व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ज्याचा देव यहोवा तो धन्य!

ज्याचा देव यहोवा तो धन्य!

जीवन कथा

ज्याचा देव यहोवा तो धन्य!

टॉम डीडर यांच्याद्वारे कथित

एक सामाजिक सभागृह भाड्याने घेण्यात आला होता. पॉर्क्यूपाईन प्लेन्स, सॅस्काटचेवन, कॅनडा येथे होणाऱ्‍या संमेलनाला ३०० जण उपस्थित राहतील अशी अपेक्षा केली जात होती. बुधवारी बर्फ पडू लागला आणि शुक्रवारपर्यंत तापमान गोठणबिंदूपेक्षाही खाली उतरलं ज्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं. तापमान -४०°से. इतकं झालं. फक्‍त २८ जण आणि काही मुलं उपस्थित होती. नवा विभागीय पर्यवेक्षक या नात्याने हे माझं पहिलं संमेलन होतं; तेव्हा मी २५ वर्षांचा होतो आणि मला भीती देखील वाटत होती. पण संमेलनात पुढं काय झालं ते सांगण्याआधी, मला सेवेचा हा विशेषाधिकार कसा मिळाला ते मी तुम्हाला आधी सांगतो.

आठ मुलांपैकी माझा सातवा नंबर. सर्वात थोरला, बिल; मग, मेट्रो, जॉन, फ्रेड, माईक, ॲलिक्स. माझा जन्म १९२५ साली झाला; माझ्यानंतर सर्वात धाकटा वॅली. आम्ही मॅनिटोबा येथील युक्रेना गावाजवळ माझी आई ॲना आणि बाबा मायकल डीडर यांच्या मालकीच्या एका लहानशा मळ्यात राहत होतो. बाबा, सेक्शन मॅन म्हणून रेल्वेत नोकरीला होते. गावापासून दूर एखाद्या रेल्वेलाईन शेजारी असलेले बंकहाऊस, आमच्यासारख्या मोठ्या कुटुंबाला राहण्यासाठी पुरेसं नसल्यामुळे आम्ही मळ्यात राहत होतो. बाबा बहुतेकदा घरी नसायचे, त्यामुळे आईनंच आम्हाला लहानाचं मोठं केलं. कधीकधी, एक किंवा बऱ्‍याच आठवड्यांसाठी ती पण बाबांबरोबर राहायला जायची; पण तिनं आम्हाला स्वयंपाक बनवायला, ब्रेड इत्यादी बनवायला, आणि घरातील इतर कामं करायला शिकवलं. आम्ही ग्रीक कॅथलिक चर्चेचे सदस्य असल्यामुळे, बालपणापासूनच आईनं आम्हाला दिलेल्या प्रशिक्षणात, प्रार्थना तोंडपाठ करण्याचं व इतर प्रथांमध्ये भाग घेण्याचं शिक्षण समाविष्ट होतं.

बायबल सत्याशी संपर्क

मी लहान होतो तेव्हापासून माझ्या मनात बायबल समजून घेण्याची उत्कट इच्छा होती. आमच्या शेजारी राहत असलेला एक मनुष्य यहोवाचा साक्षीदार होता; तो आमच्याकडे नियमित येऊन आम्हाला देवाचं राज्य, हर्मगिदोन, नवीन जगातील आशीर्वाद यांजशी संबंधित असलेले बायबलमधील भाग वाचून दाखवायचा. आईला याविषयी काहीच आवड नव्हती, पण माईक आणि ॲलिक्सला मात्र संदेश आवडू लागला. इतका की, ते जे काही शिकत होते त्यामुळे त्यांनी, दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान धार्मिक कारणांसाठी लष्करात भरती होण्यास नकार दिला. यामुळे माईकला अल्पकाळासाठी तुरुंगात टाकण्यात आलं आणि ॲलिक्सला ओन्टोरियो येथील मजूर छावणीत पाठवण्यात आलं. या दरम्यान फ्रेड आणि वॅलीने देखील सत्य स्वीकारले. माझ्या तीन भावांनी मात्र सत्य स्वीकारले नाही. आईनेसुद्धा कित्येक वर्षांपर्यंत आमचा विरोध केला पण नंतर मात्र तिने यहोवाची बाजू घेतली तेव्हा आम्हा सर्वांना आश्‍चर्य वाटले. वयाच्या ८३ व्या वर्षी तिचा बाप्तिस्मा झाला. आणि वयाच्या ९६ व्या वर्षी ती वारली. बाबांनीसुद्धा मरतेवेळी सत्याबद्दल आवड दाखवली.

