व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ज्यांनी यहोवाचे हृदय संतोषविले अशा स्त्रिया

ज्यांनी यहोवाचे हृदय संतोषविले अशा स्त्रिया

ज्यांनी यहोवाचे हृदय संतोषविले अशा स्त्रिया

“परमेश्‍वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. . . . तो तुला पुरे पारितोषिक देवो.”—रूथ २:१२.

१, २. ज्या स्त्रियांनी यहोवाचे हृदय संतोषविले त्यांच्या बायबलमधील उदाहरणांवर विचार केल्यामुळे आपल्याला काय फायदा होऊ शकतो?

देवाच्या भयाने दोन स्त्रियांना एका फारोची आज्ञा धुडकावून लावण्यास प्रवृत्त केले. एका वेश्‍येच्या विश्‍वासाने तिला दोन इस्राएली हेरांना शरण देण्यास प्रेरित केले. सुज्ञता व नम्रता यांसारख्या गुणांमुळे एका स्त्रीला संकटप्रसंगी अनेकांचे जीव वाचवणे व यहोवाच्या अभिषिक्‍ताला रक्‍तदोषी होण्यापासून वाचवणे शक्य झाले. यहोवा देवावर विश्‍वास व अतिथीप्रियतेचा गुण असल्यामुळे, विधवा व माता असलेली एक स्त्री आपल्याजवळ शेवटची उरलेली अन्‍नसामग्री देवाच्या संदेष्ट्याला देण्यास प्रवृत्त झाली. यहोवाचे हृदय संतोषविणाऱ्‍या स्त्रियांच्या शास्त्रवचनांतील उदाहरणांपैकी ही केवळ काही उदाहरणे आहेत.

या स्त्रियांबद्दल यहोवाचा दृष्टिकोन आणि त्यांना त्याने जे आशीर्वाद दिलेत त्यांवरून हेच स्पष्ट होते की यहोवा एका व्यक्‍तीच्या आध्यात्मिक गुणांनी सर्वात जास्त संतुष्ट होतो, मग ती स्त्री असो वा पुरुष. ऐहिक गोष्टींच्या आकर्षणाने झपाटलेल्या या जगात, स्वतःच्या आध्यात्मिकतेला प्राधान्य देणे एक आव्हान आहे. पण देवाच्या लोकांपैकी एक मोठा भाग असलेल्या लाखो स्त्रियांच्या उदाहरणावरून दिसून येते त्याप्रमाणे हे आव्हान पेलणे शक्य आहे. या ख्रिस्ती स्त्रिया बायबलमध्ये उल्लेख केलेल्या देवभीरू स्त्रियांच्या विश्‍वासाचे, सुज्ञतेचे, अतिथीप्रियतेचे आणि इतर सुरेख गुणांचे अनुकरण करतात. अर्थात, प्राचीन काळातील स्त्रियांच्या या चांगल्या गुणांचे अनुकरण पुरुषांनीही केले पाहिजे. आपण हे अधिक परिपूर्णरित्या कसे करू शकतो हे पाहण्याकरता सुरवातीला उल्लेख केलेल्या स्त्रियांबद्दलच्या बायबलमधील वृत्तान्तांची आपण अधिक सविस्तर चर्चा करू या.—रोमकर १५:४; याकोब ४:८.

एका फारोला धुडकावणाऱ्‍या स्त्रिया

३, ४. (अ) फारोने प्रत्येक नवजात इस्राएल मुलग्याला जिवे मारण्याचा हुकूम दिला असताना, शिप्रा व पुवाने त्याचे उल्लंघन का केले? (ब) या दोन सुइणींनी धैर्याने व देवाचे भय बाळगून कार्य केल्यामुळे यहोवाने त्यांना कशाप्रकारे आशीर्वादित केले?

