व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबल तुमच्या विवाहास सहायक ठरू शकते

बायबल तुमच्या विवाहास सहायक ठरू शकते

बायबल तुमच्या विवाहास सहायक ठरू शकते

विवाह—हा शब्द ऐकून काहींच्या मनात सुखद विचार येतात. तर इतरांचे हृदय पिळवटते. एक पत्नी दुःखाने म्हणते: “मला भावनिकरीत्या घटस्फोटित असल्यासारखं वाटतं. मला नेहमीच दुर्लक्षित व एकटं एकटं वाटतं.”

प्रेम करण्याचे व एकमेकांचा सांभाळ करण्याचे एकेकाळी वचन देणाऱ्‍या दोन व्यक्‍ती एकमेकांपासून अशा का दुरावतात? याचे एक कारण म्हणजे, विवाहात काय काय समाविष्ट आहे याच्याविषयीचे अपुरे शिक्षण असणे. एक वैद्यकीय पत्रकार म्हणाले: “कोणतेही प्रशिक्षण न घेताच आपण विवाहसंस्थेत दाखल होतो.”

आज फार कमी लोकांना विवाहाविषयीचे ज्ञान आहे, याची पुष्टी अमेरिकेतील न्यू जर्सी येथील रटगर्ज विद्यापीठाने घेतलेल्या राष्ट्रीय विवाह प्रकल्प नावाच्या संशोधनात मिळाली. या प्रकल्पाचे व्यवस्थापक लिहितात, की “अभ्यासात असे अनेक लोक भेटले ज्यांच्या आईवडिलांचे वैवाहिक जीवन सुखी नव्हते किंवा त्यांचा घटस्फोट झाला होता. दुःखी वैवाहिक जीवन काय असते हे त्यांना माहीत असते परंतु, सुखी वैवाहिक जीवन कसे असले पाहिजे याची त्यांना खात्री नसते. ‘माझ्या आईवडिलांच्या विवाहाच्या उलट’ जो विवाह तोच सुखी विवाह, केवळ असे स्पष्टीकरण त्यांच्यातले काहीजण देऊ शकतात.”

ख्रिश्‍चनांचा विवाह समस्याविरहीत असतो का? नाही. पहिल्या शतकातील काही ख्रिश्‍चनांना, आपल्या विवाहापासून “मुक्‍त होण्यास पाहू नको” असा सल्ला द्यावा लागला. (१ करिंथकर ७:२७) दोन अपरिपूर्ण मानवांच्या विवाहात समस्या या येणारच, पण आपल्याला मदत पुरवण्यात आली आहे. बायबल तत्त्वांचे अनुकरण करून पती-पत्नी आपला नातेसंबंध सुधारू शकतात.

हे खरे आहे, की बायबल हे केवळ विवाहविषयक सूचना देणारे पुस्तक नाही. पण, ज्याने विवाह व्यवस्थेची सुरवात केली त्या निर्माणकर्त्याने बायबल लिहिण्याची प्रेरणा दिली असल्यामुळे त्यातील तत्त्वे आपल्याला सहायक ठरू शकतात अशी आपण अपेक्षा करू शकतो. संदेष्टा यशया याच्याद्वारे, यहोवा देवाने म्हटले: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.”—यशया ४८:१७, १८.

तुमच्यामध्ये व तुमच्या सोबत्यामध्ये एकेकाळी असलेले प्रेम नाहीसे होत चालले आहे का? प्रेमहीन विवाहात अडकून पडल्याप्रमाणे तुम्हाला वाटते का? विवाहाला २६ वर्षे झालेल्या एका पत्नीने म्हटले: “अशा नातेसंबंधामुळे सहन कराव्या लागणाऱ्‍या वेदनेचे वर्णन करणे कठीण आहे. ती वेदना सतत व सदोदित असते.” असे असमाधानी वैवाहिक जीवन निमूटपणे सहन करीत बसण्यापेक्षा ते सुधारण्याचा प्रयत्न का करू नये? पुढील लेख पती-पत्नींना, बायबलची तत्त्वे त्यांच्या विवाहाला एका क्षेत्रात अर्थात, विवाहाच्या वचनबद्धतेच्या बाबतीत कशाप्रकारे साहाय्य करू शकतात हे दाखवेल.