व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा नेहमीच आपली काळजी घेतो

यहोवा नेहमीच आपली काळजी घेतो

जीवन कथा

यहोवा नेहमीच आपली काळजी घेतो

एनलेस म्झांग यांच्याद्वारे कथित

१९७२ सालची गोष्ट. मलावीच्या युवक संघाचे दहा तरणेबांड सदस्य आमच्या घरात घुसले; त्यांनी मला धरून जवळच असलेल्या एका उसाच्या मळ्यात फरफटत नेलं. तिथं त्यांनी मला बेदम मारहाण केली आणि मी मेले असं समजून मला तिथंच सोडून ते पळून गेले. मलावीतील अनेक यहोवाच्या साक्षीदारांनी अशाप्रकारचे हिंसक हल्ले सहन केले आहेत. पण त्यांच्यावर असे क्रूर हल्ले का केले जात होते? कोणत्या गोष्टीमुळे ते टिकून राहू शकले? आधी मी तुम्हाला माझ्या कुटुंबाविषयी थोडं सांगते.

डिसेंबर ३१, १९२१ रोजी, एका धार्मिक प्रवृत्तीच्या कुटुंबात माझा जन्म झाला होता. माझे बाबा, मध्य आफ्रिकन प्रिसबेटेरीयन चर्चमध्ये पाळक होते. मलावीची राजधानी लिलाँग्वाजवळ असलेल्या अन्कोम नावाच्या एका लहानशा गावात मी लहानाची मोठी झाले. वयाच्या १५ व्या वर्षी माझं, एमास म्झांग यांच्याशी लग्न झालं.

एकदा, बाबांचे एक मित्र आमच्या घरी आले होते; तेही पाळक होते. त्यांनी पाहिलं होतं, की आमच्या घराशेजारी यहोवाचे साक्षीदार राहत होते तर त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर कसलाच संबंध न ठेवण्याविषयी ताकीद दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं, की साक्षीदार भुताटकी करणारे आहेत व आपण सावध राहिलो नाही तर आपल्यालाही भूत लागू शकते. या काकांनी दिलेला सल्ला आम्ही इतक्या गंभीरतेने घेतला की आम्ही दुसऱ्‍या एका गावात राहायला गेलो आणि तिथं एमासना दुकानात नोकरी मिळाली. पण काही दिवसांत आम्हाला कळलं, की आमच्या या नव्या घराच्या शेजारीसुद्धा यहोवाचे साक्षीदार होते!

एमासना बायबलबद्दल खूप प्रेम होते, त्यामुळे काही दिवसांतच ते या साक्षीदारांबरोबर बोलू लागले. आपल्या अनेक प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यावर, एमास यांनी, साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास दिलेले आमंत्रण स्वीकारले. सुरवातीला हा अभ्यास एमास काम करत असलेल्या दुकानात झाला, पण नंतर दर आठवडी मग तो आमच्या घरात होऊ लागला. यहोवाचे साक्षीदार जेव्हा जेव्हा आमच्या घरात येत, तेव्हा तेव्हा मी बाहेर जात असे, कारण मला त्यांची भीती वाटत होती. एमासनी मात्र बायबलचा अभ्यास चालूच ठेवला. अभ्यास करायला सुरू करून सहा महिने उलटल्यावर एमास यांचा १९५१ सालच्या एप्रिल महिन्यात बाप्तिस्मा झाला. त्यांनी याविषयी मला काहीच सांगितले नाही, कारण त्यांना अशी भीती वाटत होती, की जर का मला त्यांच्या बाप्तिस्म्याविषयी काही कळले तर आमचा विवाह कदाचित संपुष्टात येईल.

