व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नीतिमत्त्वाकरता छळ झालेले

नीतिमत्त्वाकरता छळ झालेले

नीतिमत्त्वाकरता छळ झालेले

“नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य.”मत्तय ५:१०.

१. येशू पंतय पिलातासमोर का उभा होता आणि येशूने काय म्हटले?

“मी ह्‍यासाठी जन्मलो आहे व ह्‍यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) येशूने हे शब्द उद्‌गारले तेव्हा तो यहुदीयाचा रोमी प्रांताधिकारी पंतय पिलात याच्यासमोर उभा होता. येशू तेथे स्वतःहून गेला नव्हता, किंवा पिलातानेही त्याला बोलावलेले नव्हते. तर, तो मृत्यूदंडास पात्र असलेला गुन्हेगार आहे असा यहुदी धर्मपुढाऱ्‍यांनी त्याच्यावर खोटा आरोप लावल्यामुळे तो तेथे उभा होता.—योहान १८:२९-३१.

२. येशूने कोणते पाऊल उचलले आणि याचा काय परिणाम झाला?

आपली एकतर सुटका करण्याचा किंवा आपल्याला मृत्यूदंड देण्याचा पिलाताला पूर्ण अधिकार असल्याची येशूला पूर्ण कल्पना होती. (योहान १९:१०) पण म्हणून तो पिलाताला देवाच्या राज्याबद्दल निर्भयपणे सांगण्यास कचरला नाही. जीव धोक्यात असतानाही येशूने त्या प्रदेशातील सर्वोच्च सरकारी अधिकाऱ्‍याला साक्ष देण्याची संधी हातून जाऊ दिली नाही. साक्ष दिल्यानंतरही येशूला दोषी ठरवून मृत्यूदंड देण्यात आला आणि त्याला एका वधस्तंभावर यातनामय मृत्यू सहन करून शहीद व्हावे लागले.—मत्तय २७:२४-२६; मार्क १५:१५; लूक २३:२४, २५; योहान १९:१३-१६.

साक्षी की शहीद?

३. बायबल लिहिण्यात आले त्या काळी “शहीद” या शब्दाचा काय अर्थ होता, पण आज त्याचा काय अर्थ होतो?

आज बऱ्‍याच लोकांच्या मते, शहीद हा शब्द धर्मवेड्या किंवा जहालमतवादी व्यक्‍तीला सूचित करतो. जे आपल्या विश्‍वासांकरता, खासकरून धार्मिक विश्‍वासांकरता मरण पत्करायला तयार असतात त्यांना सहसा समाजात उग्रवादी किंवा निदान समाजकंटक असल्याप्रमाणे शंकेखोर दृष्टीने पाहिले जाते. पण बायबल लिहिण्यात आले त्या काळात शहीद या अर्थाच्या ग्रीक शब्दाचा अर्थ मुळात “साक्षी” असा होता, अर्थात एक अशी व्यक्‍ती जी इतरांपुढे उदाहरणार्थ, एखाद्या न्यायालयीन चौकशीदरम्यान आपल्या मतांची ग्वाही देते. पण कालांतराने, “साक्ष देण्याकरता आपला जीव देणारी व्यक्‍ती” किंवा आपला जीव देऊन साक्ष देणारी व्यक्‍ती असा या शब्दाचा अर्थ घेतला जाऊ लागला.

४. येशू मुख्यतः कोणत्या अर्थाने शहीद होता?

येशू मुख्यतः या शब्दाच्या सुरवातीच्या अर्थानुसार शहीद होता. त्याने पिलाताला सांगितल्याप्रमाणे तो “सत्याविषयी साक्ष द्यावी” म्हणून आला होता. त्याच्या साक्षकार्याला लोकांकडून अगदी वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. सर्वसामान्य लोकांपैकी काहीजण, त्यांनी जे ऐकले व पाहिले त्यामुळे भारावून गेले आणि त्यांनी येशूवर विश्‍वास ठेवला. (योहान २:२३; ८:३०) बहुतेक लोकांनी आणि विशेषतः धर्मपुढाऱ्‍यांनीही अतिशय तीव्र परंतु प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्‍त केली. येशूने त्याच्यावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍या आपल्या नातेवाईकांना म्हटले: “जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करिते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याविषयी साक्ष देतो.” (योहान ७:७) सत्याची साक्ष दिल्यामुळे येशूने त्या राष्ट्राच्या नेत्यांचाही रोष ओढवला आणि यामुळे शेवटी त्याचा मृत्यू झाला. खरोखर, तो “विश्‍वसनीय व खरा साक्षी” ठरला.—प्रकटीकरण ३:१४.