मी १७ वर्षांचा होतो तेव्हा काम शोधण्यासाठी व माझ्याबरोबर बायबलचा अभ्यास करू शकणाऱ्‍या लोकांबरोबर संगती करण्यासाठी विनीपेगला गेलो. त्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी होती, पण सभा मात्र नियमित भरवल्या जात होत्या. मी पहिल्यांदा सभेला गेलो होतो तेव्हा ती एका खासगी गृहात भरवली होती. ग्रीक कॅथलिक विश्‍वास मला शिकवण्यात आलेले असल्यामुळे सुरवातीला मी जे काही ऐकले ते मला विचित्रच वाटत होते. परंतु हळूहळू मला, पाळक आणि चर्चच्या लोकांमधील फरक ही व्यवस्था शास्त्रवचनांनुसार का नाही आणि पाळक युद्धावर आशीर्वाद द्यायचे तेव्हा देवाला हे मान्य का नाही ते समजू लागले. (यशया २:४; मत्तय २३:८-१०; रोमकर १२:१७, १८) एका दूरच्या ठिकाणी कायमचे जाण्यापेक्षा पृथ्वीवरील परादीसमध्ये जिवंत राहणे मला जास्त व्यावहारिक व तर्काला पटणारे वाटले.

हेच सत्य आहे, याची मला खात्री पटल्यावर मी यहोवाला माझे समर्पण केले आणि विनीपेगमध्ये १९४२ साली माझा बाप्तिस्मा झाला. सन १९४३ पर्यंत, कॅनडातील यहोवाच्या साक्षीदारांवरील बंदी उठवण्यात आली आणि प्रचार कार्य वेगाने होऊ लागले. बायबल सत्याचा माझ्या हृदयावर खोल प्रभाव पडू लागला होता. मंडळीमध्ये मला सेवक (त्या काळी वडिलांना असे संबोधले जायचे) म्हणून सेवा करण्याचा तसेच सार्वजनिक सभा मोहिमांमध्ये व न नेमलेल्या क्षेत्रांत कार्य करण्याचा सुहक्क मिळाला. अमेरिकेतील मोठमोठ्या अधिवेशनांना उपस्थित राहिल्यामुळे माझी आध्यात्मिकरीत्या खूप प्रगती होऊ शकली.

यहोवाच्या सेवेतील वाढ

सन १९५० मध्ये मी पायनियर सेवक म्हणून माझे नाव नोंदवले आणि त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात मला विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याचे आमंत्रण मिळाले. चार्ली हेपवर्थ नावाच्या एका अनुभवी व निष्ठावान बांधवाकडून मला प्रशिक्षण घेण्याचा सुहक्क मिळाला. आणि शेवटच्या आठवड्यात तर मला, विनीपेगमध्ये आधीपासूनच विभागीय कार्यात असलेला माझा भाऊ ॲलिक्स याच्याबरोबर कार्य करण्याचा आनंद मिळाला.

सुरवातीला वर्णन केलेल्या माझ्या पहिल्या विभागीय संमेलनाच्या आठवणी माझ्या मनात जणू काय कोरल्या गेल्या आहेत. ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे साहजिकच मला खूप चिंता वाटत होती. पण, आमचे प्रांतीय पर्यवेक्षक बंधू जॅक नेथन यांनी आम्हा सर्वांना कामात व्यस्त व आनंदी ठेवले. आम्ही उपस्थित असलेल्यांना संमेलन कार्यक्रमाचा सारांश सांगितला. सर्वांनी आळीपाळीने अनुभव सांगितले, घरोघरच्या सादरतांच्या व पुनर्भेटींच्या तालिमी केल्या, गृह बायबल अभ्यास कसे संचालित करायचे ते दाखवले. आम्ही राज्य गीते गायिले. अन्‍नपाण्याची काही कमतरता नव्हती. दर दोन तासाला आम्ही कॉफी आणि केक खात होतो. काही बेंचवर तर काही स्टेजवर झोपले आणि बाकीचे खालीच झोपले. रविवारपर्यंत हिमवादळ जरासे कमी झाल्यामुळे ९६ लोक जाहीर भाषणाला उपस्थित राहिले. कठीण परिस्थिती येते तेव्हा कसे टिकून राहायचे हे या अनुभवावरून मी शिकलो.

