व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचा विवाह मजबूत कसा कराल

तुमचा विवाह मजबूत कसा कराल

तुमचा विवाह मजबूत कसा कराल

दुर्लक्ष झाल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झालेल्या एका घराची कल्पना करा. रंगाचे पोपडे निघत आहेत, छत गळत आहे, सगळी झाडे वाळल्यामुळे घरासमोरची बाग भकास दिसत आहे. अनेक वर्षांपासून या घराने वादळवाऱ्‍यात तग धरला आहे तसेच त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचेही स्पष्टपणे दिसत आहे. मग ते पूर्णपणे पाडले पाहिजे का? तशी गरज नाही. जर त्या घराचा पाया भक्कम आहे आणि भिंती मजबूत आहेत तर घराची केवळ डागडुजी केल्याने ते व्यवस्थित होऊ शकते.

या घरावरून तुम्हाला तुमच्या विवाहाची आठवण होते का? अनेक वर्षांपासून तुमच्या वैवाहिक नातेसंबंधावर, वादळवाऱ्‍याचा मारा झाला असावा. दोघांपैकी एकाने किंवा कदाचित दोघांनीही आपल्या विवाहाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले असेल. तुम्हालाही सॅन्डीप्रमाणे वाटेल. विवाह होऊन १५ वर्षांनंतर ती म्हणते: “आमच्या दोघांत काहीच सारखं नव्हतं; सारखं होतं ते इतकंच की आम्ही दोघं एकाच घरात राहत होतो. आणि हे पुरेसं नव्हतं.”

तुमचाही विवाह असा असेल तर, तो मोडण्याची घाई करू नका. तुमचा विवाह कदाचित वाचवता येऊ शकेल. तुमच्यामध्ये व तुमच्या सोबत्यामध्ये असलेल्या विवाहाच्या वचनबद्धतेवर हे पुष्कळशा प्रमाणात अवलंबून आहे. वैवाहिक वचनबद्धतेमुळे तुमच्या विवाहाला परीक्षांच्या वेळी स्थैर्य लाभू शकते. पण वचनबद्धता म्हणजे काय? आणि ती मजबूत करण्यासाठी बायबल तुमची मदत कशी करू शकते?

वैवाहिक वचनबद्धतेत कर्तव्याची जाणीव

वचनबद्धता, कर्तव्याची किंवा भावनिक आसक्‍तीची जाणीव याला सूचित करते. कधीकधी, वचनबद्धता हा शब्द यंत्रवत्‌ जसे की व्यापारातील करार याला लागू केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या बिल्डरला, घर बांधून देण्यासंबंधी त्याने केलेला करार पूर्ण करण्याची जबाबदारी वाटेल. हे काम त्याला ज्याने करायला सांगितले आहे त्याला तो कदाचित व्यक्‍तिगतरीत्या ओळखत नसेल. पण, आपण केलेल्या करारानुसार आपल्याला हे काम करणे भाग आहे असे त्याला वाटते.

विवाह हा भावनारहीत व्यापारी करार नसला तरी, तुमचा दृढनिश्‍चय आणि विवाह टिकवून ठेवण्याची तुमची इच्छा यांमुळे तुमच्यात आपोआप कर्तव्याची जाणीव उत्पन्‍न होईल. तुम्ही आणि तुमच्या सोबत्याने देवासमोर व इतर लोकांसमोर अशी शपथ घेतलेली असते, की आमच्यासमोर कोणतीही परिस्थिती आली तरी आम्ही एकत्र राहू. येशूने म्हटले: “उत्पन्‍नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, ‘ह्‍याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील.’” आणि येशूने पुढे असेही म्हटले, की “म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” (मत्तय १९:४-६) यास्तव, समस्या येतात तेव्हा तुम्ही आणि तुमच्या सोबत्याने एकमेकांना दिलेले वचन पूर्ण करण्याचा दृढनिश्‍चय केला पाहिजे. * एक पत्नी म्हणते: “घटस्फोट एक पर्याय आहे असा विचार करण्याचे आम्ही सोडून दिल्यावरच आमची वैवाहिक परिस्थिती बदलू लागली.”

वैवाहिक वचनबद्धतेत केवळ कर्तव्यच समाविष्ट नाही. मग आणखी काय समाविष्ट आहे?

