व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकच खरा ख्रिस्ती विश्‍वास एक वास्तविकता

एकच खरा ख्रिस्ती विश्‍वास एक वास्तविकता

एकच खरा ख्रिस्ती विश्‍वास एक वास्तविकता

येशू ख्रिस्ताने केवळ एकाच चर्चची अथवा मंडळीची स्थापना केली. ही मंडळी एक आध्यात्मिक शरीर, आध्यात्मिक कुटुंब होती. याचा अर्थ ही देवाच्या पवित्र आत्म्याने निवडलेल्या लोकांची मिळून बनलेली मंडळी होती—सर्वांना देवाची मान्यता मिळाली होती व त्यांना त्याची “मुले” म्हणून ओळखले जायचे.—रोमकर ८:१६, १७; गलतीकर ३:२६.

येशूने अशी शिकवण दिली, की सत्याकडे व जीवनाकडे लोकांना मार्गदर्शित करण्यासाठी देवाने एकाच रस्त्याचा उपयोग केला. हे महत्त्वपूर्ण सत्य स्पष्ट करण्यासाठी, येशूने सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्‍या त्या रस्त्याची तुलना एका मार्गाशी केली. तो म्हणाला: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.”—मत्तय ७:१३, १४; योहान १४:६; प्रेषितांची कृत्ये ४:११, १२.

ऐक्य असलेली मंडळी

“आजकाल आपण कॅथलिक चर्चविषयी बोलतो तेव्हा आपल्या मनात जो विचार येतो त्याप्रमाणे आपण पहिल्या शतकातील त्या मंडळीला, जगव्याप्त, सार्वत्रिक, संघटित समाज” समजू नये, असे द न्यू डिक्शनरी ऑफ थिओलॉजी म्हणते. का समजू नये? याचे कारण सोपे आहे; “कारण असा संघटित, सार्वत्रिक समाज कधी अस्तित्वातच नव्हता.”

आरंभीची ख्रिस्ती मंडळी ही कोणत्याही प्रकारे, आज आपण पाहत असलेल्या समाजव्यवस्थेला सामावून घेतलेल्या चर्च व्यवस्थेच्या सदृश्‍य नव्हती, हे कोणीही अमान्य करणार नाही. पण ती संघटित होती. मंडळ्या स्वतंत्रपणे कार्य करीत नव्हत्या. त्यांनी, जेरुसलेममधील नियमन मंडळाचा अधिकार मान्य केला होता. प्रेषित आणि जेरुसलेम मंडळीतील वयस्कर पुरुषांच्या मिळून बनलेल्या या मंडळाने, ख्रिस्ताचे ‘एकच शरीर’ या नात्याने मंडळीतील ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत केली.—इफिसकर ४:४, ११-१६; प्रेषितांची कृत्ये १५:२२-३१; १६:४, ५.

त्या एका खऱ्‍या मंडळीचे काय झाले? पुढे तीच शक्‍तिशाली कॅथलिक चर्च बनली का? आज आपण पाहतो त्याप्रमाणे तिचा, सांप्रदायिक, विभाजित प्रोटेस्टंट चर्च व्यवस्थेत विकास झाला का? की काही वेगळे घडले?

‘गहू’ आणि ‘निदण’

उत्तरे शोधण्यासाठी आपण, स्वतः येशू ख्रिस्त काय म्हणाला होता त्याचे बारकाईने परीक्षण करून पाहू या. तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल, की येशूने आपली मंडळी नाहीशी होण्याची अपेक्षा केली व अनेक शतकांपर्यंत तो ही दुःखद वस्तुस्थिती अस्तित्वात राहू देणार होता.

आपल्या मंडळीची तुलना ‘स्वर्गाच्या राज्याबरोबर’ करत तो म्हणाला: “कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला; पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदणहि दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यात निदण कोठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्‍याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करिताना त्याबरोबर कदाचित गहूहि उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्‍यांस सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.”—मत्तय १३:२४-३०.