माझी पुढील विभागीय नेमणूक, उत्तर अल्बर्टा, ब्रिटिश कोलंबिया आणि मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असलेले युकॉन क्षेत्र, हे होते. खडबडीत अलास्का हायवेवरून ब्रिटिश कोलंबियाच्या डॉसन क्रीक पासून युकॉनच्या व्हाईटहॉर्सपर्यंतचा (१,४७७ किलोमीटरचा) प्रवास करायला आणि प्रवास करता करता साक्षकार्य करायला, सहनशक्‍तीची आणि खबरदारीची अत्यंत आवश्‍यकता होती. जोराच्या हिमवृष्टीमुळे होणारी हिमघसरण, निसरडे डोंगर उतार आणि अंधूक वातावरण (ज्यामुळे पुढचे दिसत नाही) या सर्वांचा सामना करावा लागायचा.

अतिदूरच्या उत्तरेकडे सत्य कसे काय पोहंचले होते, याचे मला नेहमी नवल वाटायचे. एके प्रसंगी, वॉल्टर लुकोवीट्‌स आणि मी, अलास्का हायवेच्या मार्गावर युकॉन क्षेत्राच्या सीमेजवळील ब्रिटिश कोलंबियाच्या लोवर पोस्टजवळ एका लहानशा केबिनजवळ गेलो. या केबिनमध्ये नक्की कोणीतरी राहत असावे असे आम्हाला वाटत होते, कारण एका लहानशा खिडकीतून आम्हाला मिणमिणता प्रकाश दिसत होता. रात्रीचे नऊ वाजले होते; आम्ही केबिनचे दार वाजवले. आतून एका पुरूषाचा आवाज आला, त्याने आम्हाला आत यायला सांगितले म्हणून आम्ही आत गेलो. आत गेल्यावर आम्ही पाहतो तो काय, एक म्हातारा मनुष्य आपल्या बंक बिछान्यावर पडून टेहळणी बुरूज मासिक वाचत होता! विशेष म्हणजे त्याच्याजवळ, आम्ही लोकांना जो अंक सादर करत होतो त्याच्यानंतरचा अगदी नवीन अंक होता. त्याला हा अंक विमानाने आल्याचे त्याने आम्हाला सांगितले. मंडळीपासून दूर राहून आम्हाला आठ दिवस झाले होते त्यामुळे आमच्याकडे नवीन अंक नव्हते. या मनुष्याने स्वतःची ओळख फ्रेड बर्ग अशी करून दिली; तो अनेक वर्षांपासून या मासिकाचा वर्गणीदार असला तरी, यहोवाचे साक्षीदार त्याला पहिल्यांदाच भेटत होते. फ्रेडने आम्हाला रात्री त्याच्याकडेच राहायला सांगितले. आम्ही त्याला शास्त्रवचनांतील अनेक सत्ये सांगू शकलो आणि या क्षेत्रातून नियमिरीत्या जाणाऱ्‍या इतर साक्षीदारांनी त्याला येऊन भेट देण्याची आम्ही व्यवस्था देखील केली.

अनेक वर्षे मी तीन लहान विभागांमध्ये सेवा केली. हे विभाग, पूर्वेकडील अल्बर्टा, ग्रान्डे प्रेअरीपासून उत्तरेकडील अलास्का, कोडिआकपर्यंत सुमारे ३,५०० किलोमीटरवर पसरले होते.

