व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मार्टिन ल्यूथर आणि त्याचा वारसा

मार्टिन ल्यूथर आणि त्याचा वारसा

मार्टिन ल्यूथर आणि त्याचा वारसा

“इतिहासात इतर कोणावरही इतकी पुस्तके लिहिण्यात आलेली नाहीत जितकी [मार्टिन ल्यूथरवर] लिहिण्यात आली आहेत; याला केवळ एक अपवाद म्हणजे, त्याचा गुरू, येशू ख्रिस्त.” असे टाईम पत्रिकेने म्हटले होते. ल्यूथरच्या बोलण्याने आणि कृतींनी धर्मसुधारणेला अर्थात “मानवाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची क्रांती” असे जिचे वर्णन केले जाते त्या धार्मिक चळवळीला प्रोत्साहन दिले. त्याने युरोपमधील धार्मिक वातावरण बदलले आणि त्या खंडात मध्ययुगीन काळाचा अंत केला. ल्यूथरने प्रमाणित लेखी जर्मन भाषेसाठी आधार निर्माण केला. बायबलचे त्याने केलेले भाषांतर आजही जर्मन भाषेतील सर्वात लोकप्रिय भाषांतर आहे.

मार्टिन ल्यूथर कसा मनुष्य होता? युरोपियन व्यवहारांवर त्याचा इतका जबरदस्त प्रभाव कसा पडला?

ल्यूथर विद्वान बनतो

जर्मनीतील आइस्लेबन, येथे नोव्हेंबर १४८३ साली मार्टिन ल्यूथरचा जन्म झाला. त्याचे वडील तांब्याच्या खाणीत कामगार होते तरीपण मार्टिनला उत्तम शिक्षण देण्याइतका पैसा त्यांच्याजवळ होता. १५०१ साली, मार्टिन एर्फुर्ट विद्यापीठात अध्ययन करू लागला. तेथील ग्रंथालयात त्याने सर्वात पहिल्यांदा बायबल वाचले. त्याने म्हटले, “ते पुस्तक मला खूपच आवडले आणि एक न एक दिवशी हे पुस्तक मला प्राप्त होईल अशी मी आशा करू लागलो.”

वयाच्या २२ व्या वर्षी, ल्यूथरने एर्फुर्ट येथील ऑगस्टिन्यन मठात प्रवेश केला. त्यानंतर त्याने व्हिटन्बेर्क विद्यापीठात अध्ययन केले आणि ईश्‍वरविद्येत डॉक्टरेट मिळवली. आपण देवाची कृपा मिळवण्यास पात्र नाही असे ल्यूथर विचार करत असे आणि काही वेळा अपराधी भावनेमुळे तो फार खिन्‍न होत असे. परंतु, बायबल अभ्यास, प्रार्थना आणि मनन करण्याद्वारे पापी लोकांविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे हे त्याला समजले. ल्यूथरने हे जाणले की एक व्यक्‍ती स्वतःच्या कृत्यांनी देवाची कृपा प्राप्त करू शकत नाही. तर, विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांना अपात्र कृपेद्वारे ती दिली जाते.—रोमकर १:१६; ३:२३, २४, २८.

आपली नवीन समज बरोबर आहे असा निष्कर्ष ल्यूथरने कसा काढला? प्रारंभिक चर्च इतिहास आणि नव्या कराराच्या मजकूर संशोधनाचे प्राध्यापक, कुर्ट आलाँट यांनी लिहिले: “त्याला नव्याने प्राप्त झालेले हे ज्ञान बायबलमधील इतर विधानांच्या तुलनेत खरे ठरते का हे पाहण्यासाठी त्याने संपूर्ण बायबलवर मनन केले आणि त्याला सगळीकडून पुष्टी मिळाली.” कृत्यांद्वारे किंवा प्रायश्‍चित्ताद्वारे नव्हे तर विश्‍वासाकरवी समर्थन किंवा तारण हा सिद्धान्त ल्यूथरच्या शिकवणींचा मुख्य पाया होता.

