व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देण्याची प्रवृत्ती विकसित करा

देण्याची प्रवृत्ती विकसित करा

देण्याची प्रवृत्ती विकसित करा

देण्याची प्रवृत्ती कोणामध्येही जन्मापासून असत नाही. बाळाची नैसर्गिक प्रवृत्ती स्वतःच्या इच्छा आणि गरजा पूर्ण करण्याची असते, त्याची काळजी घेणाऱ्‍यांच्या हिताची ते पर्वा करत नाही. परंतु, कालांतराने बाळाला कळते की, जगात केवळ त्यालाच गरजा नसतात. इतरांचाही विचार केला पाहिजे आणि केवळ घेण्याची नव्हे तर देण्याची सवय देखील त्याला लावावी लागते. देण्याची प्रवृत्ती विकसित करावी लागते.

दान करणाऱ्‍या सगळ्या व्यक्‍तींमध्ये—अगदी उदारपणे दान करणाऱ्‍या व्यक्‍तींमध्ये देखील देण्याची प्रवृत्ती असते असे नाही. काहीजण आपला स्वार्थ साधण्याकरता एखाद्या संस्थेला देणगी देतील. इतरजण स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी मदत करतील. परंतु, खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे देणे वेगळ्या स्वरूपाचे आहे. तर मग, देवाच्या वचनात ज्या देण्याविषयी उत्तेजन दिले आहे त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांच्या देण्याच्या प्रथेविषयी आपण थोडा विचार केला तर आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर सापडेल.

ख्रिस्ती देण्याची उदाहरणे

बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे, ख्रिश्‍चनांचे देणे म्हणजे गरजवंतांना ‘दान करणे’ होते. (इब्री लोकांस १३:१६; रोमकर १५:२६) कोणाच्याही दबावाखाली येऊन दान करायचे नव्हते. प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ९:७) लोकांचे लक्ष आकर्षित करण्याकरताही दान करायचे नव्हते. हनन्या आणि सप्पीरा यांनी असे ढोंग रचले आणि त्याची भारी किंमत त्यांना द्यावी लागली.—प्रेषितांची कृत्ये ५:१-१०.

दूरदूरहून आलेले अनेक यहुदी आणि यहुदी मतानुसारी सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट सणाकरता जेरूशलेमेत जमले तेव्हा दान करण्याची मोठी गरज भासली. येथेच येशूचे अनुयायी “पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि . . . निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.” एक मोठा जमाव त्यांच्याभोवती जमला आणि येशू ख्रिस्ताविषयी पेत्राचे जबरदस्त भाषण त्याने ऐकले. नंतर, लोकांनी पाहिले की, मंदिराच्या द्वारात पेत्र आणि योहानाने एका लंगड्या मनुष्याला बरे केले आणि पेत्राला पुन्हा एकदा येशूविषयी व पश्‍चात्ताप करण्याच्या गरजेविषयी बोलताना ऐकले. हजारो लोकांनी पश्‍चात्ताप केला आणि ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला.—प्रेषितांची कृत्ये अध्याय २ आणि.

धर्म परिवर्तन केलेल्या या नवीन लोकांना जेरूशलेमेतच राहून येशूच्या प्रेषितांकडून अधिक शिक्षण मिळवायचे होते. या सर्व पाहुण्यांचा सांभाळ प्रेषित कसे करणार होते? बायबल आपल्याला सांगते: “जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवीत; मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे.” (प्रेषितांची कृत्ये ४:३३-३५) खरोखर, नव्याने स्थापलेल्या जेरूशलेम मंडळीमध्ये देण्याची प्रवृत्ती होती!

नंतर इतर मंडळ्यांनी देखील देण्याची तीच प्रवृत्ती दर्शवली. उदाहरणार्थ, मासेदोनियातील ख्रिश्‍चनांनी स्वतः गरीब असतानाही, यहुदीयातील त्यांच्या गरजू बांधवांकरता स्वतःच्या क्षमतेपेक्षाही अधिक देणग्या दिल्या. (रोमकर १५:२६; २ करिंथकर ८:१-७) फिलिप्पै मंडळीने पौलाच्या सेवाकार्याला भरपूर मदत केली. (फिलिप्पैकर ४:१५, १६) जेरूशलेम येथील मंडळीनेच गरजवंत विधवांना दररोज अन्‍न दिले आणि कोणाही विधवेकडे दुर्लक्ष होणार नाही हे पाहण्यासाठी प्रेषितांनी सात योग्य पुरुषांना नेमले.—प्रेषितांची कृत्ये ६:१-६.

प्रारंभिक ख्रिस्ती मंडळ्यांनी संकटांची शक्यता असतानाही लगेच प्रतिसाद दिला. उदाहरणार्थ, संदेष्ट्या अगबने मोठा दुष्काळ पडणार असल्याचे भाकीत केले तेव्हा सिरियन अँटियोकच्या मंडळीतील शिष्यांनी “निश्‍चय केला की, यहूदीयात राहणाऱ्‍या बंधुजनांच्या मदतीकरिता यथाशक्‍ति काही पाठवावे.” (प्रेषितांची कृत्ये ११:२८, २९) इतरांच्या गरजांचा विचार करताना त्यांनी किती उत्तम प्रवृत्ती प्रदर्शित केली!

प्रारंभिक ख्रिस्ती कोणत्या कारणामुळे इतके उदार आणि प्रेमळ होते? खरे पाहता, एखाद्याला देण्याची प्रवृत्ती प्राप्त कशी होते? राजा दावीदाच्या उदाहरणाचा थोडक्यात विचार करून आपण बरेच काही शिकू शकतो.

खऱ्‍या उपासनेला दावीदाने दिलेली उदार मदत

सुमारे ५०० वर्षांकरता कराराचा कोश—यहोवाच्या उपस्थितीचे प्रतिनिधीत्व करणारा एक पवित्र संदूक—ठेवण्याकरता कोणतेही निश्‍चित स्थान नव्हते. ते तंबूत अथवा निवासमंडपात ठेवले जायचे; इस्राएल लोक अरण्यात भटकत होते आणि नंतर वाग्दत्त देशात गेले तेव्हा हा निवासमंडप देखील त्यांच्यासोबत हलवला जात होता. राजा दावीदाला या तंबूतील कोश काढून यहोवाकरता एक उचित इमारत बांधण्याची फार इच्छा होती ज्यात पवित्र कोश ठेवला जाणार होता. संदेष्टा नाथानला बोलताना दावीद म्हणाला: “मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण परमेश्‍वराच्या कराराचा कोश कनाथीखाली आहे.”—१ इतिहास १७:१.

परंतु दावीद एक वीर योद्धा होता. त्यामुळे यहोवाने असा आदेश दिला की, त्याचा पुत्र शलमोन, शांतिपूर्ण शासनादरम्यान कराराचा कोश ठेवण्याकरता एक मंदिर बांधेल. (१ इतिहास २२:७-१०) पण यामुळे दावीदाच्या उदार प्रवृत्तीला खीळ बसली नाही. त्याने कामगारांना जमा केले आणि मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य पुरवण्याची व्यवस्था केली. त्याने नंतर शलमोनाला म्हटले: “मी . . . परमेश्‍वराच्या मंदिराप्रीत्यर्थ एक लक्ष किक्कार सोने व दहा लक्ष किक्कार चांदी सिद्ध केली आहे; पितळ व लोखंड ही तर अतिशयित आहेत, ती अपरिमित आहेत; लाकूड व चिरे ही मी तयार केली आहेत.” (१ इतिहास २२:१४) तरीही दावीदाचे समाधान झाले नाही, त्याने स्वतः साठवलेल्या निधीतून सध्याच्या किंमतीनुसार ६०,००,००,००,००० रुपये इतके मूल्य असलेले सोने-चांदी दान केले. शिवाय, सरदारांनी देखील मुक्‍तहस्ते देणग्या दिल्या. (१ इतिहास २९:३-९) निश्‍चितच, दावीदाने उदारतेची, देण्याची प्रवृत्ती प्रदर्शित केली!

दावीदाने इतक्या उदारपणे दान का केले? त्याने हे जाणले की, त्याने संपादन केलेले व साध्य केलेले सर्वकाही यहोवाच्या आशीर्वादाचा परिणाम होते. त्याने प्रार्थनेत कबूल केले: “हे परमेश्‍वरा, आमच्या देवा, हा जो मोठा निधि आम्ही तुझ्या पवित्र नामाचे मंदिर बांधण्याकरिता जमविला आहे हा तुझ्याच हातून आम्हास मिळाला आहे; हा सर्व तुझाच आहे. माझ्या देवा, मला ठाऊक आहे की तुला हृदयाची पारख आहे; सरळता तुला पसंत आहे; मी तर आपल्या सरळ हृदयाने या सर्व वस्तु तुला आनंदाने समर्पिल्या आहेत; तुझे लोक जे येथे हजर आहेत त्यांनी स्वच्छेने तुला अर्पणे केली आहेत हे पाहून मला मोठा आनंद वाटत आहे.” (१ इतिहास २९:१६, १७) दावीदाला यहोवासोबतचा नातेसंबंध बहुमोलाचा वाटत होता. देवाची सेवा “सात्विक चित्ताने व मनोभावे” करण्याची गरज त्याने ओळखली आणि ते त्याने आनंदाने केले. (१ इतिहास २८:९) याच गुणांनी प्रारंभिक ख्रिश्‍चनांनाही देण्याची प्रवृत्ती प्रदर्शित करण्यास प्रवृत्त केले.

यहोवा —सर्वात मोठा दाता

देण्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण यहोवाचे आहे. तो इतका प्रेमळ आणि काळजीवाहू आहे की, “तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४५) सर्व मानवजातीला तो “जीवन, प्राण व सर्व काही” देतो. (प्रेषितांची कृत्ये १७:२५) शिष्य याकोबाने दाखवल्याप्रमाणे, “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; . . . ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.”—याकोब १:१७.

यहोवाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी भेट म्हणजे “आपला एकुलता एक पुत्र . . . अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) ही भेट मिळण्यास आपण पात्र आहोत असा दावा कोणीही करू शकत नाही कारण “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३, २४; १ योहान ४:९, १०) ख्रिस्ताची खंडणी ही ‘देवाच्या अवर्णनीय दानाचा’ अर्थात ‘देवाच्या अपार [“अपात्र,” NW] कृपेचा’ आधार आणि माध्यम आहे. (२ करिंथकर ९:१४, १५) देवाच्या दानाबद्दल गुणग्राहकता दाखवून पौलाने “देवाच्या [अपात्र] कृपेची सुवार्ता निश्‍चितार्थाने सांगण्याची . . . सेवा” हेच आपले जीवनध्येय बनवले. (प्रेषितांची कृत्ये २०:२४) त्याने ओळखले की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे” ही देवाची इच्छा होती.—१ तीमथ्य २:४.

आज, बहुव्यापी प्रचाराच्या व शिक्षण प्रदान करण्याच्या कार्याद्वारे हे साध्य होत असून ते आता जगभरातील २३४ देशांत पसरले आहे. या व्याप्तीविषयी येशूने आधीच भाकीत केले होते: “सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) होय, “प्रथम सर्व राष्ट्रात सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.” (मार्क १३:१०) गेल्या वर्षी, सुवार्तेच्या ६० लाखांहून अधिक उद्‌घोषकांनी या कार्यात १,२०,२३,८१,३०२ तास खर्च केले आणि ५३,००,००० हून अधिक बायबल अभ्यास चालवले. लोकांच्या जिवाला धोका असल्यामुळे हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.—रोमकर १०:१३-१५; १ करिंथकर १:२१.

बायबलच्या सत्यासाठी आसुसलेल्यांची मदत करण्यासाठी दरवर्षी लाखो प्रकाशने—बायबल, पुस्तके आणि माहितीपत्रके देखील—छापली जातात. शिवाय, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या पत्रिकांच्या १०० कोटींहून अधिक प्रती छापल्या जातात. सुवार्तेला लोकांचा प्रतिसाद वाढत असताना यहोवाच्या साक्षीदारांची राज्य सभागृहे आणि संमेलन गृहे अधिकाधिक प्रमाणात बांधली जात आहेत; ही बायबल मार्गदर्शनाची केंद्रे आहेत. प्रत्येक वर्षी, विभागीय संमेलने आणि खास संमेलन दिवस त्याचप्रमाणे प्रांतीय अधिवेशने यांची योजना केली जाते. मिशनरी, प्रवासी पर्यवेक्षक, वडील आणि सेवा सेवकांना प्रशिक्षण देणे हे कार्य देखील सतत चालू आहे. ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ ही सर्व व्यवस्था केल्याबद्दल आम्ही यहोवाला आभारी आहोत. (मत्तय २४:४५-४७) त्याला आभार प्रदर्शित करण्यास आपण निश्‍चितच आनंदी आहोत!

यहोवाला आभार प्रदर्शित करणे

मंदिराचे बांधकाम त्याचप्रमाणे प्रारंभिक ख्रिस्ती मंडळ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या बाबतीत होते त्याचप्रमाणे या सर्व तरतुदींसाठी निधी स्वेच्छिक अनुदानाकरवीच येतो. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी की, सर्व गोष्टींचा मालक, यहोवा याला कोणीही श्रीमंत करू शकत नाही. (१ इतिहास २९:१४; हाग्गय २:८) अनुदान याचा पुरावा आहेत की, आपल्याला यहोवाबद्दल प्रेम आहे आणि खऱ्‍या उपासनेचा पुरस्कार करण्याची आपली इच्छा आहे. पौलानुसार, उदारतेच्या या अभिव्यक्‍तींवरून “देवाचे आभार प्रदर्शन” होते. (२ करिंथकर ९:८-१३) अशा औदार्याला यहोवा प्रोत्साहन देतो कारण त्यावरून आपली योग्य मनोवृत्ती आहे आणि त्याच्याप्रती आपल्या अंतःकरणात प्रेम आहे हे दिसून येते. जे उदार मनाचे आहेत आणि यहोवावर विसंबून राहतात त्यांना त्याच्याकडून आशीर्वाद मिळेल आणि ते आध्यात्मिकरित्या समृद्ध होतील. (अनुवाद ११:१३-१५; नीतिसूत्रे ३:९, १०; ११:२५) यामुळे आनंद मिळेल असे वचन देत येशूने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.”—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

देण्याची प्रवृत्ती असलेले ख्रिस्ती गरज निर्माण होईस्तोवर थांबून राहत नाहीत. तर “सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे” करण्यासाठी ते संधी शोधत असतात. (गलतीकर ६:१०) पौलाने औदार्याच्या ईश्‍वरी गुणाला प्रोत्साहन देत लिहिले: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (इब्री लोकांस १३:१६) इतरांची मदत करण्यासाठी आणि शुद्ध उपासनेला बढावा देण्यासाठी आपला वेळ, शक्‍ती, पैसा खर्च करणे हे यहोवाला भावते. त्याला खरोखर देण्याची प्रवृत्ती आवडते.

[२८, २९ पानांवरील चौकट/चित्र]

दान देण्यासाठी काहीजण अनुसरत असलेले मार्ग

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान

“जगभरात होणाऱ्‍या कार्यासाठी अनुदान—मत्तय २४:१४.” असे लिहिलेल्या दान पेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.

दर महिन्याला मंडळ्या ही रक्कम संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दान देखील या कार्यालयांना सरळ पाठवले जाऊ शकते. शाखा दफ्तरांचे पत्ते या पत्रिकेच्या पृष्ठ २ वर सापडतील. चेक असतील तर ते “वॉच टावर”ला देय असावेत. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तूसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्‍यक आहे.

सशर्त-दान योजना

काही देशांमध्ये पैसे अशा खास योजनेत दान केले जाऊ शकतात ज्यामध्ये दात्याला ते हवे असल्यास परत केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी, कृपया तुमच्या स्थानिक शाखा दफ्तराशी संपर्क साधा.

धर्मादाय योजना

पैशांची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता तुम्ही राहता त्या देशानुसार देणगी देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:

विमा: वॉच टावर संस्थेला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर संस्थेला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌स देखील वॉच टावर संस्थेला थेट दान केले जाऊ शकतात.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती संस्थेच्या नावावर करून जिवंत असेपर्यंत त्याचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा दफ्तराशी संपर्क साधा.

दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात वॉच टावर संस्थेच्या नावावर पैसे किंवा सुरक्षितता केली जाते. त्याच्या बदल्यात, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर संस्थेच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावर संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. एखादी धार्मिक संस्था ट्रस्टची हिताधिकारी असल्यास करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात.

“धर्मादाय योजना” या शब्दांशावरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानांकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईड हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. भेटवस्तू, इच्छा-पत्र आणि ट्रस्ट यांच्यासंबंधाने केलेल्या चौकशींमुळे हे माहितीपत्रक लिहिण्यात आले आहे. त्यामध्ये स्थावर संपत्ती, आर्थिक व कर योजनेबाबतही अतिरिक्‍त उपयुक्‍त माहिती देण्यात आली आहे. सध्या किंवा मृत्यूलेखदानाकरवी दान करण्याच्या अनेक मार्गाविषयीही त्यात सांगितले आहे. माहितीपत्रक वाचल्यानंतर आणि स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांशी आणि धर्मादाय योजना कार्यालयाशी मसलत करून अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांचे साहाय्य करता आले आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणारे कर फायदे देखील वाढवता आले आहेत.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे संपर्क साधू शकता.

Jehovah’s Witnesses of India

Post Box ६४४०,

Yelahanka,

Bangalore ५६० ०६४,

Karnataka.

Telephone: (०८०) ८४६८०७२

[२६ पानांवरील चित्र]

प्रारंभिक ख्रिस्ती उदारता दाखवण्यास कशामुळे प्रवृत्त झाले?