दुसऱ्‍या महायुद्धानंतर जर्मनीत न्युरेमबर्ग येथे लाखो लोकांच्या हत्येचा आरोप असलेल्या गुन्हेगारांवर खटला सुरू असताना त्यांनी केवळ असे म्हणून स्वतःला निर्दोष स्थापित करण्याचा प्रयत्न केला, की आम्ही वरिष्ठांच्या आज्ञेनुसार काम केले. आता या लोकांची तुलना प्राचीन ईजिप्तमध्ये राहणाऱ्‍या दोन इस्राएली सुइणी, शिप्रा व पुवा यांच्याशी करा. ज्या फारोच्या राज्याखाली त्या राहात होत्या त्याचे नाव दिलेले नाही; पण तो अतिशय क्रूर होता. इब्री लोकांची लोकसंख्या वाढत चालली आहे हे पाहून तो घाबरला आणि त्याने या दोन सुइणींना हुकूम दिला की जन्माला येणाऱ्‍या प्रत्येक इब्री मुलाला ठार मारले जावे. या दुष्ट आज्ञेला या स्त्रियांनी कसा प्रतिसाद दिला? “त्यांनी मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे न करिता मुलगेहि जिवंत राहू दिले.” (तिरपे वळण आमचे.) या स्त्रिया मनुष्याच्या भयाला बळी का पडल्या नाहीत? कारण त्या “देवाचे भय बाळगणाऱ्‍या होत्या.”—निर्गम १:१५, १७; उत्पत्ति ९:६.

होय, या दोन सुइणींनी यहोवाला आपला आश्रय मानले होते आणि फारोच्या क्रोधापासून त्या दोघींचे रक्षण करण्याद्वारे तो खरोखरच त्यांच्याकरता “ढाल” ठरला. (२ शमुवेल २२:३१; निर्गम १:१८-२०) पण यहोवाचा आशीर्वाद एवढ्यावरच थांबला नाही. त्याने शिप्रा व पुवा यांना स्वतःची कुटुंबे देऊन आशीर्वादित केले. शिवाय, त्या फारोचे नाव काळाच्या ओघात लुप्त झाले असले तरीसुद्धा या दोन स्त्रियांची नावे व त्यांची कृत्ये यांविषयी आपल्या प्रेरित वचनात लिहून ठेवण्याद्वारे देवाने त्यांना सन्मानित केले.—निर्गम १:२१; १ शमुवेल २:३०ब; नीतिसूत्रे १०:७.

५. आज अनेक ख्रिस्ती स्त्रिया शिप्रा व पुवा यांच्यासारखीच मनोवृत्ती कशाप्रकारे दाखवत आहेत आणि यहोवा त्यांना कशाप्रकारे प्रतिफळ देईल?

आज शिप्रा व पुवासारख्या स्त्रिया आहेत का? होय निश्‍चितच आहेत! दरवर्षी अशा हजारो स्त्रिया अशा देशांमध्ये बायबलमधील जीवनदायक संदेश निर्भयतेने घोषित करत आहेत जेथे ‘राजाच्या आज्ञेनुसार’ तो घोषित करण्याची मनाई आहे. अशारितीने त्या आपले स्वातंत्र्य, इतकेच नव्हे तर आपला जीव देखील धोक्यात घालतात. (इब्री लोकांस ११:२३; प्रेषितांची कृत्ये ५:२८, २९) देवाबद्दल व शेजाऱ्‍याबद्दल असलेल्या प्रीतीने प्रेरित होऊन या धैर्यवान स्त्रिया कोणाचीही तमा न बाळगता देवाच्या राज्याची सुवार्ता दुसऱ्‍यांना सांगतात. त्यामुळे अनेक ख्रिस्ती स्त्रियांना विरोध व छळ सहन करावा लागतो. (मार्क १२:३०, ३१; १३:९-१३) शिप्रा व पुवा यांच्याबाबतीत झाले त्याप्रमाणे, यहोवाला या उत्कृष्ट, धैर्यवान स्त्रियांच्या कृत्यांची पूर्ण जाणीव आहे आणि त्या शेवटपर्यंत विश्‍वासू राहिल्यात तर त्यांची नावे “जीवनाच्या पुस्तकात” लिहून ठेवण्याद्वारे यहोवा त्यांच्याविषयी आपली प्रीती व्यक्‍त करेल.—फिलिप्पैकर ४:३; मत्तय २४:१३.

