व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिक्षेचा उद्देश समजून घेणे

शिक्षेचा उद्देश समजून घेणे

शिक्षेचा उद्देश समजून घेणे

“शिक्षा” हा शब्द ऐकताच तुमच्या मनात कोणता विचार येतो? एका शब्दकोशात शिक्षा या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे देण्यात आला आहे, “लोकांना नियमांनुसार अथवा आचरणाच्या लोकमान्य दर्जांनुसार वागायला लावणे आणि त्यांनी असे न केल्यास दंड देणे.” शिक्षा या शब्दाची ही काही एकमात्र व्याख्या नसली तरीसुद्धा आज अनेक लोक शिक्षेशी संबंधित असलेल्या कोणत्याही गोष्टीला अशाच नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात.

पण बायबल मात्र शिक्षेविषयी एक वेगळा दृष्टिकोन सादर करते. बुद्धिमान राजा शलमोन याने लिहिले, “माझ्या मुला यहोवाची शिक्षा तुच्छ मानू नको आणि त्याच्या शासनाला कंटाळू नको.” (नीतिसूत्रे ३:११, NW) हे शब्द सर्वसामान्य शिक्षेच्या संदर्भात नसून ‘यहोवाच्या शिक्षेविषयी,’ अर्थात, देवाच्या उच्च तत्त्वांवर आधारित असलेल्या शिक्षेविषयी आहेत. केवळ हीच शिक्षा आध्यात्मिकरित्या फायदेकारक आणि उपयोगी—तसेच इच्छिण्याजोगी असू शकते. याउलट मानवी विचारसरणीवर आधारित असलेली आणि यहोवाच्या उच्च दर्जांच्या विरोधात असणारी शिक्षा सहसा अपमानास्पद आणि हानीकारक ठरते. आणि म्हणूनच बहुतेक लोकांचा शिक्षेबद्दल नकारात्मक दृष्टिकोन आहे.

आपल्याला यहोवाची शिक्षा स्वीकारण्याचा आग्रह का केला जातो? शास्त्रवचनांत, देवाची शिक्षा ही त्याला त्याच्या मानवी प्राण्यांबद्दल असलेल्या प्रेमाची अभिव्यक्‍ती असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणूनच शलमोनाने पुढे असे म्हटले: “जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्‍वर ज्याच्यावर प्रीति करितो त्याला शासन करितो.”—नीतिसूत्रे ३:१२.

शिक्षा की दंड?

बायबलमध्ये वर्णन केल्याप्रमाणे शिक्षेचे अनेक पैलू आहेत—मार्गदर्शन, शिक्षण, प्रशिक्षण, ताडन, सुधारणूक आणि दंड देखील. पण प्रत्येक बाबतीत यहोवाची शिक्षा प्रेमाने प्रेरित होते आणि ती स्वीकारणाऱ्‍याचा फायदा व्हावा हाच तिचा उद्देश असतो. सुधारणुकीच्या उद्देशाने दिलेली यहोवाची शिक्षा कधीही केवळ दंड देण्याकरता नसते.

दुसरीकडे पाहता, देव दंड आणतो तेव्हा तो केवळ संबंधित व्यक्‍तीला सुधारण्यासाठी किंवा तिला धडा शिकवण्यासाठी नसतो. उदाहरणार्थ, ज्या दिवशी आदाम व हव्वा यांनी पाप केले त्याच दिवसापासून ते आपल्या अवज्ञेचे दुष्परिणाम भोगू लागले. यहोवाने त्यांना एदेन बागेतील परादीसमधून हाकलून लावले आणि यानंतर ते अपरिपूर्णता, आजार व म्हातारपणाला बळी पडले. शेकडो वर्षे काबाडकष्ट करून कसेबसे जिवंत राहिल्यानंतर ते कायमचे नष्ट झाले. ही देवाचीच शिक्षा होती, पण ही शिक्षा सुधारणेसाठी नव्हती. स्वेच्छेने व अपश्‍चात्तापी वृत्तीने पाप करणारे आदाम व हव्वा सुधारणेच्याही पलीकडे गेले होते.

