व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“मंडळीत” यहोवाचे स्तवन

“मंडळीत” यहोवाचे स्तवन

“मंडळीत” यहोवाचे स्तवन

आपल्या लोकांना आध्यात्मिकरित्या मजबूत ठेवण्याकरता ख्रिस्ती सभा ही यहोवाकडील एक तरतूद आहे. नियमितपणे सभांना उपस्थित राहिल्याने, आपण यहोवाच्या तरतूदींबद्दल आपली कृतज्ञता व्यक्‍त करतो. शिवाय, आपल्या बांधवांना “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन” देता येते आणि हा एकमेकांबद्दल प्रेम प्रदर्शित करण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. (इब्री लोकांस १०:२४; योहान १३:३५) परंतु, आपण सभांमध्ये आपल्या बांधवांना उत्तेजन कसे देऊ शकतो?

आपले मत जाहीर करा

राजा दावीदाने स्वतःविषयी लिहिले: “मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ति वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करितो.” “मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन.” “महामंडळात मी नीतिमत्वाचे सुवृत्त सांगितले; हे परमेश्‍वरा, मी आपले तोंड बंद ठेविले नाही हे तू जाणतोस.”—स्तोत्र २२:२२, २५; ३५:१८; ४०:९.

प्रेषित पौलाच्या दिवसात, ख्रिस्ती लोक उपासनेकरता एकत्र यायचे तेव्हा ते अशाचप्रकारे यहोवावरील विश्‍वासाविषयी आणि त्याच्या महिमेविषयी बोलून दाखवायचे. अशातऱ्‍हेने त्यांनी एकमेकांना प्रीती आणि सत्कर्मे करावयास उत्तेजन दिले. दावीद आणि पौल यांच्या अनेक शतकांनंतर आपल्या काळात, “[यहोवाचा] दिवस . . . जवळ येत असल्याचे” आपण खरोखर पाहत आहोत. (इब्री लोकांस १०:२४, २५) सैतानाचे व्यवस्थीकरण झोकांड्या खात नाशाकडे वाटचाल करत आहे आणि एकावर एक समस्या वाढत आहेत. पूर्वी कधी नव्हते इतके आज आपल्याला “सहनशक्‍तीचे अगत्य आहे.” (इब्री लोकांस १०:३६) आपले बांधव आपल्याला सहनशील असण्याचे उत्तेजन देणार नाहीत तर आणखी कोण देईल?

पूर्वीप्रमाणे आज प्रत्येक उपासकाला “मंडळीत” आपला विश्‍वास व्यक्‍त करायला संधी दिली जाते. मंडळीच्या सभांमध्ये श्रोत्यांना प्रश्‍न विचारले जातात तेव्हा उत्तरे देणे ही एक संधी आहे. यामुळे साध्य होणाऱ्‍या फायद्यांना केव्हाही कमी लेखू नये. उदाहरणार्थ, समस्या कशा टाळाव्यात आणि त्यांवर मात कशी करावी यावरील टिपणींनी बायबलची तत्त्वे अनुसरत राहण्यास आपल्या बांधवांचा निर्धार अधिक पक्का होतो. उद्धृत शास्त्रवचनांवर नव्हे तर केवळ उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी दिल्याने किंवा व्यक्‍तिगत संशोधनामधील काही विचार मांडल्याने इतरांना अभ्यासाच्या चांगल्या सवयी निर्माण करण्यास उत्तेजन मिळू शकते.

सभांमध्ये आपण टिपणी केल्यास आपला आणि इतरांचाही फायदा होईल हे जाणल्याने सर्व यहोवाच्या साक्षीदारांना बुजरेपणावर किंवा कमी बोलण्याच्या आपल्या मितभाषी प्रवृत्तीवर मात करण्यास उत्तेजन मिळाले पाहिजे. वडिलांनी आणि सेवा सेवकांनी प्रामुख्याने सभांमध्ये टिपणी दिली पाहिजे कारण सभांमध्ये सहभाग घेण्यात त्याचप्रमाणे उपस्थित राहण्यात त्यांनी पुढाकार घ्यावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. परंतु, एखाद्या व्यक्‍तीला या ख्रिस्ती कार्यात विशेषकरून कठीण जात असल्यास ती कशाप्रकारे सुधार करू शकते?

