व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राज्य संदेशाचा स्वीकार करण्यास इतरांना साहाय्य करणे

राज्य संदेशाचा स्वीकार करण्यास इतरांना साहाय्य करणे

राज्य संदेशाचा स्वीकार करण्यास इतरांना साहाय्य करणे

“अग्रिप्पाने पौलाला म्हटले, ‘मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस!’”—प्रेषितांची कृत्ये २६:२८.

१, २. प्रेषित पौल, सुभेदार फेस्त आणि राजा हेरोद अग्रिप्पा यांच्यापुढे कसा आला?

सा.यु. ५८ साली रोमी सुभेदार पुर्क्य फेस्त याला भेटण्यास राजा हेरोद अग्रिप्पा दुसरा आणि त्याची बहीण बर्णीका आली. सुभेदार फेस्ताच्या निमंत्रणाचा स्वीकार करून ते ‘मोठ्या थाटामाटाने सरदार व नगरातील मुख्य लोकांसह दरबारात आले.’ फेस्ताने हुकूम दिल्यावर ख्रिस्ती प्रेषित पौलाला त्यांच्यासमोर आणण्यात आले. येशू ख्रिस्ताचा हा अनुयायी सुभेदार फेस्ताच्या न्याय सिंहासनासमोर कसा काय आला?—प्रेषितांची कृत्ये २५:१३-२३.

फेस्ताने त्याच्या या पाहुण्यांना पौलाविषयी जी माहिती दिली त्यावरून या प्रश्‍नाचे उत्तर मिळते. त्याने म्हटले: “अग्रिप्पा, राजे व आम्हाबरोबर उपस्थित असलेले सर्व जनहो, ह्‍या माणसाला तुम्ही पाहता ना? ह्‍याला ह्‍यापुढे जिवंत ठेवू नये असे ओरडत यहूद्यांच्या सर्व समुदायाने यरुशलेमेस व येथेहि मला अर्ज केला; परंतु त्याने मरणदंडास योग्य असे काही केले नाही असे मला कळून आले, आणि त्याने स्वतः बादशहाजवळ न्याय मागितला म्हणून त्याला पाठविण्याचे मी ठरविले. ह्‍याविषयी मी आपल्या स्वामीला निश्‍चित असे लिहिण्यासारखे काही नाही, तुमच्यापुढे व विशेषेकरून अग्रिप्पा राजे, आपणापुढे ह्‍याला आणले आहे; अशा हेतूने की, चौकशी झाली म्हणजे मला काहीतरी लिहावयास सापडावे. कारण बंदिवानास पाठविताना त्याच्यावरील दोषारोप न कळविणे मला ठीक दिसत नाही.”—प्रेषितांची कृत्ये २५:२४-२७.

३. धार्मिक पुढाऱ्‍यांनी पौलावर आरोप का लावले?

फेस्ताच्या शब्दांवरून असे सूचित होते की पौलावर राजद्रोहाचा खोटा आरोप लावण्यात आला होता; या गुन्ह्याची शिक्षा मृत्यूदंड होती. (प्रेषितांची कृत्ये २५:११) पण पौल निर्दोष होता. हे आरोप जेरूसलेममधील धार्मिक पुढाऱ्‍यांनी मत्सरापायी लावले होते. ते पौलाच्या राज्य घोषणेच्या कार्याचा विरोध करत होते आणि इतर लोकांना तो येशू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास मदत करत होता यामुळे ते त्याचा द्वेष करत होते. पौलाला कडक बंदोबस्तात जेरूसलेमहून कैसरिया या बंदर शहरात आणण्यात आले. येथे त्याने कैसराजवळ न्याय मागितला. तेथून त्याला रोममध्ये नेले जाणार होते.

४. राजा अग्रिप्पा याने कोणते विलक्षण विधान केले?

कल्पना करा, पौल सुभेदाराच्या दरबारात आणि तेसुद्धा रोमी साम्राज्याच्या एका मुख्य प्रदेशाच्या शासकासहित इतर वरिष्ठांसमोर उभा आहे. राजा अग्रिप्पा पौलाकडे वळून म्हणतो: “तुला स्वतःच्या तर्फे बोलावयास परवानगी आहे.” पौलाच्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागतात तेव्हा एक विलक्षण गोष्ट घडते. पौलाच्या बोलण्याचा राजाच्या मनावर परिणाम होऊ लागतो. शेवटी राजा अग्रिप्पा त्याला म्हणतो: “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस!”—प्रेषितांची कृत्ये २६:१-२८.

५. अग्रिप्पा याला बोललेले पौलाचे शब्द इतके प्रभावी का ठरले?

जरा विचार करा! पौलाने निपुणतेने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे एका राजाच्या मनावर देवाच्या वचनाच्या भेदक सामर्थ्याचा परिणाम झाला. (इब्री लोकांस ४:१२) पौलाने दिलेले प्रत्युत्तर इतके प्रभावी का ठरले? आणि शिष्य बनवण्याच्या आपल्या कार्यात कामी पडेल असे पौलाकडून आपण काय शिकू शकतो? पौलाच्या प्रत्युत्तराकडे बारकाईने पाहिल्यास, दोन गोष्टी अगदी स्पष्ट होतात: (१) ऐकणाऱ्‍यांचे मन वळेल अशाप्रकारे पौल बोलला. (२) एक निपुण कामकरी त्याच्याजवळ असलेल्या साधनांचा प्रभावीपणे उपयोग करतो त्याप्रमाणे पौलाने देवाच्या वचनाच्या ज्ञानाचा प्रभावीपणे उपयोग केला.

मन वळविण्याच्या कलेचा उपयोग करा

६, ७. (अ) बायबलमध्ये “मन वळविणे” ही संज्ञा कोणत्या अर्थाने वापरली आहे? (ब) इतरांना बायबलच्या शिकवणुकी स्वीकारण्यास मदत करण्याशी मन वळविण्याचा कसा संबंध आहे?

प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात, मन वळविणे याकरता असलेल्या ग्रीक संज्ञांचा वारंवार पौलाच्या संबंधात उपयोग करण्यात आला आहे. शिष्य बनवण्याच्या आपल्या कार्याशी याचा काय संबंध आहे?

व्हाईन यांची एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेन्ट वड्‌र्स यानुसार, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या मूळ भाषेत, “मन वळविणे” म्हणजे “जिंकून घेणे” अथवा “युक्‍तिवाद किंवा नैतिक विचारांच्या साहाय्याने मन बदलणे.” मूळ अर्थाचे परीक्षण केल्याने अधिक बोध प्राप्त होतो. त्यातून भरवशाचा अर्थ ध्वनित होतो. त्याअर्थी, बायबलमधील विशिष्ट शिकवणूक स्वीकारण्याकरता जर तुम्ही एखाद्या व्यक्‍तीचे मन वळविले तर तुम्ही तिचा भरवसा जिंकून घेतला आहे, जेणेकरून ती त्या शिकवणुकीच्या सत्यतेवर विश्‍वास ठेवू लागते. अर्थात, केवळ बायबल काय म्हणते एवढे सांगितल्याने एक व्यक्‍ती त्यावर विश्‍वास ठेवून त्यानुसार कृती करणार नाही. तुम्ही जे सांगताहात ते सत्य असल्याची तुमचे ऐकणाऱ्‍याला खात्री असली पाहिजे; मग ती व्यक्‍ती वयाने लहान असो, तुमच्या शेजारी राहणारी असो, सहकर्मचारी वा शाळासोबती असो किंवा नात्यातली असो.—२ तीमथ्य ३:१४, १५.

८. एका व्यक्‍तीला एखाद्या शास्त्रवचनीय सत्याची खात्री पटवून देण्यात कशाचा समावेश आहे?