अनुज्ञेबाबत क्रोधित

पापी लोकांबद्दल देवाचा दृष्टिकोन याविषयी ल्यूथरची जी समज होती ती रोमन कॅथलिक चर्चच्या मतापेक्षा भिन्‍न होती. त्या वेळी, एक सामान्य विश्‍वास असा होता की, मृत्यूनंतर पापी जणांना काही काळासाठी शिक्षा भोगावी लागते. परंतु, देणग्या देऊन पोपच्या अधिकाराने अनुज्ञा संक्रात केल्याने हा काळ कमी केला जाऊ शकतो असे म्हटले जात होते. त्यानंतर, आर्चबिशप आल्बर्ट ऑफ मेन्झ यांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करणाऱ्‍या योहान टेटसलसारख्या विक्रेत्यांचा, सामान्य लोकांना अनुज्ञा विकण्याचा किफायतशीर धंदा सुरू झाला. पुष्कळांना अनुज्ञा म्हणजे भावी पापांचा जणू विमा असल्यासारखा वाटत होता.

अनुज्ञांची ही विक्री पाहून ल्यूथर क्रोधित झाला. मनुष्य देवाशी असा सौदा करू शकत नाहीत हे त्याला ठाऊक होते. १५१७ सालाच्या शरद ऋतूत त्याने आपले सुप्रसिद्ध ९५ थीसिस (९५ सिद्धान्त) लिहिले व त्यात त्याने चर्चवर आर्थिक, सैद्धान्तिक आणि धार्मिक व्यवस्थेचा गैरवापर होत असल्याचा आरोप लावला. विद्रोह नव्हे तर परिवर्तन करण्याच्या दृष्टिने ल्यूथरने या सिद्धान्ताच्या प्रती आर्चबिशप आल्बर्ट ऑफ मेन्झ आणि विविध विद्वानांना पाठवल्या. अनेक इतिहासकारांच्या मते, १५१७ किंवा त्या सुमारास धर्मसुधारणेची सुरवात झाली.

चर्चच्या चुकांबद्दल दुःखी असलेला ल्यूथर केवळ एकटाच नव्हता. त्याच्या शंभर वर्षांआधी, चेक धर्मसुधारक यॅन हूस यानेही अनुज्ञा विकणे चुकीचे आहे हे दाखवले होते. हूसच्याही आधी, इंग्लंडचा जॉन वायक्लिफ याने देखील दाखवले की, चर्चच्या काही शिकवणी शास्त्रवचनांनुसार नव्हत्या. ल्यूथरचे समकालीन रॉटरडॅमचा इरासमस आणि इंग्लंडचा टिंडेल यांनीही सुधारणेवर जोर दिला. पण, योहानस गुटेनबर्गने जर्मनीत चल खिळ्यांच्या मुद्रण यंत्राचा शोध लावल्यामुळेच खरे तर, ल्यूथरचा संदेश इतर सुधारकांपेक्षा अधिक प्रभावशाली ठरला आणि दूरदूरपर्यंत पोचला.

गुटनेबर्गचे मेन्झ येथील मुद्रण यंत्र १४५५ साली चालू होते. नवीन शतकाच्या सुरवातीपर्यंत ६० जर्मन शहरांमध्ये आणि युरोपमधील इतर १२ देशांमध्ये छापखाने होते. इतिहासात पहिल्यांदा असे घडत होते की, जनतेला कसल्याही गोष्टीविषयी तत्काळ माहिती मिळू शकत होती. ल्यूथरचे ९५ सिद्धान्त त्याच्या परवानगीशिवाय छापले व वितरित केले गेले. चर्च सुधारणेचा विषय स्थानीय राहिला नाही. तो सगळीकडे एक वादग्रस्त विषय ठरला आणि मार्टिन ल्यूथर एका रात्रीत जर्मनीत सर्वात प्रसिद्ध मनुष्य बनला.

“सूर्य आणि चंद्र” प्रतिक्रिया दर्शवतात

अनेक शतकांपासून, युरोपवर दोन शक्‍तिशाली व्यवस्थांचे वर्चस्व होते: पवित्र रोमन साम्राज्य आणि रोमन कॅथलिक चर्च. ल्यूथरन वर्ल्ड फेडरेशनचे भूतपूर्व अध्यक्ष, हान्स लिल्ये म्हणतात, “सम्राट आणि पोप यांची जोडी सूर्य आणि चंद्र यांसारखी होती.” परंतु, या दोघांमध्ये सूर्य कोण आणि चंद्र कोण याविषयी मात्र अनिश्‍चितता होती. १६ व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत, दोन्ही संस्थांचे वर्चस्व नाहीसे झाले होते. परिवर्तनाची चिन्हे दिसू लागली होती.

