व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

व्यवहारचातुर्य दाखवण्याची कला आत्मसात करणे

व्यवहारचातुर्य दाखवण्याची कला आत्मसात करणे

व्यवहारचातुर्य दाखवण्याची कला आत्मसात करणे

पेगीने पाहिले, की आपला थोरला मुलगा आपल्या धाकट्या भावाला घालून-पाडून बोलत होता. तिने त्याला विचारले: “तू तुझ्या धाकट्या भावाबरोबर जसं बोललास ते बरोबर होतं असं तुला वाटतं का? त्याला किती वाईट वाटलं, पाहा जरा.” पेगीने असे का म्हटले? पेगी आपल्या मुलाला व्यवहारचातुर्याने वागण्याची आणि इतरांच्या भावनांची कदर करण्याची कसब शिकवण्याचा प्रयत्न करीत होती.

प्रेषित पौलाने, आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सोबत्याला अर्थात तीमथ्याला “सर्वांबरोबर सौम्य [किंवा “व्यवहारचातुर्य वापरून वागावे”] असे उत्तेजन दिले. (२ तीमथ्य २:२४) व्यवहारचातुर्याचा अर्थ काय होतो? याबाबतीत तुम्ही सुधारणा कशी करू शकता? आणि इतरांना ही कला आत्मसात करण्यास तुम्ही मदत कशी करू शकता?

व्यवहारचातुर्य म्हणजे काय?

व्यवहारचातुर्य म्हणजे, “एखाद्या परिस्थितीचा नाजुकपणा समजण्याची आणि सर्वात दयाळू व उचित मार्गाने बोलण्याची कुवत.” व्यवहारचातुर्य यासाठी असलेला इंग्रजी शब्द मुळात, स्पर्श याला सूचित करतो. संवेदनक्षम बोटांना जसे, चिकट, मऊ, गुळगुळीत, गरम किंवा केसाळ असलेले काहीही जाणवते तसे, व्यवहारचातुर्य असलेल्या व्यक्‍तीला इतरांच्या भावना कळतात आणि स्वतःच्या बोलण्याचा व कार्याचा इतरांवर कसा प्रभाव पडतो, हे समजते. परंतु ही केवळ एक कलाच नव्हे तर यात, इतरांना दुःख देण्याचे टाळण्याची मनापासून इच्छा असणे देखील समाविष्ट आहे.

बायबलमध्ये, व्यवहारचातुर्याचा अभाव असलेला अलीशाचा सेवक गेहजी याचे उदाहरण दिले आहे. एक शूनेमकरीण जिच्या मुलाने नुकताच तिच्या मांडीवर आपला प्राण सोडला होता, सांत्वन मिळण्यासाठी अलीशाकडे गेली. तिची ख्यालीखुशाली विचारल्यावर तिने उत्तर दिले: “सर्व खुशाल आहेत.” परंतु ती जेव्हा संदेष्टा अलीशाजवळ आली तेव्हा “गेहजी तिला एकीकडे लोटावयास जवळ गेला.” पण अलीशाने त्याला म्हटले: “तिला हात लावू नको, तिचे मन व्याकुळ झाले आहे.”—२ राजे ४:१७-२०, २५-२७.

गेहजी इतक्या अविचारीपणे व व्यवहारचातुर्य न वापरता कसा काय वागला? या स्त्रीला ख्यालीखुशाली विचारल्यावर तिने आपल्या भावना व्यक्‍त केल्या नाहीत हे खरे आहे. पण, पुष्कळ लोक सगळ्यांजवळच आपल्या भावना व्यक्‍त करीत नाहीत. या स्त्रीची व्याकुळ मनःस्थिती काही अंशी तरी दिसत असावी. अलीशाने ती ओळखली, पण गेहजीला ओळखता आली नाही किंवा कदाचित त्याने मुद्दामहून त्याकडे दुर्लक्ष केले असावे. यावरून, व्यवहारचातुर्याचा उपयोग न करता वागण्याचे एक सर्वसामान्य कारण अगदी स्पष्टपणे दिसते. एखाद्याला आपल्या कामाच्या महत्त्वाची फाजील काळजी लागलेली असते तेव्हा तो, त्याचा ज्या लोकांशी संपर्क येतो त्या लोकांच्या गरजा ओळखण्यास किंवा त्या समजण्यास चुकतो. तो त्या बस ड्रायव्हरप्रमाणे असतो जो वेळेवर पोंहचण्यासाठी मार्गावरील बस थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांकरता बस न थांबवताच निघून जातो.

