धीराने छळ सोसल्यामुळे यहोवाचे गौरव होते
धीराने छळ सोसल्यामुळे यहोवाचे गौरव होते
“चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीनेउचित आहे.”—१ पेत्र २:२०.
१. खऱ्या ख्रिश्चनांना आपल्या समर्पणानुसार जगण्याची इच्छा असल्यामुळे कोणता प्रश्न विचारात घेणे आवश्यक आहे?
ख्रिस्ती लोक यहोवाला समर्पित आहेत आणि ते त्याची इच्छा पूर्ण करू इच्छितात. आपल्या समर्पणाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी ते आपला आदर्श येशू ख्रिस्त याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा आणि सत्याची साक्ष देण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. (मत्तय १६:२४; योहान १८:३७; १ पेत्र २:२१) परंतु, येशू व इतर विश्वासू जनांनी आपला जीव दिला आणि आपल्या विश्वासाकरता ते शहीद झाले. याचा अर्थ सर्व ख्रिश्चनांना त्यांच्या विश्वासाकरता जीव द्यावा लागेल का?
२. ख्रिस्ती लोक परीक्षा व छळ सोसण्याविषयी कसा दृष्टिकोन बाळगतात?
२ ख्रिस्ती या नात्याने आपल्याला आपल्या विश्वासाकरता मरण्याचा नव्हे, तर मृत्यूपर्यंत विश्वासू राहण्याचा आर्जव करण्यात येतो. (२ तीमथ्य ४:७; प्रकटीकरण २:१०) याचा अर्थ आपल्या विश्वासाकरता आपण दुःख सोसण्यास आणि वेळ आल्यास मरण्यासही तयार असलो तरीसुद्धा आपल्याला हा अनुभव हवाहवासा वाटत नाही. छळ सोसण्यास आपल्याला आनंद वाटत नाही किंवा वेदना व विटंबना सोसण्याचा अनुभव आपल्याला सुखावह वाटत नाही. पण परीक्षा व छळ अपेक्षित असल्यामुळे, असे अनुभव येतात तेव्हा आपण कसे वागावे याविषयी आता बारकाईने विचार करू.
परीक्षाप्रसंगांत विश्वासू
३. छळाला तोंड देण्याच्या संदर्भात तुम्ही बायबलमधील कोणत्या उदाहरणांविषयी सांगू शकता? (पुढील पृष्ठावरील “त्यांनी छळाला कसे तोंड दिले” शीर्षकाची पेटी पाहा.)
३ बायबलमध्ये, आपल्याला अनेक अहवाल सापडतात ज्यांत देवाच्या सेवकांनी गतकाळात जिवावर बेतणाऱ्या परिस्थितीला कशाप्रकारे तोंड दिले होते हे आपल्याला कळून येते. त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आज ख्रिश्चनांना मार्गदर्शक ठरू शकतात आणि यदाकदाचित त्यांच्यावर जर असे प्रसंग आलेत तर त्यांना कसे तोंड द्यावे हे त्यांना समजू शकेल. “त्यांनी छळाला कसे तोंड दिले” या पेटीतील अहवाल विचारात घ्या आणि त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळते ते पाहा.
४. परीक्षांना तोंड देत असताना येशू व इतर विश्वासू सेवकांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया दाखवली त्याविषयी काय म्हणता येईल?
४ परिस्थितीनुसार, येशूने व देवाच्या इतर विश्वासू सेवकांनी छळाला वेगवेगळ्या प्रकारे तोंड दिले असले तरीसुद्धा, त्यांनी अनावश्यकपणे आपला जीव धोक्यात घातला नाही हे स्पष्ट आहे. धोकेदायक परिस्थिती त्यांच्यावर आली तेव्हा ते धैर्यवान होते पण त्याचवेळेस ते सावधही होते. (मत्तय १०:१६, २३) त्यांचा उद्देश हा प्रचार कार्य पुढे चालू ठेवणे आणि यहोवाला विश्वासू राहणे हा होता. विविध प्रसंगी त्यांची प्रतिक्रिया आजच्या काळात परीक्षा व छळ यांना तोंड देणाऱ्या ख्रिश्चनांकरता उदाहरणादाखल आहे.
५. मलावीत १९६० च्या दशकात कशाप्रकारे छळ होण्यास सुरवात झाली आणि तेथील साक्षीदारांची काय प्रतिक्रिया होती?