एकजुटीने काम केल्यास विवाहातील वचनबद्धता मजबूत होते

वैवाहिक वचनबद्धतेचा अर्थ, विवाह सोबत्यांमध्ये दुमत होणार नाही असे नाही. जेव्हा दुमत होते तेव्हा, कर्तव्य म्हणून नव्हे तर भावनिक बंधनाची जाणीव ठेवून समस्या सोडवण्याची मनापासून इच्छा असली पाहिजे. पती-पत्नीविषयी येशूने म्हटले: “ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत.”

तुमच्या सोबत्याबरोबर “एकदेह” असण्याचा काय अर्थ होतो? प्रेषित पौलाने लिहिले, की “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी.” (इफिसकर ५:२८, २९) तेव्हा, काही अंशी “एकदेह” असण्याचा अर्थ, तुम्हाला स्वतःच्या हिताची जशी काळजी वाटते तशीच काळजी आपल्या सोबत्याच्या हिताची वाटते. लग्न झालेल्यांनी, “माझे” याऐवजी “आपले” आणि “मी” याऐवजी “आपण” असा विचार केला पाहिजे. एका महिला सल्लागारने असे लिहिले: “पती-पत्नी दोघांनी, आपण एकटे आहोत असा विचार करण्याचे थांबवून आता आपण दोघं आहोत असा विचार करण्यास सुरू करावे.”

तुम्ही व तुमचा वैवाहिक सोबती, आपण एकटे नव्हे तर आता “दोघे” आहात असा विचार करता का? अनेक वर्षे सोबत राहूनही त्या अर्थाने “एकदेह” न होण्याची शक्यता आहे. असे घडू शकते, परंतु गिविंग टाईम अ चान्स नावाचे पुस्तक म्हणते: “विवाह म्हणजे, एकत्र जीवन व्यतीत करणे आणि दोन व्यक्‍ती जितके अधिक एकत्र काम करतील तितके अधिक त्यांचे जीवन उत्कर्ष पावेल.”

आपल्या विवाहात संतुष्ट नसलेली काही जोडपी मुलांखातर किंवा आर्थिक सुरक्षा मिळण्याखातर एकत्र राहतात. काही जोडपी मुक्याट्याने सर्व काही सहन करीत असतात कारण एकतर घटस्फोटाला त्यांचा ठाम नकार असतो किंवा आपण विभक्‍त झालो तर लोक काय म्हणतील, ही भीती त्यांच्या मनात असते. त्यांचा विवाह टिकून राहतो हे प्रशंसनीय असले तरी, तुमचा विवाह दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवण्याचा नव्हे तर तुमच्या विवाहात प्रेमळ नातेसंबंध असण्याचा हेतू असला पाहिजे.

निःस्वार्थ कार्यांमुळे वैवाहिक वचनबद्धता तयार होते

बायबलने भाकीत केले, की ‘शेवटल्या दिवसांत’ लोक “स्वार्थी” होतील. (२ तीमथ्य ३:१, २) या भविष्यवाणीत म्हटल्याप्रमाणे आज स्वतःची पूजा करण्यावर जास्त भर दिला जातो असे दिसते. बहुतेक विवाहांत, मोबदल्याची खात्री नसताना स्वतःला वाहून टाकणे कमजोरीचे चिन्ह असल्याचे समजले जाते. परंतु, एका यशस्वी विवाहात दोन्ही सोबती आत्म-त्यागाची मनोवृत्ती दाखवतात. तुम्ही अशी मनोवृत्ती कशी दाखवू शकाल?

‘मला या नातेसंबंधातून काय मिळत आहे,’ या प्रश्‍नावर जास्त विचार करत बसण्यापेक्षा, ‘माझा विवाह आणखी मजबूत करण्यासाठी मी स्वतः काय करत आहे?’ हा प्रश्‍न स्वतःला विचारा. बायबल म्हणते, की ख्रिश्‍चनांनी ‘आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्‍याचेहि’ पाहावे. (फिलिप्पैकर २:४) या बायबल तत्त्वावर विचार करताना गेल्या आठवड्यांतील तुमच्या कार्यांचे परीक्षण करा. केवळ तुमच्या सोबत्याच्या लाभासाठी तुम्ही कितींदा एखादे दयाळू कार्य केले? तुमच्या सोबत्याला तुमच्याशी बोलायचे होते तेव्हा तुम्ही, तुम्हाला इच्छा नसतानाही तिचे/त्याचे म्हणणे ऐकून घेतले का? तुमच्या आवडीपेक्षा तुमच्या सोबत्याच्या आवडीच्या किती कार्यांत तुम्ही भाग घेतलात?

या प्रश्‍नांवर विचार करताना, तुमच्या चांगल्या कार्यांकडे डोळेझाक होईल किंवा तुम्हाला त्याचे काही प्रतिफळ मिळणार नाही, अशी काळजी करू नका. एक संदर्भग्रंथ म्हणतो: “बहुतेक नातेसंबंधात, सकारात्मक वागणूक इतरांना सकारात्मकपणे वागण्यास प्रेरित करते; तेव्हा, तुम्ही स्वतः सकारात्मक वागा आणि तुमच्या सोबत्याला सकारात्मकपणे वागण्याचे होता होईल तितके उत्तेजन द्या.” आत्म-त्यागी कार्यांमुळे तुमचा विवाह मजबूत होतो कारण त्यावरून तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनाला मोलाचे लेखता आणि तुम्हाला तो टिकवून ठेवायचा आहे हे दिसून येते.

दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्‍यक

यहोवा देवाला एकनिष्ठता हा गुण खूप महत्त्वाचा वाटतो. बायबल म्हणते: “निष्ठावंतांशी तू [यहोवा] निष्ठेने वागतोस.” (२ शमुवेल २२:२६, मराठी कॉमन लँग्वेज) देवाशी एकनिष्ठ राहण्यामध्ये, त्याने स्थापन केलेल्या विवाह संस्थेला एकनिष्ठ राहणे समाविष्ट आहे.—उत्पत्ति २:२४.

तुम्ही आणि तुमचा सोबती एकमेकांबरोबर एकनिष्ठ असाल, तर तुमच्या एकीची तुम्ही खात्री बाळगू शकता. तुमच्या भवितव्याचा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्ही शेवटपर्यंत एकत्र असल्याचे चित्र तुम्हाला दिसेल. एकमेकांशिवाय राहण्याची कल्पनासुद्धा तुमच्या मनात येणार नाही आणि यामुळे तुमच्यातला नातेसंबंध सुरक्षित राहील. एक पत्नी म्हणते: “मला माझ्या नवऱ्‍यावर खूप राग आलेला असला आणि आमच्यात हे काय चाललं आहे म्हणून मी खूप अस्वस्थ झालेले असले तरी, आता आमचं लग्न मोडेल याची मला मुळीच काळजी वाटत नाही. काळजी वाटते ती याची की आम्ही पुन्हा आमचा नातेसंबंध सुरळीत कसा करू शकतो. आम्ही एकत्र येऊ याच्याबद्दल मला शंका नसते—फक्‍त त्या प्रसंगी मला याविषयी काही सुचत नाही.”

तुमच्या सोबत्याशी तुमचा विवाह दीर्घकाळ टिकवण्याचा दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे, परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे पुष्कळ वैवाहिक सोबत्यांमध्ये असा दृष्टिकोन नसतो. भांडणाच्या वेळी, एखादा सोबती म्हणेल: “मी तुला/तुम्हाला सोडून चाललो/चालले!” किंवा “माझी खरी किंमत असलेल्या व्यक्‍तीला मी शोधणार आहे!” बहुतेकदा असे केवळ रागात बोलले जाते. तरीपण, बायबल म्हणते की जीभ “प्राणघातक विषाने भरलेली आहे.” (याकोब ३:८) धमक्या आणि निर्वाणीचे शब्द हा संदेश देत असतात: ‘आपला विवाह कायमचा आहे असे मला वाटत नाही. मी केव्हाही तो मोडू शकतो/शकते.’ अशाप्रकारे आपल्या वैवाहिक सोबत्यांना सुचवणे, विवाहासाठी हानीकारक ठरू शकते.

