व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परादीस पृथ्वीवर तुमचा विश्‍वास आहे का?

परादीस पृथ्वीवर तुमचा विश्‍वास आहे का?

परादीस पृथ्वीवर तुमचा विश्‍वास आहे का?

ही पृथ्वी एक परादीस बनेल यावर फार कमी लोक विश्‍वास करतात. पुष्कळांना वाटते की, तिचा अंत होईल. ब्रायन ली मोलीनो यांच्या पवित्र पृथ्वी (इंग्रजी) या पुस्तकानुसार, कोट्यवधी वर्षांआधी ‘विश्‍वामधील एका मोठ्या विस्फोटामुळे’ पृथ्वी अस्तित्वात आली. आणि मानवाने या पृथ्वीचा नाश केला नाही तर सरतेशेवटी ही पृथ्वी आणि संपूर्ण विश्‍वच “आतून पेटणारा अग्नीचा गोळा” बनेल असा अनेकांचा विश्‍वास आहे.

परंतु, जॉन मिल्टन या १७ व्या शतकातील इंग्रज कवीचे असे नकारात्मक विचार नव्हते. हरवलेले परादीस (इंग्रजी) या आपल्या महाकाव्यात त्यांनी लिहिले की, पृथ्वी मानवांकरता एक परादीसमय घर असण्यासाठी देवाने तिची निर्मिती केली. ते मूळ परादीस राहिले नाही. परंतु, मिल्टन यांचा असा विश्‍वास होता की, ते पुनर्स्थापित केले जाईल अर्थात येशू ख्रिस्त तारकाच्या रूपात एके दिवशी ‘आपल्या विश्‍वासू जनांना प्रतिफळ देईल आणि त्यांना स्वर्गात किंवा पृथ्वीवर सुखलोकात नेईल.’ मिल्टनने आपला भरवसा अशाप्रकारे व्यक्‍त केला: “तेव्हा संपूर्ण पृथ्वी परादीस बनेल.”

परादीस—स्वर्गात की पृथ्वीवर?

अनेक धार्मिक लोक मिल्टनशी सहमत आहेत; त्यांच्या मते, या पृथ्वीवर सोसलेल्या भारी दुःखाच्या बदल्यात त्यांना एके दिवशी प्रतिफळ नक्की मिळेल. पण त्या प्रतिफळाचा आनंद ते कोठे घेतील? “स्वर्गात की पृथ्वीवर”? हे पृथ्वीवर घडेल असे काहींना मुळीच वाटत नाही. ते म्हणतात की, पृथ्वी सोडून स्वर्गातील एका आत्मिक जगात राहिल्यावरच लोकांना “सुख” प्राप्त होईल.

स्वर्ग—एक इतिहास (इंग्रजी) या पुस्तकात, सी. मॅकडॅनल आणि बी. लँग हे लेखक म्हणतात की, दुसऱ्‍या शतकातला धर्मशास्त्रज्ञ आयरिनेयस याचा असा विश्‍वास होता की, पुनर्स्थापित परादीसमधील जीवन “दूरवरच्या स्वर्गीय जगात नव्हे तर पृथ्वीवर असेल.” त्या पुस्तकानुसार, जॉन कॅल्व्हिन आणि मार्टिन ल्यूथर या धर्मगुरूंना स्वर्गात जाण्याची आशा होती तरीपण त्यांचा असाही विश्‍वास होता की, “देव पृथ्वीला नवीन करेल.” इतर धर्माच्या लोकांनीही असाच विश्‍वास बाळगला आहे. मॅकडॅनल आणि लँग असेही म्हणतात की, काही यहुद्यांचा असा विश्‍वास होता की, देव आपल्या नियुक्‍त वेळी मानवांच्या सर्व अडचणी “दूर करेल आणि [त्यांना] संपूर्ण अर्थाने पृथ्वीवर जीवन जगायला मिळेल.” दि एन्साक्लोपिडिया ऑफ मिडल इस्टर्न मायथोलॉजी अँण्ड रिलीजन यात म्हटले आहे की, प्राचीन पर्शियन विश्‍वासानुसार, “पृथ्वीचे अपूर्व सौंदर्य पूर्ववत केले जाईल आणि लोक पुन्हा एकदा शांतीने राहतील.”

परादीसमय पृथ्वीच्या आशेचे काय झाले? पृथ्वीवरील आपले अस्तित्व केवळ क्षणिक आहे का? पहिल्या शतकातील यहुदी तत्त्ववेत्ता फिलो याने म्हटल्याप्रमाणे, ते अस्तित्व, आत्मिक जगात जाण्याआधीचा केवळ “क्षणभंगूर, सहसा क्लेशदायक अनुभव” असावा का? की देवाने पृथ्वी निर्माण करून त्यावरील परादीसमय स्थितीत मानवांना ठेवले तेव्हा त्याच्या मनात आणखी काही होते? मानवांना याच पृथ्वीवर खरी आध्यात्मिक संतुष्टी आणि सुखाचा अनुभव घडू शकतो का? याविषयी बायबल काय म्हणते ते तपासून पाहू या. लाखो लोकांनी मान्य केल्याप्रमाणे तुम्ही देखील कदाचित हे मान्य कराल की, पृथ्वीवर परादीसमय परिस्थिती निर्माण होण्याची आशा करणे खरोखर वाजवी आहे.

[३ पानांवरील चित्र]

परादीस पुन्हा स्थापले जाईल असा जॉन मिल्टन या कवीचा विश्‍वास होता

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुखपृष्ठ: पृथ्वी: U.S. Fish & Wildlife Service, Washington, D.C./NASA

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृथ्वी: U.S. Fish & Wildlife Service, Washington, D.C./NASA; जॉन मिल्टन: Leslie’s