व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाला आपला भरवसा बनवा

यहोवाला आपला भरवसा बनवा

यहोवाला आपला भरवसा बनवा

“तू माझी आशा आहेस; हे प्रभू, यहोवा, माझ्या तरुणपणापासून तू माझा भरवसा आहेस.”स्तोत्र ७१:५, पं.र.भा.

१. मेंढपाळ दावीदासमोर कोणते आव्हान होते?

गल्याथ चक्क नऊ फूटांहून उंच होता. म्हणूनच, सर्व इस्राएली सैनिक त्याच्यापुढे जायला घाबरत होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी हा पलिष्टी राक्षस इस्राएलच्या सैन्याची थट्टा उडवत असे आणि त्याच्याशी युद्ध करायला एक योद्धा पाठवून द्या असे ललकारत असे. कित्येक आठवडे असे चालत राहिले. शेवटी, एकाने हे आव्हान स्वीकारले. तो कोणी योद्धा नव्हता तर केवळ एक तरुण होता. मेंढपाळ दावीद आपल्या विरोध्यासमोर अगदीच ठेंगणा होता. गल्याथाच्या चिलखतापेक्षा आणि हत्यारांपेक्षाही त्याचे वजन कमी असावे! तरीही, या तरुणाने त्या राक्षसाचा सामना केला आणि धिटाईचे प्रतीक म्हणून तो प्रसिद्ध झाला.—१ शमुवेल १७:१-५१.

२, ३. (अ) दावीद इतक्या भरवशाने गल्याथाचा सामना का करू शकला? (ब) यहोवाला आपला भरवसा बनवण्यासाठी कोणती दोन पावले उचलली पाहिजेत ज्यांची आपण चर्चा करणार आहोत?

दावीदाला हे धैर्य कोठून मिळाले? त्याने आपल्या वृद्धापकाळी लिहिलेल्या शब्दांचा आपण विचार करू या: “तू माझी आशा आहेस; हे प्रभू, यहोवा, माझ्या तरुणपणापासून तू माझा भरवसा आहेस.” (स्तोत्र ७१:५, पं.र.भा.) होय, तरुणपणी दावीदाने यहोवावर पूर्ण भरवसा केला. त्याने असे म्हणून गल्याथाचा सामना केला: “तू तरवार व भाला व बरची घेऊन माझ्याकडे आलास, परंतु सैन्यांचा यहोवा इस्राएलाच्या फौजांचा देव, ज्याला तू तुच्छ लेखले आहे त्याच्या नावाने मी तुझ्याकडे येतो.” (१ शमुवेल १७:४५, पं.र.भा.) गल्याथाने आपले सामर्थ्य आणि आपल्या शस्रास्रांवर भरवसा केला परंतु दावीदाने यहोवावर भरवसा केला. विश्‍वाचा सार्वभौम प्रभू आपल्या बाजूने असताना दावीदाला एका मनुष्याची—भले तो मनुष्य धिप्पाड आणि शस्त्रास्रे घेतलेला असला तरी—भीती का वाटावी?

दावीदाविषयी वाचताना, आपलाही यहोवावर इतकाच दृढ भरवसा असावा असे तुम्हाला वाटते का? कदाचित पुष्कळांना असे वाटत असावे. तर मग, यहोवाला आपला भरवसा बनवण्यासाठी आपण जी दोन पावले उचलली पाहिजेत त्यांच्याविषयी पाहूया. प्रथम, हा भरवसा प्राप्त करण्यासाठी एका सामान्य अडथळ्यावर मात करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, यहोवावर भरवसा ठेवण्यात काय गोवले आहे हे जाणून घेण्याची गरज आहे.

यहोवावर भरवसा ठेवण्यासाठी एका सामान्य अडथळ्यावर मात करणे

४, ५. पुष्कळ लोकांना देवावर भरवसा ठेवणे इतके कठीण का जाते?

