व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बक्षीस मिळवण्यासाठी, आत्मसंयम बाळगा!

बक्षीस मिळवण्यासाठी, आत्मसंयम बाळगा!

बक्षीस मिळवण्यासाठी, आत्मसंयम बाळगा!

“स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करितो.”१ करिंथकर ९:२५.

१. इफिसकर ४:२२-२४ यात सांगितल्यानुसार लाखो लोकांनी यहोवाला कशाप्रकारे होकारार्थी प्रतिसाद दिला आहे?

यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक सदस्य या नात्याने तुमचा बाप्तिस्मा झाला असेल, तर तुम्ही जाहीररित्या हे कबूल केले की तुम्ही एका अशा स्पर्धेत उतरत आहात ज्याचे बक्षीस सार्वकालिक जीवन हे आहे. यहोवाची इच्छा करण्याच्या आमंत्रणास तुम्ही होकारार्थी उत्तर दिले आहे. यहोवाला आपले जीवन समर्पित करण्याआधी, आपले समर्पण अर्थपूर्ण आणि देवाला स्वीकार्य ठरावे म्हणून आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना जीवनात अनेक फेरबदल करावे लागले. प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना दिलेल्या पुढील सल्ल्याचे आपण पालन केले: “तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्‍त असून त्याचा नाश होत आहे आणि . . . सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” (इफिसकर ४:२२-२४) दुसऱ्‍या शब्दांत, देवाला समर्पण करण्याचे होकारार्थी उत्तर देण्याआधी आपल्याला पूर्वीच्या अयोग्य जीवनशैलीला नाही म्हणावे लागले.

२, ३. पहिले करिंथकर ६:९-१२ यात देवाची स्वीकृती मिळवण्याकरता कोणत्या दोन प्रकारचे बदल करण्याविषयी सांगण्यात आले आहे?

यहोवाचे साक्षीदार होऊ इच्छिणाऱ्‍यांनी जुन्या मनुष्याचा भाग असलेल्या ज्या गुणांचा त्याग केला पाहिजे त्यांचा देवाच्या वचनात स्पष्टपणे धिक्कार केला आहे. त्यांपैकी काही गोष्टींविषयी पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रांत उल्लेख केला: “जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” मग त्याने स्पष्ट केले की कशाप्रकारे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी आपल्या व्यक्‍तिमत्त्वात आवश्‍यक ते बदल केले: “तुम्हांपैकी कित्येक तसे होते.” लक्ष द्या येथे आहेत असे नव्हे तर होते असे म्हटले आहे.—१ करिंथकर ६:९-११.

याव्यतिरिक्‍तही काही बदल करावे लागू शकतात असे पौलाने सूचित केले कारण त्याने पुढे म्हटले: “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही.” (१ करिंथकर ६:१२) यानुसार, यहोवाचे साक्षीदार होऊ इच्छिणारे अनेकजण अशा गोष्टींस नाही म्हणण्यास शिकतात, की ज्या कायदेशीर तर आहेत पण फायद्याच्या नाहीत किंवा दीर्घकाळाच्या दृष्टीने मोलाच्या नाहीत. या वेळखाऊ गोष्टी असू शकतात ज्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींपासून त्यांचे लक्ष विचलित करू शकतात.

४. समर्पित ख्रिस्ती पौलाशी कशाविषयी सहमत आहेत?

देवाला समर्पण कुरकूर करत, फार मोठा त्याग करावा लागत आहे अशा आविर्भावाने नव्हे, तर स्वेच्छेने केले जाते. समर्पित ख्रिस्ती पौलाच्या एकमतात आहेत, ज्याने ख्रिस्ताचा अनुयायी बनल्यानंतर असे म्हटले: “ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्‍याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्‍यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.” (फिलिप्पैकर ३:८) देवाला होकारार्थी प्रतिसाद देता यावा म्हणून पौलाने कमी मोलाच्या गोष्टींना आनंदाने नाही म्हटले.

५. पौल कोणत्या शर्यतीत यशस्वीरित्या सहभागी झाला आणि आपणही असे कशाप्रकारे करू शकू?

