व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दारिद्र्‌यावर कायमचा उपाय शोधणे

दारिद्र्‌यावर कायमचा उपाय शोधणे

दारिद्र्‌यावर कायमचा उपाय शोधणे

जगभरातील नकारात्मक अहवालांव्यतिरिक्‍त काहींना अशी खात्री वाटते की, काही तरी निश्‍चित करता येऊ शकते. उदाहरणार्थ, मनिला बुलेटिन यातील एका ठळक मथळ्यानुसार, एशिया डेव्हेलपमेंट बँकेने असा अहवाल दिला की, “आशिया २५ वर्षांत दारिद्र्‌याचा नायनाट करू शकते.” दारिद्र्‌याच्या खाईतून लोकांना वर काढण्यासाठी या बँकेने अर्थव्यवस्थेत वाढ करण्याचे सुचवले.

इतर संस्थांनी आणि सरकारांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजनांची मोठी यादी मांडली आहे. त्यांच्यापैकी काही उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत: सामाजिक विमा कार्यक्रम, सुधारित शिक्षण, विकसनशील देशांना औद्योगिक राष्ट्रांना द्यावयाचे कर्ज माफ करणे, आयातातील अडथळे दूर करणे जेणेकरून गरिबांची अधिक संख्या असलेली राष्ट्रे सहजपणे आपल्या उत्पादनांची विक्री करू शकतील आणि गरिबांकरता कमी पगाराच्या घरांची व्यवस्था.

२००० सालात, संयुक्‍त राष्ट्रसंघ महासभेने २०१५ सालापर्यंत साध्य करावयाची काही ध्येये नेमून दिली. यामध्ये अति दारिद्र्‌य आणि उपासमार तसेच राष्ट्रांमध्ये मिळकतीतील मोठी असमानता यांचा नायनाट करणे समाविष्ट होते. या ध्येयांमागचे हेतू कितीही चांगले असले तरी आजच्या ऐक्यहीन जगात ते खरोखर साध्य करता येतील याविषयी अनेकांना शंका वाटते.

दारिद्र्‌यावर काही व्यावहारिक उपाय

जागतिक प्रमाणावर खरोखर प्रगती होण्याची आशा फारच पुसट असल्यामुळे एखाद्याला कोठून साहाय्य मिळू शकेल? आधी सांगितल्याप्रमाणे, व्यावहारिक सुज्ञानाचा एक स्रोत आहे ज्याद्वारे आज लोकांना मदत मिळू शकते. तो कोणता? तो स्रोत म्हणजे देवाचे वचन अर्थात बायबल.

बायबल हे माहितीच्या इतर स्रोतांपासून वेगळे कसे आहे? ते सर्वोच्च अधिकारी अर्थात आपला निर्माणकर्ता याच्याकडून आलेले पुस्तक आहे. त्याने त्यात सर्व लोकांना, सर्व ठिकाणी आणि सर्व वेळी लागू होणारी सुज्ञानाची रत्ने अर्थात व्यावहारिक तत्त्वे समाविष्ट केली आहेत. या तत्त्वांचा अवलंब केल्यास, गरिबांना सध्याही समाधानकारक जीवन जगायला मदत मिळू शकेल. आपण काही उदाहरणे पाहू या.

पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा. बायबल म्हणते: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” (उपदेशक ७:१२) याचा काय अर्थ होतो? पैसा सर्वकाही नाही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात सुरक्षा मिळते हे खरे आहे. त्यामुळे आपण आवश्‍यक वस्तू खरेदी करू शकतो परंतु त्याच्याही काही मर्यादा आहेत. पैशाने विकत घेता येऊ शकत नाहीत अशा काही बहुमोलाच्या गोष्टी आहेत. या गोष्टीची जाणीव ठेवल्याने भौतिक वस्तूंबद्दल आपण योग्य दृष्टिकोन बाळगू शकू आणि त्यामुळे केवळ पैसा कमावण्यात दंग असलेल्यांच्या जीवनात होणाऱ्‍या निराशा टाळू शकू. पैशाने जीवन विकत घेता येऊ शकत नाही पण सुज्ञतेने वागल्याने सध्याच्या जीवनाचे संरक्षण करता येऊ शकेल आणि अनंत जीवन मिळवण्याची संधीही आपल्याला प्राप्त करता येईल.

अंथरूण पाहून पाय पसरा. आपल्या इच्छा व आपल्या गरजा सारख्या नसतात. गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. एखादी वस्तू आपल्याला हवी असते पण त्याची खरोखर गरज नसते तेव्हा त्या वस्तूची आपल्याला गरज आहे अशी आपण स्वतःची खात्री सहजरित्या पटवू शकतो. एक सुज्ञ व्यक्‍ती सर्वात आधी महत्त्वाच्या गरजांवर—जसे की, अन्‍न, कपडे, निवारा वैगरेंवर आपला पगार खर्च करेल. मग, अतिरिक्‍त खर्च करण्याआधी, त्याच्याजवळ उरलेला पैसा आणखी काही वस्तू घेण्यास पुरेसा आहे का याचा तो विचार करेल. येशूने आपल्या एका दाखल्यात, एका व्यक्‍तीने “अगोदर बसून . . . खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ . . . ऐपत आहे की नाही” हे पाहावे असे सुचवले.—लूक १४:२८.