देवाच्या वचनातून तुम्ही जे घोषित करता ते सत्य आहे याची खात्री एखाद्या व्यक्‍तीला तुम्ही कशी पटवू शकता? पौलाने तर्कशुद्ध युक्‍तिवाद, सयुक्‍तिक वादविवाद आणि प्रामाणिक विनवणी करण्याद्वारे, ज्यांच्याशी त्याने संभाषण केले त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. एखादी गोष्ट खरी आहे असे केवळ घोषित करणे पुरेसे नाही, तर तुमचे विधान खरे आहे हे दाखवण्याकरता तुम्ही समाधानकारक पुरावा सादर केला पाहिजे. हे कसे करता येईल? तुमचे विधान हे वैयक्‍तिक मतावर नव्हे, तर सर्वतोपरी देवाच्या वचनावर आधारित असले पाहिजे. तसेच शास्त्रवचनातून मनःपूर्वक विधाने करताना ती शाबीत करणारा अतिरिक्‍त पुरावा देखील द्या. (नीतिसूत्रे १६:२३) आज्ञाधारक मानवजात परादीस पृथ्वीवर आनंदी जीवन उपभोगेल असा मुद्दा मांडल्यास, लूक २३:४३ किंवा यशया ६५:२१-२५ यांसारख्या शास्त्रवचनांचा संदर्भ देऊन त्या विधानाला पुष्टी द्या. तुमच्या शास्त्रवचनीय मुद्द्‌याकरता अतिरिक्‍त पुरावा तुम्हाला कशाप्रकारे देता येईल? श्रोत्याच्या अनुभवातील उदाहरणांचा उपयोग तुम्ही करू शकता. सूर्यास्ताचे निरामय सौंदर्य, फुलांचा मधुर गंध, रसरशीत फळांचा स्वाद किंवा पिलाला भरवणाऱ्‍या पक्षिणीचे दृश्‍य पाहून होणारा आनंद यांसारख्या साध्या, विनामूल्य लाभणाऱ्‍या सुखद अनुभवांची तुम्ही त्याला आठवण करून देऊ शकता. हे सुखद अनुभव एक गोष्ट शाबीत करतात, ती अशी की आपण या पृथ्वीवर जीवनाचा आनंद लुटावा ही निर्माणकर्त्याची इच्छा आहे. हे समजून घेण्याकरता तुमच्या श्रोत्याला मदत करा.—उपदेशक ३:११, १२.

९. आपण प्रचार कार्यात समजूतदारपणा कसा दाखवू शकतो?

बायबलमधील एखाद्या शिकवणुकीचा स्वीकार करण्यास एखाद्या व्यक्‍तीचे मन वळविण्याचा प्रयत्न करताना अतिउत्साहामुळे आपले बोलणे अवाजवी वाटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा समोरची व्यक्‍ती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकात हा इशारा देण्यात आला आहे: “दुसऱ्‍या व्यक्‍तीला प्रिय वाटणाऱ्‍या विश्‍वासाला खोटे ठरवणारे सत्य विधान, मग त्यासोबत पुराव्यादाखल शास्त्रवचनांची लांबलचक यादी जरी पुरवली तरीसुद्धा ते सहसा आनंदाने स्वीकारले जात नाही. उदाहरणार्थ, लोकप्रिय सण मूर्तिपूजक प्रथांपासून सुरू झाले म्हणून ते पाळणे योग्य नाही असे सडेतोड विधान केले तरी लोकांचे पूर्वीचे मत त्यामुळे बदलणार नाही. त्यामुळे समजूतदारपणे युक्‍तिवाद करणे अधिक परिणामकारक ठरू शकते.” समजूतदारपणा दाखवण्याचा आवर्जून प्रयत्न करणे का महत्त्वाचे आहे? प्रशाला पाठ्यपुस्तक म्हणते: “समजूतदारपणे युक्‍तिवाद करण्याच्या प्रवृत्तीमुळे चर्चेला प्रोत्साहन मिळते, लोकांच्या विचारांना चालना मिळते आणि भविष्यात आणखी संभाषणाचा मार्ग खुला होतो. मन वळविण्याकरता हे अतिशय परिणामकारक ठरू शकते.”—कलस्सैकर ४:६.