आध्यात्मिक शर्यतीत धावत असताना पौलाने आत्मसंयम बाळगला आणि त्यामुळे शेवटी तो असे म्हणू शकला: “जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे; आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेविला आहे; प्रभु जो नीतिमान्‌ न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाहि देईल.” (२ तीमथ्य ४:७, ८) आपणही कधी असे म्हणण्यास समर्थ होऊ का? आपल्या ख्रिस्ती शर्यतीत शेवटपर्यंत हिंमत न हारता जर आपण विश्‍वासाने व आत्मसंयम राखून धावत राहिलो तर अवश्‍य आपण असे म्हणू.

चांगले ते करण्याकरता इंद्रियदमन

६. इंद्रियदमन म्हणजे काय आणि कोणत्या दोन प्रकारे आपण त्याचा अवलंब केला पाहिजे?

बायबलमध्ये “इंद्रियदमन” असे भाषांतर केलेल्या हिब्रू व ग्रीक शब्दांचा शाब्दिक अर्थ एका व्यक्‍तीला स्वतःवर ताबा अथवा नियंत्रण आहे असा होतो. हे शब्द सहसा, वाईट करण्यापासून स्वतःला आवरण्याचा अर्थ सूचित करतात. पण चांगली कृत्ये करण्यासाठी आपल्या शरीराचा वापर करायचा असेल तरीसुद्धा काही प्रमाणात इंद्रियदमनाची गरज आहे असे आपण म्हणू शकतो. अपरिपूर्ण मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती वाईट करण्याची आहे, त्याअर्थी आपल्याला दोन प्रकारचे संघर्ष करावे लागतील. (उपदेशक ७:२९; ८:११) वाईट करण्यापासून आवरण्यासोबतच आपण स्वतःला चांगले ते करण्यासाठी भाग पाडले पाहिजे. किंबहुना, चांगले ते करण्याकरता आपल्या शरीरावर नियंत्रण करणे हा वाईट करण्यापासून स्वतःला आवरण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.

७. (अ) दाविदाप्रमाणे आपण कशासाठी प्रार्थना केली पाहिजे? (ब) कशाविषयी मनन केल्यामुळे आपल्याला अधिक आत्मसंयम दाखवण्यास मदत होईल?

स्पष्टपणे, आपण देवाला केलेले समर्पण पूर्ण करायचे असेल तर इंद्रियदमन करणे अत्यंत आवश्‍यक आहे. दाविदाप्रमाणे आपण प्रार्थना केली पाहिजे: “हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्‍न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तोत्र ५१:१०) ज्या गोष्टी नैतिकरित्या अयोग्य आहेत किंवा शारीरिकरित्या नुकसानकारक आहेत त्या टाळल्यामुळे कोणते फायदे मिळू शकतात याविषयी आपण मनन करू शकतो. अशा गोष्टी न टाळल्यास कोणते नुकसान भोगावे लागू शकतात त्याविषयी विचार करा: आरोग्याच्या गंभीर समस्या, नातेसंबंधांतील वितुष्टे किंवा अकाली मृत्यू. दुसरीकडे पाहता, यहोवाने सांगितल्यानुसार जीवन व्यतीत केल्यामुळे होणाऱ्‍या अनेक फायद्यांचा विचार करा. पण वास्तविक दृष्टिकोन राखून आपण ओळखले पाहिजे की हृदय कपटी आहे. (यिर्मया १७:९) यहोवाच्या दर्जांना क्षुल्लक लेखण्यास आपले हृदय आपल्याला प्रवृत्त करू पाहत असल्यास आपण लगेच त्याचा प्रतिकार केला पाहिजे.

८. अनुभवाने आपल्याला कोणते वास्तविक सत्य शिकायला मिळते? उदाहरण द्या.