लोक कशामुळे देवावर भरवसा ठेवत नाहीत? आज घडणाऱ्‍या दुष्ट गोष्टी पाहून काहीजण गोंधळून जातात. देवच दुःखाला कारणीभूत आहे असे पुष्कळांना शिकवले जाते. एखादी दुर्घटना घडते तेव्हा, धर्मगुरू कदाचित असे म्हणतील की, दुर्घटनेत बळी पडलेल्या व्यक्‍तींना देव स्वर्गात “घेऊन” गेला. शिवाय, अनेक धर्मगुरू असे शिकवतात की, देवाने जगात घडणारी प्रत्येक घटना, तसेच दुर्घटना आणि दुष्ट कृत्य देखील आधीच नियोजित केले आहे. अशी समज असताना, एखाद्या कठोर देवावर भरवसा ठेवणे कठीण होऊ शकते. विश्‍वास नसलेल्यांची मने आंधळी करणारा सैतान सर्वप्रकारच्या ‘भुतांच्या शिक्षणाला’ उत्तेजन देण्याच्या संधीचा फायदा घेतो.—१ तीमथ्य ४:१; २ करिंथकर ४:४.

यहोवावर लोकांचा भरवसा राहू नये हे सैतानाला हवे आहे. देवाच्या त्या शत्रुची अशी इच्छा आहे की, मानवी दुःखाची खरी कारणे आपल्याला कळू नयेत. आणि त्याची शास्त्रवचनीय कारणे आपल्याला कळालीच तर त्यांचा विसर पडावा असे सैतानाला वाटते. त्यामुळे, जगामधील दुःखाच्या तीन मुख्य कारणांची आपण वेळोवेळी उजळणी करावी हे चांगले आहे. असे केल्याने, आपण स्वतःच्या मनाला उमेद देऊ की, जीवनात आपल्यासमोर येणाऱ्‍या अडचणींना यहोवा जबाबदार नाही.—फिलिप्पैकर १:९, १०.

६. मानवी दुःखाचे कोणते एक कारण १ पेत्र ५:८ मध्ये देण्यात आले आहे?

मानवी दुःखाचे एक कारण म्हणजे, सैतानाला यहोवाच्या विश्‍वासू लोकांची सचोटी भंग करायची आहे. त्याने ईयोबाची सचोटी मोडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सैतान अपयशी ठरला पण त्याने हार मानलेली नाही. या जगाचा शासक या नात्याने तो यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना ‘गिळण्याचा’ प्रयत्न करत आहे. (१ पेत्र ५:८) आणि यात आपल्यापैकी प्रत्येकजण सामील आहे! आपण यहोवाची सेवा करण्याचे सोडून द्यावे अशी सैतानाची इच्छा आहे. त्यामुळे, तो छळाला उत्तेजन देतो. पण हा त्रास कितीही दुःखदायक असला तरी तग धरून राहण्याकरता आपल्याजवळ चांगले कारण आहे. असे केल्याने, आपण सैतानाला खोटे शाबीत करतो आणि यहोवाला आनंदी करतो. (ईयोब २:४; नीतिसूत्रे २७:११) छळात तग धरून राहण्यास यहोवा आपल्याला बळकट करतो तसा त्याच्यावरील आपला भरवसा वाढतो.—स्तोत्र ९:९, १०.

७. गलतीकर ६:७ आपल्याला दुःखाच्या कोणत्या कारणाची ओळख करून देते?

दुःखाचे दुसरे एक कारण पुढील तत्त्वात सापडते: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) काही वेळा लोक चुकीच्या निवडींची पेरणी करतात आणि यामुळे त्यांना दुःखाच्या रूपात पीक मिळते. कदाचित ते बेपर्वाईने गाडी चालवतील आणि त्यामुळे त्यांचा अपघात होईल. पुष्कळजण धूम्रपान करतात व यामुळे त्यांना हृदयविकार किंवा फुफ्फुसांचा कर्करोग होतो. जे अनैतिक वर्तन राखतात त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध बिघडतात, ते स्वतःचा सन्मान गमावतात, त्यांना गुप्तरोग होतात आणि नको असताना गर्भधारणा होते. अशा दुःखासाठी लोक देवाला जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न करतात पण खरे पाहता ते स्वतःच्याच वाईट निर्णयांचे दुष्परिणाम भोगत असतात.—नीतिसूत्रे १९:३.

८. उपदेशक ९:११ नुसार, लोकांना दुःख का सोसावे लागते?