फिलिपाईन्समध्ये युफ्रोसिना नामक तीन मुलांची एक एकटी माता आहे. तिच्या पतीने तिला काही वर्षांआधी सोडून दिल्यापासून कुटुंबासाठी पैसा कमवून काटकसर करणे किती त्रासदायक आहे हे तिने अनुभवले आहे. असे करताना, तिने आपल्या मुलांना बजेटमधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे ओळखण्यास शिकवले आहे. उदाहरणार्थ, मुले आपल्या आवडीच्या काही गोष्टी पाहतील. तेव्हा त्यांना केवळ नाही म्हणण्याऐवजी ती त्यांच्याशी असा तर्क करते: “तुला आवडलं असेल तर तू ते घेऊ शकतो, पण तुला काही तरी एक निवडावं लागेल. आपल्याजवळ फक्‍त एकाच वस्तूसाठी पैसे आहेत. एकतर तुला ही आवडलेली वस्तू आपण घेऊ शकतो किंवा आठवड्याभरात आपल्या जेवणासाठी हवे असलेले मांस किंवा भाज्या आपण घेऊ शकतो. मग, तुला काय हवंय? तूच निर्णय घे.” सहसा, मुलांना लगेच कळते की, इतर कोणत्याही वस्तूपेक्षा जेवण असलेले बरे.

तृप्त असा. “आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे,” असे आणखी एक बायबलचे तत्त्व आहे. (१ तीमथ्य ६:८) केवळ पैसा आनंद मिळवून देत नाही. बरेच श्रीमंत लोक दुःखी आहेत आणि बरेच गरीब लोक आनंदी आहेत. या गरिबांनी जीवनात आवश्‍यक असलेल्या मोजक्या गोष्टींमध्ये समाधानी असण्यास शिकले आहे. येशूने ‘निर्दोष डोळ्याविषयी’ सांगितले जो अधिक महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित असतो. (मत्तय ६:२२) यामुळे एखाद्या व्यक्‍तीला तृप्त असायला मदत मिळते. बरेच गरीब लोक समाधानी आहेत कारण देवासोबत त्यांचा चांगला नातेसंबंध आहे आणि त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी असते—या गोष्टी पैशाने विकत घेता येऊ शकत नाहीत.

ही केवळ बायबलमधील व्यावहारिक सल्ल्यांची एक-दोन उदाहरणे आहेत ज्यामुळे गरिबांना आपल्या परिस्थितीचा सामना करायला मदत मिळू शकते. असे पुष्कळ सल्ले आहेत. उदाहरणार्थ, धूम्रपान व जुगार यांसारख्या वाईट सवयी टाळा ज्यामुळे पैसा वाया जातो; जीवनातल्या महत्त्वपूर्ण गोष्टी ओळखा, खासकरून आध्यात्मिक ध्येये; नोकरीचा तुटवडा असतो तेथे एखादे कौशल्य किंवा सेवा सादर करा ज्याची इतरांना गरज आहे. (नीतिसूत्रे २२:२९; २३:२१; फिलिप्पैकर १:९-११) “व्यावहारिक बुद्धी व विचारशक्‍ती” यांचा उपयोग करण्यास बायबल सुचवते कारण “ती [तुमच्या] आत्म्याला जीवन” अशी होतील.—नीतिसूत्रे ३:२१, २२, NW.

गरिबीत दिवस काढणाऱ्‍यांना बायबलमधील सल्ल्यांमुळे थोडीफार मदत होऊ शकते तरीपण भविष्याविषयी शंका उरतातच. गरीब लोक दारिद्र्‌याच्या कचाट्यात सर्वकाळ राहतील का? अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत गरीब यांच्यातील असमानता कधी नाहीशी होईल का? पुष्कळांना ज्याविषयी माहीत नाही असा एक उपाय आपण पाहू या.

बायबलमध्ये आशेचा किरण

पुष्कळांच्या मते, बायबल एक चांगला ग्रंथ आहे. परंतु, त्यांना हे माहीत नाही की, त्यामध्ये लवकरच होणाऱ्‍या प्रचंड बदलांविषयीचे तपशील दिले आहेत.