कठीण आठवडे

एकदा, माझी मैत्रीण इलेन काडझालेरो हिने मला सांगितले, की एमास यांचा यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला होता. हे ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोहंचली! त्या दिवसापासून मी एमास यांच्याबरोबर बोलणं काय त्यांच्यासाठी जेवण बनवण्याचंही सोडून दिलं. त्यांच्या आंघोळीसाठी पाणी आणून ते तापवून देण्याचंही मी थांबवलं; हे काम बायकोचं आहे असं आमच्याकडे समजलं जातं.

तीन आठवड्यांपर्यंत माझा असा त्रास सहन केल्यानंतर एमास यांनी मला अगदी प्रेमानं त्यांच्याशेजारी बसायला सांगून, त्यांनी साक्षीदार होण्याचा निर्णय का घेतला होता हे समजावून सांगितलं. त्यांनी मला अनेक वचनं वाचून दाखवली, जसे की १ करिंथकर ९:१६. याचा माझ्या मनावर खूप खोल प्रभाव पडला, मी देखील सुवार्तेच्या प्रचार कार्यात भाग घेतला पाहिजे असं मला वाटू लागलं. मग मीही यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली. त्याच दिवशी संध्याकाळी मी एमाससाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं.

कुटुंबातील सदस्यांना व मित्रांना सत्य सांगणे

आम्ही यहोवाच्या साक्षीदारांबरोबर सहवास राखू लागलो आहोत हे आमच्या दोन्ही घरी समजलं तेव्हा त्यांनी आमचा कडाडून विरोध केला. माझ्या कुटुंबानं तर मला सरळ एक पत्र लिहून सांगितलं, की आम्ही त्यांच्या घरी येऊ नये. घरच्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आम्ही नाराज झालो खरं पण, आम्हाला अनेक आध्यात्मिक बंधूभगिनी, आईवडील मिळतील असे येशूने दिलेल्या अभिवचनावर आम्ही विश्‍वास ठेवला.—मत्तय १९:२९.

मी माझ्या बायबल अभ्यासात भरभर प्रगती केली आणि १९५१ सालच्या ऑगस्ट महिन्यात, एमासनंतर केवळ साडेतीन महिन्यांत माझाही बाप्तिस्मा झाला. माझी मैत्रीण इलेन हिलाही मी सत्य सांगितले पाहिजे असं मला तीव्रपणे वाटू लागलं. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तिनंही बायबल अभ्यास करण्याविषयी मी दिलेलं आमंत्रण स्वीकारलं. १९५२ सालच्या मे महिन्यात इलेनचा बाप्तिस्मा झाला; ती माझी आध्यात्मिक बहीण झाली यामुळे आमच्या मैत्रीचे बंधन अधिक घट्ट झाले. आजही आम्ही दोघी सख्ख्या मैत्रिणी आहोत.

१९५४ साली, एमास यांना मंडळ्यांना भेटी देण्यासाठी विभागीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्‍त करण्यात आलं. तेव्हा आम्हाला सहा मुलं होती. त्या दिवसांत, कुटुंब असलेले प्रवासी पर्यवेक्षक एक आठवडा मंडळ्यांना भेट देऊन आल्यावर दुसऱ्‍या आठवडी आपल्या बायको-मुलांबरोबर राहायचे. पण, एमास जेव्हा प्रवासी कार्यावर जायचे तेव्हा मी कौटुंबिक बायबल अभ्यास घेत असल्याची ते खात्री करायचे. आमच्या मुलांबरोबरचा अभ्यास आम्ही आनंददायक बनवण्याचा प्रयत्न केला. यहोवाबद्दल आणि त्याच्या वचनातील सत्याबद्दल आम्हाला मनापासून किती प्रेम आहे याविषयीही आम्ही नेहमी बोलायचो व कुटुंब मिळून आम्ही प्रचार कार्यात जायचो. या आध्यात्मिक प्रशिक्षणाने आमच्या मुलांचा विश्‍वास पक्का झाला व आम्हाला लवकरच अनुभवाव्या लागणाऱ्‍या छळासाठी त्यांची जणू काय तयारी झाली.