पूर्वीची एक वेश्‍या यहोवाचे हृदय संतोषविते

६, ७. (अ) राहाबला यहोवा व त्याच्या लोकांविषयी काय माहीत होते आणि या माहितीचा तिच्यावर कसा परिणाम झाला? (ब) देवाच्या वचनात कशाप्रकारे राहाबला सन्मानित केले आहे?

सा.यु.पू. १४७३ साली यरीहो नावाच्या कनानी शहरात राहाब नावाची एक वेश्‍या राहात होती. राहाब ही एक ज्ञानी स्त्री होती. दोन इस्राएली हेर तिच्या घरात लपण्याकरता आले तेव्हा ती तब्बल चाळीस वर्षांपूर्वी घडलेल्या ईजिप्तमधून इस्राएलाच्या निर्गमनाविषयी बारीक तपशीलासह सर्व घटना त्यांना वर्णन करून सांगू शकली! शिवाय अलीकडेच इस्राएलने अमोरी राजा सिहोन व ओग यांना कसे पराभूत केले होते त्याविषयीही तिला माहीत होते. या ज्ञानामुळे तिच्यावर कसा परिणाम झाला याकडे लक्ष द्या. त्या हेरांना ती म्हणाली: “परमेश्‍वराने हा देश तुम्हाला दिला आहे, . . . हे मला ठाऊक आहे, . . . कारण तुमचा देव परमेश्‍वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.” (यहोशवा २:१, ९-११) यहोवाबद्दल व त्याच्या कृत्यांबद्दल राहाबला जे समजले होते, त्यामुळे तिच्या अंतःकरणावर परिणाम झाला आणि त्यामुळे ती त्याच्यावर विश्‍वास ठेवू लागली.—रोमकर १०:१०.

राहाबच्या विश्‍वासाने तिला कृती करण्यास प्रेरित केले. तिने इस्राएली हेरांचे “स्नेहभावाने” स्वागत केले आणि इस्राएलने यरीहोवर हल्ला केला तेव्हा तिने त्यांच्या सूचनांचे पालन केले ज्यामुळे तिचा जीव वाचला. (इब्री लोकांस ११:३१; यहोशवा २:१८-२१) राहाबने विश्‍वासायोगे जी कार्ये केली त्यामुळे यहोवाचे हृदय आनंदित झाले यात काही शंका नाही कारण त्याने ख्रिस्ती शिष्य याकोबाला तिचे नाव देवाचा मित्र, अब्राहाम याच्या शेजारी, ख्रिस्ती लोकांकरता उदाहरणादाखल लिहून ठेवण्यास प्रेरित केले. याकोबाने लिहिले: “तसेच राहाब वेश्‍या हिने देखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्‍या वाटेने लावून दिले; ह्‍यांत ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय?”—याकोब २:२५.

८. यहोवाने राहाबला तिच्या विश्‍वासाबद्दल व आज्ञाधारकतेबद्दल कशाप्रकारे आशीर्वादित केले?

यहोवाने राहाबला अनेक मार्गांनी आशीर्वादित केले. एकतर त्याने तिला आणि तिच्या घरात आश्रय घेतलेल्यांना—अर्थात ‘तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते त्या सर्वांना’ वाचवले. मग त्याने त्यांना “इस्राएल लोकांमध्ये” वस्ती करण्यास परवानगी दिली, जेथे इस्राएल लोकांना त्यांच्याशी स्वदेशी लोकांसारखाच व्यवहार करण्यास सांगण्यात आले होते. (यहोशवा २:१३; ६:२२-२५; लेवीय १९:३३, ३४) एवढेच नव्हे तर, यहोवाने राहाबला येशू ख्रिस्ताची पूर्वज होण्याचा सन्मान देखील बहाल केला. एकेकाळी मूर्तिपूजक कनानी असलेल्या एका स्त्रीला यहोवाने किती चमत्कारिक रितीने प्रेमदया दाखवली! *स्तोत्र १३०:३, ४.

