व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या ज्ञानात इंद्रियदमनाची भर घाला

आपल्या ज्ञानात इंद्रियदमनाची भर घाला

आपल्या ज्ञानात इंद्रियदमनाची भर घाला

“आपल्या . . . ज्ञानात इंद्रियदमनाची . . . भर घाला.”—२ पेत्र १:५-८.

१. मनुष्याच्या अनेक समस्या कोणत्या असमर्थतेमुळे आहेत?

“फक्‍त नाही म्हणा.” हा सल्ला मादक पदार्थांच्या विरोधातील एका भव्य मोहिमेत अमेरिकेतील सर्व तरुणांना देण्यात आला. खरोखर, केवळ मादक पदार्थांनाच नव्हे, तर अति मद्यपान, अनैतिक जीवनशैली, बेईमान आर्थिक व्यवहार आणि “देहवासना” या सर्व गोष्टींना जर लोक केवळ नाही म्हणण्यास शिकले तर किती बरे होईल! (रोमकर १३:१४) पण नाही म्हणणे कोणाला सोपे जाते?

२. (अ) नाही म्हणण्याची असमर्थता नवीन नाही हे बायबलमधील कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते? (ब) या उदाहरणांमुळे आपल्याला काय करण्याचे प्रोत्साहन मिळाले पाहिजे?

सगळ्याच अपरिपूर्ण मनुष्यांना इंद्रियदमन करणे कठीण आहे; त्यामुळे, जर आपण स्वतः आपल्या जीवनात एखाद्या वाईट सवयीवर मात करण्याचा प्रयत्न करत असू, तर या लढाईत आपल्याला विजयी कसे होता येईल हे आपण जाणून घेतले पाहिजे. बायबल आपल्याला गतकाळातील काही व्यक्‍तींविषयी सांगते ज्यांनी देवाची सेवा करण्याचा प्रयत्न केला पण विशिष्ट प्रसंगी केवळ नाही म्हणणे त्यांनाही कठीण गेले. दावीदाने बथशेबासोबत केलेल्या पापाविषयी तुम्हाला आठवत असेल. या पापामुळे जन्माला आलेल्या बालकाचा आणि बथशेबाच्या पतीचाही मृत्यू झाला; हे दोघेही निर्दोष होते. (२ शमुवेल ११:१-२७; १२:१५-१८) तसेच, प्रेषित पौलाची आठवण करा; त्याने उघडपणे कबूल केले की “जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो.” (रोमकर ७:१९) काही वेळा तुम्हीही अशाचप्रकारे वैफल्यग्रस्त होता का? पौलाने पुढे म्हटले: “माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो. किती मी कष्टी माणूस! मला ह्‍या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” (रोमकर ७:२२-२४) अधिकाधिक आत्मसंयम उत्पन्‍न करण्याच्या लढाईत कधीही हार न मानण्याचा आपला निर्धार बायबलमधील उदाहरणांनी अधिकच बळकट झाला पाहिजे.

आत्मसंयमाचा धडा

३. आत्मसंयमाने वागणे सोपे असण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही हे का म्हणता येईल, स्पष्ट करा.

आत्मसंयम, अर्थात इंद्रियदमन यात नाही म्हणण्याचे सामर्थ्य समाविष्ट आहे; या गुणाचा उल्लेख २ पेत्र १:५-७ येथे विश्‍वास, सात्विकता, ज्ञान, धीर, सुभक्‍ती, बंधुप्रेम व प्रीती या गुणांसोबत करण्यात आला आहे. हे सर्व अतिशय उत्तम गुण आहेत, पण यांपैकी कोणताच गुण मनुष्यात उपजतच नसतो. तर ते उत्पन्‍न करण्याची गरज आहे. योग्य प्रमाणात हे गुण आपल्या वर्तनात आणण्याकरता दृढसंकल्प व प्रयत्न आवश्‍यक आहे. मग आत्मसंयमाच्या संदर्भातही हीच गोष्ट लागू होणार नाही का?

