व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

उत्पत्ति ३:२२ येथे यहोवाने कोणाला उद्देशून “आमच्यातल्या एकासमान” असे म्हटले?

“मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे,” असे यहोवा देवाने जेव्हा म्हटले तेव्हा तो स्वतःला आणि आपल्या एकुलत्या एका पुत्राला संबोधून बोलला, असे दिसते. (उत्पत्ति ३:२२) त्याचे कारण काय हे आपण पाहू या.

पहिल्या मानवी जोडप्याला दंड घोषित केल्यावर यहोवाने वरीलप्रमाणे म्हटले. काहींच्या मते, “आमच्यातल्या एकासमान” हा वाक्यांश, परमेश्‍वराची श्रेष्ठता सूचित करण्यासाठी अनेकवचनात वापरण्यात आला आहे; जसे की एखादा राजा स्वतःविषयी बोलताना, “आम्हाला हे मुळीच आवडले नाही,” असे बोलतो तेव्हा तो केवळ स्वतःविषयी बोलत असतो. परंतु उत्पत्ति १:२६ आणि ३:२२ च्या बाबतीत, बायबल विद्वान डॉनल्ड ई. गऊन म्हणतात: “हे शब्द ज्याप्रकारे समजण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यांपैकी बहुतेकांविषयी जुन्या करारात कोणताही पुरावा मिळत नाही, जसे ‘आम्ही,’ हे श्रेष्ठता सूचित करण्यासाठी वापरण्यात आले असावे, . . . किंवा ते कदाचित परमेश्‍वरत्वात एकापेक्षा अधिक परमेश्‍वर असल्याचा पुरावा असावा. परंतु, यांपैकीचे एकही स्पष्टीकरण, उत्पत्ति ३:२२ मधील ‘आमच्यातल्या एकासमानाविषयी’ या शब्दांना लागू होत नाही.”

स्वतःहूनच “बरेवाईट” ठरवण्यास सुरवात करणाऱ्‍या आणि पहिल्या मानवी दांपत्यालाही असेच करण्यास प्रभावीत करणाऱ्‍या दियाबल सैतानाला संबोधून यहोवा बोलत असावा का? हे तर्काला पटण्याजोगे नाही. कारण येथे यहोवाने ‘आमच्यातल्या एकासमान’ या वाक्यांशाचा उपयोग केला. त्या वेळी, सैतान यहोवाच्या विश्‍वासू देवदूतांच्या समूहातला एक राहिला नव्हता; त्यामुळे यहोवाच्या बाजूने असलेल्यांमध्ये त्याची गणती होऊ शकत नाही.

मग देव विश्‍वासू देवदूतांना उद्देशून बोलत होता का? हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही. परंतु, उत्पत्ति १:२६ आणि ३:२२ मधील वाक्यांशांतील साम्यतेवरून आपल्याला याचा एक सुगावा मिळतो. उत्पत्ति १:२६ येथे आपण यहोवाने असे म्हटल्याचे वाचतो: “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू.” हे तो कोणाशी बोलत होता? आत्मिक प्राणी जो नंतर परिपूर्ण मनुष्य येशू बनला त्याला सूचित करत प्रेषित पौलाने म्हटले: “तो अदृश्‍य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पतीत ज्येष्ठ आहे; कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, . . . सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले.” (कलस्सैकर १:१५, १६) होय, उत्पत्ति १:२६ मध्ये यहोवा आपल्या एकुलत्या एका पुत्राशी अर्थात स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी त्याच्याबरोबर असलेल्या ‘कुशल कारागीराशी’ बोलत होता, हे तर्काला पटण्यासारखे आहे. (नीतिसूत्रे ८:२२-३१) उत्पत्ति ३:२२ मधला असाच वाक्यांश सुचवतो, की यहोवा पुन्हा त्याच्या अगदी जवळ असलेल्या त्याच्या एकुलत्या एका पुत्राशी बोलत होता.

देवाच्या एकुलत्या एका पुत्राला निश्‍चितच ‘बऱ्‍यावाईटाचे’ ज्ञान होते. यहोवाबरोबरच्या त्याच्या दीर्घ आणि निकटच्या सहवासात त्याने नक्कीच आपल्या पित्याच्या विचारसरणीविषयी, तत्त्वांविषयी आणि दर्जांविषयी पूर्णपणे शिकून घेतले. आपल्या पुत्राला या सर्व गोष्टींची ओळख आहे आणि तो या सर्व गोष्टींच्या बाबतीत एकनिष्ठ राहील याची यहोवाला पक्की खात्री असल्यामुळे यहोवाने त्याला, प्रत्येक वेळा आपल्याशी विचारविमर्श न करता निर्णय घेण्याचे काही प्रमाणात स्वातंत्र्य दिले असावे. त्यामुळे पुत्र, बरे काय आणि वाईट काय हे ठरवू शकला आणि ते ठरवण्याचा अधिकारही त्याला मिळाला. परंतु, त्याने सैतान, आदाम आणि हव्वेप्रमाणे यहोवाच्या दर्ज्यांच्या विरुद्ध दर्जा मांडला नाही.