९. राहाब व पहिल्या शतकातील काही ख्रिस्ती स्त्रियांबद्दल यहोवाच्या मनोवृत्तीमुळे आज काही स्त्रियांना कशाप्रकारे प्रोत्साहन मिळू शकते?

राहाबप्रमाणे पहिल्या शतकापासून आजपर्यंत काही ख्रिस्ती स्त्रियांनी देवाला संतोषविण्यासाठी आपल्या अनैतिक जीवनाचा त्याग केला आहे. (१ करिंथकर ६:९-११) त्यांच्यापैकी काहीजणी साहजिकच प्राचीन कनानसारख्याच वातावरणात लहानाच्या मोठ्या झाल्या असतील, जेथे अनैतिकता सर्रास चालत होती, किंबहुना सामान्य समजली जात होती. तरीसुद्धा, शास्त्रवचनांतील अचूक ज्ञानाच्या आधारावर निर्माण झालेल्या विश्‍वासायोगे या स्त्रियांनी आपले मार्ग बदलले आहेत. (रोमकर १०:१७) त्यामुळे अशा स्त्रियांबद्दल असे म्हणता येते की “आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला त्यांची लाज वाटत नाही.” (इब्री लोकांस ११:१६) हा किती मोठा सन्मान आहे!

सुज्ञतेने वागल्यामुळे आशीर्वादित

१०, ११. नाबाल व दावीद यांच्या संदर्भात घडलेल्या कोणत्या घटनांमुळे अबीगईल विशिष्ट पावले उचलण्यास प्रवृत्त होते?

१० प्राचीन काळातील अनेक विश्‍वासू स्त्रियांनी असाधारण मार्गाने सुज्ञतेचा गुण दाखवला आणि यामुळे यहोवाच्या लोकांकरता त्या अतिशय मोलवान ठरल्या. अशा स्त्रियांपैकी एक होती अबीगईल. ती नाबाल नावाच्या एका श्रीमंत इस्राएली मातबराची पत्नी होती. अबीगईलच्या शहाणपणामुळे अनेकांचे जीव वाचले आणि इस्राएलचा भावी राजा दावीद याच्यावर रक्‍तदोष येण्यापासून टळला. १ शमुवेल अध्याय २५ यातील अहवालात आपण अबीगईलविषयी वाचू शकतो.

११ दावीद व त्याच्या माणसांनी नाबालाच्या कळपांशेजारी तळ ठोकला आहे. ते नाबालाला आपला इस्राएली बंधू समजून त्याच्या कळपांचे रात्रंदिवस रक्षण करतात व तेसुद्धा मोबदला न घेता. पण दाविदाजवळची शिधासामुग्री संपू लागते तेव्हा मात्र तो आपल्या दहा तरुणांना नाबालाजवळ काही अन्‍न देण्याची विनंती करण्यासाठी पाठवतो. दाविदाच्या उपकाराची फेड करण्याची आणि यहोवाचा अभिषिक्‍त या नात्याने त्याचा सन्मान करण्याची ही नाबालाला खरे तर चांगली संधी मिळते. पण तो याच्या अगदी उलट करतो. रागाच्या भरात तो दाविदाचा अपमान करतो आणि त्या तरुणांना रिकाम्या हाती परत पाठवतो. दाविदाला हे कळते तेव्हा तो ४०० शस्त्रधारी माणसांना एकत्र करतो आणि सूड उगवण्यास निघतो. अबीगईलला तिच्या नवऱ्‍याने दिलेल्या कठोर उत्तराविषयी कळते आणि ती लगेच दाविदाची मनधरणी करण्यासाठी, भरपूर प्रमाणात अन्‍नसामुग्री पाठवण्याचे सुज्ञ पाऊल उचलते. मग ती स्वतः दाविदाला भेटण्यास निघते.—२-२० वचने.

१२, १३. (अ) अबीगईल कशाप्रकारे सुज्ञता आणि यहोवा व त्याच्या अभिषिक्‍त पुरुषाप्रती निष्ठा व्यक्‍त करते? (ब) घरी परतल्यावर अबीगईल काय करते आणि पुढे तिच्या जीवनात काय घडते?

