व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आनंदी जीवनाकरता भरवसा अत्यावश्‍यक

आनंदी जीवनाकरता भरवसा अत्यावश्‍यक

आनंदी जीवनाकरता भरवसा अत्यावश्‍यक

जेवणातून विषबाधा होणे अत्यंत त्रासदायक असते. वारंवार अशी विषबाधा होणाऱ्‍या व्यक्‍तीला आपल्या खाण्याच्या सवयींविषयी काळजीपूर्वक असावे लागते. परंतु, विषबाधा होते म्हणून काहीही खाण्याचे पूर्णपणे बंद करणे हा व्यावहारिक उपाय नाही. असे केल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिक गंभीर होईल. अन्‍नाविना कोणालाही फार काळ जगता येणार नाही.

त्याचप्रमाणे, आपला विश्‍वासघात होणे हा दुःखदायक अनुभव आहे. वारंवार असा विश्‍वासघात झाल्याने आपण कदाचित लोकांसोबत सहवास राखण्याविषयी निवडक बनू. तथापि, या परिस्थितीतून सुटका मिळवण्यासाठी सर्वच लोकांपासून दूर राहणे हा उपाय योग्य असणार नाही. का नाही? कारण प्रत्येक व्यक्‍तीवर शंका केल्याने आपला आनंद हिरावला जाऊ शकतो. समाधानी जीवन जगण्याकरता, परस्पर भरवशावर आधारित नातेसंबंधांची गरज असते.

“परस्परांमधील दररोजचे संबंध सुरळीत चालायचे असतील तर भरवसा असणे हा एक मूळ घटक आहे,” असे युजेंट २००२ हे पुस्तक म्हणते. नोई सुरखर त्सायतुंग या बातमीपत्राने म्हटले की, “प्रत्येक व्यक्‍ती भरवशासाठी आसुसलेली असते. भरवशामुळे जीवनाचा दर्जा सुधरतो” किंबहुना तो “जगण्यासाठी अनिवार्य बनतो.” तेच बातमीपत्र पुढे म्हणते की, भरवशाविना “माणसाला जीवनाचा सामना करणे शक्य नाही.”

कोणा न कोणावर भरवसा ठेवण्याची आपली मूलभूत गरज असल्यामुळे असा कोण आहे ज्यावर भरवसा ठेवून आपली निराशा होणार नाही?

आपल्या संपूर्ण हृदयाने यहोवावर भरवसा ठेव

“तू आपल्या सर्व हृदयाने यहोवाच्या ठायी भरवसा ठेव,” असे बायबल आपल्याला सांगते. (नीतिसूत्रे ३:५, पं.र.भा.) होय, देवाचे वचन आपल्याला वारंवार आपला निर्माणकर्ता, यहोवा देव याच्यावर भरवसा ठेवायला उत्तेजन देते.

आपण देवावर आपला भरवसा का ठेवू शकतो? पहिले कारण म्हणजे, यहोवा देव हा पवित्र देव आहे. संदेष्टा यशयाने लिहिले: “पवित्र! पवित्र! पवित्र! सेनाधीश परमेश्‍वर!” (यशया ६:३) पवित्रतेची कल्पना तुम्हाला अनाकर्षक वाटते का? उलट, ती तुम्हाला आकर्षक वाटली पाहिजे कारण यहोवाची पवित्रता म्हणजे तो शुद्ध, अपराधापासून मुक्‍त आणि पूर्णतः विश्‍वसनीय आहे. तो कधीही भ्रष्ट होणार नाही किंवा आपला फायदा उचलणार नाही आणि त्याने आपली निराशा करणे तर अगदीच अशक्य आहे.

शिवाय, देवावर आपण भरवसा ठेवू शकतो कारण त्याची सेवा करणाऱ्‍यांना मदत करण्याची त्याला ताकद व इच्छा आहे. उदाहरणार्थ, काहीही कार्य करण्यास त्याच्याजवळ परम सामर्थ्य आहे. त्याची कार्ये, त्याचा परिपूर्ण न्याय आणि बुद्धी यांनी मार्गदर्शित असतात. आणि त्याची निरुपम प्रीती त्याला कार्य करण्यास प्रवृत्त करते. प्रेषित योहानाने लिहिले: “देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) देवाची प्रीती त्याच्या सर्व कार्यांना प्रभावित करते. यहोवाची पवित्रता आणि त्याचे इतर उल्लेखनीय गुण यांमुळे तो उत्कृष्ट पिता आहे ज्यावर पूर्ण भरवसा ठेवला जाऊ शकतो. यहोवाइतकी इतर कोणतीही गोष्ट किंवा व्यक्‍ती भरवशालायक असू शकत नाही.

