व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा नम्र लोकांना सत्याकडे आकर्षित करतो

यहोवा नम्र लोकांना सत्याकडे आकर्षित करतो

जीवन कथा

यहोवा नम्र लोकांना सत्याकडे आकर्षित करतो

आसानो कोसीनो यांच्याद्वारे कथित

१९४९ साली, दुसरे महायुद्ध समाप्त होऊन नुकतीच काही वर्षे उलटली होती तेव्हा, कोबे शहरात मी ज्या घरी काम करत होते त्या कुटुंबाला भेट द्यायला एक उंच, मैत्रीपूर्ण स्वभावाची परदेशी व्यक्‍ती आली. जपानला आलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मिशनरींपैकी ते सर्वात पहिले होते. त्यांच्या भेटीमुळे मला बायबल सत्याकडे आकर्षित होण्याचा मार्ग खुला झाला. पण आधी मी तुम्हाला माझ्या पार्श्‍वभूमीविषयी सांगते.

उत्तर ओकायामा प्रिफिक्चर येथील एका लहानशा गावात, १९२६ साली माझा जन्म झाला. आठ मुलांपैकी माझा पाचवा नंबर होता. माझे बाबा, स्थानीय शिंटो देवळातील दैवताचे श्रद्धाळु भक्‍त होते. त्यामुळे आम्हा मुलांना, संपूर्ण वर्षभर सणावारांच्या निमित्ताने आमच्या कुटुंबातले सर्वजण एकत्र यायचे तेव्हा खूप मौज करायला मिळायची.

मी जसजशी मोठी होत गेले, तसतसे माझ्या मनात जीवनाविषयी खूप प्रश्‍न आले; खासकरून मरणाची मला खूप चिंता वाटत होती. आमच्या इथली परंपरा अशी आहे, की मरण आले तर ते घरीच यावे आणि मृत्यूशय्येच्या आजूबाजूला मुले असावीत. माझी आजी आणि माझा तान्हा भाऊ ज्याला एक वर्षंही पूर्ण झालं नव्हतं, ते वारले तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. माझ्या पालकांच्या मृत्यूच्या नुसत्या कल्पनेनंच मी खूप निराश व्हायचे. ‘माणसाच्या जीवनात एवढंच आहे का? जीवन आणखी अर्थपूर्ण असू शकतं का?’ मला या प्रश्‍नांची उत्तरं हवी होती.

१९३७ साली मी प्राथमिक शाळेत सहावीत शिकत होते तेव्हा सीनो-जपानी युद्धाला सुरवात झाली. सैन्यात भरती होण्यासाठी पुरूषांची निवड करून त्यांना चीनच्या रणभूमीत पाठवण्यात आले. शाळेला जाणारी मुले आपल्या वडिलांना, भावांना, सम्राटाचा “बानझाय!” (जय असो), असे ओरडून वाटी लावत असत. लोकांची अशी खात्री होती, की देवाचे शासन असलेल्या व जिवंत देव शासन करत असलेल्या जपानलाच विजय मिळेल.

काही दिवसांतच कुटुंबांना युद्धाच्या आघाडीवरून त्यांच्या सदस्यांच्या मृत्यूच्या नोटीसा मिळू लागल्या. शोकाकुल कुटुंबांना कोणत्याही प्रकारे सांत्वन देणे शक्य नव्हते. त्यांच्या मनात द्वेष वाढू लागला, शत्रू राष्ट्रात मोठ्या संख्येने लोकांच्या कत्तली होत होत्या तेव्हा किंवा लोकांना जखमी केले जात होते तेव्हा त्यांना खूप आनंद व्हायचा. पण माझ्या मनात असा विचार यायचा, की ‘शत्रू राष्ट्रातील लोकांनासुद्धा, त्यांच्या प्रिय जनांचा मृत्यू होतो तेव्हा आपल्याप्रमाणेच दुःख होत असेल.’ प्राथमिक शाळेतून पदवीधर होईपर्यंत युद्ध चीनच्या अगदी आतल्या भागापर्यंत पोचले होते.