धार्मिक कारणांसाठी छळ सुरू होतो

१९६४ साली मलावी स्वतंत्र देश झाला. शासन करणाऱ्‍यांना, राजनीतीच्या बाबतीत आमची तटस्थ भूमिका समजली तेव्हा त्यांनी आम्हाला पक्षाचे सदस्य कार्ड विकत घेण्यास जबरदस्ती केली. * एमासनी व मी हे कार्ड विकत घेण्यास नकार दिल्यामुळे, युवक संघाच्या सदस्यांनी, येणाऱ्‍या वर्षासाठी आमच्या अन्‍नाचा जो प्रमुख साठा होता तोच म्हणजे मक्याचे शेतच नष्ट करून टाकले. शेतातला मका कापत असताना या युवक संघाचे सदस्य असं गात होते: “कामाझुचे कार्ड जे नाकारतील, वाळवी त्यांची हिरवी कणसे खाऊन टाकेल आणि ते फक्‍त पाहत राहतील.” या लोकांनी आमच्या तोंडचा घास हिसकावून घेतला होता तरीपण आम्ही नाराज झालो नाही. यहोवा आमची काळजी घेत आहे हे आम्हाला जाणवलं. त्यानं प्रेमळपणे आम्हाला बळकट केले.—फिलिप्पैकर ४:१२, १३.

१९६४ सालच्या ऑगस्ट महिन्यात एका मध्यरात्री, मी आणि मुलंच घरात होतो. आम्ही गाढ झोपेत होतो, पण दूरवरील गाण्याच्या आवाजानं मला जाग आली. ते गुलेवामकुलूचे लोक होते; हे लोक एका गुप्त समाजातील नाच करणारे आदिवासी लोक होते जे लोकांवर हल्ला करत व मृत पूर्वजांचे आत्मे असल्याचे सोंग करत; या लोकांना सर्व जण घाबरत असत. युवक संघाच्या लोकांनी आमच्यावर हल्ला करण्यासाठी या गुलेवामकुलूच्या लोकांना पाठवलं होतं. मी लगेच मुलांना उठवलं आणि हे हल्लेखोर आमच्या घरी पोहंचेपर्यंत आम्ही सर्व झाडीत पळून गेलो.

तिथून आम्हाला एक मोठा प्रकाश दिसला. या गुलेवामकुलूच्या लोकांनी आमच्या गवताचे छप्पर असलेल्या घराची होळी केली होती. आमच्या घराची, आतील सामानासुमानाची जळून राख झाली. राखरांगोळी केल्यानंतर हे हल्लेखोर जाऊ लागले तेव्हा आम्ही त्यांना असं म्हणताना ऐकलं: “या साक्षीदारासाठी आपण छान शेकोटी केली.” पण आम्ही सर्व जिवंत होतो म्हणून यहोवाचे किती आभार मानले! लोकांनी आमच्या मालमत्तेचा नाश केला होता पण मनुष्यापेक्षा देवावर विश्‍वास ठेवण्याचा आमचा निर्धार ते तोडू शकले नाहीत.—स्तोत्र ११८:८.

नंतर आम्हाला कळलं, की या गुलूवामकुलूच्या लोकांनी आमच्या भागात राहणाऱ्‍या आणखी पाच यहोवाच्या साक्षीदारांच्या कुटुंबांची घरं अशीच उद्ध्‌वस्त केली होती. जवळपासच्या मंडळ्यांतील बंधूभगिनी आमच्या मदतीला धावून आले तेव्हा आम्हाला खूप आनंद व कृतज्ञता वाटली. त्यांनी आमची घरं पुन्हा बांधून दिली आणि कित्येक आठवड्यांपर्यंत त्यांनी आम्हाला अन्‍न दिलं.