यहोवावर भरवसा ठेवा आणि आनंदी बना

यहोवावर भरवसा ठेवण्याचे आणखी एक ठोस कारण म्हणजे, इतर कोणाहीपेक्षा तो आपल्याला अधिक समजतो. त्याला ठाऊक आहे की, प्रत्येक मानवाची, निर्माणकर्त्यासोबत सुरक्षित, कायमस्वरूपी आणि भरवशालायक नातेसंबंध ठेवण्याची मूलभूत गरज आहे. ज्यांचा निर्माणकर्त्यासोबत असा नातेसंबंध आहे त्यांना अधिक सुरक्षित वाटते. “जो पुरुष यहोवाला आपला भरवसा करतो . . . तो सुखी आहे.” (स्तोत्र ४०:४, पं.र.भा.) आज लाखो जण दावीदाच्या विचारांशी संपूर्ण हृदयाने सहमत आहेत.

काही उदाहरणे घ्या. डोरिस डोमिनिकन रिपब्लिक, जर्मनी, ग्रीस आणि अमेरिकेत राहिलेली आहे. ती म्हणते: “यहोवावर भरवसा ठेवण्यास मी फार आनंदी आहे. माझी शारीरिक, आध्यात्मिक आणि भावनिकरित्या काळजी कशी घ्यायची हे त्याला ठाऊक आहे. त्याच्या तोडीचा उत्तम मित्र कोठेही सापडणार नाही.” वोल्फगाँग हे कायदा सल्लागार म्हणतात: “ज्या व्यक्‍तीला तुमच्या हिताची काळजी आहे, जी तुमच्याकरता उत्तम काय ते करू शकते आणि करील अशा व्यक्‍तीवर भरवसा ठेवणे यासारखी उत्तम गोष्ट नाही!” आशियात जन्मलेला परंतु सध्या युरोपमध्ये राहणारा हॅम म्हणतो: “मला खात्री वाटते की, यहोवाला सर्व गोष्टींवर नियंत्रण आहे आणि तो कधीही चुका करत नाही म्हणून त्याच्यावर अवलंबून राहायला मला आवडते.”

अर्थात, आपल्यातील प्रत्येकाने केवळ निर्माणकर्त्यावरच नव्हे तर लोकांवरही भरवसा ठेवण्याची गरज आहे. यास्तव, सुज्ञ आणि अनुभवी मित्र या नात्याने यहोवा आपल्याला, कोणत्या प्रकारच्या व्यक्‍तींवर भरवसा ठेवावा याविषयी सल्ला देतो. बायबलचे काळजीपूर्वक वाचन केल्याने या बाबतीत त्याच्या सल्ल्याची दखल आपण घेऊ शकतो.

भरवशास पात्र लोक

“अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” (स्तोत्र १४६:३) हा प्रेरित सल्ला आपल्याला हे कबूल करण्यास मदत करतो की, अनेक मानव भरवसा ठेवण्यास पात्र नाहीत. जगात “अधिपती” म्हणून ओळखले जाणारे माहितीच्या किंवा इतर कार्यहालचालींच्या खास क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसारखे नामवंत लोकही भरवसा ठेवण्यास आपोआप पात्र ठरत नाही. त्यांचे मार्गदर्शन सहसा चुकीचे ठरते आणि अशा “अधिपतींवर” ठेवलेल्या भरवशाची लगेच निराशा होऊ शकते.