येशूने म्हटले, की ‘पेरणारा’ तो स्वतः होता. “चांगले बी” त्याच्या खऱ्‍या शिष्यांना सूचित करत होते. त्याचा “वैरी” दियाबल सैतान होता. “निदण” बनावटी ख्रिश्‍चन होते जे हळूहळू आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीत शिरू लागले होते. येशूने म्हटले, की “कापणीपर्यंत” अर्थात ‘युगाच्या समाप्तीपर्यंत’ तो ‘गहू’ आणि “निदण” यांना एकत्र वाढू देणार होता. (मत्तय १३:३७-४३) या सर्वांचा काय अर्थ होतो?

ख्रिस्ती मंडळी भ्रष्ट होते

प्रेषितांच्या मृत्यूनंतर लगेच, मंडळीतल्याच धर्मत्यागी शिक्षकांनी सर्वकाही हातात घेतले. ते “शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी” बोलू लागले. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) यामुळे, पुष्कळ ख्रिस्ती ‘विश्‍वासापासून भ्रष्ट’ झाले. ते ‘कल्पित कहाण्यांकडे वळाले.’—१ तीमथ्य ४:१-३; २ तीमथ्य ४:३, ४.

सा.यु. चवथ्या शतकापर्यंत “कॅथलिक ख्रिस्ती धर्म हा . . . रोमी साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला होता,” असे द न्यू डिक्शनरी ऑफ थिओलॉजी म्हणते. “चर्च आणि नागरी समाजाचा मिलाफ” अर्थात चर्च आणि राजकारणाचे एकत्रीकरण झाले जे आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या विश्‍वासांच्या पूर्ण विरोधात होते. (योहान १७:१६; याकोब ४:४) तेच पुस्तक पुढे म्हणते, की कालांतराने चर्चची संपूर्ण रचना आणि वैशिष्ट्य तसेच चर्चच्या पुष्कळ मूलभूत शिकवणुकी “जुना करार व नवप्लेटो आदर्श यांच्या विचित्र व अगदीच अहितकारक मिलाफामुळे” आमूलाग्रपणे बदलल्या. येशू ख्रिस्ताने भाकीत केल्याप्रमाणे त्याचे खरे शिष्य, नकली ख्रिश्‍चनांची भरभराट झाल्यामुळे जणू काय झाकले गेले.

गव्हाच्या हंगामात वाढणाऱ्‍या व हुबेहूब गव्हासारखे दिसणाऱ्‍या विषारी केसाळ डार्नेलप्रमाणे, येशूच्या श्रोत्यांना असली गहू आणि निदण यांच्यात फरक करणे किती कठीण आहे हे माहीत होते. त्यामुळे येशूने दाखल्यात म्हटले, की काही काळापुरते खरे ख्रिस्ती आणि नकली ख्रिस्ती यांच्यातील फरक स्पष्ट दिसणार नाही. याचा अर्थ असा होत नाही, की ख्रिस्ती मंडळी नाहीशी झाली कारण येशूने अभिवचन दिले की तो आपल्या आध्यात्मिक बांधवांना ‘युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस’ त्यांना मार्गदर्शन देत राहील. (मत्तय २८:२०) येशूने म्हटले, की गहू वाढत राहतील. इतकेच नव्हे तर अनेक काळापर्यंत असली ख्रिश्‍चनांनी—व्यक्‍तिगतरीत्या किंवा समूह या नात्याने—ख्रिस्ती शिकवणुकींचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते स्पष्ट ओळखण्याजोगे, दृश्‍य समूह किंवा संघटना म्हणून दिसत नव्हते. ते निश्‍चितच दृश्‍य धर्मत्यागी धार्मिक व्यवस्थेप्रमाणे नव्हते जिने संपूर्ण इतिहासभर येशू ख्रिस्ताच्या नावाचा अनादर केला, त्याच्या नावावर कलंक आणला.—२ पेत्र २:१, २.

‘अनीतिमान पुरुषाचे प्रकट होणे’

प्रेषित पौलाने आणखी काही तरी सांगितले जे या नकली धार्मिक व्यवस्थेला चिन्हांकित करणार होते. त्याने लिहिले: “कोणत्याहि प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण [यहोवाच्या दिवसाच्या] अगोदर विश्‍वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल.” (२ थेस्सलनीकाकर २:२-४) हा “अनीतिमान पुरुष” दुसरे तिसरे कोणी नसून पाळक वर्ग आहे ज्याने स्वतःला “ख्रिस्ती” मंडळीवर अधिकार गाजवण्यासाठी उंचावले. *

प्रेषित पौलाच्या दिवसांत या धर्मत्यागाची सुरवात झाली. प्रेषितांचा मृत्यू झाला व त्यांचा प्रतिबंधात्मक प्रभाव गायब झाला त्यानंतर धर्मत्याग वाढत गेला. “सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्‌भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट” याद्वारे हे स्पष्टपणे दिसून आले. (२ थेस्सलनीकाकर २:६-१२) संपूर्ण इतिहासातील अनेक धार्मिक नेत्यांच्या कार्यांचे किती हे अचूक वर्णन!

