तरुणपणापासून यहोवाने शिकवले
जीवन कथा
तरुणपणापासून यहोवाने शिकवले
रिचर्ड एब्रहॅमसन यांच्याद्वारे कथित
“हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.” स्तोत्र ७१:१७ येथील हे शब्द माझ्याकरता इतके अर्थपूर्ण का आहेत याविषयी तुम्हाला सांगतो.
माझी आई, फॅनी एब्रहॅमसन हिला १९२४ साली बायबल विद्यार्थी येऊन भेटले. त्या काळी यहोवाच्या साक्षीदारांना याच नावाने ओळखले जात होते. तेव्हा मी अवघ्या एक वर्षाचा होतो. आईला बायबलमधील सत्ये कळू लागली तसतशी ती लगबगीने आपल्या शेजाऱ्यांकडे जाऊन त्यांना त्यांविषयी सांगायची. शिवाय, मला व माझ्या थोरल्या भावाला व बहिणीला देखील ती शिकवीत. मला वाचताही येत नव्हते तेव्हाच तिने देवाच्या राज्याच्या आशीर्वादांसंबंधी अनेक वचने माझ्याकडून तोंडपाठ करवून घेतली होती.
१९२० च्या दशकाच्या उत्तरार्धात संयुक्त संस्थानांच्या ओरेगॉन राज्यातील ला ग्रान्ड शहरात, जेथे माझा जन्म झाला व लहानपण गेले तेथे एक बायबल अभ्यास गट होता; या गटात काही स्त्रिया व लहान मुले होती. आमच्या जवळपास कोणतीच मंडळी नसली तरीसुद्धा वर्षातून एकदा किंवा दोनदा प्रवासी सेवक आम्हाला भेट देत. या प्रवासी सेवकांना त्या काळी पिलग्रिम्स म्हणत. ते अतिशय प्रोत्साहनदायक भाषणे देत, घरोघरच्या सेवेत आमच्याबरोबर कार्य करत आणि मुलांकडे विशेषतः खूप प्रेमाने लक्ष देत. आम्हाला विशेष प्रिय असणाऱ्या या प्रवासी सेवकांमध्ये शील्ड टूटजिआन, जीन ऑरेल आणि जॉन बूथ हे होते.
कोलंबस, ओहायो येथे १९३१ साली झालेल्या अधिवेशनात बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले. आमच्या गटातून त्या अधिवेशनाला कोणीही जाऊ शकले नाहीत. पण ज्या मंडळ्या (त्या काळी मंडळ्यांना कंपनी म्हणत) व एकाकी गट त्या अधिवेशनाला जाऊ शकले नाहीत त्यांनी ऑगस्ट महिन्यात स्थानिक सभा भरवून हे नाव स्वीकारण्याचा
ठराव निश्चित केला. आमच्या ला ग्रान्डच्या लहानशा गटानेही असेच केले. मग १९३३ साली द क्राइसिस नावाची पुस्तिका वाटप मोहीम आयोजित करण्यात आली तेव्हा मला आठवते की मी एक बायबल संदेश पाठ केला, आणि पहिल्यांदा घरोघरच्या सेवेत एकट्यानेच साक्षकार्य केले.एकोणीसशे तीसच्या दशकादरम्यान आपल्या कार्याला अधिकाधिक विरोध होऊ लागला. याला तोंड देण्याकरता मंडळ्यांचे (कंपन्या) गट पाडण्यात आले व या गटांना डिव्हिजन्स म्हणत. हे गट लहान सभा भरवून, वर्षातून एक किंवा दोन वेळा प्रचार मोहिमा (डिव्हिजनल कॅम्पेन्स) आयोजित करत. या सभांतून आम्हाला प्रचार करण्याच्या विविध पद्धतींविषयी शिकवले जात असे व पोलिस किंवा इतरांनी कार्यात व्यत्यय आणल्यास त्यांच्याशी आदरपूर्वक कशाप्रकारे व्यवहार करायचा हे दाखवले जात असे. त्या काळी साक्षीदारांना कित्येकदा पोलिस न्यायाधीशांपुढे किंवा नेहमीच्या न्यायालयापुढे नेले जायचे; त्यामुळे ऑर्डर ऑफ ट्रायल या विशेष सूचना पत्रकातील साहित्य या अधिकाऱ्यांपुढे सादर करण्याचा सराव देखील आम्ही करत असू. अशारितीने आम्हाला विरोधाला तोंड देण्याकरता खरोखर सुसज्ज करण्यात आले.
