व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युसेबियस “चर्च इतिहासाचा संस्थापक”?

युसेबियस “चर्च इतिहासाचा संस्थापक”?

युसेबियस “चर्च इतिहासाचा संस्थापक”?

सा.यु. ३२५ साली, रोमन सम्राट कॉन्स्टंटीनने सर्व बिशपांची नायसीयात सभा भरवली. देवाचा आपल्या पुत्रासोबत काय नातेसंबंध आहे या वादग्रस्त विषयावर निष्कर्ष काढणे हा त्याचा हेतू होता. उपस्थित असलेल्या लोकांपैकी सिझेरियाचा युसेबियस देखील होता; त्या काळातील सर्वात ज्ञानी व्यक्‍ती अशी त्याची ख्याती होती. युसेबियसने बारकाईने शास्त्रवचनांचा अभ्यास केला होता आणि ख्रिस्ती एकेश्‍वरवादाचा तो समर्थक होता.

एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात म्हटल्यानुसार, नायसीयाच्या सभेत “स्वतः कॉन्स्टंटीन अध्यक्ष होता, त्याने चर्चा हाताळल्या व . . . धर्मसभेत मान्य करण्यात आलेल्या ‘पित्यासोबत तत्त्वतः एक असलेला’ या मतांगीकारात ख्रिस्ताचा देवासोबत कसा नातेसंबंध आहे हे दाखवणारा महत्त्वाचा सिद्धान्त त्याने खुद्द मांडला . . . सम्राटाचे भय बाळगून दोन बिशपांना वगळता बाकीच्या सर्व बिशपांनी या मतांगीकाराला मान्यता दर्शवली; बऱ्‍याच जणांनी आपल्या इच्छेविरुद्ध ही मान्यता दर्शवली.” ज्यांनी मान्यता दर्शवली नाही त्यांच्यापैकी युसेबियस एक होता का? त्याने घेतलेल्या भूमिकेतून आपण काय शिकू शकतो? युसेबियसची काय पार्श्‍वभूमी होती—तो किती शिकलेला होता आणि त्याने काय साध्य केले होते?

त्याची उल्लेखनीय लिखाणे

युसेबियसचा जन्म सा.यु. २६० च्या सुमारास पॅलेस्टाईनमध्ये झाला होता. कोवळ्या वयातच तो सिझेरियातील चर्चवर देखरेख करणाऱ्‍या पॅम्फिलससोबत सहवास राखू लागला होता. युसेबियस, पॅम्फिलसच्या थिओलॉजिकल शाळेत दाखल झाला आणि तो आवेशी विद्यार्थी होता. पॅम्फिलसच्या मोठ्या ग्रंथालयाचा त्याने पुरेपूर उपयोग केला. युसेबियसने मन लावून अभ्यास केला, विशेषकरून बायबलचा अभ्यास त्याने फार बारकाईने केला. तो पॅम्फिलसचा एक विश्‍वासू मित्र देखील बनला आणि त्याने नंतर स्वतःला “पॅम्फिलसचा युसेबियस” असेही म्हटले.

स्वतःच्या उद्दिष्टांविषयी युसेबियसने म्हटले: “पवित्र प्रेषितांच्या वारसदारांविषयी त्याचप्रमाणे आपल्या तारकापासून आपल्यापर्यंत गुदरलेल्या काळाविषयी लिहिण्याचा माझा उद्देश आहे; हे दाखवण्यासाठी की चर्चच्या इतिहासात पुष्कळ व महत्त्वाच्या घटना कशा घडल्या; आणि अशांचा उल्लेख करण्यासाठी जे चर्चमध्ये अत्यंत प्रमुख क्षेत्रांत अधिकारपदी व अध्यक्षपदी होते आणि ज्यांनी प्रत्येक पिढीत मौखिकरित्या किंवा लिखाणांद्वारे ईश्‍वराच्या वचनाची घोषणा केली.”

हिस्टरी ऑफ ख्रिश्‍चन चर्च या प्रसिद्ध ग्रंथासाठी युसेबियसचे स्मरण केले जाते. सा.यु. ३२४ च्या सुमारास त्याने प्रकाशित केलेले त्याचे दहा खंड, चर्चच्या इतिहासाची माहिती देणारे प्राचीन काळातील सर्वात महत्त्वाचे मानले जातात. या कार्यसिद्धीमुळे चर्च इतिहासाचा संस्थापक म्हणून युसेबियसची ख्याती झाली.

चर्च हिस्टरी याशिवाय युसेबियसने क्रॉनिकल या ग्रंथाचेही लिखाण दोन खंडांमध्ये केले. पहिला खंड जगाच्या इतिहासाचा सारांश होता. चवथ्या शतकात, जगाच्या कालगणनेच्या संदर्भाकरता ते मानक ठरले. दुसऱ्‍या खंडात ऐतिहासिक घटनांच्या तारखा होत्या. समांतर रकान्यांचा उपयोग करून युसेबियसने विविध राष्ट्रांच्या राजपदाचे वारसदार दाखवले.