परदेशी व्यक्‍तीला भेटणे

शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे, आमची नेहमीच गरिबी होती; तरीपण जोपर्यंत पैसे द्यावे लागले नाहीत तोपर्यंत बाबांनी मला शिक्षण घ्यायची परवानगी दिली. त्यामुळे १९४१ साली मी १०० किलोमीटर दूर असलेल्या ओकायामा शहरातील एका कन्या शाळेत प्रवेश घेतला. मुलींना सद्‌गुणी पत्नी आणि माता होण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ही शाळा बनवण्यात आली होती आणि ती, हाऊसकिंपींग अप्रेन्टीस (घरकाम करणाऱ्‍या शिकाऊ मुली) म्हणून शहरातील श्रीमंत कुटुंबांबरोबर राहायला मुलींना पाठवत असे. सकाळी या विद्यार्थीनी अशा घरात काम करत असत आणि दुपारी शाळेला जात असत.

प्रवेश समारोह झाल्यानंतर, किमोनो घातलेल्या माझ्या शिक्षिकेने मला एका मोठ्या घरी नेले. पण त्या घरातील मालकीणीने मला स्वीकारलं नाही, मला याचं कारण माहीत नाही. मग माझ्या शिक्षिकेने मला विचारलं: “आपण श्रीमती कोडाच्या घरी जाऊ या का?” तिनं मला पाश्‍चात्त्य पद्धतीच्या एका घरी नेलं आणि दारावरची बेल वाजवली. थोड्या वेळानं, एक उंच-पुरी राखट केसांची बाई बाहेर आली. मी तर तिला पाहतच राहिले! ती जपानी नव्हती आणि मी माझ्या अख्या जीवनात एकाही पाश्‍चिमात्त्य व्यक्‍तीला पाहिलं नव्हतं. माझ्या शिक्षिकेने माझी ओळख या श्रीमती मोड कोडा यांच्याशी करून दिली आणि मला तिथं सोडून ती लगेच निघून गेली. सामान फरफटत आत नेत घाबरत घाबरत मी घरात गेले. नंतर मला समजलं, की श्रीमती मोड कोडा या अमेरिकन होत्या व त्यांनी एका जपानी मनुष्याबरोबर लग्न केलं होतं ज्यांचं शिक्षण अमेरिकेत झालं होतं. श्रीमती मोड व्यापारी शाळांमध्ये इंग्रजी शिकवायच्या.

दुसऱ्‍या दिवशी, सकाळीच मी कामाला जुंपले. श्रीमती कोडाच्या नवऱ्‍याला अपस्माराचा आजार झाला होता व मला त्यांना मदत करायची होती. मला इंग्रजीचं एकही अक्षर समजत नसल्यामुळे मला जरा काळजी वाटू लागली. पण श्रीमती कोडा माझ्याबरोबर जपानी भाषेत बोलू लागल्यावर मला जरा बरं वाटलं. मी दररोज त्या नवरा-बायकोला इंग्रजीत बोलताना ऐकायचे आणि हळूहळू मला ती भाषा ऐकायची सवय झाली. त्यांच्या घरातील प्रसन्‍न वातावरण मला आवडायचं.

श्रीमती मोडना आपल्या आजारी पतीची शुश्रूषा करताना पाहून मी खूप प्रभावित झाले. तिच्या नवऱ्‍याला बायबल वाचायला खूप आवडायचे. नंतर मला कळलं, की या पती-पत्नीनं एका जुन्या पुस्तकांच्या दुकानातून द डिव्हाईन प्लॅन ऑफ द एजेस पुस्तकाची जपानी भाषेतील आवृत्ती आणली होती व अनेक वर्षांपासून इंग्रजी भाषेतील टेहळणी बुरूज मासिकाची वर्गणी केली होती.

एके दिवशी मला बक्षीस म्हणून त्यांनी एक बायबल दिलं. मला खूप आनंद झाला कारण पहिल्यांदा मला माझं स्वतःचं बायबल मिळालं होतं. शाळेला येता-जाता मी ते वाचू लागले पण त्यातल्या गोष्टी मला इतक्या समजत नव्हत्या. जपानी शिंटो धर्मात माझं संगोपन झाल्यामुळे मला येशू ख्रिस्त कोण आहे हे माहीत नव्हतं. परंतु या घटनांमुळे मी कालांतरानं बायबलमधील सत्य स्वीकारेन याची मला तेव्हा जाणीव झाली नाही. याच सत्याद्वारे मला जीवन आणि मृत्यूविषयी माझ्या मनात असलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळणार होती याची मला तेव्हा कल्पना नव्हती.

तीन दुःखद घटना

दोन वर्षांतच अप्रेन्टीसशीप समाप्त झाली आणि मला कोडा परिवाराला सोडून जावं लागलं. शाळा संपल्यावर मी मुलींच्या स्वयंसेवक दलात सामील झाले व नौसेनेचे गणवेष बनवण्यात भाग घेतला. अमेरिकन बॉम्बफेकी B-२९  विमानांनी हवाई हल्ले सुरू केले आणि ऑगस्ट ६, १९४५ रोजी हिरोशिमावर एक आण्विक बॉम्ब फेकण्यात आला. काही दिवसांनंतर, आई खूप आजारी असल्याचा मला टेलिग्राम आला. पहिल्याच ट्रेननं मी घरी गेले. स्टेशनवर उतरल्यावर माझ्या एका नातेवाईकानं मला आई गेल्याचं सांगितलं. ऑगस्ट ११ रोजी तिचं निधन झालं होतं. इतक्या वर्षांपासून मला ज्याची भीती वाटत होती ते खरं झालं होतं! आई आता माझ्याबरोबर पुन्हा कधीच बोलू शकणार नव्हती की माझ्याकडे पाहून हसू शकणार नव्हती.

ऑगस्ट १५ रोजी जपानचा पराजय खरा ठरला. केवळ दहा दिवसांत घडलेल्या तीन दुःखद घटनांना मला सामोरं जावं लागलं; आण्विक बॉम्ब स्फोट, आईचा मृत्यू आणि जपानचा ऐतिहासिक पराजय. पण लोक आता युद्धात मरणार नाहीत या विचारानं थोडं सांत्वन मिळालं. दुःखी मनानं मी नौसेनेतील माझं काम सोडून पुन्हा माझ्या गावी परतले.

सत्याकडे आकर्षित

एके दिवशी अचानक मला ओकायामाहून श्रीमती कोडांचं पत्र आलं. त्या एक इंग्रजी शाळा सुरू करणार असल्यामुळे, तू घरातल्या कामासाठी येऊ शकशील का, असं त्यांनी पत्रात विचारलं होतं. जाऊ का नको, असा मी विचार करत होते आणि शेवटी मग मी त्यांचे आमंत्रण स्वीकारलं. काही वर्षांनंतर, कोडा पती-पत्नीबरोबर मीही कोबेला राहायला गेले.

१९४९ च्या उन्हाळ्याच्या सुरवातीला, एक उंच मैत्रिपूर्ण स्वभावाचे गृहस्थ कोडा यांना भेटायला आले. त्यांचे नाव होते, डॉन्लड हॅसलेट; कोबेत मिशनऱ्‍यांसाठी एक घर शोधत शोधत ते टोकियोहून कोबेला आले होते. जपानला आलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मिशनऱ्‍यांपैकी ते सर्वात पहिले मिशनरी होते. एक घर मिळालं आणि १९४९ सालच्या नोव्हेंबर महिन्यात अनेक मिशनरी कोबेत राहायला आले. एकदा पाच जण कोडा यांना भेटायला आले. यांपैकी दोघे जण, लॉईड बॅरी आणि पर्सी इझलॉब, दहा मिनिटांसाठी घरात जमलेल्या सर्वांबरोबर इंग्रजीत बोलले. श्रीमती मोड यांना मिशनऱ्‍यांची ख्रिस्ती भगिनी असे संबोधले जायचे; मिशनऱ्‍यांच्या भेटीमुळे त्यांना खूप उत्तेजन मिळाल्याचे स्पष्ट दिसले. त्यानंतरच मला इंग्रजी शिकण्याची प्रेरणा मिळाली.

या आवेशी मिशनऱ्‍यांच्या साहाय्यामुळे मी हळूहळू बायबलमधील मूलभूत सत्य समजू शकले. बालपणापासून माझ्या मनात असलेल्या प्रश्‍नांची मला उत्तरे मिळाली. बायबलमध्ये, परादीस पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याच्या आशेविषयी आणि ‘कबरेतील सर्व माणसांसाठी’ असलेल्या पुनरुत्थानाच्या आशेविषयी सांगितले आहे. (योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २१:१,) आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्या खंडणी बलिदानाद्वारे ही आशा दिल्याबद्दल मी यहोवाचे खूप आभार मानले.