“लोक तुमचा द्वेष करितील”

५. आपल्या सेवाकार्याच्या सुरवातीला येशूने छळाविषयी काय सांगितले?

स्वतः येशूने तर क्रूर छळ भोगलाच पण त्याने असाही इशारा दिला की त्याच्या अनुयायांचाही छळ होईल. आपल्या सेवाकार्याच्या सुरवातीला येशूने डोंगरावरील उपदेशात आपल्या श्रोत्यांना असे सांगितले: “नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गांत तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.”—मत्तय ५:१०-१२.

६. येशूने आपल्या १२ प्रेषितांना पाठवताना त्यांना कोणती ताकीद दिली?

नंतर १२ प्रेषितांना पाठवताना येशूने त्यांना सांगितले: “माणसांच्या बाबतीत जपून राहा; कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील, आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्‍यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल.” पण केवळ धार्मिक अधिकाऱ्‍यांकडूनच येशूच्या अनुयायांचा छळ होणार नव्हता. येशूने असेही म्हटले: “भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, मुले आईबापांवर उठून त्यांस ठार करतील; आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील; तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.” (मत्तय १०:१७, १८, २१, २२) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचा इतिहास या शब्दांच्या सत्यतेला ग्वाही देतो.

विश्‍वासूपणे टिकून राहिल्याची ख्याती

७. स्तेफन कशाप्रकारे शहीद झाला?

येशूच्या मृत्यूनंतर काही काळातच, सत्याची साक्ष देण्याबद्दल मरण पावणारा प्रथम ख्रिस्ती स्तेफन होता. तो “कृपा व सामर्थ्य ह्‍यांनी पूर्ण होऊन लोकांत मोठी अद्‌भुते व चिन्हे करीत असे.” त्याच्या धार्मिक शत्रूंना “तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलत होता त्यांना त्यांच्याने तोंड देववेना.” (प्रेषितांची कृत्ये ६:८, १०) मत्सरापायी शेवटी न राहावून त्यांनी स्तेफनाला यहुदी उच्च न्यायालयापुढे, अर्थात महासभेपुढे ओढत नेले; येथे स्तेफनाने आपल्यावर खोटे आरोप करणाऱ्‍यांना तोंड दिले आणि त्यांना प्रभावी साक्ष दिली. पण, शेवटी स्तेफनाच्या शत्रूंनी या विश्‍वासू साक्षीदाराला जिवे मारले.—प्रेषितांची कृत्ये ७:५९, ६०.

८. स्तेफनाच्या मृत्यूनंतर जेरूसलेम येथील शिष्यांचा छळ सुरू झाला तेव्हा त्यांनी काय केले?

स्तेफनाच्या खुनानंतर “यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहूदीया व शोमरोन ह्‍या प्रदेशांत पांगापांग झाली.” (प्रेषितांची कृत्ये ८:१) छळामुळे ख्रिस्ती साक्षकार्यात खंड पडला का? उलट अहवालानुसार, “ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले.” (प्रेषितांची कृत्ये ८:४) प्रेषित पेत्राने याआधी केलेल्या विधानाप्रमाणेच त्या सर्वांच्या भावना राहिल्या असाव्यात, अर्थात “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२९) छळ होऊनही, आणि हे कार्य केल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल हे माहीत असूनही त्या विश्‍वासू व धैर्यवान शिष्यांनी सत्याची साक्ष देण्याच्या कार्यात खंड पडू दिला नाही.—प्रेषितांची कृत्ये ११:१९-२१.

९. येशूच्या अनुयायांवर कशाप्रकारे छळ येतच राहिला?

पण यानंतर खरोखरच, त्यांच्यावर अधिकच खडतर परीक्षा आल्या. सर्वप्रथम शौल, ज्याने स्तेफनाच्या वधाला संमती दिली होती तो “अजूनहि प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्‍याविषयींचे फूत्कार टाकीत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीहि त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे.” (प्रेषितांची कृत्ये ९:१, २) मग, सा.यु. ४४ साली, “हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला; आणि योहानाचा भाऊ याकोब ह्‍याला त्याने तरवारीने जिवे मारले.”—प्रेषितांची कृत्ये १२:१, २.

१०. प्रेषितांची कृत्ये व प्रकटीकरण येथे आपण छळाचा कोणता अहवाल वाचतो?

१० प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातील उर्वरित भागात अनेक विश्‍वासू जनांना भोगाव्या लागलेल्या परीक्षा, तुरुंगवास आणि छळाचा अहवाल वाचायला मिळतो; यांपैकी एक पौल होता, जो पूर्वी ख्रिस्ती लोकांचा छळ करत असे. नंतर त्याला प्रेषित म्हणून नेमण्यात आले आणि कदाचित सा.यु. ६५ च्या दरम्यान रोमी सम्राट नीरो याच्या हुकुमाने त्याचा वध करण्यात आला. (२ करिंथकर ११:२३-२७; २ तीमथ्य ४:६-८) शेवटी, पहिले शतक संपत आले असताना लिहून पूर्ण झालेल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण योहानाला “देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष ह्‍यांखातर” पात्म नावाच्या बेटावर कैदेत ठेवल्याचे वाचतो. प्रकटीकरणात “माझा साक्षी, माझा विश्‍वासू अंतिपा जो” पर्गमममध्ये “जिवे मारला गेला” असाही एक उल्लेख आढळतो.—प्रकटीकरण १:९; २:१३.

११. सुरवातीच्या ख्रिश्‍चनांच्या जीवनात छळासंबंधी येशूचे शब्द कशाप्रकारे खरे ठरले?

११ या सर्व घटनांमुळे येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलेले खरे ठरले: “त्यांनी जर माझी छळणूक केली तर ते तुमचीही करतील.” (योहान १५:२०, ईजी टू रीड व्हर्शन) “यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल,” या प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याकरता सुरवातीचे विश्‍वासू ख्रिस्ती सर्वात मोठ्या परीक्षेलाही अर्थात मृत्यूलाही तोंड देण्यास तयार होते, मग तो यातना देण्याद्वारे येवो, जंगली श्‍वापदांपुढे फेकल्यामुळे येवो किंवा इतर कोणत्याही मार्गाने येवो.—प्रेषितांची कृत्ये १:८.

१२. ख्रिश्‍चनांचा छळ केवळ इतिहासाचा भाग का नाही?

१२ येशूच्या अनुयायांना केवळ गतकाळातच अशा क्रूर व्यवहाराला तोंड द्यावे लागले असा जर कोणी विचार करत असेल तर ते साफ खोटे आहे. पौल, ज्याला कित्येक कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागले होते, त्याने असे लिहिले: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२) छळाविषयी पेत्राने म्हटले: “ह्‍याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेहि तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१) या व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या काळापर्यंत’ यहोवाच्या लोकांचा द्वेष व छळ केला जात आहे. (२ तीमथ्य ३:१) पृथ्वीच्या सर्व भागांत, हुकूमशाही पद्धतीच्या व लोकशाही पद्धतीच्या सरकारांतही यहोवाच्या साक्षीदारांना वैयक्‍तिक व सामूहिकरित्या छळ सोसावा लागला आहे.

द्वेष व छळ होण्यामागचे कारण?

१३. छळाच्या संबंधाने यहोवाच्या आधुनिक सेवकांनी काय आठवणीत ठेवले पाहिजे?

१३ आपल्यापैकी बहुतेकांना प्रचार करण्याचे व सभांमध्ये शांतीपूर्णरीत्या एकत्र येण्याचे स्वातंत्र्य असले तरीही बायबलची ताकीद आपण आठवणीत ठेवली पाहिजे; ती अशी, की “ह्‍या जगाचे बाह्‍यस्वरूप बदलत जात आहे.” (१ करिंथकर ७:३१, पं.र.भा.) परिस्थिती रातोरात बदलू शकते; आणि जर आपण मानसिक, भावनिक व आध्यात्मिक रितीने तयार नसू तर आपण सहज विश्‍वासातून पडू शकतो. मग स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो? आत्मसंरक्षणाचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शांतताप्रेमी व कायदेनिष्ठ ख्रिश्‍चनांचा द्वेष व छळ का केला जातो याचे कारण सदोदित आपल्या मनात स्पष्ट असले पाहिजे.