युसेबियसने आणखी दोन ऐतिहासिक ग्रंथ लिहिले; ते होते मारटर्स ऑफ पॅलेस्टाईन आणि लाईफ ऑफ कॉन्स्टंटीन. आधी उल्लेखलेल्या ग्रंथात, सा.यु. ३०३-१० दरम्यानच्या कालावधीचा समावेश होतो आणि त्या काळातील हुतात्म्यांची त्यात चर्चा केली आहे. या घटनांना युसेबियस प्रत्यक्ष साक्षीदार असावा. नंतरचा ग्रंथ, सा.यु. ३३७ मध्ये सम्राट कॉन्स्टंटीनच्या मरणानंतर चार पुस्तकांच्या रूपात प्रकाशित करण्यात आला; त्यात महत्त्वाचे ऐतिहासिक तपशील देण्यात आले होते. हा थेट इतिहास असण्याऐवजी तो मुख्यत्वे एक प्रशंसा ग्रंथ आहे.

युसेबियसच्या दोषनिवारक ग्रंथांमध्ये त्या काळातील रोमन सुभेदार हिरोक्लीस याला दिलेले उत्तर आहे. हिरोक्लीसने ख्रिश्‍चनांविरुद्ध लिहिले तेव्हा युसेबियसने त्यांची बाजू घेऊन त्याला प्रत्युत्तर दिले. शिवाय, शास्त्रवचने देवाने लिहिली आहेत हे सिद्ध करण्याकरता त्याने ३५ पुस्तके लिहिली; ही पुस्तके सर्वात महत्त्वाची आणि सर्वात तपशीलवार मानली जातात. यांतली पहिली १५ पुस्तके, हिब्रूंची पवित्र लिखाणे ख्रिश्‍चनांनी मान्य केल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. इतर २० हा पुरावा देतात की, ख्रिश्‍चनांनी यहुदी विधींना पार करून नवीन तत्त्वे व रीती अवलंबल्या ते उचित केले. या सर्व पुस्तकांमधून युसेबियसच्या दृष्टिकोनातल्या ख्रिस्ती धर्माचे बहुसमावेशक समर्थन केले आहे.

युसेबियस सुमारे ८० वर्षे (सा.यु. २६०-३४० सुमारास) जगला व प्राचीन काळातील बहुप्रसव लेखक ठरला. त्याच्या लिखाणांत पहिल्या तीन शतकांपासून सम्राट कॉन्स्टंटीनच्या काळापर्यंतच्या घटनांचा समावेश आहे. त्याच्या जीवनाच्या उत्तरार्धात, लेखनाव्यतिरिक्‍त तो सिझेरियाचा बिशप म्हणूनही कार्य करत होता. इतिहासकार म्हणून अधिक प्रसिद्ध असलेला युसेबियस, समर्थक लेखन करणारा, स्थलवर्णनवेत्ता, प्रचारक, टीकाकार आणि धार्मिक लिखाणांवरील विवरणात्मक अभ्यासाचा लेखक देखील होता.

त्याचा दुहेरी उद्देश

युसेबियसने असे अभूतपूर्व व प्रचंड मोठे प्रकल्प का हाती घेतले? कारण त्याचा असा विश्‍वास होता की, एका नव्या युगात स्थित्यंतर करण्याच्या काळात तो जगत होता. त्याच्या मते, गत पिढ्यांमध्ये मोठमोठ्या घटना झाल्या होत्या व भावी पिढ्यांकरता लेखी पुरावा असण्याची गरज होती.

युसेबियसचा आणखी एक उद्देश होता—समर्थक असण्याचा. ख्रिस्ती धर्म हा देवाकडून आला आहे, असा त्याचा विश्‍वास होता. परंतु काहीजणांमध्ये याविषयी मतभेद होते. युसेबियसने लिहिले: ‘ज्यांनी नाविन्याच्या मागे लागून घोडचुका केल्या व स्वतःला तथाकथित ज्ञानाचा शोध लावणारे घोषित करून ख्रिस्ताच्या कळपाला क्रूर लांडग्यांप्रमाणे निर्दयीपणे उद्‌ध्वस्त केले त्यांची नावे व संख्या देणे आणि किती वेळा असे घडले ते सांगणे हा माझा उद्देश आहे.’

युसेबियस स्वतःला ख्रिस्ती समजत होता का? तसे दिसते कारण त्याने ख्रिस्ताला ‘आपला तारक’ असे संबोधले. त्याने म्हटले: “यहुद्यांनी आपल्या तारकाविरुद्ध रचलेल्या कटाचा परिणाम म्हणून संपूर्ण यहुदी राष्ट्रावर आलेल्या दुर्घटनांचा अहवाल देणे व परराष्ट्रीयांनी ज्या पद्धतींनी व जितक्या वेळा देवाच्या वचनावर हल्ला केला त्याचा अहवाल देणे आणि रक्‍त व छळांव्यतिरिक्‍त ज्यांनी त्याकरता विविध समयी संघर्ष केला त्यांच्या महानतेचे त्याचप्रमाणे आपल्याच काळात [लोकांनी] केलेली विश्‍वासाची कबुली व आपल्या तारकाने त्या सर्वांना दयाळुपणे व प्रेमळपणे दिलेली मदत यांचे वर्णन करणे . . . हा माझा हेतू आहे.”