अनुभवाने आपल्यापैकी कित्येकांना हे माहीत आहे की आत्मा इच्छुक असला तरीसुद्धा इच्छुक नसणारे शरीर कधीकधी आपल्या इच्छुक आत्म्याचा आवेश विझवण्याचा प्रयत्न करते. राज्य प्रचाराचे उदाहरण घ्या. या जीवनदायक कार्यात मानव स्वेच्छेने भाग घेतात तेव्हा यहोवाला आनंद वाटतो. (स्तोत्र ११०:३; मत्तय २४:१४) आपल्यापैकी बऱ्‍याच जणांकरता जाहीररित्या प्रचार करणे सुरवातीला सोपे गेले नाही. प्रचार करण्यास इच्छुक नसलेल्या आपल्या शरीरावर ताबा मिळवून आपल्याला अक्षरशः त्यास ‘कुदलून व दास करून’ ठेवावे लागले असेल आणि कदाचित अजूनही लागत असेल.—१ करिंथकर ९:१६, २७; १ थेस्सलनीकाकर २:२.

“सर्व गोष्टींविषयी”?

९, १०. “सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन” दाखवण्यात कशाचा समावेश आहे?

“सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन” करण्याच्या बायबलमधील सल्ल्यावरून सूचित होते की केवळ आपल्या क्रोधावर नियंत्रण करणे आणि अनैतिक आचरणापासून स्वतःला आवरणे पुरेसे नाही. या क्षेत्रांत आपण आत्मनियंत्रण मिळवले आहे असे कदाचित आपल्याला वाटेल आणि जर हे खरे असेल तर निश्‍चितच आपण आभारी असावे. पण जीवनाच्या ज्या क्षेत्रांत आत्मनियंत्रणाची गरज इतकी उघडपणे दिसून येत नाही त्यांविषयी काय? उदाहरणार्थ आपण एका सुसंपन्‍न देशात राहात असू, जेथे राहणीमान अतिशय उच्च दर्जाचे आहे. अशा परिस्थितीत, अनावश्‍यक खर्च करण्याच्या मोहाला नाही म्हणण्यास शिकणे सुज्ञपणाचे ठरणार नाही का? केवळ एखादी वस्तू उपलब्ध आहे, आकर्षक आहे किंवा आपल्याला परवडणारी आहे म्हणून ती लगेच विकत घेणे योग्य नाही हे आईवडिलांनी आपल्या मुलांना शिकवले पाहिजे. अर्थात, हे मार्गदर्शन परिणामकारक होण्यासाठी आईवडिलांनी स्वतः उत्तम आदर्श मांडला पाहिजे.—लूक १०:३८-४२.

१० काही गोष्टींपासून स्वतःला वंचित ठेवल्यामुळे आपली इच्छाशक्‍ती बळकट होते. तसेच आपल्याजवळ आधीपासूनच असलेल्या भौतिक वस्तूंची आपण कदर करायला शिकतो आणि ज्या लोकांना स्वेच्छेने नव्हे तर परिस्थितीमुळे काही गोष्टींपासून वंचित राहावे लागते त्यांच्याबद्दल आपण अधिक सहानुभूतिशील बनतो. अर्थात, अशी ही मर्यादशील जीवनशैली आजकालच्या “स्वतःची हौस पुरवा” आणि “तुम्हाला सर्वोत्कृष्ट तेच मिळाले पाहिजे” यांसारख्या लोकप्रिय मनोवृत्तींच्या विरोधात जाते. जाहिरातींचे विश्‍व सर्व इच्छा लागलीच तृप्त करण्यावर जोर देते; पण उद्योजक स्वतःच्या नफ्यासाठी अशा जाहिराती करतात. या सर्व गोष्टींमुळे आत्मनियंत्रण दाखवण्याच्या आपल्या प्रयत्नांत व्यत्यय येऊ शकतो. एका समृद्ध युरोपियन देशातील एका नियतकालिकात अलीकडेच असे विधान करण्यात आले होते: “जर अत्यंत दारिद्र्‌यात राहणाऱ्‍यांनाही आपल्या अयोग्य वासनांवर नियंत्रण करण्यासाठी आंतरिक संघर्ष करावा लागतो तर मग आजच्या प्रगतीशील समजातल्या दुधामधाच्या देशांत राहणाऱ्‍यांना आणखी किती संघर्ष करावा लागेल!”

११. स्वतःला काही गोष्टींपासून वंचित ठेवण्यास शिकणे फायद्याचे का आहे, पण कशामुळे हे कठीण जाते?