आनंदविणारी ईश्‍वरशासित कार्ये

१९४९ सालच्या डिसेंबर ३० पासून १९५० सालच्या जानेवारी १ पर्यंत जपानमध्ये कोबे मिशनरी गृहात यहोवाच्या साक्षीदारांचे पहिले संमेलन झाले. मी मोडबरोबर गेले होते. हे घर पूर्वी नात्सींचे होते; तिथून इन्लँड समुद्राचे आणि अवाजी द्वीपाचे विलोभनीय दृश्‍य दिसत होते. मला बायबलची इतकी समज नसल्यामुळे संमेलनात जे काही सांगितले जात होते त्यातले थोडेच समजले. तरीपण, जपानी लोकांबरोबर खेळी-मेळीनं राहणाऱ्‍या मिशनऱ्‍यांना पाहून मी प्रभावित झाले होते. या संमेलनात जाहीर भाषणासाठी एकूण १०१ जण उपस्थित होते.

संमेलनानंतर लगेच मी क्षेत्र सेवेत भाग घेण्याचं ठरवलं. तसं घरोघरी जायला मला धैर्याची आवश्‍यकता होती, कारण स्वभावानं मी लाजरी होते. एके दिवशी सकाळी, बंधू लॉईड बॅरी, मला सेवेला घेऊन जाण्यासाठी आमच्या घरी आले. त्यांनी भगिनी कोडाच्या अगदी शेजारच्याच घरापासून सुरवात केली. ते जेव्हा सुवार्ता सादर करत होते तेव्हा मी अक्षरशः त्यांच्या पाठीमागे लपले होते. दुसऱ्‍यांदा जेव्हा मी प्रचारकार्यात गेले तेव्हा मी इतर दोन मिशनरी भगिनींबरोबर काम केलं. एका वृद्ध जपानी महिलेनं आम्हाला घरात बोलावलं, आमचं ऐकून घेतलं आणि आम्हाला प्रत्येकाला ग्लासभर दूध प्यायला दिलं. तिनं बायबलचा अभ्यास करायची तयारी दर्शवली आणि कालांतरानं ती बाप्तिस्मा घेतलेली एक ख्रिस्ती बनली. तिची प्रगती पाहून मला खूप उत्तेजन मिळालं.

१९५१ सालच्या एप्रिल महिन्यात, ब्रुकलिन मुख्यालयातील बंधू नेथन एच. नॉर जपानला पहिल्यांदा भेट द्यायला आले. टोकियो, कंदा येथील क्योरेटसू सभागृहात त्यांनी दिलेल्या जाहीर भाषणाला ७०० लोक उपस्थित होते. या खास सभेला आलेल्या सर्वांना, टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या जपानी आवृत्तीचे प्रकाशन झालेले पाहून खूप आनंद वाटला. पुढील महिन्यात, बंधू नॉर यांनी कोबेला भेट दिली आणि तेथील खास सभेत, मी यहोवाला माझं जीवन समर्पित केल्याचं दाखवण्यासाठी पाण्याने बाप्तिस्मा घेतला.

एक वर्षानंतर, मला पूर्ण-वेळेच्या सेवेत अर्थात पायनियर सेवेत भाग घेण्याचं उत्तेजन देण्यात आलं. त्या काळी जपानमध्ये खूप कमी पायनियर होते; माझ्या पोटा-पाण्याचं काय करायचं हा प्रश्‍न माझ्यासमोर होता. शिवाय, माझं लग्न होईल की नाही याविषयी देखील माझ्या मनात प्रश्‍न आला. पण नंतर मला जाणवलं, की यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिलं पाहिजे; त्यामुळे मग १९५२ साली मी पायनियर बनले. आनंदाची गोष्ट म्हणजे, मला पायनियरींग करता करता, भगिनी कोडा यांच्या घरी अर्धवेळ काम मिळालं.