व्यवहारचातुर्य नसलेल्या गेहजीप्रमाणे न होण्याकरता आपण, लोकांबरोबर दयाळुपणे वागण्याचा होता होईल तितका प्रयत्न केला पाहिजे कारण लोकांना काय वाटत असते हे आपल्याला नक्की माहीत नसते. एखाद्या व्यक्‍तीच्या भावना प्रकट करणाऱ्‍या लक्षणांबद्दल आपण नेहमी जागृत असले पाहिजे आणि दयाळुपणे बोलण्याद्वारे व कार्य करण्याद्वारे प्रतिक्रिया दाखवली पाहिजे. याबाबतीत तुम्ही तुमची कसब कशी सुधारू शकता?

इतरांच्या भावना समजणे

येशू, लोकांच्या भावना समजण्यात आणि होता होईल तितक्या दयाळुपणे त्यांना वागवण्यात उल्लेखनीय होता. एकदा तो शिमोन नावाच्या एका परूशाच्या घरी जेवत होता तेव्हा तेथे एक स्त्री आली जी “त्या गावात . . . पापी स्त्री” होती. शूनेमकरीणीप्रमाणे ही स्त्री देखील काही बोलली नाही, पण तिने ज्याप्रकारे कार्य केले त्यावरून येशूला तिच्या भावनांबद्दल पुष्कळसे कळले. “ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.” या सर्वाचा काय अर्थ होतो, हे येशूला कळले. शिमोन काही बोलला नाही परंतु तो मनात काय म्हणत होता ते येशूला समजले: “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”—लूक ७:३७-३९.

या प्रसंगी येशूने त्या स्त्रीला धुडकावले असते किंवा तो शिमोनाला जर असे म्हणाला असता, की: “हे, भावनाशून्य माणसा, ती पश्‍चात्ताप करत आहे, हे तुला दिसत नाही का?” तर त्याचा परिणाम किती वाईट झाला असता याची तुम्ही कल्पना करू शकता का? त्याऐवजी येशूने व्यवहारचातुर्याचा उपयोग करून शिमोनाला एका माणसाचे उदाहरण दिले ज्याने, खूप कर्जात बुडालेल्या एका व्यक्‍तीचे आणि कमी कर्ज असलेल्या दुसऱ्‍या एका व्यक्‍तीचे कर्ज माफ केले. मग येशूने विचारले: “त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीति करील?” शिमोनाची अप्रत्यक्षपणे टीका करण्याऐवजी, त्याने दिलेल्या बरोबर उत्तराबद्दल येशूने त्याची प्रशंसा केली. मग अगदी दयाळुपणे येशूने, त्या स्त्रीची खरी भावना दर्शवणारी अनेक लक्षणे आणि पश्‍चात्ताप व्यक्‍त करणारे तिचे कार्य समजण्यास शिमोनाला मदत केली. येशू स्त्रीकडे वळाला आणि दयाळुपणे तिला सूचित केले की त्याला तिच्या भावना समजल्या होत्या. त्याने तिला सांगितले, की तिची पापे क्षमा करण्यात आली होती; तो तिला म्हणाला: “तुझ्या विश्‍वासाने तुला तारिले आहे, शांतीने जा.” येशूच्या या व्यवहारचतुर शब्दांमुळे तिला जे बरोबर आहे ते करण्याचा तिचा निश्‍चय आणखी पक्का करण्याचे उत्तेजन मिळाले असावे! (लूक ७:४०-५०) येशू यशस्वीपणे व्यवहारचातुर्य दाखवू शकला होता कारण, लोकांच्या काय भावना आहेत हे त्याने पाहिले होते आणि कनवाळूपणे त्याने त्यांना प्रतिक्रिया दाखवली होती.