११ आपल्या इच्छा व गरजा यांतला फरक समजणे आपल्याला कठीण जात असेल, तर आपण काही पावले उचलली पाहिजेत जेणेकरून आपण बेजबाबदारपणे वागण्याचे टाळू. उदाहरणार्थ, नियंत्रणाबाहेर खर्च करण्याच्या प्रवृत्तीवर मात करण्याची आपली इच्छा असेल तर आपण उधारीवर काहीही विकत घ्यायचे नाही असा निश्‍चय करू शकतो; किंवा, खरेदीला जाताना जेमतेमच पैसे नेऊ शकतो. पौलाने काय म्हटले होते, आठवणीत घ्या: “चित्तसमाधानासह भक्‍ति हा तर मोठाच लाभ आहे.” याचे कारण सांगताना तो म्हणतो: “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीमथ्य ६:६-८) आपण तृप्त आहोत का? कोणत्याही क्षेत्रात असो, पण स्वतःचा प्रत्येक लाड पुरवण्याच्या प्रवृत्तीमुळे आपण जीवनातला पसारा वाढवत जातो; त्याऐवजी साधे, सुटसुटीत जीवन जगण्यास आपण शिकले पाहिजे. याकरता प्रबळ इच्छाशक्‍ती व आत्मनियंत्रणाची गरज आहे. पण असे करण्याचे फायदे अनेक आहेत.

१२, १३. (अ) ख्रिस्ती सभांच्या संबंधाने आत्मनियंत्रणाची गरज का असू शकते? (ब) इतर काही क्षेत्रे कोणती आहेत, ज्यांत आत्मनियंत्रणाची गरज आहे?

१२ ख्रिस्ती सभा, संमेलने व अधिवेशने यांच्या संदर्भातही आत्मनियंत्रण दाखवणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, आत्मनियंत्रण नसल्यास कार्यक्रम सुरू असताना आपले मन इतरत्र भरकटू शकते. (नीतिसूत्रे १:५) वक्‍त्‌याकडे पूर्ण लक्ष देण्याऐवजी आपल्या शेजारी बसलेल्यांच्या कानात कुजबुजून इतरांचे लक्ष विचलित न करण्यासाठीही आत्मसंयमाची गरज आहे. वेळेवर सभांना येण्याकरता आपल्या वेळापत्रकात फेरबदल करण्यासाठीही आत्मनियंत्रणाची गरज आहे. शिवाय, सभांची तयारी करण्यासाठी वेळ काढण्यासाठी तसेच सभांमध्ये सहभाग घेण्यासाठीही आत्मनियंत्रणाची गरज असू शकते.

१३ लहानसहान गोष्टींत आत्मनियंत्रण दाखवल्याने गंभीर विषयांतही ते दाखवण्याची आपली क्षमता वाढते. (लूक १६:१०) तेव्हा नियमितरित्या देवाचे वचन व बायबल प्रकाशने वाचणे, त्यांचा अभ्यास करणे व आपण जे शिकतो त्यावर मनन करणे यासाठी स्वतःला शिस्त लावणे किती चांगले ठरेल. अयोग्य प्रकारचे व्यवसाय, मैत्रीसंबंध, प्रवृत्ती व सवयी यांसंबंधी स्वतःवर नियंत्रण करणे, तसेच देवाच्या सेवेकरता असलेला मौल्यवान वेळ आपल्याकडून हिरावून घेतील अशा कार्यांना नकार देण्यास स्वतःला भाग पाडणे किती सुज्ञतेचे ठरेल. यहोवाच्या जागतिक मंडळीच्या आत्मिक परादीसपासून आपल्याला दूर नेतील अशा गोष्टींपासून बचावून राहण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे यहोवाच्या सेवेत व्यस्त राहणे.

आत्मसंयम दाखवून परिपक्व बना

१४. (अ) लहान मुलांनी आत्मसंयम दाखवण्यास कशाप्रकारे शिकले पाहिजे? (ब) लहान मुले कोवळ्या वयातच हे गुण आत्मसात करतात तेव्हा त्यांना कोणता फायदा होऊ शकतो?