१२ अबीगईल दाविदाला भेटते तेव्हा ती नम्रपणे त्याच्याकडे दयेची भीक मागते. यावरून तिला यहोवाच्या अभिषिक्‍ताबद्दल असलेला आदर दिसून येतो. ती म्हणते, “परमेश्‍वर खरोखर माझ्या स्वामींचे घराणे कायमचे वसवील; कारण माझे स्वामी परमेश्‍वराच्या लढाया लढत आहेत.” तसेच, परमेश्‍वर दाविदाला इस्राएलाचा अधिपति नेमील याबद्दलही ती विश्‍वास व्यक्‍त करते. (२८-३० वचने) यासोबतच, दावीदाने सूड उगवण्यापासून स्वतःला आवरले नाही तर त्याच्या हातून नाहक रक्‍तपात घडेल हे त्याला सांगण्याकरता पुरेसे धैर्य देखील ती एकवटते. (२६, ३१ वचने) अबीगईलेच्या नम्रतेमुळे, आदरपूर्वक व्यवहारामुळे आणि सुस्पष्ट विचारशक्‍तीमुळे दाविदाचे डोळे उघडतात. त्याच्या तोंडून हे उद्‌गार निघतात: “ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठविले तो इस्राएलाचा देव परमेश्‍वर धन्य! धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची! तू स्वतः धन्य! तू आज मला आपल्या हाताने रक्‍तपात करण्यापासून व सूड उगविण्यापासून आवरिले आहे!”—३२, ३३ वचने.

१३ माघारी परतल्यावर अबीगईल दाविदाला दिलेल्या भेटीसंबंधी आपल्या पतीला सांगण्यास जाते. पण तो ‘फार झिंगलेला’ असतो. म्हणून तो शुद्धीवर येईस्तोवर ती थांबते आणि मग त्याला सर्व हकीगत सांगते. नाबालाची काय प्रतिक्रिया असते? तो इतका सुन्‍न होतो की त्याला एकप्रकारचा पक्षाघात होतो. दहा दिवसांनी देवाकडून तडाका मिळाल्याने तो मृत्यू पावतो. दाविदाला नाबालाच्या मृत्यूविषयी कळते तेव्हा तो अबीगईलला लग्नाची मागणी घालतो. साहजिकच तिच्याविषयी त्याचे चांगले मत असते, शिवाय तो मनापासून तिचा आदरही करत असतो. अबीगईल दाविदाची मागणी स्वीकारते.—३४-४२ वचने.

तुम्ही अबीगईलचे अनुकरण करू शकता का?

१४. अबीगईलचे कोणते गुण आपण अधिक प्रमाणात संपादन करण्याची इच्छा धरू शकतो?

१४ तुम्ही स्त्री असो वा पुरुष, तुम्हाला अबीगईलमध्ये असे काही गुण दिसून येतात का जे तुम्ही अधिक प्रमाणात संपादन करू इच्छिता? कदाचित, कठीण परिस्थितीला तोंड देताना अधिक सुज्ञतेने वागण्याच्या बाबतीत प्रगती करण्याची तुमची इच्छा असेल. किंवा, इतरजण भावनांच्या आहारी जाऊन वागतात बोलतात तेव्हा स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवून शांतपणे बोलण्याची तुमची इच्छा असेल. असे असल्यास, या बाबतीत यहोवाला प्रार्थना करा. तो आश्‍वासन देतो की जे कोणी ‘विश्‍वासाने मागतील’ त्यांना तो सुज्ञता, सूक्ष्मदृष्टी आणि विचारशक्‍ती देईल.—याकोब १:५, ६; नीतिसूत्रे २:१-६, १०, ११.

१५. खासकरून कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ती स्त्रियांनी अबीगईलचे गुण दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे?

१५ सत्य न मानणारा आणि बायबल तत्त्वांची जराही कदर न करणारा पती असलेल्या स्त्रियांकरता तर हे चांगले गुण अधिकच महत्त्वाचे आहेत. कदाचित तुमचा पती अत्याधिक मद्यपान करत असेल. अशाप्रकारचे पुरुषही आपले मार्ग बदलतील अशी आपण आशा करू शकतो आणि पुष्कळांनी सहसा आपल्या पत्नींचे नम्र, आदरपूर्वक व निष्कलंक आचरण पाहून असे केलेही आहे.—१ पेत्र ३:१, २, ४.