येशूने जशी शिमोनाला मदत केली तसेच आपणही, इतरांच्या भावनांची मूक भाषा समजण्यास शिकू शकतो आणि इतरांना ती समजण्यास शिकवू शकतो. कधीकधी अनुभवी सेवक सत्यात आलेल्या नवीन बंधूभगिनींना ख्रिस्ती सेवेत ही कला शिकवू शकतात. सुवार्ता सांगितल्यानंतर, ते घरमालकाच्या भावनांची लक्षणे पडताळून पाहू शकतात. घरमालक लाजाळू, शंकेखोर, संतप्त की व्यस्त होता? त्याला मदत करण्याचा सर्वात दयाळू मार्ग कोणता असू शकतो? व्यवहारचातुर्याचा उपयोग न केल्यामुळे एकमेकांचे मन दुखवलेल्या बंधूभगिनींना देखील वडीलजन मदत करू शकतात. प्रत्येकाला एकमेकांच्या भावना समजण्यास मदत करा. समोरच्या व्यक्‍तीला अपमानित झाल्यासारखे, तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखे किंवा गैरसमज झाल्यासारखे वाटते का? दयाळुपणा दाखवल्यामुळे तिला बरे वाटेल का?

पालकांनी आपल्या मुलांना सहानुभूती दाखवण्यास शिकवले पाहिजे कारण या गुणामुळे ते व्यवहारचातुर्य दाखवण्यास प्रवृत्त होतील. लेखाच्या सुरवातीला उल्लेखलेल्या पेगीच्या थोरल्या मुलाने आपल्या धाकट्या भावाचा हिरमुसलेला, रडका चेहरा, त्याचे डबडबलेले डोळे पाहिले तेव्हा त्याला आपल्या भावाला किती वाईट वाटले आहे हे जाणवले. त्याच्या आईने अपेक्षा केल्याप्रमाणे, त्याला पस्तावा झाला आणि त्याने स्वतःत बदल करण्याचे ठरवले. पेगीच्या दोन्ही मुलांनी लहानपणी मिळालेल्या बाळकडूचा चांगला उपयोग केल्यामुळे मोठेपणी ते सफल शिष्य-बनवणारे आणि ख्रिस्ती मंडळीत मेंढपाळ बनू शकले.

तुम्ही समंजस असल्याचे दाखवा

तुम्हाला कोणाविरुद्ध तक्रार असेल तर अशा वेळी खासकरून व्यवहारचातुर्य दाखवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे अशा व्यक्‍तीच्या स्वाभिमानाला तुम्ही सहजरीत्या ठेच पोहंचवू शकता. सर्वांत पहिल्यांदा, त्या व्यक्‍तीच्या चांगल्या कामाविषयी प्रशंसा करणे उचित आहे. मग तिची टीका करण्यापेक्षा समस्या सोडवण्यावर लक्ष ठेवा. तिच्या कोणत्या कार्यांमुळे तुम्ही नाराज होता आणि तिने स्वतःत नेमकी कोणती सुधारणा केली पाहिजे ते तिला समजावून सांगा. मग, तिचे बोलणे ऐकून घेण्यास तयार असा. कदाचित असे होऊ शकते की तुमचा गैरसमज झालेला असेल.

आपला दृष्टिकोन समजून घ्यावा असे लोकांना वाटते; इतरजण त्याजशी सहमत नसले तरीसुद्धा. येशूने व्यवहारचातुर्याचा उपयोग करून मार्थाची कळकळ त्याला समजल्याचे दाखवले. तो मार्थाला म्हणाला: “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस.” (लूक १०:४१) तसेच, एखादी व्यक्‍ती तुम्हाला तिच्या एखाद्या समस्येविषयी सांगत असते तेव्हा, तिचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच तिला समस्येवर तोडगा सुनावण्याऐवजी, तुम्हाला त्या व्यक्‍तीची समस्या समजली आहे हे तिला कुशलपणे दाखवून देण्याकरता तुम्ही तिची समस्या अथवा तक्रार तुमच्या शब्दांत पुन्हा बोलून दाखवू शकता. तुम्ही समंजस आहात हे दाखवण्याचा हा एक दयाळू मार्ग आहे.

