व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?

निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?

निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?

“निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुति करा.”१ थेस्सलनीकाकर ५:१७, १८.

१, २. प्रार्थनेच्या विशेषाधिकाराची आपल्याला कदर आहे हे दानीएलाने कशाप्रकारे दाखवले आणि याचा त्याच्या देवासोबतच्या नातेसंबंधावर कसा परिणाम झाला?

देष्टा दानीएल दिवसातून तीन वेळा देवाला प्रार्थना करत असे. हा त्याचा नित्यक्रम होता. आपल्या माडीवरील खोलीतल्या, जेरूसलेम शहराच्या दिशेकडे असलेल्या खिडकीत तो दररोज गुडघे टेकून देवाला प्रार्थना करत असे. (१ राजे ८:४६-४९; दानीएल ६:१०) मेदी राजा दारयावेश याला सोडून इतर कोणाचीही आराधना करू नये असे फर्मान राजाने काढले तेव्हासुद्धा दानीएल क्षणभरही विचलित झाला नाही. आपल्या जिवाची पर्वा न करता, या प्रार्थनाशील मनोवृत्तीच्या मनुष्याने यहोवाला प्रार्थना करणे निरंतर सुरू ठेवले.

यहोवाचा दानीएलाबद्दल कसा दृष्टिकोन होता? दानीएलाच्या प्रार्थनेचे उत्तर देण्याकरता एकदा देवदूत गब्रीएल त्याच्याकडे आला तेव्हा त्याने या संदेष्ट्याचे वर्णन “परमप्रिय” या शब्दात केले. (दानीएल ९:२०-२३) यहेज्केलाच्या भविष्यवाणीत यहोवाने दानीएलाच्या संदर्भात बोलताना त्याला एक धार्मिक पुरुष म्हटले. (यहेज्केल १४:१४, २०) दानीएलाच्या जीवनात, त्याच्या प्रार्थनांमुळे देवासोबत त्याचा एक घनिष्ट नातेसंबंध निर्माण झाला असेल; ही गोष्ट दारयावेशनेही ओळखली होती.—दानीएल ६:१६.

३. एका मिशनरी बांधवाच्या उदाहरणावरून दिसून येते त्याप्रमाणे, प्रार्थना आपल्याला विश्‍वासात मजबूत राहण्यास कशाप्रकारे मदत करू शकते?

नियमित प्रार्थना आपल्याला भयंकर परीक्षांना तोंड देण्यासही मदत करू शकते. उदाहरणार्थ, हॅरल्ड किंग यांचे उदाहरण घ्या. ते चीनमध्ये मिशनरी सेवा करत होते आणि त्यांना पाच वर्षांच्या एकांतवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपल्या या अनुभवाविषयी बंधू किंग यांनी म्हटले: “मला माझ्या बांधवांपासून तोडले तरी देवापासून मला कोणीही दूर करू शकले नाही. त्यामुळे माझ्या कोठडीच्या समोरून येणाऱ्‍या-जाणाऱ्‍यांना दिसेल अशाप्रकारे मी बायबलमध्ये दानीएलाबद्दल सांगितल्याप्रमाणे दिवसातून तीन वेळा गुडघे टेकून प्रार्थना करत असे. . . . तेव्हा मला असे जाणवायचे की जणू देवाचा आत्मा माझ्या मनाला हितकारक विषयांवर विचार करण्यास प्रवृत्त करून मला शांती प्रदान करत आहे. प्रार्थनेमुळे मला अद्‌भुतरित्या आध्यात्मिक ताकद आणि सांत्वन मिळाले!”

४. या लेखात आपण प्रार्थनेसंबंधी कोणते प्रश्‍न विचारात घेणार आहोत?

बायबल सांगते: “निरंतर प्रार्थना करा. सर्व स्थितीत उपकारस्तुति करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१७, १८) हे मार्गदर्शन लक्षात घेऊन पुढील प्रश्‍नांचा विचार करू या: आपल्या प्रार्थनांकडे आपण का लक्ष दिले पाहिजे? यहोवाला सतत प्रार्थना करणे का आवश्‍यक आहे? आणि आपल्या चुकांमुळे देवाला प्रार्थना करण्यास आपल्याला संकोच वाटत असल्यास आपण काय करावे?