विवाह दीर्घ-काळ टिकवण्याचा तुमचा दृष्टिकोन असतो तेव्हा तुम्ही तुमच्या वैवाहिक सोबत्याला जीवनातील उतार-चढावात साथ द्यायला तयार असता. यामुळे आणखी एक लाभ होतो. यामुळे तुम्ही आणि तुमचा वैवाहिक सोबती एकमेकांच्या कमतरता, चुका सहजपणे स्वीकारता, एकमेकांचे सहन करता आणि एकमेकांना क्षमा करण्यास तयार असता. (कलस्सैकर ३:१३) एका पुस्तकात असे म्हटले आहे: “चांगल्या विवाहात दोघांनाही चुका करण्यास वाव असतो आणि तरीपण वैवाहिक वचनबद्धता कायम राहते.”

तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही, विवाहसंस्थेला नव्हे तर एका जिवंत व्यक्‍तीला अर्थात तुमच्या वैवाहिक सोबत्याला वचन देता. यामुळे या वस्तुस्थितीचा, एक विवाहित व्यक्‍ती या नात्याने आता तुमच्या विचारसरणीवर आणि कार्यावर गहन प्रभाव झाला पाहिजे. विवाहाच्या पावित्र्यावर तुमचा भक्कम विश्‍वास आहे म्हणूनच नव्हे तर तुम्ही ज्या व्यक्‍तीबरोबर विवाह केला आहे त्या व्यक्‍तीवर तुमचे प्रेम आहे म्हणून तुम्ही तुमच्या सोबत्याबरोबर राहिले पाहिजे याजशी तुम्ही सहमत नाही का?

[तळटीपा]

^ परि. 7 काही टोकाच्या प्रसंगी, एखाद्या वैवाहिक जोडप्याकडे विभक्‍त होण्याची ठोस कारणे असतील. (१ करिंथकर ७:१०, ११; यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य पृष्ठे १६०-१ पाहा.) याशिवाय, जारकर्म (लैंगिक अनैतिकता), या कारणासाठी घटस्फोट देण्यास बायबल अनुमती देते.—मत्तय १९:९.

[५ पानांवरील चौकट/चित्र]

तुम्ही आता काय करू शकता

वैवाहिक वचनबद्धतेच्या बाबतीत तुमचा विवाह कसा आहे? यात काही सुधारणा करता येतील असे तुम्हाला कदाचित वाटेल. वैवाहिक वचनबद्धता आणखी मजबूत करण्यासाठी पुढील गोष्टी करून पाहा:

• आत्म-परीक्षण करा. स्वतःला विचारा: ‘माझं लग्न झालं आहे हे मी मनापासून स्वीकारलं आहे, की अजूनही मी अविवाहित व्यक्‍तीप्रमाणेच विचार व कार्य करतो/करते?’ याबाबतीत तुमच्या सोबत्याला तुमच्याविषयी काय वाटते ते विचारा.

• हा लेख आपल्या सोबत्याबरोबर वाचा. मग, शांतपणे तुमच्यापुढे व तुमच्या सोबत्यापुढे तुमची वैवाहिक वचनबद्धता आणखी मजबूत करण्यासाठी कोणते मार्ग आहेत याची चर्चा करा.

• तुमची वैवाहिक वचनबद्धता मजबूत होईल असे कार्य दोघे मिळून करा. जसे की: तुमच्या लग्नाचे आणि इतर अविस्मरणीय घटनांचे फोटो पाहा. लग्न व्हायच्या आधी, एकमेकांची ओळख करून घेत असतानाच्या दिवसांत किंवा नवीन लग्न झाले होते तेव्हाच्या दिवसांत तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडायच्या त्या करा. विवाहाशी संबंधित, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांतील बायबल आधारित लेखांचा एकत्र मिळून अभ्यास करा.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

वैवाहिक वचनबद्धतेत पुढील गोष्टींचा समावेश होतो . . .

• कर्तव्य “जो नवस तू केला असेल त्याची फेड कर. नवस करावा आणि तो फेडू नये यापेक्षा तो मुळीच न करणे बरे.”—उपदेशक ५:४, ५.

• एकत्र मिळून काम करणे “एकट्यापेक्षा दोघे बरे; . . . त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.”—उपदेशक ४:९, १०.

• आत्म-त्याग “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

• विवाह दीर्घकाळ टिकवण्याचा दृष्टिकोन “प्रीति . . . सर्वांसंबंधाने धीर धरते.”—१ करिंथकर १३:४, ७.

[७ पानांवरील चित्रे]

तुमच्या सोबत्याला तुमच्याशी बोलायचे असते तेव्हा तुम्ही ऐकता का?