यहोवाने दिलेल्या दंडाचे वर्णन करणाऱ्‍या इतर अहवालांत नोहाच्या काळातील प्रलय, सदोम व गमोरा यांचा नाश आणि तांबड्या समुद्रात ईजिप्शियन सैन्याच्या नाशाचा समावेश आहे. यहोवाकडून आलेल्या या न्यायदंडांचा उद्देश हा मार्गदर्शन, शिक्षण अथवा प्रशिक्षण पुरवण्याचा नव्हता. तर देवाच्या अशा दंडकृत्यांविषयी प्रेषित पेत्राने लिहिले: “त्याने प्राचीन जगाचीहि गय केली नाही, तर अभक्‍तांच्या जगावर जलप्रलय आणिला, आणि नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्‍याचे सात जणांसह रक्षण केले; पुढे होणाऱ्‍या अभक्‍तांस उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांस विध्वंसाची शिक्षा केली.”—२ पेत्र २:५, ६.

यहोवाने दिलेला दंड “पुढे होणाऱ्‍या अभक्‍तांस उदाहरण” कशाप्रकारे ठरला? पौलाने थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पत्रात तो आपल्या काळाकडे संकेत करून अशी वेळ येण्याविषयी सांगतो जेव्हा देव आपला पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे ‘जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा सूड उगवील.’ पौल पुढे म्हणतो: “युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.” (२ थेस्सलनीकाकर १:८, १०) साहजिकच ही शिक्षा त्या व्यक्‍तींना काही शिकवण्याच्या किंवा सुधारण्याच्या उद्देशाने दिली जाणार नाही. पण जेव्हा यहोवा आपल्या उपासकांना त्याची शिक्षा स्वीकारण्याचे निमंत्रण देतो तेव्हा तो अपश्‍चात्तापी पातक्यांच्या दंडास सूचित करत नाही.

बायबल यहोवाचे वर्णन दंड देणारा या रूपात करत नाही हे लक्ष देण्याजोगे आहे. उलट, बहुतेक ठिकाणी त्याचे वर्णन एक प्रेमळ शिक्षक किंवा एक सहनशील प्रशिक्षकाच्या रूपात केलेले आहे. (ईयोब ३६:२२; स्तोत्र ७१:१७; यशया ५४:१३) होय, सुधारणेसाठी दिली जाणारी शिक्षा नेहमी प्रेमाने व सहनशीलतेने दिली जाते. शिक्षेचा उद्देश समजून घेतल्याने एक ख्रिस्ती व्यक्‍ती शिक्षा स्वीकारताना व ती देताना योग्य मनोवृत्ती बाळगू शकते.

प्रेमळ आईवडिलांची शिक्षा

कौटुंबिक वर्तुळात आणि ख्रिस्ती मंडळीत सर्वांनी शिक्षेचा उद्देश समजून घेतला पाहिजे. खासकरून जे अधिकारपदी आहेत, उदाहरणार्थ आईवडील. नीतिसूत्रे १३:२४ म्हणते: “जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करितो तो त्याजवर प्रीति करणारा होय.”

आईवडिलांनी कशाप्रकारे शिक्षा द्यावी? बायबल सांगते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) हा सल्ला पुन्हा या शब्दांत व्यक्‍त करण्यात आला आहे: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.”—कलस्सैकर ३:२१.