प्रार्थनेद्वारे मैत्री दृढ करा

५. प्रार्थनेद्वारे आपण कोणत्या अनोख्या मैत्रीचा आनंद उपभोगू शकतो?

यहोवाने तुम्हाला मित्र समजावे असे तुम्हाला वाटते का? त्याने कुलपिता अब्राहाम याला आपला मित्र म्हटले. (यशया ४१:८; याकोब २:२३) यहोवाची इच्छा आहे की आपण त्याच्यासोबत अशाचप्रकारचा नातेसंबंध जोडावा. तो आपल्याला त्याच्या जवळ येण्याचे निमंत्रण देतो. (याकोब ४:८) त्याच्या या निमंत्रणाने आपल्याला प्रार्थनेच्या अनोख्या विशेषाधिकारावर मनन करण्यास प्रवृत्त करू नये का? एखाद्या महत्त्वपूर्ण सरकारी पदावर असलेल्या अधिकाऱ्‍याशी मैत्री करण्याची गोष्ट तर दूर, पण त्यांच्याशी बोलण्याकरता परवानगी देखील मिळणे किती कठीण असते! पण सबंध विश्‍वाचा निर्माणकर्ता आपल्याला जेव्हाही इच्छा असेल अथवा गरज असेल तेव्हा प्रार्थनेद्वारे त्याच्याजवळ येण्याचे निमंत्रण देतो. (स्तोत्र ३७:५) आपल्या निरंतर प्रार्थना आपल्याला यहोवासोबत घनिष्ट मैत्री जोडण्यास मदत करतात.

६. ‘प्रार्थना करीत राहणे’ किती आवश्‍यक आहे याविषयी येशूच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?

इतके असूनही, प्रार्थना करण्याकडे किती सहज आपले दुर्लक्ष होऊ शकते! दैनंदिन जीवनाच्या दबावांना तोंड देण्यातच आपण इतके व्यग्र होऊन जातो की देवाशी प्रार्थनेद्वारे बोलण्याचा प्रयत्नसुद्धा आपण करत नाही. येशूने आपल्या शिष्यांना “प्रार्थना करीत राहा” असा सल्ला दिला आणि त्याने स्वतः देखील हेच केले. (मत्तय २६:४१, NW) सबंध दिवसभर व्यस्त असूनही येशूने आपल्या स्वर्गीय पित्याशी बोलण्याकरता वेळ काढला. कधीकधी येशू “सकाळी मोठ्या पहाटेस” उठून प्रार्थना करत असे. (मार्क १:३५) इतर प्रसंगी, तो संध्याकाळी एखाद्या एकांत स्थळी जाऊन यहोवाशी बोलत असे. (मत्तय १४:२३) येशूने नेहमी प्रार्थनेकरता वेळ काढला आणि आपणही हेच केले पाहिजे.—१ पेत्र २:२१.

७. कशाप्रकारच्या परिस्थितींनी आपल्या स्वर्गीय पित्याशी बोलण्यास आपल्याला प्रेरित केले पाहिजे?

दररोज आपल्याला निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते, आपल्यासमोर वेगवेगळे मोहात पाडणारे प्रसंग येतात किंवा आपल्याला लहानमोठे निर्णय घ्यावे लागतात तेव्हा कित्येकदा आपल्याला यहोवाला वैयक्‍तिक प्रार्थना करण्याची संधी मिळते. (इफिसकर ६:१८) आपण जीवनातल्या सर्व क्षेत्रांत देवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यासोबतची आपली मैत्री निश्‍चितच घनिष्ट होते. दोन मित्र अथवा मैत्रिणी एकत्र मिळून समस्यांना तोंड देतात तेव्हा त्यांची मैत्री अधिक पक्की होत नाही का? (नीतिसूत्रे १७:१७) आपण यहोवावर विसंबून राहतो आणि त्याचे पाठबळ अनुभवतो तेव्हाही असेच घडते.—२ इतिहास १४:११.

८. नहेम्या, येशू व हन्‍ना यांच्या उदाहरणांवरून आपण आपल्या वैयक्‍तिक प्रार्थना किती लांब असाव्यात या संदर्भात काय शिकू शकतो?