१४ नवजात शिशूकडून साहजिकच आपण आत्मसंयमाची अपेक्षा करू शकत नाही. बाल वर्तनाचा अभ्यास करणाऱ्‍या तज्ज्ञांनी काढलेल्या एका माहितीपत्रकात असे म्हटले आहे: “आत्मनियंत्रण आपोआप किंवा एकाएक उत्पन्‍न होत नाही. बाळांना व लहान मुलांना आईवडिलांच्या मार्गदर्शनाने व आधाराने आत्मनियंत्रणाचा गुण हळूहळू शिकावा लागतो. . . . आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली सबंध शालेय जीवनात आत्मनियंत्रण विकसित करण्याची प्रक्रिया सुरू राहते.” चार वर्षांच्या मुलांवर करण्यात आलेल्या एक अभ्यासानुसार असे दिसून आले की ज्या मुलांना आत्मसंयम दाखवण्यास शिकवण्यात आले होते, ते “सहसा किशोरावस्थेत इतरांशी सहज जुळवून घेणारे, सर्वांचे मन जिंकणारे, धाडसी, आत्मविश्‍वासी आणि विश्‍वासार्ह” बनले. पण ज्यांना हा धडा लहानपणी मिळाला नाही ते “सहसा एकाकी, सहज निराश होणारे आणि हट्टी बनले. थोडाही तणाव आल्यास ते लगेच हात टेकणाऱ्‍यांपैकी आणि आव्हानांपासून दूर पळणाऱ्‍यांपैकी होते.” त्याअर्थी, एक सुदृढ मानसिकतेची प्रौढ व्यक्‍ती बनण्याकरता, लहान मुलांनी आत्मसंयम दाखवण्यास शिकून घेतले पाहिजे.

१५. बायबलमध्ये आपल्याकरता निश्‍चित केलेल्या ध्येयाच्या विरोधात, आत्मसंयमाचा अभाव काय सूचित करतो?

१५ त्याचप्रकारे जर आपल्याला ख्रिस्ती या नात्याने परिपक्व व्हायचे असेल, तर आपणही आत्मनियंत्रण दाखवण्यास शिकून घेतले पाहिजे. आत्मसंयम नसल्यास, आपण अद्यापही आध्यात्मिक अर्थाने बालकेच आहोत असे त्यावरून दिसेल. बायबल आपल्याला, “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा” असा सल्ला देते. (१ करिंथकर १४:२०) “देवाच्या पुत्रावरील विश्‍वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत” पोचण्याचे आपले ध्येय आहे. कशासाठी? “ह्‍यासाठी की, आपण ह्‍यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्‍तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.” (इफिसकर ४:१३, १४) स्पष्टपणे, आत्मसंयम दाखवण्यास शिकणे आपल्या आध्यात्मिकतेकरता महत्त्वाचे आहे.

आत्मसंयम उत्पन्‍न करणे

१६. यहोवा कशाप्रकारे मदत पुरवतो?

१६ आत्मसंयम उत्पन्‍न करण्याकरता देवाच्या मदतीची गरज आहे आणि देवाने ही मदत आपल्याला पुरवली आहे. देवाचे वचन एका स्वच्छ आरशाप्रमाणे आपल्याला दाखवते की आपल्याला वैयक्‍तिकरित्या कोठे सुधारणा करायची आहे आणि ही सुधारणा आपल्याला कशी करता येईल याविषयी त्यात मार्गदर्शनही करण्यात आले आहे. (याकोब १:२२-२५) तसेच, आपले प्रेमळ बांधवही आपल्याला मदत करण्यास सदैव तयार आहेत. ख्रिस्ती वडील समजूतदारपणा दाखवून वैयक्‍तिक साहाय्य पुरवतात. स्वतः यहोवा देव आपण विनंती केल्यास आपल्याला मुबलक प्रमाणात त्याचा पवित्र आत्मा देईल. (लूक ११:१३; रोमकर ८:२६) तेव्हा या तरतुदींचा आपण आनंदाने फायदा करून घेऊ या. पृष्ठ २१ वरील पेटीतील सूचना तुम्हाला उपयोगी पडतील.