५ आधुनिक काळांत यहोवाच्या लोकांना अनेकदा युद्धे, प्रतिबंध किंवा छळामुळे अतिशय बिकट परिस्थिती व हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. उदाहरणार्थ, १९६० च्या दशकात मलावी येथील यहोवाच्या साक्षीदारांना भयंकर छळ सोसावा लागला. त्यांची राज्य सभागृहे, घरे, अन्नपुरवठा, व्यापार इत्यादि, म्हणजे त्यांच्याजवळ होते नव्हते ते सारे काही नष्ट झाले. त्यांना मारहाण आणि इतर पीडादायक अनुभव सहन करावे लागले. त्या बांधवांची काय प्रतिक्रिया होती? हजारो साक्षीदारांना आपली गावे सोडून पळ काढावा लागला. कित्येकांना जंगलात, तर इतरांना शेजारच्या मोझांबिक देशात तात्पुरते शरण घ्यावे लागले. कित्येक विश्वासू बांधवांना आपला जीव गमवावा लागला,
पण काहींनी धोकेदायक क्षेत्रातून पलायन करण्याचे निवडले. अशा परिस्थितीत हाच मार्ग सर्वात सयुक्तिक होता. असे करणाऱ्या बांधवांनी येशूच्या व पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण केले.६. क्रूरतेने छळ करण्यात आला तरीसुद्धा मलावीच्या साक्षीदारांनी काय करण्याचे सोडले नाही?
६ मलावीच्या बांधवांना आपले गाव सोडून जावे लागले किंवा काही काळ लपून राहावे लागले, तरीसुद्धा त्यांनी ईश्वरशासित मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केला आणि भूमिगत राहून, जमेल तसे ख्रिस्ती कार्य चालू ठेवले. परिणाम काय झाला? १९६७ साली मलावीत बंदी आली तेव्हा १८,५१९ राज्य प्रचारकांचा उच्चांक गाठण्यात आला होता. बंदी अजूनही अंमलात होती आणि कित्येकांनी मोझांबिकला पलायन केले होते तरीसुद्धा १९७२ सालापर्यंत २३,३९८ प्रचारकांच्या नवीन उच्चांकाचा अहवाल देण्यात आला. हे प्रचारक दर महिन्यात सरासरी १६ तासांपेक्षा अधिक वेळाचा सेवाकार्याचा अहवाल देत होते. त्यांच्या कार्यांमुळे यहोवाचे गौरव झाले आणि त्या अतिशय खडतर काळात यहोवाचा आशीर्वाद त्या विश्वासू बांधवांवर होता. *
७, ८. विरोधामुळे अनेक समस्या निर्माण होत असूनही, काहीजण दुसऱ्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय का घेतात?
७ दुसरीकडे पाहता, ज्या देशांत विरोधामुळे समस्या आहेत तेथील काही बांधव दुसरीकडे जाणे शक्य असूनही तेथून न जाण्याचा निर्णय कदाचित घेतील. कारण दुसरीकडे गेल्याने काही समस्यांचे निवारण होईल पण कदाचित दुसरी आव्हाने उभी ठाकतील. उदाहरणार्थ, आपले ठिकाण सोडल्यावर ख्रिस्ती बंधुसमाजाशी संपर्क कायम राखणे त्यांना शक्य होईल का, की ते आध्यात्मिकरित्या एकाकी पडतील? स्थलांतर करून एखाद्या श्रीमंत सुविकसित देशात किंवा जेथे बक्कळ पैसा कमवण्याच्या अधिक सुसंधी मिळतील अशा ठिकाणी गेल्यावर तेथे बस्तान बसेपर्यंत संघर्ष करताना त्यांना आध्यात्मिक कार्यांत नियमित सहभाग घेणे शक्य होईल का?—८ इतरजण आपल्या बांधवांच्या आध्यात्मिक कल्याणाचा विचार करून दुसऱ्या ठिकाणी न जाण्याचा निर्णय घेतात. आपल्या मूळ क्षेत्रात प्रचार करत राहण्यासाठी आणि सह उपासकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते कठीण परिस्थितीतही तेथेच राहून त्या परिस्थितीला तोंड देण्याचे ठरवतात. (फिलिप्पैकर १:१४) असा निर्णय घेतल्यामुळे काहींना त्यांच्या देशात कायदेशीर विजय मिळवून देण्यास हातभार लावण्याची संधी मिळाली आहे. *
९. छळ होत असताना स्थलांतर करावे किंवा नाही हे ठरवताना एका व्यक्तीने कोणत्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे?