४. काही लोकांना आत्मसंयमाच्या संदर्भात काहीही समस्या का वाटत नाही, पण हे कशाचे लक्षण आहे?

अर्थात, लाखो लोक असेही आहेत ज्यांना आत्मसंयम दाखवण्याच्या संदर्भात काहीच समस्या नाही. निदान, त्यांना तरी असेच वाटते. ते मनात येईल तसे वागतात; जाणूनबुजून म्हणा किंवा नकळत म्हणा, ते स्वतःला किंवा इतरांना होणाऱ्‍या दुष्परिणामांचा विचार न करता, आपल्या अपरिपूर्ण शरीराच्या आज्ञेप्रमाणे वागतात. (यहूदा १०) नाही म्हणण्याची असमर्थता आणि अनिच्छा आज अभूतपूर्व प्रमाणात दिसून येते. यावरून हेच दिसून येते की आपण खरोखरच “शेवटल्या काळी” जगत आहोत, जेव्हा पौलाने सांगितल्याप्रमाणे: ‘कठीण दिवस येतील कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, असंयमी होतील.’—२ तीमथ्य ३:१-३.

५. आत्मसंयमाच्या विषयात यहोवाच्या साक्षीदारांना स्वारस्य का आहे आणि कोणता सल्ला आजही अर्थपूर्ण आहे?

आत्मसंयमाच्या अभावामुळे किती गंभीर समस्या निर्माण होऊ शकते याची यहोवाच्या साक्षीदारांना चांगली कल्पना आहे. पौलाप्रमाणे, एकीकडे देवाच्या दर्जांप्रमाणे चालण्याद्वारे त्याला संतुष्ट करण्याची इच्छा आणि दुसरीकडे अपरिपूर्ण शरीर त्यांना पत्करण्यास लावत असलेला मार्ग यांतल्या संघर्षाची त्यांना जाणीव आहे. या कारणास्तव, या लढाईत कसे यशस्वी होता येईल याविषयी अनेक वर्षांपासून त्यांना स्वारस्य राहिले आहे. १९१६ साली तुम्ही आता वाचत असलेल्या या नियतकालिकाच्या एका सुरवातीच्या अंकात, “स्वतःवर, आपल्या विचारांवर, शब्दांवर व वर्तनावर नियंत्रण मिळवण्याकरता योग्य मार्ग” निवडण्याविषयी उल्लेख करण्यात आला होता. त्यात फिलिप्पैकर ४:८ आठवणीत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. देवाकडून येणारा तो सल्ला आजपासून २००० वर्षांपूर्वी लिहिण्यात आला असला तरीसुद्धा तो आजही तितकाच अर्थपूर्ण आहे; कदाचित १९१६ साली होते त्यापेक्षा आज त्याचे पालन करणे अधिकच कठीण झाले आहे. पण तरीसुद्धा खरे ख्रिस्ती या जगाच्या वासनांना नकार देण्याचा कसोशीने प्रयत्न करतात कारण असे केल्याने ते आपल्या निर्माणकर्त्याची बाजू घेतात याची त्यांना जाणीव आहे.

६. इंद्रियदमन विकसित करत असताना निराश होण्याची गरज का नाही?