बायबल सत्याची वाढ होऊ लागते
बायबल सत्यांविषयी आणि देवाच्या स्वर्गीय राज्याखाली पृथ्वीवर सदैव जगण्याच्या बायबल आधारित आशेविषयी माझे ज्ञान व कदर दिवसेंदिवस वाढत होती. त्या काळी ज्यांना ख्रिस्तासोबत स्वर्गात राज्य करण्याची आशा नव्हती अशांना बाप्तिस्मा घेण्याचे फार प्रोत्साहन दिले जात नव्हते. (प्रकटीकरण ५:१०; १४:१, ३) पण मला सांगण्यात आले होते की जर मी मनोमन यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला असेल तर बाप्तिस्मा घेणे योग्य ठरेल. त्यामुळे १९३३ साली ऑगस्ट महिन्यात माझा बाप्तिस्मा झाला.
मी १२ वर्षांचा असताना माझ्या शिक्षिकेला माझ्या जाहीर वक्तृत्वाचे खूप कौतुक वाटायचे, त्यामुळे मला याचे अधिक प्रशिक्षण देण्याचा तिने आईला आग्रह केला. आईला वाटले की यामुळे मला यहोवाची अधिक चांगल्याप्रकारे सेवा करण्यास मदत होईल. म्हणून तिने माझ्याकरता शिकवणी लावली आणि मोबदला म्हणून वर्षभर शिक्षकाच्या घरी कपडे धुण्याचे काम केले. या प्रशिक्षणामुळे माझ्या सेवाकार्यात मला खूप मदत झाली. पण मी १४ वर्षांचा असताना मला सांधेदुखीचा ताप आला आणि त्या आजारपणामुळे माझे एक वर्ष वाया गेले.
एकोणीसशे एकोणचाळीस साली वॉरन हेन्शल नावाचे एक पूर्णवेळेचे सेवक आमच्या क्षेत्रात आले. * आध्यात्मिक दृष्टीने ते मला मोठ्या भावासारखे होते; सहसा ते मला दिवसभर क्षेत्र सेवाकार्य करण्यासाठी आपल्यासोबत घेऊन जात. लवकरच त्यांनी मला वेकेशन पायनियर सेवा सुरू करण्यास मदत केली; हा पूर्णवेळेच्या सेवाचा एक तात्पुरता प्रकार होता. त्या उन्हाळ्यात आमच्या गटाचे एक कंपनी म्हणून संघटन करण्यात आले. वॉरन यांना कंपनी सर्व्हंट म्हणून आणि मला टेहळणी बुरूज अभ्यास संचालक म्हणून नेमण्यात आले. वॉरन बेथेल, अर्थात न्यूयार्क, ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालयात सेवा करण्याकरता निघून गेले तेव्हा मी कंपनी सर्व्हंट झालो.
पूर्णवेळेच्या सेवाकार्याला सुरवात
कंपनी सर्व्हंट म्हणून सेवा करण्याच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे नियमित पूर्णवेळेच्या सेवेत उतरण्याची माझी इच्छा अधिक बळावली आणि उच्च माध्यमिक शाळेचे तिसरे वर्ष संपल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी मी ही इच्छा पूर्ण केली. माझे वडील आमच्या धार्मिक विश्वासांत सहभागी नव्हते पण ते कुटुंबाची चांगली काळजी घ्यायचे आणि जीवनात ते उच्च नैतिक तत्त्वांचे पालन करत होते. मी महाविद्यालयीन शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांनी मला स्पष्ट सांगितले की स्वतःच्या
राहण्याची व जेवण्याखाण्याची सोय करण्यास जर मी तयार असेन तर वाटेल तो मार्ग मी निवडू शकतो. त्यामुळे, सप्टेंबर १, १९४० रोजी मी पायनियर सेवेला सुरवात केली.मी घर सोडले तेव्हा, निरोप देताना आईने मला नीतिसूत्रे ३:५, ६ वाचायला लावले: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” आणि खरोखर मी माझे जीवन कायमचे यहोवाच्या हातात सोपवून दिल्यामुळे मला खूप मदत झाली आहे.