रोमन कॅथलिक धर्मच केवळ एक खरे चर्च आहे या दाव्याचे समर्थन करताना, कॅथलिक नेत्यांचे असे म्हणणे आहे, की त्यांच्या बिशपांना “ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीपासून एकापाठोपाठ एक अशा मूळ प्रेषितांकडून त्यांचे प्रेषितपद वारशाने प्राप्त झाले आहे.” परंतु वास्तविकतेत, प्रेषितांकडून मिळालेल्या वारशाच्या त्यांच्या दाव्याला इतिहासात किंवा शास्त्रवचनात कसलाच आधार नाही. येशूच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतर निघालेल्या चर्च व्यवस्थेला देवाच्या पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन होते असे सूचित करणारा कसलाही ठोस पुरावा नाही.—रोमकर ८:९; गलतीकर ५:१९-२१.

ज्याला धर्मसुधारणा म्हटले जाते त्यानंतर स्थापन झालेल्या चर्चेसविषयी काय? त्यांनी आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीचा आदर्श पाळला का? मूळ ख्रिस्ती मंडळीची शुद्धता त्यांनी टिकवून ठेवली का? हे खरे आहे, की धर्मसुधारणेनंतर सामान्य लोकांना त्यांच्या भाषेत बायबल उपलब्ध झाले. तरीपण, इतिहास दाखवतो, की हे चर्चेस चुकीच्या शिकवणुकी शिकवत राहिले.—मत्तय १५:७-९.

परंतु या गोष्टीची नोंद घ्या. येशू ख्रिस्ताने हे निश्‍चितपणे भाकीत केले की त्याची एकच खरी मंडळी, या व्यवस्थीकरणाची समाप्ती म्हटलेल्या काळादरम्यान पुनःस्थापित केली जाईल. (मत्तय १३:३०, ३९) बायबल भविष्यवाणींची पूर्णता दाखवून देते, की आपण आता त्या काळात जगत आहोत. (मत्तय २४:३-३५) हे खरे असताना, आपण प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्‍न विचारला पाहिजे, की ‘ते एकच खरे चर्च कोठे आहे?’ ते हळूहळू अधिक स्पष्टरीत्या ओळखण्याजोगे असले पाहिजे.

तुम्हाला कदाचित वाटेल, की तुम्हाला ते एकच खरे चर्च किंवा मंडळी सापडली आहे. परंतु याची तुम्ही खात्री करणे महत्त्वाचे आहे. का? कारण, पहिल्या शतकाप्रमाणे एकच खरे चर्च असू शकते. तुमचे चर्च पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीने मांडलेल्या आदर्शाचे जवळून अनुकरण करते का व ते येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकींचे काटेकोरपणे पालन करते का याची खात्री करण्यासाठी तुम्ही वेळ काढला का? आता त्याचे परीक्षण करायला काय हरकत आहे? याविषयी यहोवाच्या साक्षीदारांना तुम्हाला मदत करण्यास आनंद वाटेल.—प्रेषितांची कृत्ये १७:११.

[तळटीपा]

^ परि. 17 ‘अनीतिमान पुरुषाला’ ओळखण्याविषयीची अधिक माहिती टेहळणी बुरूज सप्टेंबर १, १९९० पृष्ठे १२-१६ वरील लेखात मिळू शकेल.

[५ पानांवरील चित्रे]

गहू आणि निदण यांचा येशूने दिलेला दाखला आपल्याला खऱ्‍या मंडळीविषयी काय शिकवतो?

[७ पानांवरील चित्रे]

तुमचे चर्च, प्रचार व अभ्यास करण्याविषयी पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी मांडलेल्या नमुन्याचे अनुकरण करते का?