आत्मसंयमाचा उल्लेख गलतीकर ५:२२, २३ यात ‘आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळाचा’ भाग म्हणून करण्यात आला आहे. “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा [आणि] सौम्यता” या सर्वांसोबत जर आपण इंद्रियदमनाचा गुण प्रदर्शित केला तर आपल्याला मोठा फायदा होईल. पेत्राने समजावल्याप्रमाणे असे केल्यामुळे आपण देवाच्या सेवेत “निष्क्रिय व निष्फळ” ठरणार नाही. (२ पेत्र १:८) पण हे गुण आपण जितक्या लवकर व जितक्या प्रमाणात प्रदर्शित करू इच्छितो तितके न करू शकल्यास निराश होण्याचे अथवा स्वतःला दोषी ठरवण्याची गरज नाही. शाळकरी मुलांपैकी कधीकधी एकजण दुसऱ्‍यापेक्षा लवकर प्रगती करतो हे तुमच्या पाहण्यात आले असेल. तसेच कर्मचाऱ्‍यांपैकी एक व्यक्‍ती एखादे नवीन काम इतर सहकाऱ्‍यांपेक्षा लवकर शिकून घेते. त्याचप्रकारे काही व्यक्‍ती ख्रिस्ती गुण प्रदर्शित करण्यास इतरांपेक्षा लवकर शिकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जमेल तितक्या चांगल्याप्रकारे देवाला प्रिय असणारे हे गुण विकसित करत राहणे. यहोवा आपल्या वचनाद्वारे आणि मंडळीद्वारे जी मदत पुरवतो त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याद्वारे आपण हे करू शकतो. आपण किती कमी वेळात एखादे ध्येय गाठतो हे महत्त्वाचे नाही तर उन्‍नती करत राहण्याकरता निश्‍चयपूर्वक प्रयत्न सातत्याने करत राहणे अधिक महत्त्वाचे आहे.

७. आत्मसंयम अनिवार्य आहे हे कशावरून दिसून येते?

आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या गुणांत इंद्रियदमनाचा सर्वात शेवटी उल्लेख करण्यात आला असला तरीसुद्धा, हा गुण इतर गुणांपेक्षा कमी महत्त्वाचा निश्‍चितच नाही. उलट, आपण आठवणीत ठेवले पाहिजे, की आपण पूर्णपणे इंद्रियदमन करू शकलो तरच सगळी “देहाची कर्मे” आपण टाळू शकतो. पण अपरिपूर्ण असल्यामुळे मानवांच्या हातून “जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद,” यांसारखी “देहाची कर्मे” घडण्याची शक्यता आहे. (गलतीकर ५:१९, २०) म्हणूनच आपण सतत लढत राहिले पाहिजे; आपल्या अंतःकरणातून व मनातून वाईट प्रवृत्ती पूर्णपणे काढून टाकण्याचा आपला दृढ निश्‍चय असला पाहिजे.

काहींच्यासमोर विशेष आव्हान

८. कोणत्या कारणांमुळे काहीजणांना इंद्रियदमन करणे खासकरून कठीण जाते?

काही ख्रिश्‍चनांना आत्मसंयम दाखवणे इतरांपेक्षा जास्त कठीण जाते. का? आईवडिलांचे संस्कार किंवा गतकाळातील अनुभव याकरता जबाबदार असू शकतात. जर आत्मसंयम विकसित करून आपल्या वर्तनात प्रदर्शित करणे आपल्याला कठीण गेलेले नसेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. पण ज्यांना हा गुण प्रदर्शित करणे कठीण जाते त्यांच्याशी व्यवहार करत असताना, त्यांच्या आत्मसंयमाच्या अभावामुळे आपल्याला थोडा त्रास झाला तरीसुद्धा आपण निश्‍चितच सहानुभूती व समंजसपणा दाखवला पाहिजे. आपण स्वतः अपरिपूर्ण आहोत, त्यामुळे आपल्यापैकी कोणाजवळही फाजील धार्मिक वृत्तीने वागण्याचे कारण नाही.—रोमकर ३:२३; इफिसकर ४:२.

९. काहीजण कोणत्या बाबतीत कमी पडतात आणि या कमतरता पूर्णपणे केव्हा दूर होतील?

उदाहरणार्थ: आपण कदाचित एखाद्या अशा सहख्रिस्ती बांधवाला ओळखत असू ज्याने तंबाखू किंवा इतर अंमली पदार्थांचे सेवन अलीकडेच सोडले आहे पण ज्याला अजूनही कधीकधी या गोष्टींची तीव्र आसक्‍ती वाटते. किंवा काहीजणांना खाण्याच्या किंवा मद्य पिण्याच्या बाबतीत मर्यादेत राहणे कठीण जात असेल. इतरांना आपल्या जिभेवर ताबा ठेवणे कठीण जात असल्यामुळे ते सहसा नको ते बोलून जात असतील. अशा वाईट सवयींवर मात करण्याकरता आत्मसंयम विकसित करण्याचा निर्धारपूर्वक प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. का? याकोब ३:२ यात वस्तुस्थिती कबूल केली आहे: “कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरहि कह्‍यात ठेवण्यास समर्थ आहे.” इतर काहींना जुगार खेळण्याच्या तीव्र इच्छेवर मात करावी लागते. किंवा त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल. या व अशा इतर दोषांवर यशस्वीरित्या मात कशी करावी हे शिकायला बराच काळ लागू शकतो. आज आपण जरी याबाबतीत बऱ्‍याच प्रमाणात प्रगती करू शकत असलो तरीसुद्धा सर्व प्रकारच्या अयोग्य इच्छा आपण परिपूर्ण झाल्यावरच पूर्णपणे निघून जातील. तोपर्यंत, आत्मसंयमाने वागण्याचा प्रयत्न केल्यामुळे पापमय जीवनशैलीत पुन्हा अडकण्याचे आपण टाळू शकतो. ही लढाई सुरू आहे तोवर, कोणीही हिंमत हारू नये म्हणून आपण एकमेकांना साहाय्य करत राहू या.—प्रेषितांची कृत्ये १४:२१, २२.

१०. (अ) काही जणांकरता लैंगिक गोष्टींसंबंधी आत्मसंयम राखणे खासकरून कठीण का आहे? (ब) एका बांधवाने कोणता मोठा बदल केला? (पृष्ठ १६ वरील पेटी पाहा.)

१० आणखी एक क्षेत्र ज्यात आत्मसंयम राखणे बऱ्‍याच जणांना कठीण जाते ते म्हणजे लैंगिकता. यहोवाने आपल्याला निर्माण करताना लैंगिक इच्छा आपल्यात निर्माण केल्या होत्या. पण काहीजणांना देवाच्या दर्जांनुसार लैंगिक संबंधांना योग्य ठिकाणी ठेवणे अत्यंत कठीण जाते. शिवाय त्यांना अतिशय तीव्र लैंगिक वासना असल्यामुळे त्यांना आणखीनच कठीण जात असेल. आपण लैंगिक वासनेने झपाटलेल्या जगात राहात आहोत, जेथे अनेक मार्गांनी लैंगिक वासना अधिकच भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे विवाहाच्या जबाबदारीशिवाय देवाची सेवा मोकळेपणाने करण्यासाठी निदान काही काळ तरी अविवाहित राहू इच्छिणाऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते. (१ करिंथकर ७:३२, ३३, ३७, ३८) पण “वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे,” या शास्त्रवचनातील इशाऱ्‍याप्रमाणे ते कदाचित लग्न करण्याचे ठरवतील; अर्थातच हा एक आदरणीय निर्णय आहे. पण त्याच वेळेस शास्त्रवचनांतील सल्ल्याप्रमाणे ते “केवळ प्रभूमध्ये,” लग्न करू इच्छितात. (१ करिंथकर ७:९, ३९) आपण खात्री बाळगू शकतो की धार्मिक तत्त्वांना जडून राहण्याच्या त्यांच्या दृढसंकल्पामुळे यहोवा आनंदित होतो. अशा उच्च नैतिक आदर्शांनुसार विश्‍वासूपणे चालणाऱ्‍या खऱ्‍या उपासकांसोबत देवाची सेवा करणे हे त्यांच्या सहविश्‍वासू बांधवांकरता आनंददायक आहे.

११. लग्न करण्याची इच्छा असूनही जे करू शकलेले नाहीत, अशा बंधू अथवा भगिनीला आपण कशाप्रकारे मदत करू शकतो?

११ योग्य साथीदार न सापडल्यास काय? ज्या व्यक्‍तीला विवाह करण्याची इच्छा असूनही करता येत नाही तिला वाटणाऱ्‍या वैफल्याची कल्पना करा! ही व्यक्‍ती आपल्या मित्रमैत्रिणींचे लग्न होताना पाहते, त्यांना सुखाने संसार करताना पाहते; पण तिला मात्र योग्य साथीदार सापडत नाही. अशा स्थितीत असलेल्या काहींना हस्तमैथुनाची अशुद्ध सवय जडण्याची शक्यता आहे. कोणतीही ख्रिस्ती व्यक्‍ती, शुद्ध आचरण राखू इच्छिणाऱ्‍या दुसऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीला नकळतपणे निराश करू इच्छित नाही. पण, “तू केव्हा करणार लग्न?” यांसारखे अविचारी प्रश्‍न विचारून कदाचित आपण नकळत त्या व्यक्‍तीला हताश वाटण्यास लावत असू. आपण वाईट हेतूने जरी बोलत नसलो तरीसुद्धा, या बाबतीत आपल्या जिभेला लगाम देऊन आत्मसंयम दाखवणे किती चांगले ठरेल. (स्तोत्र ३९:१) आपल्यापैकी जे अविवाहित अवस्थेत असूनही शुद्ध राहण्याचा प्रयत्न करत आहेत ते खरोखरच प्रशंसेस पात्र आहेत. एखादी व्यक्‍ती ज्यामुळे निराश होईल असे काही बोलण्याऐवजी तिला उभारी मिळेल असे काहीतरी बोलण्याचा आपण प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, प्रौढ ख्रिश्‍चनांचा लहानसा गट जेवणाच्या निमित्ताने अथवा निकोप ख्रिस्ती संगतीचा आनंद लुटण्याकरता एकत्र येतो तेव्हा काही अविवाहित व्यक्‍तींनाही सामील करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो.

वैवाहिक संबंधांत आत्मसंयम

१२. ज्यांचा विवाह झाला आहे त्यांनी देखील आत्मसंयम बाळगणे का महत्त्वाचे आहे?

१२ केवळ लग्न झाले आहे म्हणून लैंगिक विषयांत आत्मसंयमाची गरज नाही असा अर्थ होत नाही. उदाहरणार्थ, पती व पत्नीच्या लैंगिक गरजांमध्ये बराच फरक असू शकतो. किंवा काही वेळा एका जोडीदाराच्या शारीरिक स्थितीमुळे सामान्य लैंगिक संबंध ठेवणे कठीण किंवा अशक्य असेल. गतकाळातील अनुभवांमुळे कदाचित एका जोडीदाराला, “पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेहि पतीला द्यावा,” या बायबलमधील आज्ञेनुसार वागणे कठीण वाटत असेल. अशा परिस्थितीत दुसऱ्‍या जोडीदाराने अधिक आत्मसंयम दाखवावा. दोघांनी विवाहित ख्रिश्‍चनांना पौलाने दिलेला सल्ला आठवणीत ठेवावा: “एकमेकांबरोबर वंचना करू नका, तरी प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकापासून दूर राहा मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हास परीक्षेत पाडू नये.”—१ करिंथकर ७:३,.

१३. आत्मसंयम दाखवण्याकरता संघर्ष करत असलेल्यांसाठी आपण काय करू शकतो?