काही काळातच मी वॉशिंग्टन राज्याच्या उत्तर केंद्रिय भागात ज्यो व मार्गरेट हार्ट यांच्यासोबत सेवाकार्य करू लागलो. हे क्षेत्र वैविध्यपूर्ण होते—गुरेढोरे पोसण्याची मोठी राने, मेंढरांचे संगोपन मळे, इंडियन जमातीच्या लोकांची आरक्षित क्षेत्रे तसेच अनेक छोटी छोटी गावे व खेडी या क्षेत्रात होती. १९४१ सालच्या वसंत ऋतूत, मला वॉशिंग्टन राज्यातील वनॅची मंडळीत कंपनी सर्व्हंट म्हणून नेमण्यात आले.
वॉशिंग्टनमध्येच, वाला वाला येथे झालेल्या एका संमेलनात मी अटेन्डंटचे काम करत होतो आणि सभागृहात येणाऱ्यांचे स्वागत करत होतो. तेवढ्यात मला एक तरुण बांधव लाउडस्पीकर लावण्याचा प्रयत्न करताना दिसला; त्याला ते जमेना. तेव्हा मी त्याला माझे काम बघण्यास सांगितले आणि मी त्याचे काम करेन असे सुचवले. विभागीय सेवक ॲल्बर्ट हॉफमन परत आले आणि मी माझे काम सोडून त्याचे काम करत आहे हे त्यांनी पाहिले, तेव्हा त्यांनी प्रेमळपणे मला समजावून सांगितले की जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत आपल्याला नेमून दिलेले काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी दिलेला तो सल्ला मी आजपर्यंत आठवणीत ठेवला आहे.
१९४१ सालच्या ऑगस्ट महिन्यात यहोवाच्या साक्षीदारांनी मिसूरी राज्यातील सेंट लुई शहरात एक भव्य अधिवेशन आयोजित केले होते. हार्ट दांपत्याने त्यांच्या पिकअप ट्रकच्या मागे कव्हर लावले आणि बाके बसवली आणि आम्ही नऊ पायनियरांनी मिळून तो २,४०० किलोमीटरचा प्रवास त्यांच्या ट्रकने केला. जायला एक व परत यायला एक आठवडा लागला. अधिवेशनात, पोलिसांच्या अंदाजानुसार १,१५,००० इतकी सर्वाधिक उपस्थिती होती. कदाचित उपस्थिती त्यापेक्षा कमी असावी पण त्या वेळी संयुक्त संस्थानांत असलेल्या जवळजवळ ६५,००० साक्षीदारांपेक्षा ती जास्तच होती. हे अधिवेशन आध्यात्मिकरित्या निश्चितच अत्यंत उभारणीकारक ठरले.
ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा
वनॅची येथे परतल्यावर मला एक पत्र मिळाले ज्यात मला ब्रुकलिन बेथेलला येण्यास सांगण्यात आले होते. ऑक्टोबर २७, १९४१ रोजी मी तेथे पोचलो तेव्हा मला नेथन एच. नॉर यांच्या कार्यालयात नेण्यात आले. ते फॅक्टरी ओव्हरसियर म्हणून कार्य करत होते. त्यांनी मला बेथेलच्या जीवनाविषयी काही माहिती दिली आणि येथे तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सदोदित यहोवासोबत एक निकटचा संबंध ठेवणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. मग मला शिपिंग विभागात नेण्यात आले आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यासाठी प्रकाशने भरलेली कार्टन्स बांधण्याचे काम देण्यात आले.