उपदेशक ९:११ (पं.र.भा.) येथे दुःखाचे तिसरे कारण देण्यात आले आहे: “मी फिरून सूर्याच्या खालती असे पाहिले की वेगवंतांस धाव व बलवानांस युद्ध साधत नाही, आणि ज्ञान्यांस अन्‍न व बुद्धिमंतांस धन आणि निपुणांस अनुग्रह प्राप्त होत नाही, परंतु समय व प्रसंग हे सर्वांना घडतात.” काही वेळा, केवळ चुकीच्या क्षणी चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे काही दुर्घटना घडतात. आपले सद्‌गुण व दुर्गुण काहीही असले तरी दुःख आणि मृत्यू आपल्यावर अनपेक्षितपणे येऊ शकतात. उदाहरणार्थ, येशूच्या काळात जेरूसलेममधील एक बुरूज कोसळला आणि त्यात १८ जण ठार झाले. येशूने तेव्हा दाखवून दिले की, देव त्या लोकांना त्यांच्या पूर्वीच्या पापांची शिक्षा देत नव्हता. (लूक १३:४) होय, अशा दुःखासाठी देव दोषी नाही.

९. पुष्कळांना दुःखासंबंधी कोणती एक गोष्ट समजत नाही?

दुःखाच्या काही कारणांची समज बाळगणे महत्त्वाचे आहे. परंतु, एक गोष्ट पुष्कळांना समजून घ्यायला कठीण जाते. ती म्हणजे: यहोवा देव दुःखाला परवानगी का देतो?

यहोवा दुःखाला परवानगी का देतो?

१०, ११. (अ) रोमकर ८:१९-२२ नुसार ‘सबंध सृष्टीला’ काय झाले? (ब) सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन कोणी केले हे कसे ठरवता येईल?

१० प्रेषित पेत्राने रोमकरांना लिहिलेल्या पत्रातील एक उतारा या महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकतो. पौलाने लिहिले: “सृष्टी देवाच्या पुत्राच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली ती आपखुशीने नव्हे, तर ती स्वाधीन करणाऱ्‍यामुळे. सृष्टीहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते. कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”—रोमकर ८:१९-२२.

११ या वचनांचा मुद्दा समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काही मुख्य प्रश्‍नांची उत्तरे मिळायला हवीत. उदाहरणार्थ, सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन कोणी केले? काहीजण सैतानाला जबाबदार ठरवतात; इतरजण आदामाला. पण हे दोघेही असू शकत नाहीत. का नाही? कारण ज्याने सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन केले आहे त्याने ती “आशेने” केली आहे. होय, तो अशी आशा देतो की, विश्‍वासू लोक सरतेशेवटी “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त” केले जातील. ही आशा आदाम किंवा सैतान देऊ शकला नाही. केवळ यहोवा ही आशा देऊ शकत होता. यावरून हे स्पष्ट होते की, त्यानेच सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन केले होते.

१२. ‘सबंध सृष्टीविषयी’ कोणता गोंधळ झाला आहे आणि याचे स्पष्टीकरण कसे दिले जाऊ शकते?

१२ या उताऱ्‍यात “सबंध सृष्टी” कशाला सूचित करते? काहीजण म्हणतात की, “सबंध सृष्टी” ही सबंध नैसर्गिक जगाला सूचित करते ज्यामध्ये प्राणी आणि वनस्पती देखील सामील होतात. परंतु, पशु व वनस्पती “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” मिळवण्याची आशा करू शकतात का? नाही. (२ पेत्र २:१२) त्यामुळे “सबंध सृष्टी” ही केवळ मानवजातीला सूचित होऊ शकते. याच सृष्टीवर एदेनमधील बंडाळीमुळे पाप व मृत्यूचा परिणाम झाला आणि तिलाच आशेची अत्यंत गरज आहे.—रोमकर ५:१२.

१३. एदेनमधील बंडाळीचा मानवजातीवर काय परिणाम झाला?

१३ या बंडाळीचा मानवजातीवर नेमका कसा परिणाम झाला? पौल या परिणामाचे एकाच शब्दात वर्णन करतो: व्यर्थता. * एका संदर्भ ग्रंथानुसार, हा शब्द, “इच्छिल्याप्रमाणे कार्य करत नसलेल्या वस्तूच्या व्यर्थतेचे” वर्णन करतो. मानवांना सर्वकाळ जगण्यासाठी, परादीसमय पृथ्वीची देखभाल करणारे परिपूर्ण, संयुक्‍त कुटुंब या नात्याने कार्य करण्यासाठी निर्माण करण्यात आले होते. पण याउलट, त्यांचे जीवन अल्पकाळाचे, वेदना व निराशेने भरलेले केवळ अस्तित्व ठरले. ईयोबाने म्हटल्यानुसार, “स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.” (ईयोब १४:१) खरोखर व्यर्थता!