त्याच सुमारास, माझा मोठा भाऊ, जो युद्धात मरण पावला होता असं आम्ही समजत होतो, तो तायवानहून त्याच्या कुटुंबाला घेऊन घरी आला. माझ्या कुटुंबानं ख्रिस्ती धर्मात कधीच आवड दाखवली नव्हती, पण माझ्यात पायनियर आत्मा संचारला होता त्यामुळे मी त्यांना आपली नियतकालिके आणि पुस्तके पाठवू लागले. नंतर कामाच्या निमित्तानं माझा भाऊ आपल्या कुटुंबाला घेऊन कोबेला राहायला आला. तेव्हा मी माझ्या वहिनीला विचारलं, “तू ती नियतकालिकं वाचलीस का?” तिचं उत्तर ऐकून मी आश्‍चर्यचकित झाले; ती म्हणाली: “होय, खूपच चांगली नियतकालिकं आहेत ती.” मग ती एका मिशनरीबरोबर बायबलचा अभ्यास करू लागली आणि त्यांच्याबरोबर राहणाऱ्‍या माझ्या धाकट्या बहिणीनं देखील अभ्यास सुरू केला. कालांतरानं, दोघीही बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्ती झाल्या.

आंतरराष्ट्रीय बंधूसमाज पाहून प्रभावित

काही दिवसांतच मला गिलियडच्या वॉचटावर बायबल प्रशालेच्या २२ व्या वर्गाचे आमंत्रण मिळाले तेव्हा मी चाट पडले. बंधू त्सुटोमू फुकासे आणि मी, जपानहून या प्रशालेला उपस्थित राहणाऱ्‍यांपैकी पहिले होतो. १९५३ साली, वर्ग सुरू होण्याआधी आम्ही न्यूयॉर्क येथील यांकी स्टेडियम येथे झालेल्या न्यू वर्ल्ड सोसायटी असेंब्लीला उपस्थित राहू शकलो. यहोवाच्या लोकांचा आंतरराष्ट्रीय बंधूसमाज पाहून मी खूपच प्रभावित झाले.

अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी, जपानी प्रतिनिधी, ज्यात बहुतेक मिशनरीच होते, किमोनो घालणार होते. न्यूयॉर्कला मी माझा किमोनो पुढे पाठवला होता तो अद्याप आला नव्हता, त्यामुळे भगिनी नॉरचा किमोनो मी घातला. कार्यक्रमाच्या वेळी, पाऊस पडू लागला आणि मी घातलेला किमोनो भिजेल याची मला काळजी लागली होती. इतक्यात, कोणीतरी माझ्या मागून हलकेच माझ्या अंगावर एक रेनकोट घातला. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या भगिनीनं मला विचारलं: “हे कोण आहेत माहीत आहे का?” नंतर मला समजलं, की ते, नियमन मंडळाचे सदस्य बंधू फ्रेडरिक फ्रान्झ होते. मला यहोवाच्या संघटनेतील बांधवांच्या प्रेमाचा प्रत्यय आला होता!

गिलियडचा २२ वा वर्ग खरोखरच आंतरराष्ट्रीय होता; कारण त्या वर्गात ३७ राष्ट्रांहून आलेले १२० विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या भाषांमुळे एकमेकांबरोबर बोलणे जरा कठीणच होते तरीसुद्धा आम्ही आंतरराष्ट्रीय बंधूसमाजाचा पुरेपूर आनंद लुटला. १९५४ सालच्या फेब्रुवारी महिन्यातल्या बर्फ पडत असलेल्या एका दिवशी मला पदवी प्राप्त झाली आणि जपानला नेमणूक मिळाली. माझ्या वर्गातील, इंगर ब्रान्ट, या नावाची स्वीडनची एक भगिनी माझी सोबतीण होती; आम्हा दोघींना नागोया सिटीत नेमण्यात आले. तेथे आम्ही, युद्धामुळे कोरिया सोडून आलेल्या मिशनऱ्‍यांबरोबर गेलो. मिशनरी सेवेत मी घालवलेली ती काही वर्षे माझ्यासाठी खरोखरच अनमोल होती.

पती-पत्नी मिळून केलेली आनंदी सेवा

१९५७ सालच्या सप्टेंबर महिन्यात मला टोकियो बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. ती दोन मजली असलेली लाकडी इमारत, जपानचे शाखा दफ्तर होते. शाखा दफ्तरात, केवळ चार सदस्य आणि शाखा पर्यवेक्षक बंधू बॅरी होते. बाकीचे मिशनरी होते. मला भाषांतर, प्रूफरीडींग, साफसफाई, लॉन्ड्री, स्वयंपाक इत्यादी कामं नेमण्यात आली होती.

