धीर आणि चिकाटीचे उत्तम प्रतिफळ
राज्य घोषकांचा वृत्तान्त
धीर आणि चिकाटीचे उत्तम प्रतिफळ
येशू ख्रिस्ताने भाकीत केले की शेवटल्या दिवसांत, “पुष्कळांची प्रीति थंडावेल.” यामुळेच, जगाच्या अनेक भागांतील लोकांना आज सर्वसाधारणतः राज्य सुवार्तेबद्दल आस्था नाही. काहींना तर धर्माचा तिटकारा वाटतो.—मत्तय २४:१२, १४.
तरीसुद्धा, विश्वास आणि धीर दाखवून देवाच्या राज्याचे प्रचारक समोर येणाऱ्या अडचणीला यशस्वीपणे तोंड देत आहेत; चेक प्रजासत्ताक येथून आलेल्या पुढील अनुभवावरून हे दिसून येते.
दोन साक्षीदार बहिणी एका स्त्रीशी बोलल्या जिने दार उघडले नाही. काही वेळानंतर, त्या स्त्रीने थोडेसेच दार उघडले आणि दाराच्या फटीतून तिने साक्षीदार बहिणींच्या हातातली टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके घेतली. मग तिने “धन्यवाद” म्हटले आणि दार बंद झाले. साक्षीदार बहिणी विचार करू लागल्या: “या स्त्रीला पुन्हा भेट द्यावी का?” बहिणींपैकी एक जी पायनियर अर्थात पूर्ण वेळेची सेविका आहे तिने पुन्हा जायचे ठरवले; पण पुन्हा तेच झाले आणि असे एक वर्षभर होत राहिले.
या पायनियर बहिणीने वेगळी पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला आणि तिने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली. पुढच्या वेळी ती त्या स्त्रीला नियतकालिके द्यायला गेली तेव्हा तिने तिला विचारले: “तुम्ही कसे आहात? तुम्हाला मासिकं आवडलीत का?” सुरवातीला, काही उत्तर येत नव्हतं; पण नंतरच्या भेटींमध्ये ती स्त्री जरा बोलू लागली. एकदा तिने दार सताड उघडले पण बोलणे मात्र कमीच झाले.
ही स्त्री बोलण्यास कुचराई करत आहे हे पाहून पायनियर बहिणीने तिला पत्राद्वारे, आपल्या येण्यामागचा उद्देश समजावण्याचे व तिला गृह बायबल अभ्यासाविषयी सांगण्याचे ठरवले. सरतेशेवटी, दीड वर्षानंतर, या बहिणीला त्या स्त्रीबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करता आला. या स्त्रीने म्हटले, “तुम्ही माझ्यासाठी मासिके आणायला लागल्यापासून मी देवावर विश्वास करू लागले.” हे ऐकून बहिणीला खूप आश्चर्य तर वाटलेच, पण प्रोत्साहनही मिळाले.
होय, राज्य प्रचाराच्या व शिष्य बनवण्याच्या कार्यात धीर आणि चिकाटीचे उत्तम प्रतिफळ मिळते.—मत्तय २८:१९, २०.