१६. घरची परिस्थिती कशीही असो, पण एक ख्रिस्ती बहीण कशाप्रकारे दाखवू शकते की यहोवासोबतचा तिचा नातेसंबंध तिच्याकरता सर्वात महत्त्वाचा आहे?

१६ तुम्हाला घरात कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा यहोवा तुमच्या पाठीशी आहे हे कधीही विसरू नका. (१ पेत्र ३:१२) तेव्हा आध्यात्मिकरित्या स्वतःला बळकट करा. सुज्ञता व शांत मनोवृत्ती यांकरता प्रार्थना करा. तसेच, नियमित बायबल अभ्यास, प्रार्थना, मनन आणि सहख्रिस्ती बांधवांसोबत संगती करण्याद्वारे यहोवाच्या जवळ या. अबीगईलच्या पतीची आध्यात्मिक मनोवृत्ती नव्हती; पण यामुळे तिचे यहोवावरचे प्रेम व त्याच्या अभिषिक्‍त सेवकाप्रती तिची मनोवृत्ती यांवर विपरीत परिणाम झाला नाही. तिने धार्मिक तत्त्वांच्या आधारावर कृती केली. ज्या कुटुंबांत पती हा देवाचा उत्तम सेवक असतो त्या कुटुंबांतही, एक ख्रिस्ती पत्नी हे जाणते की स्वतःची आध्यात्मिकता वाढवण्याकरता व टिकवून ठेवण्याकरता तिला स्वतःला सतत मेहनत घ्यावी लागेल. तिच्या पतीला तिची आध्यात्मिक व भौतिक रितीनेही काळजी घेण्याची जबाबदारी आहे हे खरे आहे पण शेवटी काही झाले तरी, तिने “भीत व कापत आपले तारण साधून” घेतले पाहिजे.—फिलिप्पैकर २:१२; १ तीमथ्य ५:८.

तिला “संदेष्ट्याचे प्रतिफळ” मिळाले

१७, १८. (अ) सारफथच्या विधवेसमोर कोणती असामान्य विश्‍वासाची परीक्षा आली? (ब) त्या विधवेने एलीयाच्या विनंतीला कशाप्रकारे प्रतिसाद दिला आणि यहोवाने याबद्दल तिला कशाप्रकारे आशीर्वादित केले?

१७ संदेष्टा एलीयाच्या काळात एका गरीब विधवेची यहोवाने ज्याप्रकारे काळजी वाहिली त्यावरून हे दिसून येते की जे लोक स्वतःची शक्‍ती व साधने खर्च करून खऱ्‍या उपासनेला पाठिंबा देतात त्यांची यहोवा मनःपूर्वक कदर करतो. एलीयाच्या काळात दीर्घकाळपर्यंत चाललेल्या दुष्काळामुळे कित्येकांवर उपासमारीची वेळ आली. यांपैकी, एक विधवा आपल्या लहान मुलासोबत सारफथ येथे राहात होती. शेवटच्या वेळी खाता येईल एवढेच अन्‍न त्यांच्याजवळ उरले असताना त्यांच्याकडे एक पाहुणा आला. तो होता संदेष्टा एलीया. त्याने त्यांच्याकडे एक आगळीच विनंती केली. त्या स्त्रीच्या परिस्थितीची जाणीव असताना, त्याने तिच्याकडे उरलेले पीठ व तेल वापरून आपल्याकरता एक “लहानशी भाकर” भाजून आणण्यास तिला सांगितले. पण यासोबतच तो तिला म्हणाला: “इस्राएलाचा देव परमेश्‍वर म्हणतो, परमेश्‍वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टि करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही.”—१ राजे १७:८-१४.