१३ या सर्वात घनिष्ट नातेसंबंधात दोन्ही जोडीदारांनी योग्यप्रकारे आत्मसंयम दाखवण्याचे शिकून घेतले असेल तर दोघेही किती आनंदाने राहू शकतात. त्याच वेळी, जे सहउपासक अजूनही या क्षेत्रात आत्मसंयम दाखवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी ते समंजसपणे वागतात. आत्मसंयम दाखवण्याच्या आणि अयोग्य इच्छांवर ताबा मिळवण्याच्या लढ्यात सातत्याने लढत राहण्याकरता यहोवाने आपल्या आध्यात्मिक बांधवांना सूक्ष्मदृष्टी, धैर्य व संकल्पबुद्धी द्यावी म्हणून आपण त्यांच्याकरता प्रार्थना करण्यास कधीही विसरू नये.—फिलिप्पैकर ४:६, ७.

एकमेकांना मदत करत राहा

१४. सहख्रिस्ती बांधवांसोबत आपण सहानुभूतीने व समंजसपणे का वागले पाहिजे?

१४ ज्याबाबतीत आपल्याला आत्मसंयम दाखवणे अजिबात जड जात नाही, पण त्याबाबतीत इतर सहविश्‍वासू ख्रिस्ती बांधवांना संघर्ष करावा लागतो, तेव्हा त्यांच्याशी समंजसपणे वागणे आपल्याला कठीण जाऊ शकते. पण सर्वांचा स्वभाव वेगळा असतो. काहीजण भावनाप्रधान असतात, इतरजण नसतात. काहींना स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे फार कठीण जात नाही, त्यामुळे आत्मसंयम दाखवण्यात त्यांना काहीच समस्या येत नाही. पण इतरांना मात्र हे कठीण जाते. पण आठवणीत असू द्या, की प्रयत्न करत असलेली व्यक्‍ती ही वाईट व्यक्‍ती नाही. सहख्रिस्ती बांधवांना आपल्या समजूतदारपणाची व सहानुभूतीची गरज आहे. आत्मसंयम दाखवण्यास झटत असलेल्यांप्रती क्षमाशील वृत्ती राखल्यास आपण स्वतः आनंदी होऊ शकतो. मत्तय ५:७ येथे लिहिलेल्या येशूच्या शब्दांवरून आपण हे पाहू शकतो.

१५. स्तोत्र १३०:३ यातील शब्द आत्मसंयम दाखवण्याच्या बाबतीत सांत्वनदायक का आहेत?

१५ एखाद्या वेळेस ख्रिस्ती गुण दाखवण्यास कमी पडलेल्या सहख्रिस्ती बांधवांविषयी आपण कधीही वाईट मत बनवू नये. आपण स्वतः एखाद्या वेळी चुकतो तेव्हा यहोवा केवळ त्या एका घटनेकडे पाहण्याऐवजी, आपण यशस्वी ठरलेल्या अनेक प्रसंगांकडे लक्ष देतो (आपल्या सहख्रिस्ती बांधवांच्या नजरेतून हे प्रसंग सुटले असले तरीसुद्धा) ही जाणीव किती उत्तेजन देणारी आहे. स्तोत्र १३०:३ [सुबोध भाषांतर] यातील शब्द मनात बाळगणे अतिशय सांत्वनदायक आहे: “हे देवा, तू आमची पापे लक्षात आणशील, तर आमच्यापैकी कोण जिवंत राहील?”

१६, १७. (अ) आत्मसंयमाच्या बाबतीत गलतीकर ६:२, ५ आपण कशाप्रकारे लागू करू शकतो? (ब) आत्मसंयमाविषयी पुढे आपण काय विचारात घेणार आहोत?