१४. ख्रिस्ती लोकांना छळले जाण्याचे कारण पेत्राने कशाप्रकारे स्पष्ट केले?

१४ प्रेषित पेत्राने या संदर्भात, सा.यु. ६२-६४ च्या दरम्यान लिहिलेल्या आपल्या पहिल्या पत्रात विवेचन केले; या कालावधीत सबंध रोमी साम्राज्यात ख्रिश्‍चनांचा भयंकर छळ होत होता. त्याने म्हटले: “प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हांवर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका.” आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पेत्र पुढे म्हणाला: “खून करणारा, चोर, दुष्कर्मी, किंवा दुसऱ्‍याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये; ख्रिस्ती ह्‍या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.” त्यांना जे दुःख सहन करावे लागत होते ते काही वाईट कृत्ये केल्यामुळे नव्हे तर केवळ ते ख्रिस्ती असल्यामुळे करावे लागत होते, याकडे पेत्राने त्यांचे लक्ष वेधले. ते देखील त्यांच्या काळातील लोकांच्या “बेतालपणात” सामील झाले असते तर लोकांनी त्यांना आनंदाने स्वीकारले असते. पण ते ख्रिस्ताचे अनुयायी या नात्याने त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना छळ सोसावा लागत होता. आज खऱ्‍या ख्रिस्ती लोकांची हीच स्थिती आहे.—१ पेत्र ४:४, १२, १५, १६.

१५. यहोवाच्या साक्षीदारांना दिल्या जाणाऱ्‍या वागणुकीत कोणता विरोधाभास आज दिसून येतो?

१५ यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनांत व बांधकाम प्रकल्पांत दिसून येणाऱ्‍या ऐक्याविषयी व सहकार्याविषयी, त्यांच्या प्रामाणिक व कष्टाळू वृत्तीविषयी, त्यांच्या अनुकरणीय नैतिक आचरणाविषयी व कौटुंबिक जीवनाविषयी तसेच त्यांच्या सभ्य पेहरावाविषयी व उत्तम वागणुकीविषयी जगाच्या अनेक भागांत त्यांची जाहीररित्या प्रशंसा केली जाते. * दुसरीकडे पाहता, हा लेख लिहिला जात असताना त्यांच्या कार्यावर कमीतकमी २८ देशांत बंदी होती; शिवाय, बऱ्‍याच साक्षीदारांना आपल्या विश्‍वासामुळे शारीरिक दुर्व्यवहार व नुकसान सहन करावे लागते. इतका उघड विरोधाभास का बरे? आणि देव हे का घडू देतो?

१६. देव आपल्या लोकांना छळ सहन करू देतो यामागचे सर्वात महत्त्वपूर्ण कारण कोणते आहे?

१६ सर्वप्रथम, नीतिसूत्रे २७:११ यातील शब्द आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजेत: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्‍यास मी प्रत्युत्तर देईन.” होय, हे विश्‍वाच्या सार्वभौमत्वाच्या जुन्या वादविषयामुळे आहे. शतकानुशतके यहोवाला विश्‍वासू राहिलेल्या सर्वांनी भरपूर साक्ष पुरवली असूनही सैतानाने नीतिमान ईयोबाच्या दिवसाप्रमाणेच यहोवाची निंदा करण्याचे आजही थांबवलेले नाही. (ईयोब १:९-११; २:४, ५) आता देवाचे राज्य सुस्थापित झाले असून त्याचे निष्ठावान सेवक व प्रतिनिधी सबंध पृथ्वीवर पसरले असल्यामुळे सैतान आपला निंदात्मक दावा सिद्ध करण्याचा शेवटचा प्रयत्न अतिशय संतप्त होऊन करत आहे. देवाच्या राज्याचे हे प्रतिनिधी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट किंवा खडतर परिस्थिती आली तरीसुद्धा देवाला विश्‍वासू राहतील का? हा असा एक प्रश्‍न आहे ज्याचे उत्तर यहोवाच्या प्रत्येक सेवकाने वैयक्‍तिकरित्या दिले पाहिजे.—प्रकटीकरण १२:१२, १७.