जानेवारी ८, १९४२ रोजी जोसफ रुदरफोर्ड, जे त्या काळी यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याची देखरेख करत होते, ते मरण पावले. पाच दिवसांनी संस्थेच्या संचालकांनी बंधू नॉर यांना त्यांचे उत्तराधिकारी होण्याकरता निवडले. संस्थेचे सेक्रेटरी-ट्रेझरर म्हणून अनेक वर्षांपासून कार्य करणाऱ्या डब्ल्यु. ई. व्हॅन ॲम्बर्ग यांनी बेथेल कुटुंबाला याची घोषणा केली तेव्हा ते म्हणाले: “चार्ल्स टी. रस्सल यांचा मृत्यू [१९१६ साली] झाल्यावर जे. एफ. रुदरफोर्ड यांनी सुत्रे हाती घेतली तेव्हाचा काळ मला आठवतो. प्रभूने त्याच्या कार्याचे पुढेही नेतृत्व केले
व त्याची भरभराट केली. आता मला पूर्ण भरवसा आहे की नेथन एच. नॉर यांनी अध्यक्षपद हाती घेतल्यानंतरही कार्य उत्तरोत्तर वाढतच जाईल कारण हे कोणा मानवाचे नव्हे, तर प्रभूचे कार्य आहे.”फेब्रुवारी १९४२ मध्ये “ईश्वरशासित सेवाकार्याचा सुधारित अभ्यासक्रम” सुरू करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. हा कोर्स बेथेल सदस्यांना बायबलच्या विषयांवर संशोधन करण्यात, साहित्याचे वर्गीकरण करण्यात व ते प्रभावीपणे सादर करण्यात अधिक वाकबगार होण्यास प्रशिक्षित करण्याकरता तयार करण्यात आला होता. मला पूर्वी जाहीर वक्तृत्वाचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे या कार्यक्रमात जलद प्रगती करता आली.
लवकरच मला सर्व्हिस विभागात काम करण्यास नेमण्यात आले; हा विभाग संयुक्त संस्थानांतील साक्षीदारांच्या सेवाकार्याची देखरेख करतो. त्याच वर्षी, नंतर साक्षीदारांच्या कंपन्यांना काही सेवकांनी भेटी देण्याचा कार्यक्रम नव्याने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रवासी सेवक ज्यांना आधी बांधवांचे सेवक म्हटले जायचे, त्यांना कालांतराने विभागीय पर्यवेक्षक असे नाव पडले. १९४२ सालच्या उन्हाळ्यात अशा प्रकारच्या सेवेकरता बांधवांना प्रशिक्षित करण्यासाठी बेथेलमध्ये एका कोर्सची व्यवस्था करण्यात आली आणि हे प्रशिक्षण प्राप्त करण्याचा मलाही बहुमान मिळाला. प्रशिक्षकांपैकी एक स्वतः बंधू नॉर होते; त्यांनी सांगितलेला एक मुद्दा मला अजूनही जसाच्या तसा आठवतो, ते म्हणाले: “माणसांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करू नका. असे कराल तर कोणाचीही मर्जी तुम्हाला राखता येणार नाही. यहोवाची मर्जी राखा, कारण असे केल्याने यहोवावर प्रेम करणाऱ्या सर्वांची मर्जी तुम्हाला राखता येईल.”
प्रवासी कार्याची सुरवात ऑक्टोबर १९४२ मध्ये करण्यात आली. बेथेलमध्ये राहणारे आमच्यापैकी काहीजण आठवड्याच्या सुटीदरम्यान कधीकधी न्यूयॉर्क सिटीच्या ४०० किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या मंडळ्यांना भेटी द्यायचे. मंडळीच्या प्रचार कार्याच्या व सभांच्या उपस्थितीच्या अहवालांचे परीक्षण करणे, मंडळीत जबाबदार पदांवर असलेल्या बांधवांसोबत एक सभा घेणे, एक किंवा दोन भाषणे देणे आणि स्थानिक साक्षीदारांसोबत प्रचार कार्यात सहभागी होणे हे सर्व या भेटीत केले जायचे.
१९४४ साली सर्व्हिस विभागातून काहीजणांना सहा महिन्यांकरता प्रवासी कार्याकरता पाठवण्यात आले, त्यांच्यापैकी मी देखील होतो. डेलवेअर, मेरीलँड, पेन्सिलव्हानिया, आणि व्हर्जिनिया या विविध ठिकाणी मी प्रवासी सेवा केली. नंतर काही महिन्यांकरता कनेक्टिकट, मॅसचूसेट्स, आणि ऱ्होड आयलंड या मंडळ्यांना मी भेटी दिल्या. बेथेलला परतल्यानंतर, मी बंधू नॉर व त्यांचे सचीव मिल्टन हेन्शेल यांच्यासोबत पार्टटाईम काम केले; यामुळे मला आपल्या जागतिक कार्याविषयी बरीच माहिती मिळाली. तसेच डब्ल्यू. ई. व्हॅन ॲम्बर्ग आणि त्यांचे मदतनीस ग्रान्ट सूटर यांच्या देखरेखीखाली ट्रेझरी कार्यालयातही मी पार्टटाईम काम केले. नंतर १९४६ साली मला बेथेलच्या अनेक कार्यालयांचा पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले.
माझ्या जीवनातील मोठे बदल
१९४५ साली मंडळ्यांना भेटी देत असताना ऱ्होड आयलंड येथील प्रॉव्हिडंस शहरातील मंडळीत माझी ओळख जूलिया चारनॉस्कस हिच्याशी झाली. १९४७ साली आम्ही लग्न करण्याचा विचार केला. बेथेल सेवा मला मनापासून प्रिय होती, पण त्या काळी लग्न करून आपल्या सोबत्याला बेथेलमध्ये आणण्याची सोय नव्हती. त्यामुळे १९४८ साली जानेवारीत मी बेथेल सोडले आणि जूलिया (जूली) व मी विवाहबद्ध झालो. प्रॉव्हिडंस येथील एका सुपर मार्केटमध्ये मी पार्टटाईम नोकरी करू लागलो आणि आम्ही दोघांनी मिळून पायनियर सेवा सुरू केली.
सप्टेंबर १९४९ मध्ये मला वायव्येकडे असलेल्या विसकॉन्सिन येथे विभागीय कार्य करण्याकरता आमंत्रित करण्यात आले. दुग्धउत्पादनाचा व्यवसाय असलेल्या या लहान लहान नगरांत व ग्रामीण भागांत प्रचार करण्याचा अनुभव आम्हा दोघांकरता अगदी वेगळा होता. इथे हिवाळा बराच काळ चालायचा आणि थंडी खूप पडायची. काही वेळा तर अनेक आठवड्यांपर्यंत -२० डिग्री सेल्सियस तापमान राहायचे आणि सतत बर्फ पडायचा. आमच्याजवळ कार नव्हती. पण नेहमी कोणी न कोणी आम्हाला पुढच्या मंडळीपर्यंत गाडीने पोचवून द्यायचे.
मी विभागीय कार्याला सुरवात केल्यावर काही काळातच एक विभागीय संमेलन आयोजित करण्यात आले. मला आठवते, सर्वकाही व्यवस्थित पार पडावे म्हणून या संमेलनाच्या एकूण एक व्यवस्थेची मी बारकाईने तपासणी करत होतो; यामुळे काहीजण मला थोडे घाबरायचे. तेव्हा प्रांतीय पर्यवेक्षक निकलस कोव्हलॅक यांनी मला प्रेमाने समजावून सांगितले की स्थानिक बांधव बरीच कामे आपल्या पद्धतीने आजपर्यंत करत आले आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टीबद्दल मला काळजी
करण्याची खरे तर गरज नाही. हा सल्ला त्यानंतर अनेक नेमणुका पार पाडताना मला कामी पडला.१९५० साली मला एक तात्पुरती नेमणूक मिळाली—न्यू यॉर्क सिटी येथील यँकी स्टेडियममध्ये झालेल्या अनेक मोठ्या अधिवेशनांपैकी पहिल्याच अधिवेशनाला येणाऱ्या प्रतिनिधींच्या मुक्कामाची व्यवस्था करणे. हे अधिवेशन सुरवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत रोमांचक ठरले; अधिवेशनाला ६७ देशांचे प्रतिनिधी आले होते आणि सर्वोच्च उपस्थिती १,२३,७०७ इतकी होती! अधिवेशनानंतर जूली व मी आमचे प्रवासी कार्य पुन्हा सुरू केले. आम्ही विभागीय कार्यात आनंदी होतो. पण आम्हाला स्वतःला अधिक कार्यासाठी उपलब्ध करायचे होते. त्यामुळे दर वर्षी आम्ही बेथेल व मिशनरी सेवेकरता अर्ज भरत होतो. १९५२ साली आम्हाला वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या २० व्या वर्गाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. या प्रशालेतून आम्ही मिशनरी कार्याचे प्रशिक्षण घेतले.