९ तेथेच राहावे किंवा दुसरीकडे जावे हा निश्चितच एक वैयक्तिक निर्णय आहे. अर्थात असे निर्णय प्रार्थनापूर्वक यहोवाचे मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न केल्यानंतरच घेतले जावेत. आपण कोणताही मार्ग निवडला तरीसुद्धा प्रेषित पौलाचे पुढील शब्द आपण आठवणीत ठेवले पाहिजेत: “आपणातील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी [देवाला] हिशेब देईल.” (रोमकर १४:१२) आधी सांगितल्याप्रमाणे, यहोवा आपल्या सर्व सेवकांनी कोणत्याही परीक्षेत विश्वासू राहावे अशी अपेक्षा करतो. त्याच्या सेवकांपैकी काहीजण आज परीक्षा व छळ सोसत आहेत; काहींना भविष्यात सोसावा लागेल. या न् त्या मार्गाने प्रत्येकाला परीक्षेतून जावे लागेल; आपल्यावर कोणतीच परीक्षा येणार नाही असे कोणीही समजू नये. (योहान १५:१९, २०) यहोवाचे समर्पित सेवक या नात्याने, यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण आणि त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन याजशी संबंधित असलेला सार्वत्रिक वादविषय आपण टाळू शकत नाही.—यहेज्केल ३८:२३; मत्तय ६:९, १०.
“वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका”
१०. येशू व त्याच्या प्रेषितांनी दबाव व विरोधाला कसे तोंड द्यावे यासंबंधी कोणते महत्त्वाचे उदाहरण आपल्यापुढे ठेवले?
१० येशू व त्याच्या प्रेषितांनी दबावाखाली जशी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण आणखी एक महत्त्वाचे तत्त्व शिकतो; ते म्हणजे, छळ करणाऱ्यांना कधीही जशास तशी वागणूक देऊ नये. येशूने किंवा त्याच्या अनुयायांनी एकत्र येऊन आपला छळ करणाऱ्यांविरुद्ध चळवळ सुरू केली किंवा हिंसक मार्गाने त्यांचा प्रतिकार केला, असे बायबलमध्ये कोठेही सांगितलेले नाही. उलट प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला की “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका.” “सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.” शिवाय, “वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाइटाला जिंक.”—रोमकर १२:१७-२१; स्तोत्र ३७:१-४; नीतिसूत्रे २०:२२.
११. सुरवातीच्या ख्रिश्चनांच्या सरकारप्रती असलेल्या मनोवृत्तीविषयी एका इतिहासकाराने काय भाष्य केले?
११ सुरवातीच्या ख्रिश्चनांनी तो सल्ला मनावर घेतला. दी अर्ली चर्च ॲन्ड द वर्ल्ड या पुस्तकात इतिहासकार सेसिल जे. कादू यांनी सा.यु. ३०-७० सालांदरम्यान ख्रिस्ती लोकांच्या सरकाराप्रती असलेल्या मनोवृत्तीचे वर्णन केले आहे. ते लिहितात: “या कालावधीतील ख्रिश्चनांनी कधीही छळाचा जोरजबरदस्तीने प्रतिकार केल्याचा कोणताच उघड पुरावा आमच्याजवळ नाही. जास्तीतजास्त ते शासकांची आवेशाने निर्भर्त्सना करीत किंवा पलायन करून त्यांना चकमा देत. पण सर्वसामान्य ख्रिस्ती व्यक्ती छळ झाल्यास, संयमाने पण खंबीरपणे सरकारच्या ज्या आज्ञा ख्रिस्ताला आज्ञाधारक राहण्याच्या आड येत होत्या त्यांचे पालन करण्यास नकार देत असे; याच्या पलीकडे कोणी जात नसे.”
१२. जशास तशी वागणूक देण्यापेक्षा छळ सोसणे अधिक चांगले का आहे?