१७. “ह्‍यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधि मिळेल” असे येशूने कोणत्या अर्थाने म्हटले?

१७ ‘युगाच्या समाप्तीदरम्यान’ घडणाऱ्‍या घटनांविषयी आपल्या शिष्यांना सांगताना येशूने आणखी एक कारण सांगितले ज्यामुळे यहोवा आपल्या सेवकांचा छळ होऊ देतो. येशूने म्हटले: “[ते तुम्हाला] राजे व अधिकारी ह्‍यांच्यापुढे माझ्या नावासाठी नेतील. ह्‍यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधि मिळेल.” (मत्तय २४:३, ९; लूक २१:१२, १३) येशूने स्वतः हेरोद व पंतय पिलात यांच्यासमोर साक्ष दिली. प्रेषित पौलालाही “राजे व अधिकारी ह्‍यांच्यापुढे” नेण्यात आले होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या निर्देशानुसार पौलाने त्याच्या काळातील सर्वात सामर्थ्यशाली शासकाला साक्ष देण्याची संधी मिळवण्याचा प्रयत्न केला; त्याने म्हटले: “मी कैसराजवळ न्याय मागतो.” (प्रेषितांची कृत्ये २३:११; २५:८-१२) त्याचप्रमाणे आज, देवाच्या लोकांसमोर अनेक आव्हाने आली आहेत आणि यांमुळे कित्येकदा अधिकाऱ्‍यांना व जनतेलाही उत्तम साक्ष देण्याची संधी त्यांना मिळाली आहे. *

१८, १९. (अ) परीक्षांना तोंड दिल्याने आपल्याला कोणता फायदा होईल? (ब) पुढील लेखात कोणते प्रश्‍न विचारात घेतले जातील?

१८ शेवटचे म्हणजे परीक्षा व छळ सोसल्यामुळे आपल्याला वैयक्‍तिकरित्याही फायदा होऊ शकतो. तो कसा? शिष्य याकोबाने आपल्या सहख्रिस्ती बांधवांना आठवण करून दिली व म्हटले: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.” होय, छळामुळे आपला विश्‍वास तावून सुलाखून निघतो आणि आपला धीर अधिक परिपूर्ण होतो. त्यामुळे आपण छळाची अवास्तव भीती बाळगत नाही किंवा तो टाळण्याकरता अथवा संपुष्टात आणण्याकरता आपण गैरशास्त्रीय मार्गांचा अवलंब करत नाही. उलट, आपण याकोबाच्या सल्ल्याचे पालन करतो: “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्‍यासाठी की, तुम्ही कशातहि उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.”—याकोब १:२-४.

१९ देवाच्या विश्‍वासू सेवकांचा छळ का होतो आणि यहोवा त्यांचा छळ का होऊ देतो हे आपल्याला देवाच्या वचनातून समजले तरीसुद्धा, यामुळे काही छळ सोसणे सोपे होत नाही. मग छळ सोसताना खंबीर राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? छळ होत असल्यास आपण काय करू शकतो? या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे आपण पुढील लेखात पाहू या.

[तळटीपा]

^ परि. 15 टेहळणी बुरूज, डिसेंबर १५, १९९५ अंकातील पृष्ठे २७-९; एप्रिल १५, १९९४ अंकातील पृष्ठे १६-१७ आणि सावध राहा!, डिसेंबर २२, १९९३ (इंग्रजी) अंकातील पृष्ठे ६-१३ पाहा.

^ परि. 17 सावध राहा! जानेवारी ८, २००३ (इंग्रजी) अंकातील, पृष्ठे ३-११ पाहा.

तुम्ही समजावू शकता का?

• येशू मुख्यतः कोणत्या अर्थाने शहीद झाला?

• पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांवर छळाचा काय परिणाम झाला?

• पेत्राने स्पष्ट केल्याप्रमाणे सुरवातीच्या ख्रिश्‍चनांचा छळ का झाला?

• कोणत्या कारणांमुळे यहोवा आपल्या सेवकांचा छळ होऊ देतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१०, ११ पानांवरील चित्रे]

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना त्यांच्या अपराधांसाठी नव्हे तर ते देवाचे सेवक असल्यामुळे छळ सोसावा लागला

पौल

योहान

अंतिपा

याकोब

स्तेफन