व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण एकटे का जगू शकत नाही

आपण एकटे का जगू शकत नाही

आपण एकटे का जगू शकत नाही

“एकट्यापेक्षा दोघे बरे; . . . त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.”—राजा शलमोन

प्राचीन इस्राएलच्या राजा शलमोनाने म्हटले: “एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते.” (उपदेशक ४:९, १०) या शब्दांत मानवी वर्तनाचा हा सुज्ञ निरीक्षक, साहचर्याच्या गरजेवर आणि स्वतःला इतरांपासून दूर न नेण्याच्या महत्त्वावर जोर देतो. परंतु, हे केवळ मानवी विचार नाहीत. देवाकडून मिळालेल्या बुद्धीमुळे आणि प्रेरणेमुळे तो असे बोलला.

स्वतःला इतरांपासून दूर ठेवणे सुज्ञपणाचे नाही. लोकांना एकमेकांची गरज असते. आपल्या सर्वांना शक्‍ती आणि मदतीची आवश्‍यकता असते जी आपल्याला इतरांकडून मिळू शकते. बायबलमधील एक नीतिसूत्र म्हणते: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” (नीतिसूत्रे १८:१) म्हणून समाज शास्त्रज्ञ, लोकांना, एखाद्या गटात सामील होण्याचे आणि एकमेकांमध्ये आस्था बाळगण्याचे उत्तेजन का देतात यात नवल करण्यासारखे काही नाही.

सामाजिक जीवन पुनरुज्जीवित करण्याकरता दिलेल्या सूचनांपैकी, “आध्यात्मिक विश्‍वासाचा प्रभाव वाढवणे” या एका सूचनेचा उल्लेख प्राध्यापक रॉबर्ट पुटनम करतात. याबाबतीत यहोवाचे साक्षीदार उल्लेखनीय आहेत; कारण, ते संपूर्ण जगभरात कुटुंबाप्रमाणे असलेल्या मंडळ्यांमधील सुरक्षित वातावरणाचा उपभोग घेतात. प्रेषित पेत्राच्या शब्दांच्या अनुषंगात, ते “बंधुवर्गावर प्रीति” करतात आणि “देवाचे भय” धरतात. (१ पेत्र २:१७) साक्षीदार स्वतःला विलग करण्याचे आणि विलग केल्यामुळे होणारे घातक परिणाम देखील टाळतात कारण, खऱ्‍या उपासनेशी संबंधित असलेली कार्ये त्यांना, देवाचे वचन बायबल यात सापडणारे सत्य आपल्या शेजाऱ्‍यांना सांगण्यात व्यस्त ठेवते.—२ तीमथ्य २:१५.

प्रेम आणि साहचर्य यांमुळे त्यांचे जीवन बदलले

यहोवाच्या साक्षीदारांचा एक संयुक्‍त समाज आहे, ज्यांतील प्रत्येक सदस्याची भूमिका महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, मिगेल, फ्रोईलन आणि अल्मा रूथ हे तिघे एकाच लॅटिन-अमेरिकन कुटुंबातील तीन सदस्य आहेत. हे तिघेही, जन्मापासूनच असलेल्या हाडांच्या विकृतीमुळे बुटके आहेत. तिघांनाही व्हीलचेअर वापरावी लागते. साक्षीदारांबरोबर संगती केल्यामुळे त्यांच्या जीवनावर कोणता प्रभाव पडला आहे?

मिगेल म्हणतो: “मी संकटकाळाचा अनुभव घेतला, पण यहोवाच्या लोकांबरोबर मी संगती करू लागल्यापासून माझं जीवन बदललं. स्वतःला लोकांपासून दूर ठेवणं अतिशय घातक आहे. सहविश्‍वासूंबरोबर ख्रिस्ती सभांमध्ये संगती केल्यानं आणि दर आठवडी त्यांच्याबरोबर राहिल्यानं मला खूप समाधान मिळालं आहे.”

अल्मा रूथ म्हणते: “कधीकधी मी खिन्‍न व दुःखी व्हायचे. पण यहोवाबद्दल शिकल्यानंतर मला वाटलं की मी त्याच्याबरोबर एक जवळचा नातेसंबंध जोडू शकते. ही माझ्या जीवनातली सर्वात मौल्यवान गोष्ट बनली. माझ्या कुटुंबानं आम्हाला खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं आहे आणि यामुळे आमच्यातलं ऐक्य आणखी मजबूत झालं आहे.”

मिगेलच्या वडिलांनी मिगेलला लिहा-वाचायला शिकवले. मग मिगेलने फ्रोईलन आणि अल्मा रूथला शिकवले. ही गोष्ट त्यांच्या आध्यात्मिकतेसाठी अत्यंत आवश्‍यक होती. अल्मा रूथ म्हणते: “वाचायला शिकल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला कारण बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने वाचून आम्ही आध्यात्मिकरीत्या पोषण प्राप्त करू शकलो.”

मिगेल सध्या ख्रिस्ती वडील या नात्याने सेवा करत आहे. फ्रोईलनने आतापर्यंत नऊ वेळा बायबल वाचून काढले आहे. अल्मा रूथने, १९९६ पासून पायनियर म्हणून किंवा पूर्ण वेळेची राज्य उद्‌घोषक बनण्याद्वारे यहोवाची सेवा वाढवली आहे. ती म्हणते: “यहोवाच्या आशीर्वादानं मी या ध्येयापर्यंत पोहंचू शकले; कारण माझ्या प्रिय साक्षीदार भगिनी माझ्या पाठीशी आहेत. त्यांनी मला केवळ प्रचारच नव्हे तर बायबल अभ्यास संचालित करण्यासही शिकवले आहे; यामुळे मी ११ बायबल अभ्यास सुरू करू शकले आहे.”

आणखी एक उत्तम उदाहरण आहे, एमिलिया हिचे. एमिलियाचा अपघात झाला, त्यात तिच्या पायाला आणि पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तिला व्हीलचेअर वापरावी लागत आहे. मेक्सिको सिटीतील यहोवाच्या साक्षीदारांनी तिच्याबरोबर बायबलचा अभ्यास केला आणि १९९६ साली तिचा बाप्तिस्मा झाला. ती म्हणते: “सत्य मिळण्याआधी मला आत्महत्या करावीशी वाटत होती; मला जगण्याची मुळीच इच्छा नव्हती. मला जीवनात एकप्रकारची पोकळी जाणवत होती; मी रात्रंदिवस रडायचे. पण यहोवाच्या लोकांबरोबर संगती करायला लागल्यापासून मी बंधूवर्गाचे प्रेम अनुभवू लागले. ते माझ्यात आस्था घेत असल्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळते. एक वडील तर माझ्यासाठी एका भावासारखे किंवा एका पित्यासारखे आहेत. ते व काही सेवा सेवक मला माझ्या व्हीलचेअरवरून सभांना आणि प्रचार कार्याला जाण्या-येण्यासाठी माझी मदत करतात.”

यहोवाचा साक्षीदार या नात्याने १९९२ साली बाप्तिस्मा घेतलेले होसे नामक बंधू एकटेच राहतात. ते ७० वर्षांचे आहेत, १९९० साली ते सेवानिवृत्त झाले होते. होसे यांनी देखील नैराश्‍याचा सामना केला पण जेव्हा एका साक्षीदाराने त्यांना प्रचार केला तर लगेच त्यांनी ख्रिस्ती सभांना उपस्थित राहायला सुरवात केली. तेथे गेल्यावर त्यांनी जे काही ऐकले आणि पाहिले ते त्यांना खूप आवडले. जसे की, त्यांनी बंधूभगिनींचे साहचर्य पाहिले आणि या सर्वांना आपल्याबद्दल किती काळजी आहे हे त्यांना जाणवले. आता त्यांच्या मंडळीतील वडील आणि सेवा सेवक त्यांची काळजी घेतात. (फिलिप्पैकर १:१; १ पेत्र ५:२) अशाप्रकारचे सहविश्‍वासू बंधूभगिनी त्यांच्याकरता एक “सांत्वन” आहेत. (कलस्सैकर ४:११) ते त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातात, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटतात, आणि चार वेळा त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्यांनी त्यांना भावनिक आधार दिला. होसे म्हणतात: “त्यांना माझी काळजी आहे. ते खरोखरच माझ्या कुटुंबासारखे आहेत. मला त्यांचा सहवास आवडतो.”

देण्यात खरी धन्यता

“एकट्यापेक्षा दोघे बरे” असे राजा शलमोनाने म्हटले त्याआधी तो, भौतिक संपत्ती मिळवण्यासाठी आपली सर्व शक्‍ती पणाला लावणे किती व्यर्थ आहे याबद्दल बोलला होता. (उपदेशक ४:७-९) आणि अगदी याच गोष्टीमागे आज पुष्कळ लोक लागले आहेत; यासाठी ते घरातील आणि बाहेरील लोकांपासून दूर जायलाही तयार असतात.

अशा या लोभी आणि स्वार्थी मनोवृत्तीमुळे पुष्कळ लोक स्वतःला इतरांपासून विलग करत आहेत. यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना सुख, समाधान तर मिळत नाही उलट, निराशा आणि वैफल्यच त्यांच्या पदरी पडते. परंतु, वर उल्लेखलेल्या अनुभवांवरून दिसून येते, की यहोवाची सेवा करणाऱ्‍यांना, यहोवावर आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम करणाऱ्‍यांबरोबर संगती केल्याने किती चांगले परिणाम मिळतात. फटकून राहिल्याने मनात येणाऱ्‍या नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी, ख्रिस्ती सभांमध्ये नियमित उपस्थित राहणे, सहख्रिश्‍चनांच्या पाठीशी राहणे, त्यांच्याबद्दल काळजी दाखवणे व सेवेमध्ये पूर्ण आवेशाने भाग घेणे, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या.—नीतिसूत्रे १७:१७; इब्री लोकांस १०:२४, २५.

आपण एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे, इतरांसाठी काहीही केल्यावर साहजिकच मनाला समाधान मिळते. पुष्कळांना ज्याच्या कामामुळे लाभ झाला त्या अल्बर्ट आयंस्टाईनने म्हटले: “मनुष्याचे मूल्य . . . तो काय घेऊ शकतो यानुसार नव्हे तर तो काय देतो यानुसार पाहिले पाहिजे.” हे शब्द आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांच्या किती एकमतात आहेत, ज्याने म्हटले होते, की “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) यास्तव, लोकांचे प्रेम मिळवणे हे तर चांगले आहेच पण, इतरांना प्रेम दाखवल्यानेसुद्धा आरोग्यास लाभ होतो.

आध्यात्मिक साहाय्य देण्याकरता अनेक वर्षांपासून मंडळ्यांना भेटी देणाऱ्‍या व ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे अशा ख्रिश्‍चनांसाठी सभास्थाने बांधण्यास मदत करणाऱ्‍या एका प्रवासी पर्यवेक्षकांनी आपल्या भावना पुढील शब्दांत व्यक्‍त केल्या: “माझ्या बांधवांची सेवा करण्याचा आनंद तसेच या बांधवांच्या चेहऱ्‍यावरील कृतज्ञतेचे भाव पाहून मी, त्यांना आणखी मदत करण्याची संधी शोधत असतो. इतरांमध्ये व्यक्‍तिगत आस्था घेणे, सौख्यानंदाचे रहस्य आहे हे मी माझ्या अनुभवावरून शिकलो आहे. मला माहीत आहे, की वडील या नात्याने आम्ही ‘वाऱ्‍यापासून आसरा . . . रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया’ असे असले पाहिजे.”—यशया ३२:२.

ऐक्याने एकत्र राहणे किती मनोरम आहे!

होय, इतरांना मदत करण्यात व यहोवाची सेवा करणाऱ्‍यांबरोबर संगती करण्यात बराच लाभ व खरा आनंद मिळतो. स्तोत्रकर्त्याने म्हटले: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” (स्तोत्र १३३:१) मिगेल, फ्रोईलन आणि अल्मा रूथच्या बाबतीत होते त्याप्रमाणे, कौटुंबिक ऐक्य ही एकमेकांना आधार देण्यातील मुख्य गोष्ट आहे. खऱ्‍या उपासनेत एकमेकांबरोबर ऐक्याने राहिल्याने खरोखरच किती आशीर्वाद मिळतो! ख्रिस्ती पती व पत्नींना सल्ला दिल्यानंतर, प्रेषित पेत्राने असे लिहिले: “शेवटी, तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी, बंधुप्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा.”—१ पेत्र ३:८.

खऱ्‍या मैत्रीमुळे, भावनिक व आध्यात्मिक अशा दोन्ही मार्गांनी पुष्कळ लाभ मिळतात. विश्‍वासातील आपल्या सोबत्यांना संबोधून प्रेषित पौलाने असे आर्जवले: “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. . . . सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१४, १५.

इतरांचे भले करण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधा. “सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे [आपण] बरे करावे,” कारण यामुळे आपल्या जीवनाला अर्थ मिळेल आणि आपले जीवन अधिक समाधानी होईल. (गलतीकर ६:९, १०) येशूचा शिष्य याकोब याने असे लिहिले: “भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्‍नाची वाण आहे, आणि तुम्हांमधील कोणी त्यांना म्हणतो, सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा; पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ?” (याकोब २:१५, १६) या प्रश्‍नाचे उत्तर अगदी उघड आहे. ‘आपण केवळ आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्‍याचेही पाहावे.’—फिलिप्पैकर २:४.

खास गरज असते तेव्हा किंवा एखाद्या विपत्तीच्या वेळी, इतरांना भौतिकरीत्या मदत करण्याव्यतिरिक्‍त यहोवाचे साक्षीदार एका अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गाने आपल्या सहमानवांना मदत करण्यात व्यस्त आहेत—देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या कार्यात ते व्यस्त आहेत. (मत्तय २४:१४) आशा व सांत्वन देणाऱ्‍या या संदेशाची घोषणा करण्यात ६०,००,००० पेक्षा अधिक साक्षीदारांच्या सहभागावरून हेच दिसून येते, की साक्षीदारांना इतरांबद्दल खरी व प्रेमळ काळजी आहे. पवित्र शास्त्रवचनांतून मदत देण्याद्वारे, मानवजातीची आणखी एक गरज पूर्ण केली जाते. ती कोणती?

महत्त्वपूर्ण गरज

खऱ्‍या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला देवाबरोबर उचित नातेसंबंध जोडण्याची आवश्‍यकता आहे. असे म्हटले जाते, की “पहिल्यापासून आतापर्यंत मानवाला, स्वतःपेक्षा कोणा तरी उच्च व अधिक शक्‍तिशाली व्यक्‍तीकडे पाहण्याची तीव्र इच्छा वाटली आहे; या वस्तुस्थितीवरून हेच दिसते की धर्माची संकल्पना ही मानवांमध्ये जन्मतःच असते व ती शास्त्रोक्‍तरीतीने मान्य केली पाहिजे. . . . विश्‍वातील सर्व मानव, एका अलौकिक शक्‍तीचा करीत असलेला शोध आणि त्याच्यावर करत असलेला विश्‍वास पाहून आपल्या मनात, भय, आश्‍चर्य आणि श्रद्धा निर्माण झाली पाहिजे.”—मॅन डज नॉट स्टॅण्ड अलोन, ए. क्रेसी मॉरिसन.

येशू ख्रिस्ताने म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य.” (मत्तय ५:३, NW) इतरांपासून स्वतःला विलग करून मानवाला जास्त काळ लाभ होत नाही. परंतु, आपल्या निर्माणकर्त्यापासून स्वतःला दूर करणे किती तरी पटीने गंभीर आहे. (प्रकटीकरण ४:११) “देवाविषयीचे ज्ञान” मिळवणे व त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात अवलंब करणे, आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण पैलू असला पाहिजे. (नीतिसूत्रे २:१-५) होय, आपण आपली आध्यात्मिक गरज भागवण्याचा दृढनिश्‍चय केला पाहिजे कारण आपण एकटे जगू शकत नाही आणि देवापासून दूर राहू शकत नाही. “सर्व पृथ्वीवर परात्पर” असलेल्या यहोवाबरोबर एक उत्तम नातेसंबंध ठेवल्यानेच आपले जीवन आनंदी आणि वास्तविक अर्थाने प्रतिफलदायी होऊ शकते.—स्तोत्र ८३:१८.

[५ पानांवरील चित्र]

मिगेल: “मी संकटकाळाचा अनुभव घेतला, पण यहोवाच्या लोकांबरोबर मी संगती करू लागल्यापासून माझं जीवन बदललं”

[५ पानांवरील चित्र]

अल्मा रूथ: “यहोवाबद्दल शिकल्यानंतर मला वाटलं की मी त्याच्याबरोबर एक जवळचा नातेसंबंध जोडू शकते.”

[६ पानांवरील चित्र]

एमिलिया: “सत्य मिळण्याआधी मला . . . जीवनात एकप्रकारची पोकळी जाणवत होती”

[७ पानांवरील चित्र]

खऱ्‍या उपासकांबरोबर संगती केल्याने आपली आध्यात्मिक गरज भागवण्यास आपल्याला मदत मिळते