आपण देवाशी किती वेळ बोलावे किंवा कितीदा त्याला प्रार्थना करावी यावर त्याने काहीही निर्बंध लावले नाहीत यासाठी आपण किती कृतज्ञ असू शकतो! नहेम्याने पारसाच्या राजाकडे विनंती करण्याआधी मनोमन प्रार्थना केली. (नहेम्या २:४, ५) येशूने देखील लाजाराला पुनरुत्थित करण्याआधी शक्‍ती मिळावी म्हणून यहोवाला लहानशी प्रार्थना केली. (योहान ११:४१, ४२) दुसरीकडे पाहता, हन्‍नाने “परमेश्‍वरापुढे . . . [बराच वेळ] करुणा भाकीत” त्याच्यासमोर आपले मन मोकळे केले. (१ शमुवेल १:१२, १५, १६) आपल्या प्रार्थना गरजेनुसार व परिस्थितीनुसार एकतर संक्षिप्त अथवा लांब असू शकतात.

९. यहोवा आपल्याकरता जे काही करतो त्याविषयी प्रार्थनेत स्तुती व आभार व्यक्‍त करणे का महत्त्वाचे आहे?

बायबलमधील अनेक प्रार्थना यहोवाचे सार्वभौम पद व त्याची अद्‌भुत कार्ये यांविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्‍त करतात. (निर्गम १५:१-१९; १ इतिहास १६:७-३६; स्तोत्र १४५) एका दृष्टान्तात प्रेषित योहान २४ वडिलांना—अर्थात आपापली स्वर्गीय स्थाने घेतलेल्या एकूण अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना पाहतो. हे वडील यहोवाची असे म्हणून स्तुती करत असतात की “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटीकरण ४:१०, ११) आपणही आपल्या निर्माणकर्त्याची नियमित स्तुती करू शकतो. आईवडिलांच्या एखाद्या उपकाराबद्दल मुले आपल्या आईवडिलांचे मनःपूर्वक आभार मानतात तेव्हा आईवडिलांना किती आनंद वाटतो! यहोवाच्या दयाळुपणाबद्दल कृतज्ञतेने मनन करून त्याविषयी आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्‍त करणे हा आपल्या प्रार्थनांचा दर्जा सुधारण्याचा उत्तम मार्ग आहे.

“निरंतर प्रार्थना करा”—पण का?

१०. विश्‍वास दृढ होण्यात प्रार्थनेची काय भूमिका आहे?

१० नियमित प्रार्थना आपल्या विश्‍वासाकरता अत्यावश्‍यक आहेत. “सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये” असे सांगितल्यानंतर येशूने हा प्रश्‍न विचारला: “मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्‍वास आढळेल काय?” (लूक १८:१-८) अर्थपूर्ण, मनःपूर्वक प्रार्थनांमुळे विश्‍वास दृढ होतो. कुलपिता अब्राहाम वयोवृद्ध होत चालला होता आणि अद्याप त्याला संतान नव्हते तेव्हा त्याने यहोवाला आपली ही विवंचना कळवली. उत्तरात, यहोवाने प्रथम त्याला आकाशात पाहून, शक्य असल्यास तारे मोजण्यास सांगितले. मग देवाने अब्राहामाला पुन्हा आश्‍वासन दिले की “तुझी संतति अशीच होईल.” परिणाम? अब्राहामने “परमेश्‍वरावर विश्‍वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्‍वास परमेश्‍वराने त्याचे नीतिमत्त्व गणिला.” (उत्पत्ति १५:५, ६) आपणही प्रार्थनेत यहोवासमोर आपले मन मोकळे केले, बायबलमधून त्याच्या प्रतिज्ञा स्वीकारल्या आणि त्याच्या आज्ञांचे पालन केले तर तो आपला विश्‍वास बळकट करेल.

११. प्रार्थना आपल्याला समस्यांना तोंड देण्यास कशाप्रकारे मदत करू शकतात?

