व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेम अनिवार्य आहे

प्रेम अनिवार्य आहे

प्रेम अनिवार्य आहे

कोणत्याही वयोगटाच्या, संस्कृतीच्या किंवा जातीच्या मानवांना प्रेमाची गरज असते. ती गरज पूर्ण झाली नाही तर ते आनंदी नसतात. एका वैद्यकीय संशोधकाने लिहिले: “आपल्या आजारपणाला आणि सुदृढतेला, निराशेला आणि आनंदाला, दुखण्याला आणि बरे होण्याला कारणीभूत ठरणारे प्रेम व जिव्हाळा हे मूलभूत घटक आहेत. एखाद्या नवीन औषधाचा हाच परिणाम होत असेल तर त्या देशातील जवळजवळ प्रत्येक डॉक्टर ते औषध घेण्यास रुग्णांना सांगेल. त्याविषयी कोणाला न सांगणे हे चुकीचे ठरेल.”

तथापि, आधुनिक समाज, खासकरून प्रसार माध्यमे आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले लोक सहसा प्रेमळ, जिव्हाळ्याच्या नातेसंबंधांच्या मानवी गरजेवर भर देण्याऐवजी संपत्ती, सत्ता, प्रसिद्धी आणि सेक्स यांवर जास्त भर देतात. शैक्षणिक क्षेत्रातले लोक ऐहिक ध्येये आणि कारकीर्द यांवर जोर देतात आणि त्या गोष्टींच्या आधारे एखाद्याचा यशस्वीपणा ठरवतात. शिक्षण आणि कौशल्यांचा विकास करणे आवश्‍यक आहे हे खरे असले तरी, त्यांच्या मागे इतके लागावे का, की कुटुंबासाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी वेळच उरणार नाही? मानवी स्वभावाचे जवळून परीक्षण करणाऱ्‍या एका शिक्षित प्राचीन लेखकाने कर्तबगार परंतु प्रेमळ नसलेल्या व्यक्‍तीची तुलना “वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज” याजशी केली. (१ करिंथकर १३:१) असे लोक सुसंपन्‍न होतात, प्रसिद्धी देखील गाठतात पण ते खऱ्‍या अर्थाने सुखी नसतात.

मानवांना गहिरेपणाने समजून घेणाऱ्‍या व त्यांच्याबद्दल खास प्रीती बाळगणाऱ्‍या येशू ख्रिस्ताने देवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याला आपल्या शिकवणुकीत सर्वाधिक महत्त्व दिले. त्याने म्हटले: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर. . . . तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३७-३९) या शब्दांचे काटेकोर पालन करणारेच केवळ येशूचे खरे अनुयायी बनू शकत होते. म्हणून त्याने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५.

परंतु, आजच्या जगात प्रेम कसे विकसित करता येते? आणि पालक आपल्या मुलांना प्रेम कसे शिकवू शकतात? या प्रश्‍नांची उत्तरे पुढील लेखात देण्यात येतील.

[३ पानांवरील चित्रे]

स्वार्थी जगात प्रेम विकसित करणे आव्हानात्मक आहे