१७. नीतिसूत्रे २४:१६ येथे आपल्याला कोणते प्रोत्साहन देण्यात आले आहे?

१७ आपण यहोवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्या प्रयत्नांची कदर करतो ही जाणीव किती सांत्वनदायक आहे. यामुळे आपल्याला अधिकाधिक आत्मसंयम उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. कदाचित काही वेळा आपण अपयशी ठरू, पण आपण प्रयत्न करण्याचे कधीही सोडू नये. “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात.” (नीतिसूत्रे २४:१६) दर वेळी जेव्हा आपण यशस्वी होतो, तेव्हा आपण स्वतःविषयी संतुष्ट होऊ शकतो. तसेच यहोवाही संतुष्ट होतो याची आपण खात्री बाळगू शकतो. एक साक्षीदार सांगतो, की यहोवाला आपले जीवन समर्पित करण्याआधी दरवेळी जेव्हा एक आठवडाभर तो सिगरेट ओढण्याच्या मोहाचा प्रतिकार करण्यात यशस्वी व्हायचा तेव्हा आत्मसंयम दाखवल्यामुळे त्याचे जे पैसे वाचले त्यातून तो स्वतःला शाबासकी देण्यासाठी एखादी उपयोगी वस्तू खरेदी करायचा.

१८. (अ) आत्मसंयमाच्या संघर्षात कशाचा समावेश आहे? (ब) यहोवा आपल्याला कोणते आश्‍वासन देतो?

१८ सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण नेहमी आठवणीत ठेवले पाहिजे, की आत्मसंयम दाखवण्यात आपले मन व भावनांचा समावेश आहे. हे येशूच्या शब्दांवरून स्पष्ट होते: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” (मत्तय ५:२८; याकोब १:१४, १५) जो आपल्या मनावर व भावनांवर ताबा मिळवण्यास शिकला आहे त्याला आपल्या सबंध शरीरावर ताबा राखणे सोपे जाईल. तेव्हा, आपण केवळ वाईट गोष्टी न करण्याचा नव्हे तर त्यांच्याविषयी विचारही न करण्याचा निर्धार बळकट करू या. वाईट विचार मनात आलेच तर लगेच त्यांना झटकून टाका. येशूवर प्रार्थनापूर्वक आपली नजर केंद्रित करण्याद्वारे आपण मोहांपासून दूर पळू शकतो. (१ तीमथ्य ६:११; २ तीमथ्य २:२२; इब्री लोकांस ४:१५, १६) आपण आपल्या परीने होईल तितके करू तसतसे आपण स्तोत्र ५५:२२ येथील सल्ल्याचे पालन करत असू: “तू आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.”

तुम्हाला आठवते का?

• कोणत्या दोन मार्गांनी आपण आत्मसंयम दाखवला पाहिजे?

• “सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन” करण्याचा काय अर्थ होतो?

• या अभ्यासादरम्यान, आत्मसंयम उत्पन्‍न करण्यासाठी दिलेल्या कोणत्या व्यावहारिक सूचना तुम्हाला विशेष आवडल्या?

• आत्मसंयम कोठून सुरू होतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चौकट/चित्रे]

आत्मसंयम कसा वाढवावा

• लहानसहान गोष्टींत तो दाखवण्याचा प्रयत्न करा

• त्यामुळे होणाऱ्‍या वर्तमान व भावी फायद्यांविषयी मनन करा

• देव ज्याची मनाई करतो त्याऐवजी तो जे करण्याचे प्रोत्साहन देतो ते करा

• अयोग्य विचार लगेच झटकून टाका

• आपले मन आध्यात्मिकरित्या उभारणीकारक विचारांनी भरा

• प्रौढ ख्रिस्ती बांधवांची मदत स्वीकारा

• मोहात पाडणारी परिस्थिती टाळा

• मोहात पडल्यास देवाला मदतीकरता प्रार्थना करा

[१८, १९ पानांवरील चित्रे]

इंद्रियदमन आपल्याला चांगले ते करण्याची प्रेरणा देते