इतर कोणत्याही ठिकाणांप्रमाणेच दूरच्या ठिकाणी राहणाऱ्‍या लोकांवर देखील यहोवाची तिच अपात्र कृपा आहे व त्याचा आत्मा सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्ती राखणाऱ्‍या लोकांचे मन व हृदय यांना प्रेरित करतो, ही गोष्ट जाणून मला आनंद वाटला. अशा लोकांपैकी एक आहेत, हेन्री लपीन; आता ज्याला डॉसन म्हटले जाते त्या युकॉन येथील डॉसन सिटीत ते राहायचे. परंतु त्यांचे घर खूप दूर होते. वास्तविक पाहता, ६० पेक्षा अधिक वर्षांपासून ते सोन्याच्या खाणीच्या क्षेत्रातून बाहेरच पडले नव्हते. पण, यहोवाच्या आत्म्याने या ८४ वर्षीय वृद्ध गृहस्थाला, अँकरेज येथे होणाऱ्‍या एका विभागीय संमेलनाला उपस्थित राहण्याकरता, १,६०० किलोमीटर दूरचा एकतर्फी प्रवास करण्यास प्रवृत्त केले; ते यापूर्वी एकाही मंडळीच्या सभेला उपस्थित राहिले नव्हते तरीदेखील ते या संमेलनाला आले. संमेलनाच्या कार्यक्रमामुळे व बंधूभगिनींच्या संगतीमुळे ते रोमांचित व अति आनंदीत झाले. डॉसन सिटीत पुन्हा आल्यावर हेन्री आपल्या मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिले. हेन्रीला ओळखणाऱ्‍या पुष्कळ लोकांना कळत नव्हते, की कोणत्या गोष्टीमुळे हे वृद्ध गृहस्थ इतका लांबचा प्रवास करायला प्रेरित झाले होते. या जिज्ञासेपोटी आणखी काही वयस्कर लोकांनी सत्य स्वीकारले. म्हणजे, एका अप्रत्यक्ष मार्गाने हेन्रीने उत्तम साक्ष दिली होती.

यहोवाची अपात्र कृपा मिळणे

सन १९५५ मध्ये, मला वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या २६ व्या वर्गाचे आमंत्रण मिळाले तेव्हा खूप आनंद झाला होता. या प्रशिक्षणामुळे माझा विश्‍वास मजबूत झाला आणि मी यहोवाच्या आणखी जवळ येऊ शकलो. पदवीधर झाल्यानंतर, मला कॅनडात विभागीय कार्य चालू ठेवण्याची नेमणूक मिळाली.

ओन्टारियोच्या प्रांतात मी सुमारे एक वर्ष सेवा केली. मग मला पुन्हा नयनरम्य अलास्कात नेमण्यात आले. माझ्या डोळ्यासमोर अजूनही तिथल्या, हायवेला लागून असलेल्या नितळ, चकाकणाऱ्‍या तळ्यांचे व माथ्यावर बर्फ असलेल्या डोंगरांना वळसा घालून करावा लागणाऱ्‍या प्रवासाचे चित्र उभे राहते. उन्हाळ्यात तर असे वाटायचे, की दऱ्‍यांनी व कुरणांनी, श्‍वास रोखून धरण्याजोगी रंगीबेरंगी फुलांची शालच पांघरली आहे. हवा ताजी होती, पाणी शुद्ध होते. अस्वले, लांडगे, मूस, कॅरिबाऊ आणि इतर जंगली प्राणी मुक्‍त संचार करीत.

अलास्कात सेवा करणे—फक्‍त तिथल्या बदलणाऱ्‍या हवामानामुळेच नव्हे तर दूरच्या अंतरांमुळे देखील कठीण आहे. माझा विभाग, पूर्वेपासून उत्तरेपर्यंत ३,२०० किलोमीटर इतका होता. त्या दिवसांत, विभागीय पर्यवेक्षकांना कार दिली जात नव्हती. स्थानीय बंधू स्वेच्छेने आपल्या कारमधून मला एका मंडळीतून दुसऱ्‍या मंडळीपर्यंत न्यायचे. कधीकधी मला ट्रकवाल्यांकडे किंवा पर्यटकांकडे लिफ्ट मागावी लागायची.

