निर्णय घेणे टाळता न येण्याजोगे आव्हान
निर्णय घेणे टाळता न येण्याजोगे आव्हान
“निर्णय घेण्याइतकी कठीण आणि म्हणूनच महत्त्वाची गोष्ट इतर कोणतीही नाही,” असे नेपोलियन बोनापार्टे या १९ व्या शतकातल्या फ्रान्सच्या सम्राटाने एकदा म्हटले. कदाचित तुम्ही वरील दोन्ही गोष्टींशी सहमत असाल कारण लोकांना सहसा आपल्या स्वतःच्या जीवनावर नियंत्रण करायला आवडते. त्याच वेळी, त्यांना हे देखील समजलेले असते की, निर्णय घेणे काही सोपी गोष्ट नाही.
निर्णय सोपे असोत अथवा कठीण, ते टाळता येऊ शकत नाहीत. दररोज आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. सकाळी उठल्यावर काय घालावे, नाश्त्यासाठी काय खावे, याप्रमाणे इतर पुष्कळ निर्णय आपल्याला दिवसादरम्यान घ्यावे लागतात. यातील बहुतेक निर्णय फार महत्त्वाचे नसतात. त्यांविषयी आपण क्वचितच पुन्हा विचार करतो. किंवा ते योग्य होते किंवा नव्हते या विचाराने आपली क्वचितच झोपमोड होते.
दुसऱ्या बाजूला पाहता, काही निर्णयांचा दूरगामी परिणाम होतो. आजच्या या जगात अनेक तरुणांना आपल्या भविष्यातील ध्येयांविषयी निर्णय घ्यावा लागतो. कोणते शिक्षण घ्यावे आणि किती प्रमाणात घ्यावे याचा त्यांना निर्णय घ्यावा लागेल. आज न उद्या, लग्न करावे अथवा अविवाहित राहावे हा निर्णय त्यांच्यापैकी बहुतेकांना घ्यावा लागेल. लग्नाचा विचार करणाऱ्यांना पुढील निर्णय घ्यावा लागतो: ‘लग्नासाठी माझे वय झाले आहे का आणि मी ही जबाबदारी घेण्याइतपत प्रौढ आहे का? माझा सोबती मला कसा हवाय किंवा याहून महत्त्वाचे म्हणजे, मला कसल्या प्रकारच्या सोबत्याची गरज आहे?’ सोबती निवडण्यासंबंधीच्या निर्णयाव्यतिरिक्त जीवनातील फार कमी निर्णयांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो.
अधिक महत्त्वाच्या बाबींमध्ये, योग्य निर्णय घेणे फार आवश्यक आहे कारण आपला आनंद त्यावर निर्भर आहे. असे निर्णय घ्यायला आपण समर्थ आहोत असे काहींना वाटते आणि यासंबंधी ते इतरांकडून मदत स्वीकारत नाहीत. हे शहाणपणाचे आहे का? आपण पाहू या.
[३ पानांवरील मथळा]
नेपोलियन: From the book The Pictorial History of the World