देव, मानवजातीच्या समस्या सोडवण्यासाठी पावले उचलणार आहे; यात गरिबीची समस्या देखील सोडवली जाईल. मानवी सरकारे हे करण्यास एकतर असमर्थ ठरली आहेत किंवा इतकी इच्छुक नाहीत त्यामुळे त्यांना बदलून टाकण्याची देवाची इच्छा आहे. हे कसे घडेल? दानीएल २:४४ येथे बायबल ठासून सांगते: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”

ही सर्व ‘राज्ये’ किंवा सरकारे काढून टाकल्यावर देवाने स्वतः नियुक्‍त केलेला शासक कार्य करील. तो शासक कोणी मानव नव्हे तर खुद्द देवासमान एक शक्‍तिशाली स्वर्गीय व्यक्‍ती आहे ज्याच्याजवळ सद्य काळातील असमानता काढून टाकण्यासाठी मोठे बदल घडवून आणण्याची ताकद आहे. देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला हे करण्यासाठी नियुक्‍त केले आहे. (प्रेषितांची कृत्ये १७:३१) स्तोत्र ७२:१२-१४ मध्ये हा शासक काय करील त्याचे वर्णन केले आहे: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्र्‌यांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.” केवढे अद्‌भुत भवितव्य! सरतेशेवटी साहाय्य मिळेल! देवाचा नियुक्‍त शासक गरिबांच्या आणि दीनांच्या वतीने कार्य करील.

त्या वेळी दारिद्र्‌याशी संबंधित असलेल्या अनेक समस्या सोडवल्या जातील. स्तोत्र ७२ च्या १६ व्या वचनात म्हटले आहे: “भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.” दुष्काळ, पैशांचा अभाव किंवा व्यवस्थापनातील त्रुटी यांमुळे पुन्हा कधीच अन्‍न टंचाई होणार नाही.

इतरही समस्या सोडवल्या जातील. उदाहरणार्थ, आज पृथ्वीवरील अधिकांश लोकांना स्वतःचे म्हणता येईल असे घर नाही. परंतु, देव असे अभिवचन देतो: “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.” (यशया ६५:२१, २२) प्रत्येकाचे स्वतःचे घर असेल आणि प्रत्येकाला आपल्या कामात आनंद वाटेल. अशाप्रकारे, दारिद्र्‌यावर एक पूर्ण आणि कायमचा उपाय काढण्याचे वचन देव देतो. श्रीमंत आणि गरीब यांच्यातला प्रचंड फरक उरणार नाही, नुसते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोणालाही संघर्ष करावा लागणार नाही.

बायबलमधील या अभिवचनांविषयी पहिल्यांदाच ऐकल्यावर हे वास्तविक नाही असे तुम्हाला वाटू शकेल. परंतु, बायबलचे बारकाईने परीक्षण केल्यावर हे लक्षात येईल की, गतकाळात देवाची सर्व अभिवचने पूर्ण झाली. (यशया ५५:११) त्यामुळे, हे घडेल तर चा प्रश्‍न नाही. उलट, खरा प्रश्‍न हा आहे की, ते घडेल तेव्हा त्याचा फायदा उचलण्यासाठी तुम्ही काय करावे?

तुम्ही तेथे असाल का?

ते सरकार देवाचे असेल त्यामुळे आपण देवाला त्या शासनाखालचे स्वीकारणीय नागरिक होण्याची गरज आहे. यासाठी आपण पात्र कसे ठरू शकतो हे देवाने लपवून ठेवलेले नाही. बायबलमध्ये त्याबद्दल मार्गदर्शन दिले आहे.

नियुक्‍त शासक अर्थात देवाचा पुत्र नीतिमान आहे. (यशया ११:३-५) त्यामुळे, या सरकाराखाली जीवन देण्याकरता ज्यांना स्वीकारले जाते त्यांच्याकडून नीतिमान असण्याचीही अपेक्षा केली जाते. नीतिसूत्रे २:२१, २२ म्हणते: “सरळ जनच देशांत वस्ती करितील; सात्विक जन त्यांत राहतील. दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्‍यांचे त्यांतून निर्मूलन होईल.”

या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील हे शिकून घेण्याचा काही मार्ग आहे का? निश्‍चितच आहे. बायबल वाचून त्यातील मार्गदर्शनांवर अंमल केल्याने तुम्ही हे अद्‌भुत भवितव्य मिळवू शकाल. (योहान १७:३) याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी यहोवाचे साक्षीदार तुम्हाला आनंदाने मदत करतील. या संधीचा फायदा उचलून दारिद्र्‌य आणि अन्याय विरहित समाजाचा भाग बनण्याचे आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो.

[५ पानांवरील चित्र]

युफ्रोसिना: “एक निश्‍चित बजेट राखल्याने माझ्या कुटुंबाला आवश्‍यक त्या वस्तू मिळतात”

[६ पानांवरील चित्रे]

देवासोबत चांगला नातेसंबंध आणि आनंदी कौटुंबिक जीवन हे पैशाने खरेदी करता येत नाही