१२ अशी सोशीक वृत्ती खरोखर श्रेयस्कर आहे का? अशी प्रतिक्रिया दाखवणाऱ्या लोकांचा, त्यांना संपवण्याच्या प्रयत्नात असलेल्यांकडून गैरफायदा घेतला जाणार नाही का? आत्मसंरक्षण करणे शहाणपणाचे ठरणार नाही का? मानवी दृष्टीने पाहिल्यास कदाचित असे भासेल. पण यहोवाचे सेवक या नात्याने आपल्याला पूर्ण खात्री आहे की यहोवाचे मार्गदर्शन सर्व बाबतीत सर्वात उत्तम आहे. आपण पेत्राचे शब्द आठवणीत ठेवतो: “चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे.” (१ पेत्र २:२०) आपल्याला खात्री आहे की यहोवाला परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे आणि तो ही परिस्थिती सर्वकाळ टिकू देणार नाही. याची आपण खात्री का बाळगू शकतो? बॅबिलोन येथे बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांना यहोवाने असे सांगितले: “जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जखऱ्या २:८) कोणीही दुसऱ्या व्यक्तीला आपल्या बुबुळाला किती वेळ स्पर्श करू देईल? योग्य वेळी यहोवा नक्कीच आपली सुटका करेल. याविषयी काहीच शंका नाही.—२ थेस्सलनीकाकर १:५-८.
१३. येशूचे शत्रू त्याला अटक करण्यास आले तेव्हा त्याने निमूटपणे स्वतःला त्यांच्या हाती का दिले?
मत्तय २६:५३, ५४) यहोवाची इच्छा पूर्ण होणे हे येशूच्या दृष्टीत सर्वात महत्त्वाचे होते आणि त्यासाठी तो दुःख देखील सहन करण्यास तयार होता. दाविदाच्या भविष्यसूचक स्तोत्रातील शब्दांवर त्याला पूर्ण विश्वास होता: “तू माझा जीव अधोलोकांत राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तांस कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.” (स्तोत्र १६:१०) कित्येक वर्षांनंतर प्रेषित पौलाने येशूविषयी म्हटले: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.”—इब्री लोकांस १२:२.
१३ या संदर्भात, आपण येशूच्या पदचिन्हांचे अनुकरण करू शकतो. गथशेमाने बागेत त्याच्या शत्रूंनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा तो स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ होता अशातला भाग नव्हता. त्याने स्वतःच शिष्यांना सांगितले: “[तुम्हाला] असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे?” (यहोवाचे नाव पवित्र करण्याचा आनंद
१४. येशूला त्याच्या सर्व परीक्षांत कोणत्या आनंदाने तारले?
१४ कल्पनेपलीकडील यातनामय परीक्षेतही, तो कोणता आनंद होता ज्याने येशूला तारले? यहोवाच्या सर्व सेवकांपैकी निश्चितच देवाच्या परमप्रिय पुत्राला सैतानाने आपले लक्ष्य बनवले होते. त्यामुळे येशू परीक्षेत शेवटपर्यंत विश्वासू राहिल्यास सैतान यहोवाची जी निंदा करीत होता त्याला कायमचे उत्तर मिळणार होते. (नीतिसूत्रे २७:११) पुनरुत्थान झाल्यानंतर येशूला किती आनंद व समाधान वाटले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन व त्याच्या नावाचे पवित्रीकरण करण्यात एक परिपूर्ण मनुष्य या नात्याने येशूने आपली भूमिका पूर्ण केली हे जाणून त्याला किती आनंद झाला असावा! शिवाय, ‘देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसणे’ ही निःसंशये येशूकरता एक अत्यंत बहुमानाची व आनंदाची गोष्ट आहे.—स्तोत्र ११०:१, २; २ तीमथ्य ६:१५, १६.
१५, १६. सॅक्सेनहाउसन येथे साक्षीदारांना कशाप्रकारच्या क्रूर छळाला तोंड द्यावे लागले आणि त्यांना टिकून राहण्याची शक्ती कोठून मिळाली?
१५ त्याचप्रमाणे, ख्रिश्चनांकरता येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून, सर्व परीक्षांत व छळात टिकून राहण्याद्वारे यहोवाच्या नावाच्या पवित्रीकरणात सहभागी होणे ही एक आनंदाची गोष्ट आहे. यासंदर्भात एक समर्पक उदाहरण, कुविख्यात साक्सेनहाउसन बंधनागृहात छळ सोसलेल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी भयंकर मृत्यू पदयात्रेतून जिवंत बचावलेल्या साक्षीदारांचे आहे. या पदयात्रेत हजारो कैदी टोकाचे हवामान, आजार, उपासमार यांमुळे मेले तर काहींना एस एस शिपायांनी रस्त्याच्या कडेलाच खतम केले. या पदयात्रेत एकूण २३० साक्षीदार होते; एकमेकांना चिकटून राहिल्यामुळे आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून एकमेकांना मदत केल्यामुळे ते सर्वच्या सर्व जिवंत बचावले.
१६ इतक्या क्रूर छळातही टिकून राहण्याची शक्ती या साक्षीदारांना कोठून मिळाली? सुरक्षित ठिकाणी पोचताच त्यांनी “मेक्लनबर्गमधील श्वेरिनजवळच्या एक जंगलात सहा वेगवेगळ्या देशांच्या २३० यहोवाच्या साक्षीदारांचा ठराव” या शीर्षकाच्या एका लिखित पत्रात आपला आनंद व यहोवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. त्यात त्यांनी म्हटले: “अतिशय खडतर दीर्घकालीन परीक्षेचा काळ नुकताच संपुष्टात आला आहे. ज्यांचा येथपर्यंत संभाळ झाला आहे, ते जणू आगीच्या भट्टीतून जिवंत बचावले आहेत, परंतु त्यांच्यावर आगीचा गंधही नाही. (दानीएल ३:२७ पाहा.) उलट यहोवाच्या सामर्थ्याने व शक्तीने ते परिपूर्ण आहेत आणि राजाकडून ईश्वरशासित कार्यांचा बढावा करण्याकरता पुढच्या आज्ञेची उत्सुकतेने प्रतिक्षा करत आहेत.” *
१७. देवाचे लोक आज कशाप्रकारच्या परीक्षांना तोंड देत आहेत?
१७ आपण “रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार” केला नसला तरीसुद्धा त्या २३० विश्वासू साक्षीदारांप्रमाणे, आपल्याही विश्वासाची परीक्षा होऊ शकते. (इब्री लोकांस १२:४) पण परीक्षा अनेक रूपांत येऊ शकते. ती वर्गसोबत्यांच्या थट्टेच्या रूपात, अथवा मित्रमैत्रिणींकडून अनैतिकता किंवा इतर गैरकृत्ये करण्यासाठी येणाऱ्या दबावाच्या रूपातही असू शकते. तसेच, रक्त वर्ज्य करण्याच्या, केवळ प्रभूमध्ये विवाह करण्याच्या, किंवा विभाजित कुटुंबात मुलांवर ख्रिस्ती संस्कार करण्याच्या निर्धारामुळे देखील एका व्यक्तीवर भयंकर दबाव व परीक्षा येऊ शकतात.—प्रेषितांची कृत्ये १५:२९; १ करिंथकर ७:३९; इफिसकर ६:४; १ पेत्र ३:१, २.
१८. सर्वात भयंकर परिक्षेतही आपण टिकून राहू शकतो याची खात्री आपण का बाळगू शकतो?
१८ आपल्यावर कोणत्याही परीक्षा आल्या तरीसुद्धा, आपल्याला हे माहीत आहे की यहोवा व त्याच्या राज्याला आपण जीवनात प्राधान्य देत असल्यामुळेच आपल्याला छळ सोसावा लागतो आणि ही मोठ्या बहुमानाची व आनंदाची गोष्ट आहे असे आपण समजतो. “ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहा; कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हांवर येऊन राहिला आहे,” या पेत्राच्या सांत्वनदायक शब्दांतून आपल्याला धैर्य मिळते. (१ पेत्र ४:१४) यहोवाच्या आत्म्याच्या शक्तीने आपल्याला सर्वात खडतर परीक्षांनाही तोंड देण्याची ताकद प्राप्त होते, आणि असे केल्यामुळे त्याच्या नावाला आपण गौरव व स्तुती मिळवून देतो.—२ करिंथकर ४:७; इफिसकर ३:१६; फिलिप्पैकर ४:१३.
[तळटीपा]
^ परि. 6 एकोणीसशे साठच्या दशकातील घटना म्हणजे छळाची केवळ सुरवात होती; यानंतर जवळजवळ तीन दशकांपर्यंत मलावीच्या साक्षीदारांना अतिशय क्रूर व पाशवी छळ सहन करावा लागला. सविस्तर अहवालाकरता १९९९ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) यातील पृष्ठे १७१-२१२ पाहा.