जपानमध्ये काम वाढत चालले होते आणि आणखी बांधवांना बेथेलमध्ये बोलावण्यात आले. त्यांपैकी एक, माझ्या मंडळीचे पर्यवेक्षक बनले. १९६६ साली आमचा विवाह झाला; त्यांचे नाव आहे जुंजी कोशिनो. लग्नानंतर जुंजी यांना विभागीय कार्य नेमण्यात आले. आम्ही वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी द्यायला जायचो तेव्हा अनेक बंधूभगिनींना भेटून आनंद वाटायचा. मला भाषांतराचं काम करावं लागत असल्यामुळे, भेटीच्या आठवड्यात आम्ही ज्या घरी राहायचो तेथे मी घरी राहून ते करत असे. प्रवास करताना, आम्हाला आमच्या सूटकेसस आणि बॅगांशिवाय जडजड डिक्शनऱ्‍या सोबत वागवाव्या लागायच्या.

चार पेक्षा अधिक वर्षे आम्ही विभागिय कार्य केले आणि संघटनेचा विस्तार कसा होत चालला हेही पाहिलं. शाखा दफ्तर नुमाझू इथं हालवण्यात आलं आणि काही वर्षांनंतर, सध्याच्या ठिकाणी अर्थात एबिना इथं पुन्हा हलवण्यात आलं. जुंजी व मी अनेक वर्षांपासून बेथेल सेवा करत आहोत; सध्या बेथेल कुटुंबात ६०० च्या जवळपास सदस्य आहेत. २००२ सालच्या मे महिन्यात, बेथेलमधल्या आमच्या मित्रमैत्रिणींनी, पूर्ण वेळेच्या सेवेतील माझी ५० वर्षे साजरी केली.

वाढ पाहून आनंद होतो

१९५० साली, मी यहोवाची सेवा करण्यास सुरवात केली होती तेव्हा, जपानमध्ये केवळ मुठभर प्रचारक होते. आता, इथं २,१०,००० पेक्षा अधिक प्रचारक आहेत. खरंच, हजारो मेंढरांसमान लोक माझ्याप्रमाणेच यहोवाकडे आकर्षित झाले आहेत.

१९४९ साली, भगिनी कोडा यांच्या घरी आम्हाला भेटायला आलेले ते चार मिशनरी बंधूभगिनी तसेच भगिनी मोड कोडा, हे सर्व शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले. तसेच, माझा भाऊ जो सेवा सेवक होता आणि माझी वहिनी जी सुमारे १५ वर्षे पायनियर होती, हे दोघंही त्यांच्या मृत्यूपर्यंत सत्यात विश्‍वासू होते. मला लहानपणी माझ्या आईवडिलांच्या मृत्यूची भीती वाटत होती, मग त्यांना काय आशा आहे? बायबलमधील पुनरुत्थानाच्या अभिवचनामुळे मला आशा आणि सांत्वन मिळते.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

आता मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं, की १९४१ मध्ये भगिनी मोड यांच्यासोबत झालेली भेट ही माझ्या जीवनाला कलाटणी देणारी होती. मी त्यांना भेटले नसते आणि युद्धानंतर त्यांनी मला कामासाठी पुन्हा बोलावलं नसतं तर कदाचित मी दूरवर असलेल्या आमच्या मळ्यातच राहिले असते आणि त्या दिवसांत माझी मिशनऱ्‍यांबरोबर ओळख झाली नसती. भगिनी मोड आणि इतर मिशनऱ्‍यांद्वारे मला सत्याकडे आकर्षित केल्याबद्दल मी यहोवाचे खूप खूप आभार मानते!

[२५ पानांवरील चित्र]

भगिनी मोड आणि तिचे पती. मी पुढे डावीकडे आहे

[२७ पानांवरील चित्र]

१९५३ साली यांकी स्टेडियम येथे जपानच्या मिशनऱ्‍यांबरोबर. मी अगदी डावीकडे आहे

[२८ पानांवरील चित्रे]

बेथेलमध्ये माझे पती, जुंजी यांच्याबरोबर