पोप दहावा लिओ यांनी ९५ सिद्धान्तांबाबत ल्यूथरला अशी धमकी दिली की, त्याने आपले शब्द मागे घेतले नाहीत तर त्याला बहिष्कृत केले जाईल. याचा प्रतिकार करून ल्यूथरने पोपच्या धमकीचे आज्ञापत्र जाहीरपणे जाळले आणि पोपची संमती न घेता चर्चमध्ये सुधारणा करण्यासाठी धर्मगुरूंना उत्तेजन देणारे आणखी साहित्य छापले. १५२१ साली, पोप दहावा लिओ यांनी ल्यूथरला बहिष्कृत केले. आपल्याला चौकशीविना आरोपी ठरवण्यात आले याविषयी ल्यूथरने आक्षेप घेतला तेव्हा सम्राट पाचवा चार्ल्झ याने वर्म्झ येथील आपल्या राज्यसभेत (डाएट) या धर्मसुधारकाला बोलावले. एप्रिल १५२१ मध्ये व्हिटन्बेर्कपासून वर्म्झपर्यंतचा ल्यूथरचा १५ दिवसांचा प्रवास एखाद्या विजयी मोर्चासमान होता. त्याला लोकांचा आधार होता आणि सगळीकडे लोक त्याला पाहायला उत्सुक होते.

वर्म्झ येथे ल्यूथर सम्राट, राजपुत्र आणि पोपच्या वकीलासमोर उभा राहिला. यॉन हूसला १४१५ साली कॉन्स्टान्स येथे अशाच एका सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागले होते आणि त्यानंतर त्याला खांबावर जाळण्यात आले. चर्च आणि साम्राज्याची नजर त्याच्यावर खिळलेली असता, ल्यूथरने म्हटले की, जोपर्यंत माझे विरोधक बायबलमधून मी खोटे असल्याचे शाबीत करत नाहीत तोपर्यंत मी माझी चूक कबूल करणार नाही. परंतु, ल्यूथरच्या तोडीचे तेथे कोणीच नव्हते ज्याला शास्त्रवचने पाठ होती. वर्म्झचे आज्ञापत्र नावाच्या दस्तऐवजात सुनावणीचा निकाल देण्यात आला होता. त्यात ल्यूथरला हद्दपार घोषित करण्यात आले आणि त्याच्या लिखाणांवर बंदी घालण्यात आली. पोपने बहिष्कृत केल्यामुळे व सम्राटाने हद्दपार केल्यामुळे ल्यूथरचा जीव अगदीच धोक्यात होता.

पण यानंतर नाट्यमय आणि अनपेक्षित घटना घडल्या. व्हिटेन्बेर्क येथे परतताना, सॅक्सनीचा फ्रीड्रिख याने ल्यूथरचे “अपहरण” केले. यामुळे ल्यूथर आपल्या शत्रूंपासून सुरक्षित ठिकाणी गेला. त्याला पळवून व्हार्टबुर्कच्या एकान्तातील किल्ल्यात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. तेथे ल्यूथरने दाढी वाढवली आणि एक सरदार म्हणून युंकर यॉर्ग हे नवीन नाव धारण केले.

सप्टेंबर बायबलसाठी अधिक मागणी

पुढील दहा महिन्यांकरता, ल्यूथर, सम्राट आणि पोपपासून व्हार्टबुर्क किल्ल्यात लपून राहिला. वेल्टर्बे व्हार्टबुर्क या पुस्तकात म्हटले आहे की, “व्हार्टबुर्क येथील काळ त्याच्या आयुष्यातला सर्वात फलदायी आणि सर्जनशील काळ होता.” इरासमसच्या ग्रीक शास्त्रवचनांचे जर्मनमध्ये केलेले भाषांतर हे त्याचे सर्वात मोठे साहित्य तेथे पूर्ण झाले होते. सप्टेंबर १५२२ मध्ये ल्यूथरचे नाव जाहीर न करता प्रकाशित केलेला तो ग्रंथ सप्टेंबर बायबल या नावाने गाजला. त्याची किंमत १ १/२ गिल्डर इतकी होती—एका मोलकरणीसाठी ते वर्षभराचे वेतन होते. तरीपण, सप्टेंबर बायबलसाठी जबरदस्त मागणी होती. केवळ १२ महिन्यांत, २ आवृत्त्यांच्या ६,००० प्रती छापण्यात आल्या आणि त्यानंतरच्या १२ वर्षांमध्ये ६९ पेक्षा अधिक आवृत्त्या छापण्यात आल्या.