काय बोलू नये ते समजून घ्या

एस्तेर राणीला, यहुद्यांचा नायनाट करण्यासाठी हामानाने रचलेला कट हाणून पाडावा, असे आपल्या पतीला सांगायचे होते तेव्हा तिने व्यवहारचातुर्याचा उपयोग करून आनंदी वातावरण निर्माण केले जेणेकरून तिचा नवरा चांगल्या मनःस्थितीत असेल. त्यानंतरच तिने हा नाजूक विषय त्याच्यासमोर मांडला. तिने काय म्हटले नाही याकडेही आपण लक्ष दिल्यास, आपल्याला पुष्कळ काही शिकता येईल. या दुष्ट कटात, आपल्या पतीचीही भागीदारी होती याचा उल्लेख त्याच्यासमोर करण्याचे तिने व्यवहारचातुर्याचा उपयोग करून टाळले.—एस्तेर ५:१-८; ७:१, २; ८:५.

तसेच, एखाद्या ख्रिस्ती भगिनीच्या सत्यात नसलेल्या पतीला भेटायला गेल्यावर, लगेचच बायबल उघडून त्याला प्रचार करण्यापेक्षा, व्यवहारचातुर्याचा उपयोग करून त्याला कोणकोणत्या गोष्टींत आवड आहे याची विचारपूस करण्यास काय हरकत आहे? एखादी अनोळखी व्यक्‍ती राज्य सभागृहात साध्या पोषाखात येते किंवा एखादा बंधू अथवा भगिनी बऱ्‍याच दिवसांनी सभेला येते तेव्हा अशा लोकांना त्यांच्या पोषाखाविषयी किंवा त्यांच्या अनुपस्थितीविषयी शेरा मारण्याऐवजी त्यांचे प्रेमळपणे स्वागत करा. आणि, एखादी नवीन आस्थेवाईक व्यक्‍ती चुकीचा विचार बाळगते तेव्हा तिथल्या तिथे तिला सुधारण्याचे टाळा. (योहान १६:१२) व्यवहारचातुर्य दाखवण्यामध्ये, काय बोलू नये हे ओळखून दयाळुपणे वागणे समाविष्ट आहे.

बरे करणारे बोल

व्यवहारचातुर्याचा उपयोग करून बोलण्याची कसब शिकल्याने तुम्हाला इतरांबरोबर तसेच तुमच्या हेतूंविषयी गैरसमज झाल्यामुळे तुमच्यावर खूपच नाराज झालेल्या व तुमचा राग येणाऱ्‍या व्यक्‍तींबरोबरही शांतीपूर्ण नातेसंबंध ठेवता येऊ शकतील. उदाहरणार्थ, एफ्राइमी पुरुष गिदोनाशी “हुजत घालू लागले” तेव्हा व्यवहारचातुर्याचा उपयोग करून गिदोनाने त्यांना उत्तर दिले, शिवाय नेमके काय घडले होते याचे त्याने स्पष्ट वर्णन केले तसेच एफ्राइमी पुरुषांनी काय मिळवले होते याविषयी त्याने आपले प्रामाणिक मत व्यक्‍त केले. गिदोनाने व्यवहारचातुर्याचा उपयोग केला होता असे आपण म्हणू शकतो कारण, एफ्राइमी लोक का चिडले होते हे त्याने ओळखले होते आणि त्याच्या सौम्य वर्तनामुळे त्यांचा राग शमला.—शास्ते ८:१-३; नीतिसूत्रे १६:२४.

तुमच्या बोलण्याचा लोकांवर कसा परिणाम होतो याचा नेहमी विचार करण्याचा प्रयत्न करा. व्यवहारचातुर्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला नीतिसूत्रे १५:२३ मध्ये वर्णन केलेला आनंद उपभोगता येईल: “मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम!”

[३१ पानांवरील चित्र]

पालक इतरांबद्दल सहानुभूती बाळगण्यास आपल्या मुलांना शिकवू शकतात

[३१ पानांवरील चित्र]

अनुभवी ख्रिस्ती सेवक नवीन लोकांना व्यवहारचातुर्याचा उपयोग करण्यास शिकवू शकतात