१८ त्या विलक्षण विनंतीला तुम्ही कसा प्रतिसाद दिला असता? एलीया यहोवाचा संदेष्टा आहे हे ओळखून, सारफथच्या विधवेने “एलीयाच्या सांगण्याप्रमाणे केले.” यहोवाने तिच्या अतिथ्याबद्दल तिला कशाप्रकारे आशीर्वादित केले? तिने तिच्यासाठी, तिच्या मुलासाठी आणि संदेष्टा एलीयासाठी दुष्काळादरम्यान चमत्कारिकरित्या अन्‍न पुरवले. (१ राजे १७:१५, १६) होय, सारफथची विधवा इस्राएली नव्हती तरीसुद्धा यहोवाने तिला “संदेष्ट्याचे प्रतिफळ” दिले. (मत्तय १०:४१) तसेच, देवाच्या पुत्राने देखील त्याचे गाव नासरेथ येथील अविश्‍वासी लोकांना या विधवेचे उदाहरण देऊन तिला सन्मानित केले.—लूक ४:२४-२६.

१९. आज अनेक ख्रिस्ती स्त्रिया सारफथच्या विधवेची मनोवृत्ती कोणकोणत्या मार्गांनी दाखवतात आणि यहोवा त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

१९ आज अनेक ख्रिस्ती स्त्रिया सारफथच्या विधवेची मनोवृत्ती प्रदर्शित करतात. उदाहरणार्थ, दर आठवडी निःस्वार्थ मनोवृत्तीच्या या ख्रिस्ती बहिणी, त्यांच्यापैकी कित्येक जणी गरीब आहेत आणि त्यांना आपल्या कुटुंबांची काळजी घ्यावी लागते तरीसुद्धा प्रवासी पर्यवेक्षक व त्यांच्या पत्नींना त्या आतिथ्य दाखवतात. इतरजणी आपापल्या मंडळीतल्या पूर्णवेळेच्या सेवकांना आपल्या घरी जेवायला बोलवतात, गरजू लोकांना मदत करतात किंवा इतर मार्गांनी स्वतःची शक्‍ती व साधने राज्याच्या कार्याला पाठिंबा देण्याकरता खर्च करतात. (लूक २१:४) यहोवा त्यांच्या या त्यागाची दखल घेतो का? निश्‍चितच! “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.

२०. पुढच्या लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

२० पहिल्या शतकात, कित्येक देवभीरू स्त्रियांना येशू व त्याच्या प्रेषितांची सेवा करण्याचा बहुमान मिळाला. त्यांनी कशाप्रकारे यहोवाला संतोषविले आणि आधुनिक काळातील स्त्रिया कशाप्रकारे यहोवाची मनोभावे सेवा करत आहेत याविषयी आपण पुढच्या लेखात चर्चा करू.

[तळटीपा]

^ परि. 8 मत्तयाने लिहिलेल्या येशूच्या वंशावळीत चार स्त्रियांचा उल्लेख आढळतो—तामार, राहाब, रूथ व मरीया. या सर्वांचा देवाच्या वचनात आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे.—मत्तय १:३, ५, १६.

उजळणी

• खालील स्त्रियांनी कशाप्रकारे यहोवाचे हृदय संतोषविले?

• शिप्रा व पुवा

• राहाब

• अबीगईल

• सारफथची विधवा

• या स्त्रियांच्या उदाहरणांवर मनन केल्याने आपल्याला कोणता वैयक्‍तिक फायदा होऊ शकतो? उदाहरणासहित सांगा.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्रे]

अनेक विश्‍वासू स्त्रियांनी ‘राजाचा हुकूम’ न जुमानता देवाची सेवा केली आहे

[१० पानांवरील चित्र]

विश्‍वास धरणाऱ्‍यांपैकी राहाब एक उत्तम उदाहरण का आहे?

[१० पानांवरील चित्र]

अबीगईलने दाखवलेल्या कोणत्या गुणांचे तुम्हाला अनुकरण करावेसे वाटते?

[१२ पानांवरील चित्र]

आज अनेक ख्रिस्ती स्त्रिया सारफथच्या विधवेची मनोवृत्ती प्रदर्शित करतात