मार्टिन ल्यूथरने १५२५ साली, कॅथरिना फोन बोरा या ख्रिस्ती संन्यासिनीशी (नन) विवाह केला. कॅथरिना घरातले कामकाज हाताळण्यात तरबेज होती आणि आपल्या पतीच्या उदारतेमुळे निर्माण होणाऱ्‍या परिस्थितीला हाताळायलाही योग्य होती. ल्यूथरच्या घरात त्याची पत्नी आणि त्यांची सहा मुले यांच्याव्यतिरिक्‍त त्याचे मित्र, विद्वान आणि निर्वासितही होते. नंतरच्या काळात ल्यूथरला सल्लागाराचा असा मान देण्यात आला की त्याच्या घरात राहणारे विद्वान नेहमी कागद आणि पेन बाळगून त्याची सर्व निरीक्षणे लिहून घेत असत. या सर्व नोंदी ल्यूटर्स टीशरेडन (ल्यूथरचे मेजावरील संभाषण) नावाच्या संग्रहात एकत्र करण्यात आल्या. काही काळापर्यंत, हा संग्रह, जर्मन भाषेमध्ये बायबलनंतर सर्वात लोकप्रिय ठरला.

कुशल भाषांतरकार आणि व्यापक लेखक

ल्यूथरने १५३४ पर्यंत इब्री शास्त्रवचनांचे आपले भाषांतर पूर्ण केले. लेखनशैली, तालबद्धता आणि शब्दसंचय यांचा योग्य प्रमाणात उपयोग करण्याची क्षमता त्याच्याजवळ होती. परिणामस्वरूप, सामान्य जनतेला समजेल असे बायबल निर्माण करण्यात आले. भाषांतराच्या आपल्या पद्धतीविषयी ल्यूथरने असे लिहिले: “घरातील माता, रस्त्यावरील मुले आणि बाजारातील सामान्य मनुष्य यांच्याशी संवाद साधून ते कसे बोलतात याचे बारकाईने निरीक्षण करून मग भाषांतर केले पाहिजे.” ल्यूथरच्या बायबलने एका प्रमाणित लिखित भाषेकरता पाया घातला व ती भाषा संपूर्ण जर्मनीत मान्य करण्यात आली.

ल्यूथरच्या भाषांतर कौशल्याला लेखकाच्या उत्साहाची जोड होती. त्याच्या लेखन जीवनादरम्यान दर दोन आठवडी तो एक संशोधनात्मक निबंध लिहीत असे असे त्याच्याविषयी म्हटले जाते. हे निबंध त्यांच्या लेखकाइतकेच विवादात्मक होते. ल्यूथरच्या आयुष्यातील पूर्वार्धात त्याची मार्मिक लेखनशैली वयोमानामुळे सौम्य झाली नाही. उलट, त्याने नंतर लिहिलेले निबंध अधिक तीव्र होते. लेक्सिकोन फूर टेओलोजी उन्ट कर्के यानुसार, ल्यूथरच्या साहित्यातून “त्याचा अतीव राग” आणि “नम्रता आणि प्रेमाचा अभाव” त्याचप्रमाणे “आपली कामगिरी पूर्ण करण्याची तीव्र इच्छा” दिसून येते.

शेतकऱ्‍यांचे युद्ध सुरू झाल्यावर प्रांतांमध्ये अनेक लोक ठार होऊ लागले तेव्हा या दंगलीविषयी ल्यूथरला त्याचे मत विचारण्यात आले. या शेतकऱ्‍यांना जहागिरदारांविरुद्ध तक्रार करण्यास योग्य कारण होते का? ल्यूथरने बहुतांश लोकांना खूष करणारे उत्तर देऊन लोकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचा असा विश्‍वास होता की, देवाच्या सेवकांनी अधिकार पदी असलेल्यांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. (रोमकर १३:१) अगदी स्पष्ट शब्दात ल्यूथरने म्हटले की, हा विद्रोह जबरदस्तीने संपवण्यात यावा. त्याने म्हटले, “ज्याला जमेल त्याने भोसकावे, वार करावा आणि ठार मारावे.” हान्स लिल्ये यांनी म्हटले की, ल्यूथरच्या या उत्तरामुळे “तोपर्यंत त्याच्या पाठीशी असलेल्या जनतेने त्याला सोडून दिले.” शिवाय, ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास नकार दिलेल्या यहूद्यांविषयी ल्यूथरने नंतर लिहिलेल्या निबंधांमुळे, खासकरून, यहूदी आणि त्यांची लबाडी (इंग्रजी) या निबंधामुळे पुष्कळांनी त्याला यहूद्यांच्या विरोधात असलेला लेखक असे नाव दिले.

