व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्हाला आठवते का?

तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? तर मग, पुढील प्रश्‍नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:

• कोणकोणत्या बाबतीत रूथ एक उत्तम उदाहरण होती?

यहोवाबद्दल प्रेम दाखवण्याच्या बाबतीत, नामीला एकनिष्ठ प्रीती दाखवण्याच्या बाबतीत आणि कामासूपणा व नम्रता दाखवण्याच्या बाबतीत ती एक उदाहरण होती. यामुळेच तर लोक तिला “सद्‌गुणी स्त्री” समजत होते. (रूथ ३:११)—४/१५, पृष्ठे २३-६.

यहोवा सामान्य लोकांची काळजी घेतो हे आपल्याला कसे माहीत होते?

ईजिप्तमध्ये ज्यांना क्रूरपणे वागवण्यात आले होते त्या इस्राएली लोकांना त्याने सांगितले की त्यांनी सामान्य लोकांना गैरवागणूक देऊ नये. (निर्गम २२:२१-२४) आपल्या पित्याचे अनुकरण करणाऱ्‍या येशूने सामान्य लोकांमध्ये आस्था दाखवली; व जे “निरक्षर व अज्ञानी इसम” होते अशांना त्याने आपले प्रेषित होण्यासाठी निवडले. (प्रेषितांची कृत्ये ४:१३; मत्तय ९:३६) इतरांबद्दल जसे की तरुणांबद्दल काळजी व्यक्‍त करण्याद्वारे आपण देवाचे अनुकरण करू शकतो.—४/१५, पृष्ठे २८-३१.

आपण जे काही करतो ते यहोवा पाहतो, असा विश्‍वास करण्यामागे काय कारण आहे?

बायबल अहवाल दाखवतो, की मानवाने साध्य केलेल्या गोष्टी यहोवा पाहतो. हाबेलाचे अर्पण त्याने पाहिले, आणि आपण जे ‘स्तुतीचे यज्ञ’ अर्पण करतो तेही तो पाहतो. (इब्री लोकांस १३:१५) शुद्ध, नैतिक जीवन जगण्याद्वारे हनोख आपल्याला संतुष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे, हे यहोवाला माहीत होते. सारफथच्या एका विधवेने आपल्याजवळ जे थोडेबहुत अन्‍न होते ते संदेष्टा अलीशाबरोबर वाटून खाल्ले हेही यहोवाने पाहिले. आपली विश्‍वासाची कार्ये देखील यहोवा पाहतो.—५/१, पृष्ठे २८-३१.

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर ख्रिस्ती बनलेल्या यहुद्यांना देवाला व्यक्‍तिगत समर्पण करावे लागले असे का म्हटले जाऊ शकते?

सा.यु.पू. १५१३ मध्ये प्राचीन इस्राएली लोकांचा, यहोवाबरोबर एक समर्पित नातेसंबंध प्रस्थापित झाला. (निर्गम १९:३-८) त्यानंतर, जे यहुदी जन्माला आले ते, नियमशास्त्राधीन असलेल्या समर्पित राष्ट्रात सामील झाले. परंतु, सा.यु. ३३ मध्ये ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे यहोवाने नियमशास्त्र रद्द केले. (कलस्सैकर २:१४) त्यानंतर, देवाची सेवा करणाऱ्‍या यहुद्यांना देवाची मर्जी प्राप्त करण्याकरता, देवाला समर्पण करून येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा लागला.—५/१५, पृष्ठे ३०-१.

खऱ्‍या उपासनेत आज धूप जाळला जातो का?