^ परि. 8 “अराराट देशी खऱ्या उपासनेला सर्वोच्च न्यायालयाची संमती” हा टेहळणी बुरूज, एप्रिल १, २००३ अंकातील पृष्ठे ११-१४ वरील लेख पाहा.
^ परि. 16 या ठरावाचा पूर्ण मजकूर १९७४ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे २०८-९ वर दिला आहे. पदयात्रेतून जिवंत बचावलेल्या एका साक्षीदाराचे स्वगत टेहळणी बुरूज, जानेवारी १, १९९८ अंकातील पृष्ठे २५-९ वर सापडेल.
तुम्ही खुलासा करू शकता का?
• ख्रिस्ती लोक छळाविषयी व यातनांविषयी कसा दृष्टिकोन बाळगतात?
• येशू व इतर विश्वासू जनांनी परीक्षांना तोंड देताना ज्याप्रकारे प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण काय शिकू शकतो?
• आपला छळ होत असताना जशास तशी वागणूक देणे का योग्य नाही?
• कोणत्या आनंदाने येशूला त्याच्या परीक्षांदरम्यान टिकून राहण्यास मदत केली आणि यावरून आपण काय शिकू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१५ पानांवरील चौकट/चित्रे]
त्यांनी छळाला कसे तोंड दिले
• दोन वर्षे व त्याखालील सर्व मुलांचा घात करण्यासाठी हेरोदाची माणसे बेथलेहेमात येण्याआधी देवदूतांच्या मार्गदर्शनाने योसेफ व मरीया बाळ येशूला घेऊन मिसर देशास निघून गेले.—मत्तय २:१३-१६.
• येशूच्या सेवाकार्यादरम्यान कित्येक वेळा त्याच्या शत्रूंनी त्याच्या सामर्थ्यशाली साक्षीमुळे त्याचा घात करण्याचा प्रयत्न केला. येशूने प्रत्येक प्रसंगी त्यांना हुलकावणी दिली.—मत्तय २१:४५, ४६; लूक ४:२८-३०; योहान ८:५७-५९.
• गेथशेमाने बागेत सैनिक व अधिकारी येशूला अटक करण्यास आले तेव्हा त्याने उघडपणे आपली ओळख करून दिली; दोनदा तो त्यांना म्हणाला: “मीच तो आहे.” त्याने आपल्या अनुयायांनाही प्रतिकार न करण्यास बजावले आणि जमावाच्या हाती त्याने स्वतःला सोपवून दिले.—योहान १८:३-१२.
• जेरूसलेममध्ये, पेत्र व इतरांना अटक करून फटके मारण्यात आले आणि येशूच्या नावाने न बोलण्याचा हुकूम देण्यात आला. तरीसुद्धा सुटका होताच, “दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.”—प्रेषितांची कृत्ये ५:४०-४२.
• शौल जो नंतर प्रेषित पौल बनला त्याला जेव्हा कळले की दमिष्क येथील यहुदी त्याचा घात करण्याचा कट रचत आहेत तेव्हा बांधवांनी त्याला रात्रीच्या वेळी पाटीतून गावकुसावरून खाली सोडले व अशारितीने त्याने पलायन केले.—प्रेषितांची कृत्ये ९:२२-२५.
• कित्येक वर्षांनंतर सुभेदार फेस्त व राजा अग्रिप्पा या दोघांनाही पौलात ‘मरणास योग्य असे काहीही’ आढळले नाही तरीसुद्धा त्याने कैसराजवळ न्याय मागण्याचा निर्णय घेतला.—प्रेषितांची कृत्ये २५:१०-१२, २४-२७; २६:३०-३२.
[१६, १७ पानांवरील चित्रे]
भयंकर छळामुळे मलावीच्या विश्वासू साक्षीदारांजवळ पळून जाण्याशिवाय पर्याय नव्हता तरीसुद्धा त्यांनी राज्य सेवा आनंदाने चालू ठेवली
[१७ पानांवरील चित्रे]
यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण करण्याच्या आनंदाने या विश्वासू बांधवांना नात्सी मृत्यू पदयात्रा व बंधनागृहांतील छळातही तारले
[चित्राचे श्रेय]
मृत्यूचा मोर्चा: KZ-Gedenkstätte Dachau, courtesy of the USHMM Photo Archives
[१८ पानांवरील चित्रे]
परीक्षा व दबाव अनेक रूपांत येऊ शकतात