वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
जगाच्या अनेक भागांत, विवाहाच्या वेळी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. अशा भेटवस्तू देताना किंवा घेताना कोणती शास्त्रवचनीय तत्त्वे आपण लक्षात ठेवली पाहिजेत?
उचित हेतूसह व उचित प्रसंगी भेटवस्तू देण्याला बायबलमध्ये मनाई करण्यात आलेली नाही. देण्याच्या बाबतीत, आपला उदार दाता यहोवा याचे अनुकरण करण्याचे उत्तेजन बायबल खऱ्या ख्रिश्चनांना देते. (याकोब १:१७) प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना असे आर्जवले: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” त्यामुळे, ख्रिश्चनांना उदार असण्याचे प्रोत्साहन दिले जाते.—इब्री लोकांस १३:१६; लूक ६:३८.
भेटवस्तू नोंदवहीचा उपयोग करण्याविषयी संयुक्त संस्थानांतील सर्वसामान्य प्रथेविषयी काय? इंग्लंडमध्ये याला विवाह यादी असे म्हटले जाते. विवाह करणारे जोडपे, एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन, दुकानांतील वेगवेगळ्या वस्तू पाहतात आणि कोणत्या वस्तू आपल्याला भेट म्हणून हव्या आहेत त्यांची यादी या नोंदवहीत लिहून ठेवतात. मग या नवदांपत्याच्या नातेवाईकांना व मित्रांना त्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन नोंदवहीतील यादीनुसार, या दांपत्यासाठी भेटवस्तू विकत घेण्याचे आमंत्रण दिले जाते. तसे पाहायला गेलो तर, भेटवस्तू नोंदवहीमुळे, भेटवस्तू विकत घेणाऱ्याला वस्तू शोधण्यात वेळ घालवावा लागत नाही आणि जे भेटवस्तू स्वीकारतात त्यांचा, नको असलेली भेटवस्तू पुन्हा दुकानात जाऊन ती परत करण्याचा त्रास वाचतो.
ज्यांचा विवाह होणार आहे अशा जोडप्याने भेटवस्तू नोदंवहीचा उपयोग करावा की करू नये हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. परंतु, बायबल तत्त्वांचे उल्लंघन करणारी कोणतीही प्रथा टाळण्याविषयी ख्रिस्ती जन खबरदारी बाळगतील. जसे की, मागणी झालेल्या एखाद्या जोडप्याने, महागड्या वस्तुंची यादी केल्यास काय? अशा वेळी, ज्यांना महागड्या वस्तू घेणे परवडत नाही त्यांना या नवदांपत्याला भेटवस्तू देणे जमणार नाही किंवा महागड्या वस्तू न घेतल्यामुळे आपली होणारी कुचंबना टाळण्यासाठी आपण विवाहासाठी दिलेले आमंत्रणच स्वीकारू नये, असे कदाचित त्यांना वाटेल. एका ख्रिस्ती स्त्रीने लिहिले: “विवाह भेटवस्तू देणे एक ओझेच बनले आहे. मी उदार होण्याचा प्रयत्न केला पण अलीकडे अलीकडे, देण्यामुळे मला जो आनंद मिळत होता तोच नाहीसा होत चालला आहे.” तेव्हा, विवाहामुळे निराशा येत असेल तर ही किती दुःखाची गोष्ट आहे!
अर्थातच, भेटवस्तू देणाऱ्यांना असे जाणवू देऊ नये, की त्यांची भेटवस्तू स्वीकारयोग्य व्हावी म्हणून ती अमुक दुकानातूनच खरेदी केली पाहिजे किंवा अमुक किंमतीचीच असली पाहिजे. येशू ख्रिस्ताने असे सूचित केले होते, की एखाद्या भेटवस्तुची किंमत नव्हे तर देणाऱ्या व्यक्तीची मनोवृत्ती देवाच्या नजरेत अधिक मौल्यवान असते. (लूक २१:१-४) तसेच, गरजू लोकांना दिल्या जाणाऱ्या दयेच्या भेटवस्तुंविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथकर ९:७.
बायबल अनुसार, भेटवस्तू देणाऱ्याने आपले नाव सांगण्यात काही गैर नाही; कदाचित भेटवस्तुसोबत तो आपल्या नावाची एक चिठी लिहू शकतो. परंतु, काही ठिकाणी, भेटवस्तू देणाऱ्या व्यक्तीचे नाव उपस्थित असलेल्या सर्वांसमोर वाचून दाखवण्याची प्रथा आहे. यामुळे समस्या उद्भवतात. भेटवस्तू देणाऱ्यांना, लोकांचे लक्ष विनाकारण आकर्षित करण्याचे टाळण्यासाठी आपले नाव गुप्त ठेवण्याची इच्छा असेल. हे लोक, मत्तय ६:३ मधील तत्त्वाच्या अनुषंगात कार्य करतात जेथे येशूने म्हटले होते: “तू तर दानधर्म करितोस तेव्हा तुझा उजवा हात काय करितो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये.” इतरांची अशी इच्छा असेल, की भेटवस्तू देणे ही व्यक्तिगत बाब असल्यामुळे, ती केवळ देणाऱ्यामध्ये व घेणाऱ्यामध्येच असली पाहिजे. शिवाय, भेटवस्तू देणाऱ्यांची नावे जाहीर केल्यामुळे भेटवस्तुंची तुलना केली जाऊ शकते ज्यामुळे “एकमेकांमध्ये स्पर्धात्मक भावना” उत्पन्न होऊ शकते. (गलतीकर ५:२६, NW) भेटवस्तू देणाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांची कुचंबना करण्याचे ख्रिस्ती जन नक्कीच टाळतील.—१ पेत्र ३:८.
देवाच्या वचनातील तत्त्वांच्या अनुषंगाने कार्य केल्यामुळे, भेटवस्तू देण्यामुळे नेहमीच आनंद मिळत राहील.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.