अर्थात याचा अर्थ, आपण प्रत्येक व्यक्‍तीवर शंका घ्यावी असे नाही. एवढे मात्र स्पष्ट आहे की, कोणावर भरवसा ठेवावा याबाबतीत आपण निवडक असावे. पण कोणावर भरवसा ठेवावा आणि कोणावर ठेवू नये हे कशाच्या आधारे ठरवता येईल? इस्राएलच्या प्राचीन राष्ट्राच्या उदाहरणातून आपल्याला मदत मिळेल. इस्राएलमध्ये भारी जबाबदाऱ्‍या उचलण्याकरता लोकांची निवड करण्याची गरज भासली तेव्हा मोशेला “सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्‍वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून” घेण्याचा सल्ला देण्यात आला. (निर्गम १८:२१) यातून आपण काय शिकू शकतो?

या पुरुषांना भरवशाच्या स्थानी नियुक्‍ती मिळण्याआधी त्यांनी ईश्‍वरी गुण प्रदर्शित केले होते. त्यांना देवाचे भय आहे, निर्माणकर्त्याविषयी एक सुदृढ भीती आहे व त्याला नाराज करण्याचे भय आहे याचा पुरावा त्यांनी आधीच दिला होता. या पुरुषांनी देवाचे दर्जे उंचावून धरण्यास होता होईल तितके केले होते हे सर्वांसमोर स्पष्ट होते. त्यांना लाचलुचपतीचा द्वेष होता यावरून त्यांची नैतिक ताकद दिसून येते ज्यामुळे सत्ता हाती आल्यावर ते भ्रष्ट होऊ शकणार नव्हते. आपले स्वतःचे किंवा आपल्या नातेवाईकांचे वा मित्रांचे हित पाहण्यासाठी ते भरवशाचा गैरफायदा उचलणार नव्हते.

आपणही भरवशाच्या व्यक्‍तींना निवडताना याच आधारे निवड करणे सुज्ञपणाचे नसेल का? आपल्या वर्तनातून देवाचे भय प्रदर्शित करणारे लोक आपल्याला ठाऊक आहेत का? वर्तनासंबंधी देवाच्या दर्जांनुरूप जगण्याचा त्यांचा दृढनिश्‍चय आहे का? ज्या गोष्टी योग्य नाहीत त्या न करण्याच्या बाबतीत ते विश्‍वासू आहेत का? एखाद्या परिस्थितीतून आपला स्वार्थ न साधणे किंवा आपल्याला हवे ते न मिळवणे याबाबतीत ते प्रामाणिक आहेत का? निश्‍चितच जे स्त्री-पुरुष हे गुण प्रदर्शित करतात ते भरवसा ठेवण्यास पात्र आहेत.

अधूनमधून होणाऱ्‍या निराशेने हताश होऊ नका

कोणावर भरवसा ठेवायचा हे ठरवताना आपण सहनशील असले पाहिजे कारण भरवसा वाढायला वेळ लागतो. सर्वात उत्तम म्हणजे, हळूहळू त्यांच्यावर आपला भरवसा वाढवावा. ते कसे करता येईल? एक व्यक्‍ती काही परिस्थितींमध्ये कशी वागते याचे आपण पुष्कळ वेळापासून निरीक्षण करत असू. ती व्यक्‍ती लहानसहान बाबींमध्ये भरवशालायक आहे का? उदाहरणार्थ, दिलेल्या वचनानुसार इतरांच्या मागितलेल्या वस्तू परत करण्यात ती तत्पर आहे का आणि वक्‍तशीर आहे का? असे असल्यास, आपण अधिक गंभीर बाबींबद्दल त्यांच्यावर निश्‍चिंतपणे भरवसा ठेवू शकतो असे आपल्याला वाटेल. हे पुढील तत्त्वाच्या सुसंगतेत आहे: “जो अगदी थोडक्याविषयी विश्‍वासू तो पुष्काळाविषयीहि विश्‍वासू आहे.” (लूक १६:१०) निवडक आणि धीर धरणारे असल्यामुळे आपल्याला गंभीर स्वरूपाच्या निराशा अनुभवाव्या लागणार नाहीत.