११ प्रार्थना आपल्याला समस्यांना तोंड देण्यासही मदत करू शकते. आपल्या जीवनातील परिस्थिती दुःसह आणि खडतर आहे का? बायबल आपल्याला सांगते: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) कठीण निर्णय घ्यावे लागतात तेव्हा आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करू शकतो. त्याने आपल्या १२ प्रेषितांची नेमणूक करण्याआधी एक सबंध रात्र प्रार्थना केली. (लूक ६:१२-१६) आणि त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने इतकी विव्हळून प्रार्थना केली की “रक्‍ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.” (लूक २२:४४) याचा काय परिणाम झाला? “त्याच्या सद्‌भक्‍तीमुळे [त्याची प्रार्थना] ऐकण्यात आली.” (इब्री लोकांस ५:७) आपल्या अगतिक व निरंतर प्रार्थना आपल्यालाही तणावपूर्ण परिस्थितीला व कठीण परीक्षांना तोंड देण्यास आपली मदत करतील.

१२. प्रार्थनेद्वारे हे कसे दिसून येते की यहोवाला आपली काळजी आहे?

१२ प्रार्थनेद्वारे यहोवाच्या जवळ येण्याचे आणखी एक कारण म्हणजे, असे केल्यामुळे तोही आपल्या जवळ येईल. (याकोब ४:८) आपण प्रार्थनेत यहोवासमोर आपले मन मोकळे करतो तेव्हा तो आपली कोमलतेने काळजी वाहतो हे आपल्याला जाणवत नाही का? आपण अतिशय वैयक्‍तिक रितीने यहोवाचे प्रेम अनुभवतो. आपल्या सेवकांची प्रत्येक प्रार्थना ऐकण्याकरता आपल्या स्वर्गीय पित्या यहोवाने इतर कोणाला नेमलेले नाही. (स्तोत्र ६६:१९, २०; लूक ११:२) आणि तो आपल्याला सांगतो की ‘आपली सर्व चिंता त्याच्यावर टाकावी कारण तो आपली काळजी घेतो.’—१ पेत्र ५:६, ७.

१३, १४. निरंतर प्रार्थना करण्याकरता आपल्याकडे कोणती कारणे आहेत?

१३ प्रार्थना आपल्याला जाहीर सेवाकार्याकरता अधिक आवेशी बनवू शकते आणि लोकांच्या थंड प्रतिसादामुळे अथवा विरोधामुळे जेव्हा आपले धैर्य खचते तेव्हा प्रार्थनेद्वारे आपल्याला बळ मिळते. (प्रेषितांची कृत्ये ४:२३-३१) प्रार्थना आपल्याला ‘सैतानाच्या डावपेचांपासून’ देखील सुरक्षित ठेवू शकते. (इफिसकर ६:११, १७, १८) दैनंदिन परीक्षांना तोंड देण्याचा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा आपण यहोवाला आपल्याला बळ देण्याची सतत विनंती करू शकतो. येशूच्या आदर्श प्रार्थनेत आम्हाला “वाइटापासून सोडीव” अर्थात दियाबल सैतानापासून वाचव अशी विनंती देखील आहे.—मत्तय ६:१३.

१४ आपल्या पापमय प्रवृत्तींवर नियंत्रण करण्याकरता आपण मदत मागत राहिलो तर आपल्याला यहोवाच्या साहाय्याचा अनुभव घेता येईल. आपल्याकडे हे आश्‍वासन आहे, की “देव विश्‍वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील, ह्‍यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” (१ करिंथकर १०:१३) प्रेषित पौलाने स्वतः कित्येक प्रकारच्या परिस्थितीत यहोवाचे पाठबळ अनुभवले होते. त्याने म्हटले: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१३; २ करिंथकर ११:२३-२९.

दोषभावनेमुळे प्रार्थना करण्याचे थांबवू नका

१५. आपली वागणूक देवाच्या दर्जांपर्यंत पोचत नाही तेव्हा काय घडण्याची शक्यता आहे?

