व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

अलीशाने एलीयाच्या आत्म्याचा “दुप्पट वाटा” का मागितला?

इस्राएलातील संदेष्टा या नात्याने एलीया आपली नेमणूक संपवण्याच्या बेतात असताना त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेला संदेष्टा अलीशा याने त्याला अशी विनंती केली: “आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.” (२ राजे २:९) आध्यात्मिक अर्थाने अलीशा, ज्येष्ठ पुत्राला मिळणारा दुप्पट वाटा मिळण्याची अपेक्षा करत होता. (अनुवाद २१:१७) हा अहवाल थोडक्यात विचारात घेतल्यास ही गोष्ट स्पष्ट होईल आणि त्या घटनेतून आपल्यालाही बरेच शिकता येईल.

यहोवाच्या निर्देशनानुसार संदेष्टा एलीया याने अलीशाला आपला उत्तराधिकारी होण्याकरता अभिषिक्‍त केले होते. (१ राजे १९:१९-२१) जवळजवळ सहा वर्षे अलीशाने एलीयाचा विश्‍वासू सेवक म्हणून काम केले आणि हे तो शेवटपर्यंत करू इच्छित होता. इस्राएलचा संदेष्टा या नात्याने सेवा करण्याच्या एलीयाच्या शेवटल्या दिवशी देखील अलीशा आपल्या अनुभवी उपदेशकाला सोडायला तयार नव्हता. एलीयाने त्याला जाण्यास सांगितले तेव्हा देखील वयाने एलीयापेक्षा लहान असलेल्या या संदेष्ट्याने म्हटले: “मी आपल्याला सोडावयाचा नाही.” (२ राजे २:२, ४, ६; ३:११) खरोखर अलीशा, वयाने मोठ्या एलीयाला आपला आध्यात्मिक पिता मानत होता.—२ राजे २:१२.

पण अलीशा हा एलीयाचा एकुलता एक आध्यात्मिक पुत्र नव्हता. एलीया व अलीशा यांचा संबंध एका गटाशी होता ज्यातील सदस्यांना “भविष्यवाद्यांचे मुलगे” म्हणण्यात आले आहे. (२ राजे २:३, पं.र.भा.) दुसरे राजे यातील अहवाल असे सूचित करतो की ज्यांना “मुलगे” म्हणण्यात आले आहे, त्यांना देखील आपला आध्यात्मिक पिता एलीया याच्याबद्दल आपुलकी वाटत होती. (२ राजे २:३, ५, ७, १५-१७) तरीपण, अभिषिक्‍त उत्तराधिकारी असल्यामुळे अलीशा हा एलीयाच्या आध्यात्मिक पुत्रांपैकी प्रमुख होता—जणू तो त्याचा ज्येष्ठ पुत्र होता. प्राचीन इस्राएलातील कुटुंबांत खरोखरच्या ज्येष्ठ पुत्राला त्याच्या पित्याच्या वतनातील दुप्पट वाटा मिळत असे; पण इतर मुलांना केवळ एकेकच वाटा मिळे. म्हणूनच अलीशाने एलीयाच्या आध्यात्मिक वतनातून दुप्पट वाटा मागितला.

त्या विशिष्ट वेळी अलीशाने ही विनंती का केली? कारण लवकरच तो एक महत्त्वाची जबाबदारी हाती घेणार होता, अर्थात इस्राएलचा संदेष्टा या नात्याने एलीयाची भूमिका यापुढे तो स्वतः पार पाडणार होता. या आव्हानात्मक कार्याशी संबंधित असलेल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्याकरता आपल्याला स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहता येणार नाही, तर यहोवाकडून मिळू शकणाऱ्‍या आध्यात्मिक सामर्थ्याची आपल्याला गरज पडणार आहे याची अलीशाला जाणीव होती. त्याला देखील एलीयाप्रमाणेच निर्भयतेने कार्य करावे लागणार होते. (२ राजे १:३, ४, १५, १६) म्हणूनच, त्याने एलीयाच्या आत्म्याचे दोन भाग, अर्थात देवाच्या आत्म्याकरवी उत्पन्‍न होणारे दोन उत्कृष्ट गुण आपल्याला मिळावे अशी विनंती केली; एकतर धैर्यवान असण्याचा आणि दुसरे म्हणजे ‘यहोवाविषयी फार ईर्ष्यायुक्‍त’ असण्याचा आत्मा. (१ राजे १९:१०, १४) एलीयाने अलीशाला काय उत्तर दिले?

अलीशाने जे मागितले ते आपण नव्हे तर केवळ देव देऊ शकतो हे एलीयाला माहीत होते. त्यामुळे एलीयाने विनयशीलपणे उत्तर दिले: “तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुजपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल.” (२ राजे २:१०) आणि खरोखरच, यहोवाने अलीशाला वावटळीतून एलीया स्वर्गास जात असतानाचे दृश्‍य पाहू दिले. (२ राजे २:११, १२) अलीशाची विनंती मान्य करण्यात आली. यहोवाने त्याला त्याचे नवे कार्य हाती घेण्यास आणि येणाऱ्‍या परीक्षांना तोंड देण्यास आवश्‍यक असणारा आत्मा पुरवला.

आज अभिषिक्‍त ख्रिस्ती (ज्यांना कधीकधी अलीशा वर्ग असे संबोधले जाते) आणि इतर देवाचे सेवक देखील या बायबल अहवालापासून बरेच प्रोत्साहन मिळवू शकतात. काही वेळा एखादी नवी नेमणूक मिळते तेव्हा आपल्याला ती खूपच आव्हानात्मक किंवा आपल्या सामर्थ्यापलीकडील आहे असे वाटू शकते. किंवा आपल्या क्षेत्रात लोकांना राज्याच्या संदेशात स्वारस्य नसल्यामुळे अथवा विरोध वाढत असल्यामुळे प्रचाराचे कार्य सुरू ठेवण्याचे धैर्य पूर्वीसारखे आता आपल्याला होत नसेल. पण जर आपण यहोवाकडे त्याच्या पाठबळाकरता याचना केली तर तो आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना आणि बदलत्या परिस्थितीला तोंड देण्याकरता आवश्‍यकतेप्रमाणे पवित्र आत्मा जरूर देईल. (लूक ११:१३; २ करिंथकर ४:७; फिलिप्पैकर ४:१३) होय, अलीशाला त्याच्या आव्हानात्मक जबाबदाऱ्‍या पार पाडण्याकरता यहोवाने ज्याप्रमाणे बळ दिले त्याचप्रमाणे, आपण तरुण असो वा वृद्ध, आपल्यालाही तो आपले सेवाकार्य पार पाडण्याकरता नक्कीच मदत करेल.—२ तीमथ्य ४:५.