सुधार करण्यासाठी सल्ले

यहोवा यात सामील आहे हे लक्षात ठेवा. जर्मनीत राहणाऱ्‍या एका ख्रिस्ती बहिणीला आपल्या टिपणींविषयी काय वाटते याबद्दल ती म्हणते, “माझी टिपणी म्हणजे, देवाच्या लोकांनी आपला विश्‍वास व्यक्‍त करू नये म्हणून सैतान जे प्रयत्न करतो त्याला माझे वैयक्‍तिक प्रत्युत्तर आहे.” त्याच मंडळीतील नवीन बाप्तिस्मा झालेला एक बांधव म्हणतो: “टिपणीबद्दल मी पुष्कळ प्रार्थना करतो.”

चांगली तयारी करा. तुम्ही साहित्याचा आधी अभ्यास केला नाही तर तुम्हाला टिपणी द्यायला कठीण वाटेल आणि तुमची टिपणी इतकी प्रभावकारी देखील ठरणार नाही. मंडळीच्या सभांमध्ये टिपणी देण्याकरता ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतील शिक्षणाचा लाभ मिळवा (इंग्रजी) या प्रकाशनातील पृष्ठ ७० वर सल्ले दिले आहेत. *

प्रत्येक सभेत निदान एक उत्तर देण्याचे ध्येय ठेवा. कदाचित यासाठी तुम्हाला अनेक उत्तरे तयार करावी लागतील कारण तुम्ही पुष्कळदा हात वर केला तर सभा चालवणारे बांधव तुम्हाला उत्तर विचारण्याची अधिक शक्यता आहे. तुम्ही कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे तयार केली आहेत हे देखील सभा हाताळणाऱ्‍या बांधवाला तुम्ही आधीच सांगू शकता. विशेषतः तुम्ही नवीन असल्यास हे फायद्याचे ठरते. ‘मोठ्या मंडळीत’ हात वर करायला तुम्ही कचरत असाल, पण हा तुमचा परिच्छेद आहे आणि सभा संचालित करणारे बांधव तुमचा हात वर येण्याची अपेक्षा करत असतील हे माहीत असल्याने कदाचित तुम्हाला उत्तर देण्याचे उत्तेजन मिळू शकेल.

लवकर उत्तर द्या. दिरंगाईने एखादे कठीण काम सोपे होत नाही. सभेच्या सुरवातीलाच उत्तर दिल्याने मदत होऊ शकते. पहिले उत्तर देण्याचा एक अडथळा पार केल्यावर दुसरे किंवा तिसरे उत्तर देणे किती सोपे आहे याचे तुम्हाला आश्‍चर्य वाटेल.

योग्य जागा निवडा. काहींना राज्य सभागृहात समोर बसल्याने उत्तरे द्यायला सोपे वाटते. तेथे लक्ष विचलित करणाऱ्‍या कमी गोष्टी असतात आणि सभा चालवणाऱ्‍या बांधवांचे दुर्लक्ष होण्याची शक्यता देखील कमी असते. असा प्रयत्न केल्यास, सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात बोलायला विसरू नका, खासकरून मंडळीत फिरते मायक्रोफोन नसतील तर.

काळजीपूर्वक ऐका. यामुळे दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीने सांगितलेले तेच उत्तर तुम्ही देणार नाही. त्याचप्रमाणे, इतरांच्या टिपणीवरून तुम्हाला एखादे शास्त्रवचन किंवा एखादा मुद्दा आठवेल ज्यामुळे व्यक्‍त केलेल्या विचारावर तुम्ही आणखी काही सांगू शकाल. अधूनमधून एखादा संक्षिप्त अनुभव सांगितल्यास ज्या मुद्द्‌यावर चर्चा होत असेल त्याचे स्पष्टीकरण मिळेल. अशाप्रकारच्या टिपणी फायद्याच्या असतात.

स्वतःच्या शब्दात उत्तर देण्यास शिका. अभ्यासाच्या साहित्यामधून एखादी टिपणी वाचून दाखवल्याने तुम्हाला योग्य उत्तर मिळाले आहे हे दिसेल शिवाय उत्तरे देण्यास ही एक चांगली सुरवात ठरू शकेल. परंतु, स्वतःच्या शब्दांत उत्तरे देण्याइतकी प्रगती केल्याने तुम्हाला मुद्दा समजला असल्याचे जाहीर होते. आपल्या प्रकाशनांतील शब्द जसेच्या तसे सांगण्याची गरज नाही. यहोवाचे साक्षीदार त्यांच्या प्रकाशनांतील माहिती जशीच्या तशी म्हणून दाखवत नाहीत.