मन वळविताना अंतःकरणाचा ठाव घेणे

१०. पौलाने अग्रिप्पासमोर आपल्या बचावात्मक भाषणाची कशाप्रकारे सुरवात केली?

१० आता आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय २६ यातील पौलाच्या बचावात्मक भाषणाकडे बारकाईने लक्ष देऊ. त्याने या भाषणाला कशाप्रकारे सुरवात केली याकडे लक्ष द्या. अग्रिप्पाचे आपली बहीण बर्णीका हिच्यासोबत अवैध संबंध असल्याचे सर्वज्ञात होते तरीसुद्धा आपल्या भाषणाच्या सुरवातीला पौलाने अग्रिप्पाची एका योग्य कारणासाठी स्तुती केली. पौलाने म्हटले: “अग्रिप्पा राजे, यहूद्यांच्या चालीरीती व त्यांच्या वादविषयक बाबी ह्‍यात आपण विशेष जाणते आहा, आणि यहूदी ज्याविषयी माझ्यावर दोषारोप ठेवतात त्या सर्वांविषयी मला आज आपणापुढे प्रत्युत्तर करावयाचे आहे, ह्‍यावरून मी स्वतःला धन्य समजतो; आणि मी आपल्याला विनंती करितो की, शांतपणे माझे भाषण ऐकून घ्या.”—प्रेषितांची कृत्ये २६:२, ३.

११. पौलाने अग्रिप्पाला आपल्या बोलण्यातून कशाप्रकारे आदर दाखवला आणि यामुळे कोणता फायदा झाला?

११ पौलाने अग्रिप्पाला राजे या त्याच्या पदवीने संबोधून त्याच्या उच्च पदाचा मान राखला, हे तुमच्या लक्षात आले असेल. त्याचे हे संबोधन आदरयुक्‍त होते आणि योग्य शब्द निवडून पौलाने अग्रिप्पाचा सन्मान केला. (१ पेत्र २:१७) आपल्या यहुदी प्रजेच्या सर्व गुंतागुंतीच्या चालीरिती व कायद्यांविषयी अग्रिप्पाला ज्ञान होते याची पौलाला जाणीव असल्यामुळे, अशा जाणत्या शासकासमोर आपला बचाव करण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्‍त केला. ख्रिस्ती असल्यामुळे आपण अग्रिप्पापेक्षा वरचढ आहोत अशा आविर्भावाने पौल वागला नाही. (फिलिप्पैकर २:३) उलट त्याने राजाला आपले भाषण शांतपणे ऐकून घेण्याची विनंती केली. अशारितीने पौलाने एक ग्रहणशील वातावरण निर्माण केले ज्यात अग्रिप्पाला आणि इतर श्रोत्यांनाही त्याचे म्हणणे स्वीकारणे सोपे जाईल. त्याने जणू एक पाया घातला, समान दृष्टिकोनांचा एक आधार तयार केला ज्यावर तो आपला तर्कवाद उभारू शकत होता.

१२. राज्य घोषणेच्या कार्यात आपण आपल्या ऐकणाऱ्‍यांच्या अंतःकरणाचा कशाप्रकारे ठाव घेऊ शकतो?

१२ पौलाने अग्रिप्पाशी बोलताना केले त्याप्रमाणे, आपणसुद्धा राज्य संदेश सादर करताना प्रस्तावनेपासून समाप्तीपर्यंत ऐकणाऱ्‍यांच्या अंतःकरणाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करू या. ज्या व्यक्‍तीला आपण प्रचार करत आहोत तिच्याविषयी मनःपूर्वक आदर दाखवण्याद्वारे आणि त्याच्या किंवा तिच्या विशिष्ट पार्श्‍वभूमीविषयी व विचारसरणीविषयी प्रामाणिक आस्था व्यक्‍त करण्याद्वारे आपण हे करू शकतो.—१ करिंथकर ९:२०-२३.