१६ यहोवाला संतुष्ट करण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने आत्मसंयम विकसित केला पाहिजे; पण आपले ख्रिस्ती बांधव आपल्याला मदत करतील याविषयी आपण आश्‍वस्त राहू शकतो. अर्थातच, आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीचे ओझे स्वतः वाहिले पाहिजे पण तरीसुद्धा आपण ज्याबाबतीत कमी पडतो, त्याबाबतीत एकमेकांची मदत करावी असे प्रोत्साहन देण्यात येते. (गलतीकर ६:२, ५) ज्या ठिकाणी आपण जायला नको, ज्या गोष्टी आपण पाहायला नकोत किंवा ज्या गोष्टी आपण करायला नकोत अशा गोष्टी करण्यापासून आईवडील, वैवाहिक जोडीदार अथवा एखादा मित्र अथवा मैत्रीण आपल्याला अडवते तेव्हा आपण उलट तिचे आभार मानले पाहिजे. हे लोक आपल्याला आत्मसंयम दाखवण्यास अर्थातच वाईट गोष्टींना नाही म्हणून त्यानुसार वागण्याचे सामर्थ्य विकसित करण्यास मदत करत असतात!

१७ आतापर्यंत आपण आत्मसंयमाविषयी जे विचारात घेतले आहे, त्याच्याशी बरेच ख्रिस्ती सहमत असतील पण वैयक्‍तिकरित्या आपल्याला बरीच प्रगती करण्यास वाव आहे असे त्यांना वाटत असेल. अपरिपूर्ण मानवांकडून ज्या प्रमाणात अपेक्षा केली जाऊ शकते तितक्या पूर्णपणे आत्मसंयम दाखवण्याची कदाचित त्यांची इच्छा असेल. तुमची अशी इच्छा आहे का? मग देवाच्या आत्म्याच्या फळात सामील असलेला हा गुण विकसित करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? आणि असे केल्यामुळे एक ख्रिस्ती या नात्याने तुमच्यासमोर असलेली दीर्घकालीन ध्येये साध्य करण्यास तुम्हाला कशी मदत मिळेल? याविषयी पुढच्या लेखात पाहू या.

तुम्हाला आठवते का?

आत्मसंयम . . .

• ख्रिश्‍चनांकरता महत्त्वाचा का आहे?

• विकसित करणे काहीजणांना कठीण का जाते?

• वैवाहिक संबंधांत का आवश्‍यक आहे?

• विकसित करण्यासाठी आपण एकमेकांना कशाप्रकारे मदत करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चौकट/चित्र]

तो नाही म्हणायला शिकला

जर्मनीत राहणारा एक यहोवाचा साक्षीदार टेक्निकल कम्युनिकेशन्स क्लर्क म्हणून काम करत होता. त्याला ३० वेगवेगळ्या टीव्ही व रेडिओ कार्यक्रमावर नजर ठेवावी लागत असे. प्रक्षेपणात काही व्यत्यय आल्यास त्याला त्या कार्यक्रमाकडे लक्ष देऊन नेमकी समस्या शोधून काढावी लागत असे. तो म्हणतो: “व्यत्यये नेमकी चुकीच्या वेळी, म्हणजे हिंसक अथवा कामोत्तेजक दृश्‍ये दाखवली जात असतानाच यायची. ही घाणेरडी दृश्‍ये कित्येक दिवस, कधीकधी तर कित्येक आठवडे माझ्या मनात घोळत राहायची, जणू माझ्या मेंदूवर त्यांची छाप पडायची.” तो कबूल करतो की यामुळे त्याच्या आध्यात्मिकतेवर नकारात्मक प्रभाव पडला: “मी मुळातच गरम डोक्याचा असल्यामुळे ही हिंसक दृश्‍ये पाहिल्यावर मला आत्मसंयम दाखवणे कठीण जायचे. शिवाय, उत्तान दृश्‍ये पाहिल्यामुळे माझ्या पत्नीमध्ये व माझ्यामध्ये तणाव वाढू लागला. हा दररोजचा संघर्ष बनला. पण या लढाईत मला हार मानायची नव्हती, म्हणून मी कमी पगाराची का होईना पण नवी नोकरी शोधायचे ठरवले. लवकरच मला नवी नोकरी मिळाली. माझ्या मनासारखेच घडले.”

[१५ पानांवरील चित्रे]

बायबल अभ्यासातून मिळवलेले ज्ञान आपल्याला आत्मसंयम दाखवण्यास मदत करते