विषयाला धरून बोला. विषयाला धरून नसलेल्या टिपणी किंवा विषयाच्या मुख्य मुद्द्‌यांपासून विकर्षित करणाऱ्‍या टिपणी योग्य नाहीत. याचा अर्थ, तुमच्या टिपणी विषयाला समर्पक असल्या पाहिजेत. मगच मुख्य विषयाची आध्यात्मिकरित्या उभारणीकारक चर्चा होण्यास हातभार लागू शकेल.

उत्तेजन देण्याचे ध्येय ठेवा. टिपणी देण्यामागचे महत्त्वपूर्ण कारण इतरांना उत्तेजन देणे हे असल्यामुळे त्यांना निरुत्साहित करेल असे काही म्हणण्याचे आपण टाळले पाहिजे. तसेच, परिच्छेदातले सगळेच मुद्दे सांगू नका नाहीतर इतरांना बोलायला काही राहणार नाही. लांबलचक किंवा कठीण उत्तरांमुळे मुद्द्‌याचा अर्थ स्पष्ट होत नाही. कमी शब्दांमध्ये दिलेली लहान उत्तरे प्रभावकारी असू शकतात आणि त्यांमुळे नवीन लोकांना छोटी उत्तरे देण्याचे उत्तेजन मिळू शकेल.

सभा संचालकांची भूमिका

उत्तेजन देण्याच्या बाबतीत सभा संचालकांवर मोठी जबाबदारी असते. एखादी व्यक्‍ती उत्तर देत असताना सभा संचालक दुसरे काही करण्यात व्यस्त राहण्याऐवजी उत्तर देणाऱ्‍या व्यक्‍तीचे लक्षपूर्वक ऐकून व तिच्याकडे पाहून प्रत्येक टिपणी ऐकण्याची आपल्याला खरी उत्सुकता असल्याचे दाखवतात. त्यांनी लक्षपूर्वक न ऐकल्यामुळे एकदा सांगितलेला मुद्दा पुन्हा बोलून दाखवला किंवा ज्याचे उत्तर मिळाले आहे तोच प्रश्‍न पुन्हा विचारला तर ते किती अनुचित ठरेल!

शिवाय, एखाद्या व्यक्‍तीने उत्तर दिल्यानंतर पुन्हा तोच मुद्दा वेगळ्या शब्दांत सांगण्याची संचालकाला सवय असल्यास, उत्तर देणारी व्यक्‍ती निराश होईल कारण तिला असे वाटेल की तिने दिलेले उत्तर बहुधा अपुरे होते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, एका टिपणीमुळे एखाद्या महत्त्वपूर्ण मुद्द्‌यावर अधिक चर्चा होते तेव्हा ते उत्तेजनदायक ठरू शकते. ‘आपल्या मंडळीत याचा उपयोग कसा केला जाऊ शकतो?’ किंवा ‘आता दिलेल्या टिपणीला परिच्छेदातले कोणते शास्त्रवचन आधार देते?’ अशा प्रश्‍नांनी सकारात्मक टिपणीला उत्तेजन मिळते व यामुळे मौल्यवान योगदान होते.

अर्थात, नवीन लोकांनी किंवा बुजऱ्‍या स्वभावाच्या लोकांनी उत्तरे दिल्यास त्यांची आवर्जून प्रशंसा केली पाहिजे. हे सभेच्या नंतर प्रत्यक्ष भेटून करता येईल ज्यामुळे त्या व्यक्‍तीला सर्वांसमोर लाजल्यासारखे होणार नाही आणि संचालकांनाही आवश्‍यक असल्यास काही सल्ले द्यायचे असल्यास ते देऊ शकतील.

सर्वसाधारण संभाषणात, जी व्यक्‍ती एकटीच बोलत असते ती देवाणघेवाण करत नसते. मग ऐकणाऱ्‍यांनाही स्वतःचे मत व्यक्‍त करण्याची गरज वाटत नाही. आणि जर त्यांनी ऐकलेच तर ते अर्धवट लक्ष देऊन ऐकतात. संचालक जेव्हा जास्त बोलतात तेव्हा देखील हेच घडू शकते. परंतु, सभा संचालक एखादा अतिरिक्‍त प्रश्‍न विचारून श्रोत्यांना आपले मत व्यक्‍त करायला लावू शकतात किंवा त्या विषयावर त्यांना विचार करायला प्रवृत्त करू शकतात. असे प्रश्‍न क्वचितच वापरले जावेत.

सभा संचालक, सर्वात आधी हात वर करणाऱ्‍या व्यक्‍तीलाच उत्तर विचारतील असे नाही. अशाने, ज्यांना आपले विचार शब्दात मांडायला थोडा वेळ लागतो त्यांचे धैर्य खचू शकते. थोडा वेळ थांबल्याने ज्याला उत्तर द्यायला संधी मिळाली नाही त्यालाही संधी मिळू शकते. त्याचप्रमाणे, लहान मुलांना समजणार नाहीत अशा विषयांवरील प्रश्‍नांची उत्तरे त्यांना न विचारूनही सभा संचालक तारतम्य प्रदर्शित करतील.

एखादे चुकीचे उत्तर कोणी दिल्यास काय? संचालकांनी उत्तर देणाऱ्‍या व्यक्‍तीला लाजवू नये. काही उत्तरे चुकीची असली तरी त्यांमध्ये काही प्रमाणात सत्य असते. उत्तरातील बरोबर असलेला मुद्दा चातुर्याने निवडून, प्रश्‍न वेगळ्या पद्धतीने मांडून किंवा आणखी एक प्रश्‍न विचारून सभा संचालक कोणालाही अनावश्‍यकपणे न लाजवता स्थिती सावरून घेऊ शकतात.

सभा संचालकांना उत्तरांकरता उत्तेजन द्यायचे झाल्यास, ‘आणखी कोण उत्तर द्यायचे राहिले आहे?’ असे प्रश्‍न ते सर्वांना करण्याचे टाळतील. ‘कोणी अजून उत्तर दिलेले नाही? ही तुमची शेवटी संधी आहे!’ असे म्हणण्यामागे कदाचित हेतू चांगला असेल पण त्यामुळे एखाद्या व्यक्‍तीला आपले मत व्यक्‍त करायला उत्तेजन मिळणार नाही. अभ्यासाच्या सुरवातीला उत्तर न देऊन बांधवांनी काही चूक केली आहे असे त्यांना वाटू देऊ नये. उलट, त्यांना जे माहीत आहे ते इतरांना सांगण्यास उत्तेजन द्यावे कारण इतरांना सांगणे ही प्रेमाची एक अभिव्यक्‍ती आहे. शिवाय, एकाला उत्तर विचारल्यावर, “त्यानंतर अमुक बांधवाचे आणि नंतर तमुक भगिनीचे उत्तर आपण ऐकू” असे न म्हणणे बरे राहील. सभा संचालकांनी आधी एका व्यक्‍तीचे उत्तर ऐकून घ्यावे आणि मग आणखी टिपणी करण्याची गरज आहे का हे ठरवावे.

टिपणी करणे एक सुहक्क

ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे ही एक आध्यात्मिक गरज आहे. तेथे टिपणी करणे हा एक सुहक्क आहे. “मंडळीत” यहोवाचे स्तवन करण्याच्या या अनोख्या पद्धतीत आपण जितका भाग घेतो तितकेच आपण दावीदाच्या उदाहरणाचे अनुकरण करत असतो आणि पौलाच्या सल्ल्याकडे लक्ष देत असतो. सभांमधील आपल्या सहभागाने हे सिद्ध होते की आपल्या बांधवांवर आपली प्रीती आहे आणि आपण यहोवाच्या मोठ्या मंडळीचा भाग आहोत. “तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते” तसे तुम्हाला आणखी इतर कोणत्या ठिकाणी असायला आवडेल?—इब्री लोकांस १०:२५.

[तळटीप]

^ परि. 10 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

[२० पानांवरील चित्रे]

ऐकणे आणि टिपणी देणे या दोन्ही गोष्टी ख्रिस्ती सभांमध्ये महत्त्वाच्या आहेत

[२१ पानांवरील चित्र]

संचालक प्रत्येक टिपणीकडे लक्ष देऊन ऐकतात