परंतु, कोणी आपल्याला निराश केलेच तर काय? बायबलचा अभ्यास करणाऱ्‍यांना हे आठवत असेल की, येशू ख्रिस्ताला अटक केली त्या रात्री त्याच्या प्रेषितांनी त्याला खूप निराश केले. यहूदा इस्कर्योतने त्याचा विश्‍वासघात केला आणि इतरजण भयभीत होऊन पळून गेले होते. पेत्राने तर येशूला तीन वेळा नाकारले! परंतु, येशूने हे जाणून घेतले की, फक्‍त यहूदाचे वागणे हे जाणूनबुजून होते. अशा आणीबाणीच्या वेळी येशूला निराश केले असतानाही केवळ काही आठवड्यांनंतर त्याने आपल्या उरलेल्या ११ प्रेषितांवर भरवसा असल्याचे पुन्हा दाखवले. (मत्तय २६:४५-४७, ५६, ६९-७५; २८:१६-२०) त्याचप्रमाणे, आपल्या भरवशाच्या व्यक्‍तीने आपल्याला दगा दिला असे आपल्याला वाटल्यास, हा बेभरवशाच्या प्रवृत्तीचा पुरावा आहे की फक्‍त शरीराच्या तात्पुरत्या कमतरतेचा, याचा आपण जरूर विचार करावा.

मी स्वतः भरवशालायक आहे का?

जी व्यक्‍ती केवळ निवडक लोकांवर भरवसा ठेवत असेल तिने प्रामाणिकपणे स्वतःलाही असा प्रश्‍न करावा: ‘मी भरवशालायक आहे का? स्वतःकडून आणि इतरांकडून भरवशाच्या कोणत्या योग्य अपेक्षा मी कराव्यात?’

निश्‍चितच, भरवशालायक व्यक्‍ती सातत्याने सत्य बोलते. (इफिसकर ४:२५) आपला फायदा करून घेण्यासाठी ती लोकांना पाहून त्यानुसार बोलत नाही. शिवाय, भरवशालायक मनुष्याने एखादे वचन दिलेच तर ते पाळण्याचा तो आपल्या परीने होता होईल तितका प्रयत्न करील. (मत्तय ५:३७) भरवशालायक व्यक्‍तीला कोणी आपले गुपित सांगितले असेल तर तो त्यांचा विश्‍वासघात करत नाही आणि चहाडी करत नाही. विश्‍वसनीय मनुष्य आपल्या विवाहसोबत्याला विश्‍वासू राहतो. तो अश्‍लील साहित्य पाहत नाही, कामोत्तेजक कल्पनांत रमत नाही आणि इतर विरुद्धलिंगी व्यक्‍तींसोबत प्रणयचेष्टा करत नाही. (मत्तय ५:२७, २८) भरवशालायक मनुष्य स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी कष्ट करतो, इतरांचा फायदा उचलून परिश्रम न करता पैसा मिळवण्याचे मार्ग अवलंबत नाही. (१ तीमथ्य ५:८) हे उचित आणि शास्त्रवचनीय दर्जे लक्षात ठेवल्याने भरवशाच्या व्यक्‍तींना ओळखण्यास आपल्याला मदत मिळेल. शिवाय, आपणही याच दर्जांनुसार वागल्यास इतरांकरता आपण प्रत्येक जण भरवशालायक बनू.

अशा एका जगात राहणे किती आनंदविणारे असते जेथे सगळे लोक भरवशालायक असते आणि विश्‍वासघाताचे प्रकार घडले नसते! ही केवळ एक कल्पना आहे का? बायबलमधील अभिवचनाची दखल घेणाऱ्‍यांकरता ही एक कल्पना नाही कारण देवाचे वचन एका सुंदर ‘नवीन पृथ्वीविषयी’ भाकीत करते ज्यात फसवाफसवी, लबाडी, गैरफायदा घेण्याचे प्रकार होणार नाहीत आणि दुःख, आजारपण व मृत्यू देखील त्यात नसतील! (२ पेत्र ३:१३; स्तोत्र ३७:११, २९; प्रकटीकरण २१:३-५) या प्रत्याशेविषयी अधिक जाणून घेणे फायद्याचे ठरणार नाही का? यहोवाचे साक्षीदार आनंदाने तुम्हाला याविषयी आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर अधिक माहिती देतील.

[४ पानांवरील चित्र]

बेभरवशाच्या प्रवृत्तीमुळे आपला आनंद हिरावला जातो

[५ पानांवरील चित्र]

यहोवा सर्वात भरवशालायक व्यक्‍ती आहे

[७ पानांवरील चित्र]

परस्पर भरवशावर आधारित नातेसंबंधांची आपल्या सर्वांना गरज आहे