१४, १५. (अ) यहोवाने मानवजातीला दिलेल्या शिक्षेत न्यायीपणाचा काय पुरावा दिसतो? (ब) सृष्टी “आपखुशीने” व्यर्थतेच्या स्वाधीन झाली नाही असे पौलाने का म्हटले?

१४ आता आपण सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न पाहू या: “सर्व जगाचा न्यायाधीश” याने मानवजातीला अशा वेदनामय, निराशाजनक अस्तित्वाच्या स्वाधीन का केले? (उत्पत्ति १८:२५) यात तो न्यायी होता का? आपल्या पहिल्या पालकांनी काय केले हे लक्षात ठेवा. देवाविरुद्ध बंड करून त्यांनी सैतानाचा पक्ष घेतला ज्याने यहोवाच्या सार्वभौमत्वाला एक मोठे आव्हान दिले. आपल्या कार्यांनी त्यांनी या दाव्याला पुष्टी दिली की, मानव यहोवाविना चांगल्या स्थितीत राहतील, एका बंडखोर आत्मिक प्राण्याच्या मार्गदर्शनाने ते स्वतःवर राज्य करू शकतील. यहोवाने या बंडखोरांना शिक्षा देताना त्यांनी जे मागितले तेच त्यांना दिले. त्याने मानवाला सैतानाच्या प्रभावाखाली स्वतःवर राज्य करू दिले. त्या परिस्थितीत, मानवांना आशेच्या आधारे व्यर्थतेच्या स्वाधीन करण्याशिवाय इतर कोणताही निर्णय न्यायीपणाचा ठरला नसता.

१५ अर्थात, सृष्टी “आपखुशीने” स्वाधीन झाली नाही. आपण जन्मतःच पाप आणि नश्‍वरतेचे दास झालो; यात आपल्याला कसलीही निवड नाही. परंतु यहोवाने दयाळुपणे आदाम आणि हव्वेला आपले आयुष्य जगू दिले व त्यांना मुले होऊ दिली. आपण त्यांचे संतान, पाप आणि मृत्यूच्या व्यर्थतेच्या स्वाधीन असलो तरी आदाम आणि हव्वा जे करायला चुकले ते करण्याची आपल्याला संधी आहे. आपण यहोवाचे ऐकू शकतो आणि हे जाणून घेऊ शकतो की त्याचे सार्वभौमत्व नीतिमान आणि परिपूर्ण आहे परंतु यहोवाच्या मार्गदर्शनाविना असलेल्या मानवी शासनामुळे केवळ वेदना, निराशा आणि व्यर्थता हाती लागते. (यिर्मया १०:२३; प्रकटीकरण ४:११) त्यात सैतानाच्या प्रभावाने परिस्थिती अधिकच बिकट होते. मानवी इतिहास या सत्याला पुष्टी देतो.—उपदेशक ८:९.

१६. (अ) आजच्या जगातील दुःखाला देव जबाबदार नाही अशी खात्री आपण का बाळगू शकतो? (ब) यहोवाने विश्‍वासू लोकांकरता कोणती आशा दिली आहे?

१६ यावरून स्पष्ट होते की, मानवजातीला व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यामागे यहोवाकडे योग्य कारणे होती. याचा अर्थ, आज आपल्या प्रत्येकाला पीडित करणाऱ्‍या व्यर्थतेला व दुःखाला यहोवा कारणीभूत आहे का? एखाद्या गुन्हेगाराला न्यायीपणे शिक्षा देणाऱ्‍या न्यायाधीशाचा विचार करा. आरोपीला आपली शिक्षा पूर्ण करताना पुष्कळ त्रास होतो पण त्याच्या दुःखाला न्यायाधीश जबाबदार आहे असा त्याचा आरोप योग्य ठरेल का? मुळीच नाही! शिवाय, यहोवा कधीच दुष्टाईचा स्रोत नसतो. याकोब १:१३ (पं.र.भा.) म्हणते: “वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा होत नाही, आणि तो कोणाचीही परीक्षा तशी पाहत नाही.” आपणही हे लक्षात ठेवू या की, यहोवाने “आशेने” ही शिक्षा दिली. आदाम आणि हव्वेच्या विश्‍वासू संततीने व्यर्थतेचा अंत पाहावा आणि “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” अनुभवावी म्हणून त्याने प्रेमळपणे एक योजना केली. सर्व सृष्टी पुन्हा व्यर्थतेच्या दुःखमय स्थितीत पडेल अशी चिंता विश्‍वासू मानवजातीला सर्वकाळापर्यंत करावी लागणार नाही. यहोवाच्या न्याय्य व्यवहार पद्धतीने त्याचे सार्वभौमत्व खरे असल्याचे कायमचे सिद्ध केले जाईल.—यशया २५:८.

१७. आज जगामध्ये दुःख सोसण्यामागील कारणे जाणून घेतल्याचा आपल्यावर काय परिणाम झाला पाहिजे?

१७ मानवी दुःखाच्या या कारणांची उजळणी केल्यावर दुष्टाईकरता आपल्याला, यहोवाला दोषी ठरवण्यासाठी किंवा त्याच्यावरील आपला भरवसा गमावण्यासाठी काही आधार दिसतो का? उलट, अशा अभ्यासामुळे मोशेच्या शब्दांशी सहमत होण्याचे कारण आपल्याला मिळते; त्याने म्हटले: “तो दुर्ग आहे; त्याची कृति परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्‍वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीति नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनुवाद ३२:४) या गोष्टींवर मनन करण्याद्वारे आपण आपल्या समजबुद्धीला वेळोवेळी उजाळा देऊ या. तशा प्रकारे, आपण परीक्षांना तोंड देऊ तेव्हा आपल्या मनात शंका निर्माण करण्याच्या सैतानाच्या प्रयत्नांचा आपण प्रतिकार करू. परंतु, सुरवातीला सांगितलेल्या दुसऱ्‍या पावलाविषयी काय? यहोवावर भरवसा ठेवण्यात काय सामील आहे?

यहोवावर भरवसा ठेवण्याचा अर्थ

१८, १९. यहोवावर भरवसा ठेवण्याचे उत्तेजन बायबल आपल्याला कोणत्या शब्दात देते, पण या बाबतीत, काहींचे कोणते गैरसमज आहेत?

१८ देवाचे वचन असे उत्तेजन देते: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीतिसूत्रे ३:५, ६) हे शब्द किती मनोरम, दिलासा देणारे आहेत. निश्‍चितच, संपूर्ण विश्‍वात आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याइतका विश्‍वसनीय कोणीही नाही. तरीही, नीतिसूत्रातील ते शब्द आचरणात आणण्यापेक्षा वाचायला सोपे आहेत.

१९ यहोवावर भरवसा ठेवण्याचा काय अर्थ होतो याविषयी अनेकांना गैरसमज आहेत. काहींना वाटते की, भरवसा म्हणजे आपल्या हृदयात आपोआप निर्माण व्हावी अशी केवळ एक उत्कट आनंदाची भावना आहे. इतरांचा असा समज आहे की, देवावर भरवसा ठेवणे म्हणजे त्याने आपल्याला प्रत्येक अडचणीपासून सुरक्षित ठेवावे, आपली प्रत्येक समस्या दूर करावी, आपल्याला वाटते त्याप्रमाणे दररोजच्या जीवनातल्या अडचणी चुटकीसरशी सोडवाव्यात अशी आपण त्याच्याकडून अपेक्षा करू शकतो. पण या कल्पना निराधार आहेत. भरवसा ही केवळ एक भावना नाही आणि ती अवास्तविक नाही. प्रौढ लोक भरवसा ठेवतात म्हणजे ते जाणीवपूर्वक, विचार करून निर्णय घेतात.

२०, २१. यहोवावर भरवसा ठेवणे म्हणजे काय आहे? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

२० नीतिसूत्रे ३:५ काय म्हणते त्याकडे पुन्हा लक्ष द्या. त्यात यहोवावर भरवसा ठेवणे आणि आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहणे यामधील फरक दाखवून आपण दोन्ही गोष्टी करू शकत नाही हे सुचवले आहे. याचा अर्थ आपल्या बुद्धीचा उपयोग करण्याची आपल्याला परवानगी नाही का? नाही, कारण ज्या यहोवाने आपल्याला ती क्षमता दिली आहे त्याची अशी अपेक्षा आहे की, आपण त्याची सेवा करताना तिचा उपयोग करावा. (रोमकर १२:१) पण आपण कोणावर अवलंबून राहावे किंवा कोणाचा आधार घ्यावा? आपले विचार यहोवाच्या विचारांशी जुळत नाहीत तेव्हा, त्याची बुद्धी आपल्या बुद्धीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे हे ओळखून आपण ती स्वीकारतो का? (यशया ५५:८, ९) यहोवावर भरवसा ठेवणे म्हणजे त्याच्या विचारांना आपल्या विचारांस मार्गदर्शित करू देणे.

२१ हे स्पष्ट करण्यासाठी: एक लहान मूल कारच्या मागच्या सीटवर बसले आहे आणि त्याचे आईवडील समोरच्या सीटवर आहेत असे समजा. त्याचे वडील गाडी चालवत आहेत. प्रवास करताना अडचणी आल्या—योग्य मार्गासंबंधी शंका निर्माण झाली किंवा हवामान ठीक नसले किंवा रस्ता चांगला नसला तर आज्ञाधारक व भरवसा ठेवणारे मूल काय करील? ते मागून आपल्या वडिलांना गाडी चालवण्याविषयी सूचना देत राहील का? आपल्या आईवडिलांच्या निर्णयाबद्दल शंका व्यक्‍त करील का किंवा आईवडील त्याला सीट बेल्ट काढू नकोस असे सांगतात तेव्हा प्रतिकार करील का? नाही, त्याचे आईवडील अपरिपूर्ण असले तरीही त्याला आपल्या पालकांवर भरवसा असतो. यहोवा आपला परिपूर्ण पिता आहे. तर मग, आपण त्याच्यावर, खासकरून अडचणीत असताना, संपूर्ण भरवसा ठेवू नये का?—यशया ३०:२१.

२२, २३. (अ) आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा आपण यहोवावर आपला भरवसा का ठेवावा आणि आपण हे कसे करू शकतो? (ब) पुढील लेखात कशावर चर्चा केली जाईल?

२२ परंतु, नीतिसूत्रे ३:६ (मराठी कॉमन लँग्वेज) दाखवते की, आपण केवळ अडचणीच्या काळातच नव्हे तर “प्रत्येक गोष्टीत प्रभूची आठवण” ठेवली पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनातील निर्णयांमधून यहोवावर आपला भरवसा असल्याचे दिसले पाहिजे. समस्या येतात तेव्हा, आपण निराश होऊ नये, गोंधळून जाऊ नये किंवा काही गोष्टी हाताळण्यासाठी यहोवाकडून उत्तम मार्गदर्शन मिळते तेव्हा त्याचा प्रतिकार करू नये. आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षा म्हणजे यहोवाच्या सार्वभौमत्वाला आधार देण्याच्या, सैतानाला लबाड ठरवण्याच्या आणि यहोवाला संतुष्ट करण्यासाठी आज्ञाधारकपणा व इतर गुण विकसित करण्याच्या संधी आहेत असे आपण समजले पाहिजे.—इब्री लोकांस ५:७, ८.

२३ आपल्यासमोर कितीही अडथळे आले तरी यहोवावरील आपला भरवसा आपण दाखवू शकतो. आपल्या प्रार्थनांद्वारे आणि यहोवाच्या वचनातून व त्याच्या संघटनेकडून मार्गदर्शन घेण्याद्वारे आपण असे करू शकतो. परंतु, आजच्या जगात आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा यहोवावर आपण आपला भरवसा नेमका कशारितीने दाखवू शकतो? आमचा पुढील लेख या विषयावर चर्चा करील.

[तळटीप]

^ परि. 13 पौलाने “व्यर्थता” यासाठी वापरलेला ग्रीक शब्द, शलमोनाने उपदेशकाच्या पुस्तकात वारंवार वापरलेल्या अभिव्यक्‍तीचा (“सर्व काही व्यर्थ!” ) अनुवाद करण्यासाठी ग्रीक सेप्ट्यूअजिंटमध्ये वापरलेला तोच शब्द आहे.—उपदेशक १:२, १४; २:११, १७; ३:१९; १२:८.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• दावीदाने यहोवावर भरवसा ठेवल्याचे कसे दाखवून दिले?

• आज मानवी दुःखाची तीन कारणे कोणती आहेत आणि वेळोवेळी त्यांची उजळणी करणे का चांगले आहे?

• यहोवाने मानवजातीला कोणती शिक्षा दिली आणि ही शिक्षा न्यायाला धरून होती असे का म्हणता येईल?

• यहोवावर भरवसा ठेवण्यात काय सामील आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८ पानांवरील चित्रे]

दावीदाने यहोवावर भरवसा ठेवला

[१० पानांवरील चित्र]

येशूने दाखवले की, जेरूसलेममधील अमुक एक बुरूज कोसळला तेव्हा यहोवा त्याला जबाबदार नव्हता