शिक्षेचा उद्देश समजून घेणारे ख्रिस्ती पालक कधीही कठोरपणे वागणार नाहीत. २ तीमथ्य २:२४ येथे दिलेले तत्त्व आईवडिलांच्या शिक्षा देण्याच्या पद्धतीला लागू करता येईल. पौलाने येथे लिहिले: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील [असावे].” राग अनावर होऊ देणे, ओरडाओरड करणे, आणि अपमानास्पद उद्‌गार काढणे किंवा हिणवणे ही प्रेमाने शिक्षा देण्याची चिन्हे नाहीत आणि अशा वागणुकीला एका ख्रिस्ती व्यक्‍तीने आपल्या जीवनात थारा देता कामा नये.—इफिसकर ४:३१; कलस्सैकर ३:८.

आईवडील केवळ तडकाफडकी शिक्षा देऊन आपल्या मुलांना सुधारू शकत नाहीत. बहुतेक मुलांची विचारसरणी बदलण्याकरता त्यांना वारंवार समजवावे लागते. म्हणूनच, आईवडिलांनी अवकाश घेऊन, सहनशीलतेने, आणि आपण कशाप्रकारे शिक्षा देतो याचा लक्षपूर्वक विचार करून मगच शिक्षा दिली पाहिजे. मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवले पाहिजे हे त्यांनी नेहमी आठवणीत ठेवावे. आणि हे प्रशिक्षण कित्येक वर्षे चालू शकते.

ख्रिस्ती मेंढपाळ सौम्यतेने शिक्षा देतात

हीच तत्त्वे ख्रिस्ती वडिलांनाही लागू होतात. प्रेमळ मेंढपाळांप्रमाणे ते शिक्षण, मार्गदर्शन व गरज भासल्यास ताडन देऊन कळपाची उन्‍नती करण्याचा प्रयत्न करतात. असे करताना ते शिक्षा देण्याचा मूळ उद्देश आठवणीत ठेवतात. (इफिसकर ४:११, १२) त्यांनी केवळ दंड देण्यावर लक्ष दिले तर ते चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीला शासन करण्याशिवाय काहीच साध्य करणार नाहीत. देवाच्या तत्त्वांवर आधारित असलेली शिक्षा एवढ्यावरच थांबत नाही. प्रेमाने प्रेरित होऊन वडील जन दिलेल्या सल्ल्याचे पालन केले जात आहे किंवा नाही हे पाहण्याकरता चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत करण्याचा पुढेही प्रयत्न करत राहतात. त्यांना त्या व्यक्‍तीबद्दल मनापासून काळजी असल्यामुळे ते प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्याकरता कित्येक सत्रांची व्यवस्था करतात.

दुसरे तीमथ्य २:२५, २६ यातील सल्ल्यानुसार जे सहजासहजी शिक्षा स्वीकारत नाहीत अशांनाही “सौम्यतेने” शिक्षण देण्यास वडिलांना सांगितले जाते. त्याच वचनात पुढे शिक्षेचा उद्देश असा मांडला आहे: “कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्‍चातापबुद्धि देईल, आणि सैतानाने त्यांना धरून ठेविल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरिता शुद्धीवर येतील.”

कधीकधी पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पातक्यांना मंडळीतून बहिष्कृत करण्याची गरज असते. (१ तीमथ्य १:१८-२०) अशाप्रकारचे कडक पाऊल देखील केवळ दंड नसून शिक्षा समजली पाहिजे. वेळोवेळी वडील अशा बहिष्कृत व्यक्‍तींना भेट देतात जे सध्या वाईट कृत्यांत सक्रियपणे गोवलेले नाहीत. अशा भेटींदरम्यान, वडील त्या व्यक्‍तीला ख्रिस्ती मंडळीत परत येण्याकरता कोणती पावले उचलता येतील हे समजावून शिक्षेच्या खऱ्‍या उद्देशानुसार कार्य करतात.

यहोवा परिपूर्ण न्यायाधीश आहे

आईवडील, ख्रिस्ती मेंढपाळ आणि शिक्षा देण्याचा ज्यांना शास्त्रवचनांनुसार अधिकार आहे अशा इतरांनी आपली ही जबाबदारी गांभिर्याने घ्यावी. एक व्यक्‍ती कधीच सुधारणा करू शकणार नाही असा निष्कर्ष काढण्याची त्यांनी घाई करू नये. त्यामुळे त्यांची शिक्षा ही कधीही सूड घेण्याच्या किंवा शत्रूत्वाच्या भावनेने दिली जाऊ नये.