त्याचे प्रचंड संशोधन

युसेबियसने स्वतः असंख्य पुस्तकांचे वाचन केले व त्यांचा संदर्भ दिला. इतकेच नव्हे तर, युसेबियसच्या लिखाणांतूनच आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या तीन शतकांमधील अनेक महत्त्वाच्या व्यक्‍तींची ओळख पटली आहे. महत्त्वपूर्ण चळवळींविषयी माहिती देणारे उपयुक्‍त अहवाल केवळ त्याच्या लिखाणांमध्ये मिळतात. ते अशा ज्ञानाच्या स्रोतांमधून आहेत जे आता उपलब्ध नाहीत.

माहिती गोळा करण्यात युसेबियस तरबेज व पक्का होता. त्याने विश्‍वसनीय आणि विश्‍वासास पात्र नसलेल्या अहवालांमधील फरक ओळखून अत्यंत काळजीपूर्वक प्रयास केल्याचे आढळते. असे असूनही, त्याचे लिखाण दोषरहित नाही. काही वेळा, त्याने चुकीचा अर्थ दिला आहे आणि लोकांना व त्यांच्या कृतीही समजून घेण्यात त्याने चूक केली आहे. कालगणनेत तो काही वेळा चुकला आहे. युसेबियसकडे साहित्य कल्पकतेने सादर करण्याचे कौशल्य देखील नव्हते. परंतु, त्याच्या साहित्यात हे सर्व दोष स्पष्ट असूनही त्याचे साहित्य मूल्यवान समजले जाते.

सत्यप्रेमी?

पिता आणि पुत्र यांच्यातील संबंधाविषयी जो वादविषय सोडवण्यात आला नव्हता त्याची त्याला चिंता होती. युसेबियसचा विश्‍वास होता की, पिता पुत्राआधी अस्तित्वात होता; हा विश्‍वास खरा होता का? की पिता आणि पुत्र एकाच काळी अस्तित्वात होते? त्याने प्रश्‍न केला, “जर ते एकाच काळी अस्तित्वात होते तर पिता हा पिता कसा असेल आणि पुत्र, पुत्र कसा असेल?” आपल्या विश्‍वासाला त्याने शास्त्रवचनांतून आधारही दिला; त्याने योहान १४:२८ चा उल्लेख केला, ज्यात म्हटले आहे की, ‘पिता येशूपेक्षा थोर आहे’ आणि योहान १७:३ चाही उल्लेख केला, ज्यात, येशूला एकच खऱ्‍या देवाने “पाठवले” आहे असे म्हटले आहे. कलस्सैकर १:१५ आणि योहान १:१ या वचनांना अनुलक्षून युसेबियसने असा वाद मांडला की, लोगोस किंवा वचन “अदृश्‍य देवाचे प्रतिरूप आहे”, अर्थात, देवाचा पुत्र आहे.

परंतु, आश्‍चर्याची गोष्ट ही आहे की, नायसीयाच्या धर्मसभेच्या शेवटी, युसेबियसने विरुद्ध मताची बाजू घेतली. देव आणि ख्रिस्त एकाच काळी अस्तित्वात नव्हते या शास्त्रवचनांवर आधारलेल्या त्याच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन त्याने सम्राटाचा पक्ष घेतला.

मिळणारा बोध

नायसीयाच्या धर्मसभेत युसेबियसने दबावात येऊन शास्त्रवचनांविरुद्ध असलेल्या सिद्धान्ताला मान्यता का दिली? त्याची काही राजकीय उद्दिष्टे होती का? सर्वात प्रथम, धर्मसभेत उपस्थित राहण्याचे त्याचे कारण काय होते? सर्व बिशपांना बोलावणे दिले असतानाही केवळ ३०० बिशप त्या सभेत आले होते. आपल्या सामाजिक प्रतिमेला काही धक्का बसू नये याची युसेबियसला काळजी असावी का? आणि सम्राट कॉन्स्टंटीनने त्याला इतका सन्मान का दिला? या धर्मसभेत युसेबियस सम्राटाच्या उजव्या हाताशी बसला होता.

असे दिसते की, येशूच्या अनुयायांनी ‘जगाचे असू नये’ या त्याच्या आज्ञेकडे युसेबियसने दुर्लक्ष केले. (योहान १७:१६; १८:३६) “अहो अविश्‍वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय?” असा शिष्य याकोबाने प्रश्‍न केला. (याकोब ४:४) शिवाय, पौलाचा पुढील सल्ला किती उचित आहे: “तुम्ही विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.” (२ करिंथकर ६:१४) आपणही “[पित्याची] उपासना आत्म्याने व खरेपणाने” करून जगापासून वेगळे राहू या.—योहान ४:२४.

[३१ पानांवरील चित्र]

नायसियाच्या धर्मसभेचे भित्तिलेपचित्र

[चित्राचे श्रेय]

Scala/Art Resource, NY

[२९ पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of Special Collections Library, University of Michigan