परदेशात सेवा
१९५३ साली पदवीधर झाल्यानंतर आम्हाला ब्रिटनमध्ये सेवा करण्यास नेमण्यात आले; इंग्लंडच्या दक्षिणेकडे मी प्रांतीय कार्य करू लागलो. या कार्यात जूली व मी अत्यंत आनंदी होतो, पण येथे अजून एक वर्षही झाले नव्हते तोच आम्हाला डेन्मार्कला जाण्यास सांगण्यात आले; आम्हाला थोडे आश्चर्य वाटले. पण डेन्मार्कच्या शाखा दफ्तरात नवे पर्यवेक्षक नेमण्याची गरज होती. मी जवळच होतो आणि या कामाचे ब्रुकलिनमध्ये मला प्रशिक्षण मिळाले असल्यामुळे मला तेथे मदत करण्यास पाठवण्यात आले. आम्ही बोटीने नेदरलँड्सला गेलो आणि तेथून रेल्वेने कोपनहेगन, डेन्मार्क येथे ऑगस्ट ९, १९५४ रोजी आलो.
एक समस्या अशी होती, येथे जबाबदार पदांवर सेवा करणारे काही बांधव ब्रुकलिन मुख्यालयातून येणारे मार्गदर्शन स्वीकारण्यास तयार नव्हते. शिवाय, डेनिश भाषेत भाषांतर करणाऱ्या चार बांधवांपैकी तिघांनी बेथेल सोडले आणि नंतर यहोवाच्या साक्षीदारांसोबत त्यांनी संबंध तोडले. पण यहोवाने आमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले. दोन पायनियर, योअर्न व आना
लार्सन यांनी स्वतःला पूर्णवेळेच्या कामासाठी उपलब्ध केले; त्यांनी काही काळ पार्टटाईम भाषांतराचे काम केले होते. अशारितीने डेनिश भाषेत आपल्या मासिकांचे भाषांतर सुरू राहिले, एकही अंक कधी चुकला नाही. लार्सन दांपत्य अजूनही डेन्मार्क बेथेलमध्येच आहेत आणि योअर्न हे शाखा समितीचे संयोजक आहेत.त्या सुरवातीच्या वर्षांत बंधू नॉर यांच्या नियमित भेटी खरोखरच अत्यंत उत्तेजनदायक होत्या. ते प्रत्येकासोबत निवांत बसून बोलायचे, आणि समस्यांना कसे तोंड द्यावे यासंबंधी अतिशय उद्बोधक अनुभव सांगायचे. १९५५ साली त्यांच्या एका भेटीदरम्यान डेन्मार्ककरता नियतकालिके छापण्याकरता मुद्रणाची सुविधा असलेले नवे शाखा संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. कोपनहेगनच्या उत्तरेकडील एका उपनगरात जमीन घेण्यात आली आणि १९५७ सालच्या उन्हाळ्यात आम्ही एका नव्या इमारतीत राहायला गेलो. हॅरी जॉन्सन आपली पत्नी कॅरीन हिच्यासोबत गिलियड प्रशालेच्या २६ व्या वर्गातून पदवीधर होऊन नुकतेच डेन्मार्कला आले होते; त्यांनी आमचे मुद्रणालय सुरू करण्यात आम्हाला बरीच मदत केली.
डेन्मार्कमध्ये मोठी अधिवेशने अधिक चांगल्याप्रकारे संयोजित करण्याकरता पावले उचलण्यात आली; संयुक्त संस्थानांतील अधिवेशनांकरता कार्य करताना मला जो अनुभव मिळाला होता तो या करता अतिशय उपयोगी पडला. १९६१ साली कोपनहेगनमध्ये झालेल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात ३० वेगवेगळ्या देशांहून प्रतिनिधी आले होते. सर्वोच्च उपस्थिती ३३,५१३ होती. १९६९ साली पुन्हा आम्ही स्कॅन्डिनेव्हियामध्ये एक अधिवेशन भरवले; ४२,०७३ इतकी सर्वोच्च उपस्थिती असलेले हे अधिवेशन आजवरचे सर्वात मोठे अधिवेशन होते!
१९६३ साली मला गिलियडच्या ३८ व्या वर्गाला उपस्थित राहण्याकरता निमंत्रित करण्यात आले. हा खासकरून शाखा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याकरता थोडेबहुत फेरबदल करून तयार केलेला दहा महिन्यांचा कोर्स होता. यानिमित्ताने पुन्हा एकदा ब्रुकलिन बेथेल कुटुंबाला भेटायला मिळाल्याचा खूप आनंद झाला आणि जे अनेक वर्षांपासून मुख्यालयाच्या कार्याची देखरेख करीत होते त्यांचे अनुभव देखील अतिशय उद्बोधक ठरले.
या प्रशिक्षणानंतर मी पुन्हा डेन्मार्कला परतलो आणि तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळू लागलो. या सोबतच मला एक परिमंडल पर्यवेक्षक या नात्याने पश्चिम व उत्तर युरोपातील विविध शाखा दफ्तरांना भेटी देण्याची, तेथील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आणि आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता त्यांना मदत करण्याची सुसंधी मिळाली. अलीकडे मी या कार्यानिमित्ताने पश्चिम आफ्रिका आणि कॅरिबियन येथेही जाऊन आलो.
१९७० दशकाच्या उत्तरार्धात डेन्मार्कमध्ये बांधव भाषांतर व मुद्रण कार्याचा विस्तार करण्याकरता आणखी मोठे शाखा संकुल बांधण्याकरता नवीन ठिकाण शोधू लागले. कोपनहेगनपासून ६० किलोमीटर अंतरावर सर्व दृष्टीने उत्तम अशी जमीन पाहण्यात आली. मी देखील इतर बांधवांसोबत या नवीन संकुलाच्या योजना आखण्यात आणि इमारतींच्या डिझाइन्स तयार करण्याच्या कामात सहभाग घेतला. जूली व मी बेथेल कुटुंबासोबत या नव्या बेथेल गृहात जाऊन राहण्यास अतिशय उत्सुक होतो. पण तसे घडले नाही.
परत ब्रुकलिनला
नोव्हेंबर १९८० मध्ये मला व जूलीला ब्रुकलिनला येऊन बेथेलमध्ये सेवा करण्याकरता बोलावण्यात आले. १९८१ जानेवारी महिन्याच्या सुरवातीला आम्ही ब्रुकलिनला आलो. तेव्हा आम्ही दोघेही साठीच्या जवळपास आलो होतो आणि निम्मे आयुष्य डेन्मार्कच्या प्रिय बंधू भगिनींसोबत घालवल्यानंतर अचानक संयुक्त संस्थानांत परतणे आम्हाला अर्थातच सोपे गेले नाही. पण आमच्या आवडीनिवडींवर अधिक लक्ष न देता आम्ही आमच्यावर सोपवलेल्या कामाकडे आणि त्याच्याशी संबंधित आव्हानांकडे लक्ष केंद्रित केले.
आम्ही ब्रुकलिनला आलो आणि हळूहळू इथल्या जीवनाला रुळलो. जूलीला अकाउन्टिंग ऑफिसमध्ये काम देण्यात आले. डेन्मार्कमध्येही ती तेच करत होती. मला लेखन विभागात, आपल्या प्रकाशनांच्या विविध टप्प्यांची वेळापत्रके तयार करण्याकरता नेमण्यात आले. १९८० च्या सुरवातीला ब्रुकलिनच्या
कार्यपद्धतीत बरेच बदल झाले; टाइपराइटर्स आणि हॉट लेड टाइपसेटिंग बंद करून कंप्युटर प्रोसेसिंग आणि ऑफसेट प्रिंटिंग सुरू करण्यात आले. मला कंप्युटर्समधले काहीच कळत नव्हते पण संस्थेच्या कामकाजाविषयी मला माहिती होती, तसेच लोकांसोबत काम करण्याचा मला अनुभव होता.त्यानंतर काही काळातच, फुल कलर ऑफसेट प्रिंटिंग आणि रंगीत चित्रांचा वापर सुरू करण्यात आला तेव्हा आर्ट डिपार्टमेंटचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याची गरज भासली. कलेच्या क्षेत्रात मला अनुभव नसला तरीसुद्धा संघटनात्मकदृष्ट्या मी मदत करू शकत होतो. तेव्हा त्या विभागाची तब्बल नऊ वर्षे देखरेख करण्याचा बहुमान मला मिळाला.
१९९२ साली मला नियमन मंडळाच्या प्रकाशन समितीला मदत करण्याकरता नेमण्यात आले आणि त्यानंतर ट्रेझरी कार्यालयात माझी बदली झाली. येथे मी अजूनही यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याच्या आर्थिक बाबींच्या संबंधाने सेवा करत आहे.
तरुणपणापासून सेवा
तरुणपणापासून आजपर्यंत, ७० वर्षांच्या समर्पित सेवेदरम्यान यहोवाने त्याचे वचन बायबल याच्या माध्यमाने आणि त्याच्या अद्भुत संस्थेतील मदत करणाऱ्या बंधवांच्या साहाय्याने मला अतिशय सहनशीलपणे शिकवले आहे. पूर्णवेळेच्या सेवेत मी ६३ पेक्षा अधिक वर्षे घालवली आहेत आणि त्यांतील ५५ पेक्षा जास्त वर्षे माझी विश्वासू पत्नी जूली हिच्यासोबत घालवली आहेत. खरोखर मला यहोवाने विपुल आशीर्वाद दिले आहेत.
१९४० साली पायनियर सेवा करण्याकरता मी घर सोडले तेव्हा माझ्या वडिलांनी उपरोधाने म्हटले होते: “बेटा, हे काम करण्याकरता घर सोडताना असे समजू नको की तुला वाटेल तेव्हा मदतीसाठी तू इथे धावत येऊ शकतोस.” या सर्व वर्षांत मला एकदाही असे करावे लागले नाही. यहोवाने मोठ्या उदारतेने, आणि कधीकधी मदत करणाऱ्या सहख्रिस्ती बांधवांच्या माध्यमाने माझ्या सर्व गरजा पुरवल्या आहेत. कालांतराने माझे वडील आपल्या कार्याचा आदर करू लागले आणि १९७२ साली त्यांचा मृत्यू होण्याआधी त्यांनी बायबलचे सत्य शिकण्यात थोडीबहुत प्रगतीही केली होती. आईला स्वर्गीय जीवनाची आशा होती आणि तिने १९८५ साली तिचा मृत्यू होईस्तोवर, वयाच्या १०२ व्या वर्षापर्यंत यहोवाची विश्वासूपणे सेवा केली.
पूर्ण वेळेच्या सेवाकार्यात अनेकदा समस्या येतात; आमच्यासमोरही आल्या, पण जूली व मी कधीही पूर्णवेळेची सेवा सोडून देण्याचा विचार केला नाही. या निर्धाराला जडून राहताना यहोवानेही आम्हाला नेहमी सांभाळले आहे. माझे आईवडील वृद्ध होऊ लागले आणि त्यांना मदतीची गरज होती, तेव्हा माझी बहीण व्हिक्टोरिया मार्लिन स्वतःहून पुढे आली आणि तिने त्यांची मोठ्या प्रेमाने काळजी घेतली. तिच्या प्रेमळ साहाय्याबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत कारण त्यामुळेच आम्हाला पूर्णवेळेच्या सेवेत टिकून राहता आले आहे.
जूलीने आमच्या वेगवेगळ्या नेमणुका पार पाडताना सदैव मला पाठबळ दिले आहे; यहोवाला तिने केलेल्या समर्पणाचा हा भाग आहे या भावनेने तिने असे केले आहे. आज मी ८० वर्षांचा झालो आहे आणि बऱ्याच आरोग्यविषयक समस्यांना तोंड देत आहे; पण तरीसुद्धा यहोवाने मला भरपूर आशीर्वाद दिले आहेत असे मी समजतो. देवानेच आपल्याला तरुणपणापासून शिकवले आहे, असे घोषित केल्यावर स्तोत्रकर्त्याने जे म्हटले ते मला नेहमी प्रोत्साहित करते, त्याने अशी विनंती केली: “मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नको.”—स्तोत्र ७१:१७, १८.
[तळटीप]
^ परि. 12 वॉरन हे यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळात अनेक वर्षे सेवा करणाऱ्या मिल्टन हेन्शल यांचे थोरले बंधू होते.
[२० पानांवरील चित्र]
आईसोबत १९४० साली मी पायनियरींगला सुरवात केली तेव्हा
[२१ पानांवरील चित्र]
माझे पायनियर सोबती, ज्यो व मार्गरेट हार्ट
[२३ पानांवरील चित्र]
जानेवारी १९४८ साली आमच्या लग्नाच्या दिवशी
[२३ पानांवरील चित्र]
गिलियडच्या वर्गसोबत्यांबरोबर १९५३ साली. डावीकडून उजवीकडे: डॉन व व्हर्जिनिया वॉर्ड, हेरटुएडा स्टेहेंगा, जूली व मी
[२३ पानांवरील चित्र]
कोपनहेगन, डेन्मार्क येथे १९६१ साली फ्रेड्रिक डब्ल्यू. फ्रान्झ आणि नेथन एच. नॉर यांच्या सोबत
[२५ पानांवरील चित्र]
आता जूली सोबत