अलास्का हायवेवरील असाच एक लांबचा पट्टा, टोक जंक्शन अलास्का आणि माईल १२०२ किंवा स्कॉटी क्रीक क्षेत्र यांच्यामधला होता. या दोन्ही ठिकाणांवरील कस्टम कार्यालयांमधील अंतर सुमारे १६० किलोमीटर इतके होते. टोक येथील अमेरिकन कस्टम कार्यालय मी पार केले आणि तेथून पुढे ५० किलोमीटरपर्यंत मला एक लिफ्ट मिळाली. पण त्यानंतर रस्त्यावर एकही कार दिसायला तयार नव्हती आणि मी सुमारे दहा तास चालून ४० पेक्षा अधिक किलोमीटर पार केले. नंतर मला कळाले, की मी जेव्हा कस्टम पॉईन्ट पार केले होते त्याच्या काही वेळानंतर, हायवेवरील सर्व वाहतूक थांबवण्यात आली होती कारण कस्टम क्रॉसींग पॉईन्टपासून थोड्याशा अंतरावरच हिमघसरण झाले होते. मध्यरात्री तापमान सुमारे -२३°से. इतके कमी झाले आणि सर्वात जवळच्या आश्रयस्थानापासून मी जवळजवळ ८० किलोमीटर दूर होतो. मला काहीही करून, आराम करता येईल असे ठिकाण शोधावे लागले.

लंगडत लंगडत जात असताना मला रस्त्याच्या कडेला एक बेवारशी कार दिसली; तिच्यावर थोडा बर्फ साठला होता. मी विचार केला, की मी जर कारच्या आतील सीटवर झोपलो तर कडाक्याची थंड रात्र मी काढू शकेन. कारच्या दारावरील बर्फ मी काढला आणि दार उघडून आत पाहिले तर आत सीटचा फक्‍त सांगाडाच तेवढा उरला होता. मग असच थोडं पुढं रस्त्यावर चालत गेल्यावर मला एक रिकामी कॅबिन दिसली. मी कसाबसा कॅबिनच्या आत गेलो, शेकोटी केली आणि फक्‍त काही तासच आराम करू शकलो. मग सकाळी उठून मला दुसऱ्‍या लॉजपर्यंत लिफ्ट मिळाली; तिथं मी भरपूर जेवलो आणि थंडीमुळे चिरलेल्या माझ्या बोटांना मलमपट्टी करू शकलो.

उत्तरेकडे यहोवा वाढ करतो

फेअरबँक्स येथे मी दिलेली पहिली भेट सर्वात उत्तेजनदायक होती. सेवेमध्ये आम्हाला बरेच यश मिळाले व रविवारच्या दिवशी सुमारे ५० लोक जाहीर भाषणाला उपस्थित होते. वर्नर आणि लरेन डेवीस राहत असलेल्या लहानशा मिशनरी गृहात आम्ही एकत्र जमलो होतो. लोक स्वयंपाक घरातून, बेडरूममधून, हॉलमधून डोके बाहेर काढून भाषण ऐकत होते. भाषण ऐकायला आलेल्या इतक्या लोकांना पाहून फेअरबँक्समध्ये प्रचार कार्याला स्थैर्य लाभण्यासाठी एका राज्य सभागृहाची आवश्‍यकता आहे, असे आम्हाला वाटले. यास्तव, यहोवाच्या मदतीने आम्ही, पूर्वी नृत्यासाठी वापरली जाणारी एक मोठी लाकडी तयार इमारत विकत घेतली आणि ती एका उचित जागेवर हलवली. एक विहीर खोदण्यात आली, बाथरूम बनवण्यात आले, आणि आतले वातावरण गरम राहावे म्हणून हिटींग युनिटही बसवण्यात आले. एक वर्षाच्या आतच, फेअरबँक्समधील राज्य सभागृह कार्य करू लागले. नंतर मग एक स्वयंपाकघर बनवण्यात आले; हे सभागृह १९५८ साली ३३० जणांची उपस्थिती असलेल्या प्रांतीय अधिवेशनासाठी वापरण्यात आले.