१५ आपल्या प्रार्थना ऐकल्या जाव्यात म्हणून आपण देवाच्या वचनातील मार्गदर्शनाचा कधीही अव्हेर करू नये. प्रेषित योहानाने लिहिले: “आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करितो.” (१ योहान ३:२२) पण आपली वागणूक यहोवाच्या दर्जापर्यंत पोचू शकत नाही तेव्हा काय घडते? एदेन बागेत पाप केल्यानंतर आदाम व हव्वा लपून बसले. आपल्यालाही कदाचित दोषभावनेमुळे “परमेश्‍वर देवाच्या दृष्टीपुढून” स्वतःला लपवावेसे आणि प्रार्थना करण्याचे बंद करावेसे वाटू शकते. (उत्पत्ति ३:८) क्लाउस नावाचे एक अनुभवी प्रवासी पर्यवेक्षक म्हणतात, की “माझ्या पाहण्यात आल्याप्रमाणे यहोवा व त्याच्या संघटनेपासून दुरावणारे जे पहिले चुकीचे पाऊल टाकतात ते म्हणजे प्रार्थना करण्याचे बंद करणे.” (इब्री लोकांस २:१) होसे आन्खेल याच्या बाबतीत असेच घडले. तो सांगतो: “जवळजवळ आठ वर्षांपर्यंत मी क्वचितच कधी यहोवाला प्रार्थना करत असे. त्याच्याशी बोलण्यास आपण लायक नाही असे मला वाटू लागले, अर्थात तो माझा स्वर्गीय पिता आहे हे मनोमन मी मानत होतो.”

१६, १७. नियमित प्रार्थना कशाप्रकारे आपल्याला आध्यात्मिक कमजोरीवर मात करण्यास मदत करू शकते याची उदाहरणे द्या.

१६ आपल्यापैकी काहीजण आध्यात्मिक कमजोरीमुळे अथवा आपल्या हातून चूक घडल्यामुळे कदाचित प्रार्थना करण्यासाठी आपण लायक नाही असे समजत असतील. पण याच परिस्थितीत आपण प्रार्थनेच्या तरतुदीचा पुरेपूर फायदा उचलला पाहिजे. योनाला ज्या कार्याकरता नेमले होते त्यापासून तो दूर पळाला. पण त्याने ‘आपल्या संकटावस्थेत परमेश्‍वराचा धावा केला, तेव्हा त्याने योनाचे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून त्याने आरोळी केली. तेव्हा यहोवाने त्याचा शब्द ऐकला.’ (योना २:२) योनाने प्रार्थना केली, यहोवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि योना आध्यात्मिक रितीने पुन्हा सावरला.

१७ होसे आन्खेलनेही मदतीसाठी कळकळीने प्रार्थना केली. तो आठवून सांगतो: “मी माझे मन मोकळे केले आणि देवाला क्षमेची याचना केली. आणि खरोखरच त्याने मला मदत केली. प्रार्थनेच्या मदतीशिवाय मी कधी सत्यात परत आलो असतो असे मला वाटत नाही. आता मी न चुकता रोज प्रार्थना करतो आणि प्रार्थना करण्याची अक्षरशः वाट पाहात असतो.” आपल्या चुकांविषयी देवाशी मनमोकळेपणाने बोलण्यास व त्याची क्षमा मागण्यास आपण कधीही कचरू नये. राजा दाविदाने त्याची पातके कबूल केली तेव्हा यहोवाने त्याच्या पापांची क्षमा केली. (स्तोत्र ३२:३-५) यहोवा आपली मदत करू इच्छितो आपल्याला दोषी ठरवू इच्छित नाही. (१ योहान ३:१९, २०) आणि मंडळीतल्या वडीलजनांच्या प्रार्थना आपल्याला आध्यात्मिकरित्या सहायक ठरू शकतात कारण त्यांच्या या प्रार्थना “प्रबळ” असतात.—याकोब ५:१३-१६.

१८. देवाचे सेवक त्याच्यापासून कितीही दुरावले तरीसुद्धा ते कोणती खात्री बाळगू शकतात?

१८ आपल्या मुलाने चूक केल्यानंतर जेव्हा तो नम्रपणे आपल्याकडे मदतीसाठी व सल्ला घेण्यासाठी येतो तेव्हा कोणता पिता त्याला झिडकारेल? उधळ्या पुत्राचा दृष्टान्त दाखवून देतो की आपण देवापासून कितीही दुरावलो तरीसुद्धा जेव्हा आपण त्याच्याकडे परत येतो तेव्हा तो आनंदित होतो. (लूक १५:२१, २२, ३२) ज्यांच्या हातून चुका घडल्या आहेत अशा सर्वांना यहोवा आग्रह करतो की त्यांनी त्याचा धावा करावा “कारण तो [त्यांना] भरपूर क्षमा करील.” (यशया ५५:६, ७) दाविदाने बरीच गंभीर पापे केली होती तरीसुद्धा त्याने यहोवाला असे म्हणून प्रार्थना केली: “हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे; माझ्या विनंतीपासून तोंड फिरवू नको.” तो असे म्हणाला: ‘संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाऱ्‍हाणे करीन आणि [यहोवा] माझी वाणी ऐकेल.’ (स्तोत्र ५५:१, १७) किती दिलासादायक आश्‍वासन!