देवाच्या वचनाचा निपुणतेने उपयोग करा

१३. पौलाप्रमाणे तुम्हीही आपल्या ऐकणाऱ्‍यांना कशाप्रकारे प्रेरित करू शकता?

१३ पौलाला आपल्या ऐकणाऱ्‍यांना सुवार्तेकडे लक्ष देऊन त्यानुसार वागण्यास प्रवृत्त करण्याची इच्छा होती. (१ थेस्सलनीकाकर १:५-७) त्याकरता, त्याने त्यांच्या लाक्षणिक हृदयाला, अर्थात एका व्यक्‍तीत असलेल्या प्रेरक शक्‍तीला आवाहन करण्याचा प्रयत्न केला. आता आपण पौलाने अग्रिप्पासमोर केलेल्या बचावाकडे परत येऊन, मोशे व संदेष्टे यांनी केलेल्या विधानांचा संदर्भ देण्याद्वारे त्याने कशाप्रकारे ‘देवाचे वचन नीट हाताळले’ याकडे लक्ष देऊ.—२ तीमथ्य २:१५.

१४. पौलाने अग्रिप्पासमोर असताना मन वळवण्याच्या कलेचा कसा वापर केला हे स्पष्ट करा.

१४ अग्रिप्पा केवळ नावापुरता यहुदी होता हे पौलाला माहीत होते. यहुदी धर्माविषयी अग्रिप्पाला ज्ञान आहे हे लक्षात घेऊन, पौलाने असा युक्‍तिवाद केला की तो आपल्या प्रचारात खरे तर मशीहाचा मृत्यू व पुनरुत्थान यासंबंधाने ‘ज्या गोष्टी होणार आहेत म्हणून संदेष्ट्यांनी व मोशेने सांगितले, त्याखेरीज दुसरे काही सांगत नव्हता.’ (प्रेषितांची कृत्ये २६:२२, २३) अग्रिप्पाला थेटपणे संबोधून पौलाने विचारले: “हे राजा अग्रिप्पा, संदेष्ट्यांवर आपला विश्‍वास आहे ना?” आता अग्रिप्पा पेचात पडला. जर त्याने म्हटले की संदेष्ट्यांवर त्याचा विश्‍वास नाही, तर एक यहुदी धर्म मानणारा या नात्याने त्याची ख्याती धुळीस मिळेल. पण जर त्याने पौलाच्या युक्‍तिवादाला सहमती दर्शवली तर तो जाहीररित्या पौलाचा पक्ष घेत असल्यासारखे भासेल आणि लोक त्याला ख्रिस्ती म्हणतील अशी त्याला भीती होती. पौलाने सुज्ञपणे स्वतःच्या प्रश्‍नाचे स्वतःच उत्तर दिले व म्हटले: “[आपला] विश्‍वास आहे, हे मला ठाऊक आहे.” (तिरपे वळण आमचे.) यावर अग्रिप्पाच्या हृदयाने त्याला काय उत्तर देण्यास प्रेरित केले? तो म्हणाला: “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवितोस!” (प्रेषितांची कृत्ये २६:२७, २८) अग्रिप्पा ख्रिस्ती झाला नाही तरीसुद्धा पौलाने काही प्रमाणात का होईना त्याच्या मनावर आपल्या संदेशाचा प्रभाव पाडला यात शंका नाही.—इब्री लोकांस ४:१२.

१५. थेस्सलनीका येथे पौल कशाप्रकारे एका मंडळीची स्थापना करू शकला?

१५ पौलाने ज्याप्रकारे सुवार्ता सादर केली त्यात घोषणा व मन वळविणे दोन्हींचा समावेश होता याकडे तुम्ही लक्ष दिले का? ‘देवाचे वचन नीट हाताळण्यासोबतच’ पौलाने या विशिष्ट पद्धतीचा अवलंब केल्यामुळेच त्याच्या श्रोत्यांपैकी काहीजण निव्वळ ऐकणारे राहिले नाहीत तर ते सत्य मानणारे बनले. पौलाने थेस्सलनीका येथील सभास्थानात यहुद्यांना व देवभीरू विदेश्‍यांना प्रचार केला तेव्हा असे घडले. प्रेषितांची कृत्ये १७:२-४ (NW) यातील अहवाल म्हणतो: “पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्‍याचे अगत्य होते, . . . तेव्हा त्यांच्यापैकी काही जण सत्य मानू लागले.” पौल मन वळविण्याच्या कलेत पारंगत होता. त्याने शास्त्रवचनांच्या साहाय्याने युक्‍तिवाद केला, स्पष्टीकरण केले आणि शाबीत केले की येशू हा प्राचीन काळी प्रतिज्ञा केलेला मशीहा होता. याचा परिणाम काय झाला? सत्य मानणाऱ्‍यांची एक मंडळी स्थापन करण्यात आली.

१६. राज्य घोषणेच्या कार्यात तुम्हाला अधिक आनंद कसा मिळू शकेल?

१६ देवाच्या वचनाचा खुलासा करताना तुम्हाला देखील मन वळविण्याच्या कलेचा अधिक कौशल्याने वापर करता येईल का? तुम्ही असे केल्यास, देवाच्या राज्याबद्दल लोकांना प्रचार करण्याच्या व शिकवण्याच्या कार्यात तुम्हाला अधिक समाधान व आनंद मिळेल. प्रचार कार्यात बायबलचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचनांचे पालन करणाऱ्‍या सुवार्तेच्या प्रचारकांना हाच अनुभव आला आहे.

१७. सेवाकार्यात बायबलचा उपयोग करणे फायदेकारक आहे हे दाखवण्याकरता एखादा वैयक्‍तिक अनुभव सांगा अथवा या परिच्छेदातील अनुभवाचा सार सांगा.

१७ उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रवासी पर्यवेक्षकाने असे लिहिले: “बरेच बंधू व भगिनी आता घरोघरच्या साक्षकार्यात बायबल हातात घेऊन जाऊ लागले आहेत. यामुळे भेटणाऱ्‍या लोकांना निदान एक तरी शास्त्रवचन वाचून दाखवणे त्यांना शक्य झाले आहे. घरमालकांना व प्रचारकांना देखील, आपल्या साक्षकार्याचा संबंध केवळ मासिकांशी व पुस्तकांशी न लावता बायबलशी त्याचा संबंध ओळखण्यास मदत झाली आहे.” अर्थात, प्रचार कार्यात खुलेआम हातात बायबल घ्यावे किंवा घेऊ नये हे स्थानिक प्रथांसहित, बऱ्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इतरांना राज्य संदेशाचा स्वीकार करण्यास त्यांचे मन वळविण्याकरता देवाच्या वचनाचा कौशल्यपूर्ण वापर करण्याचा नावलौकिक मिळवण्याचा आपला प्रयत्न असावा.

सेवाकार्यासंबंधी देवाचा दृष्टिकोन बाळगा

१८, १९. (अ) देवाचा आपल्या सेवाकार्यासंबंधी कसा दृष्टिकोन आहे आणि आपणही त्याचा दृष्टिकोन कशाप्रकारे बाळगू शकतो? (ब) प्रभावी पुनर्भेटी करण्याकरता कोणत्या सूचना सहायक ठरतील? (पृष्ठ १६ वर “प्रभावी पुनर्भेटी तुम्हाला कशा करता येतील” या शीर्षकाची पेटी पाहा.)