सन १९६० च्या उन्हाळ्यात मी, कारने न्यू यॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाला, अमेरिका आणि कॅनडा येथील सर्व प्रवासी पर्यवेक्षकांसाठी असलेल्या एका रिफ्रेशर कोर्ससाठी गेलो. तिथे असताना, बंधू नेथन नॉर आणि इतर जबाबदार पदी असलेल्या बांधवांनी, अलास्कात शाखा दफ्तर उघडण्याच्या शक्यतेबाबत माझी मुलाखत घेतली. काही महिन्यांनंतर आम्हाला लगेच ही आनंदाची बातमी ऐकायला मिळाली की सप्टेंबर १, १९६१ पासून अलास्कात स्वतःचे एक शाखा दफ्तर असेल. बंधू ॲन्ड्रू के. वॅग्नर यांना शाखेतील कामं सांभाळण्यास नेमण्यात आले. बंधू वॅग्नर आणि त्यांची पत्नी वीरा, या दोघांनी ब्रुकलिन इथं २० वर्षे सेवा केली होती; शिवाय प्रवासी कार्याचा देखील त्यांना अनुभव होता. अलास्कात शाखा दफ्तराची स्थापना झाल्यामुळे आम्हाला आनंद वाटला कारण, त्यामुळे विभागीय पर्यवेक्षकाला प्रवासात जो वेळ खर्च करावा लागायचा तो वेळ वाचला आणि तोच वेळ मंडळ्यांच्या व दूरदूरच्या क्षेत्रांतील बंधूभगिनींच्या विशेष गरजांसाठी वापरता आला.

उत्तरेतील १९६२ सालचा उन्हाळा आनंदाचा समय होता. अलास्का शाखा दफ्तराचं समर्पण झालं आणि जुनोजू, अलास्का येथे एक प्रांतीय अधिवेशन होतं. जुनोजू आणि व्हाईटहॉर्स, युकॉन येथे नवीन राज्य सभागृहे बांधण्यात आली आणि दूरवरचे अनेक नवीन गट बनवण्यात आले.

कॅनडाला परतणे

कॅनडातील मार्ग्रीटा पेट्रस हिच्याबरोबर मी अनेक वर्षे पत्रव्यवहार करत होतो. तिला सर्वजण रिटा म्हणायचे; रिटाने १९४७ साली पायनियर सेवा सुरू केली होती, १९५५ साली गिलियडमधून पदवीधर होऊन ती कॅनडाच्या उत्तरेकडील भागात पायनियरींग करीत होती. मी तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने मला होकार दिला. १९६३ साली, व्हाईटहॉर्समध्ये आमचे लग्न झाले. त्या वर्षात मला कॅनडाच्या पश्‍चिमेकडे विभागीय कार्यासाठी नेमण्यात आले आणि तेथे आम्ही पुढील २५ वर्षें सेवा केली.

पण, आमच्या तब्येतीमुळे आम्हाला १९८८ साली विनीपेग, मॅनिटोबा मध्ये खास पायनियर म्हणून नेमण्यात आले. याशिवाय सुमारे पाच वर्षांपर्यंत एका संमेलन गृहाची काळजी देखील घ्यायची होती. सध्या, आम्ही होता होईल तितके शिष्य बनवण्याच्या कार्यात आनंदाने भाग घेतो. विभागीय कार्यात असताना आम्ही पुष्कळ बायबल अभ्यास इतरांना सुरू करून दिले होते. आता, यहोवाच्या अपात्र कृपेमुळे आम्ही बायबल अभ्यास सुरू करतोच शिवाय, या विद्यार्थ्यांनी समर्पण आणि बाप्तिस्म्यापर्यंतची प्रगती केल्याचे पाहूनही आम्हाला आनंद वाटतो.

यहोवाची सेवा हा जीवनातला सर्वात उत्तम मार्ग आहे, याची मला खात्री पटली आहे. हा मार्ग अर्थपूर्ण आहे, समाधान देणारा आहे व या मार्गावर राहिल्याने यहोवाबद्दल आपले प्रेम दिवसेंदिवस अधिक गहिरे होत जाते. या सर्वांमुळे मग खरा आनंद मिळतो. आम्हाला कोणतीही ईश्‍वरशासित नेमणूक मिळो, किंवा पृथ्वीच्या पाठीवर आम्ही कोठेही असलो तरी, “ज्या लोकांचा देव [“यहोवा,” NW] आहे ते धन्य!” या स्तोत्रकर्त्याच्या शब्दांशी आम्ही पूर्ण सहमत आहोत.—स्तोत्र १४४:१५.

[२४ पानांवरील चित्र]

विभागीय कार्यात असताना

[२५ पानांवरील चित्र]

डॉसन सिटीत हेन्री लपीन यांना भेटताना. मी डावीकडे आहे

[२६ पानांवरील चित्र]

अँकरेजमधील पहिले राज्य सभागृह

[२६ पानांवरील चित्र]

रिटा आणि मी, १९९८ साली