखर मदतदायी ठरू शकते. मंडळीत तो आध्यात्मिक योग्यता असलेले पर्यवेक्षक पुरवतो जे त्याच्या करुणेचे अनुकरण करून इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. (याकोब ५:१४, १५) ‘प्रार्थना ऐकणारा’ या नात्याने यहोवा ‘जे मागतात त्यांस पवित्र आत्मा’ देतो. (स्तोत्र ६५:२; लूक ११:१३) या सर्व तरतुदी ‘आपल्या देवाच्या परम दयेच्या’ अभिव्यक्‍ती आहेत.—लूक १:७८.

२४. तुम्ही यहोवाच्या प्रेमाला कशाप्रकारे प्रतिसाद द्याल?

२४ आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमाविषयी विचार करणे आनंददायक नाही का? याआधीच्या लेखात, आपल्याला आठवण करून देण्यात आली होती की यहोवाने आपले सामर्थ्य, न्यायीपण आणि बुद्धी यांचा उपयोग प्रेमळ मार्गांनी आपल्या हिताकरता केला आहे. आणि या लेखात, आपण पाहिले की यहोवाने थेटपणे मानवजातीकरता—आणि व्यक्‍तिशः आपल्याकरताही अतिशय उल्लेखनीय मार्गांनी प्रीती व्यक्‍त केली आहे. आता आपण प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, ‘मी यहोवाच्या प्रेमाला कसा प्रतिसाद देईन?’ तुम्ही आपल्या पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने व शक्‍तीने त्याच्यावर प्रेम करण्याद्वारे प्रतिसाद द्यावा हीच आमची प्रार्थना आहे. (मार्क १२:२९, ३०) दररोज तुम्ही ज्याप्रकारे जीवन व्यतीत करता त्यावरून सदोदित यहोवाच्या जवळ जाण्याची तुमची मनस्वी इच्छा प्रदर्शित होवो. आणि यहोवा देव जो प्रीती आहे तो सर्वकाळापर्यंत दिवसेंदिवस तुमच्या जवळ येत राहो!—याकोब ४:८.

[तळटीप]

^ परि. 16 एका विद्वानानुसार लाखेसारखा लाल रंग हा “एक पक्का रंग होता. दव, पावसाचे पाणी यांमुळे किंवा धुतल्यामुळे अथवा कापड जुने झाल्यामुळे हा रंग जात नसे.”

तुम्हाला आठवते का?

प्रीती हा यहोवाचा सर्वात प्रमुख गुण आहे हे आपल्याला कसे कळते?

यहोवाने आपल्या पुत्राला दुःख सहन करून आपल्याकरता मरण्यासाठी पाठवले ही इतिहासातली प्रीतीची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्‍ती आहे असे का म्हणता येते?

यहोवा आपल्यावर व्यक्‍तिशः प्रेम करतो याचे तो कशाप्रकारे आश्‍वासन देतो?

बायबलमध्ये यहोवाच्या क्षमाशीलतेविषयी कशाप्रकारे स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

“देवाने . . . आपला एकुलता एक पुत्र दिला”

[१६ पानांवरील चित्र]

“पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे”

[चित्राचे श्रेय]

© J. Heidecker/VIREO

[१८ पानांवरील चित्र]

आईला तिच्या बाळाकरता असलेल्या भावना आपल्याला यहोवाच्या करुणेविषयी शिकवतात