व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

जन्मरत्न वापरण्याविषयी ख्रिश्‍चनांचा काय दृष्टिकोन असला पाहिजे?

काही संस्कृतींमध्ये, जन्मरत्नांचा संबंध एखाद्याचा जन्म झालेल्या महिन्याशी जोडला जातो. एखाद्या ख्रिश्‍चनाने एखाद्या विशिष्ट रत्नाची रत्नजडीत अंगठी घालावी की नाही हा त्याचा व्यक्‍तिगत निर्णय आहे. (गलतीकर ६:५) परंतु हा निर्णय घेण्याआधी, असे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत ज्यांचा विचार केला पाहिजे.

एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका यात असे म्हटले आहे, की जन्मरत्न म्हणजे, “एखाद्याच्या जन्मदिवसानुसार प्रत्येक ग्रहाचे असलेले विशिष्ट रत्न, आणि हे रत्न अंगावर धारण करणारा शकुनी किंवा अपशकुनी ठरू शकतो अशी लोकांची सर्वसामान्य धारणा आहे.” पुढे असेही म्हटले आहे, की “विशिष्ट रत्नांमध्ये अद्‌भुत गूढ शक्‍ती आहे असे फलज्योतिषींचे म्हणणे आहे.”

खासकरून प्राचीन काळांत पुष्कळांचा असा विश्‍वास होता, की जन्मरत्न धारण करणाऱ्‍यांस लाभ होत असे. खरे ख्रिस्ती असा विश्‍वास करतात का? नाही, कारण त्यांना माहीत आहे, की ज्यांनी यहोवाला सोडले व जे ‘भाग्यदेवतेवर’ भरवसा करत होते त्यांचा यहोवाने अव्हेर केला.—यशया ६५:११.

मध्ययुगादरम्यान, भविष्य सांगणारे वर्षातील प्रत्येक महिन्यासाठी एक रत्न निवडत असत. त्यांनी लोकांना, इजा होण्यापासून बचाव होण्याकरता त्यांचा जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याचे रत्न अंगावर धारण करण्यास प्रोत्साहित केले. परंतु पैसे कमावण्यासाठी अशा भविष्य सांगणाऱ्‍यांवर भरवसा ठेवणे ख्रिश्‍चनांकरता शास्त्रवचनांनुसार चुकीचे ठरेल कारण बायबल अशा लोकांचा निषेध करते.—अनुवाद १८:९-१२.

अंगठीत जन्मरत्न जडलेले आहे म्हणून ख्रिश्‍चनांनी त्या अंगठीला महत्त्व देणे देखील उचित ठरणार नाही. यहोवाचे साक्षीदार वाढदिवस साजरा करत नाहीत. कारण त्या दिवशी, जिचा वाढदिवस असतो त्या व्यक्‍तीला जास्त महत्त्व दिले जाते आणि बायबलमध्ये केवळ अशा शासकांच्या वाढदिवसांचा उल्लेख आहे जे देवाची सेवा करत नव्हते.—उत्पत्ति ४०:२०; मत्तय १४:६-१०.

काही लोकांना वाटते, की जन्मरत्नजडीत अंगठी घातल्याने, अंगठी धारण करणाऱ्‍याच्या व्यक्‍तिमत्त्वावर चांगला प्रभाव पडतो. परंतु, खरे ख्रिस्ती असा विश्‍वास करत नाहीत, कारण एक व्यक्‍ती पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली आल्यावर आणि शास्त्रवचनीय तत्त्व आपल्या जीवनात लागू केल्यावरच ‘नवे मनुष्यत्व’ धारण करते, हे त्यांना माहीत आहे.—इफिसकर ४:२२-२४.

सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, उद्देश. जन्मरत्नजडीत अंगठी घालायची की नाही, हा निर्णय घेण्याआधी ख्रिश्‍चन स्वतःला असे विचारू शकतात: ‘हे रत्न, जन्मरत्न म्हणून समजले जात असले तरी, ते मला आवडतात म्हणून मी ही अंगठी घालू इच्छितो का? की, अशा रत्नांबद्दल काही लोकांच्या अंधश्रद्धेचा माझ्यावर थोडा का होईना पण प्रभाव पडला आहे म्हणून मी ती अंगठी घालू इच्छितो?’

ख्रिश्‍चनांनी, अशी रत्नजडीत अंगठी घालण्यामागचा उद्देश समजण्यासाठी आपल्या अंतःकरणाचे परीक्षण करावे. शास्त्रवचने सांगतात: “सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यांत जीवनाचा उगम आहे.” (नीतिसूत्रे ४:२३) जन्मरत्नांच्या बाबतीत निर्णय घेताना, प्रत्येक ख्रिश्‍चनाने आपल्या हेतूचा आणि आपल्या निर्णयांचा स्वतःवर आणि इतरांवर काय परिणाम होऊ शकतात याचा विचार केला पाहिजे.—रोमकर १४:१३.