छळ वाढतो

१९६७ सालच्या सप्टेंबर महिन्यात देशांतील सर्व यहोवाच्या साक्षीदारांना जबरदस्तीनं एकत्र आणण्याची एक मोहीम निघाली. युवक संघ आणि मलावी युवक अग्रेसर या तरुण मंडळाचे निर्दयी व आक्रमक सदस्य हातात चाकू घेऊन दारोदारी जाऊन साक्षीदारांना शोधू लागले. कोणी सापडल्यास त्याला ते राजकीय पक्षाचे कार्ड विकत घ्यायला सांगायचे.

आमच्या घरी आल्यावर, तुमच्याकडे पक्ष कार्ड आहे का, असं त्यांनी आम्हाला विचारलं. मी म्हणाले: “नाही, मी विकत घेतलं नाही. आता किंवा पुढेही विकत घेणार नाही.” हे ऐकताच, त्यांनी एमासना आणि मला स्थानीय पोलिस स्टेशनात नेलं; आम्हाला सोबत काहीच घेऊ दिलं नाही. आमची लहान मुलं शाळेतून घरी आली तेव्हा त्यांना आम्ही घरात दिसलो नाही, त्यांना खूप काळजी वाटू लागली. काही वेळानं, आमचा मोठा मुलगा डॅन्यल घरी आला तेव्हा शेजाऱ्‍यांकडून त्याला सर्व कळलं. त्यानं लगेच आपल्या भावंडांना घेतलं आणि ते सर्व पोलिस स्टेशनात आले. आम्हाला लिलाँग्वा इथं नेण्यासाठी ट्रकमध्ये चढायला सांगण्यात आलं इतक्यात आमची मुलं तिथं आली. मग तेही आमच्याबरोबरच आले.

लिलाँग्वामध्ये पोलिस मुख्यालयात आमची अभिरूप न्यायचौकशी करण्यात आली. अधिकाऱ्‍यांनी आम्हांला विचारलं: “तुम्ही यहोवाचे साक्षीदारंच राहणार आहात का?” आम्ही म्हणालो: “होय.” होय म्हटल्यावर आम्हाला तुरूगांत सात वर्षांचा कारावास होणार होता. जे संघटनेचे “व्यवस्थापक” होते त्यांच्यासाठी १४ वर्षांची शिक्षा होती.

अन्‍न व आरामाविना एक रात्र काढल्यानंतर पोलिसांनी आम्हाला माऊल तुरुंगात नेलं. तिथल्या कोठड्या इतक्या गच्च भरल्या होत्या की आम्हाला जमिनीवर झोपायला जागा नव्हती! शौचालय म्हणजे, प्रत्येक भरलेल्या कोठडीत एक बादली. जेवण अतिशय कमी आणि हलक्या दर्ज्याचे. दोन आठवड्यांनंतर, आम्ही शांतीप्रिय लोक आहोत हे तुरुंग अधिकाऱ्‍यांनी ओळखल्यावर त्यांनी आम्हाला तुरुंगातील व्यायामासाठी असलेल्या अंगणाचाही वापर करण्याची परवानगी दिली. आम्ही पुष्कळजण एकत्र असल्यामुळे आम्हाला एकमेकांना दररोज उत्तेजन देण्याची व इतर कैद्यांना उत्तम साक्ष देण्याची संधी मिळायची. आम्हाला तुरुंगाची शिक्षा होऊन केवळ तीनच महिने झाले होते, पण मलावीच्या सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव आणल्यामुळे आमची सुटका करण्यात आली तेव्हा आम्हाला खूप आश्‍चर्य वाटले.

पोलिस अधिकाऱ्‍यांनी आम्हाला आमच्या घरी जाण्यास गळ घातली, पण आम्हाला सांगितलं, की यहोवाच्या साक्षीदारांवर मलावीत बंदी आली होती. ही बंदी, ऑक्टोबर २०, १९६७ पासून ऑगस्ट १२, १९९३ पर्यंत—जवळजवळ २६ वर्षं होती. तो काळ खरोखरच कठीण काळ होता, पण यहोवाच्या मदतीनं आम्ही आमची तटस्थता टिकवून ठेवू शकलो.