प्राचीन इस्राएलमध्ये, खऱ्‍या उपासनेत धूपाचा उपयोग केला जात असे. (निर्गम ३०:३७, ३८; लेवीय १६:१२, १३) परंतु, ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर, नियमशास्त्र आणि धूपाचा उपयोग बंद झाला. धार्मिक नसलेल्या कारणांसाठी धूपाचा उपयोग करावा की नाही हे आज ख्रिश्‍चन ठरवू शकतात; परंतु आज खऱ्‍या उपासनेत तो जाळला जात नाही. इतरांना ठेच पोहंचणार नाही म्हणून इतरांच्या भावनांचाही विचार करणे आवश्‍यक आहे.—६/१, पृष्ठे २८-३०.

अलीकडील कोणत्या एका बातमीमुळे अनेक जण, येशू या पृथ्वीवर होता या वास्तविकतेचा विचार करायला प्रवृत्त झाले आहेत?

इस्राएलमध्ये सापडलेल्या एका पेटीला, अर्थात एका अस्थिपेटीला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. ती पहिल्या शतकातील पेटी आहे असे दिसते, आणि त्यावर “याकोब, योसेफाचा पुत्र, येशूचा भाऊ” असे कोरलेले आहे. काहींच्या मते हा, येशूच्या अस्तित्वाविषयीचा बायबलच्या व्यतिरिक्‍त असलेला ‘सर्वात जुना पुरातत्त्वीय पुरावा’ आहे.—६/१५, पृष्ठे ३-४.

मानव प्रेम करायला कसे शिकतो?

आपल्या पालकांचे उदाहरण आणि प्रशिक्षण यांद्वारे मानव पहिल्यांदा प्रेम करायला शिकतात. पती-पत्नी एकमेकांना प्रेम दाखवतात, एकमेकांचा आदर करतात तेव्हा मुलेही प्रेम करायला शिकतात. (इफिसकर ५:२८; तीत २:४) एखाद्या व्यक्‍तीचे संगोपन, प्रेमाचा अभाव असलेल्या परिवारात झालेले असले तरीसुद्धा ती, पित्यासमान असलेल्या यहोवाच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करण्याद्वारे, पवित्र आत्म्याचे साहाय्य मिळवण्याद्वारे आणि ख्रिस्ती बंधूसमाजाच्या प्रेमळ आधाराच्या लाभाद्वारे प्रेम करायला शिकू शकते.—७/१, पृष्ठे ४-७.

युसेबियस कोण होता आणि त्याच्या जीवनावरून आपण कोणता धडा शिकू शकतो?

युसेबियस एक प्राचीन इतिहासकार होता व त्याने ख्रिस्ती चर्चचा इतिहास (इंग्रजी) असे शीर्षक असलेल्या दहा खंडांचा ग्रंथ सा.यु. ३२४ मध्ये पूर्ण केला. पिता पुत्राआधी अस्तित्वात होता असा युसेबियसचा विश्‍वास असला तरीसुद्धा, नायसीयाच्या परिषदेत त्याने दुसरे मत अंगीकारले. आपल्या अनुयायांनी ‘जगाचा भाग असू नये’ या येशूच्या अपेक्षेकडे त्याने दुर्लक्ष केले. (योहान १७:१६)—७/१५, पृष्ठे २९-३१.

बहुपत्नीकत्वाविषयी यहोवाने आपला दृष्टिकोन बदलला आहे का?

नाही. बहुपत्नीकत्वाविषयी यहोवाने आपला दृष्टिकोन बदललेला नाही. (मलाखी ३:६) पहिल्या मानवाने आपल्या “स्त्रीशी जडून” राहावे आणि त्या दोघांनी एकदेह व्हावे अशी देवाची व्यवस्था होती. (उत्पत्ति २:२४) येशूने म्हटले की एखादी व्यक्‍ती जर व्यभिचाराव्यतिरिक्‍त इतर कारणांसाठी आपल्या सोबत्याला घटस्फोट देऊन पुनर्विवाह करत असेल तर ती जारकर्मी आहे. (मत्तय १९:४-६, ९) ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्याबरोबर यहोवाने अनुमती दिलेल्या बहुपत्नीकत्वाच्या प्रथेचा अंत केला.—८/१, पृष्ठे २८.