ल्यूथरचा वारसा

ल्यूथर, कॅल्व्हिन आणि झ्वींग्ली यांसारख्या लोकांनी प्रोत्साहन दिलेल्या धर्मसुधारणेमुळे प्रोटेस्टंटवाद नावाच्या एका नवीन धर्माची स्थापना झाली. विश्‍वासाकरवी समर्थन हा ल्यूथरचा मुख्य सिद्धान्त प्रोटेस्टंट धर्माला दिलेला प्रमुख वारसा होता. प्रत्येक जर्मन प्रांत, एकतर प्रोटेस्टंट किंवा कॅथलिक धर्माशी संलग्न झाला. प्रोटेस्टंट धर्माचा फैलाव झाला आणि स्कँडिनेव्हिया, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि नेदरलंड येथे याला बरीच लोकप्रियता मिळाली. आज या धर्माचे लाखो अनुयायी आहेत.

पुष्कळ लोक ल्यूथरचे सर्व सिद्धान्त मानत नसले तरी ते त्याला मान मात्र देतात. १९८३ साली, भूतपूर्व जर्मन लोकशाही प्रजासत्ताकात (ज्यात आयस्लेबन, एर्फुर्ट, व्हिटेन्बेर्क आणि व्हार्टबुर्क देखील सामील झाले) ल्यूथरची ५०० वी जयंती साजरी करण्यात आली. जर्मन इतिहासात आणि संस्कृतीत एक उल्लेखनीय व्यक्‍ती म्हणून या समाजवादी राज्याने त्याचा स्वीकार केला. शिवाय, १९८० च्या दशकातील एका कॅथलिक ईश्‍वरविद्यावेत्त्याने ल्यूथरच्या प्रभावाचा सारांश देऊन म्हटले: “ल्यूथरच्या नंतर आलेला कोणीही त्याच्या तोडीचा नव्हता.” प्राध्यापक ॲलंड यांनी लिहिले: “दर वर्षी मार्टिन ल्यूथर आणि धर्मसुधारणा यांवर कमीत कमी ५०० नवीन प्रकाशने छापली जातात—ती देखील जगातील बहुतेक प्रमुख भाषांमध्ये.”

मार्टिन ल्यूथरची बुद्धी तल्लख होती, स्मरणशक्‍ती असाधारण होती, शब्दांवर उत्तम प्रभुत्व होते आणि कामाच्या बाबतीत तो अत्यंत मेहनती होता. तो उतावळा आणि निंदात्मक देखील होता आणि ज्याला तो पाखंड मानत असे त्याबद्दल तो परखड प्रतिक्रिया दाखवत असे. आयस्लेबन येथे फेब्रुवारी १५४६ मध्ये, मरणोन्मुख असताना ल्यूथरच्या काही मित्रांनी त्याला विचारले, इतरांना शिकवलेल्या सिद्धान्तांबद्दल तू स्वतः अटळ आहेस काय? त्याने “हो” असे उत्तर दिले. ल्यूथर मरण पावला परंतु त्याचे सिद्धान्त लोक अजूनही मानतात.

[२७ पानांवरील चित्र]

ल्यूथरने अनुज्ञा विकत घेण्याला विरोध केला

[चित्राचे श्रेय]

Mit freundlicher Genehmigung: Wartburg-Stiftung

[२८ पानांवरील चित्र]

विरोधकांनी आपली चूक बायबलमधून सिद्ध केल्याशिवाय आपण चूक कबूल करणार नाही असे ल्यूथरने म्हटले

[चित्राचे श्रेय]

From the book The Story of Liberty, १८७८

[२९ पानांवरील चित्र]

व्हार्टबुर्क किल्ल्यातील ल्यूथरची खोली जेथे त्याने बायबलचे भाषांतर केले

[चित्राचे श्रेय]

दोन्ही चित्रे: Mit freundlicher Genehmigung: Wartburg-Stiftung

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

From the book Martin Luther The Reformer, ३rd Edition, published by Toronto Willard Tract Depository, Toronto, Ontario

[३० पानांवरील चित्राचे श्रेय]

From the book The History of Protestantism (Vol. I)