प्राण्यांप्रमाणे साक्षीदारांचा शोध

१९७२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात, सरकारनं काढलेल्या एका हुकूमामुळे हिंसक छळाची एक नवीन लाट आली. हुकूमात असे म्हटले होते, की सर्व यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या कामावरून काढून टाकण्यात यावे आणि गावात राहणाऱ्‍या सर्व साक्षीदारांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात यावे. प्राण्यांप्रमाणे साक्षीदारांचा शोध सुरू झाला.

त्याच वेळी, एक तरुण ख्रिस्ती बांधव एमाससाठी असा एक तातडीचा संदेश घेऊन आला, की ‘युवक संघानं तुमचा शिरच्छेद करून तुमचं मुंडकं एका खांबाला बांधून स्थानीय प्रमुखाकडे नेण्याचा कट रचला आहे.’ एमासनं लगेच पळ काढला, पण जाण्याआधी आम्हीसुद्धा होता होईल तितक्या लवकर तिथून निघावे म्हणून सर्व व्यवस्था करूनच ते पळून गेले. घाईघाईनं मी मुलांना पाठवलं. शेवटी मी निघणार इतक्यात युवक संघाचे दहा सदस्य एमासना शोधत आले. ते घरात घुसले पण एमास तर पळून गेले होते हे त्यांना समजलं. संतापून त्यांनी मला जवळ असलेल्या एका उसाच्या मळ्यात नेलं, तिथं मला लाथाबुक्क्या मारल्या, उसाच्या कांड्यांनी मला झोडपलं. मग मी मेले असं समजून मला तिथंच सोडून ते निघून गेले. शुद्धीवर आल्यावर मी रांगत रांगत घरात आले.

त्या रात्री, अंधाराचा फायदा घेऊन एमास आपला जीव धोक्यात घालून मला शोधत शोधत घरी आले. माझी दयनीय स्थिती पाहून त्यांनी लगेच मला, एका मित्राच्या साहाय्यानं त्याच्या कारमध्ये अलगद उचलून ठेवलं. तिथून मग आम्ही लिलाँग्वा येथील एका बांधवाच्या घरी गेलो; माझी तब्येत हळूहळू सुधारू लागली आणि एमास देश सोडून जाण्याची योजना करू लागले.

आश्रय नसलेले निर्वासित

आमची मुलगी डिनस आणि तिचा नवरा यांच्या मालकीचा एक पाच-टनचा ट्रक होता. त्यांनी एक ड्रायव्हर ठेवला जो पूर्वी मलावी युवक अग्रेसरचा सदस्य होता पण आता त्याला आमच्याविषयी सहानुभूती वाटत होती. त्यानं आम्हाला आणि इतर साक्षीदारांना मदत करण्याची तयारी दाखवली. कित्येक दिवस तो संध्याकाळच्या वेळी आधीच ठरवलेल्या लपण्याच्या जागांहून साक्षीदारांना ट्रकमध्ये घ्यायचा. मग आपला मलावी युवक अग्रेसरचा गणवेष चढवायचा आणि तो, पोलिसांनी रस्त्यावर उभे केलेले अडथळे पार करून या सर्वांना सुरक्षित ठिकाणी पोहंचवायचा. झांबियाची सरहद्द पार करण्यासाठी त्याने शेकडो साक्षीदारांना मदत करण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला.

काही महिन्यांनंतर, झांबियाच्या अधिकाऱ्‍यांनी आम्हाला पुन्हा मलावीत पाठवलं; पण आम्ही आमच्या गावात जाऊ शकत नव्हतो. आम्ही जे सामान सोडून गेलो होतो ते सर्व चोरीला गेलं होतं. आमच्या घराचे लोखंडी पत्रेसुद्धा लोकांनी चोरून नेले होते. आमच्यासाठी इतर कोणतेही सुरक्षित ठिकाण नसल्यामुळे आम्ही मोझांबिकला गेलो आणि तिथं म्लान्गेनी निर्वासित छावणीत अडीच वर्षं राहिलो. पण १९७५ सालच्या जून महिन्यात मोझांबिकमधल्या एका नवीन सरकारनं ही निर्वासितांची छावणी बंद केली आणि आम्हाला पुन्हा मलावीत जाण्यास जबरदस्ती केली; पण मलावीत तर यहोवाच्या लोकांसाठी धोका होता. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून आम्ही पुन्हा एकदा झांबियात गेलो. तिथं आम्ही चिगुमुकीर निर्वासित छावणीत पोहंचलो.

दोन महिन्यांनंतर, मुख्य रस्त्यालगत लावलेल्या बसेसच्या व लष्करी ट्रक्सच्या तांड्यांतून आलेल्या शेकडो शस्त्रधारी झांबियन सैनिकांनी छावणीवर हल्ला केला. त्यांनी आम्हाला सांगितलं, की आमच्यासाठी छानपैकी घरं बांधण्यात आली होती व तिथपर्यंत ते आम्हाला नेऊनही घालतील. पण हे खरं नसल्याचं आम्हाला माहीत होतं. सैनिक लोकांना ट्रक आणि बसेसमध्ये जबरदस्तीनं चढवू लागले, यामुळे लोकांमध्ये हाहाकार माजला. मग सैनिकांनी आपल्या ऑटोमॅटिक शस्त्रांमधून हवेत गोळीबार करण्यास सुरवात केली आणि आपले हजारो बंधूभगिनी भयभीत होऊन इतरत्र विखुरले.

या गोंधळात, एमास खाली पडले आणि तुडवले गेले, पण एका बांधवानं त्यांना उठायला मदत केली. ही मोठ्या संकटाची सुरवात आहे असंच आम्हाला वाटलं. सर्व निर्वासित पुन्हा मलावीत पळाले. झांबियातच असताना आम्ही एका नदीजवळ पोहंचलो; तेव्हा, सर्वांना नदीच्या पलीकडे सुरक्षित पोहंचवण्याकरता बांधवांनी एकमेकांचा हात धरून एक साखळी तयार केली. पण, नदीच्या पलीकडे आम्हाला झांबियन सैनिकांनी घेरलं आणि जबरदस्तीनं मलावीत पुन्हा पाठवलं.

मलावीत आल्यावर कोठं जायचं हे आम्हाला कळत नव्हतं. आम्हाला समजलं, की राजकीय मेळाव्यांद्वारे व बातमीपत्रांद्वारे लोकांना असा इशारा देण्यात आला होता, की गावात येणाऱ्‍या “नवीन लोकांपासून” त्यांनी सावध राहावे; हे नवीन लोक म्हणजे आम्हीच यहोवाचे साक्षीदार होतो. त्यामुळे मग आम्ही राजधानी शहरात जायचे ठरवले; इथं लोक आम्हाला इतक्या सहजासहजी ओळखू शकत नव्हते. आम्ही कसेबसे एक लहानसे घर भाड्याने घेतले आणि एमासनी पुन्हा प्रवासी पर्यवेक्षक म्हणून मंडळ्यांना गुप्त भेटी देण्यास सुरू केलं.

मंडळीच्या सभांना जाणे

कोणत्या गोष्टीनं आम्हाला विश्‍वासू राहायला मदत केली होती? मंडळीच्या सभा! मोझांबिक आणि झांबियातील निर्वासितांच्या छावणीत असताना आम्ही साध्या-सुध्या गवताच्या छप्पराच्या राज्य सभागृहात भरवल्या जाणाऱ्‍या सभांना मुक्‍तपणे उपस्थित राहत होतो. मलावीत सभांसाठी एकत्र येणं जिकरीचं व कठीण असलं तरी, नेहमी प्रतिफलदायी होतं. लोकांच्या नजरेत आम्ही येऊ नये म्हणून आम्ही सहसा रात्री उशिरा दूरच्या ठिकाणी सभा भरवत असू. आमच्याकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून आम्ही वक्‍त्‌याने भाषण दिल्यावर टाळ्या वाजवण्याऐवजी फक्‍त आपले हात घासत असू.