१९. आपल्या प्रार्थनांचे अद्याप उत्तर मिळाले नाही याचा अर्थ देव आपल्यावर नाराज आहे असा निष्कर्ष आपण का काढू नये?

१९ आपल्या प्रार्थनेचे लगेच उत्तर न मिळाल्यास काय करावे? मग, आपण याची खात्री केली पाहिजे की आपली विनंती यहोवाच्या इच्छेनुसार आहे आणि ती आपण येशूच्या नावाने सादर केली आहे. (योहान १६:२३; १ योहान ५:१४) शिष्य याकोबाने काही ख्रिश्‍चनांविषयी सांगितले की त्यांच्या प्रार्थनांचे त्यांना उत्तर मिळाले नाही कारण ते “अयोग्य प्रकारे” मागत होते. (याकोब ४:३) दुसरीकडे पाहता, आपल्या प्रार्थनांचे अद्याप उत्तर मिळालेले नाही याचा अर्थ देव आपल्यावर नाराज आहे असा निष्कर्ष आपण काढू नये. कधीकधी यहोवा विश्‍वासू जनांना काही काळपर्यंत एखाद्या विषयावर प्रार्थना करू देतो आणि मगच आपले उत्तर काय ते कळवतो. येशूने म्हटले: “मागत राहा म्हणजे तुम्हास दिले जाईल.” (मत्तय ७:७, NW) म्हणूनच, ‘प्रार्थनेत तत्पर राहण्याची’ गरज आहे.—रोमकर १२:१२.

नियमित प्रार्थना करा

२०, २१. (अ) या ‘शेवटल्या काळात’ निरंतर प्रार्थना करणे का महत्त्वाचे आहे? (ब) आपण यहोवाच्या कृपेच्या राजासनाजवळ दररोज जातो तेव्हा आपल्याला काय प्राप्त होईल?

२० या ‘शेवटल्या कठीण काळात’ दबाव व समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. (२ तीमथ्य ३:१) आणि परीक्षा सहज आपल्याला गोंधळवू शकतात. पण आपल्या निरंतर प्रार्थना आपल्याला सर्व चिरस्थायी समस्या, मोह व निरुत्साहाला तोंड देऊन आध्यात्मिक मार्गावर अविचल राहण्यास मदत करतील. यहोवाला केलेल्या आपल्या दैनंदिन प्रार्थना, आपल्याला आवश्‍यक असलेले पाठबळ पुरवतील.

२१ यहोवा ‘प्रार्थना ऐकणारा’ देव आहे, आणि आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी तो सदैव तयार असतो. (स्तोत्र ६५:२) आपणही त्याच्यासोबत बोलण्याकरता सदैव तयार असले पाहिजे. देवासोबतच्या आपल्या मैत्रीपेक्षा आपल्या मालकीची कोणतीही गोष्ट अधिक मोलवान नाही. तेव्हा या विशेषाधिकाराला आपण क्षुल्लक लेखू नये. “तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.”—इब्री लोकांस ४:१६.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• प्रार्थनेच्या महत्त्वाविषयी संदेष्टा दानीएल याच्याकडून आपण काय शिकू शकतो?

• आपण यहोवासोबत आपली मैत्री अधिक घनिष्ट कशी करू शकतो?

• आपण निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?

• दोषभावनेमुळे आपण यहोवाला प्रार्थना करण्यापासून का कचरू नये?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चित्र]

राजाशी बोलण्याआधी नहेम्याने मनातल्या मनात लहानशी प्रार्थना केली

[१७ पानांवरील चित्र]

हन्‍नाने ‘बराच वेळपर्यंत यहोवाला प्रार्थना केली’

[१८ पानांवरील चित्रे]

आपल्या १२ प्रेषितांना नेमण्याआधी येशूने रात्रभर प्रार्थना केली

[२० पानांवरील चित्रे]

सबंध दिवसभर प्रार्थना करण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळतात