विश्वासू ख्रिस्ती स्त्रिया—देवाचे अनमोल उपासक
विश्वासू ख्रिस्ती स्त्रिया—देवाचे अनमोल उपासक
“सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणऱ्या स्त्रीची प्रशंसा होते.”—नीतिसूत्रे ३१:३०.
१. सौंदर्याविषयी यहोवाचा दृष्टिकोन जगाच्या दृष्टिकोनापेक्षा कशाप्रकारे वेगळा आहे?
या जगात बाह्यस्वरूपावर अवाजवी भर दिला जातो; खासकरून स्त्रियांच्या संदर्भात. पण यहोवा मात्र आंतरिक व्यक्तिमत्त्वालाच महत्त्व देतो, जे वाढत्या वयासोबत अधिकाधिक खुलते. (नीतिसूत्रे १६:३१) म्हणूनच बायबल स्त्रियांना असा आदेश देते: “तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे, किंवा उंची पोषाक करणे ह्यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.”—१ पेत्र ३:३, ४.
२, ३. पहिल्या शतकात स्त्रियांनी सुवार्तेच्या प्रसाराला कशाप्रकारे हातभार लावला आणि हे कशाप्रकारे भाकीत करण्यात आले होते?
२ अशी प्रशंसनीय मनोवृत्ती बायबलमध्ये उल्लेख केलेल्या अनेक स्त्रियांनी दाखवली. पहिल्या शतकात यांच्यापैकी काहींना येशू व त्याच्या प्रेषितांची सेवा करण्याचा बहुमान मिळाला. (लूक ८:१-३) नंतर, ख्रिस्ती स्त्रिया आवेशी प्रचारक बनल्या; इतरांनी मंडळीत पुढाकार घेणाऱ्या ख्रिस्ती पुरुषांना, उदाहरणार्थ प्रेषित पौलाला, अतिशय मोलवान असे पाठबळ दिले; आणि काहींनी असाधारण आतिथ्यप्रेम दाखवले व आपले घर मंडळीच्या सभांकरता उपलब्ध करून दिले.
३ यहोवा आपल्या उद्देशाच्या पूर्ततेत स्त्रियांचा अतिशय प्रभावशाली रितीने उपयोग करील हे शास्त्रवचनांत भाकीत करण्यात आले होते. उदाहरणार्थ, योएल २:२८, २९ यात असे भाकीत करण्यात आले होते की स्त्रिया व पुरुष, तरुण व वृद्धजन या सर्वांना पवित्र आत्मा मिळेल व ते राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारात सहभागी होतील. ही भविष्यवाणी सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टच्या दिवशी पूर्ण होण्यास सुरवात झाली. (प्रेषितांची कृत्ये २:१-४, १६-१८) काही आत्म्याने अभिषिक्त स्त्रियांना चमत्कारिक देणग्या, उदाहरणार्थ, भविष्यवाणीची देणगी देण्यात आली होती. (प्रेषितांची कृत्ये २१:८, ९) सेवाकार्यातील त्यांच्या आवेशामुळे या विश्वासू भगिनींच्या मोठ्या आत्मिक सैन्याने पहिल्या शतकात ख्रिस्ती विश्वासाच्या जलद प्रसाराला मोठा हातभार लावला. किंबहुना, सा.यु. ६० सालादरम्यान प्रेषित पौलाने असे लिहिले की सुवार्तेची “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” घोषणा झाली आहे.—कलस्सैकर १:२३.
धैर्य, आवेश व आतिथ्याबद्दल प्रशंसा
४. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीतल्या अनेक स्त्रियांची पौलाने जी प्रशंसा केली ती योग्यच होती असे का म्हणता येईल?
४ ज्याप्रकारे आज ख्रिस्ती पर्यवेक्षक आवेशी स्त्रियांच्या सेवाकार्याची कदर करतात त्याचप्रकारे पहिल्या शतकात प्रेषित पौलानेही, खासकरून काही स्त्रियांच्या सेवाकार्याची विशेष प्रशंसा केली. पौलाने ज्यांचा नावाने उल्लेख केला त्यांपैकी “प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैना व त्रुफासा,” आणि “प्रिय पर्सिस” होती जिने “प्रभूमध्ये फार श्रम केले” होते. (रोमकर १६:१२) युवदिया व सुंतुखे यांच्याविषयी पौलाने असे लिहिले की ‘ह्या स्त्रियांनी माझ्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले.’ (फिलिप्पैकर ४:२, ३) प्रिस्किल्ला हिने देखील आपला पती अक्विला ह्याच्यासोबत पौलाबरोबर सेवा केली. तिने व अक्विलाने पौलाच्या “जिवाकरिता आपला जीव धोक्यात घातला,” ज्यामुळे तो त्यांच्याविषयी असे लिहिण्यास प्रवृत्त झाला की “त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याहि मानतात.”—रोमकर १६:३, ४; प्रेषितांची कृत्ये १८:२.
५, ६. आजच्या काळातील बहिणी प्रिस्किल्लाचे कशाच्या बाबतीत अनुकरण करू शकतात?
५ प्रिस्किल्ला आवेशाने व धैर्याने कार्य का करू शकली? याचा एक सुगावा प्रेषितांची कृत्ये १८:२४-२६ यात मिळतो जेथे आपण वाचतो की अपुल्लो नावाच्या एका मोठ्या वक्त्याला प्रकट सत्याविषयी अद्ययावत माहिती देण्यात तिने आपल्या पतीला साहाय्य केले. त्याअर्थी, निश्चितच प्रिस्किल्ला ही देवाच्या वचनाचा व प्रेषितांच्या शिकवणुकींचा सखोल अभ्यास करत असावी. त्यामुळेच ती उत्तम गुण संपादन करून केवळ देवाच्या व आपल्या पतीच्याच नजरेत अनमोल ठरली नाही तर ती सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीची देखील एक मौल्यवान सदस्या ठरली. आजही अनेक परिश्रमी ख्रिस्ती बहिणी ज्या बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करण्याकरता मनःपूर्वक प्रयत्न करतात आणि ‘विश्वासू दासाकरवी’ पुरवले जाणारे आध्यात्मिक अन्न ग्रहण करतात त्या अतिशय मोलवान आहेत.—लूक १२:४२.
६ अक्विला व प्रिस्किल्ला यांचे आतिथ्यप्रेम उल्लेखनीय होते. पौल करिंथमध्ये त्यांच्यासोबत तंबू शिवण्याचे काम करत होता तेव्हा त्याने त्यांच्याच घरी मुक्काम केला होता. (प्रेषितांची कृत्ये १८:१-३) नंतर हे दांपत्य इफिसस आणि त्यानंतर रोममध्ये राहायले गेले तेव्हासुद्धा त्यांनी ख्रिस्ती आतिथ्य दाखवण्याचे थांबवले नाही; त्यांनी आपले घर देखील मंडळीच्या सभांकरता वापरण्याची परवानगी दिली. (प्रेषितांची कृत्ये १८:१८, १९; १ करिंथकर १६:८, १९) नुंफा व योहान मार्कची आई मरीया यांनी देखील आपले घर मंडळीच्या सभांकरता उपलब्ध करून दिले.—प्रेषितांची कृत्ये १२:१२; कलस्सैकर ४:१५.
आजच्या काळात स्त्रियांची मौल्यवान मदत
७, ८. आजच्या काळातील ख्रिस्ती स्त्रियांचा पवित्र सेवेत कोणता प्रशंसनीय अहवाल आहे आणि त्या कशाची खात्री बाळगू शकतात?
७ पहिल्या शतकाप्रमाणेच, आजही विश्वासू ख्रिस्ती स्त्रिया देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत आणि खासकरून सुवार्ता प्रचाराच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या बहिणींच्या कार्याचा अहवाल किती प्रशंसनीय आहे! ग्वेन हिचे उदाहरण घ्या. २००२ साली तिचा मृत्यू होईपर्यंत, ५० वर्षे तिने विश्वासूपणे यहोवाची सेवा केली. तिचे पती सांगतात, “सुवार्ता प्रचाराच्या कार्यातील आवेशाबद्दल ग्वेन आमच्या शहरात सुविख्यात होती. तिच्या नजरेत प्रत्येक व्यक्ती यहोवाचे प्रेम अनुभवण्यास व त्याच्या प्रतिज्ञांविषयी जाणून घेण्यास योग्य होती. देवाला, त्याच्या संघटनेला आणि आमच्या कुटुंबाला तिने दाखवलेली एकनिष्ठता, तसेच आम्ही निराश झालो तेव्हा तिने दिलेला प्रेमळ दिलासा यामुळे ती माझ्याकरता आणि मुलांकरता जणू एक आधारस्तंभ होती. तिच्यासोबत घालवलेले जीवन सुंदर आठवणींनी भरपूर आणि अतिशय समाधानकारक होते. तिची उणीव आम्हा सर्वांना खूप जाणवते.” ग्वेन व तिचे पती ६१ वर्षांपासून विवाहित होते.
८ हजारो विवाहित व अविवाहित ख्रिस्ती स्त्रिया पायनियर अथवा मिशनरी सेवा करत आहेत. गजबजलेल्या शहरांपासून अगदी एकाकी प्रदेशांपर्यंत सर्व प्रकारच्या क्षेत्रांत राज्याचा संदेश पोचवताना त्या जीवनाच्या आवश्यक गरजांमध्येच समाधान मानतात. (प्रेषितांची १:८) यहोवाची सेवा अधिक करता यावी म्हणून, कित्येकांनी घरदार किंवा मुलेबाळे असण्याच्या संधीचा त्याग केला आहे. काहीजणी प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करणाऱ्या आपल्या पतींना हाग्गय २:७.
विश्वासूपणे साथ देतात तर हजारो बहिणी जगभरातील बेथेल गृहांत सेवा करतात. या आत्मत्यागी स्त्रिया यहोवाचे मंदिर वैभवाने भरणाऱ्या “सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तु” म्हणून गणल्या जाण्यास योग्य आहेत यात काहीच शंका नाही.—९, १०. ख्रिस्ती पत्नी व माता म्हणून अनेक स्त्रियांनी मांडलेल्या उत्तम आदर्शाविषयी त्यांच्या काही कुटुंबीयांनी कशाप्रकारे प्रशंसेच्या भावना व्यक्त केल्या आहेत?
९ अर्थात कित्येक ख्रिस्ती स्त्रियांना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात; पण तरीसुद्धा त्या राज्याच्या कार्याला नेहमी प्राधान्य देतात. (मत्तय ६:३३) एका अविवाहित पायनियर बहिणीने लिहिले: “माझ्या आईच्या अतूट विश्वासामुळे व उत्तम आदर्शामुळेच मी देखील सामान्य पायनियर सेवा हाती घेतली. तीच माझी सर्वात उत्तम पायनियर सोबतीण होती.” पाच मोठ्या मुलींची आई असलेल्या आपल्या पत्नीविषयी एक पती असे म्हणतो: “आमचे घर नेहमी स्वच्छ व नीटनेटके असायचे. आमच्या कुटुंबाला आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष लावता यावे म्हणून बॉनीने खूप सामान गोळा करण्याच्या भानगडीत न पडता, घर साधेच ठेवले. तिने घरातील आर्थिक व्यवहार विचारपूर्वक हाताळल्यामुळेच मला ३२ वर्षे अर्धवेळेची नोकरी करून आमच्या कुटुंबाला आणि आध्यात्मिक कार्याला अधिक वेळ देणे शक्य झाले. माझ्या पत्नीने मुलींनाही कष्ट करण्याचे महत्त्व शिकवले. तिची मी कितीही स्तुती केली तरी कमीच आहे.” आज दोघे पती-पत्नी यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सेवा करत आहेत.
१० प्रौढ मुलांची आई असलेल्या आपल्या पत्नीविषयी एक पती असे लिहितो: “सुझनचे जे गुण मला सर्वात जास्त आवडतात ते म्हणजे तिचे देवावर व लोकांबद्दल असलेले मनःपूर्वक प्रेम, तसेच तिचा समजूतदारपणा, सहानुभूती आणि प्रामाणिकता. तिचे नेहमी हे ठाम मत राहिलेले आहे की यहोवाला आपण आपल्या परीने जे सर्वात उत्तम तेच दिले पाहिजे; देवाच्या सेवेत आणि मातेच्या भूमिकेत ती नेहमी हे तत्त्व स्वतः काटेकोरपणे पाळते.” आपल्या पत्नीच्या आधारामुळे या पतीला अनेक आध्यात्मिक जबाबदाऱ्या स्वीकारणे शक्य झाले आहे, जसे एक वडील, पायनियर, पर्यायी विभागीय पर्यवेक्षक आणि इस्पितळ संपर्क समितीचे सदस्य म्हणून सेवा करणे. खरोखर अशा स्त्रिया त्यांच्या पतींच्या व सहख्रिस्ती बांधवांच्याच नव्हे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाच्या नजरेत किती मोलवान आहेत!—नीतिसूत्रे ३१:२८, ३०.
पती नसलेल्या मौल्यवान स्त्रिया
११. (अ) यहोवाने विश्वासू स्त्रियांबद्दल, खासकरून विधवांबद्दल आपली काळजी कशाप्रकारे व्यक्त केली आहे? (ब) ख्रिस्ती विधवा व ज्यांना पती नाही अशा इतर विश्वासू भगिनी कशाविषयी खात्री बाळगू शकतात?
११ यहोवाने कित्येकदा विधवांच्या कल्याणासंबंधी आपली काळजी व्यक्त केली. (अनुवाद २७:१९; स्तोत्र ६८:५; यशया १०:१, २) आजही तो बदललेला नाही. आजही त्याला विधवांबद्दलच नव्हे तर एकाकी माता तसेच ज्या स्त्रिया स्वेच्छेने किंवा योग्य ख्रिस्ती जोडीदार न मिळाल्यामुळे अविवाहित आहेत अशा स्त्रियांबद्दलही काळजी वाटते. (मलाखी ३:६; याकोब १:२७) जर तुम्ही देखील ख्रिस्ती जोडीदाराच्या आधाराशिवाय यहोवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांपैकी असाल तर तुम्ही खात्री बाळगू शकता की देवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात.
१२. (अ) काही ख्रिस्ती बहिणी कशाप्रकारे यहोवाला एकनिष्ठ राहतात? (ब) आपल्या काही बहिणी कोणत्या भावनांना तोंड देत आहेत?
१२ उदाहरणार्थ, अशा ख्रिस्ती बहिणींची उदाहरणे घ्या ज्यांनी “केवळ प्रभूमध्ये” लग्न करण्याच्या यहोवाच्या आज्ञेला एकनिष्ठपणे जडून राहिल्यामुळे लग्न केलेले नाही. (१ करिंथकर ७:३९; नीतिसूत्रे ३:१) देवाचे वचन त्यांना असे आश्वासन देते: “एकनिष्ठ जनांशी तू एकनिष्ठेने वागतोस.” (२ शमुवेल २२:२६, NW) तरीसुद्धा, त्यांच्यापैकी अनेकांकरता अविवाहित राहणे सोपे नाही. एक बहीण म्हणते: “मी केवळ प्रभूमध्ये विवाह करण्याचा निश्चय केला, पण माझ्या कित्येक मैत्रिणींना उत्तम ख्रिस्ती जोडीदार मिळाले पण मी मात्र एकटीच राहिले, याचा विचार करून मी कित्येकदा रडले.” आणखी एक बहीण म्हणते: “मी २५ वर्षे यहोवाची सेवा केली आहे. त्याला एकनिष्ठ राहण्याचा माझा निर्धार आहे. पण तरीसुद्धा एकटेपणाच्या भावनांमुळे मी बऱ्याचदा दुःखी होते.” ती पुढे म्हणते: “माझ्यासारख्या बहिणी प्रोत्साहनाकरता आसुसलेल्या आहेत.” अशा एकनिष्ठ बहिणींना आपण कशी मदत करू शकतो?
१३. (अ) इफ्ताहाच्या मुलीला भेटायला जाणाऱ्यांकडून आपण काय शिकू शकतो? (ब) आणखी कोणकोणत्या मार्गांनी आपण आपल्या मंडळीतील अविवाहित बहिणींबद्दल काळजी व्यक्त करू शकतो?
१३ एक मार्ग, प्राचीन काळच्या एका उदाहरणावरून दिसून येतो. इफ्ताहाच्या मुलीने विवाह करण्याच्या संधीचा त्याग केला तेव्हा तिच्या या त्यागाची लोकांना जाणीव होती. तिला प्रोत्साहन देण्याकरता त्यांनी काय केले? ‘इस्राएल मुली इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीची स्तुती करण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात होत्या.’ (शास्ते ११:३०-४०, NW) त्याचप्रकारे आपण देखील देवाच्या नियमाचे एकनिष्ठपणे पालन करणाऱ्या अविवाहित बहिणींची मनापासून प्रशंसा केली पाहिजे. * आपली काळजी व्यक्त करण्याचा आणखी एक मार्ग कोणता आहे? आपल्या प्रार्थनांमध्ये आपण यहोवाला विनंती केली पाहिजे की त्याने या प्रिय, विश्वासू बहिणींना त्यांच्या सेवेत एकनिष्ठपणे टिकून राहता यावे म्हणून त्यांना सदैव साहाय्य करावे. यहोवाचे आणि सबंध ख्रिस्ती मंडळीचे या बहिणींवर प्रेम आहे आणि हे सर्वजण त्यांची कदर करतात असे आश्वासन त्यांना दिले पाहिजे.—स्तोत्र ३७:२८.
एकाकी पालक कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतात
१४, १५. (अ) एकाकी माता असलेल्या ख्रिस्ती स्त्रियांनी मदतीकरता यहोवाला का याचना केली पाहिजे? (ब) एकाकी पालकांनी कशाप्रकारे आपल्या प्रार्थनांच्या एकवाक्यतेत कार्य करावे?
१४ एकाकी पालक असलेल्या ख्रिस्ती स्त्रियांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. पण आपल्या मुलांचे बायबलच्या तत्त्वांनुसार संगोपन करण्याकरता त्या मदतीसाठी यहोवाकडे विनंती करू शकतात. अर्थात, तुम्ही एकाकी पालक असल्यास, माता व पिता या दोघांची भूमिका प्रत्येक बाबतीत पार पाडणे तुम्हाला शक्य होणार नाही. पण तुम्ही विश्वासाने यहोवाची मदत मागितल्यास तो तुमच्या खांद्यावर असलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता तुम्हाला मदत करेल. उदाहरणार्थ, समजा तुम्ही अनेक मजल्यांच्या एका इमारतीत राहता आणि बाजारातून आणलेल्या सामानाच्या जड पिशव्या घेऊन तुम्ही घरी जात आहात. लिफ्ट जवळ असताना तुम्ही पायऱ्या चढून जाण्याचे निवडाल का? निश्चितच नाही! त्याचप्रकारे, यहोवाला प्रार्थना करून मदत मागणे शक्य असताना तुमच्या समोर असलेली जड भावनिक ओझी एकट्याने उचलण्याचा प्रयत्न करू नका. किंबहुना, यहोवा स्वतः त्याची मदत घेण्याचे तुम्हाला आवाहन करतो. स्तोत्र ६८:१९ यात म्हटले आहे: “प्रभु धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो.” (तिरपे वळण आमचे.) त्याचप्रकारे, १ पेत्र ५:७ देखील तुम्हाला आपली सर्व चिंता यहोवावर टाकण्यास सांगते “कारण तो तुमची काळजी घेतो.” (तिरपे वळण आमचे.) तर मग, समस्या व चिंता यांमुळे तुम्हाला भाराक्रांत झाल्यासारखे वाटते तेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याजवळ जाऊन आपले मन हलके करा आणि हे “निरंतर” करत राहा.—१ थेस्सलनीकाकर ५:१७; स्तोत्र १८:६; ५५:२२.
१५ उदाहरणार्थ, तुम्ही एक माता असल्यास, तुमच्या मुलांच्या शाळेतील सोबत्यांचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडेल याविषयी किंवा त्यांना शाळेत ज्या विश्वासाच्या परीक्षांना तोंड द्यावे लागू शकते त्यांविषयी तुम्हाला चिंता वाटत असेल. (१ करिंथकर १५:३३) या चिंता समजण्याजोग्या आहेत. पण याविषयी तुम्ही प्रार्थना करू शकता. किंबहुना, तुमची मुले शाळेला जाण्याआधी, कदाचित दैनिक वचन सर्वांनी मिळून वाचल्यानंतर तुम्ही या गोष्टींबद्दल त्यांच्यासोबत प्रार्थना का करून पाहात नाही? मनापासून प्रार्थना केल्यास व आपली विवंचना स्पष्टपणे मांडल्यास मुलांच्या कोवळ्या मनांवर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही यहोवाचे वचन तुमच्या मुलांच्या मनांवर बिंबवण्याचा सहनशीलतेने प्रयत्न करता तेव्हा आपोआपच त्याचा आशीर्वाद मिळण्याकरता तुम्ही स्वतःला योग्य ठरवता. (अनुवाद ६:६, ७; नीतिसूत्रे २२:६) आठवणीत असू द्या, “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात.”—१ पेत्र ३:१२; फिलिप्पैकर ४:६, ७.
१६, १७. (अ) आपल्या आईने दाखवलेल्या प्रेमाबद्दल एका मुलाने काय म्हटले? (ब) या आईच्या आध्यात्मिक मनोवृत्तीचा तिच्या मुलांवर कसा परिणाम झाला?
१६ सहा मुलांची आई ओलिव्हीया हिचे उदाहरण घ्या. तिचे शेवटचे मूल जन्माला आल्यावर लगेच, तिच्या सत्य न मानणाऱ्या पतीने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. पण ओलिव्हीयाने आपल्या मुलांना देवाच्या मार्गांत प्रशिक्षित करण्याची जबाबदारी लगेच हाती घेतली. ओलिव्हीयाचा मुलगा डॅरन जो आता ३१ वर्षांचा असून ख्रिस्ती वडील व पायनियर म्हणून सेवा करत आहे, तो त्या वेळी केवळ ५ वर्षांचा होता. आधीच ओलिव्हीयाला इतक्या चिंता होत्या, त्यात डॅरनला गंभीर आजारपण आले. आजही त्यामुळे त्याची प्रकृती तितकी चांगली राहात नाही. आपल्या लहानपणाची आठवण काढून डॅरन लिहितो: “मी हॉस्पिटलच्या खाटेवर बसून आईची कशी वाट पाहायचो हे मला अजूनही आठवते. ती माझ्याजवळ बसून दररोज माझ्यासाठी बायबल वाचायची. मग “यहोवाला धन्यवाद” हे राज्य गीत ती म्हणायची. * आजपर्यंत ते माझे आवडते राज्य गीत आहे.”
१७ ओलिव्हीयाचा यहोवावर असलेला विश्वास व प्रेम यांमुळे ती एकाकी माता असूनही यशस्वी होऊ शकली. (नीतिसूत्रे ३:५, ६) तिने आपल्या मुलांसमोर ठेवलेल्या ध्येयांवरून तिच्या उत्तम मनोवृत्तीचा अंदाज लावता येतो. डॅरन सांगतो: “आईने नेहमी आम्हाला पूर्णवेळेच्या सेवेचे ध्येय मिळवण्याचे प्रोत्साहन दिले. त्यामुळे, माझ्या पाच बहिणींपैकी चौघी आणि मी देखील पूर्णवेळेच्या सेवेत उतरलो. पण आईने कधीही इतरांसमोर या गोष्टीची बढाई मारली नाही. तिच्या उत्कृष्ट गुणांचे अनुकरण करण्याचा मी खूप प्रयत्न करतो.” अर्थात ओलिव्हीयाच्या मुलांप्रमाणे सर्वांचीच मुले मोठी झाल्यावर देवाची सेवा करत नाहीत. पण एक आई बायबल तत्त्वांचे जीवनात पालन करण्याचा आपल्या परीने होईल तितका प्रयत्न करते तेव्हा ती यहोवाचे मार्गदर्शन व प्रेमळ आधार मिळण्याबाबत आश्वस्त राहू शकते.—स्तोत्र ३२:८.
१८. ख्रिस्ती मंडळीच्या रूपात यहोवाने केलेल्या तरतुदीची आपण कदर करतो हे आपण कसे दाखवू शकतो?
१८ देव मुख्यतः ख्रिस्ती मंडळीच्या माध्यमाने, मंडळीचा नियमित आध्यात्मिक पोषण पुरवणारा कार्यक्रम, त्यातील ख्रिस्ती बंधूभगिनी आणि आध्यात्मिक प्रौढता असलेल्या ‘मनुष्यरूपी देणग्या’ यांच्या माध्यमाने मदत पुरवतो. (इफिसकर ४:८, NW) विश्वासू वडील मंडळीतल्या सर्वांना प्रोत्साहन मिळावे म्हणून झटतात आणि ‘अनाथ व विधवा यांच्या संकटात’ त्यांच्या गरजांकडे खास लक्ष देतात. (याकोब १:२७) तेव्हा, देवाच्या लोकांच्या निकट सहवासात राहा, स्वतःला कधीही वेगळे करू नका.—नीतिसूत्रे १८:१; रोमकर १४:७.
अधीनतेत लपलेले सौंदर्य
१९. पत्नीचे अधीन राहणे तिचे न्यूनत्व सूचित करत नाही असे का म्हणता येईल आणि बायबलचे कोणते उदाहरण याला पुष्टी देते?
१९ यहोवाने स्त्रीला पुरुषाची साहाय्यक म्हणून निर्माण केले. (उत्पत्ति २:१८) त्याअर्थी, पत्नीने पतीला अधीन राहणे तिचे न्यूनत्व मुळीच सूचित करत नाही. उलट ते स्त्रीला एक मानाचे स्थान देते आणि तिला आपल्या अनेक क्षमता व कौशल्ये देवाच्या इच्छेच्या अनुरूप वापरण्याची संधी देते. नीतिसूत्रे अध्याय ३१ यात, प्राचीन इस्राएलातील एक आदर्श पत्नी कोणकोणत्या जबाबदाऱ्या सांभाळायची याचे वर्णन आढळते. ती गरजू लोकांना मदत करीत होती, द्राक्षमळे लावत होती आणि जमिनीच्या खरेदीसंबंधी व्यवहार देखील पाहत होती. होय, “तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा [ठेवत होते]; त्याला संपत्तीची वाण पडत [नव्हती],” असे तिच्याविषयी म्हणण्यात आले.—वचने ११, १६, २०.
२०. (अ) देवाने दिलेल्या क्षमतांविषयी अथवा कौशल्यांविषयी एका ख्रिस्ती स्त्रीने कशी मनोवृत्ती बाळगावी? (ब) एस्तेरने कोणते उत्तम गुण प्रदर्शित केले आणि यामुळे यहोवाने कशाप्रकारे तिचा उपयोग केला?
२० एक विनयशील, देवभीरू स्त्री महत्त्वाकांक्षी वृत्तीने स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा अथवा आपल्या पतीसोबत स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत नाही. (नीतिसूत्रे १६:१८) ती केवळ लौकिक ध्येये साध्य करून आत्मसंतुष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही तर देवाने आपल्याला दिलेल्या कौशल्यांचा ती इतरांची सेवा करण्याकरता—अर्थात, तिच्या कुटुंबाची, सह ख्रिस्ती बांधवांची, शेजाऱ्यांची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाची सेवा करण्याकरता उपयोग करते. (गलतीकर ६:१०; तीत २:३-५) बायबलमधील एस्तेर राणीचे उदाहरण विचारात घ्या. शारीरिकरित्या ती सुंदर असली तरीसुद्धा ती विनयशील आणि अधीन राहण्यास तयार होती. (एस्तेर २:१३, १५) तिचा विवाह झाल्यानंतर ती आपला पती राजा अश्वरोश याची पहिली पत्नी वाश्ती हिच्याप्रमाणे वागली नाही तर आपल्या पतीला तिने मनापासून आदर दिला. (एस्तेर १:१०-१२; २:१६, १७) तसेच समर्पक मुद्द्यांवर तिने राणी झाल्यानंतरही मर्दकाय या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या भावाचे आदरपूर्वक ऐकले. पण तिचे व्यक्तिमत्त्व दुबळे मुळीच नव्हते! तिने सत्तेवर असलेल्या व क्रूर अशा हामानाचा यहुद्यांच्या विरोधात रचलेला कट उघडकीस आणला. यहोवाने आपल्या लोकांचा बचाव करण्याकरता एस्तेरचा अतिशय प्रभावशाली रितीने उपयोग केला.—एस्तेर ३:८-४:१७; ७:१-१०; ९:१३.
२१. एक ख्रिस्ती स्त्री यहोवाच्या नजरेत अधिक मौल्यवान कशी ठरू शकते?
२१ गतकाळात व आजही धार्मिक स्त्रियांनी यहोवा व त्याची उपासना यासंबंधी संपूर्ण समर्पणाच्या भावनेने त्याची सेवा केली आहे हे या चर्चेतून स्पष्ट झाले आहे. म्हणूनच देवभीरू स्त्रिया यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहेत. ख्रिस्ती बहिणींनो, यहोवाला त्याच्या आत्म्याच्या माध्यमाने तुमचे “प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र” होण्याकरता उत्तरोत्तर रूपांतर करू द्या. (२ तीमथ्य २:२१; रोमकर १२:२) अशा मौल्यवान उपासकांबद्दल देवाचे वचन म्हणते: “तिच्या हातांचे श्रमफल तिला लाभू द्या, तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.” (नीतिसूत्रे ३१:३१) तुमच्यापैकी प्रत्येकीसंबंधी हे शब्द खरे ठरोत.
[तळटीपा]
^ परि. 13 आपण त्यांची प्रशंसा कशी करू शकतो याविषयी टेहळणी बुरूज मार्च १५, २००२ अंकातील पृष्ठे २६-८ पाहा.
^ परि. 16 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या यहोवाचे गुणगान करा यातील गीत क्रमांक २६.
तुम्हाला आठवते का?
• पहिल्या शतकातील काही ख्रिस्ती स्त्रिया यहोवाच्या नजरेत मौल्यवान कशा ठरल्या?
• आपल्या काळातील अनेक बहिणींनी कशाप्रकारे स्वतःला देवाकरता मौल्यवान असे शाबित केले आहे?
• एकाकी माता व ज्यांना पती नाही अशा इतर स्त्रियांना यहोवा कशाप्रकारे साहाय्य करतो?
• एक स्त्री मस्तकपदाच्या व्यवस्थेप्रती कशाप्रकारे मनस्वी आदर दाखवू शकते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१७ पानांवरील चौकट]
मनन करण्याजोगी उदाहरणे
बायबलमध्ये ज्यांचा उल्लेख करण्यात आला अशा आणखी काही विश्वासू स्त्रियांच्या उदाहरणांवर विचार करायला तुम्हाला आवडेल का? तर मग खाली दिलेली वचने वाचा. यात उल्लेख केलेल्या व्यक्तींबद्दल मनन करताना आपल्या जीवनात कोणत्या तत्त्वांचे अधिकाधिक पालन करता येईल याविषयी विचार करा.—रोमकर १५:४.
◆ सारा: उत्पत्ति १२:१, ५; १३:१८अ; २१:९-१२; १ पेत्र ३:५, ६.
◆ उदार इस्राएली स्त्रिया: निर्गम ३५:५, २२, २५, २६; ३६:३-७; लूक २१:१-४.
◆ दबोरा: शास्ते ४:१–५:३१.
◆ रूथ: रूथ १:४, ५, १६, १७; २:२, ३, ११-१३; ४:१५.
◆ शूनेमकरीण: २ राजे ४:८-३७.
◆ कनानी स्त्री: मत्तय १५:२२-२८.
◆ मार्था व मरीया: मार्क १४:३-९; लूक १०:३८-४२; योहान ११:१७-२९; १२:१-८.
◆ टबीथा: प्रेषितांची कृत्ये ९:३६-४१.
◆ फिलिप्पाच्या चार मुली: प्रेषितांची कृत्ये २१:९.
◆ फीबी: रोमकर १६:१, २.
[१५ पानांवरील चित्र]
देवाच्या नियमांचे एकनिष्ठतेने पालन करणाऱ्या अविवाहित बहिणींची तुम्ही प्रशंसा करता का?
[१६ पानांवरील चित्र]
मुले शाळेला जाण्याआधी कोणत्या विशिष्ट गोष्टींविषयी प्रार्थनेत उल्लेख करता येईल?