बाप्तिस्मेसुद्धा रात्री उशिराच व्हायचे. आमचा मुलगा अबियुद याचा अशाच एका प्रसंगी बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्म्याच्या भाषणानंतर, त्याला आणि इतर बाप्तिस्म्याच्या उमेदवारांना अंधारातच, एका दलदलीच्या ठिकाणी खणण्यात आलेल्या एका उथळ खड्ड्याजवळ नेण्यात आलं. आणि तिथं त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला.

आमचं लहानसं घर सुरक्षित ठिकाण

सरकारी बंदीच्या शेवटल्या वर्षांदरम्यान, लिलाँग्वामधील आमचं लहानसं घर सुरक्षित ठिकाण होते. झांबियाच्या शाखा दफ्तराकडून येणारे पत्र व प्रकाशने आमच्या घरात सुरक्षितपणे टाकली जात असत. सायकलींवर कुरियरचं काम करणारे बांधव आमच्या घरी येऊन, झांबियाहून आलेल्या गोष्टी मलावीच्या सर्व भागांमध्ये नेऊन घालायचे. वितरण केली जाणारी टेहळणी बुरूज नियतकालिके पातळ होती कारण ती बायबल कागदावर छापली जात असत. यामुळे, या कुरियर बांधवांना, नेहमीच्या कागदावर छापण्यात येणाऱ्‍या नियतकालिकांपेक्षा दुप्पट नियतकालिके पोहंचवता येऊ शकली. याशिवाय या बांधवांनी टेहळणी बुरूज यांच्या लघुनियतकालिकांचे देखील वाटप केले; या नियतकालिकांमध्ये फक्‍त अभ्यास लेख छापले जात. हे लघुनियतकालिक शर्टाच्या खिशात सहज लपवता येऊ शकत होते कारण ते एकाच पानाचे असायचे.

कुरियरचं काम करणाऱ्‍या या बांधवांनी आपले स्वातंत्र्य आणि जीव धोक्यात घालून झाडींमधून, कधीकधी तर काळ्याकुट्ट अंधारात आपल्या सायकलींवर बंदी असलेल्या प्रकाशनांचे उंच गठ्ठे बांधून नेले. पोलिसांनी लावलेले अडथळे आणि इतर धोकेदायक परिस्थितीतून या बांधवांनी, आपल्या बांधवांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्याकरता, पावसा-पाण्याची, उनवाऱ्‍याची पर्वा न करता सायकलींवर शेकडो किलोमीटर प्रवास केला. या प्रिय बांधवांच्या धैर्याचा आम्हाला अभिमान वाटतो!

यहोवा विधवांची काळजी घेतो

१९९२ सालच्या डिसेंबर महिन्यात, एका विभागीय भेटीदरम्यान भाषण देत असताना एमास यांना मस्तिष्काघाताचा झटका आला. त्यानंतर त्यांची वाचा गेली. काही काळानंतर त्यांना दुसरा एक झटका आला त्यामुळे त्यांना अर्धांगवायू झाला. त्यांना तसा पुष्कळ त्रास सहन करावा लागला पण, आमच्या मंडळीतील बंधूभगिनींनी दाखवलेल्या प्रेमामुळे आमची चिंता कमी झाली. नोव्हेंबर १९९४ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचं निधन होईपर्यंत मी घरातच त्यांची काळजी घेऊ शकले. आमच्या लग्नाला ५७ वर्ष पूर्ण झाली होती, आणि एमास यांनी आपल्या मृत्यूपूर्वी बंदी उठताना पाहिली होती. पण, मला अजूनही माझ्या विश्‍वासू सोबत्याची कमी भासते.

माझ्या वैधव्यामुळे, माझ्या जावयानं आपली पत्नी व पाच मुलांबरोबर माझी देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली. पण, ऑगस्ट २००० साली, अल्पकालीन आजारपणानंतर तोही मृत्यू पावला. आता, माझी मुलगी आमच्या सर्वांच्या खाण्या-पिण्याची व राहण्याची सोय कशी करणार होती? पुन्हा एकदा मला, यहोवा आमची काळजी घेतो आणि तो “पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी” आहे याची प्रचिती आली. (स्तोत्र ६८:५) यहोवानं पृथ्वीवरील आपल्या सेवकांद्वारे आमच्यासाठी एक नवीन घर दिलं. ते कसं? आमच्या मंडळीतील बंधूभगिनींनी आमची दयनीय अवस्था पाहिल्यावर फक्‍त पाच आठवड्यांत एक नवीन घर बांधून दिलं! गवंड्याचं काम करणारे दुसऱ्‍या मंडळीतील बांधव मदत करायला आले. या सर्व साक्षीदारांनी दाखवलेलं प्रेम आणि दया पाहून आम्ही भारावून गेलो; कारण, त्यांनी आमच्यासाठी बांधलेलं घर, बहुतेक बंधूभगिनी राहत असलेल्या घरापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. मंडळीतील सर्वांनी दाखवलेल्या या प्रेमामुळे आमच्या शेजारच्या लोकांना चांगली साक्ष मिळाली. मी रात्रीची झोपी जाते तेव्हा मला वाटतं, जणू मी परादीसमध्येच आहे! आमचं घर साध्याशा विटांचंच असलं तरी, अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ते प्रेमानं बांधलेलं आहे.—गलतीकर ६:१०.

यहोवा काळजी घेत आहे

कधीकधी मी निराशेच्या खाईत पडता पडता वाचले, पण प्रत्येक वेळा यहोवानं माझी काळजी घेतली. नऊ पैकी माझी सात मुले जिवंत आहेत आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांची संख्या १२३ इतकी आहे. यांतील बहुतेक जण यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत आहेत म्हणून मी त्याचे खूप आभार मानते!

आज, वयाच्या ८२ व्या वर्षी मी, मलावीत देवाच्या आत्म्याने काय काय साध्य केले आहे ते पाहते तेव्हा मला खूप आनंद होतो. गेल्या केवळ चार वर्षांतच, मी राज्य सभागृहांची संख्या कशी वाढत गेली आहे, म्हणजे एक राज्य सभागृहापासून ६०० पेक्षा अधिक सभागृहे झाल्याचे पाहिले आहे. लिलाँग्वा येथे आता एक नवे शाखा दफ्तर देखील आहे आणि आम्ही विपुल पुष्टीदायक आध्यात्मिक अन्‍नाचा आस्वाद घेत आहोत. यशया ५४:१७ मध्ये देवाने दिलेल्या वचनाची पूर्णता मी खरोखरच अनुभवत आहे असं मला वाटतं; तिथं आपल्याला असा दिलासा दिला आहे: “तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेहि हत्यार तुजवर चालणार नाही.” ५० हून अधिक वर्षं यहोवाची सेवा केल्यावर माझी खात्री पटली आहे, की आपल्यासमोर कोणत्याही प्रकारच्या परीक्षा आल्या तरी यहोवा आपली काळजी घेतो.

[तळटीप]

^ परि. 16 मलावीतील यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासाविषयी अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले १९९९ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिकपुस्तक, (इंग्रजी) पृष्ठे १४९-२२३ पाहा.

[२४ पानांवरील चित्र]

१९५१ साली एप्रिल महिन्यात, माझे पती एमास यांचा बाप्तिस्मा झाला

[२६ पानांवरील चित्र]

कुरियर नेणाऱ्‍या धाडसी बांधवांचा एक गट

[२८ पानांवरील चित्र]

प्रेमानं बांधलेलं घरकुल