१८ आपल्या ऐकणाऱ्‍यांच्या हृदयाचा ठाव घेण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सेवाकार्यासंबंधी देवाचा दृष्टिकोन बाळगणे व धीर धरणे. देवाची इच्छा आहे की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीमथ्य २:३, ४) आपलीही हीच इच्छा नाही का? यहोवा देखील धीर धरतो आणि यामुळे बऱ्‍याच जणांना पश्‍चात्ताप करण्याची संधी मिळत आहे. (२ पेत्र ३:९) राज्याचा संदेश ऐकून घेणारी एखादी व्यक्‍ती आपल्याला भेटते तेव्हा, त्यांची आस्था वाढवण्याकरता कदाचित त्यांची वारंवार भेट घेणे आवश्‍यक असू शकते. सत्याची बीजे अंकुरित होण्याकरता पुरेसा वेळ जाऊ देणे व धीर धरण्याची प्रवृत्ती असणे गरजेचे आहे. (१ करिंथकर ३:६) “प्रभावी पुनर्भेटी तुम्हाला कशा करता येतील” या शीर्षकाच्या पेटीत घरमालकाची आस्था वाढवण्याकरता बऱ्‍याच सहायक सूचना देण्यात आल्या आहेत. आठवणीत असू द्या, लोकांचे जीवन, त्यांच्या समस्या व परिस्थिती सतत बदलत राहते. बऱ्‍याचदा त्यांच्याकडे जाऊनही कदाचित ते आपल्याला घरी भेटणार नाहीत, पण प्रयत्न करत राहिल्यास शेवटी चांगले फळ आपल्याला मिळू शकेल. आपण त्यांना देवाचा तारणाचा संदेश ऐकण्याची संधी देऊ इच्छितो. तेव्हा, इतरांना राज्याचा संदेश स्वीकारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने मन वळविण्याचे कौशल्य विकसित करण्याकरता, अधिक सुबुद्धी देण्याची यहोवा देवाला विनंती करा.

१९ राज्य संदेशाबद्दल अधिक ऐकून घेण्याची इच्छा असणारी व्यक्‍ती सापडल्यावर ख्रिस्ती कामकरी या नात्याने आपण आणखी काय करू शकतो? याविषयी आमचा पुढील लेख सहायक ठरेल.

तुम्हाला आठवते का?

• राजा अग्रिप्पा याच्यासमोर पौलाने केलेले बचावात्मक भाषण प्रभावी का ठरले?

• आपल्या संदेशाने अंतःकरणाचा ठाव घ्यावा म्हणून काय करता येईल?

• अंतःकरणाचा ठाव घेण्याकरता देवाच्या वचनाचा परिणामकारक रितीने वापर करण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल?

• आपण आपल्या सेवाकार्याकडे देवाच्या दृष्टिकोनातून कसे पाहू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१६ पानांवरील चौकट/चित्रे]

प्रभावी पुनर्भेटी तुम्हाला कशा करता येतील

• लोकांबद्दल प्रामाणिक आस्था बाळगा.

• चर्चेकरता त्या व्यक्‍तीला आवडेल असा बायबल विषय निवडा.

• पुढच्या प्रत्येक भेटीकरता पाया तयार करा.

• त्या व्यक्‍तीचा निरोप घेतल्यावरही तिच्याविषयी विचार करत राहा.

• आस्था वाढवण्यासाठी लवकरात लवकर, जमल्यास एक किंवा दोन दिवसांत पुन्हा भेट घ्या.

• तुमचे उद्दिष्ट बायबल अभ्यास सुरू करण्याचे आहे हे आठवणीत असू द्या.

• यहोवाने त्या व्यक्‍तीच्या मनातील आस्था वाढवावी म्हणून प्रार्थना करा.

[१५ पानांवरील चित्र]

सुभेदार फेस्त व राजा अग्रिप्पा यांच्यासमोर बोलताना पौलाने मन वळविण्याच्या कलेचा वापर केला