यहोवा शेवटी अगदी कठोर शिक्षा देईल असे बायबलमध्ये सांगितले आहे हे खरे आहे. शास्त्रवचनांत तर असेही म्हटले आहे की “जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.” (इब्री लोकांस १०:३१) पण या बाबतीत किंवा इतर कोणत्याही बाबतीत, कोणत्याही मनुष्याने कधीच स्वतःची तुलना यहोवाशी करण्याचा प्रयत्न करू नये. आणि आपल्या आईवडिलांच्या किंवा मंडळीतल्या विशिष्ट वडिलांच्या हाती सापडणे हे भयंकर आहे असे इतरांना वाटू नये.

शिक्षा देताना अचूक संतुलन केवळ यहोवा साधू शकतो. मानवांत असे करण्याची क्षमता नाही. एक व्यक्‍ती सुधारणेच्या पलीकडे गेली आहे आणि त्याअर्थी ती शेवटच्या कठोर शिक्षेस पात्र आहे हे केवळ देवच एका व्यक्‍तीच्या अंतःकरणात काय आहे हे पाहून ठरवू शकतो. मानव मात्र अशाप्रकारे निवाडा करू शकत नाहीत. तेव्हा शिक्षा देण्याची गरज पडते तेव्हा अधिकारपदी असलेल्यांनी नेहमी सुधारणा करण्याच्या उद्देशानेच ती द्यावी.

यहोवाकडून मिळणारी शिक्षा स्वीकारणे

आपल्या सर्वांना यहोवाकडून मिळणाऱ्‍या शिक्षेची गरज आहे. (नीतिसूत्रे ८:३३) किंबहुना आपण देवाच्या वचनावर आधारित असलेल्या शिक्षेची उत्सुकतेने वाट पाहिली पाहिजे. देवाच्या वचनाचा आपण अभ्यास करत असताना शास्त्रवचनांद्वारे यहोवाकडून थेटपणे मिळणाऱ्‍या शिक्षेचा आपण स्वीकार करू शकतो. (२ तीमथ्य ३:१६, १७) पण कधीकधी आपल्याला सहख्रिस्ती बांधवांकडून शिक्षा मिळू शकते. ही शिक्षा कोणत्या उद्देशाने दिली जात आहे हे लक्षात घेतल्यास आपल्याला ती स्वीकारणे सोपे जाईल.

प्रेषित पौलाने कबूल केले: “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते.” पुढे त्याने म्हटले: “तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व व शांतिकारक फळ देते.” (इब्री लोकांस १२:११) यहोवाकडून मिळणारी शिक्षा त्याला आपल्याबद्दल वाटणाऱ्‍या उत्कट प्रेमाचा पुरावा आहे. आपण शिक्षा स्वीकारणारे असोत वा देणारे, आपण देवाच्या शिक्षेचा उद्देश नेहमी आठवणीत ठेवू या व बायबलच्या या सल्ल्याचे नेहमी पालन करू या: “तू शिक्षा दृढ धरून ठेव; सोडू नको; तिला जवळ राख; कारण ती तुझे जीवन आहे.”—नीतिसूत्रे ४:१३, NW.

[२१ पानांवरील चित्रे]

पाप करणाऱ्‍या अपश्‍चात्तापी लोकांना देवाचे न्यायदंड भोगावे लागतात, त्यांना सुधारणेकरता शिक्षा दिली जात नाही

[२२ पानांवरील चित्रे]

प्रेमाने प्रेरित होऊन वडील संशोधन करून चूक करणाऱ्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात

[२३ पानांवरील चित्रे]

आईवडील सहनशीलतेने व प्रेमाने आपल्या मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवतात